अंतर

संकल्पनाविषयक

अंतर

- डॉ. गौतम पंगू, सदस्यनाम - भ्रमर

घराचं दार उघडून कार्तिक बाहेर आला. "निदान दार तरी आतून बंद करून घेशील का?" त्याने मोठ्याने आवाज दिला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. चरफडत त्याने दार बाहेरून बंद करून घेतलं. शेजारीच घराबाहेर खुर्ची टाकून सारा बसली होती. ती त्याला म्हणाली, "एंजॉय द पार्टी! मी ठेवेन तिच्यावर लक्ष," त्यानं मान डोलावली आणि गाडी सुरू केली. काही वेळ स्टिअरींग व्हीलवर डोकं ठेवून तो इंजिनाचा आवाज ऐकत नुसताच बसून राहिला. इंजिनावर त्याचा पूर्ण ताबा होता. त्यानेच स्वतःहून गाडी चालवायला सुरू केल्याशिवाय त्या आवाजात कसलाही चढउतार होणार नव्हता ही जाणीव त्याला सुखद वाटली.
गाडी सुरू करून तो नरेनच्या घराच्या रस्त्याला लागला. सीडी प्लेअर चालू केला. ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए...’ ही सरितानंच आणलेली सीडी असणार. तिला जुन्या गाण्यांची आवड होती. ते अमेरिकेतल्या ओरेगॉन राज्यातल्या युजीन नावाच्या छोट्या शहरात राहायचे. लग्नानंतर पहिली काही वर्षं ते दोघं बरेचवेळा ड्राइव्हला जायचे, तेव्हाही तिच्या ओठांवर नेहमी गाणं असायचं. कार्तिक कधी सांगायचा नाही, पण त्याला ती गाताना ऐकायला आवडायचं. नंतर बेला झाली. ती थोडी मोठी झाल्यावर तिलाही लाँग ड्राइव्हला जाणं आवडायला लागलं, ती मागे कारसीट मध्ये आणि हे दोघे पुढं. मग सरिता गाणं म्हणायला लागली की मागून बेलाही बोबड्या स्वरात तिची नक्कल करायचा प्रयत्न करायची. हे दोघे हसत सुटायचे आणि मग बेलाही खिदळायला लागायची.

**

दिवस कसे भराभर चालले होते. पण मग ध्यानीमनी नसताना सरिता एकदम एका अपघातात गेली. ती एकटीच खरेदीला गेली होती, तेव्हा दाट धुक्यामुळे हायवेवर तिच्या गाडीला एका ट्रकनं जोरदार धडक दिली, आणि ती गेली दहा वर्षांच्या बेलाला एकट्या कार्तिकच्या जीवावर सोडून. दु:खाचा भर ओसरला आणि आयुष्य पुढं कसं चालू ठेवायचं हा प्रश्न उभा राहिला. भारतातल्या लोकांनी बेला लहान आहे, तर तू तिला घेऊन भारतात परत ये असं सुचवून पाहिलं. पण बेला तिकडं कशी अॅडजस्ट होईल हा प्रश्न होता, शिवाय अमेरिकेत अजून दोन तीन वर्षं राहिला असता तर त्याच्या सिटिझनशिपचंही काम झालं असतं. आणि खरं तर वयाच्या पंचेचाळीशीत त्याच्यामध्ये आता बेलाला घेऊन सगळं नव्यानं सुरुवात करायची ताकद नव्हती. युजीनमध्ये न्यू जर्सी किंवा सॅन फ्रॅन्सिस्को सारखी भरमसाट भारतीय कम्युनिटी नव्हती, तुलनेनं बरेच कमी लोक होते, पण जवळजवळ सगळे एकमेकांना ओळखणारे, सगळ्या गोष्टी एकत्र येऊन करणारे होते. त्या गावात देवेशभाई नावाचे गृहस्थ होते, वयाची साठी उलटून गेलेले. नोकरीबरोबरच मोटेल्स, गॅस स्टेशन्स चालवून भरपूर पैसा कमावलेले. पण ते नुसतेच पैसेवाले नव्हते, तर गावातल्या भारतीय लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम चालवणं, एकत्र येऊन कार्यक्रम करणं साजरे करणं अशा गोष्टींमध्येही जातीनं पुढाकार घ्यायचे. गावातल्या भारतीयांमध्ये त्यांना, त्यांच्या शब्दाला मान होता. तर त्या देवेशभाईंनी कार्तिकला मुद्दाम भेटून सांगितलं, "हे बघ, इथं आम्ही सगळे हाकेच्या अंतरावर आहोत. आपलं हे एक कुटुंबच आहे. तुला आम्हा सगळ्यांची मदत होईल. बाकीच्या मुलांबरोबर बेलाही मोठी होईल. तू इथेच राहा." कार्तिक देवेशभाईंना खूप मानायचा. आणि कार्तिकची नोकरी चांगली होती. तो एका मेडिकल इन्शुरन्स कंपनीच्या आयटी डिपार्टमेंटमध्ये सिनियर मॅनेजर होता. स्वयंपाक, घराची साफसफाई यासारख्या गोष्टींसाठी पैसे देऊन कुणाचीतरी मदत घेणं त्याला सहज शक्य होतं. त्यामुळे त्यानं तिथंच राहायचं ठरवलं. दुसऱ्या लग्नासाठी त्याला अधूनमधून लोक विचारायचे, पण त्याच्या मनात तो विचार कधीच आला नव्हता. बेलाला चांगल्या प्रकारे वाढवणं हेच त्याचं उद्दिष्ट होतं.

पण सध्या मात्र तो ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडतोय की नाही हे त्याला अजिबात समजेनासं झालं होतं. त्याचा या बाबतीतला आत्मविश्वास एकदम डळमळीत झाला होता. सरिता गेल्यानंतर त्याचं आणि बेलाचं रुटीन बसायला थोडा वेळ लागला होता. बेलाचं जेवणखाण, तिचे कपडे, तिच्या डॉक्टरांच्या अपॉईंटमेंट्स अशा सरिताच्या अखत्यारीतल्या बऱ्याच गोष्टी होत्या, की ज्या कार्तिकला कधी नीट माहीत करून घ्यायची गरजच पडली नव्हती. पण त्या सगळ्याच गोष्टी आता त्याला सांभाळाव्या लागत होत्या. पण खरं तर आता आई आपल्याबरोबर नसणार आहे या वास्तवाचा स्वीकार बेलानं बराच लवकर केला होता. कार्तिकलाच बरेचदा तिची, तिच्या भविष्याची सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे या जाणिवेनं खूप दडपण यायचं. त्यात पुन्हा ती मुलगी, अमेरिकेतल्या मुक्त वातावरणात वाढणारी, लवकरच टीन एज मध्ये जायला निघालेली! त्याच्या लवकरच लक्षात आलं होतं की तिला शाळेतल्या अभ्यासात फारशी गती नव्हती. एका जागी बसून अभ्यास करण्याची तिची क्षमताही साधारणच होती. तिच्या ग्रेड्सही तशा सुमारच असायच्या. आणि त्याचं तिला फारसं काही वाटायचंही नाही. कार्तिकचीच चिडचिड व्हायची. आत्ताच असं, तर पुढं इंजिनियरिंग किंवा मेडिकलला जायचं असेल तर कसं होणार? तो तिच्या खूप मागं लागायचा. गावातल्या बाकीच्या भारतीय लोकांची मुलं अकॅडमिक्समध्ये नेहमीच अव्वल असायची. शाळेतल्या अभ्यासाशिवाय कुणी मॅथ ऑलिम्पियाड करायचं तर कोणी स्पेलिंग बी करायचं. पण बेलाकडून शाळेचा अभ्यासच कसाबसा पूर्ण व्हायचा. अभ्यासाशिवाय तिला कशात रस आहे हे समजून घ्यायचाही कार्तिकनं प्रयत्न केला होता. गावात इंडियन, वेस्टर्न डान्सचे, गाण्याचे क्लासेस होते, पण त्यातही तिनं फारसा रस दाखवला नव्हता. देवेशभाई दर वीकेंडला शाळेत जाणाऱ्या भारतीय मुलांना एकत्र जमवून भारताची माहिती, जगाची माहिती, जनरल नॉलेज वगैरेंचे वर्ग घ्यायचे. पण त्यालाही बेला जायची नाही. तिचं बाकी भारतीय मुलांशी विशेष जमायचं नाही. ते तिला आपल्यामध्ये मिसळवून घेत नाहीत असं ती म्हणायची. हे ऐकलं की कार्तिक अजूनच वैतागायचा. अर्थात कार्तिक कितीही चिडत असला तरी बेला ‘बाबा, बाबा’ म्हणून त्याच्याच मागं असायची.

**

पण मागच्या एकदोन वर्षांत हे बदलत चाललं होतं. जसे बेलामध्ये वयानुरूप शारीरिक बदल व्हायला लागले, तसा हळूहळू तिचा स्वभाव, तिचं वागणंही बदलायला लागलं. ती पूर्वीसारखी कार्तिकशी मोकळेपणानं बोलेनाशी झाली. घरी असेल तेव्हा ती बराच वेळ तिच्या खोलीतच रहायला लागली. बाहेर आलीच तर हातात सेलफोन असायचा आणि कायम टेक्स्टिंग चालू असायचं. पूर्वी कार्तिक तिला होमवर्कमध्ये मदत करायचा, वीकेंडला दोघे मूव्ही बघायला, जेवायला किंवा जवळचं एखादं ठिकाण बघायला बाहेर जायचे. हे सगळं हळूहळू कमी व्हायला लागलं. उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे ते महिनाभर भारतात गेले, तिथं पण ती यावेळी फारशी रमली नाही. अर्थात हे बदल कार्तिकला अगदीच अनपेक्षित होते असं नाही, पण त्याला तिच्या दृष्टीनं ज्या गोष्टी महत्वाच्या वाटायच्या त्याबाबतीत तरी तिनं त्याचं ऐकावं ही त्याची अपेक्षा होती. पण तो हे तिला सांगायला जायचा तेव्हा एकतर त्यांच्यामध्ये भांडण व्हायचं किंवा ती नुसतंच त्याचं बोलणं ऐकून निघून जायची. त्यांच्यातला संवाद आता खूपच कमी झाला होता. त्याला वाटू लागलं होतं की तिला त्याच्याबद्दल प्रेम, आपुलकी वाटायचंच बंद झालंय. आणि ही जाणीव त्याला खूप बोचायची. ती मोकळेपणानं बोलायची ती फक्त तिच्या मैत्रिणींशी, त्या मैत्रिणी तरी कसल्या - एकीच्या आईवडिलांचा वडिलांच्या व्यसनापोटी डिवोर्स होऊन ती आईबरोबरच राहात होती, एक हिस्पॅनिक होती जिचे वडील ट्रक चालवायचे आणि आई वेट्रेस होती… गावात तिच्या वयाची, चांगल्या घरातली कितीतरी भारतीय वंशाची मुलं असताना तिनं या असल्या मैत्रिणी निवडल्या होत्या. नाही म्हणायला त्यांच्या शेजारच्या घरात काही महिन्यांपूर्वी सारा आणि जस्टिन हे जोडपं राहायला आलं होतं आणि त्यातल्या साराशी बेला अधूनमधून गप्पा मारायची. कार्तिकचीही त्या दोघांशी चांगली ओळख झाली होती. जस्टिनचा कसलातरी बिझनेस होता, सारा एका कम्युनिटी कॉलेजमध्ये पोलिटिकल सायन्स शिकवायची. त्यांचं लग्न झालं नव्हतं.

पण आज बेला स्वतःहून कार्तिककडं आली होती. तिला एका गोष्टीसाठी त्याची परवानगी हवी होती. ती आपणहून कशात तरी रस दाखवते आहे हे बघून त्याला आधी बरं वाटलं होतं, पण मग तिनं त्याला सांगितलं होतं की तिला तिच्या मैत्रिणींबरोबर चिअरलीडिंग समर कॅम्प जॉईन करायचा होता. रजिस्ट्रेशन फॉर्मवर तिला त्याची सही हवी होती आणि फीपण भरायची होती. तो खूप भडकला होता. त्याच्या मुलीनं चिअरलीडिंगसारख्या फालतू प्रकारात रस घ्यावा हे त्याला अजिबात मान्य नव्हतं. गेम चालू असताना उत्तान कपडे घालून बाजूला कसरती करायच्या नाहीतर नाचायचं. त्यानं म्हणे खेळणाऱ्या टीमला प्रोत्साहन मिळतं, बघणाऱ्या प्रेक्षकांची करमणूक होते. कसली करमणूक होते ते उघडच आहे. कितीही प्रतिष्ठा द्यायचा प्रयत्न केला तरी असल्या गोष्टीला काय दर्जा असणार आहे? तिनं उन्हाळ्यात बाकी काहीही करण्यात रस दाखवला असता तरी त्याला चाललं असतं- डान्स, एखादं वाद्य, पेन्टिंग, एखादी नवीन भाषा, एखादा खेळ... पण चिअरलीडिंग? शी! गावातल्या बाकीच्या भारतीय लोकांच्या मुलांची एखाद्या चांगल्या, प्रतिष्ठित व्यवसायाच्या, नोकरीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे तर माझ्या मुलीला काय करायचंय तर चिअरलीडिंग! आणि तो आत्ता ‘हो’ म्हणाला आणि न जाणो तिनं मोठं होऊन त्यातच करियर केलं तर? लोकांना काय वाटलं असतं? त्यानं मुलीच्या आयुष्याला अशी दिशा दिली म्हणून? छे! त्यानं तिला साफ नकार दिला होता. ती चेहरा पाडून निघून गेली होती.

थोड्या वेळानं त्याला तिच्या मैत्रिणीच्या त्या घटस्फोटित आईचा फोन आला होता की बेलाला कॅम्पला येऊ द्या म्हणून. बेलाची खूप इच्छा आहे आणि केटीला- म्हणजे तिच्या मुलीलासुद्धा बेला बरोबर यायला हवी आहे. तिनं कार्तिकला समजवायचा प्रयत्न केला होता की चिअरलीडिंग हा कसा खेळ मानला जातो आणि त्यात किती चढाओढ असते वगैरे. कार्तिकला अजूनच राग आला होता - त्या बाईनं चिअरलीडिंग बद्दल त्याचं मत बदलण्याचा प्रयत्न केला म्हणून नव्हे. पण कार्तिकने इतके प्रयत्न करून बेलानं आत्तापर्यंत गावातल्या एकाही भारतीय कुटुंबाशी विशेष जिव्हाळ्याचे संबंध ठेवले नव्हते. ओळखीचं कोणी घरी आलं तर तोंडदेखलं ‘हाय अंकल आंटी’ म्हणून ती बरेचदा सरळ रूममध्ये निघून जायची. आणि या केटीच्या आईशी तिची इतकी जवळीक की तिनं याला फोन करून सांगावं? त्यानं बेलाला बोलावून घेऊन कॅम्पसाठी पुन्हा ठामपणे ‘नाही’ म्हणून सांगितलं होतं. तेव्हा तीही चिडली होती आणि म्हणाली होती की मग त्यानं तिच्या आवडीनिवडी जाणून घ्यायचं ढोंग तरी बंद करावं. आणि मग त्यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं.

संध्याकाळी नरेनच्या नवीन घराची हाऊस वॉर्मिंग पार्टी होती. अर्थातच तिलाही बोलावलं होतं, बाकीची मुलंही तिथं असणार होती. पण तिनं साफ नकार दिला होता. कार्तिकनं साराला बेलावर लक्ष ठेवायची विनंती केली होती आणि तो एकटाच पार्टीला निघाला होता.

**

तो नरेनच्या घरापाशी पोचला. सगळे ओळखीचेच लोक आले होते. देवेशभाई होतेच. सगळ्यांनीच बेला का आली नाही म्हणून विचारलं. त्यानं तब्येतीचं कारण सांगून वेळ मारून नेली. नरेननं त्याला घराची टूर दिली. त्याच्या आधीच्या घरापेक्षा हे घर बरंच मोठं होतं. तीन मजले, गार्डन, स्विमिंग पूल, फिनिश्ड बेसमेंट, त्यात मुलांसाठी प्ले एरिया, मूव्ही थिएटर, पूल टेबल, कोपऱ्यात बार, वरच्या मजल्यावर स्वतंत्र देवघर… वाढत्या संपन्नतेच्या नेहमीच्या खुणा!

गप्पा मारत जेवणं झाली. मुलांपैकी कोणी प्ले-एरियामध्ये खेळत होती, कोणी एक्स-बॉक्स खेळत होती. सगळीच एकमेकांना ओळखणारी. त्यांच्यामध्ये बेलाच कुठं फिट व्हायची नाही. शनिवार असल्यामुळे लवकर घरी जायची कुणालाच घाई नव्हती. देवेशभाईंनी खास पार्टीसाठी म्हणून ब्लू लेबल आणली होती, त्यामुळे पुरुष मंडळी एकेक करत हळूहळू खाली बेसमेंटमधल्या बारच्या दिशेनं सरकायला लागली. बायकांच्या वरच गप्पा चालू होत्या. कार्तिक खाली बारच्या काउंटरवर ठेवलेले शो पीसेस न्याहाळत होता, तेव्हा देवेशभाई त्याच्याकडं आले.
"कार्तिक, आर यू ऑल राईट?" त्यांनी विचारलं.
"हो, एकदम असं का विचारताय?" कार्तिक म्हणाला.
"आल्यापासून थोडा हरवल्यासारखा वाटतोयस!"
त्यानं त्यांच्याकडं पाहिलं. त्यांचे हसरे पण आयुष्यात भरपूर बरेवाईट अनुभव घेतल्याच्या खुणा दाखवणारे डोळे त्याच्याकडे रोखून पाहात होते.
"हं, काही खास नाही हो, बेला मोठी होतेय ना, तिच्याबद्दल काळजी वाटते," तो म्हणाला.
"डू यू वॉंट टू टॉक अबाऊट इट?" एका रिकाम्या सोफ्याकडं हात करत ते म्हणाले. अजून सगळी पुरुष मंडळी खाली यायची होती. नरेनपण वरच होता. दोघे सोफ्यावर बसले.
"हं, असं आहे तर!" त्यानं सगळं सांगितल्यावर त्याच्या पाठीवर थोपटत देवेशभाई म्हणाले, "तुला काळजी वाटणं साहजिक आहे, कारण तिची सगळी जबाबदारी तुझ्यावरच आहे. तिचं आत्ताचं वयच तसं आहे, आणि त्यात हे असलं भोवतीचं वातावरण! पण आपण तिला नीट करू. तिला घरी घेऊन ये एकदा. मी तिच्याशी बोलेन, तिला समजावेन आणि तिला आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचा प्रयत्न करेन. आपल्या मुलांमध्ये मिसळायला एन्करेज करेन. आपण तिला तिचे ते बाकीचे फ्रेंड्स आणि त्यांच्या निरर्थक ऍक्टिव्हिटीज पासून आधी दूर केलं पाहिजे! अरे आपल्या कम्युनिटीचं इथं नाव आहे, रेप्युटेशन आहे, ते तसं मेंटेन झालंच पाहिजे. पण होईल सगळं ठीक, तू काळजी करू नको!"

त्यांनी असा धीर दिल्यावर त्याला थोडं बरं वाटलं. खरंच त्यांनी म्हटल्याप्रमाणं झालं असतं का, ते त्याला माहीत नव्हतं. पण निदान त्यांनी त्याला उडवून लावलं नव्हतं.
"आश्लेष मोठा होत असताना तुम्हीसुद्धा या सगळ्यातून गेला असाल ना?" त्यानं देवेशभाईंना विचारलं. आश्लेष हा त्यांचा एकुलता मुलगा. न्यूयॉर्कमध्ये आर्किटेक्ट होता.
"वेल, तुला जितकं जाणवतंय तेवढं तेव्हा आम्हाला जाणवलं नव्हतं कारण मी आणि सुमती दोघेही होतो ना- दॅट मेक्स अ डिफरन्स. पण आश्लेष वॉज अ गुड बॉय! शाळेतसुद्धा तो एकदम आदर्श विद्यार्थी होता."
"अहो, पण तुम्हीसुद्धा आदर्श बाप होतात ना! पण तुमचा हा गुड बॉय सध्या असतो कुठं? घरी कधी येतो की नाही आईबाबांना भेटायला? का आपल्या छोट्याशा गावाला विसरला? किती वर्षं झाली त्याला भेटून!" जयंत- पार्टीला आलेला अजून एक मित्र- सोफ्यावर येऊन बसला.
"अरे येतो ना, पण बिझी असतो कामात खूप! भराभर प्रमोशन्स होतायत त्याची!"
"अरे होणारच! मुलगा कुणाचा आहे? आता तिशी उलटली असेल ना? मग लग्न करायचा विचार आहे की नाही? की न्यूयॉर्कमध्ये बॅचलर लाईफ एंजॉय करतोय?" कार्तिककडं बघून डोळा मारत जयंतनं विचारलं.
"आहे तर! पण कधी करायचं या बाबतीत आम्ही विचारणं सोडून दिलंय बाबा! आणि मी म्हणतो करत असेल मजा तर करू दे ना! एकदा लग्न झालं की किती मजा शिल्लक राहाते हे काय मी तुला सांगायची गरज नाही!" हसत हसत देवेशभाई म्हणाले.
"ते खरं आहे! पण बघा हं, एखाद्या दिवशी एखादी अमेरिकन मुलगी समोर आणून उभी करायचा!"

इतक्यात नरेन खाली आला आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेत म्हणाला," फ्रेंड्स, टाइम फॉर अ टोस्ट!" आणि ते तिघे तिकडे गेले.

**

नरेनच्या नवीन घरासाठी टोस्ट करून झाल्यावर सगळ्यांनी पोकर खेळायला सुरुवात केली. बरेच दिवसांनी सगळे जमले होते, त्यामुळे मजा येत होती. थोड्या वेळानं सुमतीवहिनी- देवेशभाईंची बायको-खाली येऊन त्यांना सांगून गेल्या की त्या घरी चालल्या आहेत. पार्टीला आलेल्या एक बाई त्यांना घरी सोडणार होत्या. "तुम्ही विसरून जाल, पण माझा फोन दुपारपासून कुठंतरी हरवलाय. त्यामुळं मला कॉल करणार असाल तर लँडलाईन वर करा. आपल्या लँडलाईनचा नवीन नंबर आहे ना लक्षात?" जाताना त्या सांगून गेल्या.

त्या जाताच देवेशभाई म्हणाले, "बघा, स्वतःचा फोन सापडत नाही आणि वर मलाच म्हणते नवीन नंबर आहे ना लक्षात?"
"घर घर की कहानी," जयंत म्हणाला. सगळे हसले. देवेशभाईंचा सेलफोन वाजला, पण त्यांनी कॉल कट करून टाकला. कार्तिकनं पाहिलं की त्यांच्या कपाळावर एक क्षणभर आठ्या पडल्या होत्या.

नरेन त्याच्या आयफोनवर काहीतरी बघत होता. तो एकदम ओरडला, "गाईज, हे ऐका. ओरलँडोमध्ये पल्स नावाच्या गे नाईटक्लब मध्ये एकजण गन घेऊन शिरलाय आणि त्यानं बऱ्याच लोकांना गोळ्या घालून मारलंय. आता पोलीस वगैरे आलेत पण त्यानं आतल्या लोकांना होस्टेज धरलंय!"
"कोण शिरलाय त्याचं नाव लिहिलंय का रे?"
"हो, हे काय- ओमार मतीन."
"वाटलंच!" जयंत रागानं मान हलवत म्हणाला," या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे कळत नाही! कितीही शिकले, कुठंही राहिले तरी मूळ प्रवृत्ती बदलत नाही! हा पण आयसिसचाच अटॅक असणार!"
"नाही रे. एकटाच आहे, कदाचित सेल्फ रॅडिकलाईझपण झाला असेल. पण आता गे लोकांनी काय घोडं मारलंय याचं?"
"अरे यांचा धर्म तर असल्या गोष्टी म्हणजे गुन्हा आहे असंच मानतो ना! म्हणून याचं डोकं फिरलं असणार! नाहीतर मुळातच माथेफिरू असेल. उगीचच सेल्फ रॅडिकलाईझ वगैरे मोठे मोठे शब्द वापरायचे!"
"पण काही म्हणा, अमेरिकेत या गे, लेस्बियन आणि ट्रान्सजेंडर वगैरे लोकांचं जरा जास्तच कौतुक होतं! गे लोकांची लग्नं आता कायदेशीर काय झाली, ट्रान्सजेंडर लोकांनी स्त्रियांचं का पुरुषांचं बाथरूम वापरायचं हे ठरवायचं स्वातंत्र्य त्यांना मिळावं म्हणून लोक भांडतात काय… कुठल्याही अॅबनॉर्मल गोष्टीचा उदो उदो कसा करावा हे कुणी यांच्याकडून शिकावं!"
"अरे सोडा ना हे डिप्रेसिंग विषय! शनिवारची रात्र आहे. नरेन, एखादा फुटबॉलचा गेम वगैरे आहे का बघ ना कुठंतरी!" जयंत म्हणाला.
"तुला खरंच फुटबॉल बघायचाय का सेक्सी चिअरलीडर्स बघायच्यात ते सांग ना आधी!" त्याच्या खांद्यावर दणका देत नरेन म्हणाला. कार्तिकला ते ऐकून कसंसंच झालं. बेलाला आपण चिअरलीडर कॅम्पला जाण्याची परवानगी नाकारली ते किती बरं केलं असं त्याला वाटलं.
"अजून खेळायचंय का थांबायचं आता?" देवेशभाई जांभई देत म्हणाले.
"का देवेशभाई? तुम्ही हरताय म्हणून? "
"नाही रे बाबा. बारा वाजायला आले. वर तुमच्या बायकांचं काय चाललंय ते पण बघावं लागेल तुम्हाला. पुन्हा उद्या आहेच आठवड्याची तयारी!"
"बरं अजून एक डाव खेळू आणि थांबू. ज्याला हवं त्यानं ड्रिंक रिफील करून घ्या," असं म्हणून नरेन पत्ते वाटू लागला. देवेशभाईंचा फोन पुन्हा वाजला. त्यांनी तो पुन्हा कट केला.
"काय देवेशभाई? इतक्या रात्री कोण फोन करतंय? वहिनी फारच मिस करतायत वाटतं तुम्हाला?"
"नाही रे. माझा भाऊ कॉल करतोय भारतातून. मुलाचं ग्रीनकार्ड करायचंय त्याला. सारखा मागं लागलेला असतो. उद्या सकाळी कॉल करेन त्याला. हं , चला बेट लावा आता," समोरचे पत्ते उचलत ते म्हणाले.

शेवटची राउंड संपला. सगळे उठले. बेसमेंटमध्येच नरेननं एक छोटं बाथरूमही केलं होतं. देवेशभाई तिकडं गेले होते. त्यांचा फोन बाहेर राहिला होता. तो पुन्हा वाजायला लागला. कार्तिक फोनपाशी होता.
"हा तर आश्लेषचा फोन आहे," कॉलर आयडीवर झळकलेलं नाव बघून त्यानं सांगितलं.
"अरे मग उचल ना! आपलाच मुलगा आहे," असं म्हणून जयंतनंच पुढं येऊन कॉल घेतला आणि हसत हसत बोलू लागला, " हॅलो यंग मॅन, अरे किती वर्षांनी बोलतोयस ! ओळखलंस का मला? मी जयंत. तुझा बाप बुढ्ढा झालाय आता, दोन ड्रिंक्स घेतले आणि बाथरूममध्ये जाऊन बसलाय…"
अचानक जयंत बोलायचं थांबला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मावळत गेलं , त्याच्या हातातून फोन खाली पडला आणि तो मटकन खुर्चीवर बसला.

**

कार्तिक देवेशभाईंची गाडी चालवत होता. पार्टीत असताना त्यांना कळलं नव्हतं, पण बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. गावाबाहेरून जाणारा रस्ता. रस्त्यावर शुकशुकाट. गाडीच्या दिव्यांचा प्रकाश सोडला तर बाकी पूर्ण अंधार. शेजारी देवेशभाई सुन्न होऊन बसले होते. फक्त गाडीवर आदळणाऱ्या पावसाचा आणि गाडीच्या वायपर्सचा आवाज येत होता. कार्तिक लक्ष समोर ठेवायचा प्रयत्न करत होता, पण त्याचं डोकं भिरभिरत होतं.

जयंतनं घेतलेला कॉल आश्लेषच्या सेलफोनवरून आला होता, पण तो आश्लेषचा नव्हता. बोलणाऱ्या माणसानं त्याचं नाव मॅक्स असं सांगितलं होतं. तो ओरलँडोमधल्या त्या नाईटक्लबमधून बोलत होता. तिथं आज रात्री झालेल्या शूटिंगमध्ये आश्लेष मारला गेला होता. मॅक्स आणि आश्लेष तिथं रात्री एकत्रच गेले होते.. आश्लेष त्या शूटरच्या- ओमार मतीनच्या- गोळीला बळी पडला होता. एकूण पन्नासच्या आसपास लोक मारले गेले होते. मॅक्स मात्र वाचला होता. रात्री उशिरा पोलिसांची एक स्पेशल तुकडी आत शिरली होती. त्यांनी ओमारला मारलं होतं.

कार्तिकला कळत नव्हतं. आश्लेष न्यूयॉर्कमध्ये राहायचा. तो त्या रात्री ओरलँडोच्या गे नाईटक्लब मध्ये काय करत होता? मॅक्सनं त्याची ओळख आश्लेषचा पार्टनर अशी करून दिली होती...म्हणजे मग आश्लेष गे होता? आणि हे देवेशभाईंना माहिती होतं का? पार्टीत आश्लेषच्या लग्नाबद्दल झालेली चर्चा त्याला आठवत होती. मॅक्स जयंतला म्हणाला होता की ओमारनं पल्स मधल्या बाथरूममध्ये जेव्हा लोकांना होस्टेज धरलं होतं तेव्हा आश्लेष सारखा त्याच्या आईबाबांना कॉल करत होता. म्हणजे देवेशभाईंना पार्टीत आलेले कॉल्स आश्लेषचे होते? मग त्यांनी ते घेतले का नव्हते? आणि ते भारतातून आलेले कॉल्स आहेत असं ते का म्हणाले होते? जयंतनं देवेशभाईंना मॅक्सच्या कॉलबद्दल सांगितल्यानंतर ते शॉकमध्येच गेले होते. काही बोलतच नव्हते. म्हणूनच सर्वानुमते कार्तिक त्यांच्याच गाडीतून त्यांना घरी सोडायला निघाला होता. त्यानं साराला फोन करून सगळी कल्पना दिली होती आणि यायला उशीर होईल म्हणून सांगितलं होतं. नरेन, जयंत वगैरे लोक पाठोपाठ देवेशभाईंच्या घरी पोचणार होते.

गाडी देवेशभाईंच्या आलिशान घराच्या ड्राइव्ह वे मध्ये लावून तो खाली उतरला. घराबाहेर पूर्ण अंधार होता. आतले दिवेही बंदच होते. वहिनींना ही बातमी कळली होती का नाही हे त्यांना माहीत नव्हतं. देवेशभाईंच्या बाजूचं गाडीचं दार त्यानं उघडलं. ते तसेच शून्यात बघत बसून राहिले होते. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून तो हलकेच म्हणाला," आत जायचं का?" ते हळूहळू खाली उतरले. त्यांना आधार देत चालवत तो घराच्या दारापाशी घेऊन गेला. दार बंद होतं, पण आतून लॉक केलेलं नव्हतं. त्यानं दार उघडलं, देवेशभाईंना आत आणलं आणि भिंतीवर हातानं चाचपडत तो दिव्याचं बटण शोधू लागला.

"अभिनंदन तुमचं," अचानक वहिनींचा आवाज आला आणि खोलीतला दिवा लागला. वहिनी लिव्हिंग रूममधल्या आरामखुर्चीत बसल्या होत्या आणि त्यांनी शेजारच्या साईड टेबलवरचा लॅम्प लावला होता. आपले लाल झालेले डोळे त्यांनी देवेशभाईंवर रोखले होते. त्या अपुऱ्या प्रकाशात त्यांना तसं बसलेलं पाहून कार्तिक दचकलाच. एकदम थंड आणि कोरड्या सुरात त्या बोलत होत्या, "देवेशजी, तुमचं अभिनंदन! तुम्हाला कळली असेलच ना बातमी? आपला आश्लेष गेला. तुम्ही काही वर्षांपूर्वी एक काम तुमच्यापुरतं पूर्ण केलं होतं, ते आज एका माथेफिरू माणसानं सगळ्या जगासाठी पूर्ण करून टाकलं. त्यानं आपल्या मुलाला मारून टाकलं. तुम्हीही काही वर्षांपूर्वी त्याला आपल्या आयुष्यातून बाजूला काढून फेकलं होतं ना? दोघांचं कारण एकच - आपला मुलगा गे होता. त्याला स्त्रियांबद्दल नाही, तर पुरुषांबद्दल आकर्षण वाटायचं. तो ‘नॉर्मल’ नव्हता…"

कार्तिकनं देवेशभाईंकडं पाहिलं. तेसुद्धा त्यांच्या सुन्न अवस्थेतून बाहेर आले होते आणि वहिनींच्या या रूपाकडे आश्चर्याने पहात होते. वहिनी मात्र त्याच थंडपणानं बोलत होत्या, "तुम्ही त्याला दूर केलंत, तरीही कुठंतरी तुम्हाला अस्वस्थता वाटायची की तो कुठंतरी आहे, कधीतरी भेटतो, दुरावा मिटवायचा प्रयत्न करतो. ती जाणीवही तुम्हाला नकोशी व्हायची. पण आता त्याचं तोंड तुम्हाला कधी बघावं लागणार नाही, त्याचा आवाज तुम्हाला कधी ऐकावा लागणार नाही. आता तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकाल, नाही का?"

"अजून आठवतं मला, कॉलेजच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये असताना त्यानं आपल्याला सांगितलं होतं तो गे आहे म्हणून. त्याला ‘कमिंग आउट ‘म्हणतात हे नंतर कळलं. धक्का तर मलाही बसला होता. आपलाच एकुलता एक मुलगा असा का निघावा? पण मग त्याच्या सुखासाठी मन ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार झालं. नंतर या विषयावर माहिती मिळवत गेले तसं कळलं की हा काही ‘दोष’ नाही किंवा याच्यावर वैद्यकीय उपचार करायचीही गरज नाही. पण तुम्ही? तुम्ही हे कधीच स्वीकारू शकला नाहीत. तुम्ही खरं तर माझ्यापेक्षा जास्त शिकलेले, बाहेरच्या जगात वावरलेले. पण तुम्हाला नेहमीच हा एक आजार, मानसिक विकृती किंवा पाश्चात्य जगातल्या अति मोकळेपणाचा परिणाम वाटत आला. तुम्ही त्याला हेच पटवायचा प्रयत्न करत राहिलात. आणि जेव्हा त्यानं तुम्हाला ठामपणे सांगितलं की तो खरंच गे आहे, तेव्हा खरं तर तुम्ही त्याला समजून घ्यायची, स्वीकारायची गरज होती, पण तुम्ही त्याच्याशी सगळे संबंधच तोडून टाकलेत आणि मलाही तेच करायला भाग पाडलंत!."

"सुमती, तुला माहित आहे मला हे…" देवेशभाईंनी बोलण्याचा एक क्षीण प्रयत्न केला. पण वहिनी बोलतच राहिल्या.

"हो, मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या घरात ‘असलं काहीतरी’ अॅबनॉर्मल नको होतं. तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींमध्ये असलेल्या तुमच्या आदर्श प्रतिमेला, त्यांना तुमच्याबद्दल असलेल्या आदराला धक्का लागू द्यायचा नव्हता. तुम्ही त्याला दूर केलंत, त्याचं गे असणं सगळ्यांपासून लपवून ठेवलंत. पण त्याच वेळी त्याच्या करियरचे, त्याच्या शाळाकॉलेजमधल्या हुशारीचे गोडवे सगळ्यांसमोर गाऊन त्याचं आणि एक आदर्श बाप म्हणून स्वत:चं कौतुक ऐकताना मात्र तुम्हाला तुमचा दुटप्पीपणा जाणवला नाही! आणि मीही वेड्यासारखी वाट बघत गेले की कधीतरी तुम्ही बदलाल, कधीतरी त्याला पुन्हा आपलंसं कराल, पण ते कधी झालंच नाही. आणि आता खूप उशीर झाला."

वहिनींनी ओंजळीत चेहरा लपवला आणि त्या तशाच खुर्चीत बसून राहिल्या. देवेशभाई अनिश्चित पावलं टाकत हळूहळू त्यांच्याकडं गेले, खाली खुर्चीसमोर बसले आणि थरथरत्या आवाजात पुटपुटले, "सुमती, माझं चुकलं गं! माझं खरंच चुकलं! मला माहीत नव्हतं असं काहीतरी होऊन बसेल म्हणून!"

वहिनींनी आपला चेहरा उचलला आणि समोर बसलेल्या देवेशभाईंकडं एकटक बघत त्या म्हणाल्या, "तुम्हाला माहीत आहे? आज रात्री त्या क्लबमधून आश्लेष सारखे आपल्याला कॉल करत होता. त्याला आपल्याशी बोलायचं होतं, पण माझा फोन तेव्हा माझ्याजवळ नव्हता आणि तुम्ही तर त्याचे कॉल्स घेतलेच नाहीत. माझं बाळ माझ्याशी शेवटचे दोन शब्द बोलूही शकलं नाही! पण मॅक्स-त्याचा...त्याचा पार्टनर- या हल्ल्यातून वाचला. त्याला माहीत होतं की आश्लेषनं आपल्याशी संपर्क साधायचा प्रयत्न नक्की केला असणार. त्यानंच नंतर आश्लेषचा सेलफोन घेऊन मला फोन केला. बिचारं पोर- ना आपल्या देशाचं, ना भाषेचं, ना धर्माचं - पण माझ्याशी बोलताना स्वतःच्या आईशी बोलताना काय रडेल तसं हमसून हमसून रडत होतं हो! तो आणि आश्लेष गेली दोन वर्षं न्यूयॉर्क मध्ये एकत्र राहात होते. त्याचीच ओरलँडोमध्ये कॉन्फरन्स होती आणि त्याच्याबरोबर आश्लेषही सुटी घेऊन आला होता. मॅक्सच्याच आग्रहावरून दोघे या क्लबमध्ये आले होते. त्याला बिचाऱ्याला त्याबद्दल इतकं अपराधी वाटत होतं! त्यानं मला काय सांगितलं माहीत आहे? ते दोघे काही महिन्यांत लग्न करणार होते. मॅक्सच्या आईवडिलांना हे माहीत होतं. त्यांनी सगळं स्वीकारलं होतं. ते पुढच्या महिन्यात आपल्याला भेटायला यायचा प्लॅन करत होते. पण आता सगळंच संपलं…"

आत्तापर्यंत थंडपणानं बोलणाऱ्या सुमतीवहिनींना मोठा हुंदका आला. त्या बोलायचं थांबल्या आणि त्यांच्या हुंदक्यांचा आवाज त्या खोलीत भरून राहिला. देवेशभाईंनी वहिनींच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तेही स्फुंदून स्फुंदून रडायला लागले. या जोडप्याच्या पुत्रवियोगाच्या पहिल्या शोकाचा साक्षीदार असलेला कार्तिक मूकपणे त्यांच्याकडं बघत तसाच उभा राहिला.

**

गाडी पार्क करून कार्तिक आत आला. लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावरच सारा झोपली होती. शेजारी पुस्तक होतं. त्याची चाहूल लागताच ती उठली. जांभई देत तिनं चष्मा घातला आणि सेलफोन उचलून वेळ बघितली. पाच वाजले होते.
"सॉरी सारा, मला खूपच उशीर झाला," कार्तिक अपराधीपणे म्हणाला.
"सॉरी कशाला म्हणतोस? आपलं फोनवर बोलणं झालं तेव्हा मला लक्षात आलं होतं की तू लवकर येणार नाहीस ते. जस्टिनलाही मी कळवून टाकलं. तू त्यांना एअरपोर्टवर सोडलंस का?"
"हो. सहाची फ्लाईट आहे. डायरेक्ट ओरलँडो. बेला झोपली आहे ना?"
"हो, तिच्या बेडरूममध्ये. कसे आहेत ते दोघे?"
"शॉकमध्ये आहेत. देवेशभाई जास्तच हादरलेत. अशा अनपेक्षित प्रकारे आश्लेष गेल्याचा धक्का, दु:ख आणि वर पुन्हा गिल्ट."
तिनं उसासा सोडला, "किती शॉकिंग ना! हाऊ आर यू फिलिंग?"
त्यानं मान हलवली आणि तो म्हणाला," अजूनही जे घडलं त्याच्यावर विश्वासच बसत नाही आहे. पार्टीत आम्हाला आधी जेव्हा शूटिंग झालंय हे कळालं तेव्हा कॅज्युअली आम्ही एखादा मिनिट बोललो आणि पुन्हा पोकर खेळायला लागलो. पण त्यात आश्लेष गेल्याचं कळलं तेव्हा मात्र सगळेच जाम हादरलो! मी आत्ता येता येता विचार करत होतो - सध्या अशा इतक्या घटना घडतात पण जोपर्यंत आपल्याला त्याची झळ पोचत नाही तोपर्यंत आपण नुसतं क्षणभर चुकचुकतो आणि विसरून जातो. असं का होतं? असं होणं योग्य आहे का?"
सारा म्हणाली," खरं आहे तुझं! एक समाज म्हणून कुठंतरी आपण कोडगे बनत चाललोय अशी मला भीती वाटते. आपल्यासारखे सामान्य लोक तू म्हणालास तसं तेवढ्यापुरतं हळहळून विसरून जातात. दु:ख व्यक्त करणं ही ज्यांची जबाबदारी असते ते लोक ठराविक प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. आणि संधीसाधू लोक स्वतः:च्या फायद्यासाठी अशा गोष्टींचं भांडवल करून घेतात. आता पुढचे काही दिवस बघ, दोन्ही राजकीय पक्ष आपापल्या पोळ्या भाजून घ्यायचा प्रयत्न करतील. त्या माणसाला रॅडिकल इस्लामिस्ट म्हणायचं का जिहादिस्ट यावरून लोक भांडतील. कडक गन कंट्रोलचे कायदे असते तर हा हल्ला टळला असता का हा मुद्दा उपस्थित होईल. मुस्लिम लोकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली पाहिजे का यावर काथ्याकूट होईल. या हल्लेखोराची बायको, आईवडील त्यांच्या इच्छेविरुद्ध प्रकाशझोतात येतील…"
"पण सारा, हे सगळं तर झालंच पाहिजे ना? त्याशिवाय या हल्ल्याच्या मुळाशी कसं जाता येईल?"
"हो रे, पण यात मुद्द्याच्या, महत्वाच्या गोष्टी फार कमी होतात आणि पॉलिटिकल सर्कस जास्त होते ते नको वाटतं. पण बरोबर आहे तुझं. चर्चा, मतभेद हे मोकळेपणानं व्यक्त झालेच पाहिजेत. त्यामुळे असले प्रकार व्हायचं प्रमाण निदान कमी तरी होईल. आणि शेवटी कुठलाही बदल हा छोट्या छोट्या पावलांनीच घडतो. एखाद्या गोष्टीकडं बघायचे वेगवेगळे दृष्टिकोन किंवा ती गोष्ट करायच्या वेगवेगळ्या पद्धती समाजात एकाच वेळी अस्तित्वात असल्या पाहिजेत. पॉलिटिकल सायन्समध्ये प्लुरॅलिझम म्हणतो आम्ही याला. पण या दहशतवादी, अतिरेकी लोकांना हे मान्यच नसतं…"

कार्तिकनं पुन्हा मान डोलावली. सारा त्याच्याकडं रोखून पाहात म्हणाली, " पण खरं सांग कार्तिक, दहशतवाद किंवा गुन्हेगारी म्हणलं की साधारण एकाच प्रकारचे लोक आपल्या डोळ्यासमोर येतात. पण ही प्रवृत्ती एकाच धर्मापुरती, एकाच सामाजिक गटापुरती मर्यादित आहे असं तुला वाटतं? त्या ओमारनं निरपराध लोकांना मारून अतिशय वाईट काम केलं, पण देवेशभाईंनी आश्लेषबद्दल काय वेगळं केलं? तूच म्हणालास ना की त्यांना त्याचं गे असणं मान्य नव्हतं म्हणून त्यांनी त्याला दूर केलं होतं? तो तर त्यांचा मुलगा होता! ते का त्याला स्वीकारू शकले नाहीत?"
कार्तिक काहीच बोलला नाही.
सारा उठली," चल, मी निघते. तू थकला असशील. आता विश्रांती घे."
"सारा, बेलाकडं लक्ष दिल्याबद्दल खरंच थँक्स. जस्टिनलाही सांग. बेलाला कळलं का हे सगळं?"
"नो प्रॉब्लेम कार्तिक! हो, आम्ही शूटिंगचं कव्हरेज टीव्ही वर बघितलं. तुझा फोन आला तेव्हा ती जागीच होती. मग मी तिला सगळं सांगितलं आश्लेषबद्दल. तिला तो चांगला आठवतो. यू नो व्हॉट शी सेड? म्हणाली पेरेंटस मुलांना एका ठराविक साच्यातच बघायचा का प्रयत्न करतात? आणि जर मुलं त्या साच्याबाहेरचं काहीतरी करत असतील तर त्यांना असं का वाटतं की मुलांचं त्यांच्यावर प्रेम नाही आहे?"
कार्तिक म्हणाला," खरंच असं म्हणाली ती?"
सारा क्षणभर कार्तिककडं बघत राहिली. मग त्याच्याजवळ येऊन तिनं हलकेच त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाली, "यू टेक केअर ऑफ हर अँड टेक केअर ऑफ युवरसेल्फ."

कार्तिकनं मान हलवली. ती निघून गेली. कार्तिक काही वेळ तसाच बसून राहिला. मग तो उठला आणि बेलाच्या खोलीपाशी गेला. दार लोटलेलं होतं, पण आतला लाईट चालू होता. त्यानं हलकेच दार उघडलं आणि तो आत गेला. कितीतरी दिवसांनी तो तिच्या खोलीत येत होता. बेला शांतपणे झोपली होती. त्यानं आजूबाजूला नजर फिरवली. तिनं खोली छान ठेवली होती. टिपिकल टीनएजर मुलीची खोली... तो स्वतःशीच हसला. बेडवर बेलाच्या शेजारी तिच्या लहानपणीचा त्या तिघांचा फोटो पडला होता. बहुतेक झोपताना ती तो जवळ घेऊन झोपली असावी. ती दोन वर्षांची असावी फोटोमध्ये. गब्दुल चेहरा, भुरे केस. ती त्याच्याच कडेवर होती. तिघेही मनमोकळं हसत होते. फोटोतल्या तिच्याकडं आणि बेडवर झोपलेल्या तिच्याकडं तो पाहात राहिला. किती पटकन मोठी झाली ही, त्याला वाटलं. तो तिच्या डेस्कपाशी आला. डेस्कवर मधल्या पानात पेन्सिल घालून एक वही ठेवली होती. त्याला कुतूहल वाटलं. ती वही उघडून तो चाळायला लागला... त्या वहीत चक्क बेलानं लिहिलेल्या कविता होत्या! ती कविता करायची हे त्याला माहीतही नव्हतं. तिनं वेगवेगळे विषय हाताळलेले दिसत होते. पण त्याला तिच्या नकळत तिच्या कविता वाचायच्या नव्हत्या, त्यामुळं त्यानं ती वही होती तशीच ठेवून दिली. सकाळी त्यानं तिला त्या कविता वाचून दाखवायला सांगितल्या असत्या.

डेस्कवर पसरलेल्या कागदांमध्ये थोडं शोधल्यावर त्याला हवं ते मिळालं. तिच्या चिअरलीडिंग कॅम्पचा फॉर्म आणि माहिती देणारं ब्रोशर. त्यानं ते बरोबर घेतलं. तो ते ब्रोशर पूर्ण वाचणार होता. चिअरलीडिंगबद्दलही थोडी अधिक माहिती गोळा करणार होता. आणि मग तो बेलाला विचारणार होता, तिला कॅम्पला नक्की का जायचं आहे. तिच्याशी तो याबद्दल मोकळेपणाने संवाद साधणार होता, आणि मग ते दोघे मिळून निर्णय घेणार होते.
बेडजवळ येऊन त्याने तिच्या अंगावरचं पांघरूण नीट केलं, तिच्या केसांतून हळूच हात फिरवला, आणि लाईट बंद करून तो खोलीबाहेर आला.

**

(१२ जून २०१६ च्या मध्यरात्री ओरलँडोमधल्या ‘पल्स’ नावाच्या गे नाईटक्लबवर ओमार मतीन या माणसाने हल्ला केला. त्यानं केलेल्या गोळीबारात ४९ लोक ठार आणि ५३ लोक जखमी झाले. तो स्वतःही पोलिसांकडून मारला गेला. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतरचा हा सर्वात मोठा हल्ला होता. प्रस्तुत कथेतला या घटनेचा उल्लेख वगळता बाकी सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत.)

**

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अत्यंत भावुक करणारी कथा आहे विशेषतः "पालकत्व" या विषयावरची. पावलोपावली मला वाटत होते की माझेच बरेचसे विचार तुम्ही मांडत आहात.

पेरेंटस मुलांना एका ठराविक साच्यातच बघायचा का प्रयत्न करतात? आणि जर मुलं त्या साच्याबाहेरचं काहीतरी करत असतील तर त्यांना असं का वाटतं की मुलांचं त्यांच्यावर प्रेम नाही आहे?"

हे सत्य आहे आपल्या आई-वडीलांनी कटु बोलून तेच केले आणि आपणही तेच करत आहोत. खरं तर मुलं बरोब्बर उलटी निघतत. म्हणजे आई भोळी असेल तर मुलगी आपोआप बनेल्पणे सर्व्हायवल शिकते याउलट आई ढालगज असेल तर मुलगी बर्‍यापैकी गरीब होते. म्हणजे मला असे वाटते.
.
यापूर्वी असे ऐकलेले की एक पीढी नास्तिक-दुसरी आस्तिक-तीसरी नास्तिक असे निघत. या मागे विदा काही नाही असलेच तर नीरीक्षण असावे. पण मूळ वृत्ती हीच की तारुण्यातील बंडखोरी. आपली आयडेंटिटी (स्व) ठासून, आपल्या पायांवर ऊभे रहाण्याचा मुलांचा प्रयत्न. आणि हा अनमिस्टेकेबली प्रत्येक तरुण रक्त करते. किंबहुना ही बंडखोरी नसेल तर त्याला तारुण्यच म्हणू नये की काय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! अगदी बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय ते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या या "बंडाचा" पहील्यांदाच "रिसीव्हिंग एन्ड" ला जवळून अनुभव घेते आहे. मुलीला स्मार्ट फोन मुद्दाम दिला नव्हता. कारण डिस्ट्रॅक्शन (व्यत्यय, लक्ष चाळविणे) प्रकार नकोत म्हणुन. आत्ता मध्यंतरी तिचे खाते उघडून दिले, तिच्याकडे "स्वतःचे" कार्ड आलेले आहे. हीने ऑनलाइन स्मार्ट फोन विकत घेतला. कोणालाही (निदान मला व नवर्‍याला) सांगीतले नाही. नंतर जेव्हा मला कळले तेव्हा, मी नवर्‍यास सांगू नये म्हणुन खूप रडारड केलेली आहे. अर्थात I did what I had to do. मी हे नवर्‍याला तर सांगीतलेच आहे पण शिक्षा म्हणुन खाते स्थगितही करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहोत. केवढा ती रडारड आणि ड्रामा (या वयातील मुली ड्रामाक्वीन असतात असे फक्त ऐकून होते)
.
"ये तो शुरुआत है, आगे आगे देखिये होता है क्या" तर व्ह्यायला नकोय पण तिला करकचून बांधायचेही नाहीये कारण त्याचा सर्वांना दुप्पट त्रास होइल.
.
पूर्वी तिमा म्हणालेले की आपल्याला वाटतं फक्त दुसर्‍यांकडे असे होऊ शकते पण जेव्हा स्वतःवर वेळ येत ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0