लग्ने अशी होत.

महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय समाजातील - म्हणजे मुख्यत्वेकरून बामणं आणि ’ती’ मंडळी, म्हणजे सीकेपी, सारस्वत इत्यादि - ह्यांचे लग्नसोहळे गेल्या दीडदोनशे वर्षांमध्ये कसे बदलत गेले हे पाहणे हा मोठा मनोरंजक विषय आहे. अगदी जुन्या काळातली, म्हणजे १००-१५० वर्षांपूर्वीची ७-७ दिवस चालणारी लग्ने, त्यातील हुंड्यांच्या, रुसव्याफुगव्यांच्या गोष्टी, लग्नातले विधि, अंगावर चुळा टाकण्यापासून दातांनी लवंग तोडण्यापर्यंतचे आंबटशोकीन प्रकार येथून प्रारंभ करून सध्याची ’हम आपके है कौन’ धर्तीची संगीत, जिजाजींचे जोडे लपविणे, फेटे बांधणे, बारात असल्या थेरांनी साजरी होणारी पंजाबी स्टाईल लग्ने येथपर्यंत सर्वांचे सिंहावलोकन करून कोणी सिद्धहस्त लेखक उत्तम पुस्तक तयार करू शकेल पण तितका वकूब माझ्यात तरी नाही.

मी गेल्या ७०-७५ वर्षांमध्ये पाहिलेले बदल नोंदवून ठेवण्याचे कामच मी येथे करणार आहे. ही नोंदहि खूपच अपुरी असेल ह्याची मला खात्री आहे. इतरांनीहि आणखी भर घातल्यास एक मनोरंजक जंत्री तयार होईल अशा अपेक्षेने ही लेखनकामाठी मी करत आहे. माझी माहिती ही जवळजवळ दळिद्री ते खाऊन-पिऊन सुखी, चाळकरी ते वाड्यातले भाडेकरू इतपत मगदूराच्या मध्यमवर्गीय कुटुंबांमधील लग्नांसंबंधी आहे. मला आठवणार्‍या काही जुन्या गोष्टी:

१) घरचेच पूजा सांगणारे भटजी, काही ढालगज भवान्या, रिटायर्ड पेन्शनर प्रकारचे लोक मध्यस्थी करून नावे सुचविणे, टिपणे इकडून तिकडे देणे अशी अगदी पहिल्या टप्प्यावरची कामे उरकत असत. मुलगी गृ.कृ.द. (गृहकृत्यदक्ष), मुलगा सालस स्वभावाचा, नाकासमोर पाहून चालणारा, सरकारी कायम नोकरीवाला आहे असे निर्वाळे दिले-घेतले जात. हे मुलगा/मुलगी सांगून येणे. (हिंदीमध्ये ’बात चलाना’.)

२) तदनंतर ’मुलगी पाहणे’ हा कार्यक्रम उभयता आईवडिलांकडे वा कोणा नातेवाइकाकडे होई. पहिल्याच फटक्यात जमले असे नशीब बहुश: कोठल्याच मुलामुलीचे नसे. दोनचारापासून डझनावारी वेळा ह्यातून जावे लागे. अगदी जुन्या काळात ’मुली, चालून दाखव पाहू’ येथपासून चाचपणी केली जाई. मुलाचे हस्ताक्षर पाहिले जाई. ’चहापोहे हिनेच केले आहेत’ किंवा ’समोरचा बाळकृष्ण हिनेच भरला आहे’ असा मुलीच्या पाककौशल्याचा वा गृ.कृ.द. पणाचा पुरावा दाखवून दिला जाई.

३) ह्यानंतरचे महत्त्वाचे पाऊल म्हणजे देण्याघेण्याच्या बैठकीचे. दोन्ही पक्ष आपापले मुत्सद्देगिरीसाठी नाव कमावलेले कोणी काका, मामा, मावसोबा ह्यांना Chief Negotiator म्हणून नेमत असत. पुढच्या खोलीत पुरुष आणि उंबर्‍यापलीकडे स्त्रीवर्ग असे पक्ष आमनेसामने उभे राहात. काहीवेळ आमचे घराणे कसे नावाजलेले आहे, आमचे अमुकतमुक नातेवाईक कसे उच्च सरकारी अधिकारी - म्हणजे बहुधा मामलेदार, प्रान्त वा तत्सम असे ’भाऊसाहेब’ ह्या सार्वत्रिक उपाधीने ओळखले जाणारे - आहेत अशी खडाखडी झाल्यावर मुख्य कुस्ती सुरू होई. हुंडा देण्याची कितपत ऐपत आहे असा अंदाज घेऊन आपली मागणी वरपक्ष मांडत असे आणि ’नाही हो, आमची इतकी उडी नाही’, ’ऐपत नव्हती तर मुलगी दाखविलीच कशाल” असे वार एकमेकांवर टाकल्यावर आणि अखेर हुंडा आणि वरमाईचा मान, अन्य नातेवाईकांचे मानापमान, आमची इतकी पाने, तुमची किती असल्या हुलकावण्या देऊन झाल्या की याद्या होत. ज्यावर दोन्ही बाजूचे मुत्सद्दी आणि आईवडील सह्या करत. लगोलग गुरुजींना विचारून, कार्यालय कसे उपलब्ध आहे, सुट्या कशा आहेत वगैरे तपशील तपासून लग्नाची जागा आणि तारीख-मुहूर्त ठरत असे.

४) आता लग्नाचे कापडचोपड, दागिने, निमंत्रणे पाठविण्यासाठी पत्ते जमा करणे, निमन्त्रणपत्रिका छापून घेऊन त्या पाठविणे, लग्नाचा फराळ तयार करणे अशी कामे घरातल्या घरातच पार पडत. ओळखीचा आचारी बोलावून ’इतक्या माणसांच्या स्वैपाकाला काय साहित्य लागेल’ असा अंदाज घेण्यात येई. TurnKey पद्धतीची मंगलकार्यालये उघडण्यापूर्वी लहान गावातील लग्ने घरच्याघरी मांडव घालून आणि पुण्यासारख्या शहरांमधून छोट्यामोठ्या वाड्यांमधून निघालेल्या Cottage Industry वजा कार्यालयांमधून होत असत. स्वैपाकाला आचारी आणि मेहनतीला एखादा गडी ह्यांच्या मदतीने घरातीलच महिलामंडळ जेवणावळी उठवत असे.

५) लग्नाच्या पत्रिका हा मजेदार प्रकार होता. सर्वात वर छापखानेवाल्याकडे असतील ते छपाईच्या ब्लॉकवरील गणपति. आत्तासारखे designer गणपति कोणालाच ठाऊक नव्हते. एकंदरच पत्रिका ठराविक मजकूराच्याच असायच्या. समोरासमोर घडी घातलेली दोन पाने आर्टपेपरवर छापलेली आणि छोट्या पाकिटात बसतील इतकीच. काही कल्पक लोक पाकिटालाहि फाटा देऊन पत्रिकेवरच तिकीट चिकटवत असत. हातकागदाच्या, designer, तीनचार पानांच्या पत्रिका कोणी पाहिल्याच नव्हत्या. पत्रिकेमध्ये डाव्या बाजूस 'सौ बाईसाहेब ह्यांस' असा मायना आणि अखेरीस 'लेकीसुनांसह लग्नास अवश्य यावे अशी विनंति बायकांच्या बाजूने असे. उजव्या बाजूस मुख्य पत्रिका. त्यामध्ये घरातील सर्वात वडिलधार्‍या व्यक्तीने निमंत्रण पाठविले आहे असा सूचक मजकूर. शेवटी सह्यांमध्ये विवाहित मुलगे आणि त्यांच्या बायका इतकेच असायचे. लहान मुलांना वगैरे तेथे स्थान नसे. केवळ एका पत्रिकेत 'बाबांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी लग्नाला यायचं हं' अशी छोट्या मंडळींची आर्त विनवणी वाचली आहे. हे निमंत्रण ’इष्टमित्रांसह’ असे पण म्हणून त्यावरून चार टवाळ मित्र गोळा करून कोणी लग्नाला गेला असे ऐकलेले नाही. वधूच्या मागे ’चि.सौ.कां.’ (चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी) असे उपपद, ती ’सौ. होण्यापूर्वीचे म्हणून, लावत असत. दुसर्‍या युद्धापासूनतरी भारतात एकच Standard Time चालू आहे. तत्पूर्वी रेल्वेचा 'मद्रास टाइम' हा मुंबईच्या वेळेहून अलग असे. त्याची स्मृति मुहूर्ताच्या वेळेपुढे 'स्टँ.टा.' अशा अक्षरांमधून बरीच वर्षे नंतरहि टिकून होती. अगदी गरीब घरांमध्ये वेगळी पत्रिका छापून न घेता बाजारातील तयार पत्रिका, सुमारे १००-१२५ इतक्या, विकत घेऊन त्यामध्ये हाताने fill in the blanks मार्गाने मुलगा-मुलगी, आईवडील, लग्नाची तारीख आणि वेळ असा आवश्यक मजकूर हाताने भरून पाठवलेल्या पत्रिकाहि पाहिल्या आहेत. पत्ते लिहितांना योग्यतेनुसार चि., ती.स्व., रा.रा.’सौ., गं.भा., ह.भ.प., वे.शा.सं. इत्यादि उपपदे आठवणीने लिहिली जात.

६) निमंत्रण केवळ लग्नमुहूर्ताचेच असे. ज्यांना जेवणाचे आमंत्रण असेल ते प्रत्यक्ष भेटीतूनच अक्षता द्यायच्या वेळीच मिळे.

७) लग्नसोहळा एकूण सकाळ ते संध्याकाळ इतकाच. तेवढ्यातच 'श्रीमंतपूजना'पासून - सीमान्तपूजन - ते वरात आणि लक्ष्मीपूजन बसवून घेतलेले असे. 'वाङ्निश्चय' नावाचा मिनिसोहळा दुसरे लहान कार्यालय घेऊन करण्याइतके पैसे बहुतेक वधूपित्यांकडे नसतच. प्रत्यक्ष लग्नाच्या धार्मिक बडबडीमध्ये कोणालाच स्वारस्य नसे. धूर डोळ्यात जाऊन बेजार झालेले वरवधू आणि भटजी, आणि स्वरचित मंगलाष्टके म्हणण्यासाठी उत्सुक हौशी कवि/कवयित्री इतकेच जण काय चालले आहे ते पाहात असत. बाकी निमंत्रित मांडवात बसून ’नेहरूंचे काय चुकले’ टाइपच्या चर्चांनी कालक्रमणा करीत असत. दोन्ही पक्षांचे गोंडस ’राजू’ मांडवात धुमाकूळ घालून शिवाशिवी, लपंडावात करमणूक मिळवत असत. बायका एकमेकींच्या दागिन्यांचा आणि साड्यांचा लेखाजोखा मांडत बसलेल्या असत.

८) जेवणाखेरीजच्या निमंत्रितांना लग्नापाठोपाठ 'पानसुपारी' दिली जाई. त्यामध्ये कोठल्यातरी गोड सुपारीचे पुडे, झिरमिरीत कागदात गुंडाळलेला पेढा आणि एक कसलेतरी फूल इतकेच मिळे. घारातल्याच चुणचुणीत मुलांकडे हे काम सोपवले जाई.

९) लग्न लागताच आहेर देणार्‍यांची रांग उभी राही. नव्या जोडप्यामागे कोणी विश्वासू नातेवाईक सर्व आहेरांची वहीत नोंद करत बसलेला दिसे.

१०) लग्नाच्या मुख्य जेवणाच्या वेगळ्याच कथा. जवळजवळ १९६० पर्यंत रेशनिंग आणि अनेक गोष्टींच्या टंचाईमुळे, शास्त्रींच्या काळात आठवड्यातील एक दिवस उपास करण्याच्या आवाहनामुळे निमंत्रितांची संख्या मर्यादित असे. चाट ते चायनीज स्टॉल्स लावून कुंभमेळा भरविण्याची रीत अजून दूरच होती. मुख्य पक्वान्न अगदी जुन्या काळात केवळ बुंदी/मोतीचूर लाडू हे असे. नंतर जिलब्या आल्या. ७५-८० नंतर फ्रूट सॅलड आले. अजून कालान्तराने गुलाबजाम, आमरस ह्यांच प्रवेश झाला. दोन किंवा तीन पंक्ती बसत असत. पहिली लग्न लागताच ऑफिसला जायची घाई असलेल्यांसाठी, दुसरी सर्वसामान्य आणि तिसरी खाशांची. पंगत जमिनीवर पाट मांडून होई. सुरुवातीला दोन जण जेवणार्‍यांच्या कपाळावर तांबडे गंध लावण्याचे काम करीत असत. ह्यासाठी घरांमधून दोन चांदीच्य साखळ्या असत. एकाने ओला लेप हिंडवायचा आणि दुसर्‍याने त्यामध्ये साखळ्ञ बुडवून जेवणार्‍याच्या कपाळावर गंधाच्या दोन ओली लावायच्या. उभे वा आडवे असा option विचारला जाई. घरातील शाळकरी मुले पाणी वाढण्याच्या कामावर असत तर पोक्त बायका भात, वरण, आमटीभाजी, कोशिंबिरी, लाडूजिलब्या वाटण्याच्या कामावर. एकदा नव्या जोडप्याने पंक्तीमधून फिरून एकेक आग्रहाची जिलबी/लाडू प्रत्येक पानात घालण्याची पद्धत होती आणि तेव्हाच ’नाव घेणे’ हाहि नामांकित प्रकार होई. मुलीपाठोपाठ अन्य वडीलधार्‍या बायकाहि आपली ही हौस पुरवून घेत. त्याच पाणीवाल्या मुलांनी सुसंगति सदा घडॊ, हरीच्या घरी शेवया तूपपोळ्या, न मरे यास्तव नेला पर्वतशिखरासि लोटिला खाली, जगन्नाथे केले मज सकळ लोकांत बरवे असे श्लोक म्हणून आपल्या चुणचुणीतपणाचा पुरावा दाखवून द्यावा अशीहि अपेक्षा असे. पंगत संपता संपता तीच मुले पानापुढे विडे ठेवण्याच्या कामावर लावली जात.

११) ’Event Managemaent' हे शास्त्र अद्यापि जन्मले नव्हते. त्यामुळे ’Event Manager' वर सर्व धावपळ सोपवून दोन्ही पक्षाच्या बायकापुरुषांनी लग्न enjoy करायचे ही कल्पनाहि निर्माण झाली नव्हती. जवळजवळ सर्व कामे घरातीलच पुरुषबायका, ’नारायण’ टाईपचे लोक उरकत असत.

१२) संध्याकाळी 'रिसेप्शन' नावाचा प्रकार असे. मुख्य जेवणाचे आमंत्रण नसलेल्यांची ही सोय. तेथे बहुधा गोल्डस्पॉट सारखे पेय पहिल्या दिवसांत, नंतर आईसक्रीम असे बदल झाले. येथे आहेरहि १०-१५ रुपयांच्या मर्यादेतील असत. त्यामुळे ठराविक निरुपयोगी भेटवस्तूंचे चारचार सेट येऊन पडत - उदा. लेमन सेट, सुपारी-लवंग ठेवण्यासाठी लाकडी तबकात तबला-डग्गा.

१३) रिसेप्शन झाले की नव्या जोडप्याला कोणी वडीलधारी मंडळी जवळच्या देवळात नेऊन देवाच्या पाया पडण्याचा कार्यक्रम आवरून घेत.

१४) हे झाले की लग्नघरी दोन्ही पक्षाची निवडक मंडळीच उरत. तदनंतर हमसाहमशी रडून निरोप देण्याघेण्याचा ’जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा’ लाइनचा पाठवणीचा कार्यक्रम आणि तदनंतर ’ते कसे ग ते कसे, देव्हार्‍यातिल देव कसे असे गाणे जन्मभर गुणगुणण्यास ’नववधू’ (प्रिया मी बावरते फेम) सज्ज होई अणि एका नव्या कुटुंबाची पायाभरणी संपन्न होई.

4
Your rating: None Average: 4 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

रंजक! बेसुर मंगलाष्टके

रंजक! बेसुर मंगलाष्टके गाण्याची हौस पुरवणे आले नंतर.

सुरस आणि रंजक

जुन्या धाटणीच्या पत्रिका आता असतील का कोणाकडे? नसतील तर तुम्हीच जुन्या धाटणीचा गणपती चितारून दाखवू शकाल का?

>> गृ.कृ.द. पणा <<
याला आम्ही आता जीकेडीगिरी म्हणतो. लग्नाच्या पद्धती बदलल्या, भाषाही बदलली. त्याची गंमत वाटली.

जुन्या काळी मंगलाष्टकं, मुहूर्त गाठण्यासाठी मंगलाष्टकं म्हणण्याची घाई किंवा मुहुर्तापर्यंत थांबण्यासाठी भटजींची गायकी असे प्रकार व्हायचे का? लग्नाच्या जेवणावळींत आग्रह नामक प्रकार कितपत भीषण असायचा; माझा अंदाज असा की गरीबी आणि पुढे रेशनिंग वगैरेमुळे आचरट पातळीवर आग्रह चालत नसेल.

लग्नाचा खर्च साधारण किती होत असे, आणि तुलनेसाठी त्या काळातले लोकांचे पगार वगैरे? आमच्या घरच्या एका लग्नात (गेल्या शतकातलं लग्न) मुलीने ८-१० साड्या दिवसभरात नेसल्या होत्या. ही 'पद्धत'ही तशी नवीनच असावी, असं वाटतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जुन्या धाटणीच्या पत्रिका आता

जुन्या धाटणीच्या पत्रिका आता असतील का कोणाकडे?

जुन्या म्हणजे कधीच्या ? माझ्याकडे माझ्या आईबाबांच्या लग्नाच्या पत्रिका आहेत , १९८५ च्या. बाबा कानडी असल्याने त्यांच्याकडची पत्रिका इंग्रजीत आहे , आईकडची पत्रिका टिपिकल मराठी.

-सिद्धि

मिरजेतली लग्नकार्यालये हा एक

मिरजेतली लग्नकार्यालये हा एक स्वतंत्र विषय . बॅटमॅन आणि शांन्तिप्रिय यास विनंती.

रंजक

रंजक लेख.
पत्रिकालेखनात शुद्धलेखनाचे जुने-नवे नियम, असलेले-नसलेले अनुस्वार यांतील बदल हळूहळू झाले की झटक्यात?

१००-१५० वर्षांपूर्वीची ७-७ दिवस चालणारी लग्ने, त्यातील हुंड्यांच्या, रुसव्याफुगव्यांच्या गोष्टी, लग्नातले विधि, अंगावर चुळा टाकण्यापासून दातांनी लवंग तोडण्यापर्यंतचे आंबटशोकीन प्रकार येथून प्रारंभ करून सध्याची ’हम आपके है कौन’ धर्तीची संगीत,...

ईई!

एक विसरलो...

वर लिहिता लिहिता एक गोष्ट ध्यानात असूनहि विसरलो.

बर्‍याच जुन्या पत्रिकांमध्ये हल्लीसारखी 'विवाहबद्ध होणार आहेत' चालीवरची गुळमुळीत भाषा न वापरता 'अमक्यातमक्यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे' असे खुल्लमखुल्ला छापलेले असे. ताकाला जायचे तर भांडे कशाला लपवायचे?

हेच लिहायला आलो होतो झकास लेख एक नंबर

पंजाबी त्याहुन मारवाडी लग्ने म्हणजे उत्साह आनंद नाचण्या खाण्या हँसी मजाकची तुफान पर्वणी मराठी रूक्ष मठठ लग्नात परीसंवादात बसवल्या सारखी शिक्षा असते मराठी पोरं ही तशीच अर्थात अपवाद आहेच

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

धागा आवडला. "वधुवरांचा शरीर

धागा आवडला.

"वधुवरांचा शरीर संबंध करण्याचे योजिले आहे" हे बरोबर आहे. नॉर्बर्त इलीअस नावाच्या समाजशास्त्रज्ञाचं युरोपच्या मध्ययुगीन इतिहासावरच एक अतिशय गाजलेलं पुस्तक आहे - सीवीलायझिंग प्रोसेस: द हिस्ट्री ऑफ म्यानर्स (१९३९) ज्यात मुख्यत्वे तो युरोपातल्या सामाजिक चाली/रूढी कश्या बदलत गेल्या ह्यांचा सविस्तर इतिहास नोंदवतो. मध्ययुगीन लग्नाविषयी लिहिताना तो म्हणतो कि, वधुवरांचा शरीरसंबंध झाल्याशिवाय (दुसर्या दिवशी तशी खात्री करून घेतली जात असे) लग्न पूर्ण झालं असं मानलं जात नसे. काही प्रसंगी प्रत्यक्ष पाहुण्यांसमोरही हा शरीरसंबंध होत असे. (गेम ऑफ थ्रोन्स मधला बेडिंग सेरिमनी आठवतोय!) अरेबिअन नाईत्स मधल्या अनेक गोष्टींत सुद्धा लग्न नंतरच्या दिवशी वधूचा कौमार्यभंग झाल्याची खात्री केली जाताना दिसते. वधूपुढे जाताना वर एक विशिष्ट'प्रकारची पिसं भरलेली कापडी पिशवी आपल्या पायजम्या आतून बांधून घेत असे, जेणेकरून त्याचं लिंग उत्तेजित झाल्याचा भास व्हावा, असेही उल्लेख आढळतात. ("मेरा नाम है बुल्ला, रखता हुं खुल्ला" - असं आत्मनिवेदनपर संभाषण देखील होत असेल, कुणास ठाऊक!)

इतिहासकार नारायण भोसलेंनी ब्राह्मणेतर समाजाच्या इतिहासाचा दस्तऐवज म्हणून लग्नपत्रिकांचा अभ्यास केलेला आहे. त्यांच्या जातवर्गलिंगभाव ह्या पुस्तकात ह्या विषयी दोन लेख आहेत:

अ) स्वातंत्रोत्तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे सार्वजनिक दस्तऐवज: लग्नपत्रिका
आ) शरीरसंबंध ते शुभविवाह: लग्नपत्रिकांचा सामाजिक बंध

தநுஷ்

इतिहासकार नारायण भोसलेंनी

इतिहासकार नारायण भोसलेंनी ब्राह्मणेतर समाजाच्या इतिहासाचा दस्तऐवज ... जातवर्गलिंगभाव ह्या पुस्तकात

ये किधर मिलेगा? बुकगंगा पे.

अवांतरः बर्‍याच दिसांनी दिसलात भौ!

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

होय साहेब. गेलं वर्षभर किंवा

होय साहेब. गेलं वर्षभर किंवा त्याहूनही जास्त काळ अनेकच कारणांनी (अभ्यास, कुटुंब, भटकंती) ऐसीवरचा वावर कमी झालेला; अर्थात मधूनमधून वाचत होतोच. पण ऐसीशिवाय माझं मराठी लिखाणच होत नाहीये हे लक्ष्यात आल्यानं आता इथे अधिक सातत्यानं लिहित राहण्याचा इरादा आहे.

अवांतर: ह्या दिवाळी अंकातली तुमची गोष्ट बेहद्द झकास आहे. आणखी पोर्न विशेषांकातल्या तुमच्या साडेतीन गोष्टी सुद्धा भन्नाट होत्या. खूप दिवस गायब राहिल्यामुळे हे सांगायचं राहून गेलेलं.

தநுஷ்

आभारी आहे

आभारी आहे (स्माईल)

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

इलिया राजा। मला वाटतं

इलिया राजा।
मला वाटतं आपल्याकडे हळदीच्या निमित्ताने चाचपडून खात्री करून घेत असत. ( रामनगरीत हा उल्लेख आहे का?)

विनंती

प्रतिसादांमध्ये लिहिलेली वाढीव माहिती धाग्यातही लिहून ठेवाल का? (अनेक लोक वाचताना प्रतिसाद सोडून देतात.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अपरिहार्यपणे "नारायण"ची आठवण

अपरिहार्यपणे "नारायण"ची आठवण आली!

आमच्याकडे लग्नं लागून जेवणं वगैरे झाली आणि मुलीला पाठवण्याची तयारी सुरु झाली की नातेवाइकांमधे ४-५ सुरेल (असं त्यांना वाटंत असे) आवजाच्या बायका वाजवायची पेटी घेऊन बसत आणि न चुकता "गंगा यमुना डोळ्यात उभ्या का SSS" असं आर्त स्वरात गायला लागत! डोळ्यात बोटं घालून रडे आणण्याचाच प्रकार होता तो. आणि नवरी मुलगी य प्रत्येकीला नमस्कार करुन पुढे निघाली की बळेबळेच तिच्या तोंडात पेढा कोंबत. ती बिचारी रडता रडता तो पेढा कसातरी गिळत असावी.

डोळ्यात बोटं घालून रडे

डोळ्यात बोटं घालून रडे आणण्याचाच प्रकार

हा हा हा.

एका लग्नाची आठवण झाली. लग्नात संध्याकाळी रडणं हा नॉर्म होता. पण एका लग्नात नवरी मुलगी संध्याकाळी नमस्कार वगैरे करताना रडत बिडत अजिबात नव्हती. उलट एकदम हसत-खिदळत, थट्टा-मस्करी करत टाटा-बायबाय चालू होतं. रडण्याच्या तयारीत असलेल्या साळ्काया/माळक्या हिरमुसल्या.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मी गेल्या ७०-७५ वर्षांमध्ये

मी गेल्या ७०-७५ वर्षांमध्ये पाहिलेले बदल नोंदवून ठेवण्याचे कामच मी येथे करणार आहे

हे कुठाय? इथे तर तो बावाजी नुसताच चहा पितोय च्या चालीवर इथे तर एकाच वर्षातील लग्न पद्धत ए! (जीभ दाखवत)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फॉर व्हॉट इट इज वर्थ - माझ्या

फॉर व्हॉट इट इज वर्थ - माझ्या आणि माझ्या मित्रांच्या 'काळा'तल्या लग्नांविषयी लिहून ठेवतो. वैधानिक इशारा: हे आठ मित्रांच्या टोळक्याचं मीडियन वर्णन आहे. "मुलगी-आईने-पसंत-केली-मी-फक्त-लग्न-केलं" आणि "अचानक-फोन-चला-आळंदीला" हे दोन्ही एक्ट्रीम्स वगळले आहेत.

१) काळः २००८-२०१४. स्थळः पुणे आणि उपनगरं. व्यक्ती: साधारणपणे उच्चशिक्षित.
२) सर्वांचे 'सोयिस्कर प्रेमविवाह'. म्हणजे शक्यतोवर आपल्याच जातीतली (+/- २ व्हेरिएशन), स्वतःसारखीच उच्चशिक्षित वगैरे. होत-कसं-नाही-प्रेम-बघतोच-त्याजायला टाईप प्रकार.
३) प्रेम/विवाहपात्र शोधायची स्थळे: शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास. नोट १: सरासरी १.७ क्ष-गर्लफ्रेंडा / अयशस्वी प्रेमप्रकरणांचा इतिहास. नोट २: बहुतेकांना जवळची मैत्रीण आहे. कोणीही तिच्याशी लग्न करायचा विचार डोक्यातदेखील आणला नाही.
४) लग्नाची 'बैठक' वगैरे झाली नाही. किंबहुना बर्‍याच जणींच्या घरी आगोदरच पत्या लागला होता, आणि एखाद अपवाद वगळता विरोधही झाला नाही. पण तरीही 'भावी जावई के तौर पर' भावी सासुरवाडीला पहिल्यांदा जाताना प्रत्येकाने आपला एकतरी मित्र सोबत नेला होता. (पाठराखीण असण्याच्या परंपरेचा हा माडर्न अवतार असावा.)
५) साखरपुडा आणि लग्न हे दोन वेगळे समारंभ केले.
६) दोन्ही समारंभांचा खर्च वधूपित्याबरोबर निम्मा निम्मा वाटून घेतला. आणि निम्मा म्हणजे कटाक्षाने निम्मा. (आठापैकी चार व्यवसायाने ऑडिटर असल्याने या कटाक्ष जरा जास्तच जाचक होता.)
७) आठही मित्रांचा एकमेकांच्या लग्नात अगदी सक्रिय सहभाग होता. पत्रिका डिझाईन करण्यापासून ते गाडी सजवण्यापर्यंत ते पेढे वाटण्यापर्यंत सगळं. (याची दोन उदाहरणं: (१) एक शीघ्रकवी सगळ्यांसाठी उखाणे लिहून देत असे. पण ते उखाणे प्रस्तुत कविवर्यांसारखेच भयानक आचरट असल्याने स्वीकारले जात नसत. (२) एका लग्नात ऐन मंगलाष्टकांत माईक बंद पडला. आजूबाजूच्या मित्रांनी भटजींच्या सुरात सूर मिळवून मंगलाष्टकं म्हटली. मित्रांनी उच्चारवात म्हटलेल्या मंगलाष्टकांत त्याचं लग्न लागलं!) हेच लग्नातले इव्हेंट मॅनेजर / नारायण होते.
८) लग्नात बुफे पद्धत होती, पण स्टॉल वगैरे नव्हते. फिक्स मेनू.
९) आहेर घेतला नाही.
१०) ग्रहमखापासून ते मांडवपरतण्यापर्यंत सगळा सोहळा सरासरी तीन दिवस चालला.
११) "संगीत" वगैरे केलं नाही.
१२) सर्व लग्नांत फोटोग्राफर आणि व्हिडियो शूटिंग होतं. व्हिडियो शूटिंग नंतर सीडीस्वरूपात आलं, आणि पार्श्वसंगीत म्हणून वास्तवापासून अत्यंत फटकून असलेली भावगीतं वगैरे असल्यामुळे कोणीही त्या सीड्या परत पाहिल्या नाहीत.

.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

पार्श्वसंगीत म्हणून

...वास्तवापासून अत्यंत फटकून असलेली भावगीतं वगैरे असल्यामुळे कोणीही त्या सीड्या परत पाहिल्या नाहीत.

लोल!

:ड

आदूबाळच्या नावात 'बाळ' आहे, पण याला इतिहासकालीन होण्याची फार हौस आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पार्श्वसंगीत म्हणून

पार्श्वसंगीत म्हणून वास्तवापासून अत्यंत फटकून असलेली भावगीतं वगैरे असल्यामुळे

(दात काढत) (दात काढत) (दात काढत)

________________________________
अब जब कि तुम्हें पढ़ना आ गया
...मैं लिखना भूलती जा रही हूँ ...
(निरुपमा सिनहा)
________________________________

सत्यनारायण

अलीकडे लग्नानंतर लगेच मुलाकडे 'सत्यनारायण घालण्या'ची प्रथा वाढीस लागलेली दिसते. त्यात मुलीकडच्या ठळक लोकांना बोलवतात. मुलाकडचे दुसरे व्याहीभोजनच जसे काही.

एकारांत कोकणस्थी सुटसुटीत

५ वर्षांपूर्वी बिल्डिंग मधील एक मस्त सोहळा . सीन 1. सकाळी 7 वाजता श्री, सौ व कु xxx ले +3 बॅग खाली भेटले . मी विचारलं : का हो पाव्हणे वगैरे उत्तर : अहो सगळे पुण्यातच राहतात . येतील कार्यालयावर . लग्नसोहळा : दोनेकशे लोकं. अत्यंत आनंदी वातावरण ,मर्यादित अतिशय चविष्ट जेवण (त्यानंतर मी इतका कुठल्याही लग्नात जेवलो नाहीये).नो कुंभमेळा.मस्त गप्पा , आनंद सगळीकडे .सीन : संध्याकाळी ५ श्री व सौ xxx ले - मुलगी आणि एक बॅग त्याच जागी भेटले . मी विचारलं : काय हो ? उत्तर : झालं . मुलगी सासरी गेली . आम्ही आलो.(कुठेही काटकसर ,चिंधीचोर पणा किंवा अश्लील संपत्ती प्रदर्शन नाही. छान समाधानी आनंदी वातावरण) मला सगळ्यात आवडलेला हा सोहळा .(लिहिल्यात कणभर हि अतिशयोक्ती नाही.हे xxx ले माझ्या वरच्या फ्लॅट मध्ये राहतात )

लग्नात गोंधळ ,फजिती ,अनाठायी

लग्नात गोंधळ ,फजिती ,अनाठायी खर्च होतात पण त्याचे खापर दुसय्रांवर का फोडायचे? आपणच करू आणि त्याचे श्रेय आपणच घ्यावे या विचाराने सर्व मीच एकट्याने केले. कोणाही म्हाताय्रांना लुडबुड करू दिली नाही त्यामुळे सगळे सुरळीत झाले.बैठक मीच एकट्याने केली होती. दहा मिनिटे लागली.थोडक्यात नवीन जोडप्याने सर्व निर्णय घ्यावेत. कुणाच्याही हातात कंट्रोल देऊ नये. ।। कार्य सिद्धीस नेण्यास मी समर्थ आहे यायचं तर या ।। इतकं फक्त लिहिलं नव्हतं.

झकास अच्चु काका ..मीही

झकास अच्चु काका ..मीही वेगळ्याच कारणाने हेच केलं होतं ••

एक प्रयोग केला अण्णा. केवळ

एक प्रयोग केला अण्णा. केवळ लोकांना सल्ले देणं, चर्चा घडवण्यापेक्षा करून पाहू या विचाराने केलं. आपटीही खाल्ली असती. पण त्या दिवशी काही अनपेक्षीत विघ्न ( रेल्वे /बस/रिक्षा गोंधळ, अवकाळी पाऊस असं काही झालं नाही. सगळ्यांनी असंच करावं असं नाही पण स्थित्यंतरं कशी होतात हे एक सांगोवांगी नसलेलं उदाहरण.
त्याकाळी रेजिस्टर्ड म्यारिज आणि रिसेप्शनचं खुळ नुकतंच निघालं होतं. दोन वकील मित्र होते त्यांना विचारलं "लग्न म्हणजे कागदोपत्री काय?"त्यावर त्यांनी खरे राजमार्ग सांगितले. यातला कोणता हवा तो निवड म्हणाले. त्यातले अडथळेही सांगितले होते.
८०च्या दशकानंतर शहारातले जागेचे प्रश्न वाढले अन पाहुण्यांना दोनचार दिवस पुढेमागे ठेवून घेणे अशक्य होऊ लागल्यावर समारंभ आवरते घेऊ लागले. इथे लिहिलेली धामधुमित होणारी मारवाडी लग्न सर्वच मारवाड्यांच्या नशिबी नसतात. सार्वजनिक-सामुहिक लग्नेही होतातच.

मी साधारण १५ वर्षाचा

मी साधारण १५ वर्षाचा अनुभवलेला फरक सांगू शकेन.
पत्रिका: जातिभिन्नतेनुसार मज्कूर येत असे, बामणांची पत्रिका छापायला त्यातल्या त्यात सोयीस्कर. भावकीची नावे लिमिटेड. गोतावळा नाही. आधीच हाताने लिहून दिलेला मजकूर सुटसुटीत आणि शुध्द. सगळे प्लानिंग घरातच केले असल्याने प्रेसमध्ये घोळक्याने येईन ऐनवेळी नावे घुसडणे, त्या मानपानावर चर्चा करणे आदि प्रकार नसत. बरेच दिवस आधीच छापायला दिल्याने वेळ बराच मिळे. खर्चात मात्र फार घोळ. क्वांटीटी कमी. ऑड आकड्यात मागणे (२५०-३२५ अशा) हे सर्रास चाले. मार्जिनही कमी मिळे. इतर समाजात राजकारण, शिक्षण आदि गोष्टींमुळे पत्रिकातील आमंत्रक, शुभेच्छुक, स्वागतोत्सुक अशा लेबलाखाली नावांची संख्या वाढली. एकत्र कुटुंब पध्दतीमुळे भावकींची नावे बरीच असत. आधी मामाच्या ताईच्या लग्नाला यायचं हं! अशा प्रेमळ दटावणी नंतरची नावे आता किलबिल मंडळ, नुसतीच धावपळ, छोटे निमंत्रक, बच्चा पार्टी अशा लेबलाखाली येऊ लागली. प्रथमेश, स्वप्निल, मानसी, स्नेहा वगैरे गँग आता मोठी झाली, आर्यन, आर्य, वेद, अथर्व, शुभम, ओवी असली तुपातली नावेही आता एल्केजीयुकेजी करुन सीबीएसला गुंतली. सध्या चलती आहे ती मिथिला, वैखरी, वैनतेय आदी आयुर्वैदिक नावाची.
मी आजपर्यंंत सगळ्यात जास्त नावे असणारी पत्रिका डीझाईन करुन छापली त्यात तब्बल ३८० लोक्स नाव अन पदानिशी होते. चिल्लर वेगळीच. पत्रिका फोल्ड उघडल्यावर दिड बाय दोन फुटाची होती. एका तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी फोटोसहित विराजमान होती. इतक्या लटांबराला कव्हरवरील कॅलेंडर साईज विठूरखमाईने पेलले होते.
सुरुवातीला ट्रेडल प्रिंटिंगला गणपतीची ठराविक चित्र (ब्लॉक्स) असत. गणपतीसोबत वरात, सनई, वेलकम छाप जोडलेले हात हे ब्लॉक्स कॉमन असत. फॉन्टस रनिंग मॅटर ला फिक्स असत. नवरा नवरीची नावे वेगळ्या फॉन्टात मोठ्या पॉइन्टसायजात असत. त्यासाठी मोगरा वगैरे फॉन्ट्स तेंव्हापासून प्रसिध्द आहेत. छापाईच्या बंधनांमुळे एका रंगात पत्रिका छापली जाई. एकूणच पत्रिका हि चित्रांपेक्षा मज्कूराला महत्व देणारी असे. स्क्रीन प्रिंटिगच्या उदयानंतर जरा रंगात विविधता आली. स्क्रीनच्या मर्यादित शाई बंधनामुळे आणि हाफटोन न वापरता येत अस्ल्याने ग्राफीकल गणपती बप्पा दिसू लागले. ह्यात बरेच सिम्लिफिकेशन होत एक वाकडी रेषा म्हणजे गणपतीची सोंड अशा पधतीची चित्रे पण दिसली. ऑफसेट पध्दतीने छापल्या जाणार्‍या पत्रिकात रेडिमेड कोर्‍या पत्रिका घेऊन त्यावर छापणे सुटसूतीत झाले. स्कॅनिंग, इंटरनेट वगैरे प्रकारामुळे देवांच्या स्वरुपात विविधता आली. मूर्तींचे फोटो, रंगीत चित्रे, कॅलिग्राफीचे उपयोग, टेक्शचर्स अशा गोष्टींचा सढळपणे वापर वाढला.
(हे जर इंटरेस्टिंग वाटत असले तर अजून लिहिन वेळ मिळेल तसे (डोळा मारत))

जबरदस्त! या बात! आणखी

जबरदस्त! या बात!

आणखी डिटेलवार लिही.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

मस्त

+१

मुस्लिम पत्रिकांवर

जश्ने शादी असे लिहीलेलं असत ना ? आणि एखादा शेर असतो वरती
कधी कधी छान इमोशनल शेर असतो बाप व मुलीच्या नात्यासंदर्भातील
(अती मर्यादीत अनुभवावरुन)

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

बोहरी समाजातल्या लग्नांत हे

बोहरी समाजातल्या लग्नांत हे लिहिलेलं पाहिलं आहे. त्यातल्या शेरांमध्ये "जेवायला [काहीतरी भारी] ठेवलं आहे" वगैरे उल्लेखही केलेला असतो!

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

अरे ह्या पत्रिकांची बातच

अरे ह्या पत्रिकांची बातच न्यारी.
७८६ ने सुरुवात करुन हाजामिन फजले रब्बी चे पवित्र स्मरण, एक शेर, लगेच अस्सलामुअलैकुम, हमारे यंहा खुदाके फजले करमसे हमारे फर्जंद सलीम, अलीम जो असेल तो. त्यानंतर इनका अक्दे निकाह जनाब अमुक तमुक ब मुकाम फलाना फलाना इनकी नूरचष्मी दुख्तर नेक अख्तर (मुलीचे नाव टाकत नाहीत. ग्रामीण भागात अजून टाकतात पण आजकाल अरबीकरणाने ती प्रथा बंद झालीय. खाली विनित मध्ये पण स्त्रियांची नावे नसतात) के साथ ब तारीख ----रब्बीउलावल हिजरी वगैरे वगेरे पे होना करार पाया है. आपकी शिरकतबाईसे मसर्रत होगी. लगेच अलमुन्तजरीन आणी नियाजमंद(आपले स्नेहांकीत आणि वरील विनंतीस मान देउणवाले पब्ल्लिक ओन्ली जेंटस) यांची नावे. खाली अक्द का पता, वलीमा(मेजवानी) अक्द के बाद. पाकीटावर अद्दाई म्हणजेच प्रेषक. संपली पत्रिका. जास्त प्रयोग केले जात नाहीत. रेडिमेड पत्रिकात मुस्लीम पत्रिकांचे ही फार कमी चॉइस उप्लब्ध असतात. हैद्राबाद, मुंबई आदी भागातून मागवल्या जातात.
बोहरी वगैरे सहसा इंग्लिशात पत्रिका छापतात. त्यात ऑलमायटी वगैरे वाचून मज्जा वाटते. उत्तम सांपत्तिक स्थितीमुळे कलर आणि डीझाईन चॉइस डिसेंट असतो.
परवाच एका रेडिमेड पत्रिकांचे शोरुम चालवणार्‍या मित्राकडे गेलेलो. फावल्या वेळात तो एका मुस्लीम पत्रिकेचे डीटीपी करत बसलेला. क्लायंट पण खेड्यातील जरा अडाणी टाईप होता. मॅटरमधील बर्‍याच चुका मी सांगून सुधारुन दिल्या. त्यालाही मी क्लायंटच वाटलेलो. पत्रिका ओके झाल्यावर बाहेर जाऊन फोनवर सांगत होता. "चिल्लर गल्त्या थी. रुक्केवालेको ज्यादा मालूमात नई थी. अपनेच भाईजान मिले एक. करके दिये उनो." शुक्रीया भाईजान करुन हे बांधव आनंदाने रवाना झाले.

एक नंबर प्रतिसाद मामु मजा आ गया भोत

तुमचे सर्व प्रतिसाद व लिंक वाचले
लय भारी दांडगा अनुभव आहे हो तुमचा या क्षेत्रातला.
मजा आली वाचुन
एकदम फक्कड रीअल लाइफ टेस्ट.

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

अरबीकरण

आमच्या इथे अरबीकरणाचा जोरदार फटका बसला आहे.
आधी श्री गणेशाय नमः च्या ऐवजी सर्व लोकल पीरांचा उद्धार, सुफींचा उद्धार असे. देवनागरीत मुस्लिम बांधवांची पत्रिका हा एक अल्टिमेट प्रकार अरबीकरण खड्यात घालत आहे. लोक आता सरसकट इंग्रजीला प्राधान्य देत आहेत.
अजून एक मुद्दा, आपल्या पत्रिका साधारण ए ४ आकाराच्या असतात. दक्षिणेत विजिटिंग कार्ड आहे की पत्रिका आहे ते कळत नाही. बाकी ठिकाणच्या पत्रिका कशा असतात? बंगाल्यांच्या, पंजांब्यांच्या?

पत्रिका छापायला गेल्या की वेळ

पत्रिका छापायला गेल्या की वेळ असे रंगकामाची.
घर आतून रंगवल जाई साधारण नवरात्राआधी. मात्र घरात लग्नकार्य निघाले की आतून बाहेरुन रंगवले जाई. बाहेरील भिंतीवर दरवाज्याच्या दोन्ही बाजूला जयविजय इतरसमाजात मावळ्यांच्या वेषातील भालदार चोपदार, बाजूला वरात अथवा सोंडेत फुलांची माळ घेतलेला हत्ती रंगवला जाई. अगदीच पेंटर नवशिका असेल तर दोन कुंडया रंगवत असे. त्यातील फुलझाडाचा आकार कुंडीच्या निदान १० पट तरी असे. सुरईसारख्या तशा नाजूक फुलदाणीत एवढा डोलारा सहजी तोलला जाई. वेलकमच्या हातामागचा तो लांबट डोळे झाकलेला लंबुळका चेहरा ही अगदी कॉमन असे. काही हौशी लोक्स राजकमल स्टुडीओची वेणी फडकावत कमळात एका पायावर उभे राहून पुष्पदान करणारी स्त्री मिरर डुप्लिकेटसहित रंगवून घेत. दारावर एका बाजूस सुस्वा व दुसर्या बाजूस गतम असे. भिंतीवर शुभविवाह आणि कलश रंगवला जाई. लगेहात पेंटरकडून तुळशीवृंदावन रंगवून घेतले जाई. दिवाळीच्या नंतरचा मुहुर्त असेल तर त्यावर श्री राधादामोदर प्रसन्न रंगवलेले असे.
आत देवब्राह्मणासाठी एक कमान रंगवली जाई. दरवाजे, खिडक्या फ्रेंच पॉलिश/वार्निस पिऊन चमकू लागत. लग्नाआधी दोनतीन दिवस मांडव घातला जाई. त्यावर लोकल पेंटराकडून मांजरपाटावर अमुक तमुक शुभविवाह आणि आपले सहर्ष स्वागत करीत आहे असा मजकूर असे. संपूर्ण रंगकामात काळा रंग वर्ज्य असे. बॉर्डर्स चॉकलेटी असत. हत्तीही निळ्या वगैरे रंगात रंगवलेला असे. पेंटरलोक ह्या संपूर्ण कामाचे गुत्त्याने पैसे घेत असत. बाहेरगावी लग्न असेल तर प्रासंगिक कराराच्या एसटीबसवर लावण्यासाठी मॅरेजपार्टीचा बोर्ड ह्या गुत्त्यात समाविष्ट असे.

काय जबरी निरीक्षण !!

अभ्या शेठ , काय जबरदस्त निरीक्षण !! डोळ्यासमोर उभं केलंस सगळं !! एकदम ब्येष्ट !! काय ते सुस्वा आणि गतम , काय ती फुलदाणी !! पत्रिका आणि नोटा छापण्यातून थोडा वेळ काढून जास्त लिहायला पाहिजे राव तुम्ही. ( गुत्या या शब्दाचा हाही एक अर्थ कळाला . आता विषय निघालाच आहे तर त्या पहिल्या अर्थाचे चित्र वर्णन केव्हा लिहिताय ? का एक धागा काढायचा त्यावर त्यावेळचे बार आणि .. वगैरे )

अजून लिहा हो !!! तुमच्या कडे

अजून लिहा हो !!! तुमच्या कडे लय गोष्टीचा लय भारी माल असतोय ... जरा उघडा आपले अणभव भांडार !!!(स्माईल)

बापटाण्णा तुमच्यासाठी. माझा

बापटाण्णा तुमच्यासाठी.
माझा नेक्श्ट प्रतिसाद मिळेपर्यंत हे वाचा. (डोळा मारत)

लिही रे आणखी.

पर्यावरणरक्षकांनो मला माफ करा.

हा त्या धाग्याचा सर्वोच्च बिंदू आहे. (डोळा मारत)

आणखी लिहीच. वेळात वेळ काढून लिही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाचले , प्रतिसाद पण ...;)एक

वाचले , प्रतिसाद पण ...;)एक सांग , ते लग्न केलंस का अजून छापतो आहेस फक्त

शिक्रेट हाय ते.

शिक्रेट हाय ते. (डोळा मारत)

अभ्या.. पत्रिका ठेवल्या असशील

अभ्या.. पत्रिका ठेवल्या असशील तर म्युझिअम करून तिकिट लाव.सगळ्यास्नी गुंडाळलंस की !!

ते फेटे बांधण्याचं प्रकरण!!
चिंचवडात लग्न लागायच्या अगोदर नवरानवरी खास कपडे बदलायला गेले तेव्हा त्या वेळेचा सदुपयोग - पंचक्रोशितल्या सर्व पक्षांच्या मान्य ( =मान्यवर )नेत्यांना -अंदाजे पन्नास फेटे बांधले.

पत्रिका नमुना १: शादी खाना-ए-आबादी (२००१)

पत्रिका नमुना २: पान सुपारी (१९६५)

रिसेप्शन वा संध्याकाळचे स्नेहभोजन ह्याला 'पानसुपारी' असे म्हणत. हा १९६५ सालच्या लग्नपत्रिकेतला मजकूर.

पत्रिका नमुना ३: परशुरामा..! (१९९२)

या पत्रिकेतला सगळाच मजकूर सुरस आहे.
'शरीरसंबंध करण्याचे योजिले'पासून ते 'अनंतवर भिकीची मर्जी झाली'चा प्रवास रंजक असणार यात संशय नाही.
शिवाय 'परशुरामा तूच नाव लाव आता किनार्‍याला' हे वाक्य 'देवाक् काळ्जी' किंवा विपर्यासाने 'उठाले रे बाबा' या धर्तीचे आहे. (डोळा मारत)

त्यापेक्षासुद्धा...

शिवाय 'परशुरामा तूच नाव लाव आता किनार्‍याला' हे वाक्य 'देवाक् काळ्जी' किंवा विपर्यासाने 'उठाले रे बाबा' या धर्तीचे आहे.

त्यापेक्षासुद्धा, आमंत्रण देणाऱ्या 'आपले नम्र'मध्ये कोणीतरी कै. लक्ष्मण सोनू अग्रस्थान राखून आहेत.

बोले तो, मर्तिकाची आमंत्रणे मयताच्या स्वाक्षरीने जात नसतीलही कदाचित (साभार: पु.ल.), परंतु लग्नाची जाऊ शकतात, असे म्हणायला जागा आहे.

अर्थात, कै. अत्रे, कै. गडकरी यांसारखी ती पदवी कोणीतरी श्री. लक्ष्मण सोनू यांस आदरासहित बहाल केली असल्यास (पुन्हा, साभार: पु.ल.) बात अलाहिदा.

पदवी नसावी

कै ही पदवी नसावी कारण लक्ष्मण सोनू यांच्या नावाखाली कोणी गं.भा. स्त्री, आपले मध्यनाम लक्ष्मण असे मिरवत आहेत.

१. गं.भा. = गंगाभागीरथी = विधवा. मी अगदीच काही 'ही' नाहीये हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गोट्या (बोले तो, ताम्हणकरांचा)...

...वाचला नाहीत काय कधी?

त्यात शेजारच्या निरक्षर आऊताई आपल्या यजमानांना नेमके ऐन दिवाळीत अचानक कामानिमित्त कोल्हापुरास जावे लागल्याकारणाने भाऊबिजेनिमित्त आपल्या भावास पाठवायचे पत्र या खेपेस गोट्याकडून लिहवून घेतात, नि नुकत्याच इंग्रजी शाळेत जाऊ लागलेल्या गोट्यास आपल्या ज्ञानप्रदर्शनाची आयती संधी मिळते. त्यात पुन्हा आपले महाशय नुकतेच मराठीच्या तासाला (मराठीच्या मास्तरांना तोंडातून मरणवाचक शब्द काढवत नसल्याकारणाने) 'गेलेल्या माणसास कैलासवासी म्हणायचे आणि गेलेल्या माणसाच्या पत्नीस गंगाभागीरथी म्हणायचे' असे शिकून आलेले असल्याकारणाने ते ज्ञान त्यांच्या डोक्यात तूर्तास ताजे असते. परिणामी, जावक पत्राचा मसुदा काहीसा असा: 'काल आमचे हे अचानक कोल्हापुरास कैलासवासी झाल्याकारणाने या खेपेस पत्र मला पाठवावे लागत आहे. ... आपली लाइकती, गंगाभागीरथी आऊताई.' बरे, आऊताई स्वत: निरक्षर असल्याकारणाने पत्र पोष्टात पडण्यापूर्वी प्रुफे तपासण्याचा प्रश्न नसतो; सगळा विश्वासाचा मामला. परिणामी पत्राच्या गंतव्यस्थानी यायची ती बहार येते.

सांगण्याचा मतलब, उपरपत्रिकोल्लेखित (अवांतर: संधी साधला काय?) श्रीमती लक्ष्मण सोनू यांनाही कोणी (कदाचित ज्याने/जिने श्रीयुत लक्ष्मण सोनू यांस 'कै.' ही पदवी बहाल केली, त्याने/तिनेच?) 'गं.भा.' ही पदवी बहाल केलेली असण्याची शक्यता ही अगदीच नाकारता येत नाही. (कोई पुरानी दुश्मनी होगी शायद| कदाचित 'कंपॉझिटराचा सूड' यासच म्हणत असावेत काय?)

असो.

यातल्या उल्लेखनीय वाटलेल्या

यातल्या उल्लेखनीय वाटलेल्या गोष्टी:

- दोन्ही पक्षांकडून एकच पत्रिका छापवलेली दिसते आहे. इकॉनॉमीज ऑफ स्केल?
- वरील विनंतीस मान देऊन मध्ये ज्यांची नावं आहेत त्यात पांडुरंग हरि आणि बाबाजी पांडुरंग ही एकच बापलेकांची जोडी आहे. गोतावळा चांगलाच मोठा दिसतो आहे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

पत्रिका नमुना ४: प्रीतीची दोन पाखरं.. (२००६)

'कुंडलिका'पासून ते 'नविन आहेर'पर्यंत सगळंच नविन.

अमुकराव, हळदीच्या तारखेत २००६

अमुकराव,
हळदीच्या तारखेत २००६ ऐवजी २०६ झालंय बरका.
बाकी सेलू ची पत्रिका आहे म्हणल्यावर काय बोलणार म्हाराजा. मराठवाड्यातल्या पत्रिकांचे मायने टाकीन नमुन्यादाखल वेळ मिळाल्यास.

अमुक रावांच्या एका ओवर मध्ये

अमुक रावांच्या एका ओवर मध्ये 4 सिक्सर !!! कुठून कुठून जमवल्यात राव , लय भारी ... येउंदया अजून .... अभ्या बघ लेका , तुला आता निदान 6 तरी रोचक किंवा माहितीपूर्ण टाकाया हव्या !!!

कोल्हटकरांच्याच सुदाम्याचे पोहे वाचतांना

नुकतेच सुदाम्याचे पोहे मधील लग्नसमारंभ हा लेख वाचला व अनेक प्रश्न उभे राहीले जाणकारांनी उलगडा करावा ही विनंती
१- एके ठीकाणी ओळ येते तिथीनिश्चयही होऊन चुकला मुंबईस लग्न ठरले, थोड्याच दिवसांत सर्व इष्टमित्रांसह मुंबईस जाउन एका टोलेजंग वाड्यात "जानोसा" दिला.
हा " जानोसा" म्हणजे काय असते ?
२- एके ठिकाणी " मागे रुईच्या झाडाशी माझा विवाह झाला होता " ही झाडाशी विवाह करण्याची चाल कसलीये ? म्हणजे इतर घट इ. माहीतीय पण झाडाशी ?
३- " दररोज सकाळी व्याह्यांकडील बायका आमच्या बायकांकडे "अंबोण" घेउन येत असत. त्यात सरकी, वांग्याची डेखे वगैरे म्हशीपुढे मांडण्याजोग्या सामग्रीचा समावेश असे.
तर अंबोण खाण्यासाठी होते की नुसतेच.
४- वधुगृही भोजन होण्याच्या प्रसंगी वराला अंगठीकरता रुसवण्याची चाल आहे. याचे एक वर्णन येते हे म्हणजे ऐनवेळचे दबाव आणुन हुंडा उकळण्याचा अधिकृत प्रकार होता का ?
५- " लवकरच वरातीचा व झालीचा समारंभ झाला. झालीच्या प्रसंगी जे दिव्यांचे शिपतर वडील माणसांच्या डोक्यावर ठेवतात ते रत्नखचित मुकुटाप्रमाणे शोभत असते" ही काय चाल आहे ?
६- सगळ्यात भारी हे वाटलं मला एके ठीकाणी " आमच्याकडील विहीणीस तिकडील विहीणींनी रात्री बारा वाजता पायघड्या घालुन वाजत गाजत "रासन्हाणाकरीता" मिरवीत नेले व नंतर न्हाण्याचा थाट उडविला. त्यात त्यांच्याकडील एका करवलीने अंगास खाज आणणारी वनस्पती आमच्याकडील एका विहीणीस लावुन तिची खाजवुन खाजवुन पुरेवाट केली. पण या चालीचे सनातनत्व लक्षात घेऊन...." रासन्हाण्यांचे वेळी आमच्या कडील बायकांना बांगड्या घालण्यात आल्या त्यांची नावे काय सांगु ? राजवर्खी, कनकतारा, छानछबेली, चटकचांदणी, हंडीगलास, तारामंडळ, राणीचा बाहुटा, केरवा, बायसिकल फ़ार काय सांगावे सर्व सजीव निर्जीव सृष्टी त्यांच्या हातात होती म्हटले तरी चालेल.
हे "रासन्हाण" प्रकरण काय होत नेमकं ? एकुण प्रकार रोचक वाटला. वरील पैकी कुठल्या प्रथा आहेत अजुन शिल्लक की संपल्या ?
जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती.

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

पूर्ण माहिती नाही, पणः जानोसा

पूर्ण माहिती नाही, पणः

जानोसा / जानविसा : विवाहस्थळी "अवे टीम" जिथे उतरते ती जागा. (उदा० वराच्या गावी लग्न झाल्यास वधूपक्ष ही "अवे टीम".) एकप्रकारचं टेम्पररी लग्नघर.

"रुईच्या झाडाशी विवाह" : एखाद्या पार्टीची पत्रिका जेव्हा "लग्नानंतर आपोजिट पार्टीचा मृत्यू" असा योग दाखवते, तेव्हा प्रथम रुईच्या झाडाशी लग्न लावून देतात.

"झालीचा समारंभ" : ही प्रथा अजूनही आहे. म्हणजे एका चाळणीत बरेच दिवे लावतात. वराकडच्या दहाबारा ज्येष्ठ / कर्त्या मंडळींना बसवतात, आणि वधूचे आईबाबा प्रत्येकाच्या डोक्यावर ती चाळणी धरतात. ज्याच्या डोक्यावर चाळणी धरली आहे ती व्यक्ती त्यात लाह्या टाकते. मला वाटतं मूळ उद्देश "आता आमची मुलगी तुमची जबाबदारी आहे" हे वराकडच्या ज्येष्ठ लोकांना सांगणे हा असावा. माझ्या अनुभवात मात्र याचा उपयोग मानापमानाच्या तलवारी परजण्यासाठीच झाला आहे. (डोळा मारत)

---------
एका मित्राच्या लग्नात वधूपक्षाकडच्या प्रथांमध्ये "वराने रुसणे" ही प्रथा होती. (अंगठीकरता असं नव्हे - जनरल.) या मित्राचे वडील अत्यंत शिवराळ आहेत. त्यांच्या घरच्यांना या शिवराळपणाची सवय आहे. हे रुसणं बिसणं त्यांना काही आवडलं नाही. ऐन समारंभात मित्राच्या कानाशी म्हणाले, "बेट्या, रुसलाबिसलास ना तर **ला डाग देईन!" नेमका माईक चालू होता. काकांचा आवाजही जरा ट्रेबलमय. त्यामुळे आख्ख्या कार्यालयात हे घुमलं. वरपक्षाकडचे निवांत होते. वधूपक्ष मात्र कावराबावरा झाला.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

झाल

झाल हे प्रकर्ण ३० दिवे लावून करतात; महिन्याच्या ३० तिथ्या म्हणून ३० दिवे. वधू-वरांच्या आयुष्यात अमावस्या, पौर्णिमा किंवा अधलंमधलं काहीही असलं तरीही ह्या सगळ्यांनी त्यांची साथ द्यावी, असं कायसंसं म्हणायचं असतं (म्हणे!); लाह्या टाकणं म्हणजे (खंडणी दिल्यासारखं), 'होय, होय, साथ देईन. (पण माझ्या डोक्यावरची ही आग दुसरीकडे न्या)', असं असावं.

(आमच्या विस्तारीत कुटुंबात, एका घरच्या लग्नात असे सगळे विधी झाले होते. वधूने दिवसभरात ८-१० साड्यांचा फॅशन शो केला होता (इति - मी आणि भाऊ). त्यात झालीसाठी एका स्वतंत्र साडीची सोय वधूमातेने केली होती. लग्नाआधी, त्या साड्यांचं प्रदर्शन बरेचदा भरत असे आणि प्रदर्शनाच्या 'डोसंट टूर'मध्ये ही झालीची माहिती आमच्या कानांवर आघात करून गेली.)

झाल चाळणीत का धरतात, परातीत का नाही; किंवा "तुमच्याकडे चाळणीत धरतात होय, आमच्याकडे परातीत असते", इतपत बोलण्याएवढा माझा व्यासंग नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जानोश्याचे आणि रुईच्या

जानोश्याचे आणि रुईच्या झाडाच्या माहीतीबद्दल सहमत.
रासन्हाण म्हणजे चार बाजूला पितळी लोटे ठेवून दोरे गुंडाळून नवरा नवरी असे गुडघ्यात डोके खुपसून गरम पाणी आणि चावट शेरे अंगावर घेतानाचे दृश्य पाहण्यात आहे. फुल्ल एंटरटेनिंग कार्यक्रम असायचा लग्नाच्या आदल्या दिवशी. उखाण्यांची वगैरे रेलचेल असायची. माहेरी म्हशी धुण्याची पुलकॉमेंट बहुतेक ह्याच रासन्हाणावर होती.

एकमेकांच्या गुढग्यांत डोकी

एकमेकांच्या गुढग्यांत डोकी खुपसून? वॉव, दे वेअर नॉट किडिंग व्हेन दे कॉल्ड इट शरीरसंबंध.

विडा (का विड्या?) तोडणे

विडा (का विड्या?) तोडणे नावाचा असाच एक विधी होता. वराने तोंडात धरलेला विडा वधूने खाणे अशा टाइप असावा. कोणाला माहिती आहे का?

आमच्या लग्नात आमच्या काही

आमच्या लग्नात आमच्या काही सीनियर नातेवाईकांनी आमची गंमत बघण्यासाठी विडा तोडणे प्रकार करायला लावला होता. आम्ही निर्लज्जपणे तो फारच सखोल आणि प्रदीर्घ पद्धतीने केल्यावर त्यांचीच लाजून पळापळ झाली. यांना कुठ्ठे कुठ्ठे न्यायला नको अशी मेंटल नोट करत त्यांनी आपल्या माना वळवून घेतल्या.

सत्तर वजा एक?

एकमेकांच्या गुढग्यांत डोकी खुपसून?

एकमेकांच्या? असे नेमके कोठे म्हटले त्यांनी?

रच्याकने, एकाने दुसऱ्याच्या गुडघ्यांत डोके खुपसले असता, एकसमयावच्छेदेकरून त्या दुसऱ्यास त्या पहिल्याच्या गुडघ्यांत डोके खुपसणे कसे (रादर, कोणत्या स्थितीत) शक्य आहे?

तुमचे आकड्यांचे ज्ञान 68 च्या

तुमचे आकड्यांचे ज्ञान 68 च्या पलिकडे जात नसावे असा अंदाज करतो.

सत्तर वजा एक...

...असेही काहीसे असते, असे ऐकून होतो खरा. (म्हणून तर प्रतिसादाच्या शीर्षकात त्याचा शंकात्मक रीत्या का होईना, परंतु ज़िक्र केला.) पण काय आहे, म्हणतात ना, की सांगीवांगीची गोष्ट म्हणजे विदा नव्हे, त्यामुळे...

खरय तुमच म्हणण

येथे पाहीजे जातीचे वा पट्टीचे ( उगा जातीयवादाचा लचांड नको ) !

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

प्रकाटाआ

प्रकाटाआ

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

समर ऑफ ६९

मी श्री नवी बाजु यांना समर ऑफ ६९ या चित्रपटाची समीक्षा करुन त्यातली नवी बाजु उलगडुन दाखवणार होतो. पण म्हटल उगाच चारीत्र्यावर शिंतोडे उडवुन घेण्यापेक्षा गप्प राहीलेले बरे हा "मिशनरी" विचार करुन गप्प बसलो. उगाच गुलाबी थंडीत का उन्हाळी झळा ओढवुन घ्या ? असा विचार करुन पुन्हा रजईत डोके खुपसुन गुमान पडुन राहीलो.

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

सेक्सी कार्यक्रम होता म्हणजे

मचाक चा विषय झाला नाही का कधी ?
स्मिताली..

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

हहपुवा !!!!!!!

हसलो जोराने
इथे ती लोळुन हसणारी स्मायली पहावी आम्हाला टा़कणे जमत नाही कधी. (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत)

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

काय एकसेएक प्रतिसाद आहेत..

काय एकसेएक प्रतिसाद आहेत.. लोल.. (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत)

मैं तो पिया से नैना लगा आयी रे..

भारी लेख होतोय.

भारी लेख होतोय.

काय चर्चा ती!

काय चर्चा ती! (लोळून हसत)

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

रुसवा

आमच्या नात्यातील आधीच्या पिढीतल्या एका लग्नात जेवायला कुठल्यातरी पदार्थात वांगी होती म्हणून वरपित्याने* ताट फेकून दिल्याचे ऐकले आहे. "आम्ही वांगी गुरांना खायला घालतो" असा त्यांचा दावा होता. त्यानंतर वेगळा पदार्थ करून वाढण्यात आला असे कळते.

*आमच्या लग्नात जेवणात वांगी** असती तर आम्ही तसेच केले असते ही दाट शक्यता आहे. अर्थात आमच्याकडे गुरे नसल्याने आम्ही गुरांना वांगी खायला घालत नाही त्यामुळे बाणेदार वाक्य कोणते उच्चारावे हा प्रश्न पडला असता.
**वांग्याऐवजी मला व बायकोला दोघांनाही न आवडणारी डाळिंब्यांची*** उसळ मात्र होती. पण आम्ही ताट फेकले नव्हते.
***डाळिंब्यांची उसळ होती म्हणजे जेवण लै भारी**** होते असे बहुतांश उपस्थित पाहुण्यांचे मत झाल्याचे कानावर आले.
****कारण शेवटी ती सारी .... (इति पु.ल.)

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

****कारण शेवटी ती सारी ....

****कारण शेवटी ती सारी .... (इति पु.ल.)

आम्हीही! (बोले तो डाळिंब्यांचे - आणि वांग्याचेसुद्धा! - पक्षकार.)

परंतु वस्तुतः डाळिंब्या ही भटांपेक्षासुद्धा सीकेप्यांची खासियत आहे, असे कळते. ('त्यांच्यां'त त्यांना 'बिरडे' की कायसेसे म्हणतात, असे ऐकून आहोत. चूभूद्याघ्या.)

बिरड्यांमध्ये जातीयवादी काय

बिरड्यांमध्ये जातीयवादी काय असतं !!! आमच्या घरीही बिरड्या च म्हणतात .

शीकेपी लोक मुगाची उसळ सुद्धा

शीकेपी लोक मुगाची उसळ सुद्धा सालं काढून करतात. त्याला बिरडं म्हणतात असं मला वाटे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

लग्नात मुलाकडचे लोक भांग पिऊन

लग्नात मुलाकडचे लोक भांग पिऊन यायचे किस्से ऐकले आहेत.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

पक्षीय पक्षपात

मी लहानपणी हजर असलेल्या बहुतांशी लग्नांत, वधूपक्षाकडून असल्याने(काय करावे, बहिणीच जास्त) जेवणाच्या पंगतींमधे पक्षीय पक्षपात अनुभवला आहे. लहान मुलं असलो तरी, दुपारी तीनच्या आधी कधी जेवल्याचे स्मरत नाही. कारण वरपक्षाची जेवणंच तोपर्यंत चालत. जेवणाची वाट बघायची एक खोली असे आणि त्यांत सर्व पुरुष पानसुपार्‍यांच्या तबकासमोर वाट पहात बसलेले असत. खेळून खूप दमल्यावर तिथल्याच एखाद्या गादीवर आमचा डोळा लागे. त्यानंतर आईने शोधत येऊन उठवल्यावर, ती मला पंगतीत नेऊन बसवीत असे. पानातले वाढणे हे इतक्या वेगाने चाले की काय वाढत आहेत याचा अंदाज येण्याआधीच पानात बचकभर पांढरा भात वा मसालेभाताचा डोंगर येऊन पडत असे.पानांत काही टाकायचे नाही, हा दंडक असल्याने तो भाताचा डोंगर संपवेपर्यंत पोट भरुन जाई आणि मुख्य पक्वान्न खायला भूकच उरत नसे. कित्येकदा, एखादा आवडलेला पदार्थाची वाट बघताना, तो वाढणारी व्यक्ती अदृश्य होई.
जेवताना सुरवात करताना ती कोशिंबिरीचे पाणी घुसलेली खीर सर्वप्रथम खाल्ली नाही तर उद्धार होत असे. वाढपी तर कित्येकदा, या टोकापासून त्या टोकापर्यंत, पदार्थ ओततच धांवत असत.

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

स्वर्गीय पितरांना आमन्त्रण.

Invitation to ancestors

वरील पत्रिकेतील मजकूर इतिहाससंशोधक अ.रा.कुलकर्णी ह्यांच्या एका लेखामध्ये मिळाला. त्यांच्याच विवेचनानुसार निमन्त्रणकर्ते आहेत सातार्‍याचे छत्रपति रामराजे, १८४८ साली ज्यांच्या निपुत्रिकपणाचे कारण दाखवून त्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांकडून गादी खालसा झाली ते छ्त्रपति शहाजी ऊर्फ अप्पासाहेब ह्यांचे दत्तक पुत्र. छत्रपति रामराजे ह्यांनी हे निमन्त्रण आपले चिरंजीव शिवाजीराजे ह्यांच्या विवाहाच्या निमित्ताने दिलेले आहे. पत्रिकेच्या मजकुरामध्ये वर्षाचा कोठेच उल्लेख नाही पण तिथि आणि वार जुळविता ही पत्रिका १८८१, १८८४ अथवा १८८८ ह्यांपैकी कोठल्यातरी वर्षात झालेल्या लग्नाची दिसते. अशाच मजकुराच्या अन्य चार पत्रिका शहाजी महाराज वृंदावन शंभू महादेव, शाहू महाराज वृंदावन संगम माहुली, रामराजे महाराज वृंदावन संगम माहुली आणि शाह राजेश्वर महाराज वृंदावन संगम माहुली ह्यांनाहि देण्यात आली आहेत.

हे सर्व निमन्त्रणकर्ते रामराजे ह्यांचे पूर्वज आहेत. शहाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे पिते. त्यांचा मृत्यु कर्नाटकात होडिगेरे येथे घोड्यावरून पडल्यामुळे १६६४ साली झाला. त्यांचे वृंदावन - स्मारक - नंतर त्यांचे प्रपौत्र शाहू ह्यांनी शिखर शिंगणापूर येथे बांधले. त्या स्थानाचा उल्लेख पत्रिकेत आहे. अन्य पूर्वज म्हणजे ताराऊ ऊर्फ ताराबाई (मृत्यु १७६१), शाहू (मृत्यु १७४९), रामराजे म्हणजे शाहूचे दत्तक पुत्र (मृत्यु १७७४) आणि निमन्त्रणकर्ते रामराजे ह्यांचे वडील राजेश्वर महाराज ऊर्फ अप्पासाहेब (मृत्यु १८४८). ह्या सर्वांचा मृत्यु सातारा येथे झाला आणि त्यांचे दहन सातार्‍याच्या पूर्वेस ३ मैलावर कृष्णा आणि वेण्णा ह्यांच्या संगमावर संगम माहुली येथे झाले आणि त्यांची वृंदावने तेथेच बांधली गेली. (सातारा गावाचे श्मशानस्थान अजूनहि तेथेच आहे.)

वर उल्लेखिलेला 'शरीरसंबंध' ह्या शब्दाचा स्पष्ट उपयोग येथे दिसतो. अशा प्रकारे मृतात्म्यांना विवाहाची निमन्त्रणे पाठविण्याची प्रथा 'नांदीश्राद्ध' हिचेच जुळे भावंड दिसते. 'नांदीश्राद्ध' ब्राह्मण समाजात असते. त्यामध्ये आई आणि वडील बाजूच्या तीन पिढ्यांतील पूर्वजांना आवाहन करून त्यांना शुभकार्यामध्ये पिंडदान करण्यात येते.

मृत पूर्वजांना पत्रिका पाठविण्याची चाल आता पूर्णतः नष्ट झाली आहे. त्या जुन्या चालीची दर्शक अशी ही पत्रिका येथे मुद्दाम दाखविली आहे.