राधाकवितात्रयी

राधा- १

मी कधी ऐकला नाही मिथकातील कळंक पावा
वृंदावनी ना रमले, ना यमुनातीरी झुरले
मी कदंबफुलांच्या माळा, लेवून कधी ना सजले
मी वाट पाहिली नाही, मी कधीच नव्हते राधा

प्राणामध्ये होती श्वासांची दुष्कर बाधा
पावलांत वादळ घेऊन पैंजणांस भिरकावून
मी गरगरले या पृष्ठी पृथ्वीच्या कठोर वक्षी
निजताना टेकीत माथा मी कधीच नव्हते राधा

या तप्तहृदीच्या गाथा वाऱ्यासही ना मी कथिल्या
डोळ्यांच्या सीमारेखा, आसवांस रोखत गेल्या
मी नाही रचिला रास, मी पाण्यावरी ना गेले
मी घडा फुटू ना दिधला, मी कधी न झाले राधा

अवघड असते बाई, असले आपण आपण असणे
लय मुक्त अशा श्वासांची, अन् सुरात अनवट जगणे

-------

राधा- २

या विषण्ण वृक्षाखाली तनु गुंडाळून बसलेली
ही कोण म्हणावी? कुठली? हे बिंब असे की प्रतिमा?
पाहिले जरा निरखून... ती विझली-राखी काया
जी अजून मिरवत होती सुकलेल्या कदंबमाला

पावलांत काळी पडली चांदीची घुंगरवाळी
धांदोट्या वस्त्रापुरत्या अन विरून गेली चुनरी
ही राधा... ओळख पटली, साक्षात प्रीतीची मूर्ती
ती अधुरी जिवंत होती, श्वासाची अंधुक दीप्ती

चेहऱ्याची कठोर रेखा जणू उसवत गेल्या शिवणी
सुरकुतजाळ्यामधुनी दिसते ना पांडुर जिवणी
ए, का गे निजून येथे? जा घरी निवाऱ्यापाशी-
बुबुळेही हलली नाही... शूल नजर डोळ्यांशी

ती शुष्क तनु पाहवे ना, कधी प्रीतदंवी जी भिजली
मी नजर वळवली वरती अन् एक डहाळी झुकली
ती सांगून गेली क्षुब्धा, राहू दे तिला येथेच
घर लाभे कायमचे तिज, या विषण्ण वृक्षाखाली

तो अलगुज वाजवणारा, या वृक्षावरती बसुनि
स्वर सोडून गेला येथे, घुमणारा पानोपानी
ती जगते भासासंगे, मरणार कधीही नाही
ही बिंब नव्हे, ही प्रतिमा... स्मरणात हिला ना ठेवी

हलकेच निघूनही आले, वळुनही पाहिले नाही
निरोपही ना घेता, गालांवर तापद काही
आपणही व्हावे राधा, नीलम हा सोस किशोरी
मी सहज गाळला तेव्हा... मन विरंज झाले, बाई!

----

राधा- ३

माझ्या मनात साधी, आहे एक समाधी
पाषाणी घडलेली... अन तीवर रेखलेली
बिनमोरपिसाची मुरली, नाजूक हाती धरली

मन राधेच्या बाधेने कधी अवचित विसकटलेले
नकळत छिनला दगड अन् कोरली तिची ती मुरली
वाहिनी थेट सुरांची, ना मोरपिसाने सजली

हे गहिरे नाते होते- राधेचे मुरलीशी
मुरलीधराविनाही... विणलेले घट्ट सुरांनी
हे भान कुणाला नव्हते, मी मनीच सांभाळीते!

3
Your rating: None Average: 3 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

राधाकवितात्रयी

तीनही कविता भन्नाट आवडल्या ...
तिसरी जरा जास्त ......
मी माझ्या जिवलग व्यक्तीला कृष्ण संबोधतो ......त्यामुळे राधा अधिकच भावली !!!
"मुझकोभी राधा बनाले नंदलाल" .....!!!!!

तिसरी आताच पुन्हा लिहिली. लय

तिसरी आताच पुन्हा लिहिली. लय मनात भलतीच होती. आणि लिहिलं भलतंच. ते आता बदललंय.

प्रतिसाद आवडला.

प्रतिसाद आवडला.

तो अलगुज वाजवणारा, या

तो अलगुज वाजवणारा, या वृक्षावरती बसुनि
स्वर सोडून गेला येथे, घुमणारा पानोपानी
ती जगते भासासंगे, मरणार कधीही नाही
ही बिंब नव्हे, ही प्रतिमा... स्मरणात हिला ना ठेवी

दुसरी कविता फार आवडली.
____
पहीलीही सुंदरच आहे. तुमच्या वॉलवरती वाचली होती. मनस्वी आणि एकाकी, कणखर स्त्रीची कहाणी.

आभार!

आभार!