आरसा


बायसिकल थीफ
प्रसंग अगदी साधा आहे. एका मित्राकडे बसलो होतो. त्याचा मुलगा टी.व्ही. बघत होता. आम्ही बोलत होतो. बायसिकल थीफ ह्या चित्रपटाबद्दल. प्रश्नांचा पाठपुरावा किंवा उत्तरांचा अट्टाहास अजिबात न करता, एक कासाविस करणारा अनुभव तुमच्या पुढे मांडून बायसिकल थीफ हा चित्रपट संपून जातो. पण चित्रपटामधली तुमची गुंतवणूक संपत नाही. बाप आणि मुलाच्या ह्या गोष्टीची भेट पुढेही वारंवार होत रहाते. जगतांना कधी पेच पडला तरी तिची सोबत असते.
‘बायसिकल थीफ’ चं शेवटचं दृष्य आठव- मित्र म्हणाला. मुलाची आणि बापाची नजरानजर होते. मुलगा हात पुढे करतो आणि बाप त्याच्या आधारानं चालू लागतो. त्याक्षणी नेमकं काय घडतं ? तो माणूस मुलाएवढा होऊन जातो की मुलगा त्या अनुभवामुळे मोठा होतो?
मी त्यावर काही बोलणार एवढ्यात गाण्याच्या ओळी कानावर आल्या –
“ सबसे बेहतर कभी न बनना
जग के रहबर कभी न बनना
पीर, पयंबर कभी न बनना
सच्ची बात कही थी मैंने “
आम्ही स्तब्ध होऊन ऐकत राहिलो. मुलगाही ऐकत होता. गाणं संपलं. आमच्यातलं संभाषण तुटलं होतं.
रहबर म्हणजे काय ? मुलाचा प्रश्न. मित्रानं अर्थ सांगितला.
बेहतर म्हणजे ? चांगला. मी म्हणालो.
सगळ्यांपेक्षा चांगलं होऊ नका असं तो का म्हणतो ? मुलानं ताबडतोब प्रश्न टाकला.
आम्ही दोघं एकमेकाकडे पहायला लागलो. ह्या प्रश्नाचं उत्तर एकदम देता येईना. मी हार मान्य करून गप्प झालो. मित्रानं पुढल्या ओळींमधल्या शब्दांचे त्याला ठाऊक असलेले अर्थ सांगायला सुरूवात केली आणि शेवती कसातरी विषय बदलला. मुलगा पुढच्या कार्यक्रमात रंगून गेला. मी मित्राचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडलो. पण त्या अतिशय सुंदर कवितेइतकाच त्या मुलाचा प्रश्न ही माझा पाठलाग करत राहिला.
खरं म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर देणं वाटलं तितकं अशक्य नव्हतं. वास्तवाचं खिन्न करणारं भान देणा-या त्या ओळींमधून स्वत: च्या निष्ठांसाठी प्राण देणा-यांच्या आत्म्यातला सल जाणवत होता. सत्याचा पाठपुरावा करणा-यांना एकाकी करून टाकणारं भ्रमनिरासाचं सावट त्या कवितेतेल्या प्रत्येक ओळीत शब्दाशब्दावर पडलेलं जाणवत होतं. हे सगळं त्या मुलाला सांगताही आलं असतं कदाचित. पण त्या ओळींमधून संक्रमित होणारी उदास, अलिप्तता ? ती वगळता आली असती? ह्या प्रश्नापाशी मी थबकलो. वाटलं की , मनात एक आणि बाहेर एक असं जगणं इतकं सवयीचं झालेलं असतं आपल्या की एरव्ही ते कधी वेगळं जाणवतही नाही. नेहमी मुखवटा धारण करून वावरणा-याला कालांतरानं स्वत:चा मूळ चेहराच आठवू नये आणि कधी आठवण उजळलीच तर तो आवडू नये असं होऊन बसतं. स्वत: ची कातडी वाचवत, धडपडत, आपण जगत राहतो. आणि जगतांना मनातून अपराधीही वाटत असतं. तो अपराधबोधच अशा एखाद्या साध्याभोळ्या प्रश्नापुढे आपल्याला गप्प करून टाकतो. मग आपण पवित्रे घेतो, प्रतिक्रियाच देण्याचं टाळतो, अस्सल, थेट अनुभूतीपासूनच दूर पळू लागतो. स्वत: भोवती समज, अपसमज, गैरसमजाचं रान उठवून त्यात हरवून जाण्याची धडपड करत बसतो.
कवितेच्या व्यंग्यार्थाची भूल अनेकदा अनुभवली होती. ध्वन्यार्थाचा चकवाही. पण कधीकधी तिथपर्यंत जायची वेळच येत नाही. साधे, सरळ शब्द, वाच्यार्थाशीच आपला पराभव करून जातात.
खरं म्हणजे आपल्यापुढे निराळाच पेच असतो. जमेल तसं आल्या दिवसाला सामोरं जावं आणि त्या धडपडीतून शिकता येईल तेवढं शिकावं एवढं शहाणपण मागल्या पिढीनं आपल्याला दिलं. पण ते किती अपुरं आहे हे आता क्षणोक्षणी जाणवत असतं. सत्याचा एवढा ध्यास घेऊन जिवंतही राहता येत नाही हे आज त्या पोराला सांगितलं नाही तरी येत्या काही वर्षात चांगलंच ठाऊक होईल हे कळत असतं. आणि तरीही मागल्या पिढीनं सोपवलेला इतिहासाचा उरलासुरला जीर्णशीर्ण वारसा पुढल्या पिढीच्या स्वाधीन करण्याचा हट्ट असतोच. संकोच वाटतो. पण देण्यासारखं त्याव्यतिरिक्त जवळ काही नाही हे ठाऊक असतं. पण असं करतांना एखाद्या पिढीत मुलांच्या वाट्याला फक्त आख्यायिकाच येतील अशी भीतीही वाटते.
एका प्रश्नाचं उत्तर मनात तयार करेपर्यंत, गोळा केलेल्या शब्दांमधून अनेक प्रश्न निर्माण होऊन, घेरून उभे राहिले की माझ्यासारखी माणसं निरूपायानं नि:शब्द होऊन जातात.
एवढं सगळं मनात आल्यावरही, चिवटपणानं, स्वत:ची समजूत घालण्यासाठी ‘बायसिकल थीफ’ चं शेवटचं दृष्य पुन्हा डोळ्यांपुढे आणलं – मुलाची आणि बापाची नजरानजर होते, मुलगा हात पुढे करतो आणि बाप त्याच्या आधारानं चालू लागतो- गर्दी पासून दूर.
खरंच त्या क्षणी नेमकं काय घडतं ? तो माणूस मुलापुढे लहान होऊन जातो की मुलगाच - ?
मला वाटतं मुलगाच मोठा होतो. तुम्हाला ?

(संदर्भ : जगजित सिंग ह्यांनी गायलेली- ‘सच्ची बात कही थी मैंने’ ही गजल यू ट्यूब वर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. ‘बायसिकल थीफ’ व्हित्तोरियो डिसिका ह्यांचा प्रसिद्ध चित्रपट. )

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मुक्तक आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संवेदनशील मनाची तगमग अनुभवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इधर आ ऐ सितमगर हुनर आजमांएंगे , तु तीर आजमां हम जिगर आजमांएंगे.