Skip to main content

वाडीचं कूळ नि वस्तीचं मूळ

नातीगोती ललित

वाडीचं कूळ नि वस्तीचं मूळ

लेखक - मुकुंद कुळे

अवघा सहा महिन्यांचा होतो. आई मला घेऊन मुंबईला आली. खरंतर तिला यायचंच नव्हतं. मरेस्तोवर खपून बांधलेल्या गावच्या घरात तिचा जीव अडकला होता. ती लग्न होऊन इळणे गावातल्या कुळ्यांच्या घरी आली, तेव्हा एक साधं गवतारू घर होतं. या गवतारू घरातच तिला तीन मुलं झाली. सर्व भावंडांत धाकटा आणि चौथा असलेल्या माझा जन्म मात्र नव्या, पक्क्या घरात झालेला. हे घर बांधताना बाबांची कमाई ब‍ऱ्यापैकी खर्ची पडलेली आणि आईचे श्रमही. त्यामुळेच गावचं घर सोडून मुंबईला जाणं तिला मान्यच नव्हतं. पण परिस्थितीच तशी ओढवली होती. घर बांधून पूर्ण झालं आणि एकएकी तिला दमा सुरू झाला. तोही असा तसा नव्हे, दम्याची उबळ आली की जगतेय की मरतेय, असा प्रसंग ओढवायचा. गावाकडे खूप उपचार झाले पण गुण येईना. शेवटी गावाकडे काढलेल्या उण्यापु‍ऱ्या चाळीसेक वर्षांचं संचित आईने गाठोडीला बांधलं आणि मला घेऊन ती मुंबईला आली. मुंबईत गिरगावातल्या मोहन बिल्डिंगमध्ये आमची एक छोटी खोली होती, सहा बाय सहाची. जिन्यालगत असलेली. या खोलीत तिने तिचा संसार मांडला खरा. पण आपलं गाव आणि गावच्या घराचा तिला कधीच विसर पडला नाही.

... किंबहुना इथे राहतानाही मनात ती तिचं गावचंच आयुष्य जगत राहिली, जपत राहिली आणि माझ्यातही रुजवत राहिली. मी वाढत होतो मुंबईत, पण माझ्या रक्तात रुजत मात्र होतं माझं गाव. केवळ घर आणि घरातली माणसं नाहीत. नीट समजू उमजू लागण्याधीच अख्खा गावपरिसर माझ्या माहितीचा झाला होता. गावची नदी, नदीतला गि‍ऱ्ह्याचा डोह, म्हैसधाड, सतीचा वड, गांगे‍ऱ्याची गोठण... असं बरंच काही. प्रत्येक ठिकाणाची काहीतरी गूढरम्य कथा ती सांगायची. गिऱ्ह्याचा डोह आणि म्हैसधाडातील काळंभोर पाणी माझ्या स्वप्नातही यायचं. त्या पाण्यात खोलवर बुडत असताना, श्वास छातीत दाटून यायचा. ओरडायचं असतानाही तोंडातून किंकाळीही फुटायची नाही. जीव घाबराघुबरा होऊन जाग यायची, तेव्हा मात्र मी आईच्या कुशीत झोपलेलो असायचो. मग जीव थंड होऊन मी अधिकच तिच्या कुशीत शिरायचो. कधीकधी गांगे‍ऱ्याची गुरांची गोठणही स्वप्नात यायची. तेव्हा मात्र छान वाटायचं. एका अद्भुतरम्य दुनियेतच शिरल्यासारखं वाटायचं. ही गुरांची गोठण म्हणजे गुरांना चरण्यासाठी राखलेली खास जागा. निबीड रान असलेल्या या गोठणीवर गावातली सगळी गुरं चरायला जायची. त्या गोठणीवर एक मोठी धोंड होती. गावात लग्न असलं की या धोंडीसमोर उभं राहून मागणं मागायचं की जेवणासाठी लागणारी तपेली-पातेली अशी सगळी भांडी त्या धोंडीवर हजर व्हायची. अख्ख्या गावाचं जेवण या तपेल्या-पातेल्यांत व्हायचं. काम झालं की भांडी पुन्हा त्या धोंडीवर नेऊन ठेवायची. असं कित्येक वर्षं सुरू होतं. एक दिवस मात्र एकाने नेलेली भांडी परत दिलीच नाहीत. मग ती नेलेली भांडीही गायब झाली आणि धोंडीचा चमत्कारही. स्वप्नात मी कितीदा तरी गोठणीवरच्या धोंडीकडे भांडी मागायचो आणि ती द्यायची पण! मात्र जेव्हा मी त्या भांड्यांना हात लावायला जायचो, तेव्हा नेमकी जाग यायची.

गावरहाटीतल्या अशा किती गोष्टी-गाणी तिने मला लहानपणी सांगितली असतील, याला गणती नाही. मला कळो न कळो, ती बोलत राहायची. त्यातलं सगळंच तेव्हा मला कळत नसे. पण तिची सांगण्याची हातोटी विलक्षण होती. एखादं गुपित सांगितल्यासारखी सगळं एवढ्या विश्वासाने सांगायची की ऐकता ऐकता मी हुंकार कधी भरायला लागायचो, तेच कळायचं नाही. त्या सगळ्या सांगण्याला एक सुरेख लय असायची-

उंदुर्ल्याची उंदुर्ली, ती पडली खिरीत
वड-पान झडो, तळापाणी आटो
गायचं शिंग मोडो, कु‍ऱ्हाडीचा दांडा
नि गावचा पाटील भुंडा...

गोष्ट किंवा गाणं कुठलंही असलं, तरी त्यातले संदर्भ गावाकडचेच असायचे. तिने सांगितलेलं हे सारं मी नकळत्या अजाण वयात ऐकलं. समजण्याचं ते वयच नव्हतं. पण तिने तेव्हा सांगितलेलं मी काहीच विसरलो नाही. आता वाटतं तिचं रक्त तर माझ्यात होतंच, पण तिने त्या रक्तातून ग्रामसंस्कृतीच्या वेदना-संवेदनाही माझ्यात संक्रमित केल्या होत्या की काय....!

अन्यथा गावाला फार न राहताही माझं गावचं घर, त्यातली माणसं आणि गावपरिसर माझ्यात कसा रुजला असता? उन्हाळी सुट्टीतलं फक्त महिनाभराचं वास्तव्य, तेही सातवीपर्यंतच...त्यानंतर कधीही गावाकडे फार काळ वास्तव्य केलेलं नाही. तरीही गावचं घर, गावची माती अजून कशी भुरळ घालत आलीय? गावच्या घरातली, पुढील दारच्या अंगणातली आणि मंगीलदारच्या आवाडातली लहानपणी अनुभवलेली प्रत्येक गोष्ट अजून कशी स्मरणात आहे? लहानपणी अनुभवलेलं सगळं अजूनही लख्ख आठवतं... कालपरवा घडल्यासारखं. चित्रांची पानं उलटावीत तसं...

पहिलं स्मृतिचित्र अर्थातच घराचं आणि भोवतीच्या आवाराचं. हे घर बाबांनी बांधलेलं असलं, तरी ते फक्त आमचं नव्हतं. वडील धरून चार भाऊ. त्यामुळे चार जणांसाठी चार खण, असं ते घर होतं. एकाच छताखाली चार चुली पेटायच्या. पण प्रत्येक घर आतून एकमेकांना दरवाजांनी जोडलेलं होतं. त्यामुळे कुणालाही, कुठूनही इकडेतिकडे जाता यायचं. सर्वत्र संचार करता यायचा. पण सगळ्यात महत्त्वाचा होता, तो या घराभोवतीचा आवार. पुढच्या बाजूने अंगण-पडवी-ओटी होतीच. पण घराच्या मागच्या बाजूला मोठं अंगण आणि आवाड (आवार) होतं.

मंगीलदारच्या या आवाडात जणू काही माझं विश्व सामावलेलं होतं आणि आहे. गावाला गेलो की माझी पहिली धाव घरामागच्या आवाडात असायची. तेव्हा आमचं हे आवाड म्हणजे देवराईच होती. आंबा, रामफळ, पेरू, शेकट, रिंगी अशा झाडांची एवढी दाटी असायची होती की, उन्हं जमिनीवर उतरायचीच नाहीत. दिवसभर या आवाडात थंड आणि गूढ वातावरण असायचं. तिथे एकटाच खेळणं ही माझ्या आनंदाची परिसीमा असायची. आल्याआल्या प्रत्येक झाडाभोवती मी फेर धरायचो आणि कानात सांगितल्यासारखं सांगायचो - मी आलोय. आता महिनाभर दे धम्माल करायची. केळीपासून आंब्यापर्यंत सगळ्या झाडांचे मुके घेत सुटायचो. वारंच भरायचं जणू माझ्या अंगात! हे वारं बहुधा आईनेच माझ्यात भरलेलं होतं.

एरवीही आमच्या गावचाच नाही, घराचा परिसर म्हणजेही दंतकथांचं आगरच होतं. त्या गोष्टींचा खरेखोटेपणा माहीत नाही. पण आईच्या सांगण्यात मात्र प्रचंड आश्वासकता असायची. गावी गेलो की या कथांची पुनःपुन्हा पारायणं व्हायची. मग सुट्टीतल्या गावच्या मुक्कामात त्या कथांतच जणू दिवस सरायचे. आईने सांगितलेल्या कथा ख‍ऱ्या मानून मी घर अन् परिसर पिंजून काढायचो. त्यातलं एक हमखास पात्र म्हणजे घराच्या मंगीलदारी आवाडात असलेलं पपनसाचं झाड. त्या झाडाभोवती बांधलेल्या पारात एक गोलाकार दगड होता. तो दगड म्हणजे म्हणे एका अद्भुत शक्तीचा रहिवास होता. आई लग्न होऊन या घरी आली असताना एकदा तिला एक बाई पुढच्या दारातून ‌शिरून मागच्या दारातून बाहेर पडताना दिसली. आई तिच्या मागावर गेली, तर ती पपनसाच्या झाडाजवळ अंतर्धान पावली. सकाळी उठून बघितलं, तर पपनसाच्या पायथ्याशी दगड होता. गवतारू घर जाऊन नंतर त्याच्या जागी पक्क कौलारु घर बांधलं गेलं. परंतु, पपनस आणि तो दगड कायम राहिला. कारण अद्भुत शक्तीचा अधिवास. आज मात्र ते पपनसाचं झाड नाही, परंतु त्याच्या पायथ्याशी असलेल्या दगडाला अद्याप कुणीही हात लावलेला नाही.

आमचं जुनं गवतारू घर असताना, आजोबांनी त्यांच्यासाठी एक छोटी खोपटी मागच्याच आवाडात बांधलेली म्हणे. एकदा कुठल्याशा मुद्द्यावरून गाव आणि त्यांच्यात तंटा निर्माण झाला. एके दिवशी सगळा गाव त्यांच्यावर चाल करून आला. आजोबा एकटेच खोपटीत बसलेले. गावातली दहा-पंधरा भरभक्कम माणसं काठ्या घेऊन आजोबांना मारायला आत शिरणार, तर अचानक त्यांच्याभोवती भुंग्यांची भुणभुण सुरू झाली. असंख्य भुग्यांनी त्या खोपटीला वेढा घातला. भुंग्यांचा हा फेरा एवढा तीव्र होता की, एकालाही खोपटीत पाऊ टाकता येईना. आल्या पावली सगळे माघारी फिरले. हा पपनसाजवळच्या त्या दैवी शक्तीचाच चमत्कार होता, असं आई सांगायची.

आजोबांशी आणि घराशी संबंधित आणखी एक गोष्ट आई कायम सांगायची. एकदा आजोबांना स्वप्न पडलं होतं म्हणे! स्वप्नात त्यांना कुणीतरी म्हणालं- ‘म्हादेवा (आजोबांचं नाव) उद्या तू आगरात जाणार आहेस, तिथून येताना काही लाकूडफाटा घरी घेऊन आलास, तर त्यातून जे काही निघेल, ते टोपलीखाली झाकून ठेव. तुला तेवढंच सोनं मिळेल.’ आजोबा ठरल्याप्रमाणे दुस‍ऱ्या दिवशी पहाटे झाडांना पाणी लावायला आगरात गेले. तिथून दुपारी परत येताना त्यांनी काही सुकलेली फाटी खांद्यावरून आणली. त्यात एक मोठासा लाकडी ओंडकाही होता. आजोबा आले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सगळी फाटी अंगणात टाकली. ते निवांत मागे वळणार इतक्यात त्या सुक्या ओंडक्यातून चक्क नाग बाहेर पडला. नाग बघून तिथेच असलेली आजी किंचाळायला लागली. त्यासरशी आजोबा पुन्हा फाट्यांकडे वळले. तिथे त्यांना नाग दिसला आणि हातातल्या काठीच्या एका दणक्याने त्यांनी नागाला भुईसपाट केलं. त्याक्षणी जिवाच्या भीतीने त्यांनी नागाला मारलं. पण नंतर जिवाचा थरकाप कमी झाल्यावर, त्यांना रात्रीचं स्वप्न आठवलं. आता हळहळण्यात काही अर्थ नव्हता. पण नंतरही त्यांना कधी या गोष्टीचं वाईट वाटलं नाही म्हणे!

आजोबांची ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या मात्र मनात अनेकदा यायचं, की जर आजोबांनी नागाला झाकून ठेवलं असतं, तर खरंच सोनं मिळालं असतं का?

जशी ही आजोबांची गोष्ट. तशीच आईच्या खानदानातलीही एक गोष्ट होती. तिच्या घराण्यात म्हणे कुणाला तरी एकदा जमीन नांगरताना सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला हंडा सापडला होता. पण ते दागिने स्वतःकडे न ठेवता, त्यांनी सगळ्यांना वाटून टाकले होते. त्याच दागिन्यांतला एक ताविजासारखा दागिना माझ्या आईच्या गळ्यात मंगळसूत्राच्या बाजूला ओवलेला होता. आईच्या गळ्यातील तो तावीज मी कधीच विसरू शकणार नाही. कारण आधीच माझ्या जन्माच्या आधी आईची एक बोरमाळ गणपतीत नाचायला गेलेली असताना कुठेतरी हरवली होती. त्यात परंपरेने आलेला तावीजही एकदा गेला.

एरवी मी तिच्याकडून गोष्टी ऐकायचो. एकेक गोष्टी अफाट आणि अचाट. त्याच्या खरेपणावर मोठेपणी मी कायमच संशयाची मुद्रा उमटवलेली. पण ताविजाची गोष्ट माझ्यासमोरच घडलेली. मी‌ बारा-तेरा वर्षांचा होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणे गावी गेलो होतो. एके संध्याकाळी आई नदीवर पाणी भरायला निघाली. तिच्या मागे लागून मीही तिच्याबरोबर गेलो. तिने हंडा-कळशी घेतली होती आणि गंमत म्हणून माझ्याकडे तिला लग्नात आंदण मिळालेला छोटा तांब्या दिला होता. आम्ही दोघंही गप्पा मारत नदीवर पोचलो. ती नेहमीप्रमाणे नदीच्या आसपासचं काही सांगत होती. कुठे कुणाचं स्थान आहे, कुठे कुणाचा निवास आहे, असंच काही तरी. आम्ही नदीवर पोचलो तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकला होता. सगळीकडे छान संधिप्रकाश पसरलेला होता. आईने हंडा-कळशी घासून वाहत्या पाण्यात धुतली. नंतर पाण्यात थोडं पुढे जाऊन तिने नितळ पाण्यात हंडा बुडवला…आणि त्याच क्षणी तंगुसात ओवळेला तिचा मंगळसूत्राचा सर तुटला. सगळे काळे मणी टपटपत पाण्यात पडले. त्याचबरोबर मंगळसूत्राची वाटी आणि तिच्या जोडीला असलेला तावीजही पाण्यात पडला. आईने मंगळसूत्राची वाटी पकडली. पण तावीज हातातून घरंगळला आणि पाण्यात पडतोय न पडतोय, तोच सळसळत आलेल्या एका माशाने तो गिळलादेखील! आमच्या दोघांच्या देखत तो मासा तिथून सळसळत गेला. आम्ही काहीही करू शखलो नाही. दोघेही अवाक्‌ झाल्यासारखं ते पाहत राहिलो. पण त्यातही सर्वप्रथम मी भानावर आलो आणि भांबावलेल्या आईला पाहून मला शकुंतलेची आठवण झाली. नुकतीच मी दुष्यंत-शकुंतलेची गोष्ट वाचली होती. त्यात दुष्यंताने दिलेली मुद्रिका शकुंतलेच्या बोटातून निखळून पडते आणि एक मासा ती गिळतो, असा उल्लेख होता. आता माझ्यासमोर घडलेलं ते दृश्य त्यापेक्षा वेगळं नव्हतं. क्षणभर मनात आलं - कुणाला सापडेल हा मासा आणि गवसेल तो तावीज. तो सापडल्यावर कुणालाही कशाचं स्मरण होईल का? एरवी आईने सांगितलेल्या गोष्टींनी मी स्तिमित होऊन जात असे. मात्र त्यावेळी मीच एक अद्भुत घटनेचा साक्षीदार झालो होतो. आईने सांगितलेल्या गोष्टींच्या खजिन्यात भर टाकणारी अशीच ही गोष्ट होती.

सुट्टीत गावाला गेल्यावर तिच्याबरोबर चालायला लागलं की, वळणा‍वळणावरच्या दगडधोंड्यांच्या, भुताखेतांच्या गोष्टी सांगत राह्यची. तिची कल्पनाशक्ती जबरदस्त होती. तिने सांगितलेल्या काही गोष्टी या लोकपरंपरेने चालत आलेल्या होत्या. तर काही गोष्टींना तिच्या अनुभवांचा पातळसा का होईना, पण एक नाजूक स्तर होता. त्या पूर्ण खोट्या नव्हत्या. त्यात श्रद्धेचा भाग थोडा अधिक होता, एवढंच! त्या तिने अनुभवलेल्या गावच्या वाडीवस्तीच्या आणि त्या वस्तीवरच्या माणसांच्या होत्या. एकदा मला सोबत घेऊन ती माहेरी निघाली होती. तिच्या माहेरच्या वाटेवर एक विहीर लागली. मी तिचा हात सोडून लगेच नेहमीप्रमाणे कुतूहलाने त्या विहिरीत डोकावायला गेलो. त्याबरोबर तिने मला पटकन मागे ओढलं. म्हणाली, "त्या विहिरीत पाहू नकोस. त्या विहिरीत एक मासा आहे. त्या माशाच्या नाकात मोती आहे. तो मोतीवाला मासा कुणाला दिसला की, त्याला विहिरीची ओढ लागते. आजवर अनेकांनी उड्या घेतल्यात त्या विहिरीत." ही गोष्ट ऐकून मी अवाकच झालो आणि तिच्या हाताला धरूनच हळू विहिरीत डोकावून पाहिलं. दुपारची वेळ असल्यामुळे उन्हात विहिरीतले सगळेच मासे चमचमत होते. मी तिला म्हटलं अगं सगळ्यांच्याच नाकात मोती दिसतायत. तशी ती खेकसली आणि मला ओढत दूर घेऊन गेली.

अशा कितीतरी गोष्टी आणि किती गाणी. कधीकधी तर प्रश्न पडायचा की एवढी गोष्टी-गाणी हिला कशी ठाऊक? पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, यातल्या कुठल्याच गोष्टी तिने कधीच माझ्या इतर भावंडांना सांगितलेल्या नाहीत. मी या गोष्टींविषयी सांगायला लागलो की, ते सारे अवाक्‌ होऊन पाहत राहतात. म्हणतात – हे तुला तिने कधी आणि केव्हा सांगितलं? आणि तुलाच का सांगितलं?

या प्रश्नाचं मग माझ्याकडे उत्तर नसतं. कदाचित इतर भावंडं जन्माला आली, तेव्हा आई गावालाच होती. गावात साज‍‍ऱ्या होणा‍ऱ्या सगळ्या सणा-उत्सवांत ती नाचायला, गाणी म्हणायला आघाडीवर असायची. ग्रामीण संस्कृतीवर पोसलेल्या तिच्या भावनांना, ऊर्जेला या नाचगाण्यांतून मोकळीक मिळायची. त्यांचा निचरा व्हायचा. पण दम्यापायी मला घेऊन मुंबईला आली आणि तिचं नाचगाणं थांबलं ते कायमचंच. पण बहुधा ती आतल्याआत घुमत असावी. नाच-गात असावी. मला ती जे सगळं सांगायची, तो एकप्रकारे तिच्या मोकळं होण्याचाच भाग असावा. मला गाणी सांगताना ती मनातल्या मनात नाचत असणार. घरादाराच्या, रानाशिवाराच्या गोष्टी सांगताना ती पुन्हा एकदा मनातल्या मनात गावाकडे फिरून येत असणार. आपलं गाव सुटलंय, हे तिच्या खोल जिव्हारी लागलं होतं बहुधा. म्हणूनच मला गाणी-गोष्टी सांगण्याच्या निमित्ताने ती पुन्हा सगळं कल्पनेने जगून घ्यायची.

आपल्या भावनांच्या निच‍ऱ्यासाठी तिने माझा आसरा शोधला. मात्र तिने माझ्यात शोधलेला हा आसरा, मला संपन्न करून गेला. लोकवाङ्‌मयाच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली गाणी आणि गोष्टीही मला तिच्याकडेच मिळाल्या. महत्त्वाचं म्हणजे गावाला फार न राहताही, एक संपन्न ग्रामसंस्कृती माझ्यात रुजली. ही ग्रामसंस्कृती कदाचित भाबडी असेल. पण जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने बघायला शिकवणारी होती. त्यामुळेच समजायला लागल्यावर जेव्हा जेव्हा गावी गेलो, किंवा अजूनही जातो, तेव्हा आईने सांगितलेली ग्रामसंस्कृतीच गावात, गावच्या घरात शोधतो. म्हणूनच मला तेव्हाही आवाडातली झाडं कधी निर्जीव वाटली नव्हती. तिने मला निसर्गाशीच बोलायला शिकवलं होतं. त्यामुळे मी घरी गेल्यावर आधी सगळ्यांशी संवाद साधायचोच. पण गावाकडून निघतानाही घराचा, झाडाझुडपांचा, अगदी गायीगुरांचाही निरोप घ्यायचो. त्यांना सांगायचो- "आता मी निघालो. आता वर्षभर आपली भेट नाही. छान राहा हं सांभाळून." हे सगळं तिनेच मला आपसूक शिकवलं होतं. त्यामुळे मी तिच्यासारखाच गावच्या घरात, वातावरणात, तिथल्या मातीत आणि माणसांतही मी मिसळून गेलो. गावाकडे फार न जाताही त्याच्याशी जोडलेला राहिलो.

आईचा जीव तर शेवटपर्यंत गावच्या घरात गुंतलेला होता. मुंबईत आवडत नाही, म्हणून शेवटची दोनेक वर्षं ती गावाकडेच, पण माझ्या बहिणीच्या गावी होती. परंतु तिच्याकडे असतानाही तिला ओढ आपल्याच गावाची आणि घराची लागली होती. तिचा सारखा हेका सुरू असायचा - माझ्या गावी न्या, म्हणून. पण तिथे तिला पाहणारं कुणीच नव्हतं. शेवटी नुकतीच तीन वर्षांपूर्वी वयाच्या ८१व्या वर्षी ती गेली, तेव्हा तिला आमच्या गावी, तिच्या घरी नेण्यात आलं. पण तोपर्यंत ‌तिने डोळे मिटले होते. मला कळल्यावर मुंबईवरून निघून मी गावी पोचलो तेव्हा, ती आपल्या घरात शांतपणे झोपली होती. रात्र झालेली होती. मग लहानपणी तिच्या कुशीत झोपायचो, तसा मी तिच्याजवळच झोपलो. तिच्या अंगावर हात टाकून. सकाळी उठलो तेव्हा आधी, तिचं पोट खालीवर होतंय का ते पाहिलं. लहानपणी ती आपल्यापासून दूर जाईल या भीतीने, कधीही उठलो तरी आधी मी श्वासाबरोबर खाली-वर होणारं तिचं पोट पाहायचो. त्यादिवशीही मी सरावाने तिच्या पोटाकडे पाहिलं. मात्र ते हलत नव्हतं. शांत झालं होतं.

मनात आलं, शेवटचे काही दिवस या तिच्या हक्काच्या घरात तिला आणायला हवं होतं. हे घर बांधून झाल्यावर या घरात ती कधीच हक्काने राहिली नव्हती. सण-उत्सवांत खेळली, मिरवली नव्हती. उगाचंच उदास वाटायला लागलं. ती गेल्यावर तर त्या गावाबद्दलची, घराबद्दलची माझी ओढ कमी झाली. कधीच जाऊ नये तिकडे असंही वाटायला लागलं…

…पण तिनेच माझ्यात रुजवलेली ग्रामसंस्कृती एवढी तकलादू नव्हती, कदाचित! काही दिवसांनी मला त्या गावाच्या-घराच्या हाका ऐकू येऊ लागल्या. त्यात आईचीही हाक होती मिसळलेली. जणू ती सांगत होती – "मी आहे, या घरात, गावात, आणि आजूबाजूच्या परिसरात. एवढंच नाही, तर तुला सांगितलेल्या गाण्यांत आणि गोष्टींतही. जोपर्यंत तुला ते सारं आठवतंय. तोपर्यंत तुला या वाडीवस्तीत यावंच लागेल. मला भेटायला, आपल्या घराला भेटायला."

आणि खरोखरच मी पुन्हा निमित्तानिमित्ताने का होईना गावाकडे जायला लागलो. पुन्हा एकदा घरामागच्या आवाडात फिरायला लागलो. झाडाझुडपांशी बोलायलो लागलो. एवढंच कशाला आता आई नसली, तरी गावच्या वाटेवरून चालताना मला ऐकू येतात, तिने सांगितलेल्या दगडधोंड्यांच्या आणि भुताखेतांच्या गोष्टी…

पूर्वप्रकाशित

3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

वाडीत पोहोचवलंत.

वाडीत पोहोचवलंत.

बरेच दिवसांनी इतका सुंदर लेख

बरेच दिवसांनी इतका सुंदर लेख वाचला..

मैं तो पिया से नैना लगा आयी रे..

आईबरोबरचे हृद्य नाते आणि

आईबरोबरचे हृद्य नाते आणि आईच्या संस्कार-विचारांचा पगडा छान मांडला आहे.

आपल्या भावनांच्या निच‍ऱ्यासाठी तिने माझा आसरा शोधला. मात्र तिने माझ्यात शोधलेला हा आसरा, मला संपन्न करून गेला.

हे वाक्य खासच आहे. खूपच खास आहे. ही अशी जाणीव होण्याकरता नशीब लागतं.

छान लिहिलय. आवडलं!

छान लिहिलय. आवडलं!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.