घेई छंद - पुस्तक परीक्षण

आपल्या आयुष्यात बऱ्याच phases येत असतात. कधी कधी आवडीच्या गोष्टीसाठी वेळ न मिळाल्याने त्या बाजूला पडत जातात. मग अचानक एखाद्या दिवशी आपल्याला अशा काही गोष्टींची आठवण येते.

मी लहान असताना बरीच पुस्तकं वाचायचो. हळूहळू जसा मोठा होत गेलो तसा पुस्तकांसाठी वेळ कमी मिळायला लागला आणि त्याचा परिणाम म्हणून पुस्तकांचं वाचन थोडं मंदावलं. तरीही मी जसा वेळ मिळेल तसा काढून पुस्तकांचं वाचन चालूच ठेवलं होतं. बरीच पुस्तकं वाचली तरी वाचलेल्या पुस्तकावर आजवर मी कधी काही लिहिलं नव्हतं. अपवाद फक्त सातवीत असताना लिहिलेल्या काही टिपणांचा. त्यामुळे पुस्तक परीक्षण करण्याचा मला अजून तरी काही अनुभव नाही.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेता 'सुबोध भावे' त्याच्या चित्रपटातील अनुभवांबद्दल एक पुस्तक लिहिणार आहे असं कानावर आलं होतं. मी हे पुस्तक, 'घेई छंद', प्रकाशनापूर्वीच विकत घेतलं. एकंदरीत त्याच्या कट्यार (नाटक) ते कट्यार (चित्रपट) या प्रवासाबद्दल हे पुस्तक आहे.

नुकतंच हे पुस्तक संपवून बाजूला ठेवलं आहे, आणि यावर एखादं परीक्षण लिहिण्याचा विचार करतो आहे. ह्या पुस्तकात एकंदरीत ५ प्रकरणे आहेत. पहिलं प्रकरण त्याच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल आहे. यात त्याचा 'पुरुषोत्तम' मधला सहभाग, कॉलेज जीवनानंतर जोडलेले मित्र व केलेली सुरुवातीची कामं अशा गोष्टींचा समावेश आहे. कॉलेजनंतर केलेली नोकरी, तीच नोकरी सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात घेतलेली उडी, 'लेकुरे उदंड जाहली' सारख्या नाटकात अभिनयात अपयश आल्याने झालेली तगमग, संगीताकडे असलेली ओढ, आणि ह्याच संगीत-प्रेमातून जन्मलेला 'मैतर' नावाचा कार्यक्रम सुबोधने आपल्या लेखणीतून फार सुरेखरित्या उतरवला आहे.

दुसरं प्रकरण सुरु होतं तेच मुळी संगीताने भारलेल्या क्षणापासून. राहुल देशपांडे याने केलेली 'संगीत कट्यार काळजात घुसली' ह्या अजरामर नाटकाचं दिग्दर्शन करण्याची विनंती सुबोधला ह्या नाटकापर्यंत आणते. त्यानंतर कास्टिंग, नाटकाचं आकलन, नाट्यपदांचा सराव, राहुल देशपांडे, महेश काळे इ. गायकांना अभिनय शिकवणं वगैरे गोष्टी सुबोधने कशा जमवल्या हे त्याच्याच शब्दांत वाचणे उत्तम. हे प्रकरण वाचताना आपल्याला नाटक बसवणे किंवा नाटकातला अभिनय वगैरे गोष्टी बारकाईने कळतात. एखाद्या नाटकाबद्दल त्या नाटकाचा दिग्दर्शक काय विचार करत असेल, किंवा ते अडीच-तीन तासांचं नाटक बसवायला किती मेहनत घ्यावी लागली असेल हे सुद्धा जाणवतं.

पुढचं प्रकरण 'बालगंधर्व' ह्या चित्रपटावर बेतलेलं आहे. सुबोधला योगायोगानेच 'गंधर्वगाथा' हे पुस्तक मिळतं. बालगंधर्वांच्या जीवनाबद्दल आणि एकुणातच कार्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही हे लक्षात आल्यावर त्याला अपराधी वाटू लागतं. या अपराधीपणाच्या भावनेतूनच तो बालगंधर्वांविषयी जे काही साहित्य उपलब्ध आहे ते वाचून काढतो. ह्या भारावलेपणातूनच या विषयावर चित्रपट काढण्याचं नक्की करतो. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, गायक वगैरे मंडळी जमवल्यावर स्वतःच्या भूमिकेच्या तयारीला लागतो. बालगंधर्वांच्या भूमिकेसाठी त्याने केलेली तयारी आणि घेतलेले कष्ट आपल्याला थक्क करुन सोडतात. तब्बल २० किलो घटवलेलं वजन, 'स्त्री'भूमिकेत परफेक्ट दिसण्यासाठी बदललेली जॉ-लाईन, स्त्रियांची देहबोली जमवण्यासाठी केलेले कष्ट, चार-पाच तासांचा मेकअप, शास्त्रीय गायकाचे हावभाव इ. गोष्टी त्याने फार चांगल्या प्रकारे व डिटेलमध्ये लिहिल्या आहेत. शेवटी बालगंधर्वांच्या भूमिकेतून बाहेर पडताना, 'हा चित्रपट माझ्या करिअरचा महत्वाचा टप्पा असेल, पण हे माझं आयुष्य नाही' असं ठणकावून सांगणारा सुबोधही आपल्या मनाला भावतो.

चौथ्या प्रकरणात 'लोकमान्य... एक युगपुरुष' ह्या चित्रपटाबद्दल लिहिलं आहे. 'बालगंधर्व'सारखा चित्रपट केल्यावर लोकमान्य टिळकांवरसुद्धा एक चित्रपट काढावा असं सुबोधच्या मनात येतं. त्याच वेळी त्याला 'ओम राऊत' सारखा टिळकांवर मनस्वी प्रेम करणारा दिग्दर्शक भेटतो. चित्रपटाच्या निमित्ताने लोकमान्यांच्या आयुष्यातले महत्वाचे पैलू सुबोधला भारावून टाकतात. ह्या प्रकरणात सुबोधने काही महत्वाच्या सीन्स बद्दल खूप छान पद्धतीने लिहिलं आहे.

पाचवं प्रकरण 'कट्यार' सिनेमावर आधारित आहे. 'कट्यार काळजात घुसली' हे नाटक केल्यापासूनच ह्या विषयावर सिनेमा करावा असा विचार सुबोधच्या मनात घोळत होता हे त्याच्या आधीच्या लेखनावरून वारंवार दिसतं. ह्या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी करावी लागलेली धडपड त्याने फार सुरेख पद्धतीने मांडली आहे. पंडितजी आणि खॉंसाहेब या २ भूमिकांचे नायक त्याने बरीच शोधाशोध करून मिळवले. संगीत हा 'कट्यार'चा आत्मा आहे. 'कट्यार' नाटकातली गाणी, नवीन गाणी, त्यांचं संगीत आणि त्याचं गायन हा एक मोठा प्रवास त्याने यात उलगडून दाखवला आहे. प्रत्यक्ष शूटिंग दरम्यानचे अनुभव सुबोधने काहीसे डायरी-फॉर्म मध्ये लिहिले आहेत. त्यामुळे आपण एक real time experience घेत आहोत असा भास आपल्याला होतो.

या पुस्तकाच्या अनेक जमेच्या बाजू आहेत. पहिली बाब म्हणजे सुबोधने पुस्तकात कुठेही स्वतःच्या मोठेपणाचं प्रदर्शन केलेलं नाही. अगदी प्रस्तावनेतसुद्धा त्याने, 'पुस्तक आवडलं तर श्रेय माझ्या मित्रांचं आणि नाही आवडलं तर त्याचं श्रेय फक्त माझं' अशी नम्र जबाबदारी घेतलेली आहे. पुस्तकात मुख्यतः वर्णित कलाकृती ह्या मराठी चित्रसृष्टीत एक मैलाचा दगड ठरलेल्या कलाकृती आहेत. पण तरीही त्याने हे माझ्या अभिनयामुळे साकार झालं अशी दवंडी कुठेही पिटलेली नाही.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्याने सर्व सहकलाकारांचं योग्य त्या ठिकाणी व योग्य गोष्टीसाठी भरभरून कौतुक केलं आहे. सचिन पिळगांवकर, शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे, ओम राऊत, रवी जाधव ('बालगंधर्व'चे दिग्दर्शक), विक्रम गायकवाड (रंगभूषाकार), कौशल इनामदार ('बालगंधर्व'चे संगीतकार), आनंद भाटे ('बालगंधर्व'साठी राष्ट्रीय पारितोषिक विजेते गायक), शौनक अभिषेकी (पं. जितेंद्र अभिषेकी यांचा मुलगा, सुबोधचा मित्र), सुधीर पलसाने ('कट्यार'चा सिनेमॅटोग्राफर), शैलेश परुळेकर (फिटनेस ट्रेनर) इत्यादी सहकाऱ्यांचं त्याने ठिकठिकाणी तोंडभरून कौतुक केलेलं आहे. प्रत्येक प्रकरणात असलेल्या असंख्य छायाचित्रांनी हे पुस्तक रंगीत बनलेलं आहे.

ह्या पुस्तकाच्या काही त्रुटीही आहेत. अनेकदा खूपच informal लिहिण्याच्या नादात व्याकरणाकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं. वाक्यांची बांधणी, शब्दांची रचना, र्‍हस्व-दीर्घच्या चुका ह्यामुळे काहीसा अस्ताव्यस्तपणा आल्याचं वारंवार जाणवत राहतं. बऱ्याचदा सहकलाकारांच्या नावाचा गोंधळ वाचकाला होतो. उदाहरणार्थ, 'बालगंधर्व'च्या प्रकरणात, 'महेश' म्हणजे महेश काळे कि महेश लिमये असा गोंधळ उडतो. तसंच काहीसं 'अभिराम' ह्या नावाबद्दल होतं. अभिराम म्हणजे लेखक अभिराम भडकमकर हे समजायला काही पानं मागे उलटायला लागतात. 'कट्यार'च्या प्रकरणात देखील, 'सचिन' म्हणजे सचिन खेडेकर कि सचिन पिळगांवकर असा भ्रम क्वचित होऊ शकतो. अजून एक त्रुटी म्हणजे 'लोकमान्य'च्या प्रकरणामध्ये लिहिलेले काही 'कट्यार'चे अनुभव. हे अनुभव कालानुरूप (chronological orderने) न लावता, विभागवार लिहिले असते तर जास्त चांगले वाटले असते असं राहून राहून वाटून जातं.

या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊनही हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावं असंच आहे असं नक्कीच म्हणावसं वाटतं. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या सुबोध भावेच्या शब्दांत त्याचे अनुभव वाचणे हा खरंच अविस्मरणीय अनुभव आहे.

पूर्वप्रसिद्धी : Blog : Rajat Says It All

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet