चिकुर्डे: ताम्रपट ते ताम्रपाषाणयुगापर्यंतचा एक प्रवास!

(अन्य संस्थळावर पूर्वप्रकाशित)
उपोद्घात
या शोधयात्रेच्या कहाणीची खरी सुरुवात झाली ती १९०६ च्या जुलै महिन्यात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे त्यांच्या अस्सल कागदपत्रे जमवायच्या मोहिमेत मजल दरमजल करत पोचले ते कोल्हापूरच्या उत्तरेला ४ मैलांवर असलेल्या एका छोट्याश्या गावंढ्या खेड्यात. त्याचं नाव होतं चिकुर्डे. कृष्णेच्या खोर्‍यात वारणा-मोरणेच्या संगमापासून जवळ असलेले हे गाव. त्या गावात धनगरांची मोठी वस्ती आजही आहे. त्यातल्या गावडे कुळातील एका बाईकडे असलेला ताम्रपट राजवाड्यांना पहायला मिळाला. त्यावेळेस त्याचा ठसा घेणे त्यांना शक्य झाले नाही, परंतु त्याचे वाचन करून तपशीलवार नोंद मात्र त्यांनी करून ठेवली व लगेचच १९०७ मध्ये विश्ववृत्त मधे या ताम्रपटाचे सटीक वाचन प्रकाशित केले.
हा ताम्रपट कुण्या एका मन्नेय राम गावुंड या माहुताला जनमेजय चक्रवर्तिन नामक राजाने दिलेले गावांचे दान व मूलस्थानदेव नामक देवतेला दिलेली दाने नोंदवतो. भावसंवत्सरातील वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमीला हे दान दिले असा उल्लेख आहे. मात्र शकसंवताचा किंवा इतर कुठल्याच कालगणनेचा त्यात उल्लेख नाही.
ताम्रपटाला एकुणात तीन पत्रे होते व एका कडीने ते बांधलेले होते. त्या कडीवर एका चौकोनी मुद्रेवर वराहाचे चिन्ह अंकित होते. वराह हे चालुक्यांचे राजचिन्ह. त्यावरून राजवाडेंनी अनेगुंदीवरून राज्यकारभार करणारा हा जनमेजय राजा चालुक्य वंशातील असावा असे अनुमान काढले. मात्र या ताम्रपटाचा काळ त्यांनी शके ६५८ (इ.स. ७३६) ठरवून मराठी भाषा इतकी मागे जाते असे प्रतिपादन केले.
याचे परिणाम काय? तर हा ताम्रपट वादाच्या भोवर्‍यात सापडला. आधीच ताम्रपटाची कुठलीही 'प्रथमदर्शी प्रत' (eye-copy) नाही आणि त्यात राजवाड्यांसारख्या थोर विद्वानालाही अधूनमधून सबळ पुराव्याअभावी अतिरंजित निष्कर्ष काढायची सवय. त्यामुळे हा ताम्रपट 'तोतया (fake/forged)' आहे अशी त्यावर टीका झाली. गुणे, मार्शल, तुळपुळे यासारख्या भाषातज्ज्ञांनी ही भाषा आठव्या शतकातील नसून किमान ज्ञानेश्वरकालीन (१३व्या शतकातील) आहे , तसेच ही भाषा संपूर्णपणे मराठी नसून त्यात अनेक कानडी शब्द, प्रत्यय इ. आहेत असे ठाम प्रतिपादन केले, या सगळ्या भाषा-काल-निर्णयाच्या लठ्ठालठ्ठीत इतिहासाच्या दृष्टीकोनातून हा ताम्रपट काहीसा विस्मरणात गेल्यासारखा झाला. अनेको ताम्रपटांपैकी एक एवढीच त्याची फुटकळ स्वरूपातील नोंद नंतरच्या अभ्यासकांनी घेतली. समग्र राजवाडे साहित्याच्या एका खंडात त्या लेखाचे पुनर्मुद्रण झाले असले तरी त्यापल्याड त्याचे किती वाचन झाले असेल ही शंकाच आहे.

प्रारंभ
२०११ साली हातात थोडा रिकामा वेळ म्हणून ग्रंथालयात नेहेमीच्या कामाची सोडून इतर पुस्तके चाळताना सहज राजवाडे साहित्याचा हा खंड समोर दिसला. त्यात माझ्या संशोधनप्रदेशाशी संबंधित म्हणजे पंढरपूर, मंगळवेढा व माढा येथील लेखांचे वाचन होते म्हणून घेऊन आले. आणि मग सगळेच लेख वाचावेत म्हणून बसले. चिकुर्डे ताम्रपटाचे वाचन सुरू केले आणि अवाक, आश्चर्यचकित होऊन अथपासून इतिपर्यंत वाचून काढले. कारण त्यातील स्थळवर्णन. सहसा ताम्रपटांमधे दान दिलेल्या गावाच्या, जमिनीच्या चतु:सीमा नमूद केलेल्या असतात. सुरुवातीला देवतास्तुती, राजाची प्रशस्ती, दानाचे स्थळकाळ-दाता-दान दिलेली व्यक्ती या सगळ्याचे तपशील, दानाचे वर्णन आणि शेवटी हे दान अमान्य करणार्‍याला उद्देशून शापवचन असा एक ठराविक साचा असतो. या चतु:सीमा म्हणजे कुठल्या दिशेला कुठलं गाव अथवा नदी आहे अशाच प्रकारचे तपशील सहसा असतात.
मात्र चिकुर्डे ताम्रपट या बाबतीत फार वेगळा आहे. या चतु:सीमा नमूद करताना, फक्त आसपासची गावें, नदी, नाले, टेकड्या एवढेच वर्णन न देता, कुठे देवीचं ठाण आहे, कुठे शंकराचं ठाण आहे, कुठे वीरगळ आहे, कुठे विहिरी आहेत, सर्पमुखे कोरलेल्या शिळा आहेत, कुठे दगडांचे ढीग आहेत तर कुठे शेणाचे ढीग आहेत असे बारीकसारीक तपशील इथे नोंदवलेले मला दिसले. आणि सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते एका 'धूळ-मातीच्या' ढिगार्‍यावर असलेल्या शर-परशु अंकित केलेल्या शिळा आहेत या वर्णनाने. नेहेमीच्या डोंगरापेक्षा वेगळे असे हे टेकाडासारखे ढिगारे म्हणजे पांढरीचे टेकाड असावे हे माझ्या लक्षात आले.
माझ्या संशोधनातल्या भटकंतीत अशा टेकाडांवर अनघड किंवा घडीव शिळा किंवा तशा शिळेने/ शिळांनी बनलेले लक्ष्मी किंवा मारुती किंवा मरीआई किंवा अशाच एखाद्या देवतेचे ठाण असते हे मी अनेको ठिकाणी बघितलं होतंच. शिवाय औरंगजेबाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला तेव्हा त्यावर एक शिळा/चिरा बसवला होता असा उल्लेखही वाचनात आला होता. तेव्हा हे असे दगड म्हणजे उजाड वस्तीचे/पांढरीचे निदर्शक (mound markers) असतात असा माझा निष्कर्ष होता/आहे. आजवर पुरातत्वशास्त्रज्ञांनी या अशा निदर्शकांकडे फारसे लक्ष दिले नाहीये किंवा नोंदही केली नाहीये, पण मी मात्र जिथे जमेल तिथे याची नोंदणी तपशीलवार करते आहे, केली आहे.
तर मूळ मुद्दा चिकुर्डे ताम्रपटातल्या वर्णनाचा. इतके बारकाईने स्थळपरिसराचे वर्णन करणारा, संभवत: पांढरीच्या टेकाडाचे उल्लेख करणारा असा हा लेख दख्खनच्या इतिहासात अभूतपूर्व आहे हे माझ्या प्रकर्षाने लक्षात आले. आणि या लेखाचा नव्याने अभ्यास करायच्या मागे मी लागले.

ताम्रपट, शिलालेख यांचा अभ्यास हा माझा खरंतर खास विषय नव्हे. प्राचीन वसाहतींचे इतिहास तपासताना शिलालेख, ताम्रपट अशा साधनांच्या नोंदींचा वापर करण्यापुरतेच त्याविषयींचे माझे काम आजवर मर्यादित होते. जुने लेख अभ्यासायचे तर संस्कृत, प्राकृत भाषा पक्क्या यायला हव्यात. शिवाय विविध काळांमधली ब्राह्मी, नागरी, देवनागरी अशा लिपींवर प्रभुत्व असणे गरजेचे असते. मला अगदी कामापुरतं संस्कृत-प्राकृत येतं, ढोबळमानाने लिपी वाचता येतात. दख्खनमधे असा अभ्यास करताना थोडंफार हाळ-कन्नड (जुनी कानडी) माहित असणेही आवश्यक असते. तीही मला ओ का ठो येत नाही. तेव्हा मी कधी या विषयात फार रसही घेतला नव्हता. पण एकूण आजवरचे संशोधन बघता एक स्पष्टपणे जाणवले की ताम्रपट असो वा शिलालेख, दख्खनमधे त्यांचा इतिहास-साधने म्हणून मर्यादित स्वरूपात वापर केला गेला आहे. राजे-राजघराणी-वंशावळ्या-राजकीय घडामोडी, राज्यातले प्रशासकीय विभाग व त्यांचे तपशील, गावांची नावे, आर्थिक तपशील, सामाजिक गटांची ढोबळ माहिती व काही धार्मिक संदर्भ असतील तर त्यांचे तपशील एवढ्याच पुरता हा वापर मर्यादित आहे. दख्खनच्या पुरातत्वशास्त्रात जुन्या लेखांचा वापर करून वसाहतींचे इतिहास तपासणे,त्यांचे प्रादेशिक कालानुक्रम व निश्चित करून त्याची कारणे तपासणे, इ, प्रयत्नही क्वचितच झालेत, नाहीच जवळजवळ. चिकुर्डे ताम्रपट मला एक पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून खुणावत होता. आणि अभ्यास करायचा तर तिथे प्रत्यक्ष जाऊन लेखात लिहिलेल्या स्थळवर्णनाशी काही तपशील जुळताहेत का, खरंच ते पांढरीचं टेकाड आजही सापडण्यासारखं आहे का, यात मला रस होता.
खरंतर एवढंच एक उद्दिष्ट सुरुवातीला समोर ठेवून मी आणि माझ्या काही मित्र-मैत्रीण संशोधकांनी एक फील्डवर्क केलं. त्याची ही पाचा प्रश्नांची कहाणी...

स्थळनिश्चिती
पुराभिलेखावर आधारित सर्वेक्षणात सगळ्यात पहिल्यांदा जरूरीचे असते ते म्हणजे ताम्रपटात उल्लेखल्या गेलेल्या स्थळांची ओळख पटवून निश्चिती करणे (Place-name identification). या ताम्रपटामध्ये चिकलवाड, देवुलग्राम, स्ताणपग्राम, आयितग्राम व आमलकग्राम अशी गावांची नावे, वारुवेण्णा नदी, भैरवपाद, रुद्रपाद, भगवतीपाद अशी देवतास्थानांची नावे आदि माहिती आहे. या अशा लेखांमधे येणारी संस्कृत ग्रामनामे ही मुळातल्या देशी नावांचे 'संस्कृतीकरण' करून दिलेली असतात असे तज्ज्ञांचे मत आहे (उदा. इ.स. आठव्या शतकातील एका ताम्रपटात दापोडीचे नाव दर्पपुडिका म्हणून येते)
एकुणात राष्ट्रकूट काळापासूनचे जुने शिलालेख व ताम्रपट बघता असे दिसून येते की दख्खनमध्ये (आणि भारतातल्या बर्‍याचशा प्रदेशांत) गावांच्या नावांमधे फारसा फरक झालेला नाही. नामसाधर्म्यावरून गावे बहुतांशी वेळा विनासायास ओळखता येतात. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात अनेको लेखांमधील स्थळांची निश्चिती ही सेन्सस रेकॉर्ड्स किंवा गॅझेट बघून केली गेली आहे. आता जिथे तपशीलवार टोपोग्राफिक सर्व्हे मॅप्स बघून स्थळनिश्चिती करायची मारामार तिथे प्रत्यक्ष जाऊन, सर्वेक्षण करून स्थळनिश्चिती पक्की करणे ही फारच दुर्मिळ गोष्ट!
चिकुर्डेच्या बाबतीत मात्र याला एक अपवाद आहे. इतिहासाचार्य राजवाडेंचाच. त्यांनी लिहून ठेवले आहे की ऐन पावसाळ्यात हा ताम्रपट वाचल्यामुळे त्यांना आसपासच्या गावांमधून हिंडून स्थळनिश्चिती करता आली नाही. त्यांनी फक्त चिकलवाड = चिकुर्डे आणि आयितग्राम = ऐतवडे एवढीच निश्चिती नमूद करून ठेवली आहे.
इतिहासलेखनामध्ये चिकुर्डे ताम्रपट फारसा महत्वाच न गणला गेल्यामुळे नंतरच्या अभ्यासकांनीही या स्थळनिश्चितीबद्दल आणखी काही काम केले नाही. डॉ. ठोसर यांनी आमलकग्राम = अळवली (ता.खानापूर, जि. सांगली) व स्ताणपग्राम = ठाणेगाव (ता, पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी दोन जागांची ओळख पटवायचा प्रयत्न केला. मात्र चिकुर्डेच्या आसपासची ही 'सीमेवर' असलेली गावे आहेत हा निकष त्यांनी न पाळताच ही निश्चिती केल्याने त्याला फारसा अर्थ नाही.
तेव्हा नकाशे हातात घेऊन परत एकदा स्थळनिश्चिती करण्यासाठी ठिय्या मारला. चिकुर्डेच्या आसपास असलेली गावे व ताम्रपटात दिलेल्या दिशांची पडताळणी करून पुढीलप्रमाणे संभाव्य स्थळनिश्चिती केली. चिकलवाड = चिकुर्डे, देवुलग्राम = देवर्डे, स्ताणपग्राम = थानापुडे, आमलकग्राम = मांगले, आयितग्राम = ऐतवडे बुद्रुक, चिकलग्राम = मांगलेच्या उत्तरेस असलेली चिखलवाडी व वारुवेण्णा म्हणजे या गावांच्या दक्षिणेला असलेली वारणा नदी. ऐतवडे बुद्रुक आणि खुर्द अशी दोन गावे आहेत परंतु ताम्रपटात दिलेल्या दिशांना प्रमाण मानता ऐतवडे बुद्रुक हे आयितग्राम असावे अशी संभावना जास्त आहे.

सर्वेक्षण
यातील चिकुर्डे, देवर्डे, मांगले, ऐतवडे बुद्रुक (हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं गाव), ऐतवडे खुर्द, थानापुडे आणि या सगळ्या परिसराचाच भाग असणारे करंजवडे (याचा उल्लेख ताम्रपटात नाही) या सात गावांमध्ये व आसपासच्या परिसरामध्ये एक छोटेसे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. तेथील पांढरीची टेकाडे, खापरे, शिल्पे, वीरगळ, सतीशिळा, सर्पशिळा, मंदिरे इत्यादी सर्व प्रकारच्या पुरावशेषांची खानेसुमारी करून या गावांचे सांस्कृतिक कालानुक्रम, त्यांच्या वसाहतींची प्राचीनता निश्चित करण्यात आली. या कालानुक्रमांचा थोडक्यात तपशील पुढील प्रमाणे

चिकुर्डे: ताम्रपाषाणयुग - सातवाहन काळ - यादव काळ - मध्ययुग - अर्वाचीन/ सद्यकाळ (अंदाजे इ.स. पू. ३००० ते आजपर्यंत)
देवर्डे: वरीलप्रमाणेच
मांगले: वरीलप्रमाणेच
थानापुडे: सातवाहन काळ ते आजपर्यंत (सुमारे इ,स. पहिले शतक ते आजपर्यंत)
ऐतवडे बु|| : वरीलप्रमाणेच
ऐतवडे खु|| : वरीलप्रमाणेच
या सहाही गावांमध्ये पांढरी सध्याच्या गावाखालीच आहेत. मात्र करंजवडे गावात अशी पांढर नाही. त्याच्या हद्दीतल्या शिवारांमधे एका महालक्ष्मीच्या देवळाजवळ, ओढ्यापल्याड, पूर्वी एक पांढर होती अशी माहिती मिळाली. तिथे भेट दिली असता आज तिथे कसलेच अवशेष नाहीत परंतु देवळाशेजारच्या शेतात सातवाहनकालीन एक खापर मिळाले. ही 'महालक्ष्मी'ची मूर्ती १५-१६व्या शतकातील शैव मूर्ती असून तिला साडीचोळीने व मुखवट्याने सजवण्यात आलेले आहे.

याशिवाय चिकुर्डेच्या हद्दीतच पण गावठाणाबाहेर वायव्येला धनगरांचे दैवत विठ्ठल-बीरदेव / विठोबा-बिरोबा यांचे एक मोठे मध्ययुगीन मंदिर आहे. इथला विठोबा मात्र पंढरीच्या विठुरायासारखा वैष्णवरूप धारण करून 'विटेवरी उभा' नाही तर चक्क त्याच्या आदिम धनगरी अनघड तांदळा स्वरूपात आहे. हा विठोबा तिथे कोल्हापूरजवळच्या कोडोली गावातून मजल-दरमजल करत, गावोगाव थांबत कसा आला त्याची मोठी सुरस आणि पाल्हाळिक कथा तिथल्या पुजार्‍याने सांगितली. मजा म्हणजे त्याने ज्या ज्या गावांची नावे घेतली ती सर्व गावे मला सातवाहनकालीन वसाहती/ साईट्स म्हणून माहित आहेत. (म्हणजे विठोबाचा प्रवास तेवढा जुना नाहीये तर प्राचीन काळापासून असलेली गावे कशी मिथककथांमधे सामील होतात त्याचे हे मनोरंजक उदाहरण वाटले. ही प्रक्रिया सखोलपणे चिकित्सा करून अभ्यासणं हा एक संपूर्णपणे वेगळाच मोठ्ठ्या संशोधनाचा विषय होईल.) तसेच इथे बिरोबाला नवसाचे मेंढे करून वाहतात. मात्र या धनगरांकडे विचारणा केली असता त्यांनी त्या ताम्रपटाविषयी कधीच काहीच ऐकलेले नाही असे निदान आम्हाला तरी सांगितले.

मात्र या सर्वेक्षणात ताम्रपटात नमूद केलेल्या ठिकाणी/ दिशेला सर्पशिळा, इतर कोरलेले दगड इ. मिळाले नाही. पण त्यात फारसे आश्चर्याचे काही नाही. कारण असे अवशेष हलवून एका जागेपासून दुसरीकडे नेले जाऊ शकतात/ भंगले म्हणून त्या दगडांचा पुनर्वापर होऊ शकतो इ. इ. तसेच लेखात उल्लेखलेल्या विहिरी, डोंगर, काही देवतास्थाने इ. वेळेअभावी तपासून बघता आली नाहीत. यासाठी आणखी सखोल आणि काही दिवस देऊन सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

विश्लेषण-निष्कर्ष
आता या छोटुश्श्या फील्डवर्कमधून काय मिळालं आणि त्याचा काय अर्थ लावायचा? कशी सुसंगती लावायची?
अर्थातच सामाजिक शास्त्रांमध्ये दोन अधिक दोन चार इतकं सरळसोट प्रश्नोत्तर नसतंच कधी. पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासात मिळालेली उत्तरे ही तुकड्यांतुकड्यात असतात, त्यांचा वरवर बघता एकमेकांशी संबंध असतोच असे नाही. शिवाय तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचीच फक्त नव्हेत तर दुसरेच प्रश्न उभी करणारी 'उत्तरे' मिळायचीच शक्यता जास्त असते. एका प्रश्नाचे उत्तर हे अनेको पुढचे प्रश्न आणि विविध दिशेंनी जाणार्‍या शोधवाटांची किमान झलक असेच सहसा असते. चिकुर्डे फील्डवर्क याला अपवाद नाही.

या फील्डवर्कचा अगदी सुरुवातीचा उद्देश होता तो म्हणजे ताम्रपटात उल्लेखलेली दोन पांढरीची स्थळे प्रत्यक्षात सापडताहेत का हे तपासून बघणे. या दोन उल्लेखांचा तपशील पुढीलप्रमाणे :
- भगवतीपादाच्या (देवीचे ठाण) नजीक एक श्वेत-वालु-म्रितिका असलेले शेत आहे.
आता हा लेख कानडीमिश्रित मराठीत असला तरी बर्‍याच ठिकाणी तो 'संस्कृतप्रचुर' आहे. संस्कृतमध्ये 'श्वेत-वालु-म्रितिका' असा कुठलाच वाक्प्रचार नाही. पण मराठीत पांढरी माती याचा निश्चित असा एक अर्थ आहे आणि तो म्हणजे (जुन्या) वस्तीची जागा. (माझ्या इतरत्र भटकंतीच्या अनुभवांनुसार पांढरी माती म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट चे कंकर/ डिपॉझिट्स असलेली जागाही असू शकते. रंगाला खरंचच पांढरी माती असते. पण इथे विचारणा केल्यावर तसे डिपॉझिट्स परिसरात असल्याची माहिती मिळाली नाही, तेव्हा मग वस्तीची जागा याच अर्थाने मी ह्याची संगती लावली).

- वराहतराह नामक ओढ्याच्या उत्तरेला धूळमातीचे ढिगारे (रजम्रितिका) असून त्यावर शर आणि परशु अंकन केलेले पाषाण आहेत
इथे मला ती रजम्रितिका की रज-त-म्रितिका असेल असा एक प्रश्न पडला - म्हणजे रजतम्रितिका असेल तर परत पांढरीमाती हाच अर्थ निघतो. आपल्याकडे ताम्रपटाची प्रत्यक्षदर्शी प्रत नसल्याने हे सगळे फक्त 'जर-तारी' कयासच राहणार.
तर या दोन्ही उल्लेखातील एक संभाव्य जागा मिळाली. करंजवडेच्या शिवारांत असलेली महालक्ष्मी आणि तिच्या शेजारचे शेत (जिथे पूर्वी पांढरी होती) हे भगवतीपाद आणि तिच्या नजीकचे श्वेत-वालू-म्रितिका असलेले शेत असण्याचा दाट संभव आहे असा निष्कर्ष आम्ही काढला. मात्र धूळमातीच्या ढिगार्‍यांचा किंवा शरपरशुवाल्या शिळांचा पत्ता लागला नाही.
अशा पद्धतीने संशोधनाच्या अगदी प्राथमिक उद्दिष्टात आम्ही काहीसे यशस्वी झाले असलो तरी संशोधनाचे निष्कर्ष एवढ्यावर संपत नाहीत.

या संशोधनाने या ताम्रपटाच्या कालनिश्चितीच्या घोळाचं समाधानकारक उत्तर दिलं का? हा नक्की १३व्या शतकातला आहे का त्याही नंतरचा आहे? अस्सल आहे की नकल? बर्‍याचशा संशोधकांच्या मनात साहजिकपणेच पहिल्यांदा हा प्रश्न उभा राहील. कारण ताम्रपटाच्या अस्सलतेवरच सहसा त्याचे इतिहाससाधन म्हणून मूल्य ठरवले जाते.
तर या सर्वेक्षणातून कालनिश्चितीचा गोंधळ समाधानकारक सोडवता आला नाही. बाकी भाषा व ताम्रपटाचे इतर स्वरूप बघता त्याला इ.स. १३व्या शतकातील मानण्यास प्रत्यवाय नसावा. पण जर भगवतीपाद हे ठिकाण बरोबर ओळखलं गेलं असेल तर तिथली मूर्ती मात्र इ.स. १५-१६व्या शतकातील, म्हणजेच मध्ययुगाच्या सुरुवातीची, आहे. अशा स्थितीत मग लेखाचा काळ त्या मूर्तीनंतरचा मानावा लागेल. त्या मूर्तीआधी तिथे आणखी प्राचीन, पूर्वीची मूर्ती असल्यास कळण्याचा मार्ग नाही. किंवा मग भगवतीपादाची स्थळनिश्चिती चुकलेली असू शकते.

एक गंमतशीर बाब म्हणजे हा ताम्रपट तीन ताम्रपटांच्या 'संचा'तील एक आहे असे दिसते. मरमुरी ताम्रपट व मिरज ताम्रपट हे उरलेले दोन. तीनही वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळ्या काळी वाचन करून प्रसिद्ध केलेले हे ताम्रपट भावसंवत्सराच्या ज्येष्ठ व वैशाख महिन्यात दान दिलेले दिसतात. मरमुरी व चिकुर्डे एकाच तिथीला (वैशाख कृ. अष्टमी) दिले गेले आहेत, परंतु मरमुरी सोमवार व चिकुर्डे मंगळवार असा वारनिर्देश करतात. मरमुरी व मिरज हे चालुक्य राजा वीर सत्याश्रय याचे आहेत तर चिकुर्डे चालुक्य राजा जनमेजय याचा. हा जनमेजय चालुक्य तुलनेने अप्रसिद्ध असून त्याचे आणखी फक्त तीन ताम्रपट ज्ञात आहेत. तीन्ही कर्नाटकामधून मिळाले आहेत.
मरमुरी ताम्रपट हा परत कुण्या एका राम गावुंड नामक माहुताला दान दिलेला आहे. हा आणि चिकुर्डेचा राम गावुंड एकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिरज ताम्रपटही अन्य एका माहुताला दान दिलेला आहे - त्याचे नाव सैगोलपा.
या तीनही ताम्रपटांमधील स्थळवर्णनात, भाषेत आणि लेखनशैलीत कमालीचे साम्य आहे. कदाचित एकाच 'लेखकु' ने ते रचले असावेत अशी शंका येण्याएवढे. तसेच या स्थळवर्णनशैलीचे जनमेजय चालुक्याच्या अनंतपूर ताम्रपटातील वर्णनाशीही साम्य आहे.
चालुक्यांच्या काळातील भावसंवत्सरे पडताळून बघता मरमुरी ताम्रपटाचा काळ शके ११९६ (इ.स. १२७४) शी महिना-तिथी-वाराने तंतोतंत जुळतो. राजवाडेंनी जरी हे वर्ष मराठीची प्राचीनता मागे ओढण्यासाठी नाकारले असले तरी नंतरच्या अभ्यासकांनी चिकुर्डेची केलेली ही कालनिश्चिती खूपच संभवनीय आहे. मात्र तिथी-वार जुळत नसल्याने त्याच्या अस्सलतेवरचे पडलेले प्रश्नचिन्ह तसेच आहे. आणि यामुळेच इतिहासलेखनात, विश्लेषणात या ताम्रपटाला फारसे मूल्य नाही.
माझे एक पुरातत्वज्ञ म्हणून असे प्रतिपादन आहे की अस्सल-नकली हा अशा पुराव्यांच्या उपयुक्तता ठरवण्याचा एकच निकष असणे म्हणजे संशोधनाच्या कक्षा मर्यादित करून टाकणे असते. ताम्रपट जरी नकली असला तरी इथे त्याचे मूल्य कमी होत नाही. कारण ज्या बारकाईने या लेखात आसपासच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक अवकाशाचे तपशीलवार वर्णन आलेले आहे, त्यात कशाप्रकारने नदी-नाले-डोंगर, शेते-शिवार-विविध प्रकारच्या जमिनी याचबरोबर देवतांची ठाणे, शिल्पे, कोरीव दगड, पांढरीची टेकाडे, शिल्पे, विहिरी इ. मानवनिर्मित गोष्टींचाही समावेश आहे, अवकाशातल्या महत्वाच्या खुणा म्हणून या गोष्टी ओळखल्या जातात (landmarks and/or boundary markers) हे जाणून घेणे व त्यातून त्या लेखाचे रचनाकार आणि वापरकर्ते यांच्या आसपासच्या परिसराकडे बघण्याचे सांस्कृतिक दूष्टिकोन समजावून घ्यायचा प्रयत्न करणे हा अतिशय रोचक असा अभ्यास ठरतो. ज्याला सैद्धांतिक पुरातत्त्वीय परिभाषेत landscape archaeology असे म्हणतात त्या दृष्टीने चिकित्सा करण्यासाठी असे पुरावे अनमोल ठरतात. जरी ते मध्ययुगात बनवलेले नकली दस्तावेज असले तरी. शिवाय हे असे नकली दस्तावेज का बनवले गेले असावेत याचाही अभ्यास रोचक ठरतो. प्रत्येक वेळेस फक्त जमीनीच हक्क शाबूत रहावा, नव्याने मिळावा म्हणूनच नव्हे तर इतरही सामाजिक आर्थिक पैलू त्यात असू शकतात. लेखाबरोबरच तत्कालीन इतर पुरावे, मौखिक इतिहास, पुरातत्वीय अवशेष असे सगळे साकल्याने अभ्यासले तर अशा कारणांचा माग लागू शकतो (मी अशाच प्रकारचे आणखी एक काम केले आहे. पण ते अजून प्रकाशित झाले नसल्याने इथे संदर्भ देत नाही. प्रकाशनाला गेले की त्यावरही एक लेख पाडेन..)
त्यामुळे ताम्रपटांकडे बघताना फक्त अस्सल की नकल हा मुद्दा न बघता त्याचा साकल्याने विचार करावा, त्यातील मजकुरातील 'सब-टेक्स्ट' बघणे गरजेचे आहे असे मी इथे आग्रहाने प्रतिपादन करू इच्छिते.

या ताम्रपटात अभूतपूर्व उल्लेख असलेली बाब म्हणजे पांढरीची माती अथवा टेकाडे. पारंपरिक भारतीय लिखाणातील हा ज्ञात दुसरा तर जुन्या लेखांमधे मिळालेला हा असा पहिलाच पुरावा होय. या आधी भीमा-माहात्म्य नामक अप्रकाशित संस्कृत ग्रंथात धूळखेड नामक कर्नाटकातील गावात आढळणार्‍या नवाश्मयुगीन राखेच्या ढिगार्‍यांच्या अस्तित्वाचा (हे दख्खनच्या ताम्रपाषाणयुगाला समकालीन असलेले नवाश्मयुगीन समाज मोठ्या प्रमाणावर खिल्लारे बाळगत असत व शेणाचे ढिगारे जमवून जाळत असत. त्यामुळे त्यांच्या वसाहत स्थळांजवळ मोठेमोठे राखेचे ढिगारे आढळतात) कार्यकारणभाव दक्षयज्ञ झाला तीच ही जागा असे मिथक वापरून स्पष्ट केला आहे हे मी अन्यत्र एका शोधनिबंधात सप्रमाण दाखवून दिले आहे. मात्र इथे कुठल्याही मिथकाचा, कथेचा आधार न घेता भवतालच्या परिसरातील एक मोठी खूण अशा तर्‍हेने या अवशेषांची दखल घेतली गेली आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. मरमुरी ताम्रपटातही असाच पांढरीचा उल्लेख आहे. तसेच जनमेजय चालुक्याच्या अनंतपूर ताम्रपटाच्या इंग्लिश भाषांतरातही 'mound' असा परिसरातील एका स्थळाचा उल्लेख केलेला आहे. मात्र आजवर या शब्दाची चिकित्सा/छाननी झालेली नाही.
पुरातत्वीय सर्वेक्षणाची आखणी करताना कलोनियल/ब्रिटिश काळातील कागदपत्रे, नकाशे, प्रवासवर्णने व इतर नोंदींचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कारण पाश्चात्य परंपरेनुसार परिसराचे, प्रदेशाचे सर्व बारीकसारीक तपशील, नैसर्गिक - सांस्कृतिक खुब्या इ, दस्तावेजामध्ये साग्रसंगीत नमूद केलेले असते. आपल्याकडे पाश्चात्य परंपरेसारखी तटस्थ परिसरवर्णनाची, भौगोलिक वर्णनाची परंपरा नाही हे खरेच, परंतु तरीही वेगळ्या संदर्भात का होईना पण पारंपरिक भारतीय साहित्यात असे उल्लेख असू शकतात याचीही जाणीव दुर्दैवाने आजपर्यंत पुरातत्वशास्त्रात फारशी कुणाला झालेली आढळून येत नाही. किंबहुना त्या दृष्टीने कधी साहित्य- जुने लेख वाचलेच गेले नाहीत हे खरे!
मात्र वरील दोन उदाहरणे बघता मी असे ठाम प्रतिपादन करू इच्छिते की सर्वेक्षण आखणी करण्याच्या पद्धतीमध्ये (survey methodology) त्यात्या प्रदेशाशी संबंधित सर्व प्रकारच्या पारंपरिक साहित्याच, लेखांचा, मध्ययुगीन कागदपत्रांचा सखोल आढावा घेऊन त्यात असे - म्हणजे पुरातत्वीय अवशेषांकडे निर्देश करणारे - तपशील आले आहेत का ही तपासणी करणे गरजेचे आहे. वरील उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की किमान पूर्वमध्ययुगापासूनचे - साधारण यादवकाळापासून -समाज त्यांच्या आसपास असलेले पुरातन अवशेष, पांढरीची टेकाडे याविषयी, त्यांच्या इतर नैसर्गिक भौगोलिक घटकांपेक्षा असलेल्या वेगळेपणाविषयी जागरूक होते. (माझ्या एका अन्य लेखात गावांची नावे ७-८व्या शतकापासून कशी संभवतः तिथे मिळणारे जुनी खापरे अथवा पांढरी यावर आधारित आहेत याचे सप्रमाण विवेचन केले आहे).
दख्खनसारख्या अर्धदुष्काळी प्रदेशात असे दिसून येते की अनेको गावे/ वसाहती सहसा एकाच जागेवर किंवा त्याच परिसरात जवळपास जागा बदलत हजारो वर्षे अस्तित्वात आहेत. मध्ययुगात किंवा पूर्वमध्ययुगात (early medieval) काळात महत्वाची गणली जाणारी स्थळे खूप प्राचीन असण्याचा संभव असतो हेही मला भीमा खोर्‍याच्या सर्वेक्षणात सप्रमाण लक्षात आले आहे. आजपर्यंत सर्वेक्षण आखणी करताना भौगोलिक व प्रादेशिक घटक, पाणी-जमीन इ, ची उपलब्धता/अभाव, दळणवळणाच्या मार्गांशी संबंध या व अशा घटकांना प्रामुख्याने लक्षात घेतले जाते. प्राचीन साहित्याचा वापर फक्त गावांची नावे व त्यांचे प्रशासकीय स्थान, व्यापाराशी संबंध यांचे उल्लेख आहेत का हे जाणून घेण्यासाठी केला जातो. पण त्यापल्याड जाऊन असे प्राचीन, पूर्वमध्ययुगीन व मध्ययुगीन दस्तावेज तपासून पुरावशेषांचे तपशील आले आहेत का ते तपासून त्या माहितीचा अंतर्भाव जाणीवपूर्वक सर्वेक्षण आखणीतील आधारभूत घटकांमध्ये केला जाणे गरजेचे आहे.

या सगळ्यात शेवटी - ज्याचा या ताम्रपटाच्या संशोधनाशी थेट संबंध नाही, ज्याच्या शोधासाठी मी माझ्या मूळ संशोधनक्षेत्रात वणवण भटकले पण फारसं काही हाताला लागलं नाही, त्याची गाठभेट 'भलत्या वेळी, भलत्या मेळी, असता मन भलतीचकडे' अशा अवस्थेत इथे पडली..
मांगलेतल्या एका चौकातून सहज म्हणून माझ्या मित्राने एक खापर उचलले, तर ते दख्खनच्या ताम्रपाषाणयुगातील सुरुवातीच्या कालखंडातील - माळवा कालखंडातील - खापर निघाले. लखलखीत गेरू रंगाच्या खापरावर काळ्या रंगाने काढलेली सुंदर नक्षी असलेले. आणि चिकुर्डे आणि देवर्डेमधून ताम्रपाषाणयुगाच्या अंतकाळाची, उत्तरजोर्वे कालखंडाची, छोटीछोटी खापरे मिळाली. आजवर इनामगावचे उत्खनन व भीमा खोर्‍यातल्या मला व माझ्या आधीच्या इतर काही संशोधकांना मिळालेल्या स्थळांशिवाय उत्तरजोर्वे खापरे बाहेर कुठेच कधीच मिळाली नव्हती. ती इथल्या सुपीक, उत्तम पाऊस आणि बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या प्रदेशांतून मिळाली हा अतिशय महत्वाचा शोध आहे. आपल्याला पश्चिम दख्खनच्या इतर प्रदेशांतही बारकाईने सर्वेक्षण करण्याचा आणि त्यातून मिळणार्‍या माहितीच्या संदर्भात या अंतकाळाचा एकदा साकल्याने फेरविचार करायची नितांत गरज आहे या माझ्या आधीपासूनच्या गृहितकावर या शोधाने शिक्कामोर्तब झाले.

उपसंहार
तर अशी ही आमच्या दोन दिवसांच्या फील्डवर्कची पाचा प्रश्नांची कहाणी.. ती साठां उत्तरी सुफळ संपूर्ण नाहीच नाही. साठां प्रश्नांना जन्म देणारी मात्र दिसतेय.
एका ताम्रपटातल्या नोंदीची सहज म्हणून पडताळणी करायला निघाल्यावर त्या बिंदूपासून विविध दिशेला शोधवाटा, त्यांना फुटणार्‍या आणखी फाट्यांसकट, दिसलेल्या आहेत. त्यातल्या काही महत्वाच्या वाटांचा इथे फक्त उल्लेख केला आहे.

माझ्या दृष्टीने यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुराभिलेखांच्या अभ्यासाची, विश्लेषणाची मी नव्याने संशोधनपद्धती मांडायचा प्रयत्न करते आहे आणि त्या दिशेने हे काम हे दुसरं भक्कम पाऊल आहे. (पहिले काम अजून अप्रकाशित आहे). वरती लिहिल्याप्रमाणे मी पुराभिलेखतज्ञ नाही पण माझ्या मते निदान पुरातत्वज्ञांनी या इतिहाससाधनांचा वापर त्यातील ढोबळ तपशील वापरण्याच्या पल्याड जाऊन केला पाहिजे. लेखांमध्ये उल्लेखलेल्या स्थळांना भेट देऊन सर्वेक्षण करून स्थळ निश्चिती करणे तसेच त्या वसाहतींचे सांस्कृतिक कालानुक्रम/इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच या लेखांमध्ये आलेली माहिती त्यात्या स्थळांतील पुरातत्वीय अवशेष, मौखिक इतिहास, दंतकथा (रामायण-महाभारत-पुराणातल्या दैवी कथा अशी मिथके सोडून), तिथल्या सामाजिक-धार्मिक-आर्थिक परंपरा यांच्या संदर्भात पडताळून बघितली तर आपल्याला त्या लेखांमधे असलेल्या empirical माहितीपलिकडे जाऊन काही तथ्ये उजेडात आणता येतात. वरती नमूद केलेल्या या विविध इतिहाससाधने व परंपरा यांची मिळवणी त्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीतरी जास्त होते. मात्र ती मिळवणी कशी करायची याची अभ्यस्त व सुजाण दृष्टी हवी हे तितकेच खरे!

भरतवाक्य!
Archaeology, after all, is nothing but an exercise in common sense!! Wink

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

या संशोधनात माझ्याबरोबर सहभागी झालेले माझे संशोधक मित्र-मैत्रिणी आहेत - डॉ. मंजिरी भालेराव, डॉ. अंबरीश खरे, श्री. आनंद कानिटकर व सौ. कल्पना रायरीकर

विशेष आभारः श्री. शहाजी पाटील आणि कुटुम्बीय, चिकुर्डे, ता. वाळवा, जिल्हा सांगली.

मूळ इंग्लिश शोधनिबंध - Revisiting Chikurde Copperplates: An Archaeological Reconnaissance, Pratna Samiksha, New Series, 6:7-14 (2015)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

माझ्या दृष्टीने यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुराभिलेखांच्या अभ्यासाची, विश्लेषणाची मी नव्याने संशोधनपद्धती मांडायचा प्रयत्न करते आहे आणि त्या दिशेने हे काम हे दुसरं भक्कम पाऊल आहे. (पहिले काम अजून अप्रकाशित आहे). वरती लिहिल्याप्रमाणे मी पुराभिलेखतज्ञ नाही पण माझ्या मते निदान पुरातत्वज्ञांनी या इतिहाससाधनांचा वापर त्यातील ढोबळ तपशील वापरण्याच्या पल्याड जाऊन केला पाहिजे. ~~~~

-
सामान्य लोकांनीही उत्सुकता ठेवायला हवी. जाणून घेण्याची वृत्ती वाढवायला हवी. जिथे लेणी वगैरे आहेत त्या सह्याद्रीच्या आसपासच्या गावातले म्हातारे लोकही "पांडवांनी एका रात्रीत अज्ञातवासात असताना बांधायला घेतली मग कोंबडा आरवला ,दिवस उजाडेल समजून अर्धवट सोडली" छाप कथा सांगतात. पुढची पिढी तेच कित्ता गिरवते. उगाच त्याचा विरोध नको म्हणून. ते पांढरी टेकाडं ,राखेचा ढीग लाक्षागृहच असणार. एकदा तैलबैला गावात दुपारीच पोहोचलो. एक म्हातारा झोपडीच्या आडोशाला बाजल्यावर बसलेला दिसला. उन्हाचं जरा बसा म्हटला. लेणी गुहांचा विषय निघाल्यावर एकदम पुलकेशिन पहिला दुसरा सांगू लागला. शिक्षक असताना शिकवलय वगैरे. अगदी बरं वाटलं होतं ऐकून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय इंटरेस्टींग लेखन. कृपया अजून लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यांतले अनेक तपशील समजून घेताना कष्ट पडले; ही तक्रार नव्हे. म्हणून एक विनंती आहे की इतिहासाचं संशोधन करताना जी साधनं वापरली जातात त्याबद्दल लेख लिहिशील का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे एक पुस्तक पाहा-
तगर ते तेर पुस्तकाची पिडीएफ फ्री डाउनलोड लिंक ( 8.7 MB )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. मी ऐसीअक्षरे वर फार नियमित नसल्याने आज प्रतिक्रिया बघितल्या.
अदिती, तुला नक्की काय काय तपशील समजायला कठीण गेले हे सांगशील का? म्हणजे त्या अनुषंगाने मी एक विवरणात्मक टीप लिहेन. कारण इतिहासाची साधने असं गूगलल्यावर एक सर्वसाधारण तपशील तुला नक्की मिळेल. त्यापेक्षा तुला काहीतरी नेमकं विचारायचं असेल असं वाटतं आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. या ताम्रपटाच्या अर्थाचा शोध घेताना निर्माण झालेले प्रश्न माझ्यासारख्या वाचकांपर्यत पोचतात. मात्र पुरातत्त्वशास्त्राबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे आणि त्याकाळच्या इतिहासाबद्दल फार माहिती नसल्यामुळे चटकन संपूर्ण परिप्रेक्ष्य आणि संदर्भ कळत नाहीत.

उदाहरणार्थ - ११९६ ही तारीख बरोबर जुळली, मात्र राजवाडेंनी ती काही शतकं आधी ओढलेली होती, हे विधान समजलं. मात्र राजवाडेंनी ती आधी का ओढली? त्यांनी त्या तारखेसाठी समर्थन काय दिलं होतं? ही अशी तारखा अलिकडे ओढण्याची परंपरा आहे का? वगैरेबाबत सामान्यांसाठी काही लिखाण केलंत तर आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, तारखा मागे वगैरे ओढण्याची काही परंपरा वगैरे नाहीये. संवत्सराचे नाव, तिथी, वार हा मेळ शोधून (जर इतर काही कालगणनेचे क्लूज दिले नसतील तर) कालगणना निश्चित करतात. एकूण साठ संवत्सरे असतात. ही साठ संवत्सरे आवर्ती प्रकाराने भारतीय कालगणनेत येतात. भाव संवत्सर प्रत्येक साठ वर्षांनी येणार. मग राजवाड्यांनी ६व्या ते ११व्या शतकात येणार्‍या दहा भावसंवत्सरांची तिथी वार इ. माहिती पडताळली. त्यात शके. ६५८ बसत होते. त्याचवेळेस शके ११९६ पण बसते हे त्यांना माहित होते. शिवाय जनमेजय चालुक्याचे इतर लेख राईस या संशोधकाने १२व्या शतकातले असावेत असे आधीच प्रतिपादन केले होते. पण ते ठाम विधान स्वरूपात नसल्याने राजवाड्यांना ते मान्य नव्हते. त्यांच्या मते ही मराठी पंढरपूरच्या चौर्‍याऐंशीच्या शिलालेखापेक्षा आणि पाटणच्या शिलालेखापेक्षा (दोन्ही १२वे शतक इ.स) किमान चारपाचशे वर्षे जुनी आहे (का ते मात्र त्यांनी लिहिले नाहीये) म्हणून त्यांच्यामते शके ६५८ हीच तारीख असावी. मात्र त्यांच्याच शब्दांत 'याहून काही बलवत्तर कारणें पुढे आल्यास, हे मत बदलण्यास अडचण पडणार नाही'...
खरंतर जनमेजय नावाचा कुणीच चालुक्य राजा त्यांनी ठरवलेल्या काळात नाही तेव्हा विजयादित्य हा राजाच जनमेजय या नावानेही ओळखला जात असे अशा कोलांट्या उड्या त्यांना माराव्या लागल्या आहेत. त्यासाठी कुठलाही पुरावा मात्र नाही
मात्र मराठी इतकी जुनी आहे असे प्रतिपादन करण्यामागे कदाचित स्थानिक अस्मिता, राष्ट्रीय अस्मिता वगैरेचाही नकळत प्रभाव असावा असं मला कधीकधी वाटतं. त्यासाठी राजवाड्यांची मराठी विषयक भूमिका, त्यांचे इतर संशोधन साकल्याने वाचायला हवे तेव्हाच असे काही विधान करता येईल की नाही हे कळेल. सध्या हे सगळं 'लष्करच्या भाकर्‍या' प्रकारात मोडतं म्हणून बाजूला ठेवलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदाहरणार्थ - ११९६ ही तारीख बरोबर जुळली, मात्र राजवाडेंनी ती काही शतकं आधी ओढलेली होती, हे विधान समजलं. मात्र राजवाडेंनी ती आधी का ओढली? त्यांनी त्या तारखेसाठी समर्थन काय दिलं होतं? ही अशी तारखा अलिकडे ओढण्याची परंपरा आहे का?

शेवटी हे सर्व तर्कशास्त्रच आहे.खरा इतिहासकार { आणि वैज्ञानिक/गणिती }उगाच अस्मिताच्या ( अहम् हो)मागे लागत नाही. हट्ट करत नाही. कधीकधी कोणता समाज /गट/शासक दुखावले जाऊ नये अथवा त्यांचा रोष होऊ नये म्हणूनही इतिहासकार सत्य लपवणे/अर्धेच सांगणे/ विजेड करणे असेही करत असतील.त्याची चर्चा करत नसतील.नास्तिक आणि शूर लोकांपेक्षा मला वाटतं धार्मिक,श्रद्धावान अथवा घाबरट लोकांनी इतिहासाच्या साधनात अधिक भर घातली आहे.लेखात दोन घटनांचा उल्लेख असला तर तारीख पक्की करण्यात अडचण पडत नसावी.राजे लोक अचानक आपले नाव बदलत असतील आणि लेखक त्याच्याच 'पदरी' असल्याने त्याच नावाचा उल्लेत करत असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी! फार आवडला लेख. अजून लिहा. पांढरीच्या टेकाडांविषयी तुमचं संशोधन काय आहे, ते जाणून घ्यायला आवडेल.

मात्र राजवाडेंनी ती आधी का ओढली?

* राजवाडे प्रखर राष्ट्रवादी होते. स्वदेशाभिमान आणि स्वभाषाभिमान हा त्यांच्या संशोधनाचा पायाच होता.
* बीम्स वगैरे व्याकरणकारांनी मराठीचा उगम १३ व्या शतकात झाला असे म्हटले होते (महानुभाव साहित्य त्यांना ज्ञात नव्हते.) राजवाड्यांनी हे खोडून काढत मराठीचा उगम शके ४०० च्या सुमारास झाला असे मत मांडले. चिकुर्ड्याच्या ताम्रपटाहून प्राचीन एक मंगळवेढ्याचा ताम्रपट (शके ४०० समथिंग) होता. तो सर्वात जुना मराठी लेख असे त्यांचे म्हणणे होते. अनेक शतके मराठी ही शिष्ट, नागर, राजमान्य, सर्वोत्कृष्ट भाषा म्हणून प्रचलित होती आणि संस्कृत ते अर्वाचीन मराठी ही अप्रतिहत परंपरा आहे हा त्यांचा सिद्धान्त होता. ते सिद्ध करण्यासाठी ज्ञानेश्वरीकालीन मराठीचे व्याकरण पाणिनीच्या व्याकरणाच्या धर्तीवर लिहिणे (त्यांना सापडलेली ज्ञानेश्वरीची प्रत ही सर्वात जुनी - मूळ प्रत असून त्यातील मराठी भाषा ज्ञानेश्वरांच्या काळी प्रचलित होती असे त्यांचे ठाम मत होते), ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे संस्कृत भाषांतर करणे असे बरेच खटाटोप त्यांनी केले.

मात्र मराठी इतकी जुनी आहे असे प्रतिपादन करण्यामागे कदाचित स्थानिक अस्मिता, राष्ट्रीय अस्मिता वगैरेचाही नकळत प्रभाव असावा असं मला कधीकधी वाटतं.

नकळत/ कदाचित नाही - नक्कीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही प्रश्न, शंका-कुशंका वगैरे...

त्यातल्या गावडे कुळातील एका बाईकडे असलेला ताम्रपट राजवाड्यांना पहायला मिळाला.

या गावडे कुळापैकी कोणाला शोधायचा प्रयत्न तुम्ही केला का?

वरती तुम्ही तीन ताम्रपटांचा उल्लेख केला आहे, आणि यातील दोन गावुंड या व्यक्तीशी संबंधित आहेत. हे तिन्ही राजवाड्यांच्या काळात/आधी सापडले होते का? जर हो, तर यावर त्यांनी काही मत व्यक्त केले होते का नाही?

पांढरी म्हणजे नक्की काय हे मला अजून नीटसं कळलेलं नाही. वस्तीमुळे निर्माण झालेल्या खुणा वगैरेला तुम्ही पांढरी म्हणत आहात का?

आदिम धनगरी अनघड तांदळा स्वरूपात आहे.

याचा एखादा फोटो वगैरे आहे का? बघायला आवडेल. बाकी, कोडोली पलिकडे-कर्नाटकात वगैरे हे विठोबाचं रुप अजून कुठे दिसतं का? (हे जरा अवांतर आहे. त्याबद्दल क्षमस्व.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गावडे कुलातील ज्यांना ज्यांना भेटले त्यांनी असा ताम्रपट ऐकिवात नाही असं सांगितलं. पण त्या सांगण्यामागे स्थानिक राजकारणाचा फार मोठा भाग असणार असं तिथल्या जाणकारांनी सांगितलं. अर्थातच तपशील मला इथे लिहिणं शक्य नाही पण जे कळलं त्यावरून तो ताम्रपट असला तरी बाहेर निघणं फार मुश्किल आहे एवढं लक्षात आलं.
बाकीचे दोन ताम्रपट राजवाडेंनंतर वाचले गेलेत
आदिम धनगरी स्वरूपातला विठ्ठल बर्‍याच ठिकाणी असणारच की. ढेर्‍यांच्या पुस्तकातही तपशील असतील. परत बघायला हवं.
पांढरी म्हणजे जुन्या वसाहतींच्या अवशेषाने (एकावर एक जमत राहतात) तयार झालेला उंचवटा. इथे खापरं, हत्यारं, मणी, हाडं असं बरंच काहीबाही मिळत असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे खापरं, हत्यारं, मणी, हाडं असं बरंच काहीबाही मिळत असतं.

गेल्याच आठवड्यात मुलगी लोथलहून परतली तेव्हा बरच काही घेऊन आली!

मला आश्चर्य वाटते ते हे की, लोथलचा 'शोध' लागून पन्नास वर्षे होऊन गेली. एवढ्या अवधीत लाखो माणसे तिथे गेली असावीत. तरी अजून तिथे सटर-फटर वस्तू मिळतातच आहेत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे कसे घडले? माझ्या समजुतीनुसार पुरातत्व विभागाच्या अखत्यारातील जागेवरून काही उचलणे आणि ते बरोबर घेऊन जाणे हे पुरातत्व कायद्याचा भंग आहे. एकादी गोष्ट उचलली आणि बाहेर नेली तर ती वस्तु आणि तिचे तेथे सापडणे ह्याचा शास्त्रीय अर्थ लावण्यापासून पुढील अभ्यासकांना वंचित ठेवण्यासारखे असते म्हणून हा प्रतिबंध.

माझ्या डोळ्यासमोरील उदाहरण देतो. मी एकदा विजयानगर-हंपी पाहण्यास गेलो होतो. तेथे जुन्या इमारतींच्या मातीच्या गिलाव्यांचे रंगीत असंख्य तुकडे आसपास विखुरलेले आहेत. एका टूरिस्टाने असाच एक छोटा तुकडा उचलला आणि तो खिशात घालत असतांना एका पुरातत्व कर्मचार्‍याच्या ते पाहण्यात आले. त्याने त्या प्रवाशाला लगेच रोखून तो तुकडा जेथून घेतला तेथे परत ठेवावयास लावला.

लोथलसारख्या जागी अशी उचलेगिरी सरसहा चालत असेल हे वाचून धक्का बसला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाचसहा वर्षांपुर्वी आजी वारली. ( सांगली जिल्हा.)स्मशानात दुसय्रा दिवशी पन्नासेक गाववाले पुन्हा आले.तीन पोत्यांत सर्व राख भरली आणि एका ठिकाणी ओढ्यात टाकली. थोडीशीच पंढरपुरच्या चंद्रभागेत टाकण्यासाठी नेली आणि थोडी क्रियाकर्मासाठी आणली.फार पुर्वी अशीच राख कुठेतरी टाकत असतील आणि त्यासोबत काही मण्यांच्या माळा,मातीचा पाण्याचा गड्डू,खापराची थाळी ठेवत असतील. अशा ढिगाय्रातून तिकडचे स्थानिक कशाला वस्तू शोधत फिरतील? शिवाय काही मौल्यवान नसल्याने इतरही कोणी ढिगारा उपसत नसतील.

अभ्यासकांना ते खापर मौल्यवान असते.आता नवीन "कलेक्टर" आहेत ते उचलतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रवास सुची :
लामतुरे सन्ग्रहालय
उत्तरेश्वर मन्दिर
त्रिविक्रम मन्दिर
हिन्गळ्जवाडी
गोरोबा काका समाधी मन्दिर

कोणी "ऐसी" कर या परिसरात राहत असल्यास जरुर सान्गने..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

www.esahity.com ह्या संस्थळावर 'तगर ते तेर' ह्या नावाची छोटी (७८ पाने) पुस्तिका ई-बुक स्वरूपात विनामूल्य उपलब्ध आहे. वाटल्यास वाचून घ्या.

तसेच ’ऐसी’वरच सदस्य चंद्रशेखर ह्यांनी लिहिलेली ’एक पुरातन व्यापार केंद्र; तगर’ अशी चार लेखांची मालिका उपलब्ध आहे. तीहि पहा.
http://aisiakshare.com/node/3850
http://aisiakshare.com/node/3871
http://aisiakshare.com/node/3893
http://aisiakshare.com/node/3928

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0