हलती चित्रे आणि ज्ञानरुपी काजवा !

मुठीतल्या वाळुसारख झुळकन आयुष्य निसटून जात असताना,अचानक मला वर्ल्ड सिनेमाचा चस्का लागला. जीवनात किमान वर्ल्ड सिनेमासारखी एखादीतरी गोष्ट पुरेशा गांभीर्याने बघण्याचा प्रयत्न सुरु केला. काही सिनेमे डोक्याच्या दोन फूट वरून जायचे पण बरेचसे मनात घर करून राहू लागले. सिनेमा समजून घेण्यासाठी काय करता येईल असा लडिवाळ विचार मनाला स्पर्शून जात असे. पुण्या,मुंबईला जाऊन ,एखादी कार्यशाळा करून ,ज्ञानसाधनेसाठी कार्यालयातून सुट्टी घेऊन जाण्याचे कष्ट मात्र घेतले नाहीत. सिनेमाचा चालता बोलता ज्ञानकोश 'प्रा.समर नखाते' यांनी घेतलेली एक दिवसीय कार्यशाळा,अकस्मात खजिना सापडावा अशी आमच्या शहरातच लाभली. त्यामुळे तात्पुरते का होईना ज्ञानाचे दिवे प्रकाशले होते.नेहेमीप्रमाणे काही दिवसातच पुन्हा पहिले पाढे पंचावन्न झाले !

सिनेअभ्यासात सातत्य आणणे हे कार्य अशक्य वाटत असतानाच एक फिल्म स्कॉलर माझ्या शांत , दिशाहीन,अभ्यासहीन आयुष्यात तरंग उमटवण्यास प्रकटली.'मदर इंडिया' आणि 'आवारा' या दोन सिनेमावर पुस्तके लिहून अनेक पुरस्कार मिळविणाऱ्या विख्यात गायत्री चॅटर्जी मॅडमच्या एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी (?) होण्याची संधी आली.हे दोन्ही चित्रपट मी अजूनही बघितले नसल्याने त्यासाठी खजील होणे अनिवार्य असेल कि काय या विचारात मी गढून गेले.नर्गिस आणि सुनील दत्त हे दोन्ही प्राणी बघवत नसल्याने मदर इंडिया हा पिळदार सिनेमा बघण्याची आवश्यकता वाटली नव्हती.मदर इंडिया हा चित्रपट जगात किती अफाट लोकप्रिय आहे आणि वर्षानुवर्ष त्याचे स्क्रीनिंग जगात कुठेना कुठे कसे होत असते वगैरे मॅडमच्या गोष्टी ऐकून मी सदगदित झाले. अभिमानाने उर भरून आला परंतु त्याने सिनेमा न बघण्याच्या निर्णयात मात्र बदल झालेला नाही. आवारा मध्ये जुलाबी चेहेऱ्याची नर्गिस असल्याने टीव्हीवर फुक्कटमध्ये घरबसल्या बघण्याची संधी येऊनही आनंदाने सोडून दिली.मी बुद्धयाच वाळीत टाकलेल्या या दोन सिनेमांवर वर्षानुवर्षे अभ्यास आणि संशोधन करून पुस्तकं लिहिलेल्या विदुषीला मी मनोमन साष्टांग दंडवत घातला.

प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या मॅडम छान छान बोलू लागल्या.'व्हाॅट इज सिनेमा?' असा मूलभूत प्रश्न त्यांनी रँडमली तर्जनी रोखत आम्हाला विचारला.माझी तात्काळ दातखीळ बसली.त्यांनी मला प्रश्न विचारू नये म्हणून मी खाली मुंडी घालून पाताळ धुंडू लागले. दादासाहेब फाळक्यांची 'हलती चित्रे ' माझ्याभोवती फेर धरू लागली.शेवटी मुव्हिंग इमेजेस म्हणजे सिनेमा अशी सोपी व्याख्या तिने आमच्या गळी उतरवली.हे तर हरिश्चंद्राच्या फॅक्टरीत छान समजलं होतंच. नाटक आणि सिनेमात काय फरक आहे या पुढच्या प्रश्नाने मला पुन्हा दे माय धरणी ठाय झालं.नाटकात तुम्हाला ठराविक अंतरावर बसून रंगमंचीय घडामोडी बघता येतात आणि सिनेमात क्लोजअप,लॉंगशॉट,मागुनपुढून ,खालूनवरून असे दिग्दर्शक आणि कॅमेरा नेईल तसे बघता येतं असा बेसिक फरक कळला.शॉट ,लाईट,कंटिन्यूइटी आदि व्याख्यांचा काथ्याकूट झाला. आता पुढे विषय गहन होत जाणार असल्याने माझ्यासारख्या ढ विद्यार्थिनीवर उत्तर द्यायची जबाबदारी येईल असे वाटत नव्हते.पाताळ संशोधनातून निवृत्ती घेऊन मी धिटाईने शिक्षिकेकडे बघू लागले.ती छान हसत होती, डोळे मिचकावत होती.तिने उरुग्वे देशातल्या तरुणाने केलेली पाच मिनिटाची शॉर्ट फिल्म दाखवली. त्याच्यावर छोटीशी चर्चा झाली.बस्टर कीटनची 'सेव्हन चान्सेस' नावाची सुरीअल आणि अॅबसर्ड फिल्म दाखवली. जी सगळ्यांनी एन्जॉय केली. बस्टर कीटनच्या अदभूत फिल्म्सची दखल त्याच्या मृत्युनंतर अनेक वर्षांनी फ्रेंच लोकांनी घेतली.चार्ली चाप्लीनने त्याला पुढे येऊ दिले नाही असे त्यांनी सांगितले. बहुतेक हॉलीवूड फिल्म्स मूर्ख असतात त्या बघू नये असं मॅडमचे मत होतं.

बाजीराव मस्तानी सारखे मठ्ठ हिंदी सिनेमे काढू नये आणि पाहु नये असं मत त्यांनी मांडलं. 3 वर्षे हिंदी सिनेमा काढूच नका, तो पैसा लोककल्याणासाठी वापरा असा ( हास्यास्पद) परखड सल्ला त्यांनी दिला. तीन वर्षे हिंदी सिनेमा बघू नका ,टीव्ही बघू नका आणि फिल्म डायरी लिहित जा असं त्यांनी सुचवलं.समांतर सिनेमाला एनेफडीसी सारख्या सरकारी संस्थांनी भांडवल पुरवलं तरी निर्मात्यांनी बहुतेक वेळा सरकार विरोधी सिनेमे काढले.'चौथी कूट' या पंजाबी सिनेमाचा दिग्दर्शक गुरविंदर सिंगची अफाट स्तुती करून त्याने सिनेमात पोलिसांची दडपशाही ठळकपणे दाखवली आहे असं त्या म्हणाल्या.हा अप्रतिम सिनेमा त्यांनी आम्हाला फिल्म सोसायटीमध्ये स्क्रीनिंगसाठी देऊन मेजवानीच दिली होती. भांडवलशाही निर्मात्यांनी आता 'आवारा' सारख्या सिनेमात असलेले सौंदर्य आणि विचार संपवले आहेत असं त्यांनी सांगितलं.त्या सध्या संत तुकाराम या मराठी सिनेमाचा अभ्यास करताहेत त्याची भरपूर जाहिरात केली. या रविवारीच तुम्ही हा सिनेमा बघालअसं मला वचन द्या आणि हात वर करून सांगा पाहू म्हटल्यावर, मी हुरळलेल्या मेंढीगत हात वर न करता तशीच निगरगट्ट बसून राहिले. अधून मधून आवारा आणि मदर इंडिया ही त्यांची पुस्तके अभ्यासण्याची आठवण त्या देत राहिल्या.अखेर माझ्या सिनेमाई विश्वात एका कार्यशाळीय प्रमाणपत्राची निरर्थक कमाई झाली.या प्रमाणपत्राचा मला वर्तमानात किंवा भविष्यात कसलाही उपयोग होणार नाहीये.तर ते असो !

सारांश असा , हिंदी सिनेमाचं एकोणीसावं शतक हा भारतीय सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ असल्याने तिथच रमुया ,त्यावरचीच त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचूया आणि वर्ल्ड सिनेमा बघत जीवनाचं सार्थक करुया ! यातलं एकोणिसावं शतक आणि पुस्तकं वाचन शिताफीने टाळून मी नेहेमीप्रमाणे वर्ल्ड सिनेमारुपी हलती चित्रे बघण्याचा कार्यक्रम सुरु ठेवला आहे. क्वचित प्रकाशणाऱ्या ज्ञानरूपी काजव्यासह पुढचे तरंग उमटेपर्यंत सुखाने जगते आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्तच !!!

>> बाजीराव मस्तानी सारखे मठ्ठ हिंदी सिनेमे काढू नये आणि पाहु नये असं मत त्यांनी मांडलं. 3 वर्षे हिंदी सिनेमा काढूच नका, तो पैसा लोककल्याणासाठी वापरा असा ( हास्यास्पद) परखड सल्ला त्यांनी दिला. तीन वर्षे हिंदी सिनेमा बघू नका ,टीव्ही बघू नका आणि फिल्म डायरी लिहित जा असं त्यांनी सुचवलं.

हिंदी सिनेमा हा लोककल्याणासाठीच असतो असं माझं प्रांजळ मत आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Biggrin :bigsmile:

ज्ञानरूपी काजवा एखादा असतो तोपर्यंत ठीक असतं. पण सुरुवात अशीच होते. मग सिनेमा पाहाण्यापेक्षा या चर्चांमध्येच मन गुंतायला लागतं. आणि मोक्षप्राप्तीकडे दुर्लक्ष होऊन वाटेत मिळणाऱ्या सिद्धींकडेच मन आकर्षित होतं. विश्वामित्रासारखं कधीतरी एकदम ताडकन इदम् न मम म्हणत पुन्हा तपश्चर्येला बसावं लागतं. नाहीतर डोळ्यासमोर सतत काजवे चमकण्याचा अनुभव येतो.

त्यांनी त्यांची मतं लादली. सिनेमा प्रत्येक सिनेमा हेच करतो तरी आपल्यासारखे हट्टी प्रेक्षक ठराविक सिनेमे टाळण्यात यशस्वी होतात. प्रेक्षकांच्या भावनांना डिवचून त्याना पैसे द्यायला लावणे म्हणजे सिनेमा.

आहाहा क्या बात है!!

हुरळलेली मेंढी

या उल्लेखाबद्दल तर तुम जियो हझारो साल, साल के दिन ... वगैरे वगैरे

चॅटर्जींचा एक सल्ला मनावर घेऊन उसंत सखूनं खरोखर फिल्मी डायरी लिहावी असं वाटतं. अगदी रोज नाही लिहिली तरी माफ करू, पण दर आमोशा-पौर्णिमेलातरी काही लिहावं. करण-अर्जुन बघितल्याची किंवा न बघितल्याची एंट्रीसुद्धा चालेल.

(इथल्या काही प्रतिक्रिया पाहता, 'आचरट' अशी सकारात्मक श्रेणी असावी असा विचार आला.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

करण अर्जुन आणि बाहुबली यावर लिहायला सुरुवात केली होती पण थोडेच लिहून तसेच राहिले आहे. जमल्यास पूर्ण करीन Smile

करण अर्जुन हे फॅनफिकसाठी उपजाऊ शेत आहे.

*********
आलं का आलं आलं?

हं होतंय होतंय. जरा जोर लाव.. कोमट पाणी, अंधारखोली सगळं सज्ज आहे.. या फॅनफिकच्या 'टॅहॅ'ची वाट पाहताहेत बाहेर येरझार्‍या घालणारे कान!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ईर्शाद
.
.
.
बाय द वे, हा शब्द बरोबरे का? Wink म्हणजे अर्थ बरोबर आहे का?

गायत्री चॅटर्जी - ह्यांची कसली कार्यशाळा होती? "सिनेमा कसा बघावा" ह्याची का?
पण मग "3 वर्षे हिंदी सिनेमा काढूच नका, तो पैसा लोककल्याणासाठी वापरा" ह्या वाक्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण कसं करणार?
म्हणजे "सिनेमा कसा बघावा" हे शिकिवनार्‍या तैच जर "सिनेमा बघू नका" सांगत असतील तर मग भेंडी आम्ही नेटफ्लिक्सचं सब्स्क्रिप्शन घेतलंय त्याचं काय करायचं??
सांगा!!

चित्रपट रसग्रहण कार्यशाळा होती. या मॅडम पाच वर्षे एफटीआयआय मध्ये होत्या. एफटीआयआयवाल्यांना मी कधीच आवडले नाही अशी लाडिक तक्रारही त्या करत होत्या.मठ्ठ हिंदी आणि हॉलीवूड सिनेमे बघू नका म्हणे. वर्ल्ड सिनेमा बघितला तर चालेल म्हणे . बाय द वे तुम्ही मदर इंडिया आणि आवारा बघितले आहेत काय ते बोला ! Smile

आवारा

नर्गिस राजकपूर दोघेही दिसायला सो सो असले तरी राजकपूरचे दिग्दर्शन मला फार आवडते. त्याचा तो बावळट्ट भोळेपणाचा अतिरेक सोडला तर.

@वर्ल्ड सिनेमा बघा - ही काय फालतुगिरी आहे? जाऊ दे. परत कधी भेटल्या तर त्यांना त्रिदेव, तेहेलका आणि तिरंगा बघितलाय का विचारा. वर्ल्ड सिनेमा म्हणे.

@आवारा आणि मदर इंडिया-नाही आणि नाही.
आवारा बघायची इच्छा तरी होऊ शकेल पण मदर इंडियाबद्दल सॉरी केस आहे - कारण माहिती नाही, पण बघावासा वाटत नाही हे खरं.

बाय द वे तुम्ही मदर इंडिया आणि आवारा बघितले आहेत काय ते बोला !

दोन्ही बघितले आहेत! त्यातल्या नर्गिसला पाहून राजकपूरच्या स्त्रीविषयक 'बघण्यामध्ये' संशय उत्पन्न झाला होता (जो 'राम तेरी गंगा मैली' आणि 'सत्यं-शिवं-सुंदरं' मधले नायिकांचे लक्ष्मीकांत-प्यारेलाल बघून दूर झाला!!)

मठ्ठ हिंदी आणि हॉलीवूड सिनेमे बघू नका म्हणे. वर्ल्ड सिनेमा बघितला तर चालेल म्हणे .

त्यापेक्षा नोटा (नव्या) जाळलेल्या काय वाईट?

बाकी कार्यशाळेचं रसग्रहण उत्तम! आवडलं!

नर्गिस कधीच ग्लॅमरस वाटली नाही. तिचा उभट चेहरा व अजिबातच गोलाई नसलेली फिगर ...

मस्त लिहीले आहे Smile

जबरदस्त लिहिले आहे!

हुरळलेली मेंढी

हे खासच!

उसंतजी सखू,(संघवाले असंच म्हणतात बरं का!)

बरं झालं मी आलो नाही ते त्या "कार्यशाळे"ला. त्याऐवजी कार सर्विसिंग करुन घेतली आणि मधल्या वेळात 'डिअर जिंदगी' पाहून आलो. (पण खरं कारण म्हणजे ३०० रु मला जास्त वाटले. आणि तो कॉर्पोरेट लंच वगैरे आपल्या घशाखाली उतरत नाही.)

मग तुम्ही परवा 'अवेकनिंगज' आणि त्यानंतरचं जब्बर पटेलांचं असंबद्ध भाषण ऐकलं की नाही?

नर्गिसबद्दल-
काही लोकांना सिनेमात आणून हिरो-हिरोवीण कोणी केलं याबद्दल मला जे जन्मजात कुतूहल आहे त्यात पहिलं नाव नर्गिसचं.म्हणजे अ‍ॅक्टर बिक्टर असेल ती(आजकाल अ‍ॅक्ट्रेसला सुद्धा अ‍ॅक्टरच म्हणतात)पण हिरोईन? यानंतर येतात वहिदा रेहमान, बबिता, नूतन, शबाना आझमी, सोनम कपूर इत्यादी.

एफटीआयआय हे नाव वाचलं की हल्ली बरेच वेळा 'डेंजर'वाली खोपडी आणि त्याखाल्च्या दोन क्रॉस हड्ड्या डोळ्यासमोर येतात.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक