अध्यात्माची एक तोंडओळख - सिनेमा-नाटकांतल्या रुपकांतून

संकीर्ण

अध्यात्माची एक तोंडओळख - सिनेमा-नाटकांतल्या रुपकांतून

- विनय दाभोळकर

अध्यात्म म्हटले म्हणजे सर्वसाधारणपणे धार्मिक ग्रंथ - गीता, बायबल, कुराण, पूजाअर्चा, देवदर्शन किंवा आध्यात्मिक गुरु - श्री श्री रविशंकर, सद्गुरु, जे कृष्णमूर्ती, ओशो, मांडी घालून ध्यानस्थ बसणे, जप करणे असे संदर्भ डोळ्यासमोर येतात. स्थितप्रज्ञ कसा दिसतो याबाबतही आपले काही ठोकताळे असतात. दाढीदारी, शक्यतो भगवी किंवा पांढरी वस्त्रे, आपल्या नावाने प्रसिध्द असलेली अमुक किंवा तमुक क्रिया इ. बर्‍याचदा ह्या विषयाकडे निवृत्तीनंतर वेळ घालवायला एक साधन असेसुध्दा बघितले जाते. अशा पार्श्वभूमीवर गब्बर सिंग किंवा अँथनी गोन्साल्विस यांच्याकडूनही काही अध्यात्म शिकता येत का? आणि वरवरचे नाही, तर अगदी शंभर नंबरी? हे बघण्याचा हा एक प्रयत्न.

अध्यात्माच्या बर्‍याच व्याख्या आहेत. आपण एक सुटसुटीत व्याख्या घेऊन पुढे जाऊया. नाहीतर नुसत्या व्याख्येवरच पूर्ण लेख व्हायचा. ’दिसते तसे नसते म्हणून जग फसते’ असे म्हटले जाते. दिसते तसे जर नसते, तर नेमके काय असते? याचा शोध म्हणजे अध्यात्म. आणखी एका प्रकारे असे म्हणता येईल की अध्यात्म म्हणजे आपली विचारप्रक्रिया आपल्या मनात जो भुलभूलैया किंवा मायाजाल निर्माण करते तिचा शोध. "जगन्‌ मिथ्या" कसे? याचा शोध. म्हणजे काय? ते आपण पुढे बघूया.

वायरस सिंड्रोम

विचारप्रक्रियेकडे बघितले तर सहजपणे लक्षात येते ती विचाराची अहोरात्र चाललेली हालचाल. विचार सतत इकडून तिकडे पळत असतो. कधी तो ९:१० ची लोकल मिळेल का ते बघत असतो, तर कधी आपल्या बेबीची युनिट टेस्ट कशी जाईल याच्या काळजीत असतो. कधी शेअर बाजार तर कधी मोलकरीण. विचार सारखा इकडून तिकडे का पळतो? याचे एक उत्तर आपल्याला "3 idiots" मधला प्राध्यापक विरू सहस्रबुध्दे उर्फ वायरस (बोम्मन इराणी) देतो. तो सतत एकच गोष्ट आपल्या विद्यार्थ्यांच्या कानीकपाळी मारत असतो - "Life is a race" “जीवन ही एक स्पर्धा आहे". जो थांबला तो संपला. आपण आजुबाजूला बघितले तर आपल्याला असे दिसते की हा वायरस रोज आपल्याला या ना त्या रूपाने भेटत असतो. कधी मास्तर, कधी आई-वडील, कधी बॉस तर कधी टि.व्ही. वरचा सल्लागार. बर्‍याचदा तो रस्त्यावरच्या जाहिरात फलकावरही जाऊन बसलेला असतो. तो सांगत असतो, "हे जर तुम्ही केले नाहीत तर तुम्ही मागे पडाल - बघा बुवा..." ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न विचार आपल्या परीने करत असतो. आणि त्यात तो मग्न असतो. पण काहीवेळा आपल्याला असे दिसते की स्पर्धेची भावना नसतानासुध्दा विचार पळतच असतो. तो कसा काय?

हयवदन सिंड्रोम

स्पर्धेची एक नातलग विचाराला पळवत असते. ती म्हणजे आपण अपूर्ण असल्याची भावना (sense of incompleteness). हे समजून घेण्यासाठी आपण गिरीश कर्नाड यांच्या "हयवदन" नाटकाकडे वळूया. हे नाटक मी २०-२५ वर्षांच्या अंतराने दोनदा बघितले. शाळेत असताना बघितलेल्या प्रयोगामधली एकच गोष्ट आता आठवतेय. ती म्हणजे रविंद्र मंकणी आणि उदय म्हैसकर यांच बराच वेळ चाललेय असे वाटणारे द्वंद्व आणि ते बघताना मला दरदरून फुटलेला घाम. काही वर्षांपूर्वी बॅंगलोरला पाहिलेला प्रयोग इंग्रजीत होता. देवदत्त आणि कपिल हे जिवश्च-कंठश्च मित्र. देवदत्त विद्वान पंडित तर कपिल पिळदार अंगाचा अष्टपैलू. पद्मिनी देवदत्ताची पत्नी आणि कपिलची मैत्रिण. काही कारणाने देवदत्त आणि कपिल दोघेही स्वतःची डोकी धडापासून वेगळी करतात. दैवयोगाने पद्मिनीला कालीमातेचा वर मिळतो की धडावर डोकी लावून ती दोघांना जिवंत करू शकते. अशा प्रसंगी पद्मिनी काय करते? देवदत्तचे डोके कपिलच्या धडाला लावते आणि कपिलचे डोके देवदत्तच्या धडाला लावते. म्हणजे तिला विद्वत्ता आणि कसलेले शरीर दोन्हीही गोष्टी एकाच व्यक्तीत मिळतात आणि तिचे ’पूर्ण’ नवर्‍याचे स्वप्न साकार होते - निदान थोडा काळ तरी. आपली स्थितीही काहिशी पद्मिनीसारखीच असते. थोडीशी अजून उंची, थोडासा अजून उजळ रंग, थोडसे मोठे घर, जास्त मार्क, बरा पगार, न उखडणारा बॉस - ही यादी कधीच संपणारी नसते. आणि ही अपूर्णतेची भावना विचाराला इकडून तिकडे पूर्णत्वाच्या दिशेने पळवत असते. कधी ना कधी आपण "पूर्ण" होऊ असा विचाराचा विश्वास असतो. मानसशास्त्रज्ञांनी याला "Hedonic treadmill" असे नाव दिले आहे. अर्थात नुसती पळापळी करणे यात काही वावगे नाही. परंतु हे चालू असताना एक प्रकारची असंतुष्ट भावना तयार होते आणि ती राग-लोभ-काळजी-द्वेष अशा स्वरूपात रुपांतरीत होते. त्याचा आजुबाजूच्या सगळ्यांना तसेच फेसबुक व व्हॉट्सअॅपवरच्या मित्रमंडळींनादेखील त्रास होत असतो. काही वेळा त्या असंतुष्टतेचे स्वरूप तसे सौम्य आणि सुसह्य असते. थोडीशी काळजी किंवा थोडसे जलन केल्याने फार फरक पडत नाही. परंतु काही वेळा राग-लोभ अक्राळविक्राळ रूप धारण करतात. दुसर्‍या जातीत लग्न केले म्हणून आपल्याच मुलीला बाप मारतो किंवा पाच जणांना राहण्यासाठी कोणी २७ मजल्याचे घर बांधतो. हे कसे काय होते? ते बघण्यासाठी आपण विचार यंत्रणेतील एका महत्त्वाच्या घटकाकडे वळूया - तो म्हणजे आपल्या श्रध्दा किंवा समजूती (beliefs).

क्वीन सिंड्रोम

क्वीन (Queen) ह्या हिंदी चित्रपटातील नायिका, राणी (कंगना राणावत) हिचे लग्न समारंभाच्या आदल्या दिवशी मोडते. देशाबाहेर शिकायला गेलेला प्रियकर म्हणतो की आता ती त्याच्यासाठी फारच गावंढळ वाटायला लागलीये. राणी ठरवते आपण वडिलांनी काढलेल्या हनिमूनच्या तिकिटावर एकटीनेच पॅरीसला जाऊन यायचे. तिथे एका नव्या मैत्रिणीबरोबर ती पहिल्यांदा दारू पिते आणि नशेमध्ये म्हणते, "मी आतापर्यंत सगळ्यांचे ऐकले आहे. आई-वडिलांचे ऐकले, शिक्षकांचे ऐकले, थोरा-मोठ्यांचे ऐकले, कधीही मिनीस्कर्ट घातला नाही, तरीही माझे असे झाले." आतापर्यंत तिची अशी श्रध्दा होती की थोरामोठ्यांचे ऐकले म्हणजे सगळे चांगलेच होते. पण ह्या प्रसंगी तिला असे वाटायला लागते ह्या श्रध्देमध्ये काहितरी गफलत आहे. काय केल्याने काय होते ह्याच्या चाकोर्‍या प्रत्येकाने बांधलेल्या असतात. त्या मनात इतक्या खोलवर रुतलेल्या असतात की आपल्याला त्यांची जाणीवही नसते. आणि राणीवर आली तशी एखादी आपत्ती येते, आणि आपल्याला प्रश्नात टाकते, "हा कार्यकारण भाव खरा आहे का?" पण असे फार क्वचित होते. नेहमी आपण असंख्य श्रद्धा घेऊन आयुष्य जगत असतो. रुसवे-फुगवे जोपासत असतो. पण त्यामागचे सत्य पडताळून पहायला मात्र या ना त्या प्रकारे टाळत असतो.

गेल्या महिन्यात एलकुंचवारांचे "मग्न तळ्याकाठी" पाहण्याचा योग आला. हे नाटक म्हणजे "वाडा चिरेबंदी" भाग २. वाडा-नंतर दहा वर्षांनी त्याच देशपांडे कुटुंबात घडलेली गोष्ट. देशपांडे कुटुंबातल्या लग्नकार्यासाठी मुंबईचा भाऊ, वहिनी आणि अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असलेला पुतण्या आपल्या विदर्भातल्या गावी काकाकडे वाड्यात येतात. इथून नाटक सुरू होते. आपल्याला दहा वर्षांपूर्वी काकाने मुंबईला नेले नाही म्हणून पराग राग डोक्यात घेऊन बसलेला असतो. तो घरात आलेल्या सगळ्या पाहुण्यांशी अबोला धरतो. पण हळुहळू काकी त्याला वश करून घेते, मग चुलतभावाशीही गट्टी जमते. पण काकावरचा राग काही जात नाही. भाऊ परागला विचारतो की एवढा राग कशासाठी? तर तो म्हणतो की काकाने मुंबईत नेले नाही म्हणून त्याच्या आयुष्याचे वाटोळे झाले. त्यावर भाऊ सांगतो की त्याला मुंबईला आणू नका अशी गळ आपण बाबांना घातली होती - असूयेपोटी. ते ऐकल्यावर परागचा काकांवरचा राग कमी होतो. पण त्याआधी दहा वर्षे तो धुमसत राहिलेला असतो. त्या काळात तो राग किती अतार्किक निर्णयांना आणि जडलेल्या व्यसनांना जबाबदार असतो त्याची गणना कठीण. तर असे हे श्रध्देचे स्वरूप.

श्रध्दा म्हणजे काय? तर काही विचारांना आपण ’असेच असले पाहीजे’ असा गुणधर्म बहाल करतो, अशा विचारांचा समुच्चय. हे विचार कलांतराने प्रबळ आणि भक्कम बनतात. त्यांना आपण च-कारात्मक विचार (assumptions of necessity) म्हणूया. उदा. आयुष्यात यश मिळवण्यासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरात जायला पाहिजे किंवा मोठ्यांचे ऐकले तर आयुष्यात चांगले होते. काही चकारात्मक विचार इतके घट्ट होतात की त्यांच्यासाठी जीव घ्यायला आणि द्यायलासुध्दा लोक मागेपुढे पाहत नाहीत. ह्या चकारात्मक विचारांची जोपासना करण्यासाठी एक यंत्रणा सतत कार्यरत असते. ती फक्त आपल्या चकारात्मक विचारांशी सुसंगत अशाच गोष्टींकडे आपले लक्ष वेधून घेते. विसंगत माहिती आपल्या नकळत गाळली जाते. म्हणजे आपली जर देवावर श्रद्धा असेल तर देवावर श्रद्धा ठेवून कसे भले होते ते दाखवणार्‍या गोष्टींची नोंद घेतली जाते, आणि देवावर श्रद्धा ठेवूनसुध्दा कसे नुकसान होते हे दाखवणार्‍या गोष्टी आपल्या नकळत वगळल्या जातात. आणि याउलट आपली देवबिव काही नाही अशी श्रध्दा असेल तर श्रध्दाळू लोकांचे वर्तन कसे अतार्किक असते हे आपल्या नजरेतून अजिबात सटकत नाही. ह्याला मानसशास्त्रात पूर्वग्रह-पुष्टी कल (confirmation bias) म्हणतात. दिसते तसे नसते कारण आपल्याला जे खरे आहे असे वाटते त्याला पुष्टी देईल असेच आपल्याला दिसत असते. त्यामुळे काहीतरी गफलत असेल का अशी शंकाच मनात येत नाही. अशारितीने श्रध्दा विचारनिर्मित भ्रमाची (cognitive illusion) जोपासना करतात.

अध्यात्मामधील एक महत्त्वाचे गृहितक असे आहे: प्रत्येक कटू भावनेमागे एकतरी चकारात्मक विचार दडलेला असतो जो दुसर्‍या एका खर्‍या वाटणार्‍या विचाराशी विसंगत असतो. उदा. परागचे चकारात्मक विचार असे असू शकतात: आयुष्यात यश हे मिळायला पाहिजे, यश मिळवण्यासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरात जायला पाहिजे. त्यात "मी आता अपयशी आहे" ह्या विचाराची भर पडते. आणि हा विचार "यश मिळालच पाहिजे" ह्या चकारात्मक विचाराशी विसंगत असतो. ह्या विसंगतीतून घर्षण निर्माण होते आणि त्यातून राग. कुठलीही कटू भावना घेऊन तुम्ही हे गृहितक पडताळून पाहू शकता. उदा. काळजी, द्वेष, अपराधी भावना इ. आपल्या मुलाने अभ्यास केला पाहिजे कारण चांगल्या कॉलेजसाठी चांगले गुण आवश्यक आहेत आणि चांगले कॉलेज चांगल्या नोकरीसाठी आवश्यक आहे, चांगली नोकरी यशासाठी आवश्यक आहे इ. आणि मुलगा जर अभ्यासाऐवजी खेळाकडे लक्ष देत असेल तर त्याला ओरडणे आवश्यक बनते आणि रागाची किंवा नैराश्याची निर्मिती होते. परंतू ह्या चकारात्मक विचारांना शोधून काढणे आणि विचारांमधली विसंगती बघणे हे सोपे नाही. कारण त्यांना झाकण्याचे काम करणारी यंत्रणा आपली फसवणूक (self deception) करत असते. कशी? ते पहायला आपण गब्बर सिंगकडे वळूया.

गब्बर सिंड्रोम

गब्बर सिंगला (अमजद खान) आजुबाजूचे सगळे टरकतात. "पचास पचास कोस दूर गांवमेे जब बच्चा रोता है, तब माँ बोलती है - बेटे सो जा नही तो गब्बर सिंग आ जाएगा". अशा गब्बरच्या टोळीतले काल्या आणि त्याचे दोन साथीदार जेव्हा दोन नवोदीत तरुणांच्या धमकीला घाबरून पळून येतात तव्हा गब्बर भडकतो. आपली इज्जत "पूरी मिट्टीमें" मिळवणार्‍या तिघांना तो खतम करतो आणि म्हणतो, "जो डर गया, समझो मर गया". जो भीतीयुक्त जीवन जगतो तो मेल्यासारखाच आहे. खरे तर खोल विचार आहे हा. पण गब्बर स्वतः तो जगतोय का? नाही. कारण गब्बरलाही भीती आहे की त्याच्या प्रतिमेला त्याच्या साथीदारांच्या वागण्याने धक्का पोहोचेल याची. आणि या भीतीची प्रतिक्रीया म्हणून गब्बर भडकतो. ज्या भीतीसाठी तो आपल्या साथीदारांना मारतो तीच भीती त्याच्यातही दडलेली आहे याची त्याला सूतराम कल्पना नाही. विचारप्रकिया गब्बरचे सारे लक्ष काल्या आणि कंपनीला दोष देण्यात गुंतवून ठेवते आणि स्वतःच्या विचारांतील विसंगती बघण्याची संधीच गब्बरला मिळत नाही. आपलीही अशीच फसवणूक सतत चालू असते. प्रत्येक राग, काळजी यामागे आपल्याकडे एक "काल्या" असतो. एकदा त्याच्यावर खापर फोडायला सुरुवात झाली की मग आपला चकारात्मक विचार दिसण्याची शक्यता जवळ जवळ नाहीच. आपल्या मुलाच्या अभ्यास न करण्याने काळजी करून जेव्हा मला त्रास होतो तेव्हा माझ्या त्रासाला मुलगाच जबाबदार आहे असे मला वाटते. पण खरे तर माझ्या त्रासाला माझे चकारात्मक विचारच जबाबदार असतात. जेव्हा ही प्रक्रिया आपल्याला दिसू लागते आणि एक प्रयोग म्हणून आपण विचारातल्या ’च’ ची पकड सैल करून बघतो तेव्हा आपल्याला दिसते की एवढा त्रास होत नाहीये. अशा प्रयोगांतून आपल्याला हळुहळू असे दिसायला लागते की चकरात्मक विचारांचा डोलारा तकलादू पायांवर उभा आहे. पण असे प्रयोग प्रत्यक्ष केल्याशिवाय आपल्याला हे दिसणे कठीण आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या फसवणुकीच्या प्रक्रियेला काही मूलभूत कारण आहे का? ते बघण्यासाठी आपण "अमर अकबर अँथनी" मधल्या अँथनी गोन्साल्वीसकडे (अमिताभ बच्चन) वळूया. इथे वळण थोडे धोक्याचे आहे. तेव्हा जरा हळू जाऊया.

अॅंथनी सिंड्रोम

"माय नेम इझ अँथनी गोन्साल्वीस" हे गाणे गाताना अँथनी भरपूर पितो आणि त्यानंतर त्याची जाम पिटाई होते. काळानिळा चेहरा घेऊन अँथनी आरशासमोर उभा राहतो आणि म्हणतो, "तुला किती वेळा सांगितलये की दारू पिऊ नकोस? पण तू ऐकतच नाहीस. पण आता तू हलू नकोस. मी तुला मलमपट्टी करतो. तुला थोडसे दुखेल पण तू काळजी करू नकोस." असे म्हणत तो आरशाला मलमपट्टी लावतो, फुंकर मारतो आणि शेवटी म्हणतो, "आता तू झोपायला जा आणि मीपण जातो."

विचारप्रक्रियेतील मूलभूत चूक कुठली ते बघण्यासाठी हे एक छान रुपक आहे. जसे अँथनी आपल्या आरशातल्या प्रतिमेला आपल्यापेक्षा स्वतंत्र अस्तित्त्व असल्याचे मानतो. तसेच विचार त्याच्या प्रतिमेला स्वतंत्र अस्तित्त्व बहाल करतो. "मी" म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून विचाराने बनवलेली एक प्रतिमाच असते. ती चकारात्मक विचार एकत्र गुंफून तयार झालेली असते. या प्रतिमेची जपणूक करणे आणि तिला आणखी चकचकीत करणे हा विचाराचा प्रमुख धंदा असतो. अशावेळी ’जे आहे ते’ बघणे हा साइड बिझिनेस होतो. जमला तर ठीक नाहीतर सोडून दिला. जेव्हा आपला बॉस आपल्याला आपल्या कामाबद्दल "साधारण" असा शेरा देतो तेव्हा आपल्या प्रतिमेला गालबोट लागते. मी इतरांपेक्षा दोन बोटे सरसच असायला पाहिजे ह्या चकारात्मक विचाराशी विसंगत अशी प्रतिमा तयार होते. ती विचाराला मंजूर नसते आणि तो म्हणतो, "मी उद्यापासून असा वागणार आणि त्यामुळे मी तसा होणार." हे म्हणजे अँथनीने आरशातल्या प्रतिमेला मी तुला मलम लाऊन बरे करणार असे म्हणण्यासारखेच असते. अर्थहीन (meaningless) असते. पण मी मला सुधारण्याचे कितीही प्रयत्न केले तरी मूळ चकरात्मक विचाराची पकड (मी सरसच असायला पाहिजे) तशीच घट्ट राहिलेली असते. त्यामुळे पुढेमागे या ना त्या प्रसंगी त्याचा प्रतिसाद पुन्हा बाहेर पडणार असतो. आपण अँथनीसारखे प्यायलेलो नसलो तरी प्यायल्यासारखेच वागत असतो. विचारप्रक्रियेतील विसंगती पहायला आपण असमर्थ ठरतो.

थोडक्यात म्हणजे विरू सहस्रबुध्दे (थ्री इडियट्स), पद्मिनी (हयवदन), राणी (क्वीन), पराग (मत्न तळ्याकाठी), गब्बर आणि अँथनी ह्यांच्याकडून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे असते. ही पात्रे आपल्याला वाटेत भेटली की गंमत वाटते. पण जेव्हा त्या भूमिका स्वतः जगताना आपणच आपल्याला रंगेहात पकडतो तेव्हा खरी मजा येते. ते एक प्रकारचे ध्यानच असते. हा पकडा पकडीचा खेळ खेळायला शिकणे हीच अध्यात्म शिकण्याची सुरुवात असते असे मला वाटते.

संदर्भ :
१. या लेखातले सर्व मानसशास्त्रातले संदर्भ नोबेल विजेत्या डॅनिएल काहनेमन यांच्या "थिंकींग, फास्ट ऍण्ड स्लो" या पुस्तकात आढळतील.
२. चकारात्मक विचार, श्रध्देचे स्वरूप आणि मी ही एक प्रतिमा ह्या सगळया गोष्टी डेव्हीड बोम यांच्या "थॉट ऍझ अ सिस्टीम" या पुस्तकात आढळतील.
३. विचारप्रक्रीयेचे गुणधर्म आणि त्यातली मूलभूत चूक जे. कृष्णमूर्ती आणि डेव्हीड बोम यांमधील "विचार आणि दर्शन" ह्या भाषांतरीत संवादात दिलेली आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

"च-कारात्मक विचारांचा" उहापोह छान आहे. आवडला. आणि पटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाचं नाव ,विषय आणि आतला माल वेगळा निघालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अध्यात्म म्हणजे आपली विचारप्रक्रिया आपल्या मनात जो भुलभूलैया किंवा मायाजाल निर्माण करते तिचा शोध.

अध्यात्माची वरील व्याख्या पटली नाही. त्याचा शेवटचा भाग जरा बदलला, तर मात्र ती योग्य वाटते. म्हणजे,

अध्यात्म म्हणजे आपली विचारप्रक्रिया आपल्या मनात जो भुलभूलैया निर्माण करते, ते मायाजाल!!

बाकी, अध्यात्माकडे न वळताही म्हातारपण वा निवृत्त जीवन उत्तम जगता येते. तुम्हाला वाचनाचा, संगीताचा वा तत्सम कुठलाही छंद असला तर उत्तम दिवस जातो. त्यांत अनुभवलेल्या आनंदाची चर्चा करायला कोणी सम वा भिन्नविचारी भेटले तर आणखीनच चांगले.
कुणीही आपली एक प्रतिमा बनवून त्यांतच अडकून पडत असेल तर ते कष्टदायक होते. रोज उगवणारा दिवस नवीन असतो. येणार्‍या अनुभवांप्रमाणे स्वतःला बदलता येणे जमले तर मनाची बोच कमी होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>कुणीही आपली एक प्रतिमा बनवून त्यांतच अडकून पडत असेल तर ते कष्टदायक होते. रोज उगवणारा दिवस नवीन असतो. येणार्‍या अनुभवांप्रमाणे स्वतःला बदलता येणे जमले तर मनाची बोच कमी होऊ शकते.

+१
विशेषतः वार्धक्याने आपली ती प्रतिमा टिकवणे अवघड होऊ लागते तेव्हा त्यात अडकले की कठीण परिस्थिती होते !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अनेक गहन कल्पना खूप सोप्या शब्दात मांडल्या आहेत, हे खूप आवडलं.
ह्यावरून "कीवा"बद्दलचा हा टेड टॉक आठवला

आपण स्वतःलाच काही कहाण्या सांगून अशा "च कारात्मक" विचारांचा पाया तयार करतो, असं वाटतं.
आणि अर्थात, सत्य असं काही नसतंच, आणि सगळा भूलभूलैयाच आहे, असं गृहित धरल्यास, स्वतःला सांगण्याच्या कहाणीत बदल करून कदाचित जास्त समाधानी राह्ता येईल, असंही वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0