सुपरहीरो

क्षण तसा नाजूकच होता. बस ड्रायव्हरच्या एकामागून एक कानाखाली मारल्या जात असल्यामुळे येणारा 'फट फट फट' असा आवाज पाठीमागून माझ्या कानात घुसत होता. माझ्या पुढे, रात्रीचा एक वाजलेला असतानाही गॉगल घालून बाईकवर बसलेला आणि आपले साथीदार बसड्रायव्हरची करत असलेली धुलाई थंडपणे पाहत असलेला माणूस, माझी उत्सुकता भयंकर ताणत होता. कंपनीची दूसरी पाळी संपवून मी कंपनीच्याच बसने घरी येत असताना या लोकांनी अलका टॉकीज चौकात बस अडवून ड्रायव्हरला बडवायला सुरुवात केली होती. बसमधले इतर लोक काही मिनिटांपूर्वीच पळून गेलेले होते. मीही वैतागून घरी निघालेलो असताना ह्या माणसान माझं लक्ष वेधून घेतलं होतं.

मी त्या वेळी पळून का गेलो नाही आणि ह्या गॉगलवाल्या माणसाशी बोलायला का गेलो हे सांगण अवघड आहे. कदाचित माझ्या आयुष्यात असलेला नाट्याचा एकंदरीत अभाव मला असे करण्यास भाग पाडून गेला असावा. माणूस गोष्टींचं वर्गीकरण चूक-बरोबर किंवा धोकादायक-बिनधोकादायक असं न करता इन्टरेस्टीन्ग-कंटाळवाण्या असं करू लागला की तो गंडत चालला आहे असं म्हणण्यास हरकत नसते. सध्या मी ही ह्याच पंथाला लागलेलो होतो. घरची अस्थिर परिस्थिती आणि त्यात पोरगी सोडून गेली की येणार्या डीप्रेशनला मेंदूने दिलेला पहिला प्रतिसाद म्हणजे मी हल्ली उगाच तत्वज्ञान वगैरे, जरा जास्तच वाचू लागलो होतो. परवाच बॉस केबिनमध्ये बोलावून घेवून माझ्या अंगावर ओरडला. 'काम करायचं नाही, काहीच करायचं नाही, तर जगता कशाला?!?' या त्याच्या प्रश्नाला, मी 'आय थिंक देअरफोर आय एम' असे उत्तर देऊन टोलवले होते. मग त्याचा हात अचानक टेबलावरच्या पेपरवेटकडे जातो आहे हे पाहून मी तेथून बाणेदारपणे निघून गेलो होतो. या तत्वज्ञान वाचनाचं लॉगिकल एक्स्टेन्शन म्हणजे माझं वाढलेलं कविता वाचन आणि लेखन. माझ्या एका मित्राने लिहिलेली एक कविता मला भलतीच आवडली होती. तिचं नाव 'अस्तित्वाची जाहिरात'! ही कविता एका डीप्रेस्ड माणसाच्या पोईंट ऑफ व्ह्यू ने लिहिलेली होती. हा डीप्रेस्ड माणूस म्हणतो की मुळात माणसाचं अस्तित्व किंवा जीवन हे एक फेल्ड प्रोडक्ट आहे. आणि मी(कवी) सोडून इतर प्रत्येकजण, या अतित्वाची जाहिरात करतो आहे. आपण इतर आनंदी लोक पाहतो, त्यांची फल्फिल्ड आयुष्ये पाहतो आणि भुलतो. आपल्याला वाटत बास! आता तर जगलंच पाहिजे! पण प्रत्यक्षात जगताना मात्र जाहिरातीने प्रॉमिस केलेलं सुख वाट्याला येता येत नाही. मुळात या कवीच्या आयुष्यात सुख, नाट्य, उत्साह असा काही उरलेलाच नाहिये. उरल्यात त्या फक्त अस्तित्वाच्या जाहिराती! अशी साधारण त्या कवितेची कल्पना होती. ह्या मित्राच नाव केदार. हाही तसा मूर्खच, पण कविता बर्या करतो. असं त्याला वाटत. असो. तर हे सर्व सांगायचा उद्देश असा की या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून, मी, माझ्या आयुष्यात काहीतरी सनसनाटी घडावं याची वाट पाहत होतो. आणि त्या क्षणी, रात्री एक वाजता बस ड्रायव्हरला विनाकारण होणारी मारहाण, याहून जास्त सनसनाटी काहीच नव्हत! हं! याबाबत अधिक माहिती मिळवलीच पाहिजे.

काहीसा घाबरत आणि काहीशा उत्सुकतेने मी त्या गॉगलवाल्याच्या जवळ गेलो. खर तर 'उत्सुकता' या शब्दापेक्षा 'खाज' हा शब्द जास्त संयुक्तिक होता. पण मी मुळात सभ्य! त्यामुळे असे शब्द मी असभ्यपणासाठी राखून ठेवतो. टिळकरोड वरून एक ईनोवा अलका टॉकीजच्या दिशेने आली. तिच्या ड्रायव्हरला हा समोरचा नजारा फारसा ईन्व्हाइटिंग वाटला नसावा. ईनोवाने यु टर्न मारला आणि ढून्गणाला चाके लावत ती घरंगळून गेली. याचा नाही म्हणाल तरी एक फायदा झाला. मी या गॉगलवाल्या माणसाचे लक्ष माझ्याकडे जावे म्हणून काय करावे या विचारातच होतो. म्हणजे त्याला 'एक्सक्यूज मी' म्हणावे की त्याला तात्या, काका, मामा, मित्रा, (घशातून काढला जाणारा एक खोकलासद्रुश आवाज),बॉस, छाव्या यापैकी एखाद्या शब्दाने संबोधावे यावर माझा निर्णय होत नव्हता. पण या ईनोवामुळे त्यानेच मागे वळून पाहिले आणि त्याला मी दिसलो. तो काहीसा चक्रावला. नंतर त्याने लहान मुले(आणि आपणही) बंदुकीची खूण म्हणून मूठ वळून फक्त सुरुवातीची २ बोटे बाहेर काढतो तशी काढली आणि मला 'आता आपण फुटावे' अशा अर्थाची खूण केली.
"जरा बोलायच होत" माझ्या घशातून मलाही अनोळखी अशा आवाजात शब्द उमटले.
तो माणूस जरा त्रासल्यासारखा बाईकवरून उतरला. दोन ढांगात तो माझ्यासमोर येवून उभा राहिला. मग त्याने माझ्यावर माझे माझ्या बहिणीशी लैंगिक संबंध असल्याचा आरोप केला. हाच आरोप मी आजच सहा वाजता, चहाच्या वेळेस, माझ्या पेपरवेटवाल्या बॉसवरही केला होता. त्यामुळे मी हे फार पर्सनली घेतलं नाही. तो माझ्या रिप्लायची वाट पाहत गप्प उभा राहिला. मला काय बोलावे हे कळेना. मग मी विषय बदलला.
"तुम्ही ड्रायवरकाकांना का मारत आहात?" मी विचारल. खर तर बस ड्रायव्हरलाही आम्ही अनेकदा अनेक शिव्या देतो. पण आत्ता मी त्याला उल्लेख मुद्दाम ड्रायवरकाका असा केला. गॉगलवाल्या माणसाला मी 'निरागस' वाटलो पाहिजे ही त्यामागची भावना! म्हणजे निदान काही अवचित घडल तर हा आणि याचे मित्र मला फटकवण्यापूर्वी निदान २ मिनिटे तरी विचार करतील. एनपीएल टेकनिक! काहीही उचलून वाचल्याचा आणखी एक फ़ायदा.
त्याने गॉगल काढला. चेहरा अद्यापही त्रासलेलाच. मग अचानक त्याने 'काय राव…याला इतकही कळत नाही' असे भाव चेहर्यावर आणले.
"तत्व!" तो उद्गारला.

हे फारच भारी होत. जेम्स बॉन्डच्या कसिनो रोयाल सिनेमात एक वाक्य आहे. तत्त्वांपेक्षा माणसांसाठी लढण सोपं असत. आपण आयुष्यात हेच करतो. हा माणूस मात्र तत्वासाठी कोणाला तरी धुवत होता. असे लोक रोज रोज थोडेच भेटतात? असे लोक येती घरा तोची दिवाळी दसरा! पण हाही नियम आपण पाळत नाही. नैसर्गिक आहे. या नियमानुसार वागाल तर दिवाळी १० वर्षातून एकदा साजरी करावी लागेल किंवा दरवर्षी तोच साधू-संत घरी बोलवावा लागेल. त्यापेक्षा एक तारीख ठरवून, त्या तारखेस दर वर्षी फटाके उडवणे उत्तम. असो. सांगायचा मुद्दा असा की हा माणूस आता माझ्या नजरेत साधू होता. याच्या पाया पडले पाहिजे. मी त्याचे पाय पाहिले. स्पाइक्सचे बूट होते. चला. पाया पडण रद्द! उगाच ह्याला पटलं नाही आणि लाथेने झिडकारलं तर प्रॉब्लेम व्हायचा.
"समजलं का?" तो खेकसला.
मी तंद्रीतून जागा झालो. माणूस सहसा बोलण्याच्या ओघातून बाहेर पडून 'समजलं का?' असं विचारतो त्यावेळी ऐकणार्याने नाही असे म्हणून त्याला काही शंका विचारावी अशी त्याची अपेक्षा असते. अशा लोकांना शाळा घेण्याची आवड असते. हाही त्यातलाच दिसत होता. आता काहीतरी क्वेरी विचारलीच पाहिजे. मी त्याला नाव विचारण्यासाठी तोंड उघडले, इतक्यात बसवाला जरा जास्तच जोरात किंचाळला. बहुदा त्याचे हाड वगैरे मोडले असावे. हे ड्रायव्हर लोक तसे अत्यंत असंस्कृत! आता खातोय तर गपचूप मार खावा ना. चांगला मोमेंट खराब केला. गॉगलवालाही माझ्याकडून लक्ष हटवून हाणामारीची मजा पाहू लागला. आता त्या लोकांनी बसवाल्याला बसवर दाबलेले होते. त्याचा एक हात विचित्र कोनात खांद्यापासून लोंबत होता. बहुदा हाच मगाशी मोडला असावा. आता त्यांची त्याचा पाय तोडण्यासाठी लगबग सुरू झाली. एकाने बाईक पुसायला वापरतात तसे कळकट कापड बसवाल्याच्या तोंडात कोन्बले. आरडाओरडी जरा दबक्या आवाजात सुरू राहिली. हा बोळा कोम्बणारा तसा सुसंकृतच! दुसर्या एकाने एक पहार आणली. मी थोडासा डिस्टर्ब झालो. आणि प्रभावितही! इतकी टोकाची भूमिका घ्यायला लावणारे त्याचे तत्वही तितकेच वजनदार असले पाहिजे ह्याचा मला साक्षात्कार झाला! काय असेल बर ? हं! याबाबत अधिक माहिती मिळवलीच पाहिजे. हा गॉगलवाल्याच्या नावाहून जास्त महत्वाचा प्रश्न होता.

"कोणत तत्व आहे तुमच?" मी जरा मोठ्याने विचारले. या वेळेस मला माझा आवाज ओळखू आला. आत्मविश्वास! दुसर काय! असो. गॉगलवाल्याने माझ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. काहीशा अभिमानानेच तो उद्गारला, "खूप आहेत! आता सध्या आम्ही ही मारामारी करतोय त्याच तत्व तुला दाखवतो थांब!"
आता मात्र माझी खात्री पटली. हा हाडाचा शिक्षकच होता. त्याने खिशातून एक कागद काढला.
"आमचं एक तत्वांच पुस्तक आहे. आम्ही त्यानुसार वागतो! हे त्यातलं एक पान!" त्याने कागद मला देऊ केला. स्ट्रीटलाइटच्या प्रकाशात मी तो वाचला. कुठल्याश्या पुस्तकाचे ते ४२ वे पान होते. हे पानही पूर्ण नव्हते. अर्धेमुर्धेच! त्यावर पुढील मजकूर होता - '..बस ड्रायव्हर म्हणजे आपले शत्रूच!'
"..बस ड्रायव्हर म्हणजे आपले शत्रूच" मी मोठ्याने वाचले. " म्हणजे?" मी विचारले.
त्याने कागद खेचून परत घेतला. चेहर्यावर परत वैताग.
"त्यात न कळण्यासारख काय आहे? सरळसोट तर आहे!" तो फ़ुत्कारला.
"पण याच्या आजुबाजूचा मजकूर कुठाय? आणि हे पुस्तक इतक फाटलेल का आहे?"
या प्रश्नांवर तो जरासा हिरमुसलेला दिसला . चेहर्यावर कमालीची निराशा. पहारीचा एक खणकन आवाज आणि तारसप्तकातला एखादा कोमल सूर आळवावा तशी ड्रायव्हरची दबकी किंकाळी. करुणसागरात यथेच्छ भिजल्याचा मला अनुभव आला. पहारीच्या धातूला आणि ड्रायव्हरच्या स्वरयन्त्राला मी मनोमन दाद दिली.
"कोणतेही चांगलं काम हाती घेतलं की विरोध अटळ असतो" त्याने एक सुस्कारा देऊन बोलायला सुरुवात केली. त्याचा मुद्दा अचूक होता. मागे ड्रायव्हरचा दुसरा पायही बळी जाण्याच्या मार्गावर असावा. कारण तो आता "दुसरा नको दुसरा नको" असे बोळा कोंबलेल्या अवस्थेतही ओरडत होता. म्हणजे इथेही त्या निष्पाप जीवांना विरोधाचा सामना करावा लागत होताच!प्राक्तन. दुसरे काय!

"सध्या आम्हाला एका विशिष्ट माणसाकडून कमालीचा विरोध होतो आहे" तो संत पुढे बोलू लागला. "हा माणूस स्वताला सुपरहिरो समजतो…आमच्या अड्ड्यांवर हल्ले करतो. आमची ही…" इथे त्याने तो तत्वनिष्ठ कागद परत माझ्या तोंडापुढे नाचवला "…पुस्तके चोरतो, फाडतो, जाळतो…. आम्ही अड्डे बदलले…जागा बदलल्या…पण त्याला सगळ कळत! अगोदरच…हल्ले करून करून बेजार केलंय…"
"अरेरे…हे तर फारच वाईट आहे हो…" मी सहानुभूती दर्शवली.
"हं! यु डोन्ट इव्हन नो द हाफ ऑफ इट!" त्याच्या तोंडचे हे फटाकडे इंग्लिश वाक्य ऐकून मी चाट पडलो. माझा त्याच्याबद्दलचा आदर एकदम ३७ वगैरे पटीने वाढला. मला आणखी चकित न होण्याची संधी देता तो पुढे बोलू लागला.
"फिजिकल नुकसान असेल तर वुई कॅन टेक केअर ऑफ इट …अरे पण ह्याच काय????? त्याने उजव्या हाताचे एक बोट 'अरे पण ह्याच काय' हे बोलताना आपल्या कपाळावर ४ वेळा मारून घेतले. त्याच बोट कपाळावर आदळत होत, त्याच तालात, मागे, पहार चार वेळा ड्रायव्हरच्या दुसर्या पायावर आदळली. हा काही योगायोग नव्ह्ता. थोर लोकांच्या बोलण्यात आणि कृतीत अशीच एकवाक्यता असते.
"म्हणजे नक्की काय म्हणायचय तुम्हाला?" मी विचारल.
"अरे मेंदूशी खेळतो तो आमच्या! मागच्या आठवड्यातलीच गोष्ट सांगतो तुला."
"ओके"
"आम्ही असेच एकाला बडवत होतो…"
"का?"
"प्च!! डिटेल्स सोड रे…जेनेरिक इश्यू लक्षात घे"
"बर"
"हां…तर ५-१० मिनिटे ठोकला त्याला…मेला नव्हता तो… पण मारायचा होता. मग आम्ही त्याला पेटवून देणार इतक्यात 'तो' आला…त्याने फिजिकली काहीच केल नाही…पण आम्हाला एकदम आमची तत्व एकदम चुकीची वाटू लागली!!! 'कशाला मारायचा या माणसाला?' असले भुक्कड विचार मनात आले. आम्ही चक्क तिथून निघून गेलो. थोडं लांब गेल्यावर कळल की आपण काय घोडचूक केलीये ते!"
मामला एकंदरीत फारच दिलचस्प बनत होता.
मी विचारलं, "अजबच आहे….पण मग तो आत्तापण आला तर?"
तो अचानक खदाखदा हसू लागला. "मागे बघ"
मी मागे वळलो. मागे ३ लोक होते. एकाच्या हातात बंदूक होती. दुसर्याच्या हातात पहार. बसवाला निपचित पडला होता. बंदुकवाल्या माणसाने आमच्याकडे पाहत बंदूक लोड केली. आता ते ड्रायव्हरच्या डोक्यात गोळी घालून मामला संपवणार होते.
"त्याला आम्ही ऑलरेडी का मारलं नाहीये माहितीये का?" गॉगलवाला विचारता झाला.
मी पुन्हा त्याच्याकडे वळलो.
"नाही…."
"कारण आम्ही त्या सुपरहिरोची वाट पाहतोय अडाण्या… आयटी मध्ये आहेस ना कामाला? येवढ समजत नाही का रे गाढवा? त्याला हरवायची पूर्ण तयारी केलीये आता आम्ही!!!" तो अचानक भयंकर उत्तेजित झालेला होता. डोळ्यात वेडेपणाची झाक उतरलेली होती. एखाद्या सोफ्टवेअर बगसारखा, चोरपावलांनी, अत्यंत अनएक्सपेक्टेडली, गेल्या पाउण तासात पहिल्यांदा, घामाचा एक थेंब माझ्या कपाळावर प्रवेश करता झाला. तोंडाला कोरड पडली. पाय लटपटू लागले. च्यायला. हे सर्व त्या केदारच काम! काहीतरी डिप्रेसिंग कविता लिहितो. आता या प्रकारातून वाचलो तर त्याच्या कविता वाचण पहिलं बंद केलं पाहिजे. नकोच ते विकतच तत्वज्ञान---
"ए चिंटू…बोल ना मूर्खा…कळल का?" या वेळेस तो हे विचारून नुसता थांबला नाही. त्याने माझे खांदे धरून मला गदागदा हलवले.
"हो हो…पण हा हिरो आहे तरी कोण?" मी विचारायचे म्हणून विचारले.
"सांगतो…नीट ऐक! त्याच नाव…" तो वाक्य पूर्ण करू शकला नाही. कारण त्याच वेळेस माझ्या मागे सुतळी बॉम्ब फ़ुटल्यासारखा मोठा आवाज झाला. आधी मला वाटलं की नक्कीच ड्रायव्हरला गोळी मारली असणार. पण नाही. मागे वळलो तर एक चमत्कारिक दृश्य माझ्या नजरेस पडलं.

ड्रायव्हरच्या पायाशी एक नवीन माणूस अचानक कुठूनतरी प्रगट झाला होता. त्याने गळ्यापासून घोट्यापर्यंत एक सिंगल पीस कपडा घातलेला होता. पांढर्या रंगाचा. डोक्यावर एकही केस नाही. डोळे निळे आणि नजर अत्यंत भिरभिरती. त्या कपड्यावर छातीपाशी लाल अक्षरात 'C' हे अक्षर लिहिलेले होते. अत्यंत गार्डन व्हरायटी सुपरहिरो कोस्च्यूम! हा कोणी सुपरहिरो आहे हे ५ दिवसांच्या शेंबड्या-ओकर्या-रडक्या पोरानेही ओळखले असते. आता फक्त 'C' म्हणजे काय हीच काय ती त्यातल्या त्यात उत्सुकतेची बाब होती. गॉगलवाला माणूस म्हणत होता तसा असेलही हा भयंकर पण त्याने कपडे तरी निदान वेगळे घालायला हवे अस मला मनापासून वाटलं. ते तीन लोक घाबरल्यासारखे पळत येवून आमच्यापाशी येवून उभे राहिले.
गॉगलवाला थंडपणे जमिनीवर थुंकला. त्याने बाइकला अडकवलेली पिशवी काढून त्या तिघांकडे फ़ेकली. त्यांनी ती अलगद झेलली. त्यातून ते पटापट काही वस्तू बाहेर काढू लागले.
"या मिस्टर Context….या!…आपलीच प्रतीक्षा होती" गॉगलवाला म्हणाला. अच्छा…म्हणजे C म्हणजे Context होत तर!
"कळल का रे रताळ्या…" हे मला उद्देशून "हाच तो. Context! सगळ्याची जड…एक नम्बरचा हरामखोर!"
मी मान डोलावली. Context काही बोलला नाही. त्याच्या चेहर्यावर 'जे बोलायचं ते आधीच बोलून झालंय' असे भाव उमटले. बहुधा हा तसा कमीच बोलत असावा. एकाएकी त्याचे डोळे तेजस्वी होऊ लागले. त्यातून निळा प्रकाश बाहेर पडू लागला. माझ्या मागचे लोक जोरात हसू लागले. एकाने जोरात 'हू' असा हाय पीच्ड आवाजही काढला.
माझी उत्सुकता परतली. मी मागे पाहिले. मागच दृश्य भयंकरच अनसेटलींग होत. म्हणजे या रात्री आत्तापर्यन जे जे घडलं होत त्या सर्वापेक्षाही जास्त! ह्या सर्व लोकांनी एकेका कानात कापूस कोंबले होते. प्रत्येकाने डोळ्यावर काळ्या ओढण्या ओढल्या होत्या. आणि आता ते देशी दारूचा एक एक घुटका मारत होते. च्यामारी काय प्रकार होता हा सगळा?
मी Context कडे एक नजर टाकली. त्याचे डोळे आता पूर्ववत झाले होते. त्याची जी काही ट्रिक होती ती नक्कीच फेल झालेली होती. काहीसे गोंधळलेले आणि काहीसे घाबरट भाव चेहर्यावर घेवून हा उभा होता.
"तुम्ही नक्की काय करताय?" मी त्या चौघांना विचारलं.
गॉगलवाल्याने अत्यंत माजुरड्यासारखं माझ्याकडे पाहिलं. "लक्षात ठेव मित्रा…" तो म्हणाला "आपलं डोक ठिकाणावर नसेल, डोळ्यांवर कातड असेल आणि कान अर्धवटच उघडे असतील तर आपण Context ला सहज हरवू शकतो!!" बंदुकवाल्या माणसाने छद्मी हसत आपली लोडेड बंदूक Context वर रोखली. Context आता पूर्णपणे घाबरलेला होता. 'कुठून बुद्धी झाली आणि इथे आलो' असं त्याला वाटत असाव. त्याने ओठांवरून जीभ फ़िरवली.
"ऐकून घ्या…." तो थरथरलेल्या आवाजात बोलू लागला. त्याने जे काही परिधान केलेलं होत त्याच्या हिप पॉकेट मधून एक कागद काढला. "उगाच मारामारी करण्यात काही अर्थ नाहीये….तुम्ही प्लीज हे वाचा" त्याने कागद पुढे केला. "तुम्हाला समजेल की…" माझ्या मागून एक गोळी सुटून त्याच्या कपाळात शिरली. खूप मोठा आवाज झाला. मी दचकून २ फूट वर उडालो. आता हा काही वाचण शक्य नाही……
बंदुकवाला माणूस पुढे झाला. त्याने Context ला अजून ३-४ गोळ्या मारल्या. नंतर तसाच डावीकडे जाऊन त्याने ड्रायव्हरच्या डोक्यातही एक गोळी मारली. मी पूर्ण सुन्न झालो होतो. हे लोक माझ्या आजूबाजूला ओरडा करत नाचत होते, हवेत गोळ्या मारत होते, एकमेकांना मिठ्या मारत होते. मला मात्र यातली एकही गोष्ट व्यवस्थित दिसत वा ऐकू येत नव्हती. ते लोक कधी निघून गेले ते सांगता येणार नाही. मी सुन्नावस्थेत तिथे किती वेळ उभा होतो हे ही सांगता येणार नाही. एकाकेकी जाणवलेल्या उबीमुळे मी भानावर आलो. माझ्या समोरच्या हॉटेलच्या भिंतीवर माझी उंच सावली थरथरत होती. सभोवताली पिवळा प्रकाश. मी मागे पाहिल. कंपनीची बस कड-कड आवाज करत जळत होती. मी विस्फारलेल्या डोळ्यांनी मागे पाहतच घराकडे चालू लागलो. दोन पावले टाकली तोच कशाला तरी अडखळून तोंडावर आपटलो. माझ्या पायाशी मेलेला Context पडलेला होता. आणि नाकापाशी तो दाखवत असलेला कागद.
अभावितपणे मी तो कागद उचलला. उलगडला. कुठल्याशा पुस्तकातलं ४१ व पान होत ते. माझ्या अंगावर काटा आला. हा त्या तत्वांच्या पुस्तकातलाच कागद होता. गॉगलवाल्या माणसाकडे होता, त्या आधीचा. मी हावरटासारखा त्यावरचा मजकूर वाचू लागलो.

"काही बस ड्रायव्हर बसथाम्ब्यावर बस थांबवत नाहीत. हात करत असलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करत सरळ निघून जातात. काही जण थांबा ओलांडून काही अंतर पुढे जावून थांबतात. मग लोक बसकडे पळत सुटतात. याचा वयस्कर नागरिक, गरोदर स्त्रिया इत्यादींना निष्कारण त्रास होतो. असे --"

मजकूर सम्पला. मला हसावे का रडावे ते कळेना. मी मनातल्या मनात ४२ व्या पानावरचा मजकूर आठवून वाक्य पूर्ण केले. मी तसाच पडलेल्या अवस्थेत ड्रायव्हरच्या शवाकडे पाहिले. आता काही वेळातच तो जळणार होता. हवेत रॉकेलचा वास दरवळतो आहे याची मला एकाएकी जाणीव झाली. झाल ते झाल. आता इथून लवकर निघून गेल पाहिजे. मी उठण्याआधी जाताजाता शेवटचं म्हणून ४१ वं पान पुन्हा पाहिलं. त्यावर लेझरने मारावे तसे दोन निळे बिंदू उमटले होते. मी डोळे विस्फ़ारले. ते बिंदू जास्त तेजस्वी झाले.…

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

वा! काय स्टाइल आहे. टोटल फिदा झाले. खूप हसलेही आणि अंतर्मुखही झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! Smile
श्लोक कडक होता!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही आहे ती. प्रत्येक प्रतिसादाखाली दिसते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा आवडला. सावकाश विस्तृत प्रतिसाद देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निव्वळ कम्माल!!!
सुपर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋषिकेश Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त !!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद A.N.Bapat

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गडबडीत वाचल्याने संपूर्ण कळलं नाही पण जितकं कळलं तितकं आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त लिहिलंय हो! एकच नंबर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हायला, खत्तरनाक लिहिलय राव.

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर लिहिलय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !