संपादकीय

संपादकीय

संपादकीय

- ऐसीअक्षरे

माय म्हनता म्हनता, ओठ ओठालागी भिडे,
आत्या म्हनता म्हनता, केव्हडं अंतर पडे ,
ताता म्हनता म्हनता, दातामधी जीभ अडे ,
जीजी म्हनता म्हनता, झाला जिभेला निवारा ,
सासू म्हनता म्हनता, गेला तोंडातून वारा
-बहिणाबाई

माणूस म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक आकार उभा राहातो. त्याला डोकं, धड, हातपाय असतात. चेहेरा असतो - डोळे, नाक, कान यांनी भरलेला. पण या शरीरापलिकडचं, त्याला गुंतवून ठेवणारं, इकडून तिकडून ताणणारं नात्यांचं जाळं आपल्याला दिसत नाही. या सगळ्या अवयवांपैकी एखादा अवयव नसूनही माणसाचा जन्म होतो, अनेक वेळा आपल्या परीने तो कपाळी आलेलं जीवन जगतोही. पण नात्याविरहित कुठचाच माणूस जन्मत नाही. जन्मायच्या आधीच ती नाळ त्याच्या आईशी जोडलेली असते. आणि आईचं आईपण यायलाही तिचं त्या मुलाच्या बापाशी नातं लागतंच. आणि त्या दोघांची नाती, त्यांची इतरांशी नाती असं करत करत आपण जगभर पसरलेल्या या जाळ्यात आपल्या गाठीपासून जगातल्या इतर कुठच्याही-कुणाच्याही गाठीपर्यंत सहा पावलांमध्ये पोचतो.

या जगात आत्ता अस्तित्वात असलेल्या व्यक्तींबरोबर आपले धागे जुळलेले आहेत तसेच इतिहासातल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाशीही आपण या गाठींनी बांधलेलो आहोत. मुलीकडे आईकडून येणाऱ्या, त्या आईकडे तिच्या आईकडून येणाऱ्या मायटोकाँड्रियल डीएनएचं सूत्र पकडून काळात मागे मागे जात गेलो की आपल्या सर्वांचीच पसरलेली मुळं एका फुटव्यापाशी येऊन थांबतात. आपल्या सर्वांचेच आयुष्याचे धागे पुरेसे मागे नेले की सुमारे लाख ते दोन लाख वर्षांपूर्वीच्या आफ्रिकेतल्या एका आदीम स्त्रीपर्यंत पोचतात. ज्ञात इतिहासाला जन्म देणारी ती अज्ञात माता - महामाया - आपल्या सर्वांनाच युगानुयुगं पसरलेल्या एका अतिक्लिष्ट जाळ्यात जोडते. हे जाळं ऊर्ध्वमूलअधःशाखं पसरलेल्या महावृक्षासारखं आहे. त्याच्या फांद्या काळातून पुढे झेपावतात आणि आजपर्यंत पसरलेल्या या पानांचा एक महाप्रचंड डेरेदार विस्तार दिसतो.

ही झाली रक्ताची नाती. ती आपल्या आईवडिलांशी किंवा पितरांशी असलेली भूतकाळातली रक्ताची नाती असू शकतात, किंवा आपल्या जोडीदाराशी असलेलं आपल्या मुलांमार्फतचं भविष्यकाळातल्या रक्ताचं नातं असू शकतं. पण माणसांची माणसांशी असलेली नाती रक्तावरच थांबत नाहीत. मैत्रीचे धागे या जाळ्याच्या समांतर, कधी रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक भक्कम जाळी निर्माण करतात. तर काहींसाठी त्यांची तत्त्वं आणि ती तत्त्वं पुढे नेणाऱ्या संघटना यांच्याशी असलेलं वैयक्तिक नातं रक्तापेक्षा जास्त दाट बनतं.

बहिणाबाईंच्या वर दिलेल्या कवितेत वेगवेगळ्या नात्यांशी आपली जवळीक किती असते हे सांगितलं आहे. किंवा जीएंची भाषा वापरायची झाली तर, त्या नात्यात आपलं आतडं किती गुंतलं आहे, यावर टिप्पणी आहे. आपल्या प्रत्येकाचं प्रत्येक नातं हे वैयक्तिक असतं, आणि 'तुमचं नि आमचं सेमच असतं' असं कितीही म्हटलं तरी ते तसं नसतं.

नवीन तंत्रज्ञानाने या सर्व जाळ्यांना प्रत्यक्षरूप देण्यात हातभार लावलेला आहे. आंतरजाल हेच एक मोठ्ठं सर्वव्यापक जाळं आहे. त्यातही फेसबुकसारख्या कंपनीने त्या जाळ्यात एक उपजाळं तयार करून लोकांना आपापल्या केंद्रापासून मैत्रीचे, नात्यांचे धागे नोंदवायला उद्युक्त केलेलं आहे. हे जंजाळ इतकं खेचणारं झालं आहे की लोक दिवसाचे तासन्‌तास त्यात अडकून पडलेले दिसतात. जुन्या हरवलेल्या नात्यांना उजाळा देतात. हजारो मैल दूर असलेल्यांशी गप्पा मारतात. मध्यमवर्गातून उच्च मध्यमवर्गात गेल्याचे पुरावे परदेशी ट्रिपचे आणि उंची हॉटेलांत जेवणाचे फोटो टाकून देतात. मोदीभक्त आणि मोदीद्वेष्टे अशी रस्सीखेच एसी ऑफिसातल्या गुबगुबीत खुर्चीत बसून खेळतात.

या सर्व प्रकारच्या नात्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणंही प्रचंड मोठं काम आहे. पण त्याच्या काही पैलूंना स्पर्शायचा प्रयत्न करणारा हा ऐसीचा दिवाळी अंक. नाती तयार करणं सोपं असतं पण ती राखण्यासाठी सातत्याने कष्ट घ्यावे लागतात हे अप्रत्यक्षपणे सुचवणारा नंदा खरे यांचा लेख, धनंजयने लिहिलेली नात्यांप्रमाणेच पावलोपावली दुभंगत जाणारी कथा, जयदीप चिपलकट्टी यांची चक्रावून टाकणारी विचित्र लोकशाहीची कथा यात आहेत. तसेच कलेतील गुरूशिष्य परंपरेभोवती घुटमळणारे; कुमार गंधर्व आणि पळशीकरांसारख्या गुरूंबद्दल माहिती सांगणारे शिष्यांचे लेख आहेत. विनय दाभोळकरांचा अध्यात्माकडे सिनेमा नाटकांच्या रूपकांतून पाहाणारा लेख, उसंत सखू, ज्यूनियर ब्रह्मे वगैरेंचे गमतीदार लेख, आपल्या आजीआजोबांची व्यक्तिचित्रणं, अनेक कविता, फ्लॅश कथा, विज्ञानकथा यांनी हा अंक भरलेला आहे. मुखपृष्ठ आणि आतल्या चित्रांतून नात्यांच्या जोडणीचे वेगवेगळे पैलूही संदीप देशपांडेने दिमाखदार पद्धतीने सादर केलेले आहेत. ऐसीच्या या सादरीकरणात बहुतांशी नवीन लेखन आहेच, पण काही पूर्वप्रकाशित पण विषयाशी संलग्न लिखाणही आहे. आणि विशेष उल्लेख करण्यासारखी आदूबाळ यांची अत्यंत सशक्त कथा आहे. काही नाही वाचलंत तरी ती नक्की वाचा.

या सगळ्यांतून जे एकत्रित रसायन तयार होईल ते वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

इस्त्रिचं रुपक चित्र आवडलं. तापदायक काटेरीही.

अन्य लेख विशेषतः गुरु-शिष्य नाते आणि अध्यात्म हा विषय मध्यवर्ती ठेऊन सिनेमा-नाटकांचा घेतलेला धांडोळा वाचण्याची जबरी उत्सुकता आहे.
.
कधीही न वाचलेल्या कवितेने सुरुवात करुन पुढे पुढे जास्त गहीरे होत गेलेले,संपादकीय जबरी आवडले.
.

आपल्या आजीआजोबांची व्यक्तिचित्रणं

आने दो. Waiting eagerly.

ग्रह आणि नाती असा काही शोध लावलाय का .शुची.?

ग्रह आणि नाती असा काही शोध लावलाय का .शुची.?

ज्योतिषविषयक जे काही चिंतन, समज-गैरसमज आहेत ते ललितांमधुन मांडतेच की.

अंक उघडायला आज मुहूर्त मिळाला!

मुखपृष्ठावरची चित्ररचना आवडली. तळातली चित्रपट्टी नि त्यातलं शेवटलं चित्र सूचक.
पण त्या तुलनेत शीर्षकलेखनाचा टंकछाप नाही साजेसा वाटला. शिवाय अंकाच्या आतली सगळीच रंगसंगती करड्या छटेत करायची आवश्यकता वाटली नाही. आभाळ दाटून आल्यासारखं वाटतं कधी कधी. Wink
एकुणात सुबक.

नात्यांचे वेगळे अर्थ, ताणेबाणे वाचायला उत्सुक.

मला तर तो टंक अजिबात आवडला नाही. मराठी "मंगल" आणि असल्या फॉन्ट्स मधून बाहेर पडेल तोच सुदिन Sad

जाता जाता, मी शब्दस्पर्श नावाचा दिवाळी अंक बुकगंगावर चाळला. संगणकीय मराठी विशेषांक आहे, इंट्रेस्टिंग वाटला.

अन्य दिवाळी अंकांबद्दल निराळा धागाच उघडाल का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.