स्वप्नं विकणारा माणूस

स्वप्नं बघण्याचं वेड प्रत्येकालाच असतं. माणसामधलं हे वेड त्याने हेरलं होतं आणि ठरवलं होतं, आपण स्वप्नं विकायची. छोटी , मोठी , लोभस , गोंडस , कधी अतर्क्य तर कधी आवाक्यातली अशी सगळी स्वप्नं विकायची. स्वप्नं पाहणं खरंतर सोप्पं असतं. कधी झोपेत तर कधी जागेपणी आपण स्वप्नं पाहिलेली असतातच. पण आपल्याला पडलेलं प्रत्येक स्वप्न आपल्या आवाक्यातल असेलच असं नाही. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार स्वप्नं दाखवणं आणि विकणं तसं जिकिरिचच काम, पण ते त्याला जमायचं.

लोकांची स्वप्नं म्हणजे त्याच्यासाठी रंगीबेरंगी फुगे होते. लाल ,गुलाबी , हिरवा , पिवळा अशा रंगांचे. ज्याच्या त्याच्या स्वप्नानुसार त्या त्या रंगाचा फुगा
त्याच्याकडे आलेल्या प्रत्येकाला तो हे पटवून द्यायचा कि या रंगीबेरंगी फुग्यांतल्या एकात हवा भरून तो वर वर जाणं म्हणजेच तुझं स्वप्न पूर्ण होणं आहे. कारण शेवटी माणूस नेहमीच उन्नतीचीच स्वप्नं तर पाहात असतो ना.

ही स्वप्नं विकताना तो माणसांशी एकरूप व्हायचा. त्यांचं स्वप्न जणू आपलंच आहे इतक्या सहजतेने त्यांना समजवायचा. माणूस बघूनच स्वप्नं विकायचा तो. हाताबाहेरच स्वप्न विकायचाच नाही फारसं. मोजून मापून पूर्ण होतील अशीच स्वप्नं विकायचा आणि मग एक स्वप्न पूर्ण झालं कि लोक पुन्हा दुसऱ्या स्वप्नासाठी त्याच्याकडेच यायचे. कुणाला कुठलं स्वप्न कसं विकायचं हे बरोब्बर माहीत असायचं त्याला.

काही लोकांना प्रश्न पाडायचा , "याच्या स्वप्नांचं काय ?" कदाचित त्याला त्याची स्वप्नं विकणारा दुसरा कुणीतरी असावा. तसा कधीकधी हा सुद्धा दुःखी असायचा, म्हणायचा , "स्वप्नं विकली जातायेत पण स्वप्न पूर्ण होत नाहीये".

कळायचं नाही हा नक्की कोण आहे. गूढ होता थोडासा पण बोलका होता. बोलता बोलता लोकांच्या अधुऱ्या स्वप्नांबद्दल जाणून घ्यायचा आणि मग त्याच अपूर्ण स्वप्नाला एखाद्या रंगीत फुग्याच्या टोकाशी बांधायचा आणि सहजपणे तो स्वप्नांचा फुगा समोरच्याला विकायचा.
एकदा एकाने त्याला विचारलं, "हे सगळं इतक्या सहजपणे कसं काय जमतं रे तुला"? तो एवढंच म्हणाला , "मी marketing मध्ये M B A केलंय अरे!!!"

--अभिषेक राऊत

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)