पंगत

पंगत वाढलीय -- जरा बसून घ्या!

तर बरं का मंडळी ......

एकदा एका गावात .. मोठी लगीन घाई झाली
पायताणं नाही कुणाच्या .. पायामध्ये राहिली ।

फेटे आणि मुंडाशी .. डोईवर चढली
बिलवर , पाटल्या संगे .. नथ ही झुलली ।

जिलब्यांची रास .. श्रीखंडाचा घास
रंगीत रांगोळीची .. पंगतही सजली ।

नाव घ्या, नाव घ्या .. मंडळी बोलली
नवी नवी पाटलीण .. गालातच हसली ।

घेऊ कसा उखाणा .. (तिला) कोडं पडलं नवं
कोणाचं नाव ? .. आणि कसं बाई घ्यावं? ।

सगळे म्हणती बाई .. लाजू नको काही
नाव घे झोकात .. आणि सांग काही-बाही ।

पाटलीण बोलली लाजून .. घेते मी नाव
मान तुमचा राखून
ताई, माई, अक्का जरा ... घ्याल ना सांभाळून? ।

पदराला सावरित मग .. पाटलीण हळू बोले
रावांचे घेऊ? पंतांचे घेऊ ? .. का घेऊ दादांचेच नाव पहिले? ।

(१)

लहानशा या गावात .. किर्ती दादांची मोठी
दहा, पंध्रा वर्सं झाली .. पार केली साठी ।
आपल्या हातान मोडली .. आधाराची काठी
आंब्याचा गर फेकून .. राखून ठेवती बाठी ।
गवगवा मोठा .. जरी काम थोडं फार
दादांच्या नावाचा .. दरारा फार फार ।

(२)

घंटा वाजवून देवासमोर .. दंडवत कुणी घाली
तासभर प्रवचन देऊन .. पंत बसलेत खाली ।
डोळे मिटून अर्धे .. पाहती दक्षिणेची थाळी
नजरेनेच जोखती .. किती जमले तांदूळ-डाळी? ।
कुणाचे काय ? .. आणि कशाचे काय ?
बघता बघता पंतांचे .. नेहमीच फाटक्यात पाय ।

(३)

पंत पडले म्हणून म्हणे .. चढले आहेत राव
हात ठेवून तोंडावर .. हसतोय सारा गाव ।
माडी बांधून झोकात .. होते, मिरवीत येथे राव
त्या साठी टाकून काडी .. जाळलाय त्यांनी गाव ।
फसलाय पाय आता .. गुंते झालेत फार
राव जरा कमी खा .. वाढलाय भुईचा भार ।
गुणाचे आहेत राव मोठे .. नाव मोठं अन लक्षण खोटे
साऱ्यांना माहित गुपित त्यांचे .. नफ्याशी त्यांचे साटेलोटे ।
काय राव ? कस्सं राव ? .. कुणालाच काही नाही ठाव ?
माइक घेऊन सांगा जरा .. आहे काय तुमचा भाव ?

उखाणे ऐकता ऐकता
पंगत सारी रंगली ।
कुणाला नाही कळले
वेळ वरातीची टळली ।।

सजलेली घोडी अन
उभे बँण्ड वाले ।
हात धुण्यासाठी सारे
वऱ्हाडी पांगले ।।

(आणि हो, सारं काही हलकं हलकं घ्यायचं )

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त लिहलय. छान..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0