लाजाळू, ७०

कथा

लाजाळू, ७०

लेखक - रेणुका खोत

तिचा लग्नापूर्वीचा प्रियकर तो, कळ्ळं का? म्हातारी बागेत बसलेली असताना तोच आता म्हातारा होऊन अचानक समोर आला आणि तिच्या खपाटीला गेलेल्या पोटात फुलपाखरं डान्स करायला लागली. हार्टवर पुन्हा अटॅक. मग पळापळ. पात्तळलेले चंदेरी केस ठुब्या बोटांनी मागे सारले. डोळ्यांवरचा चष्मा झटकिनी पर्समधे गेला. कोरड्या ओठांवरून जीभ फिरली. म्हातारा काठी टेकत टेकत तिच्यापाशी आला. 'तसाच गो बाई न्याहाळतो अज्जून. ह्याच्या काड्या झाल्या पण ब्याटरी फुल्ल ए अजून', म्हातारीचं मन पावसात नाचणाऱ्या मोरासारखं थुईथुई थुईथुई.

तिच्या अशक्त बारकुड्या खांद्यावरून घसरणाऱ्या ब्लाऊजमधून बाहेर आलेला ब्रेसियरचा शुभ्र पट्टा त्याला पटकन दिसला, तशी त्याच्या गालात कायबैते फुललं. 'मेल्याची नजर स्कॅन करते.. हम्म्म्म..' त्याचे हात थरथरत होते. पायांना तोल राहिला नव्हता. दोन काड्यांवर त्याने काठीचा आधार घेऊन देह उभा केलान होता खरा, पण पायाच्या काड्या डुगडुगत होत्या.

"अजून पितो काय रे? झेपते का... झेप जातेय बघ..", ती बेफरक म्हणाली. वाकलेल्या म्हातारीच्या बोलण्यात ताठा आला होता. त्यावर तो कसला मस्त हसला. साला आता आपण अजून जगणार आयच्या गावात! "येडी. अगं म्हातारपणामुळेही होतं असं. तू पण किती सुंदर म्हातारी झाली बघ. दारूचं काय.. दारूने जगवलं गं मस्त. नाहीतर तुझ्याशिवाय शक्य होतं का? जगणं. जगणंच कसलं होतं ते?"

"गुडघे दुखतात माझे खूप" ती म्हणाली. "माझेपण.." तो एक-दोन-तीन-चार करत हळूच तिच्यापाशी बेंचवर बसला. म्हातारीने डोळे गच्च गच्च मिटले. आजोबाही पिरगळून बसलेले. प्रशस्त बेंचवर दोघांच्या मध्ये मोठाली जागा चेंगरून दोघे विरुद्ध टोकांना बसले होते. बेंचवर लाजाळूचं रोप उगवल्यासारखं दिसत होतं. पानं मिटत होती.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (4 votes)

प्रतिक्रिया

दोघे अजुनही प्रेमात असलेले नवरा-बायको असावेत आणि एकत्रच वृद्ध झालेले असावेत अशी शंका (रास्त?) आली. आणि खालील चित्रही आठवुन गेले -
http://data.whicdn.com/images/108604710/large.jpg
______
सॉरी हे पती-पत्नी नाहीत कारण तो म्हणतो ना "तुझ्याशिवाय जगणं अशक्यच होतं"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0