आय क्यू पंक्चरलेली बाहुली!!

ललित विनोदी

आय क्यू पंक्चरलेली बाहुली!!

लेखक - उसंत सखू

सर्दीमुळे होणारा सायनसचा त्रास सोडला तर प्रौढत्वी निज शैशवास जपणाऱ्या तनुजाचं जीवन 'आनंदाचे डोही आनंद तरंग'मय होतं. तिला सुखाची सरकारी नोकरी होती आणि तिचा कंट्रोल फ्रीक नवरा तुषार, खाजगी कंपनीत जनरल मॅनेजर होता. आईने लाडावून ठेवल्याने तनुजाला एखादी शिंक आली तरी सुट्टी घ्यायची सवय होती; ते पाहून वर्कोहोलिक तुषारचा तिळपापड व्हायचा. एकदा दातांच्या इन्फेक्शनमुळे तिचा गाल सुजला होता. तिने सुट्टी घ्यायचा निर्णय जाहीर केला. तुषार म्हणाला, "मुकाट्याने ऑफिसला जा. तू काय माधुरी दीक्षित आहेस का गाल सुजल्याने शूटिंग रद्द करायला"? तिला वाटलं, "खरंच की; पेनकिलरमुळे दुःख जाणवत नाहीये पण गाल सुजल्यामुळे सहकारी मात्र हमखास टिंगल करतील. मरू दे, काय फरक पडतो? चेहेरा लपवावा असं कोणतं माझं सौंदर्य उतू जातंय म्हणून ती खुशाल ऑफिसात गेली. 'आयला, तुझा हनुमान कसा झाला'; 'हा हा हा, अगदी भप्प्पी लाहिरी दिसते आहेस'; 'हीहीहीही, म्याडम क्यों डरा रही हो सबको. घर चली जाओ'; अशी मुक्ताफळं तिने दिवसभर एन्जॉयही केली. हळूहळू तुषारने शिताफीने तिला आवश्यक असेल तेव्हाच सुट्ट्या घेण्याची चांगली सवय लावली. नाईलाज झाल्याशिवाय औषधं घेऊ नये, या बाबतीत तिचं आणि तुषारचं एकमत होतं. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास पर्यायी उपचारांसाठी स्वतःचा पांढरा उंदीर करून घ्यायला ती तयारच असायची.

सायनसच्या त्रासासाठी अॅलोपथी औषधांना विश्रांती देऊन एकदा निरुपद्रवी उपचार घ्यावे म्हणून तनुजा एका सर्दट आवाजाच्या होमिओपथी डॉक्टरकडे गेली. त्याने निवांतपणे तिचा दैनंदिन जैविक तपशील उत्खणून काढायला घेतला. सर्दी, शेंबडाचा रंग, घनता, किती स्क्वेअर इंच डोकं जड झालंय वगैरे मूलभूत प्रश्न होते. शौचासंबंधी तब्बल पंधरा मिनिटं चिकित्सा करून घेतलेल्या सखोल माहितीवर त्याला एखादा रीसर्च पेपर लिहिता आला असता. काल काय खाल्लं, परवा काय खाल्लं वगैरे प्रश्नांची उत्तरं देण्याचा तिला जाम कंटाळा आला. आज सकाळी न्याहारी काय केली, काय जेवले, हे सगळं पोट बिघडलं नसेल तर लक्षात कशाला ठेवायचं? एक-दोनदा त्या शेंबुडल्या डॉक्टरच्या कंटाळवाण्या, अंतहीन प्रश्नावल्यांना तोंड दिल्यावर तिने साबुदाण्याच्या सगळ्या गोळ्या एकदम स्वाहा करून तोंड गोड केलं आणि उपचारांची अयशस्वी सांगता केली. पण होमिओपथीच्या डॉक्टरचा असा साबुदाणाखीर खाल्ल्यागत चिकट, गुळमट अनुभव आल्यानंतरही तिच्या मनातली निरुपद्रवी उपचार करून घेण्याची खुमखुमी जिरलेली नव्हती. तिचं या क्षेत्रातलं पुढचं गिनिपिगीकरण होण्यास कारणीभूत झाली ती म्हणजे तिच्या ऑफिसमधली स्वघोषित सुंदरी, मोहना!

ऑफिसमधली तिची सहकारी मोहना एक नंबरची कामचुकार आणि ढ होती. ती लाडेलाडे बोलून उल्लू पुरुष सहकाऱ्यांकडून आपलं काम करवून घ्यायची. तनुजा आणि इतर बायका तिला 'माणसाळलेली आहे मेली' म्हणायच्या. कार्यालयीन पुरुषांच्या 'मोहना'साठी ती आपले नाव आणि कार्यालयीन जीवनाचेही सार्थक करत होती. तिला बढाया मारायची खोड असल्याने, जे सांगते त्यातलं ५०% जादा आहे असं सगळे गृहीत धरत. दिवसभर फुलपाखरागत भिरभिरणारी मोहना अकारण तनुजाचा द्वेष करायची. तनुजाने कुठलाही दागिना, ड्रेस किंवा साडी विकत घेतली की तसेच हुबेहूब तिच्याकडेही असायचेच म्हणे. तनुजा त्यामुळे इतकी कंटाळली की नंतर नवीन काहीही वस्त्र नेसलं की मोहनाने तोंड उघडायच्या आधीच ती म्हणायची, "हा ड्रेस मी नवीन घेतला आहे आणि तुझ्याकडे असा मुळीच नाहीये. त्यामुळे गप्प बैस!" तनुजाने म्हटलं एक हात दुखतो आहे की मोहनाचे दोन्ही हात दुखलेच म्हणून समजा! भौतिक साधनं असोत किंवा मुलांची तुलना असो किंवा तब्येत असो; तिची तनुजाशी एकतर्फी खुन्नस होती. एकदा तनुजाला मोहनासोबत दुर्दैवयोगाने स्कूटरवर डबलसीट जावं लागलं. मोहनाने नेम धरून खड्ड्यात स्कूटर घातल्याने त्या दोघी पडल्या. तनुजाचा डावा पाय दुखावला. मोहनाचे मात्र दोन्ही पाय दुखावले होते त्यामुळे तिने १५ दिवस सुट्टी घेतली. तनुजा कोणत्या डॉक्टरकडे जातेय काय उपचार घेते आहे याच्यावर सुट्टीवर असूनही मोहनाची छुपी पाळत होती.

स्कूटरवरून पडल्यामुळे डाव्या पायाची टाच ठणकत असूनही पेनकिलर घेऊन नियमित फिरायला जाण्यात तनुजाने खंड पडू दिला नव्हता. सकाळी उठताक्षणी जमिनीवर पाय टेकल्यावर २/३ मिनिटं तीव्र वेदना व्हायच्या. कधी 'आजकल पाव जमीं पर नही पडते मेरे' असली उत्फुल्ल स्थिती लाभून ती तरंगते आहे अशी तरल दिवास्वप्नं तरळून, तिच्या अंगोपांगी हर्षाची एक लहर दौडत जायची. प्रेमळ आप्तजन, "अगं तिथल्या हाडाला हेअरलाइन फ्रॅक्चर असेल, एक्स रे काढून घे," वगैरे सल्ले देऊ लागले होते. तिची बहीण नूतन डॉक्टर असल्याने, तिने तपासून पायाला सूज नाही त्यामुळे सुदैवाने फ्रॅक्चर नसल्याचं सांगितलं. पेनकिलर बंद करून आता आठ दिवस अल्ट्रासाऊंड फिजिओथेरपी घे, बरं वाटेल असंही नूतन म्हणाली. फ्रॅक्चर नसल्याने अर्धा मनस्ताप आपोआप कमी झाला होता. दोन वर्षांपूर्वी खांदेदुखी आणि नंतर एकदा मांडीतील स्नायू दुखावला असताना अल्ट्रासाऊंड आणि डायथर्मी या फिजिओथेरपी उपचारांचा तनुजाने अनुभव घेतला होता.

डायथर्मीमुळे शेकून तात्पुरता का होईना आराम मिळतो, पण अल्ट्रासाऊंड म्हणजे निव्वळ भानामती! साउंड वेव्ह्ज दुखऱ्या भागातून आत शिरून उपचार होताहेत असं चेटूक होतंं, पण तात्कालिक किंवा नंतरही फारसा आराम पडत नाही. ही असली दुखणी, जगप्रसिध्द ब्रिटीश टीव्ही मालिका 'यस मिनिस्टर'मधला सर हंफ्रे म्हणतो त्याप्रमाणे, "इन द फुलनेस ऑफ टाईम, अॅट द अप्रोप्रिएट जन्क्चर, इफ द टाईम परमिटस्, व्हेन द मोमेंट इज राईट" अशी जेव्हा बरी व्हायची तेव्हाच होतात. त्यामुळे व्यायामाशिवायचे हे दोन फिजिओथेरपी उपचार, निव्वळ मानसोपचार आहेत असंं तनुजाचंं अनुभवांती मत झालेलं आहे. हा उपचार करण्यात तिला रस नव्हताच आणि घराजवळच्या फिजिओथेरपी केंद्रात दोन दिवस कुलूप आढळलं; त्यामुळे ते तिच्या पथ्यावरच पडलं. अॅक्युप्रेशर आणि अॅक्युपंक्चरचा उपचार घेऊन फायदा झालेल्या एका मैत्रिणीने दिलेल्या अनुभवी सल्ल्याचा विचार कृतीत आणायचं ठरवून, बिन औषधांचा हा उपचार १५ दिवस घ्यायचं तनुजाने ठरवलं. अॅक्युपंक्चरबद्दल इंटरनेटवर गुगलवाचन आणि चिंतन करण्यात तिचा बराच वेळ पसार झाला. या शीर्षकाखाली ऑफिसमधून बिनधास्तपणे गुगल सर्च करताना एकदा पॉर्न लिंक उघडल्याने तनुजा भयंकर दचकली. 'ऐसी अक्षरे'वाले 'ओके' म्हणत असले तरी ऑफिसात 'पॉर्न नॉट ओके प्लीज'.

अॅक्युपंक्चरचे पहिले ज्ञात ब्रँड अँबेसेडर बहुदा भीष्म पितामह असतील. बाणांच्या टोकदार अॅक्युपंक्चरी शय्येवर ते वेदना सुसह्य करत मृत्यूच्या प्रतीक्षेेत पहुडले असावेत असे विचार तिच्या मनात येऊ लागले. संन्यासी लोक काट्यांच्या शय्येवर झोपून अॅक्युपंक्चर उपचार घेत असतील का असाही प्रश्न तिला पडला.

आय क्यू पंक्चरलेली बाहुली

एका सुप्रसिद्ध अॅक्युपंक्चर तज्ज्ञाकडे युक्रेनची डाकू (D.A.C.U.) अशी सुजोक थेरपीची पदवी अभिमानाने भिंतीवर मिरवत होती. तिथे काहीही वायझेड लिहिलं असलं तरी कोणाला काय शष्प समजणार होतं? या इम्पोर्टेड डाकू थेरपिस्टला भेटून, सायनस आणि टाचदुखी असा 'काश्मीर से कन्याकुमारी तक' इलाज करवून घ्यायचे आहेत, असं सांगितलं. त्याने तनुजाकडे आपादमस्तक पाहून तात्काळ, "तुम्हाला वजन कमी करावं लागेल. तुमच्या सगळ्या शरीराचा भार टाचेवर येऊन तिथे दुखतं " अशी मोलाची माहिती दिली. अबे रताळ्या! नवीन माहिती दे ना! ती मनोमन चरफडली.

अकबराने बिरबलला प्रश्न विचारला. . .
भाकरी का करपली? घोडा का अडला? पान का सडलं?
बिरबलाने एका वाक्यात उत्तर दिलं, "न फिरवल्याने." तसंच काहीसं झालंय... डाव्या पापणीचा शेवटचा केस दुखतोय म्हटलं तरी, तिच्यामारी तनुजा तुझं वजन वाढलं आहे! तनुजाला वाटलं, खल्लास! भूतकाळातल्या अनंत अंबानी सारख्या टरटर फुगलेल्या तिने स्वतःच्याच टाचेच्या हाडाचा एक पाऊल टाकताच भुगा केला आहे आणि वामनाप्रमाणे तिला तिसरं आणि शेवटचं पाऊल टाकून पृथ्वी पादाक्रांत करण्याची संधी यानंतर पुन्हा कधीच मिळणार नाही.

आहार आणि व्यायाम काय असावा याबद्दल १९४७ वेळा चावून चोथा झालेली माहिती, तो पंक्चरवाला डॉक्टर तिच्या माहितीने ओसंडून वाहात असलेल्या मडक्यात पुन्हा ठोसू लागला. आपण सर्वज्ञ आहोत, हा गैरसमज दूर करणाऱ्या लशीचं संशोधन आणि त्याचं युद्धपातळीवर लसीकरण होण्याची आत्यंतिक निकड आहे याची तनुजाला खात्री पटली. पाय दुखत असूनही रोज काटेकोरपणे फिरायला जाते म्हटल्यावर तो तनुजाला म्हणाला की, पाय दुखू नये म्हणून फिरायला जाणं बंद करून पलंगावर निजून करायचे व्यायाम करायला मी पेशंटला सांगतो! ती मनातल्या जमिनीवर मनातच गडबडा लोळून हसू लागली त्यामुळे तात्काळ तिचा मनोमन व्यायाम होऊन गेला आणि वजनही कमी होऊ लागलं. पलंगावरचे व्यायाम ऐकून तुषारला गुदगुल्या होऊन खुदुखुदू हसू येऊ लागलं. यासाठी अहोरात्र सहकार्य करायला तुषार आतुरलेला होताच.

मला सायनसचा त्रास आहे आणि कानात दडे बसून डोकं कफाने जड होतं, असं तिने सांगितल्यावर डॉक्टरने ठरवलं की तो कफ नसून पित्त आहे आणि तिला अॅसिडीटी झालेली आहे. माझं पित्ताशय पोटात आहे आणि जनरली पित्त डोक्यात जात नाही हो असं ती मनातच आक्रंदू लागली. तो कफच आहे, मला अॅसिडीटीचा मुळीच त्रास नाही, असं सांगायचा तिने क्षीण प्रयत्न केला. त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करून त्याने तपासणीच्या टेबलवर झोपायला सांगून तिचे चरणकमल चुरायला घेतले. त्याच्याकडून चरणसेवा करून घेण्यासाठीच त्याच्याकडे उपचाराला बहुसंख्य स्त्रिया येतात की काय असं तिला वाटलं. तनुजा मनात 'प्रेम सेवा शरण, सहज जिंकी मन... मीच चुरीन चरण...' वगैरे गुणगुणून, यातना सहन करायचा निष्फळ प्रयत्न करू लागली. त्याने तिच्या पायाच्या बोटांचे प्रेशर पॉईंट्स दाबून किंवा चिरडून उपचार सुरू केले. ते असह्य झाल्याने ती ओरडू लागली, "ओय ओय मला त्रास होतोय". तर तो शांतपणे म्हणाला, "तुम्ही काय मिठाईच्या दुकानात आल्याहात काय? त्रास तर होणारच!" (स्वगत: तुम्हाला त्रास द्यायचेच ३०० रुपये रोज मला मिळणार आहेत!) त्यानंतर त्याने काही लाकडी वस्तूंनी बोटं रगडली आणि मग डॉल्फिन मसाजरने हातापायाला मसाज करून दिला. तिला खुर्चीत बसायला सांगून त्याने अॅक्युप्रेशर उपचारासाठी तिच्या हाताची बोटं चिणून काढली आणि तिच्या दोन्ही 'मिडल फिंगर' वर छोटंसं चुंबक दाबून सभोवती चिकटपट्टी लावली. तनुजा मनोमन मोहनाला दोन्ही मिडल फिंगरं दाखवत, 'मला पाडलंस ना, फक यु मोहना', म्हणून चरफडली. सकाळी उठल्यावर ते चुंबक काढायचे होते. बोटात खिळे टोचत असल्यासारखंं वाटून रात्री तिची दोनतीनदा झोपमोड झाली. सकाळी चुंबक काढून तिने एका डबीत ठेवले आणि संध्याकाळी जाताना पुन्हा ते चुंबकीय दुखणं लावून घेण्यासाठी नेलं. तिला पाहिल्यावर डॉक्टरने पुन्हा वजन कमी करण्याचं टुमणं सुरू केलं. त्यामुळे तुषारला मात्र परस्पर पाहुण्याच्या हातून साप मारल्यागत अतोनात उकळ्या फुटल्या. पंक्चरवाल्या डॉक्टरने आज कसं वाटतंय विचारलं. त्या क्षणी काहीच दुखत नसल्याने तनुजा, 'छान छान वाटतंय' म्हणाली आणि स्वपीडनासाठी तिने आपले चरण त्याला अर्पण केले. असह्य पिडून घेतल्यावर त्याने पुन्हा, पाय दुखतोय का, विचारलं. पाय दुखत नाहीये पण दाबला तर दुखतो, असं ती बोलली. आम्ही उपचारांची भिंत बांधत असताना तुम्ही ती असे दाबून, धक्के देऊन पाडता; असं अजब उदाहरण त्याने दिल्याने तिची दातखीळच बसली.

दुसऱ्या दिवशी अॅक्युप्रेशर उपचारासाठी त्याने तनुजाच्या दोन्ही तर्जनी आणि मध्यमा या बोटांना चुंबक चिकटवले. कधी एकदाची सकाळ होते आणि चुंबक काढून टाकते, असं लावताक्षणी तिला वाटत होतं. तीन दिवस अॅक्युप्रेशरसाठी चुंबक लावून फारसा फरक पडला नाही, म्हणून अखेर अॅक्युपंक्चरसाठी दोन्ही हाताच्या बोटात एकूण १० सुया टोचून अर्धा तास ठेवल्या होत्या. तनुजाला चुंबकापेक्षा हे सोपं आणि कमी त्रासाचं वाटलं. आपण निवडुंगाचं झाड आहोत की साळिंदर, या विचारात ती गढून गेली. कुत्रा फडफड करतो, तसं हात झटकून त्या मेल्या मोहनाच्या हातात सुया खुपसाव्यात असे हिंसक विचार तिच्या मनात येऊ लागले. मला स्कूटरवरून मुद्दाम पाडलं गधडीने, बरं झालं मेलीचे दोन्ही पाय दुखावले, असं वाटून तनुजा दुःखातही सुखावली.

एकदा पेशंट्स नव्हते तेव्हा पंक्चरवाल्याने संधीचा फायदा घेऊन तिच्या हातापायाची सगळी बोटं सावकाश ठेचून काढली. ते असह्य झाल्याने, आपण न केलेल्या खुनाचा कबुलीजबाब देऊन या थर्ड डिग्री यातनांतून सुटका करून घ्यावी, असं तिला वाटत होतं. 'तुमचे ऑक्युपेशनल हझार्डस् काय आहेत हो' असं तिने विचारल्यावर तो गांगरला. तनुजाने त्याला समजावून सांगितलं की, आम्हाला जे उपचार करता त्याने तुमचे भलते प्रेशर पॉईंट दाबले जाऊन तुम्हाला काही त्रास होतो का? 'हो ,माझी हाताची बोटं बधीर होतात त्यामुळे मला मोजकेच पेशंट घ्यावे लागतात', असं तो म्हणाला. स्वतःचं गुणवर्णन, हिंदी सिनेमातली जुनी गाणी, रोमान्स वगैरे विषयांवर चतुर संवाद करून गुंतवून ठेवायचा त्याचा प्रयत्न सुरू असे, पण असल्या संवादांत तनुजा त्याला लीलया चितपट करायची. चार महिने चिकाटीने उपचार घेणाऱ्या एका पेशंटच्या धैर्याला सलाम करून तनुजाने कसेबसे पंधरा दिवस उपचार घेतले. कुठलाच साधा किंवा नाट्यमय परिणाम न झाल्याने दुखणं 'जैसे थे' होतं. सुया टोचताना तिला आजवर खिजगणतीत नसलेल्या मोहनाची हटकून आठवण यायची. मला याचा खूप फायदा झाल्याचं सांगून तिला हा अघोरी उपचार घ्यायला लावू, असं ठरवून तनुजाने पंक्चरवाल्या छळाला रामराम ठोकला. या विचित्र उपचारपद्धतीमुळे तुषारला आयतंच कोलीत मिळाल्याने तो येताजाता तिला 'आकुऽऽऽप्रेशर' म्हणून कडकडून मिठ्या मारून ३०० रुपये मागू लागला. पंक्चरवाला मिठ्या मारत नाही, त्यामुळे मिठी मारल्याचे 'तूच मला ३०० रुपये दे', असं तनुजा म्हणू लागली.

तनुजाला जेव्हा ऑफिसात मोहना भेटली तेव्हा एकदम ठणठणीत होती आणि तिचे पाय एका सिक्रेट रिमोट थेरपीने ठीक झाले म्हणून बागडत होती. ही कोणती सिक्रेट थेरपी असेल हा विचार करून करून तनुजाचं डोकं दुखायला लागलं. तिने फेसबुक उघडलं तर मोहनाने एक सुया टोचलेली बाहुली शेअर करून पुढे 'लाफिंग आउट लाउडली' लिहिलं होतं. तनुजाच्या डोक्यात ज्ञानाचा प्रखर प्रकाश पडून तात्काळ समग्र आकलन झालं. तिने पाहिलेल्या एका आफ्रिकन काळ्या जादू 'व्हूडू'च्या व्हिडीओमध्ये बाहुलीला सुया टोचून वैऱ्याचे हाल हाल करून मारण्याच्या क्रूर पद्धती दाखवल्या होत्या. तो पंक्चरवाला डॉक्टर मोहनाचा फेसबुक मित्र होता. मोहना एका तनुजारूपी बाहुलीला साग्रसंगीत सुया टोचते आहे आणि त्याच सुया मांत्रिकाच्या वेषातल्या पंक्चरवाल्याच्या लांबसडक हातांद्वारे आपल्याला टोचल्या जात आहेत, असं भीषण चित्र तिच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. मांत्रिकाच्या वेषातला अघोरी पंक्चरवाला विकट हास्य करत तनुजाला मंतरलेल्या सुया टोचलेली जिवंत बाहुली बनवून छळत होता. मोहना रिमोटली घरबसल्या मोहक हास्य करत दोन्ही पायांनी ठणठणीत बरी होत होती असा भास तनुजाला होऊ लागला आणि तनुजा स्वतःच आय क्यू पंक्चरलेली, मंतरलेली बाहुली झाली आणि सूड घ्यायला मोहनारूपी बाहुलीचा शोध नेटाने घेऊ लागली.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

गूढ

हा हा.. मजा आली वाचायला.

- नी

काही वर्षांपूर्वी, ही उ.स. स्टाईल आवडली होती. आता मात्र, त्याचा 'टाईप' झाल्यासारखा वाटतोय. तरीही, ओव्हरऑल, आवडली असेच म्हणेन.

एकच योगी
बाकी सारे भोगी

छान खुसखुशीत आहे. तुषारकाका महाडाम्रट रंगवलेत की Wink

हिरॉईनचा पोपट होतो आणि व्हँप मिरवायला मोकळी राहते ... पण व्हँप लेडीजबायकांसारखी वागणारी आणि हिरॉईन स्वतंत्र बुद्धीची स्त्री. सखूबाई सगळ्या कल्पना उलटसुलट करतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकेका परिच्छेदामधे एकेक हास्यबाँब होते. कथा मजेशीर वाटली.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

गमतीदार आहे

३_१४अदिति चा मुद्दा पटण्यासारखा आहे :

हिरॉईनचा पोपट होतो आणि व्हँप मिरवायला मोकळी राहते ... पण व्हँप लेडीजबायकांसारखी वागणारी आणि हिरॉईन स्वतंत्र बुद्धीची स्त्री. सखूबाई सगळ्या कल्पना उलटसुलट करतात.

नमस्कार! मी विशाल सोहोनी. D.Acu. त्या तनुजाबाईंना; मी तिला तनुजाच म्हणतो; तनुजाला काहीतरी चुकीचं वाचून गैरसमज झाला. D.Acu. म्हणजे डॉक्टर ऑफ अॅक्युपंक्चर. हां, मी डाकू आहे, पण फक्त दिलाचा. माझ्याकडे येणाऱ्या तरुणींच्या, आणि मध्यमवयिनींच्या आणि कधीकधी उत्तरवयिनींच्याही दिलावर मी डाका घालतो.

दुर्दैवाने माझ्या क्लिनिकमध्ये उत्तरवयिनीच जास्त येतात. त्यांची ती राठ झालेली, टाचांना भेगा पडलेली, जाड निवडुंगासारखी वाढलेली नखं असलेली पावलं पाहून मला किळस येते. अरे या बायकांनी जरातरी आपल्या पावलांची निगा राखावी की नाही? मला लहानपणापासूनच मुलींच्या पावलांचं आकर्षण होतं. अजूनही आहे. तेव्हा मला वर्गातले सगळेजण लक्ष्मण म्हणून चिडवायचे. कारण वर्गातल्या कुठच्या मुलीने पैंजण घातले आहेत, कोणी आज नेलपॉलिश बदललं, कोणी बोटांत नाजूक जोडव्या घातल्या आहेत हे मला चटकन समजायचं. मी पूर्वी माझ्या मित्रांना सांगायचो, पण त्यांनी चिडवायला सुरुवात केल्यावर मी ते गुपित माझ्याकडेच ठेवायला लागलो.

मोठा झालो तेव्हा पोडियाट्रिस्ट बनायचं होतं. पण नावात गोंधळ झाला म्हणून मी पीडियाट्रिस्ट बनायला गेलो. त्यात जी माझी काही वर्षं फुकट गेली ती पुन्हा येणार नाहीत. असो. मला कुठच्याच कोर्ससाठी पुरेसे मार्क मिळाले नाहीत. मग मी हताश झालो. काही वर्षं लेडीज शू सेल्समन म्हणून काम केलं. पण हा D.Acu. कोर्स असतो हे कळलं आणि माझ्या उत्साहाने पुन्हा उसळी घेतली. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा कोर्स पूर्ण करण्यासाठी कोर्स करण्याचीच गरज नव्हती. नुसती पाटी लावली की झालं.

तर, तनुजा जेव्हा माझ्या क्लिनिकच्या दारातून आत आली तेव्हा माझं अंग मोहरून गेलं. तिची पावलं पाहून तर माझी आनंदपताका अजूनच उंचावली. तिचे पाय चोळून देण्यासाठी माझं मन आसुसलं. आणि तिच्या पावलांना त्यासाठी स्पर्श केला तेव्हा तर... अहाहा... मी फार सांगत नाही.

पण काहीच दिवसांनी मोहना नावाची दुसरी स्त्री माझ्या आयुष्यात आली. आयुष्यात म्हणजे क्लिनिकमध्ये. तनुजाला जे हवं होतं तेच तिला हवं होतं. पण तिच्याकडे मोडलेले दोन पाय होते. मी दुर्बळ होतो. इतक्या मोठ्या हव्यासापायी काहीही करायला तयार होतो. आणि... आणि...

बाकी काय झालं ते या गोष्टीत सांगितलं आहेच. पण मला अजूनही तनुजाच्या त्या लोभस पावलांची स्वप्नांत आठवण येते.

काही वर्षं लेडीज शू सेल्समन म्हणून काम केलं. पण हा D.Acu. कोर्स असतो हे कळलं आणि माझ्या उत्साहाने पुन्हा उसळी घेतली.

ROFL

अय्या विशाल ,तू फार्फार वर्षांपूर्वी ,पाकीजा नावाच्या सिनेमात ,राजकुमारच्या वेषात मीनाकुमारीला म्हटले होतेस ना की ,' आपके पाव बहुत हसीन है ,इन्हे जमीनपर मत रखिये, मैले हो जायेंगे' ;;)

कथेचे शिर्षक आवडलं ..

मजेशीर, खेळकर मूड मधली कथा, शेवटच्या वास्तवाच्या दर्शनाने अचानक भितीदायक वाटते.

मी तुषार एक पुरुषोत्तम पण हिला काय त्याचं? ऊठसूठ सुट्टी घ्यायची फार वाईट सवय आहे, तशा तर अनंत वाईट सवयी माहेराहून आंदण च घेऊन आलीये ही भवानी म्हणा, जरा खुट्ट झालं, शिंका आली की सुट्टी टाकते. मी इथे मर मर मरतो आणि ही मजा मारते. माझी सायकिअ‍ॅट्रिस्ट बावळट आहे तिचे मत आहे माझे बाहेर काही चालत नाही म्हणुन मी घरी शेर बनतो. त्या सायकिअ‍ॅट्रिस्टलाच मी एकदा टांग देणारे, मूर्ख स्त्रीच ती. बाया आणि डॉक्टरकी समीकरण का कुठे जमतं?
.
ते काही नाही तनुजाला आमच्या हीला हो, धडाच शिकवायला हवा असे बरेच दिवस मनात होते. पण ही डाळ शिजू देईल तर ना. आजकाल या स्त्रीमुक्तीवादानेच्या लाटेचा एक वीट आलाय. पूर्वी कशा बायका मुकाट आधीन होऊन अगदी नवर्याच्या अर्ध्या वचनात रहात. आता यांना काबूत ठेवायचं म्हणजे आम्हा पुरुषाअंची नुसती दमछाक. यां स्त्रियाना वेळेवर बंध घातला नाही तर पुरुषांची जगबुडी यायला वेळ नाही लागणार - हे माझे भविष्य लक्षात ठेवा.
.
आणि ही ऑफिसात जाऊन तरी दिवे काय लावते म्हणा अर्धा वेळ तर कोण ती मोहना आहे तिच्याशी झगडण्यातच जातो तर अर्धा वेळ कोणत्यातरी साहित्यिक "ऐसी" नामक साईटवरती पडीक असते. बायकांना वेळीच वेसण घातली नाही तर ..... असो! ही म्हणत की मोहना हिच्यावर जळते. जळण्यासारखं काही असेल तर ना हां आता नवरा बावनकशी मिळालाय.
.
तर त्या दिवशी काय तर मोहनाला घेऊन सकुटरवरून पडली. बायकांना ड्रायव्हिंगचे परवाने देऊ नयेत या माझ्याच मताला परत पुष्टी मिळाली. ते अ‍ॅक्युप्रेशर काय जॉईन केलं. ते तरी धड करावं ना तिथेही धरसोड आणि नुसते पैसे पाण्यात घालणे झालं. तरी बरं मी मर मर मरून कमावतो आणि ही नुसती गमावते. बरी झाल्यावरही करवादत होती की मोहनाने फेसबुकवर मुद्दाम जळवलं. मी तर याच मताचा आहे की स्त्रियाना फेसबुकवर बंदी घालावी. माकडाच्या हाती कोलीत होऊन बसलय हे स्त्रिया-फेसबुक समीकरण. पण एकंदर हिचा फज्जा म्हणजे माझी मज्जा झाली हां.

मी जर्रा कुठं काही लिहिलं तर तिथेही तू आपलं नकटं नाक खुपसून पकवशील काय ? चल फूट निघ इथून ! पुरुषांची दमछाक होते म्हणे तर स्त्रियांना कंट्रोल करायच्या फंदात पडावंच कशाला ? ऑफिसात जाऊन मी काय करावं यावर तुझा काही कंट्रोल नसल्याचा मला आसुरी आनंद होतो आहे. सरकार मला दरमहा पगार देतंय ना मग काय प्रॉब्लेम आहे बे तुला आं ?
आता घरी येच मग होऊन जाऊदे !
तुझीच गोग्गोड,लाडकी तनुजा

मस्तं आहे. आवडली.