एक कविता तीन टिंबं...

कथा

एक कविता तीन टिंबं...

- प्राजक्ता पाडगावकर

एक एक थेंब, गार, गरम, गार...
पाऊस पडू लागला. अवनी रडू लागली.

काळ्याकभिन्न ढगात कित्तीतरी मोठे नाट्य घडत होते, तो पहिला टप्पोरा थेंब खाली पडायच्या आधी.

हळू हळू बाल्कनीच्या रेलिंगवरची पकड सैलावत गेली. रियाज संपल्यावर तानपुरा खोळीत घालून जागेवर ठेवावा आणि उठून उभे राहताना सहज, सकाळी रेडिओवरून कानी पडलेले उडत्या चालीचे गाणे नकळत गुणगुणले जावे; रियाजाची शुचिता भंगल्याची एक सल सहज रुतावी तरी काहीशी ती धून सुखावून जावी - तसे काहीसे...

उंचवट्यावरचे पाय. चवड्यावर किती वेळ नेमकी उभी होती ती? तिलाच आठवेना. मात्र पाऊल पूर्ण जमिनीवर टेकले आणि एक टोचणी थेट मेंदूपर्यंत गेली...हात...सैलावलेली पकड पूर्णपणे सोडली तरी हातावरचे फाक पांढरे, किंचितपिवळसर लालसर व्रण तिलाच वेडावून दाखवू लागले.

नाकाखालची तिची सोनेरी लव उष्ण, तप्त श्वासांनी थरथरत राहिली, एक गरम, एक गार - ते निरंतर पेढ गुंफत राहिले - जीवनाचे. कानशिलाच्या रेषा किती ताणून धरल्या होत्या, ते त्या सैलावल्यावर जाणवल्या. घट्ट मिटलेले ओठ किंचित विलग करत ती अस्फुट हुंदके देऊन रडू लागली.

दूरवर तलावातले पाणी लकाकत होते, प्रत्येक थेंबागणिक खोलवर डुचमळत होते. पापणीवर ताणलेली लायनरची रेघ, कालिंदीसारखी कढत पाण्यात मिसळून ओघळत होती. अवनीने वर पहिले, नकळत हात पसरले गेले आणि कोसळणाऱ्या त्या मातकट थेंबांत ती भिजत राहिली. तप्त उन्हाळ्यानंतरचा पाऊस, शेतं भिजवणारा, शहर गचाळ करणारा, नद्या नादावणारा...पाऊस!

थेंबात रुजून यावे
ते चिमुकले कोंब हिरवेसे
मिटल्या खिडकुटलीला
स्वप्न पिंपळाचे पडावे
त्या धमन्यांतून वाहावे
शब्दसरींचे रक्त.........

रक्त? रक्त कुठून येतेय? shit shit shit! हळद? अॅ? अॅमब्युलन्स? पोली...स? नाही नाही नाही.... Chill. Chill. Chill.
breathe in,
breathe out...
Shit shit shit!

बाल्कनीतल्या टाईल्सच्या मधल्या ग्राउटवर एक तांबडा तांबूस ओघळ सहज वाहत निघालेला. प्रत्येक थेंबाने त्याला वाटेवर छेडायचेच ठरवल्यागत. तरी, तरी तो चिवट रक्ताचा ओघळ तसाच जात राहिला, त्या पामच्या सुबक कुंडीला वळसा घालून थेट त्या काळ्या जाळीकडे - तिथून कदाचित गटारात?
Shit
नाहीच! आधी हळद...

अवनी धडपडत आत गेली, त्या चकचकीत सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये कसली मिळायला हळद? बँडेज… बर्फ! हा, हो बर्फ!!

त्या धमन्यांतून वाहावे
शब्दसरींचे ओघळ
मिटत मिटत जावी
ही मुशाफिरांची वर्दळ

सौमील यायच्या आधी हे डाग साफ करावे लागणार. shoot!!! त्या beige couch ला डाग! Gosh!!! अवनी मनात शिवीगाळ करत चिरलेलं मनगट आणि फुटकी कविता घेऊन एकटीच बसून राहिली.

बर्फाचा तुकडा आळीपाळीने तांबडा होत राहिला. थंड बधीरपणा आला. मनगटाला, मनाला. मग दुसरा तुकडा. करत करत एक तुकडा सटकून समोरच्या ग्लास top table वर पडला. स्ट्रायकर लागलेली सोंगटी भिरभिरत कॅरमबोर्डाच्या टोकापाशी जावी आणि त्या अर्धवर्तुळाकार अंधारापाशी जीव बिलगून अवचित थांबावी, तसा तो बर्फाचा तुकडा, टेबलाच्या टोकापाशी थांबून वितळत राहिला. स्वतःच्याच असण्यात माखत राहिला, स्वतःच्याच मोहात वाहत निघाला. अवनीसारखाच...

रक्त आता थांबले होते. पर्समधले bandage लावून अवनी पुन्हा बाल्कनीपाशी गेली. खालच्या गाड्या इथून तेविसाव्या मजल्यावरून किती छोट्या दिसतात ना?

Grey skies of Mumbai. त्यातली नेमकी grey shade कोणती, ती आज तिला पक्की उमगली. निळ्यात काठाकाठाने काळा रंग मिसळत जावा आणि मनासारखा रंग अजून का झाला नाही, ह्या अधीरतेने ब्रश पुन्हा पाण्यात बुडवावा ती! ती काळपट वर्तुळे विस्तारताना अचानक तो हवासा रंग त्या पाण्यावर तरंगावा आणि निमिषार्धात सगळे पाणी गढूळ काळपट व्हावे तसे दिसते आकाश मुंबईत पाऊस पडताना. आणि त्या पावसातून सर्रकन अंगावर काटा आल्यागत काही पिवळ्या रेषा सरकाव्यात आणि शहराला पुन्हा त्याच वेगाने मिठीत घ्यावे ते इथल्या टॅक्सीने.

आयुष्यात येणाऱ्या माणसांना स्वतःच्या आतून ह्याहून वेगाने कोणीच बाहेर फेकू शकत नसेल ना, टॅक्सी सारखे? मीटर टाकून पुन्हा एक नयी सवारी. मेणचट सीट आणि डॅशबोर्डवरच्या काचेवर वेलवेटच्या झिरमिळ्यांचा पडदा.

" किधर जानेका मॅडम?"
"साकीनाका"
"टाईम लगेगा...."
"चलिये"

"Hello, I have an appointment with Dr Johri."
"She’ll see you shortly ma’am, please be seated."
"Hi! Ms. Mudit, your reports are clear, you are not pregnant, you have a classic case of amenorrhea. You should do a full course of hormones, can you see me next week?
Ms. Mudit? Hello!! I am not done…
USHA!!!! Stop that girl!! उसने पेमेंट किया था क्या???"

अवनी क्लिनिकपासून गल्लीच्या टोकापर्यंत धावतच बाहेर पडली.
"मी!!! Thank my faulty hormones! Gosh किती मूर्ख होते मी..."
"रिंक...."
"बच्चे busy होता है पापा. क्या है?"
"रिंक, I, we...अं...am not pregnant..."
"..............."
" मैंने कहा था ना, कुछ नहीं होना, पापा का सुना कर बच्चा..."
" stop बच्चाing me रिंक."
"अब क्या बच्चे?"
"बच्चा होता तो? तब क्या करते तुम?"
"अरे ऐसे कैसे होता?"
"होता तो?"
"..........."
" टेस्ट करवा लेते."
" किस चीज की?"
" देख बेबो, बेटी तो है मेरी. लड़का होता तो रखवाते. नहीं तो गिरा देते. सारा खर्चा मैंने उठाना..."
"........"
"अवनी? क्या यार? खामखाँ उटपटांग सवाल पूछने पापा से. नहीं है ना कुछ, छोड़ ना...मैं अगले हफ्ते मिलता हूं तुझे."
"Just FUCK off Rink!"
"SHUT UP!!!! SHUT THE HELL UP!!!!! आइंदा कभी फोन करने की भी जुर्रत की ना, तो तुम्हारे बीवी को सब बता दूंगी."
"अब ये क्या नया मूड तेरा???"
"JUST FUCK OFF....I said!!!"

अवनी त्या दिवशी घरी आली तेव्हा म्लान, उद्ध्वस्त, फसवली गेली होती. का तीच तिची लायकी होती? उन्मळून पडली. "किती मूर्खपणा हा? आई-अण्णांचे मध्यमवर्गीय आयुष्य नकोसे झाले म्हणून इथे या मायानगरीत आले काय, ह्या श्रीमंतीला भुलले काय आणि आता हे.. कुठे आले मी? स्वतःची किळस वाटावी असेच वागले मी. कुठे आहे ते काव्य, ते स्वप्नाळू मन आणि कुठे ही वासनांध बरबट? यशस्वी होण्याकरताची किंमत....किती हवेत अजून तुला पैसे? किती?? पोटात पोर असते तर?? खून केला असतास त्या निष्पाप जिवाचा??
इतकेच आहे तर तू स्वतःतरी का जगते आहेस???"

अवनी शॉवरखाली बसून राहिली कितीतरी वेळ. कितीही अंग घासले तरी त्याचे सराईत स्पर्श मिटणार नव्हते. कितीही केले तरी मनावरचे मळभ फिटणार नव्हते. शॉवरजेलचा फेस कुरवाळत राहिला तिचे असले-नसलेपण. तसली गुळगुळीत फसवी माया तरी कोण करणार होते तिच्यावर पुन्हा?

त्या धमन्यांतून वाहावे
शब्दसरींचे ओघळ
मिटत मिटत जावी
ही मुशाफिरांची वर्दळ
वारी जन्मोजन्मी
मज नाम्याचा कोठे सोस
प्रत्येक आषाढीला
मी कान्होपात्रा व्हावी
मी कान्होपात्रा व्हावी.
काढ कटीचा शेला
लाव माथी चंदन टिळा
ह्या पावित्र्याने आता
तू पुरती भर ओंजळ
थेंबात रुजून यावे ते
चिमुकले कोंब हिरवेसे…

"खांद्यात किती टेंशन साठवशील? सैल सोड" नंदन नेहमी म्हणायचा.
मी...मी चुकले नंदन, तुझी हुशार सालस दी चुकली रे. मी गुन्हेगार आहे आई-अण्णांची. तो! तो अण्णांच्या वयाचा आहे रे… मी खूप वाहवत गेले. असो. आता नाही. आता नाही. आता ही गोष्टच संपेल...माझ्या ह्या शेवटच्या कवितेसारखी. जगण्यात आणि शब्दांत बळ उरले नाही रे आता.

हातातले घड्याळ अवनीने काढून ठेवले. त्याच्या पट्ट्याचा व्रण, हलकासा, सोनेरी नाजूक वेणीचा...
नवा कोरा रेझर पांढऱ्या रॅपरमधून काढला. आतला फिक्कट धुरकट पांढरा कागद सवयीने घडी करून ठेवला. मग स्वतःवरच चिडून, तो चुरगळला.

कट कसा घ्यावा? कोयरीसारखा? मरणातदेखील सौंदर्याचा सोस सरेना. एकच मनगट अर्धवट चिरून ती बाल्कनीत उभी राहिली. तेविसावा मजला आहे, सहज उडी टाकता येईल. रेलिंगला घट्ट धरून ती उभी होती. टाचा उंचावून...खालच्या गाड्या खेळण्यातल्या भासत होत्या. मुंबई. करड्या कोरड्या मनाची मुंबई. कितीजणी जीव देत असतील रोज इथे? मीही त्यातलीच एक होईन. बारीकश्या रकान्यात चतकोर ओळ लिहून येईल. वाचणार कोणीच नाही. इथे जगणे इतके जीवघेणे असताना मरणाचे काय कौतुक?
अण्णांना मात्र तिचे खूपच कौतुक होते, तिचे प्रत्येक लिखाण ते कौतुकाने वाचत, तिची प्रत्येक कविता तिला छान तालात वाचून दाखवत. त्यांच्या समोर हा देहाचा चेंदामेंदा येईल तेव्हा...कसे वाटेल त्यांना?

आणि अचानक भरून आलेलं आभाळ फुटून कोसळू लागलं. एक एक थेंब...गरम, गार, गरम...
रक्ताचा तो हट्ट ओघळ. ग्राउटच्या वळणावळणांनी निघालेला...
कधीही काहीही लागलं की अण्णा tincture iodine लावणारे. "अगं, इन्फेक्शन होणार नाही. थोडे चुरचुरेल इतकेच."
त्यांनी ह्याही जखमेवर लावलेच असते झोंबणारे tincture iodine. तितक्याच हळुवारपणे...
त्यांची काय चूक? माझ्या महत्त्वाकांक्षेची किंमत त्यांनी का चुकवावी? मी त्यांचे प्रेम आहे, प्रेमाचे जिवंत रूप आहे. मला काय अधिकार आहे, त्यांची कविता अर्ध्यावर तोडायचा?

एक अवनी तृप्त झाली, त्या प्रेमळ पावसाने. एक कविता धुगधुगत राहिली...पुन्हा चालत राहिली त्या तीन ठिपक्यांपुढे.

"थेंबात रुजून यावे
ते चिमुकले कोंब हिरवेसे...."

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

सुंदर आहे. वडिलांचा अपराध केल्याच्या जाणिवेने आत्महत्येकडे धावणारे मुलीचे मन त्यांच्याच प्रेमळ आठवणींनी मागे फिरते. कथा खुप छान रंगवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोळ्यात पाणी आले. ताकदीने प्रसंग ऊभा केलेला आहे. काही काळ तरी मूड उदास रहाणार. ५/५

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0