द मॉडेल मिलियनर -ऑस्कर वाईल्ड (भावानुवाद)

श्रीमंतीशिवाय सौंदर्याला किंमत नाही. प्रेम करणं हा श्रीमंतांचा प्रांत आहे, ते बेकारांचं कुरण नव्हे. गरिबाने नेहमी वास्तववादी आणि निर्मोही असावं. कमाई गलेलठ्ठ असण्याऐवजी आधी नियमित असणं आवश्यक. आधुनिक आयुष्यातली ही महान सत्ये ह्युई अर्स्किनला कधीही कळली नाहीत; बिच्चारा ह्युई! तात्विक पातळीवर विचार केला तर ह्युई हा काही फारसा महत्वाचा माणूस होता असं प्रामाणिकपणे आपल्याला म्हणता येणार नाही. तो कधीही काही ‘उच्च’ सोडा पण वाह्यात असंही काही बोलला नसावा. पण शेवटी तो एक नीट कापलेल्या तपकिरी केसांचा, अचूक शरीरसौष्ठव आणि भुरे डोळे असलेला अतिशय देखणा माणूस होता हे मात्र तितकंच खरं. तो जेवढा बायकांमध्ये प्रिय होता तेवढाच पुरुषांमध्येही प्रसिद्ध होता. आणि पैसा कमावण्याचं एक कौशल्य सोडलं तर सारे सद्गुण त्याच्याकडे होते. त्याचे वडील वारसाहक्कात त्याच्यासाठी, त्यांची एक घोडदळातील तलवार आणि 'हिस्टरी ऑफ पेनिन्सुलर वॉर' या ग्रंथराजाचे पंधरा खंड सोडून गेले होते. ह्युईने यातली पहिली वस्तू घरातल्या आरशावर टांगली तर दुसरी एका फडताळावर ठेवून दिली आणि स्वत: एका मावशीकडून मिळणार्‍या सालाना दोनशे पौंडाच्या खुराकावर जगत होता.

त्याने जगण्यासाठी म्हणून काय काय करून पाहायचं सोडलं होतं? सहा महीने त्याने स्टॉक एक्स्चेंजमध्ये हातपाय मारून पाहीले, पण तेजीमंदीच्या त्या गलबलाटात आपल्या या नाजुक पाखराचा चिवचिवाट कोण ऐकणार? यापेक्षा थोडा अधिक काळ तो एक चहाविक्रेताही बनला होता. पण त्याचाही त्याला लौकरच कंटाळा आला. नंतर त्याने शेरी नावाची मदिरा विकून पाहिली. तीही फारशी रंगली नाही. अखेरीस तो काहीच बनला नाही.

या दुष्काळात तेरावा महिना म्हणजे तो आता प्रेमातही पडलेला होता. त्याची प्रेयसी म्हणजे लॉरा मर्टन. भारतात राहून पोट आणि डोकं, दोन्हीचं ताळतंत्र कायमचं गमावून बसलेल्या एका निवृत्त कर्नलची मुलगी. लॉरा त्याचे खूप लाड करत असे आणि तोसुद्धा तिचे शब्द झेलायला कायम तत्पर असे. ती दोघे म्हणजे लंडनमधील एक अजोड जोडपं होतं. कर्नलमहाशयही ह्युईबाबत खुशच असले तरी साखरपुड्याबाबत मात्र एक शब्द काढत नव्हते.

“बेटा ह्युई, तू आधी स्वत: दहा हजार पौंड कमावून आण मगच आपण तुम्हा दोघांबाबत विचार करू.” असं कर्नलमहाशय नेहमी म्हणत. त्यांनी असं म्हटलं की काही दिवस ह्युई अगदी बापुडवाणा चेहरा करून फिरे व मग मनाला जरा उभारी यावी म्हणून शेवटी लॉराच्या कुशीत शिरे.

असंच एकदा सकाळी, मर्टन कुटुंबीयांच्या हॉलंड पार्क भागातील घराकडे जायला ह्युई निघाला. मध्येच तो अ‍ॅलन ट्रेव्हर या त्याच्या खास मित्राच्या घरात डोकावला. ट्रेव्हर हा एक चित्रकार होता. ते तर आजकाल कोण नसतं म्हणा! पण तो एक कलावंतही होता. हे म्हणजे फारच दुर्मिळ होतं. प्रत्यक्षात तसा तो एक उसवलेल्या लाल दाढीचा, ओबडधोबड चेहर्‍याचा विचित्र माणूस होता. पण एकदा का त्याने कुंचला उचलला की मग पाहावं त्याचं कसब. त्याच्या चित्रांचे चाहते काही कमी नव्हते. पण एक गोष्ट तर मानलीच पाहिजे, की ह्युईच्या देखणेपणाने त्याच्यातल्या कलावंताला चांगलंच उत्तेजित केलं होतं. तो नेहमी म्हणायचा- "चित्रकाराने फक्त अशाच लोकांशी संबंध ठेवावा, की जे सुंदर आहेत, ज्यांच्याकडे नुसतं बघताना एक कलात्मक आनंद मिळतो आणि ज्यांच्याशी बोलताना त्यांची उच्च बौद्धिक अभिरूची कळून येते. या जगावर राज्य असतं ते देखण्या पुरुषांचं आणि सुस्वरुप स्त्रियांचं, निदान त्यांनीच ते करावं असं मला तरी वाटतं." अर्थात जसजसा त्यांचा परिचय वाढला तसं ह्युईच्या सदा प्रफुल्लित चित्तवृत्तींनी, त्याच्या उदार, निर्भिड स्वभावाने ट्रेव्हर फारच प्रभावित झाला आणि त्याने त्याला आपल्या स्टुडिओत कायमचा मुक्त प्रवेश देऊन ठेवला.

ह्युई आत आला तेव्हा ट्रेव्हर एका भिकार्‍याच्या सुंदर लाईफ साईझ पोर्टेटवर शेवटचा हात फिरवत होता. चित्रातला भिकारी खुद्द तेथेच समोर एका उंचवट्यावर उभा होता. सुरकुतलेल्या चर्मपत्रासारखा अनुभवी चेहरा. त्यावर अत्यंत दीनवाणे भाव. अंगावर एक तपकिरी रंगाचा, ठिकठिकाणी उसवलेला जाडाभरडा अ‍ंगरखा. ठिगळं लावून, चुका मारून सांधलेले जाडसर जोडे. एका हातात भिक्षा गोळा करण्यासाठीची जुनाट जीर्णशीर्ण टोपी आणि दुसर्‍या हातात आधाराला एक वेडीवाकडी काठी.

"काय अप्रतिम मॉडेल आहे!", ह्युई आपल्या मित्राला शेक हॅण्ड करत पुटपुटला.

"अप्रतिम मॉडेल?" ट्रेव्हर एकदम तारस्वरात म्हणाला; "हं...खरंच आहे तुझं! असले भिकारी काही रोज भेटत नसतात. गुलबकावलीचं फूलच जसं. जणू काही डिएगो वालेस्काचं एखादं व्यक्तिचित्रच सजीव झालंय. नशीब लागतं मित्रा असलं मॉडेल मिळायला. रेम्ब्रांटने तर याचं सोनं केलं असतं, नाही का?"

"बिचारा म्हातारा! किती बापुडवाणा दिसतोय ना? पण मला वाटतं की त्याचा हा दरिद्री चेहराच तुम्हा चित्रकारांचं भांडवल असावं." ह्युई म्हणाला.

"नक्कीच," ट्रेव्हर उत्तरला, "भिकार्‍याने आनंदी दिसावं असं कोणालाच वाटत नसतं. तुला तरी वाटेल का?"

"तसं, या मॉडेल्सना एका बैठकीपरत किती पैसे मिळतात?", एका दिवाणवर आरामात टेकत ह्युईने विचारलं.

"तासाचा एक शिलिंग."

"आणि तुला या चित्राचे किती पैसे मिळतात?"

"याचे? अं.. दोन हजार तरी मिळायला हवे."

"पौंड?"

"गिनीज, मित्रा गिनीज. चित्रकार, कवी आणि डॉक्टर हे नेहमी सोन्याच्या गिनीजमध्ये मोबदला घेतात."

"पण बघ, माझ्या मते या मॉडेल्सना सुद्धा या पैशात थोडाफार वाटा मिळायला हवा, ते सुद्धा तुमच्याइतकेच कष्ट घेतात की!" ह्युई खिदळत म्हणाला.

"काहीतरीच काय! आणि का म्हणून? नुसता रंग द्यायचं कामच किती जिकीरचं आहे बघ आणि वर दिवस दिवस हे इथे असं उभं राहणं. तुझ्यासाठी हे बोलणं फार सोपं आहे ह्युई, पण तुला एक सांगतो, कधीकधी असेही क्षण येतात जेव्हा कलेलासुद्धा जवळजवळ श्रमाचीच प्रतिष्ठा प्राप्त होते. पण आता तू काही बोलला नाहीस तरं बरं, मी फार कामात आहे. तोवर एक सिगरेट ओढ आणि जरा गप्प राहा."

थोडा वेळाने एक नोकर आत आला आणि लाकडी चौकटी करणार्‍या कारागीराला ट्रेव्हरशी काही बोलायचं आहे असं सांगू लागला.

"ह्युई,सटकू नकोस. मी येतोच थोड्या वेळात." तो जाता जाता म्हणाला.

ट्रेव्हर थोडा वेळ नसल्याचं पाहून म्हातारा भिकारी त्याच्या मागच्या बाकड्यावर विसाव्यासाठी जरा टेकला. तो इतका एकाकी आणि विदीर्ण दिसत होता की ह्युईला त्याची एकदम दया आली आणि त्याला द्यायला काही आहे का म्हणून त्याने खिसे चाचपडले. त्यात फक्त एक पौंडाचा कलदार आणि काही खुर्दा होता. "बिचारा म्हातारा! माझ्यापेक्षा यालाच याची अधिक गरज आहे. ठीक आहे, पंधरा दिवसांकरता बग्गीतून सफर नाही तर नाही!" असं म्हणून तो म्हातार्‍यापर्यंत पोचला आणि कलदार त्याच्या हाती सरकवला.

म्हातारा भानावर आला आणि आपल्या शुष्क ओठातून क्षीणपणे हसत म्हणाला,"धन्यवाद साहेब! आभारी आहे फार!"

तेवढ्यात ट्रेव्हर परतला. ह्युईने त्याचा निरोप घेतला तो मनोमन त्याने केलेल्या सत्कृत्याच्या खुशीतच. मग संपूर्ण दिवस त्याने लॉरासोबतच घालवला, त्यात त्याची असल्या उधळपट्टीबद्दल लडिवाळ खरडपट्टीही निघाली आणि शेवटी चालतच घरी परतावं लागलं.

त्याच रात्री ह्युई फिरत फिरत 'पॅलेट' नाईटक्लबमध्ये शिरला तर तिथे ट्रेव्हर आधीच धूम्रपान करत आणि मदिरेचा आस्वाद घेत बसला होता.

"काय अ‍ॅलन, तुझं चित्र पुरं झालं की नाही मग?", स्वत:ची सिगारेट शिलगावत त्याने विचारलं.

"तर काय? पूर्णही झालं आणि फ्रेमही करून ठेवलंय." ट्रेव्हर म्हणाला," आणि तू तर जादूच केलीस. तो म्हातारा मॉडेल तुझं फारच कौतुक न् वास्तपुस्त करत होता. मला त्याला तुझ्याबद्दल सारंच सांगावं लागलं जसं की, तू कोण आहेस, राहतोस कुठे, तुझी कमाई किती, तुझी संभाव्य प्रगती-"

"अरे बापरे, अ‍ॅलन!" ह्युई उद्गारला," आता तो माझ्या दाराशी येऊन माझी नक्कीच वाट पाहात असणार. मला कळतंय की तू चेष्टा करतोयस, हो ना? पण तो बिचारा म्हातारा, अरेरे! खरंच त्याच्यासाठी मला काही करता आलं असतं तर किती बरं झालं असतं. इतकं दरिद्री असणं फारच भयानक असतं, नाही? माझ्याकडे जुने कपडे ढिगाने पडले आहेत- त्याला त्यातले काही देऊ का? तुला काय वाटतं? त्याच्या कपड्यांच्या तर फक्त चिंध्याच व्हायच्या शिल्लक होत्या."

"पण तेच त्याला शोभून दिसत होते," ट्रेव्हर म्हणाला. " मी भारदस्त कोटमध्ये त्याचं चित्र कधीही काढलं नसतं. तू ज्याला चिंध्या म्हणतोस त्याला मी काव्यात्म म्हणतो. तुला ज्यात दारिद्र्य दिसतं तिथे मला चित्रमयता दिसते. ते असो, मी त्याला तू देऊ करत असलेल्या देणगीबद्दल अवश्य सांगेन."

"अ‍ॅलन," ह्युई गंभीरपणे म्हणाला,"किती हृदयशून्य असता रे तुम्ही चित्रकार लोक!"

"कलावंताचं हृदय हेच त्याचं मस्तिष्क असतं," ट्रेव्हर उत्तरला, " आणि तसंही आमचं काम हे जग जसं आहे तसं चितारणं हे आहे, ते बदलणं नव्हे. जेणो काम तेणो थाय, कसं? ते असू दे, आता मला जरा लॉराबद्दल सांग, कशी आहे ती? आपला म्हातारा मॉडेल तिच्याबद्दल बराच उत्सुक दिसला."

"म्हणजे तू त्याला तिच्याबद्दलही सांगितलं वाटतं."

"हो तर. आणि शिवाय तुझ्या मागे लागलेला कर्नल, तुझी प्रेमळ लॉरा आणि त्या दहा हजार पौंडांबद्दलही."

"तू त्या म्हातार्‍या भिकारड्याला माझ्या सगळ्या खाजगी गोष्टी सांगितल्यास?", ह्युई लालबुंद चेहर्‍याने ओरडला.

"बेटा," ट्रेव्हरने मंद स्मित केलं,"ज्याला तू म्हातारा भिकारी म्हणतोस ना, तो युरोपातल्या सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक आहे. एक पैशाचा ओवरड्राफ्ट न काढता अख्खं लंडन शहर तो आत्ता विकत घेऊ शकतो. प्रत्येक राजधानीच्या शहरात त्याचं एक घर आहे, तो सोन्याच्या ताटात जेवतो आणि रशियाला युद्धापासून परावृत्त करण्याची ताकद ठेवतो."

"म्हणजे काय, मला तर काहीच कळलं नाही!" ह्युई उद्गारला.

"म्हणजे असं की, आज जो म्हातारा माणूस तुला स्टुडिओत भेटला त्याचं नाव आहे बॅरोन हॉजबर्ग. माझा चांगला मित्र. माझी सगळी चित्रं आणि तत्सम इतर वस्तू तोच विकत घेतो. मागच्याच महिन्यात त्यानं स्वत:चं भिकार्‍याच्या वेषातलं चित्र काढायला मला सांगितलं अन् त्यासाठी भरपूर बिदागी देऊ केली. आपल्याला काय ? उंचे लोग उंची पसंद! पण त्याच्या त्या पोतेर्‍यात त्याची प्रतिमा अलौकिक दिसत होती, किंबहुना माझ्या पोतेर्‍यात असं म्हणायला हवं. तो माझाच एक स्पेनमध्ये घेतलेला जुनाट सूट होता."

"बॅरोन हॉजबर्ग! अरे देवा! आणि मी त्याला एक कलदार दिला!", ह्युई चीत्कारला आणि मटकन एका आरामखुर्चीत कोसळला.

"तू आणि त्याला एक कलदार दिलास?", ट्रेव्हर एकदम उसळत मोठमोठ्याने हसू लागला, "बेटा, विसर आता तुझे पैसे. हपापाचा माल गपापा करणारी असामी ती!"

"तू मला हे आधीच सांगायला हवं होतंस अ‍ॅलन म्हणजे माझी अशी फजिती झाली नसती." ह्युई नाराजीच्या स्वरात म्हणाला.

"खरं सांगायचं तर," ट्रेव्हर म्हणाला,"तू असा गावभर खिरापत वाटत फिरणार्‍यातला असशील असं मला कधीच वाटलं नाही. हां, आता एखाद्या सुस्वरूप मॉडेलचं तू चुंबन घेतलंस तर मी समजू शकतो पण एखाद्या कुरूप मॉडेलला एका पौंडाची दक्षिणा देणं- कल्पनेतही नाही. खरं म्हणजे मी आज कोणाचीच घरी यायची अपेक्षा केली नव्हती आणि तू अचानक आलास तेव्हा, हॉजबर्गला त्याची ओळख मी उघड केलेली चालेल की नाही याबद्दलही माझ्या मनात किंतु होता. तू पाहिलसंच की त्याने नीट रीतसर पोषाखही केलेला नव्हता."

"त्याने मला किती मूर्खांत काढलं असेल!" ह्युई म्हणाला.

"अजिबात नाही. उलट तू निघून गेल्यावर तो अतिशय उत्साही दिसत होता, आपले सुरकुतलेले हात चोळत ओठातल्या ओठातच हसत होता. तो तुझी इतकी चौकशी का करत होता ते तेव्हा मला कळलं नाही, पण आता मात्र माझ्या ध्यानात आलं. आता तू दिलेले पैसे तो तुझ्यासाठी कुठेतरी गुंतवणार, तुला दर सहा महिन्याला व्याज देणार आणि मेजवानीनंतरच्या शिळोप्याच्या गप्पात ही गोष्ट तिखट मीठ लावून सांगणार."

"माझ्यासारखा कमनशिबी मीच," ह्युईने उसासा सोडला. "आता मी घरी जाऊन शांतपणे झोपून राहाणे आणि अ‍ॅलन, मित्रा, तू हे कोणाला न सांगणे हेच उत्तम. नाहीतर मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही."

"नाही रे बाबा! उलट हा तर तुझ्या दानशूरपणाचा सर्वात चांगला दाखला आहे ह्युई! आणि पळून जाऊ नकोस. जरा वेळ बैस, एक सिगारेट ओढ आणि लॉराबद्दल सांग बरं काहीतरी."

अर्थात, अ‍ॅलन ट्रेव्हरला तसंच खिदळत सोडून ह्युई खिन्न मनाने घराकडे चालतच परतला.

दुसर्‍या दिवशी सकाळी न्याहारी घेत असताना नोकर एक चिठ्ठी घेऊन आला. 'श्री गुस्ताव नॉदिन, श्री बॅरोन हॉजबर्ग यांचेकडून.' "माफी मागायला पाठवलं असावं," ह्युई स्वत:शीच म्हणाला आणि त्याने नोकराला पाहुण्याला आत पाठवण्यास सांगितलं.

सोनेरी काड्यांचा चष्मा आणि राखाडी रंगाचे केस असलेला एक वृद्ध गृहस्थ आत आला आणि म्हणाला, "आपणच का श्रीमान अर्स्किन?"

ह्युईने मान डोलवली.

"मी बॅरोन हॉजबर्ग यांच्याकडून आलो आहे," तो म्हणाला, " श्री बॅरोन यांनी-"

"माफ करा, पण, आधी मी त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे हे त्यांना अवश्य सांगाल ही विनंती," ह्युई चाचरत म्हणाला.

"श्री बॅरोन यांनी मला हे पत्र आपणास द्यावयास सांगितले आहे," म्हातारा सद्गृहस्थ स्मितहास्य करत म्हणाला आणि एक मोहोरबंद लखोटा त्याने पुढे केला.

त्यावर 'ह्युई अर्स्किन आणि लॉरा मर्टन यांना विवाहाप्रित्यर्थ भेट, एका वृद्ध भिकार्‍याकडून' असं लिहिलं होतं आणि आत १०,००० पौंड रकमेचा एक चेक होता.

आणि जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा अ‍ॅलन ट्रेव्हर हा 'बेस्ट मॅन' होता आणि बॅरोनने मेजवानीच्या वेळेस छानसं भाषणही केलं.

तेव्हा ट्रेव्हर म्हणाला होता,"लक्ष्मीपुत्र मॉडेल म्हणून मिळणं तर दुर्मिळ आहेच म्हणा, परंतु दिलदार लक्ष्मीपुत्र मिळणं त्याहूनही दुर्मिळ आहे, बरं का!"

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

क्या बात है! एकदमच "अगं बाई खरच?" असे उद्गार निघाले Smile
खूप आवडली ही कथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली.

(पण भाषांतरात काही खडे लागले. हे माझं व्यक्तिगत मतच. मराठीत वाचताना "पण शेवटी तो एक नीट कापलेल्या तपकिरी केसांचा, अचूक शरीरसौष्ठव आणि भुरे डोळे असलेला अतिशय देखणा माणूस होता हे मात्र तितकंच खरं." असं वाक्य खटकतं.
त्याऐवजी - कसंही असलं तरी तो अतिशय देखणा माणूस होता, व्यवस्थित कापलेले तपकीरी केस, भुरे डोळे आणि नजर लागावी असं शरीरसौष्ठव.
असं वाक्य अधिक मराठी वाटेल. भाषांतर मूळ लेखनाशी प्रामाणिक असावं, असा विचार करणाऱ्यांना ते पटणार नाही याची खात्री आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आभार !

पण भाषांतरात काही खडे लागले

हम्म... हा माझा अनुवादाचा पहिलाच प्रयत्न आहे. चालवून घ्यावा ही विनंती. पुढील वेळी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन Smile

मी 'भाषां'तर करताना अनेक गोष्टींची मोडतोड केली आहे तरी काही गोष्टी मराठीत आणणं (माझ्यासाठी तरी)फारच अवघड होतं. मूळ इंग्रजी कथा इथे वाचता येईल.


भाषांतर मूळ लेखनाशी प्रामाणिक असावं
.
मी काही या मताशी फारसा सहमत नाही. उलट भाषांतर हे पुनर्लेखनासारखं करावं असं वाटतं. त्यात अधिक मजा येते. त्यामुळे वरचे काही खडे मी नीट न निवडल्यामुळे आहेत असे समजावे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी काही या मताशी फारसा सहमत नाही.

मलाही हे पटत नाही. विशेषतः जुन्या काळात लिहिलेल्या ललित लेखनाचं भाषांतर प्रामाणिकपणे केलं तर ते वाचताना खडेच जास्त लागतात. मागे कधी, आंतरजालावरच्या मैत्रमंडळातच या विषयावरून वाद रंगला होता, त्याची आठवण झाली. (तो संदर्भ तुमच्यासाठी फार लागू नाही.)

मूळ कथा आवडली; भाषांतराचा प्रयत्नही चांगला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कथा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथेच्या अंती (वाचकास) धक्कातंत्र वापरले आहे. रत्नाकर मतकरी असे तंत्र वापरत असे स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात राहून पोट आणि डोकं, दोन्हीचं ताळतंत्र कायमचं गमावून बसलेल्या

ह्याचा अर्थ काही लागत नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात राहून पोट आणि डोकं, दोन्हीचं ताळतंत्र कायमचं गमावून बसलेल्या

हे याचं भाषांतर आहे-

The girl he loved was Laura Merton, the daughter of a retired Colonel who had lost his temper and his digestion in India, and had never found either of them again.

बाकी आपण गोष्ट बारकाईने वाचली याबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

भाषांतर आहे ते ठीके. पण लेखकाची अशी का समजुत आहे की भारतात राहुन डोक्याचे ताळतंत्र सुटते (पोटाचे सुटु शकेल एकवेळ )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0