धनुष्यातून सुटलेला बाण

कथा

धनुष्यातून सुटलेला बाण

लेखक - झंपुराव तंबुवाले

अरुणने स्कूटर भाजीच्या दुकानांच्या रांगेत उठून दिसणाऱ्या फुलांच्या दुकानासमोर लावली. दुकानातलं दृश्य आता त्याच्या परिचयाचं होतं. फुलांच्या दुकानात आकर्षक रंगसंगतीत मांडलेली अनेक फुलं, फुलांचे गुच्छ, आणि काही छोट्या कुंड्या. तेरा-चौदा वर्षांचा गणू मालाचा विक्रेता आणि राखणदार दोन्ही होता. फुलांची आवश्यक ती सर्व माहिती, आणि गिऱ्हाईकांशी पुणेरी थाटात वागण्याचं एकमेवाद्वितीय तंत्र त्याला आत्मसात होतं. अरुण आलेला पाहून मात्र हातातल्या कात्रीसकट दुकानामागच्या घरात तो अरुण आल्याची वर्दी द्यायला पळाला. चिरकुट्यांची बसायची खोली बाहेरच्या मांडणीच्या अगदी विरुद्ध होती. पिवळा बुद्ध, जुनाट फ्रेम्सची चित्रं, रंग गेलेलं जुनाट लाकडी फर्निचर. गणूच्या स्वभावात जसा नेत्राला बदल करता आला नव्हता तसाच त्या खोलीतही ती काही फरक घडवून आणू शकली नव्हती. आधी फुलंपण तशीच असत - ताजी, टवटवीत पण ढिगांमध्ये आणि रंगसंगतीविहीन - आणि तरी विकली जात; कदाचित जुने गिऱ्हाईक आणि वाढत्या लोकसंख्येमुळे. अहमदाबादच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट अॉफ डिझाईन'मधून परत आल्यापासूनमात्र तिने बाहेरचं चित्रतरी पालटवलं होतं. सतत गिऱ्हाईकांना आवडेल अशा नवलाईच्या शोधात ती असे.

अरुणने हातातली डबेवजा पेटी मध्यभागी असलेल्या कॉफी टेबलवर ठेवली. खोलीत चिरकुटे, त्यांच्याकडे पडीक असलेले मोरे, आणि गणूच्या ललकारीमुळे बाहेर आलेल्या रूपामावशी आणि नेत्रा होत्या. त्या सर्वांकडे एकदा पाहून अरुणने ती पेटी हळूच उघडली. आत विविध गुलाबांची फुलं होती. गुलाबी, लाल, पिवळी, पांढरी. फुलांवर कसलीशी बारीक, रंगीत रांगोळी पसरली होती. अरुणने खोलीतला दिवा मालवला. प्रकाश कमी होताच फुलांच्या पाकळ्या अंधुक झाल्या, पण त्यांच्यावरचे रंगीत ठिपके मात्र जास्त प्रकर्षाने जाणवू लागले.

"वाह." रूपामावशी म्हणाल्या.
"मस्त". मोऱ्यांच्या तोंडून नकळत निघालं.
नेत्रा त्याच्याकडे पाहून हसली पण तितक्याच शांतपणे कपाटाकडे वळली.
"अगं, त्याला बसायला तर सांगशील आधी? अरुण, बस रे." एक खुर्ची थोडी सरकवत रूपामावशी म्हणाल्या.
बसेल की तो, अशा आविर्भावात नेत्राने कपाटातून मायक्रोस्कोपसारखं एक यंत्र काढलं व सरळ एका फुलाची पाकळी तोडून त्याखाली ठेवली. तिच्या या करारीपणामुळेच अरुणला ती आवडली होती. तिला आपण आवडलोय की केवळ आपली कर्तबगारी, याची त्याला खात्री नव्हती.

वर्षभराआधी बंगलोरच्या लालबागेत फुलांच्या प्रदर्शनातल्या एका भाषणाला तो गेला होता. बाहेरच्या टवटवीत, रंगीबेरंगी, मोहक अशा फुलांच्या मानाने अनेकांना भाषण रटाळ वाटलं तरी माहितीपूर्ण होतं. विविध फुलांचे वेगवेगळे गुणधर्म कलमांद्वारे एकत्र करण्याबद्दल दिल्लीचे डॉ. मिश्रा बोलत होते. भाषणानंतरच्या प्रश्नोत्तरांमध्ये एकाने विचारलं,
"सर, सुंदर माहितीबद्दल धन्यवाद. इतक्यातच जपानमध्ये निळ्या कार्नेशन्सचं फॅड निघाल्याचं ऐकलं आहे. त्याबद्दल काही सांगू शकाल का?"
"मी पण इतक्यातच त्याबद्दल ऐकलं आहे. सॉरी, डिटेल्स मात्र माहीत नाहीत."
"हं, विचारा तुम्ही." अरुणचा हात वर असलेला पाहून त्याला सांगण्यात आलं.
डॉ. मिश्रांऐवजी अरुण आधीच्या प्रश्नकर्त्याकडे पाहून म्हणाला, "क्रिस्पर - CRISPR - नावाचं एक पॅकेज वापरून ते निळे कार्नेशन बनवले जातात. जीन स्प्लाईस करून, म्हणजे त्यातले काही भाग वगळून किंवा बदलून हे साधलं जातं. कार्नेशनसाठी नाही, पण मीही क्रिस्पर वापरलं आहे." त्याला अजूनही बोलायचं होतं पण मिश्रांना पुढचे प्रश्न येऊ लागल्याने तो चूपचाप खाली बसला.

सगळे बाहेर पडत असताना नेत्राने त्याला गाठलं होतं.
"मी नेत्रा. मला त्या निळ्या कार्नेशन्सबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि तशा इतर प्रयोगांबद्दल."
"मी अरुण. पुणे विद्यापीठात PhD करताकरता हे प्रयोग करतो."
"क्रिस्पर हा काय प्रकार आहे?"
"क्रिस्परने छोट्या जनुकांचं कलम करता येतं. आपण झाडांचं कलम करतो तेव्हा जशी एक फांदी, किंवा डोळा वगैरे वापरतो तसंच, पण मायक्रो-स्केलवर. नेहमीच्या प्रजननात जीन्सचं मिश्रण होतं, पण ती व्हर्टीकल ट्रान्सफर असते. क्रिस्परसारख्या काही तंत्रांमध्ये मात्र हॉरीझाँटल किंवा लॅटरल जीन ट्रान्सफर होते. नेमक्या जीन्स माहीत असल्या तर अनेक गुणधर्म एका फुलातून दुसऱ्या फुलात घालणं शक्य आहे."
"कलमांपर्यंत समजलं, पुढचं नाही. पण मला समजणं तितकं महत्त्वाचं नाही. याचा उपयोग करून घ्यायची एक कल्पनामात्र मला सुचली आहे. माझा फुलांचा उद्योग आहे - पुण्यातच. माझ्याकडे डिझाईनची बॅचलर्सची डिग्री आहे... जग बरंच पुढे जात आहे. नावीन्यपूर्ण फुलं बाजारात आणायला मला आवडेल. तुमची तयारी असेल तर आपण पार्टनरशिप करू शकतो. नेमकं काय करायचं ते ठरल्यावर पार्टनरशिपच्या डीटेल्स ठरवता येतील." थेट मुद्द्यावर येत नेत्रा म्हणाली.

करार लगेच करायचा नव्हताच. कॉलेजमध्ये तसाही भरपूर वेळ असतोच. या प्रयोगांच्या निमित्ताने स्वतःची लॅब मिळाली तर बहार येईल. क्षणभरच विचार करून अरुणने होकार दिला. नेत्रा बंगलोरला आणखी काही दिवस राहणार होती. एका आठवड्याने पुण्यात भेटायचं ठरवून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

पुण्यात त्यांच्या बऱ्याच भेटी झाल्या. कधी बंड गार्डनमध्ये, तर कधी डेक्कनपाशी भर गर्दीत 'नॅचरल आईसक्रीम' खात. पहिल्या भेटीप्रमाणेच अरुण तंत्रात वाहात तर नेत्रा धंद्यावर डोळा ठेवून. पण वैचारिक देवाणघेवाण मात्र खेळीमेळीचीच असे. अरुणने तिच्या फुलांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेतलं आणि तिने त्याच्या प्रयोगांबद्दल. सुरुवात कशी करायची याबद्दल बरंच बोलणं झालं. अरुणला निळ्या कार्नेशन्सचा प्रयोग करायचा होता.

"पण ते कोणीतरी आधीच केलं आहे." नेत्राचा प्रॅक्टीकलपणा पुन्हा डोकावला.
"निळे गुलाब करू या का? ते खूप कठीण आहे असं मी ऐकलं आहे."
"पहिल्यांदाच खूप कठीण प्रयोग नको. असं काही करायला हवं की वेळ खूप जाणार नाही, आणि पैसेपण मिळतील. केवळ प्रयोग न राहता आता ही बिझनेस पार्टनरशिप आहे हे विसरू नकोस’, नेत्रा असताना अरुणला पैशांचा विसर पडण्याची सुतराम शक्यता नव्हती.
"हं. दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीला झेंडूचीच फुलं जास्त खपतात ना? रंगीत झेंडू …"
"अरुण, रंगांमधून बाहेर ये. तीच फुलं वेगळ्या रंगात आणली तर नव्याची नवलाई म्हणून काही दिवस खपतील आणि मग इतर फुलांप्रमाणेच नेहमीच्या जीवनाचा अंग बनतील. वेगळ्या रंगांत आणलीच फुलं तर मर्यादित संख्येने बनवून जास्त किंमत ठेवून केवळ श्रीमंत लोकांना टार्गेट करायला हवं."
"ए, तुला पटतं असं? आपल्यासारख्यांनी समानतेचा जास्त विचार नको करायला?" अरुणने जरा चाचरतच विचारलं. प्रयोगांबद्दल बोलत असतांना पैसे मिळवण्याचा उल्लेख त्याला खटकायचा, पण त्याचवेळी त्याला हेही जाणवायचं की सगळी सूत्रं त्यानेच हातात घेतली तर कदाचित दोघंही कफल्लक होतील.
"समानतेबद्दल वादच नाही. पण पोटाचंपण तर पाह्यला हवं. आणि पैसे असणाऱ्यांकडून घेतले थोडे, तेही त्यांच्या खुशीने आणि त्यांच्या खुशीखातर तर काय बिघडलं? माझ्याजवळ तर आणखी एक जालीम विचार आहे."
"?"
"दिवाळीच्या वेळी गुलाबांची डिझायनर फुलं बनवायची. रंग नेहमीचेच, पण पाकळ्यांवर वेगवेगळे रंगीत पॅटर्न्स. अंधारात खुलून दिसतील असे. बायो-रोषणाई." नेत्रा हवेत बोटं फिरवत म्हणाली.
"ईको-फ्रेण्डली. मस्त आहे की कल्पना. इलेक्ट्रीसिटीचीपण बचत होईल. यासाठी वेगळं तंत्र - ऱ्होडॉप्सीन प्रोटॉन पंपिंग - वापरावं लागेल."
"पंपिंग?" नेत्राला तांत्रिक तपशील कळत नसला तरी अशा वेळी ती अरुणला बोलतं ठेवायचा प्रयत्न करायची. त्याच्या या स्वगतांमधूनच त्याचा कल्पना खुलतात, फुलतात हे तिच्या लक्षात आलं होतं.
"काही बॅक्टेरीया एक प्रोटीन वापरून प्रकाशाच्या मदतीने प्रोटॉन्सना एका बाजूला ढकलतात. त्यातून केमिकल एनर्जी मिळते. प्रोटॉन्स एकाच दिशेला जात असल्याने त्याला पंपिंग असं नाव दिलं आहे. योग्य बदल करून, ते कोणत्या तरंगलांबीचा प्रकाश शोषतात, हे कंट्रोल करता येऊ शकतं." खिशात कागद न सापडल्यामुळे पेनने स्वतःच्या तळहातावरच प्रोटॉन्सचा प्रवाह दाखवायचा गिचमीड प्रयत्न करत अरुण म्हणाला.
"हं. तंत्राचं तू पाहा, विक्रीचं मी पाहीन." त्याचं मनगट धरून सेलफोनने त्याच्या तळहाताचा फोटो घेत नेत्रा म्हणाली.
"ठीक. पण या विचारात मूलगामी काय?" आपणच नेत्राचा हात पकडून त्यावरच चित्र काढायला हवं होतं असा मनात डोकावलेला विचार दूर ढकलत अरुणने विचारलं.
"किंमत कमी न करता जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर पाकळ्यांवरील पॅटर्न्स ‘श्री’, ‘ॐ’ वगैरे हवं."
"ए, बाई, उगीच त्या भानगडीत नको हं पडायला. पैसे मिळणार असले तरी त्यामुळे अंधश्रद्धा वाढणार असतील तर आपण यातून बाहेर. आपल्याला नाही जमायचं ते."
"अरुण, असा विचार कर. आपण हे नेमकं कसं करतो याचं गुपित कुणाला कळू देणार नाही; पण हे कृत्रिमरित्या करतो हे जगजाहीर करायचं. त्यामुळे अंधश्रद्धा कमी करायलाच त्यात कार्यरत असलेले गट मदत करतील - मानवालापण हे पॅटर्न्स जीन्सद्वारे बनवता येतात, आणि निसर्गात तशा जीन्समध्ये होत असलेल्या सततच्या बदलामुळे कुठे ना कुठे कधी ना कधी नैसर्गिकरित्या उद्भवणार. कधी उंबरात तर कधी वडावर."
"तेही खरं म्हणा, पण …"
"आणि जीन्समध्ये ढवळाढवळ करणं निसर्गाच्या विरुद्ध नाही?" नेत्रा अरुणला डिवचत म्हणाली.
तिच्या वाक्यातल्या शब्दांवर कोटी करायची उर्मी महत्प्रयासानं दाबत अरुण म्हणाला, "निसर्गाच्या विरुद्ध वाटणारे प्रयोग करायला माझी काहीच हरकत नाही कारण निसर्गाच्या विरुद्ध कोणी जाऊच शकत नाही. काही घडवून जरी आणलं तरी ते नैसर्गिकच. उत्क्रांतीला ठरावीक ध्येय नसतं. पुरेसं थांबलो तर जीवन कोणतं रूप घेईल हे सांगणं अशक्य आहे. दिलेल्या परिस्थितीत कसं फोफावायचं यात सर्व प्रकारच्या जीवनाचा हातखंडा. आपण फक्त ती परिस्थिती बदलण्याचं काम करणार, तिला विशिष्ट दिशेने ढकलणार’.
त्याला अजूनच खिजवत नेत्रा म्हणाली, "पण नवं काही असलं की लोक घाबरतात."
"कधी काळी विजा म्हणजे देवतांचा प्रकोप वाटायचा, आता आपण कृत्रिमरीत्या पाऊस पाडू शकतो. एकेकाळी ग्रह आपलं आयुष्य चालवतात असं वाटायचं, आता आपण मंगळावर स्वारी केली आणि एका धूमकेतूवर फिलीला उतरवलं. अज्ञाताचं भय लोकांना का वाटतं कुणास ठाऊक!" अरुण तावातावाने म्हणाला. विद्यापीठातल्या 'शांतीनिकेतन' कँटिनच्या त्याच्या पुरोगामी ग्रूपच्या गप्पांचा प्रभाव स्पष्ट दिसत होता.
"अरे पण तूच म्हणालास ना की या धार्मिक लोकांचं काही सांगता येत नाही म्हणून."
"मी म्हणालो की, उगीच त्यांच्या भावनांशी खेळायला नको, आणि अंधश्रद्धा पसरवली जाईल असं काही करायला नको. लोक धर्मात झालेले बदल सहज खपवून घेतात. धर्मच नाही म्हटलं तर मात्र त्यांचं धाबं दणाणतं. म्हणून तर धर्मनिरपेक्ष लोकांविरुद्ध असहिष्णुता वाढली आहे."
"हो, तेही खरंच. मोटरसायकलवाले जवळ थांबल्यास लगेच सावध व्हायचं. इव्हेझिव्ह अॅक्शन घ्यायची नाहीतर आपल्यालाही दाभोळकरत्व प्राप्त व्हायचं." नेत्रा अर्धवट गमतीने म्हणाली.
अजून खलबतं झाली आणि अरुण तयार झाला. या दरम्यान तो जास्त नीटनेटका राहू लागला होता, विद्यापीठाच्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सची भानगड नको म्हणून काही नव्या इक्विपमेंट्स मिळवून एक छोटी लॅब स्थापली होती आणि मोठ्या लॅबची स्वप्न पाहणं सुरू होतं.

"Great. We are almost there." या नेत्राच्या वाक्याने तो भानावर आला.
नेत्रा स्पेक्ट्रोग्राफमधून पहातच पुढे बोलली, "हा वर्णपट थोडा बदलायला हवा. चांगल्या कॉन्ट्रास्टसाठी कोणतं पॅलेट हवं, याचा एक तक्ता देते मी. पॅटर्नपण किंचित ग्राफ-पेपरसारखा वाटतोय. साधारण हजारात तीन व्यक्तींना फोटोसेन्सिटीव्ह इपिलेप्सी असते. अशा लोकांना या पॅटर्न्समुळे फेफरं यायची शक्यता असते. पॅटर्न्स बदलले तर उत्तम होईल."

डिझाईन तत्त्वांबाबतच्या तिच्या ज्ञानाची मनातल्या मनात वाखाणणी करत अरुण म्हणाला, "पॅलेट, पॅटर्न, स्पेक्ट्रम, तिन्ही बदलणं शक्य आहे. योग्य ते बदल व्हायला फुलांच्या तीन-चार पिढ्या लागू शकतात. पॅरॅललमध्ये केल्यास सामग्री जास्त लागेल, पण लवकर होईल. तसंच करतो. उद्याच्या लॅब्स झाल्यानंतर."
"परफेक्ट. दिवाळीचा लाँच पक्का. सगळ्या नोट्स नीट ठेव." स्पेक्ट्रोग्राफ परत कपाटात ठेवत नेत्रा म्हणाली.
तोपर्यंत रूपामावशीनी आणलेल्या चहाचा कप घेत अरुणने मान डोलावली.
"आणि या कानाचा त्या कानाला पत्ता नका लागू देऊ." आतापर्यंत सर्व मूकपणे पहात असलेले श्री. चिरकुटे म्हणाले.
"पण अॅडव्हरटाईज तर करावं लागेल ना?." इति अरुण.
"अरे हो, ते सांगायचंच राहिलं. मी त्याबद्दल रिंकूशी बोलले. त्याने आपल्यासाठी designer flowers आणि तत्सम नावं असलेली दोन-चार वेब-डोमेन्स घेऊन ठेवली आहेत आणि आपलं प्रॉडक्ट तयार होईपर्यंत वेबपेजेसचं डिझाईनपण तयार असेल."
"हा कोण टपकला मधेच?"
"रिंकु माझा NIDतला मित्र आहे." नेत्रा म्हणाली. अरुणचा पडलेला चेहरा पाहून तीच पुढे म्हणाली, "अरुण, तू भलत्या कल्पना नाही ना करून घेतल्या?"

सगळं सुरळीत सुरू होतं. दोन-चार ट्रायल्सनंतर रंगसंगती वगैरे सगळं नेत्राच्या मनाजोगतं झालं होतं. वेबसाईटपण तयार होती. पुण्यातले तीन इतर आऊटलेट्सपण नेत्राची फुलं ठेवणार होते. मुंबईतील एका मोठ्या फुलवाल्याबरोबर चिरकुटे वाटाघाटी करत होते.
अशातच गणू घाबरा-घाबरा आत आला.
"प-प-पोलिस." बाहेर बोट दाखवत तो म्हणाला.
तितक्यात एक इन्स्पेक्टर गणूच्या पाठोपाठ आत आले.
"काय, पोलिस म्हणताच घाबरलात?"
"पण, पण काय केलं काय आम्ही?" इति चिरकुटे.
"काही केलं नाहीत तर घाबरलात का?"
"पोलिस आले म्हंटलं की घाबरणारच ना - काही केलं असो वा नसो."
बाहेर सुरू असलेलं बोलणं ऐकून नेत्रा आणि रूपामावशीही बाहेर आल्या.
नेत्राकडे पाहात इन्स्पेक्टर म्हणाले, "यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे."
"पण आमची फुलं देवासाठी नाहीतच." नेत्रा पुढे येऊ घातलेले आरोप ताडत शांतपणे म्हणाली.
"देव? कोणता देव?."
"कोणत्याच देवासाठी नाहीत. निव्वळ शोभेसाठी आहेत."
"शोभेसाठी असो वा नसो, तुम्ही गुन्हा कबूल करता का?"
"इन्स्पेक्टर, बसा जरा. काही तरी घोटाळा होतो आहे. नाव काय म्हणालात तुमचं?"
"नेने, इन्स्पेक्टर नेने."
"आणि गुन्हा काय आहे म्हणे?"
"फुलांचं जनुकीय परिवर्तन करूनतुम्ही उत्क्रांतीत ढवळाढवळ करताय असा आरोप आहे."
ते ऐकून नेत्राने एकाचवेळी निश्वास सोडला आणि हसू दाबलं. तिचा त्यामुळे विचित्र झालेला चेहरा पाहून इन्स्पेक्टर म्हणाले, "झडती घ्यायची आहे."
"आवश्यक ते सर्व अर्ज आम्ही आधीच केले आहेत. आमच्या फुलांमध्ये पुनरुत्पादन क्षमता नाही त्यामुळे त्यांना GMOचे नियम लागू होत नाहीत. आम्ही रसायनंपण वापरत नाही. गुन्हा दाखल केला तरी कोणी?"
"अँटी-GMO ग्रूपचा गजाभाऊ कापरे."
"कोण हा?" या नेत्राच्या प्रश्नावर इन्स्पेक्टरांच्या डोळ्यातील 'असं-कसं माहीत नाही' हे तिला स्पष्ट दिसलं. तीच पुढे म्हणाली, "तुमच्याजवळ वॉरंट असल्याशिवाय आणि आमचा वकील असल्याशिवाय झडती घेता येणार नाही."
"उद्या येतो मी." म्हणत इन्स्पेक्टर नेन्यांनी काढता पाय घेतला.
त्यांच्यामुळे बाहेर जमलेल्या गर्दीला गणूने पांगवलं.

इन्स्पेक्टर गेल्याची खात्री झाल्यावर रूपामावशी म्हणाल्या, "काय करायचं गं? नसती कटकट मागे लागणार असं दिसतंय."
नेत्रा मात्र नेहमीच्याच शांतपणे म्हणाली, "आई, तू काही काळजी करू नकोस. असं काही होऊ शकतं याची मला पूर्ण कल्पना होती. मी आणि अरुण आधीच पानसे वकिलांशी बोलून आलो आहोत."
"पण ते उद्या येतील तेव्हा ही फुलं इथे नकोत ना?"
"असायला हवीत त्याचकरता तर ते येताहेत ना! दाखवू की, त्यात काहीच गैर नाही ते."
"अँटी-GMO हा काय प्रकार आहे?"
"त्यांना जेनेटीक मॉडिफीकेशन्स, म्हणजेच जनुकांमध्ये मानवाने घडवून आणलेले बदल मान्य नाहीत. जे ज्ञात आहे, प्रस्थापित आहे तेवढंच योग्य; असा त्यांचा खाक्या असतो. अरुणच्या शब्दात सांगायचं तर त्यांना नवं काहीच नको असतं. अज्ञाताचं भय. योग्य प्रयोग करून काही साधायचं म्हटलं तर ते काही सोपं नाही. असे लोक सगळीकडे असतात, पण भारतात तर आता त्यांना राजकीय साहाय्य मिळण्याची चिन्हं आहेत."
"सांभाळून राहा बरं का."
"आई, तू काही काळजी करू नकोस. आपला मार्गही तितकाच योग्य आहे याची आम्हाला खात्री आहे."

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे इन्स्पेक्टर नेने आले. या प्रकाराची कुणकुण लागल्याने त्यांच्या मागोमाग वार्ताहरही आले होते. पोलिसांनी फुलांचे आणि त्यांच्या डब्यांचे फोटो काढले, आणि पुरावा म्हणून फुलं बरोबर नेणार असल्याचं सांगितलं. पोलिसांबरोबर फिर्याद करणारी अँटी-GMO टोळीपण होती. गजाभाऊ अशा अनेक वेगवेगळ्या तक्रारी नोंदवण्यात तरबेज असलेला एक कुख्यात विघ्नसंतोषी आहे हे पानसे वकीलांच्या कानावर आलं होतं. पोलिसांचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत ते काहीच बोलले नाहीत. मग फुलांच्या डेव्हलपमेण्टबद्दलची हातातल्या कागदांची एक थप्पी इन्स्पेक्टरांच्या हातात दिली आणि गजाभाऊकडे पाहात म्हणाले, "यात माझ्या अशीलांनी घेतलेल्या सर्व परवानग्या आहेत, तसंच संपूर्ण प्रोसीजर आहे. या केसमध्ये काही तथ्य नाही हे कोणीही सांगू शकेल."
"तुम्ही बॅक्टेरीयाच्या जीन्स फुलांमध्ये नाही घातल्या?" आपल्या जीन्सच्या खिशात हात खुपसत गजाभाऊने विचारलं.
"ती एक स्टँडर्ड पद्धत आहे - फुलं जो प्रकाश शोषून घेतात ते या बॅक्टेरीयांच्या मदतीनेच."
"आणि ही किडे असलेली फुलं देवाला वाहायची?" ट्रेन केलेलं कुत्सित हास्य चेहऱ्यावर खेळवत गजाभाऊ म्हणाला.
"पण ही देवासाठी आहेत असं सांगितलंच कुणी?" नेत्रा म्हणाली.
"आणि तसंही जीन्सचं इतकं मिक्सींग झालं असतं की फक्त तुमच्या व्याख्येप्रमाणे शुद्ध फुलं वहायची म्हटलं तर देव भक्तीविना उपाशीच राहतील." अरुण म्हणाला.
"तर," पानसे पुढे म्हणाले, "तुम्ही ही केस जिंकू शकत नाही हे निर्विवाद. तुम्हालाही ते माहीत आहे, हे आम्हाला माहीत आहे. पण केस चालेल तोपर्यंत आमच्या अशिलाचं नुकसान होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून फिर्याद मागे घ्या आणि तुमचा सहभाग नसलेल्या, तुम्ही म्हणाल त्या NGOला माझे अशील पन्नास हजार रुपये देतील. तुम्हाला मान्य नसल्यास मात्र तुमच्यावरच नुकसान-भरपाईसाठी खटला दाखल करू. बोला कबूल आहे का?"
मग कागद इकडून-तिकडे गेले, थोडं विचारमंथन झालं आणि शेवटी एका लाखाचं सेटलमेण्ट झालं. इन्स्पेक्टर आगपेटीच्या काडीने कानातला मळ काढत सगळं शांतपणे पाहात होते. ती काडी कोपऱ्यातल्या कचरापेटीत टाकून ते आपल्या लवाजम्यासह तितक्याच शांतपणे बाहेर पडले.

"एक लाख इतक्या सहजासहजी दिले?" श्री. चिरकुट्यांनी विचारले.
"ते जाऊ द्या हो, पैसे काय येतील परत - ब्यादतर टळली एकदाची. थोडक्यात हे प्रकरण निपटेल असं वाटलं नव्हतं." इति रूपामावशी.
"स्पॉट अॉन." नेत्रा हसत म्हणाली. "बाहेरचे वार्ताहर पाहिले का? आपल्याला भरपूर प्रसिद्धी आपोआप मिळाली आहे. आता जास्त लोकांना आपण आणि आपल्या प्रॉडक्टबद्दल माहीत आहे आणि ते पैसे आपण दान केले असाच सूर आपण पसरवू शकतो."
पानसेंची कागदपत्रं आवरून झाली होती. "पुन्हा माझी गरज पडणार नाही, पण वाटल्यास कॉल करा" असं सांगून तेही बाहेर पडले.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमधल्या काही बातम्यांचा सूर सकारात्मक होता पण सर्वच बातम्या चांगल्या नव्हत्या. काहींनी तर सरळ नेत्राचं आणि गजाभाऊंचं संगनमत असावं असं म्हटलं होतं. फुलांची विक्री सुरू झाली होती, पण फुलांमध्ये असलेल्या ‘किड्यां’च्या जीन्समुळे काही लोकांनी त्यावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं. आऊटलेट्सपेक्षा जास्त खप अॉनलाईनच झाला. ‘श्री’ आणि ‘ॐ’ला नावीन्यामुळे मागणी असली तरी फुलं काही दिवसांतच कोमेजत असल्याने ते फार काळ टिकलं नाही. नाही म्हणायला दिवाळी पाठोपाठ येणाऱ्या ख्रिसमसच्या वेळी क्रॉस आणि बायबलमधल्या गोष्टींच्या डिझाईन्सनी हात दिला. डिझायनर फुलांची डिमांडमात्र वाढू लागली होती. रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या की-चेन्सप्रमाणे लोकांना फुलांवर चक्क आपल्या ‘सिग्निफिकंट अदर’चे अाद्याक्षर हवे असे. कुणाला स्वतःचं संपूर्ण नाव तर कुणाला पत्त्यासकट आपल्या बिझनेसचं. इतकी सगळी फंक्शनॅलिटी आणणं एकट्या अरुणला शक्य नव्हतं. आणखी दोघांना त्याने ट्रेन करणं सुरू केलं पण लोकांच्या तऱ्हेवाईक मागण्या पूर्ण करणं सोपं नव्हतं. पांढऱ्या फुलांवरील प्रयोग सर्वात जास्त यशस्वी ठरले होते, पण सगळ्यांनाच पांढरी फुलं आवडत नसत.

"प्रत्येक डिझायनर फुलासाठीची मेहनत काही परवडत नाही." एक दिवस अरुण थोडा हताशपणे म्हणाला.
"दिसतंय रे शोन्या." नेत्रा म्हणाली. "काही तरी नवी शक्कल लढवायला हवी". नेत्राचा लाडिकपणा क्षणभरच टिकला.
"निर्यात केली असती, पण बायो-प्रॉडक्ट्सवरील एक्स्पोर्ट लायसन्स मिळवणं महाकठीण."
"बरंय, नाहीतर आतापर्यंत चायनीज बायो-गणपती नसते दिसले?"
"असं काही डिझाईन हवं, जे मास प्रोड्यूस करता येईल. एकेका बॅचमध्ये शे-दोनशे."
"आयडेण्टीकल डिझाईन जे अनेकांना आवडेल."
"हिंदू, ख्रिश्चन झाले, आता …." अरुण अर्धवट स्वतःशीच म्हणाला.
"डोण्ट इव्हन मेन्शन इट - मरायचं आहे का?"
"तुला चालतं त्यापेक्षा ते जास्त जालीम आहे का? एनिवे, मी बुद्ध आणि आंबेडकरांबद्दल बोलत होते."
"नो. पण स्वातंत्र्यसैनिक करायचे का?"
"तिथे पण पटेल सारखं कोणी घेतलं तर कोणाला पटेल आणि कोणाला नाही. गांधीचीही तीच गत. काही तरी वैश्विक हवं."
"हं."
"प्रेम?" अरुण चक्क किंचीत चाचरला बोलताना.
"येस्स." त्याच्या गालावर अलगद ओठ टेकवत नेत्रा म्हणाली. लगेच दूर होत तिने आपला विचार पूर्ण केला, "व्हॅलेण्टाईन्स डे जवळ आला आहे, तेव्हा एक बार उडवून देऊ."
तो बार लग्नाचा नाही हे अरुणला समजत होतं.
"पण भारतातल्या कोणत्याच आणि कोणाच्याच देवाला आवडत नाही तो दिवस. राम सेना, शिव सेना, बजरंग दल..."
"पौराणिक कामदेवाशिवाय. पण परंपरेकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला आहे? आणि आपण लोकांना उघडपणे फुलं घ्यायला उद्युक्त काही करणार नाही. वेबसाईटवरुनच विकली जातील फुलं. अगदी दोन-चार दिवस आधी सुरू करायची विक्री."
"बाकी लोकपण फुलं विकतातच म्हणा. ठीक आहे, कोणते डिझाईन्स ते तू ठरव. मी आवश्यक सामग्री गोळा करणं सुरू करतो."

आणखी एक-दोन भेटींत काही रंगीबेरंगी डिझाईन्स ठरली. गुलाबी रंग लाल आणि पांढऱ्यापासून बनत असल्याने, गुलाबी, लाल, आणि पांढऱ्या गुलाबाच्या फुलांवर सिग्नेचर पॅटर्न्स करायचं ठरलं. फुलं जास्त दिवस फ्रेश राहावीत म्हणून अरुणने आधीच जीन्समध्ये काही फेरफार केले होते. तरी बॅक्टेरियांनी प्रदान केलेले रंग मात्र जास्त टिकत नसत. आता त्यासाठीही त्याने जीन्स हळूहळू एक्सप्रेस होतील अशी व्यवस्था केली. पहिली बॅच एकच आठवडा आधी तयार झाली.

गुलाबी फुलावर एक बदामाचा आकार आणि त्याच्या वरच्या भागात युनिटी दर्शवणारी एक लाल आणि एक पांढरी अशा दोन नाजुक पट्ट्या होत्या. अरुणने पहिलं फुल नेत्राला सगळ्यांसमक्ष दिलं. बाण योग्य ठिकाणी लागला की नाही ते त्याला कळलं नाही.
"मस्त!" रूपामावशींनी पावती दिली.
"पोरांनो, सांभाळून राहा." चिरकुट्यांनी सल्ला दिला.
"बाबा, काही काळजी करू नका. यात आक्षेपार्ह काहीच नाही. अरुण, ते बॅक्टेरियांमुळे काय वेगळं होणार आहे ते सांग पुन्हा."
"ही फुलं आठ दिवस टवटवीत राहतील. त्या पट्ट्या बदामावर हळूहळू सरकत राहतील. आधी बदाम आणि दोन पट्ट्या - एक लाल आणि एक पांढरी, मग बदाम तसाच राहणार पण लाल पट्टी गायब होणार आणि बदामावर पांढऱ्या पट्टीची जागा एक नवी लाल पट्टी घेणार आणि त्या खाली नवीन पांढरी पट्टी दिसणार. पट्ट्या अशा तऱ्हेने सरकत-सरकत बदामाच्या खालच्या टोकापर्यंत काही दिवसात पोचणार. पुढे कधीतरी त्या पट्ट्यांची लांबी बदामाच्या रुंदीप्रमाणे बदलवण्याचा प्रयोगपण करायला हवा. वेळ कमी असल्याने या वेळी जमलं नाही."
"तुला कळतंय ना काय करतो आहेस ते, मग झालं तर. वेब-अॉर्डर्स आल्या की डिलीव्हरी करायला आपली नवी टीम तयार आहेच."

व्हॅलेण्टाईन्स डे उजाडला. गेले चार दिवस भरपूर अॉर्डर्स आल्या होत्या, शेकड्यांनी फुलं रवाना झाली होती. आजही काही लास्ट मिनिट अॉर्डर्स थेट लॅबमधून जात होत्या. अरुणने ठरवलं होतं की आज हिय्या करून नेत्राला आपल्या मनातल्या तिच्याबद्दलच्या भावना बोलून दाखवायच्या. पण तो लॅबमध्ये अडकला होता. या महत्त्वाच्या दिवशी तो प्रयोगशाळा सोडता तर त्याचं काही खरं नव्हतं. इतक्यातले लागोपाठचे प्रयोग, त्यानंतर पॅक करून ठिकठिकाणी फुलं पाठवणं यामुळे प्रयोगशाळेत खूप पसारा होता - पेट्री-डिशेस, मायक्रोस्कोप्स, डबेडुबे आणि बरंच काही. लवकरच सगळं जागेवर लावायची मनाशी खूणगाठ बांधत अरुणने त्याच्या खुर्चीच्या थेट मागे असलेल्या वस्तू आवरल्या आणि टेक्स्ट पाठवून नेत्राला व्हिडीओ-कॉनवर बोलावलं.
"काय रे येवढं महत्त्वाचं?"
अनेक तरंगलांबी वापरल्या तरी तिच्या डोक्यात नव्हताच पडणार का प्रकाश?
"अं, मी तुला त्या दिवशी ते फूल दिलं ना, त्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे."
"काय?"
म्हणजे ते फूल तो तिला देतो आहे हे कळलंच नव्हतं तिला? तो बदाम, ती युनिटी?
"कुठे आहे ते फूल?"
"कपाटात आहे, स्पेक्ट्रोस्कोपजवळ." नेत्राची छोटी लॅब तिच्याजवळच असे.
"आणतेस का बाहेर? मला तुला काही सांगायचं आहे."
"अरुण, टेन्स का आहेस इतका? ठीक आहे ना सगळं?"
"आण तर ते फूल." अरुणला आपला पेशन्स टिकेल याची शाश्वती नव्हती.
"बरं आणते बाबा." नेत्रा उठली आणि फुलदाणीसकट फूल घेऊन आली. "सांग आता."
"मी तुला …." फूल पाहून मात्र अरुणची बोबडी वळली.
"अरे असं भूत दिसल्यासारखं काय बघतोस?" नेत्राने अविश्वासाने आ वासलेल्या अरुणकडे पहात म्हटलं.
"ते फ… फूल …"
पहिल्यांदाच नेत्राने फुलाकडे पाह्यलं आणि तिच्या हातातून फुलदाणी गळून पडली.
"अरुण, क-काय झालं हे?"
"बॅक्टेरीया." अरुण कसाबसा स्वतःला सावरत म्हणाला.
बॅक्टरीयातील DNAच्या डिलेड अॅक्शनने आपलं काम चोख बजावलं होतं. पण वरच्या पट्ट्या नाहीशा न होता अॅबसॉर्पशनचे प्रमाण आणि तरंगलांबी बदलल्यामुळे की काय, काळाप्रमाणे त्यांचे रंग बदलत गेले होते. त्यांना अपेक्षा होती तसं एक बदाम आणि एकावेळी दोनच पट्ट्या असं राह्यलं नव्हतं. त्याऐवजी दिसणाऱ्या बदाम आणि विविध रंगांच्या पट्ट्यांमुळे कोण काय विचार करेल हे स्पष्ट होतं. या कयासाबद्दल अरुणचं सांगून होतं न होतं तोच गणू आणि त्याच्या पाठोपाठ इन्स्पेक्टर नेने दारातून उडत आले.
"मॅडम, तुमची मागची केस मिटवली पण आता तुमची सुटका नाही."
"..."
"तुम्ही इंद्रधनुषी फुलं बनवून समलिंगी प्रवृत्तींना खतपाणी घालताहात असा तुमच्यावर आरोप आहे. तुमच्या वकिलाला थेट पोलिस ठाण्यावर आधीच बोलावलं आहे."

इन्स्पेक्टर बोलत असताना नेत्रा अरुणकडे हताशपणे पहात होती. तोच दरवाजा उघडून दोन पोलीस आत शिरले.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

सायफाय कथा खूपच छान आणि बारकाव्यांनिशी रंगवली आहे. एकंदर समाजाचा बुरसटलेपणा उघड होत होत शेवटी "होमोफोबिया" मधुन अगदी लख्ख प्रकट होतो.
.
मला सारखं वाटत होतं ती महाव्यवहारी नेत्रा, अरुणला खड्ड्यात घालणार. पण "अपेक्षित" तसे काही घडले नाही. त्याजागी बुरसटलेल्या विचारांच्या समाजाचे कुरुप रुप एकदम छान उघडे पाडलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉलिड कथा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शुचि म्हणते तसा बुरसटलेपणा रंगवतानाही सगळ्याला एक डँबिस टोन आहे. तो मला फारच आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.