विश्वसंवाद-१: विजय पाडळकर (भाग-१) [मराठी पॉडकास्ट]

"विश्वसंवाद" या मराठी पॉडकास्टची सुरुवात करतो आहे माझे आवडते लेखक विजय पाडळकर यांच्या मुलाखतींनं.

अगदी लहानपानापासून मला लेखक मंडळीविषयी अपार आदर आणि कुतूहल वाटत आलंय, ते आजही टिकून आहे. साहित्याइतकाच दुसरा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सिनेमा आणि सिनेसंगीत. शिरीष काणेकरांच्या "गाये चला जा"ची किती पारायणं झाली असतील, ते सांगणंही अशक्य. .पुढे कधीतरी विजय पाडळकरांचं, सत्यजित राय यांच्या Apu Trilogy वर आधारित "नाव आहे चाललेली" सापडलं आणि तिथून पुढे साहित्य आणि सिनेमा यांच्यावर अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणारं त्यांचं कितीतरी लेखन वाचायला मिळालं.

नांदेड सारख्या पुण्या-मुंबईहून दूर असणाऱ्या ठिकाणी पाडळकर राहात होते, त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीची शक्यता जवळ-जवळ नव्हतीच. तीस वर्षं बँकेत काम करून झाल्यावर पूर्णवेळ लेखनाला देण्यासाठी त्यांनी स्वेच्छा-निवृत्ती घेतली हे वाचण्यात आलं होतं आणि त्याचं खूप अप्रूप वाटलं होतं. पुढे गुलज़ार यांच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीचा वेध घेणारं "गंगा आये कहां से" हाती पडलं तेव्हा आजवर त्या सिनेमांमधले न जाणवलेले कितीतरी पैलू ठळकपणे समोर आले आणि त्यातून पाडळकरांच्या लिखाणाचं वेगळेपण आणि महत्त्व ठसठशीतपणे अधोरेखित झालं

अचानक, फेसबुकमुळे पाडळकरांशी संपर्क झाला आणि एक दिवस सॅन होजेमध्ये त्यांची भेटही झाली. इतके दिवस फक्त लेखनातून भेटलेल्या लेखकाशी प्रत्यक्ष भेटण्याची, गप्पा मारण्याची संधी मिळणं हा एक आनंददायी अनुभव होता. तेव्हापासून झालेल्या अनेक भेटींमधून, गप्पांमधून पाडळकर भेटत राहिले आणि त्यांचं लिखाण, त्यामागचं संशोधन आणि चिंतन, सिनेमा, साहित्य, हिंदी सिनेसंगीत अशा वेगवेगळ्या विषयांवरचं त्यांचं प्रेम या साऱ्यातून एक थक्क करून सोडणारं आगळं-वेगळं व्यक्तिमत्व समोर आलं. "विश्वसंवाद"च्या शुभारंभाच्या एपिसोडमधून त्यांची मुलाखत तुमच्यासमोर सादर करतोय.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ऐकला. पण द्रूश्यकला व साहीत्य या विषयात गती नसल्यामुळे अर्धवट सोडला. बाकी रेकॉर्डिंग सुस्पष्ट आहे. प्लीज अधिक विश्वसंवाद जरुर इथे मांडत रहा. एखाद्या कवि-कवयित्रीच्या वाटचालीबद्दल असला तर मला नक्कीच आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0