अण्णा

ललित

अण्णा

लेखक - अभिजीत अष्टेकर

२०११मध्ये अण्णा जेव्हा गेले त्यावेळी मी, मावशी आणि मामी त्यांच्या शेजारीच बसून होतो. शुद्ध हरपून भ्रमित अवस्थेत ते काहीतरी पुटपुटत होते. काय बोलत होते ऐकू येत नव्हतं. ते गेल्यानंतर काही दिवसांतच सगळं व्यवस्थित सुरू झालं. पण नंतर मात्र ते सतत माझ्या स्वप्नांत दिसायचे. अजूनही येतात. मग दुसऱ्या दिवशीची अखंड सकाळ त्यांच्या आठवणीत जाते. एखाद्या माणसाला चांगला किंवा वाईट हे दोनच निकष लावून मोकळं होणं मला कधीच पटत नाही. असं कधी ठरवता येतंच नाही. जरी ठरवायचं म्हटलं तरी त्यासाठी एखाद्यासोबत दुसरा मनुष्य कसा वागतो, हा निकष तर असूच शकत नाही. कारण त्याचं वागणं हे व्यक्तींनुसार बदलत असतं. अण्णाही त्याला अपवाद नव्हते. आजीने इडल्या, द्वाशी (आंबोळी) केल्यावर ती घेऊन उभ्या पायाने आमच्या घरी आणून देणारे आणि "लवकर खावा रे" म्हणणारे अण्णा आजीवर मात्र सदान्‌कदा खेकसायचे. चिडचिड, आरडाओरडा करायचे.

पण दोघांच्या जिवंतपणी आम्हाला आजी जास्त जवळची वाटूनही अजून अण्णांच्या आठवणी जास्त का येतात, हे मला अजूनही समजलेलं नाही. ते असते तर आज मुंबईला माझ्या घरी आवर्जून आले असते. तसेच हात मागे बांधून आजूबाजूच्या परिसरात फिरले असते, असं आईला नेहमी वाटतं.

त्यांची मूर्ती अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. भेदक डोळे, बारीक पण काटक शरीरयष्टी, रापलेला चेहरा, तोंडाचं बोळकं, पिकलेले केस, त्यांची ती हात मागे बांधून चालण्याची लकब, कन्नडमिश्रित मराठी बोलणं, त्यांचा तो जवळजवळ प्रत्येकवेळी अंगावर असलेला हाफ स्वेटर. त्यांचे डोळे सतत चिडल्यासारखे वाटायचे पण आमच्यावर ते फारसं चिडल्याचं आठवत नाही.

कर्नाटकातलं मुनवळ्ळी (सौंदत्ती) त्यांचं गाव. त्यांच्या बालपणीच्या आठवणी कुणालाच माहीत नाहीत. मुला-मुलींना, बायकोला कुणालाच त्यांनी कधीच काही सांगितलं नाही. माझी आजी तिच्या बालपणीच्या, तरुणपणीच्या अनेक आठवणी माझ्या आईला सांगायची. हसायची, रडायची. पण अण्णा मात्र कधी काही बोलल्याचं आईला आठवत नाही. त्यांची आई लहानपणीच वारली आणि बाबांनी दुसरं लग्न केलं. सावत्र आई दुष्ट होती, छळायची अशातलाही काही भाग नाही. उलट ती मायाळू होती, असं आजी सांगायची. पण अण्णांचं वडिलांसोबत पटायचं नाही, त्यांना सावत्र आई होती, त्यांचं बालपण गरिबीत गेलं आणि मॅट्रिक पास झाल्यावर १९५०च्या आसपास ते रेल्वेत लागले एवढाच काय तो भूतकाळ सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावात असलेला विक्षिप्तपणा, तुसडेपणा हा लहानपणीच्या वाईट अनुभवांतून आला का आधीपासूनच तो त्यांच्या स्वभावाचा भाग होता, हे कळलं नाही. चेन्नईला सुरुवात करून मग सिकंदराबाद, कॅसलरॉक, कोल्हापूर, सांगली अशा बदल्या होत होत शेवटी ते मिरजेला आले आणि पुढची जवळजवळ ३६ वर्षं तिथेच राहिले. आईचं, माझ्या मावश्यांचं आणि मामाचं बालपण-शिक्षण मिरजेतच झालं.

मीदेखील लहानपणापासून मिरजेतच वाढलेलो. आईबाबांच्या नोकरीमुळे मी लहानपणी दिवसभर आजी-अण्णांकडेच असायचो. शाळा सुटली की तिकडेच जाऊन जेवायचो, खेळायचो. मला ते लाडानं ‘पुट्ट्या’ म्हणायचे. घरी गेल्या-गेल्या त्यांना प्रचंड आवडणारं मारी बिस्कीट न चुकता द्यायचे. त्यांच्यासोबत अनेकदा फिरायला गेल्याचं अजूनही आठवतंय. ते अख्खा गाव चालत फिरायचे. लुना होती पण ती कधीकाळी बंद पडली, ती तशीच अंगणात उभी असायची. घरातून बाहेर पडलं की रस्त्यातला सगळ्या ओळखीच्या, मित्रांच्या घरांमध्ये डोकावून पाहणे, चौकशी करणे, इकडच्या-तिकडच्या गप्पा मारून मग राघवेंद्रस्वामींच्या मठात दर्शन घेऊन (आणि अजून गप्पा मारून) मग कंटाळा आल्यामुळे आणि चालून-चालून पाय दुखायला लागल्याने मी "घरी चला" ची कॅसेट लावली की आम्ही परतायचो. त्यांची ही घरोघरी फिरण्याची सवय आजी आणि आई दोघींना आवडायची नाही. लोक मागून नावं ठेवतात, रोजरोज घरी गेले की तोंड वाकडं करतात, टाळायला बघतात असं त्यांना वाटायचं. पण अण्णांनी मात्र याची बिलकुल पर्वा केली नाही. त्यांचा तो आवडता छंद होता. लहान मुलांना चिडवणे हा त्यांचा आणखी एक आवडता उद्योग. त्याबाबतचा एक किस्सा आई अजूनही सांगते. त्यांच्या घराशेजारी एक कुटुंब होतं. येताजाता त्यांच्या घरापाशी अण्णा नेहमी थांबायचे. घरात डोकावून तिथल्या लहानग्याला कानडी हेल काढून "काय रे चहा देणारं काय?" म्हणून उगाचच चिडवण्यासाठी विचारायचे. हे वाक्य पूर्ण होतं न होतं तोवर त्याची आई "साखर संपली म्हणून सांग रे..." म्हणून ओरडायची. मग कधी साखर संपायची कधी दूध, कधी रॉकेल तर कधी चहापूड. अण्णांना चेष्टेतसुद्धा चहा काही मिळाला नाही आणि ते विचारायचं थांबले नाहीत. आई, मावशी, आजी याबद्दल नेहमी त्यांची नेहमी कानउघाडणी करायच्या. "घरी दोन कप चहा पिल्यावर तुम्हाला लोकाच्या दारात चहा मागायची गरज काय?" म्हणायच्या. पण अण्णा दाद थोडीच देणार.

मातृभाषा कन्नड असल्याने आईसोबत, आजी-मावश्यांसोबत ते नेहमी कन्नडमधून बोलत. पण आमच्याशी मात्र मराठीतून बोलायचे. टाईम्स ऑफ इंडिया सगळा वाचून काढायचे. वाचून झालेला पेपर गुंडाळी करून हातात घेऊन गावातून फेरफटका मारायचे. अण्णांनी आम्हाला गोष्टी कधी सांगितल्या नाहीत, पण एका गोष्टीबद्दल मात्र ते भरभरून बोलायचे. ती म्हणजे रेल्वे. त्यांचं आयुष्य जिच्या सहवासात गेलं त्या रेल्वेवर त्यांचं मनापासून प्रेम होतं. मला आणि माझ्या भावाला, आनंदला पण रेल्वेबद्दल प्रचंड कुतूहल असल्यामुळे आम्ही त्याविषयी अनेक चौकशा करायचो. कदाचित नावामुळे असेल पण कॅसलरॉक स्टेशनबद्दल मला भारीच कौतुक होतं. त्यामुळे मी सतत त्यांना कॅसलरॉक कसं आहे, कुठे आहे, तिथे किल्ला आहे का, तिकडे कसं जायचं वगैरे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहायचो. आपल्या आवडीच्या विषयांवर कितीही बोललं तरी माणसाला कंटाळा येत नाही. तेही न कंटाळता सांगायचे. आम्हाला वेगवेगळे मार्ग, जंक्शन्स, स्टेशन्स, सिग्नल याबाबत सांगत राहायचे. जास्ती काही कळायचं नाही पण भारी वाटायचं. मला एसी डब्यांबद्दल खूप आकर्षण होतं. त्यातून प्रवास करावा असं वाटायचं. त्यावेळी एसीतून प्रवास करणं परवडण्यासारखं नव्हतं. पण अण्णांकडे एसीचा पास होता. आम्ही त्यांना आमची इच्छा सांगितल्यावर त्यांनी मला आणि आनंदला मिरज-कोल्हापूर असा एसीमधून घडवलेला प्रवास अजूनही आठवतो. पुढचा एक महिना आम्ही एसीतून फिरून आलो म्हणून सर्वांना भाव खात सांगत होतो हेही आठवतं.

लहान असताना त्यांच्यासोबत रेल्वेतून फिरताना सगळ्यात जास्त भीती वाटायची ती त्यांच्या उतरून जाण्याची. गाडी मध्ये कुठे स्टेशनला थांबली की तिथल्या पार्सल ऑफिस किंवा स्टेशनमास्तर ऑफिसमध्ये जाऊन ओळख काढून बोलत बसायची खोड त्यांना होती. अख्खी हयात या वातावरणात गेल्यामुळे रेल्वे स्टेशन म्हणजे त्यांना बालेकिल्लाच वाटायचा. गाडी सुटायला लागली तरी परत यायचं ते नाव घ्यायचे नाहीत. आणि मग जरा वेग पकडला की अचानक कुठूनतरी हजर व्हायचे आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडायचा. याचा फटका आईलासुद्धा एकदा बसलेला. दिल्लीला युपीएससी परीक्षेसाठी राजधानी एक्स्प्रेसमधून जाताना मध्ये एका स्टेशनवर अण्णा जे उतरले ते गाडी सुरू झाली तरी आलेच नाहीत. तिला वाटलं की त्यांची गाडी चुकलीच. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आईने तसाच प्रवास केला. पण दोन-तीन तासांनी अचानक ते परतले आणि आईचा जीव भांड्यात पडला.

आयुष्यभर त्यांनी प्रामाणिकपणे नोकरी केली. आपण सरकारचं खातो तर खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यामुळे संप वगैरे गोष्टींचा त्यांना तिटकारा होता. आणीबाणीच्या आधी जेव्हा संपाचं प्रस्थ वाढलेलं, त्या काळातही ते एकाही संपात सहभागी झाले नाहीत. एका संपात तर ते एकटे ऑफिसला जाऊन हजेरी लावून आले. आणीबाणी असताना 'इंदिरा गांधींनी बरोबरच केलंय', असं ते म्हणायचे. आपल्या नोकरीवर त्यांचं मनापासून प्रेम होतं.

कट्टर धार्मिक वैष्णव ब्राह्मण कुटुंबात जन्मले असले तरी अण्णा अजिबात धार्मिक नव्हते. नास्तिक होते असं नाही म्हणता येणार, पण देव-धर्म त्यांना फारसा आवडायचा नाही. टिपिकल वैष्णव कुटुंबातलं पूजेचं, सोवळ्याचं अवडंबर, स्टीलच्या ताटात न जेवणं, गॅसवर शिजवलेले पदार्थ न खाणं असले प्रकार त्यांनी कधीच केले नाहीत. उलट हॉटेलातलं चमचमीत खायला त्यांना खूप आवडायचं. पूजापाठही ते केवळ एक दिनचर्येचा भाग म्हणून किंवा अगदीच टाळता येत नाही म्हणून करायचे. याउलट आजी मात्र प्रचंड धार्मिक आणि श्रद्धाळू होती. आजी हॉटेलमधील अन्न अजिबात खायची नाही तर अण्णांना हॉटेलमध्ये नाश्ता केल्याशिवाय चैन पडायची नाही. आजी कडक सोवळं पाळायची तर अण्णा काही पाळायचे नाहीत. त्यांचा होमिओपॅथीवर विश्वास होता. कोणे एके काळी त्यांनी होमिओपॅथीचा छोटासा कोर्स केल्यामुळे त्यांना त्यात वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याची सवय होती. मिरजेत नव्यानेच दवाखाना सुरू केलेल्या करमरकर डॉक्टरांशी ते होमिओपॅथी कशी श्रेष्ठ आहे यावरून नेहमी वाद घालत, असंही मी ऐकून आहे. मावशीचा कान प्रचंड दुखायचा तेव्हाही बरं होण्यासाठी होमिओपॅथीचाच वापर त्यांनी कुणाचंही न ऐकता अट्टाहासाने केलेला. शेवटी गुण न आल्याने आणि जखम वाढत गेल्याने कानाचं ऑपरेशन करावं लागलं. तेव्हापासून त्यांनी तो नाद हळूहळू कमी केला, असं आई सांगते.

आईला कलेक्टर करण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यासाठी ते स्वत: रोजगार समाचार आणून, वाचून फॉर्म घेऊन येत आणि आईला भरायला लावत. परीक्षेला तिच्यासोबत जात. मुलींच्या शिक्षणाला, नोकरीला त्यांनी कधीच विरोध केला नाही. भरपूर शिकवलं. फालतू बंधनं कधीच घातली नाहीत. त्यांच्या सख्ख्या बहिणीला, आईच्या आत्याला जेव्हा अकाली वैधव्य आलं त्यावेळीदेखील आजी-अण्णांनी तिच्या केशवपनाला विरोध केला आणि पुन्हा विवाह करून देण्याचा आग्रह धरला. पण घरातल्या इतर लोकांपुढे त्या दोघांचं काही चाललं नाही. ती पुढे आयुष्यभर सोवळी राहिली.

दुपारच्या वेळी वामकुक्षी घेताना चित्रविचित्र आवाजात ओरडायची त्यांना सवय होती. आम्हाला बळेबळेच झोपायला सांगून ते झोपायचे आणि मध्येच झटका आल्याप्रमाणे "मी जाणार बद्रीनाथला, मी जाणार काशीला" असं काहीबाही बरळायचे. आम्हाला हे ऐकल्यावर हसू आवरायचं नाही. मग ते दटावून झोपायला सांगायचे. शांत झोपला नाहीत तर मुल्ला येऊन घेऊन जाईल असं म्हणायचे. अनेक दिवस ही धमकी देऊनही मुल्ला न आल्याने आम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचो. मग एक दिवस त्यांनी आम्हाला अद्दल घडवली. आम्ही असंच दुपारच्या वेळी ते झोपलेले असताना त्यांच्या शेजारी पडून दंगा करत होतो. त्यावेळी अचानक एक दाढीवाला, जाळीची टोपी घातलेला मनुष्य खरोखर आत आला आणि त्याने आम्हाला ५ मिनिटं बरंच काही सुनावलं. पुन्हा दंगा केला तर पळवून नेण्याची धमकीही दिली. आम्ही घाबरून गुट्ट झाल्याची खात्री पटताच तो निघून गेला. आम्ही घाबरून तसेच पडून राहिलो. आणि मग अर्ध्या तासाने उठून अण्णांनी हळूच मिश्किलपणे आम्हाला विचारलं, "कोण मुल्ला येऊन गेला काय रे?" आम्ही आपले गप्प. नंतर खूप दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधल्याच एका माणसाला त्यांनी ती "सुपारी" दिल्याचं आम्हाला कळून आलं.

आजीवर ते सतत खेकसायचे, चिडचिड करायचे. तरी एक विक्षिप्त, तिरसट पण प्रेमळ म्हातारा या पलीकडे त्यांच्या स्वभावाचे पैलू आम्हाला कधीच माहीत नव्हते. पण मग आई आम्ही मोठे झाल्यावर आम्हाला जे सांगायची ते ऐकल्यावर हाच तो माणूस का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहायचा नाही. लहानपणी आईला आणखी एक भाऊ होता. सर्वात मोठा. त्याची तब्येत नाजूक होती आणि त्याला फीट यायची. तो कधी शाळेत गेला नाही. त्याला फीटचा झटका आला की तो वेड्यासारखं करायचा. मग अण्णा त्याला काठीने, लाथांनी झोडपून सगळा राग त्याच्यावर काढायचे. तो गुरासारखा ओरडायचा पण अण्णा त्वेषाने दातओठ खात त्याला बडवत राहायचे. आजी मध्ये पडायची पण तिलाही मार मिळायचा. असं का करायचे कुणालाच नाही माहीत. पुढे काही वर्षांनी तो वारला. माझ्या जन्माच्या खूप आधी. हे जेव्हा ऐकायचो तेव्हा मला खूप अस्वस्थ व्हायला व्हायचं. आम्ही त्यांना कधीच त्या अवतारात पाहिलं नाही. पण मग अशी कोणती गोष्ट ते असं वागायला कारणीभूत ठरत असेल, असा प्रश्न पडायचा. त्यांच्या विक्षिप्त स्वभावामुळे आजीच्या माहेरची माणसं त्यांच्याशी नेहमीच एक अंतर राखून असायची. त्यांच्या स्वत:च्या नातेवाइकांशीही त्यांचं फार पटायचं नाही.

२००६मध्ये आजी अचानक गेली त्यावेळी आम्ही धावत तिकडे गेलेलो. अण्णा बाहेर जिन्यातच बसलेले. दु:खात असलेले अण्णा आता काय म्हणतील हा प्रश्न पडायच्या आतच त्यांनी निर्विकारपणे मला विचारलं, "काय पुट्ट्या, कॉलेज अॅडमिशनचं काय झालं रे?" डोळ्यात कोणताच भाव नव्हता. मी काहीच न बोलता नकारार्थी मान डोलावून पुढे गेलो.

पुढे ते मामासोबत पुण्याला राहायला गेले आणि त्यांचं मिरज कायमचं सुटलं. एकदोन वर्षांतच त्यांना अल्झायमर झाला. त्यानंतर ते फारसं बोलायचे नाहीत. बाहेर पडणं बंद झालं. चालताना त्यांचा हात धरावा लागायचा. शुगर सतत जास्त असायची. एकदा मी त्यांच्याकडे गेलेलो, तेव्हा त्यांनी मला ओळखलंच नाही. मामीने दहा मिनिटं खटपट करून "हा नंदाचा, तुमच्या मुलीचा मुलगा" असं कन्नडमधून सांगितल्यावर शेवटी त्यांच्या लक्षात आलं. थोडा वेळ बोलल्यावर आणि मग काही क्षण गेल्यावर अचानक काहीतरी आठवल्यासारखं त्यांनी विचारलं, "काय रे, हेम्या काय म्हणतोय?" काही क्षणांपूर्वी मला न ओळखणाऱ्या अण्णांना अचानक त्यांच्या वाड्याच्या अंगणात माझ्यासोबत खेळणारा माझा बालपणीचा मित्र आठवला. कदाचित अल्झायमरमुळे त्यांना तोच काळ आठवत असावा.

त्यानंतरही एकदा गेलो तेव्हा ते काही वेळ माझ्याशी बोलले. इकडची तिकडची चौकशी झाल्यावर मग काही वेळाने मला म्हणाले, "सर, तुम्ही नोकरी करता ना? आमच्या मुलाकडं जरा बघा की. दिवसभर उनाडक्या करत फिरत असतो. जरा त्याच्यासाठी नोकरी बघाल का?" मी कसनुसं हसलो. मामा अजूनही ऑफिसमधून यायचा होता. काही वेळ थांबून जड मनाने परत आलो.

अण्णा शुद्धीत असतानाची माझी आणि त्यांची ही शेवटची भेट.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

काय झकास लिहिलंय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यक्तीचित्रण खूपच आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिलंय.

स्टीलच्या ताटात न जेवणं, गॅसवर शिजवलेले पदार्थ न खाणं असले प्रकार त्यांनी कधीच केले नाहीत.

सोवळ्यात असलेही प्रकार असतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो , केवळ केळ्याच्या पानात किंवा पत्रावळीत जेवायचं. खास करून कर्नाटकात असतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिलय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

खूप छान!
माझे बाबांचे बाबा पण कानडी होते. त्यांना पण अण्णा म्हणायचे !!
माझ्याशी कायम इंग्रजीत बोलायचे .. ९७ वर्षांचे असताना गेले , तेव्हा त्यांना पण वार्धक्यामुळे लक्षात राहत नसे . आईशी कानडीत बोलत आणि तिला कानडी समजत नाही असं सांगितल्यावर हताश होत ! शेवटी शेवटी तर त्यांना फक्त त्यांच्या मोट्ठ्या मुलाचं नाव लक्षात होतं . आज्जी आधी गेली , पण तिचं असं वेगळं काहीच आठवत नाही , अण्णांसोबत सकाळचा चहा , त्यांच्या सोबतच फिरायला जाणं , ते बघतात तेच कार्यक्रम टीव्हीवर बघणं ; सगळं काही सगळे संदर्भ आज्जी- अण्णा असेच . आज्जीला तिची भावंडं गुंडव्वा म्हणत ते मला कॉमेडी वाटायचं !
आज्जीचं सोवळं- गौरीचा स्वयंपाक ओलेत्याने करणं , कडबू , भाग्यदा लक्ष्मी बारम्मा , माझ्या " ननगे कन्नड बरोदिल्ला" ला कौतुकाने हसणं, चटणी पुडी , बिस्सी बेल्ले भात
लेख वाचून काय काय आठवलं!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

मस्तच आहे ललित लेख. मला तर माझ्या विजापूर(आताचे विजयपूर) जवळ निंबाळ ह्या माझ्या आजोळी असलेल्या मामाची आठवण झाली. द्वाशी हा तर शब्द धमालच. मराठी वाचताना गोंडस वाटला. डोसा म्हणजे कन्नड मध्ये द्वाशी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

हा लेख क‌सा काय न‌ज‌रेतून सुट‌ला काय माहिती. अफाट लिहिलं आहे. द्वाशी हा श‌ब्द ऐकून म‌लाही एक‌द‌म गारेगार वाट‌लं, मामा-माव‌शीच्या घ‌री गेल्याग‌त‌. तो त‌व्याव‌र‌चा "द्वाशीन वास‌नी" एक‌द‌म नाकात शिर‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाय‌ला होय की. ज‌ब्ब‌र‌द‌स्तच लिहिलेय्. अस‌ले रेल्वेडे कॅरेक्ट‌र माझ्याही घ‌रात होते. आईचे व‌डिल्. स्टेश‌न‌मास्त‌र्.
द्वाशी त‌र अग‌दी खास श‌ब्द्. सोलापुरात द्वाशीला डोसा म्ह‌ण‌णारा माणूस मुळ‌चा सोलापुर‌क‌र न‌व्हेच्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌ला डोसा हा श‌ब्द‌च माहित न‌व्ह‌ता, आई द्वाशीच म्ह‌ण‌ते. क‌णकेचे ते धिर‌डे.
लेख नितांत‌सुंद‌र‌ आहे ख‌रोख‌र‌, व‌र आल्यामुळे वाचून झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तुम्ही र‌ंग‌विलेले अण्णांचे व्य‌क्तिचित्र‌ खूप‌ आव‌ड‌ले. ओघ‌व‌त्या भाषेत‌ आणि अभिनिवेश‌र‌हित‌ असे ते लेख‌न‌ आहे.

स्टीलच्या ताटात न जेवणे असे प्र‌कार‌ म‌ला माहीत‌ आहेत‌. आम‌चे एक‌ नातेवाईक‌ क‌र्म‌ठ‌ होते. ते स्टील‌ची भांडी वाप‌र‌त‌ न‌स‌त‌ कार‌ण‌ ते 'लोह‌' हा भोज‌नास‌ निषिद्ध‌ अस‌लेला धातु आहे, ते चहा पीत‌ न‌स‌त‌ त‌र‌ केव‌ळ‌ दूध‌ आणि तेहि क‌पाने नाही त‌र‌ चांदीच्या भांड्याने कार‌ण‌ क‌प‌ म्ह‌ण‌जे मृत्तिका. ते प्र‌वासाला गेले त‌र‌ घ‌राबाहेर‌ असेतोव‌र‌ तोंडात‌ पाणीहि घाल‌त‌ न‌स‌त‌. जे काय‌ ख‌णेपिणे होईल‌ ते मुक्कामाला पोहोच‌ल्याव‌र‌ स्नान‌ क‌रून‌ म‌ग‌च‌. घरात‌ सुना आणि मुलींना न‌ऊवारीची स‌क्ती होती. ( हे अग‌दी स‌त्त‌रीच्या दिव‌सांम‌ध्ये. अर्थात‌ हे त‌से इत‌के दुर्मिळ‌ न‌व्ह‌ते. आम‌ची एक‌ व‌र्ग‌भ‌गिनी नाव्याने कॉलेजात‌ आली तीहि न‌ऊवारीत‌ असे कार‌ण‌ ह्या अटीव‌र‌च‌ तिच्या व‌डिलांनी तिला कॉलेजात‌ जाण्याला होकार‌ दिला होत‌ अशी ऐकीव‌ माहिती. काही म‌हिन्यांनी व‌डिलांनी ह‌ट्ट‌ सोड‌ला असावा कार‌ण‌ दोन‌तीन‌ म‌हिन्यांन‌ंत‌र‌ ती पाच‌वारीत‌ आली. ह‌ल्ली मात्र‌ पाच‌वारी सुद्धा 'देसी डे' च्या मुहूर्ताव‌र‌ वाप‌र‌ली जाते. घ‌ट्ट‌ आणि मुद्दाम‌ फाट‌लेल्या जीन्स‌ हा चालू शिष्ट‌मान्य‌ वेष‌ आहे असे वाट‌ते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0