मुहूर्त, कुंडली, शुभराशी वगैरे, वगैरे

( प्रो. हरीमोहन झा (1908 – 1984) यांच्या ‘खट्टर काका’ पुस्तकातील ‘फलित ज्योतीष’ या मूळ हिंदी लेखाचे स्वैर रूपांतर ऐसी अक्षरेच्या वाचकांसाठी देत आहे. हा लेख 1948 साली लिहिलेला असला तरी आजही त्यातील विनोद व आशय आपल्याला अंतर्मुख करणारा आहे.

खट्टर काका हे त्यांचे विनोदी अंगाने लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तक भरपूर गाजले. परंतु हरीमोहन झा यांना केवळ विनोदी लेखक म्हणून ओळखणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. ते मुळात तत्वज्ञानाचे अभ्यासक होते व संस्कृत, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. पाटणा विद्यापीठाचे हे मैथिली भाषेचे तज्ञ होते. मैथिली भाषेतील सौंदर्य फुलवून सांगणाऱ्या त्यांच्या पुस्तकांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. )


त्या दिवशी आमच्या घराच्या कट्ट्यावर भटजीबुवा बसले होते. गावातील देव देवस्कीबरोबरच भटजीबुवांचा कदाचित थोडाफार ज्योतिषाचा अभ्यास असावा. त्यामुळे गावकरी घरातल्या छोट्या मोठ्या कार्यासाठी त्यांना मुहुर्ताची वेळ विचारत असत. जन्म वेळेच्या आधारे प्राथमिक स्वरूपात कुंडलीची मांडणीही ते करत असत. गावात त्यांचा चागलाच जम बसला होता. फक्त खट्टर काकांची त्यांना अडचण वाटत होती. ते दिसले की भटजीबुवा आहे तेथून निसटत असत. आज मात्र त्यांचा अंदाज चुकला. काकानी आज त्याना बरोबर गाठले. बुवा निसटण्या आधीच काकानी बुवांना उद्देशून, “बुवा काय चाललय?” हा प्रश्न केलाच.
“काही नाही, नवी नवरी सासरी जाणार आहे. तर प्रवासासाठी चांगला दिवस कुठला हे शोधत होतो.”
“तिला जेव्हा पाहिजे तेव्हा जाऊ दे. तुम्हाला त्याची का एवढी चिंता?”
“तसे नव्हे, प्रवासाचा मुहूर्त चांगला असला की वाटेत अडचणी येत नाहीत. म्हणून मी...”
“अगदी बरोबर, पावसात, वादळ बिदळ असल्यास शक्यतो प्रवास करू नये हे मान्य.”
“परंतु या महिन्यात एकही दिवस चांगला नाही.” इती भटजीबुवा.
“अहो बुवा, महिन्यात 30 दिवस असतात हे तुमच्या लक्षात असू दे.”
“परंतु या महिन्यात कालपुरुषाचे तोंड पूर्वेला आहे.”
“बुवा, मला फसवू नका. कालपुरुष म्हणजे सांड-बिंड आहे का काय ज्याचे सोंड पूर्वेला चरायला गेला जायला. हा तुमचा कालपुरुष सगळ्या ठिकाणी सदासर्वकाळ असतोच. त्याची भीती कशाला?”
“तुम्ही शास्त्र मानत नाही म्हणून असे बोलता. आता सूर्य दक्षिणायनात आहे.”
“असू दे की. या नवरीचा त्यात काय दोष? तिला का सासरी जाण्यापासून थांबवता?”
“मी तरी काय करू, या पंचागाप्रमाणे पुढील तीन महिने आपण तिला सासरी पाठवू शकत नाही.”
“का नाही पाठवू शकत?”
“पुष्यमासात पाठवू शकत नाही.”
“पुष्य महिन्याने एवढे काय पाप केले आहेत की त्यामुळे मुलगी सासरी जाऊ शकत नाही?”
“आता तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. माघ – फाल्गुण महिन्यातसुद्धा कालपुरुष आडवा येतो आणि चैत्रात चंद्र.”
“कुठल्याही दिवशी बाहेर पडला तरी यांचा देवच सगळीकडे आडवा येतो. भटजीबुवा जरा नीट बघा. नाही तर आजच तिला पाठवून द्यायचे का?”
“अहो आज तर सोमवार आहे पूर्वेकडे गेल्यास दिशाशूल होईल.”
“असले कसले शूल होईल? वाटेत कोणी काही खिळे टाकतील की काय?”
“तुम्ही तर नास्तिक आहात. तुम्ही असेच बोलणार.”
“अहो, सोमवारचा दिवस प्रवासाला वर्ज्य असल्यास मुंबईहून कलकत्त्याला जाणारी आजची गाडी कशी काय तेथे पोचते? ही पृथ्वीच पश्चिमेकडून पूर्वेकडे भ्रमण करते. त्याचे काय?”
“जो शहाणा असतो तोच दिशेचे बळाबळ जाणतो.”
“भटजीबुवा, आपण सोळा आणे खरे बोलत आहात. दिशेचे बळ बघून चालणाऱ्यांना सोनं सापडत की काय? मी रोज हजारो ठिकाणी चहू बाजूला फिरत असतो. मला कधी शूल बील झाले नाहीत की एखादं गाठोड सापडल नाही.”
“म्हणजे... तुम्हाला कधीच दिक्शूल जाणवले नाही?”
“बुवा, ज्याला तुम्ही दिक्शूल म्हणता ते एक दृष्टीशूल आहे. तो तुमचा भ्रम आहे. व ते मानणाऱ्यावर असते.”
“तर आपल्याला वारदोष माहित नाही की काय?”
“अगदी रोममात्रही दोष नाही हे मात्र मला माहित आहे. हा वारदोष आपला देश वगळता इतर देशात का जाणवत नाही? सर्वात भाबडे, बावळट आपणच आहोत की काय?”
“जर शास्त्रावर विश्वास नसल्यास बोलणेच खुंटले. परंतु मुहूर्तचिंतामणी बघा....”
काका त्यांना मध्येच आडवत, “मुहूर्तचिंतामणी नव्हे, धूर्तचिंतामणी म्हणा! स्वतःचे पोट भरण्यासाठी व दुसऱ्यांना मूर्ख बनविण्यासाठी मुहूर्ताच्या फेऱ्यात लोकांना अडकवता! राजासाठी अभिषेक मुहूर्त! सैन्यासाठी अश्वगज संचालन मुहूर्त! शिपायांच्यासाठी शस्त्रधारण मुहुर्त! व्यापाऱ्यांसाठी क्रय-विक्रय मुहूर्त! नर्तकीसाठी नृत्यारंभ मुहूर्त! अभिजनांसाठी ऋणदान मुहूर्त! सोनारांसाठी भूषणघटन मुहूर्त! धोब्यांच्यासाठी वस्त्रप्रक्षालन मुहूर्त!.... हे चाललय तरी काय? बिचाऱ्या शेतकऱ्यांना तर यानी मुहुर्ताचे निमित्त करून वेठीस धरून ठेवलेले आहे. नांगरण्यासाठी हलप्रवण मुहूर्त! बिया पेरण्यासाठी बीजोप्तीमुहुर्त! रोपटे रोवण्यासाठी सस्यरोपणमुहुर्त! धान्य काटण्यासाठी धान्यच्छेदन मुहूर्त! सामान्यांना लुबाडण्यासाठी कसल्या कसल्या युक्त्या-प्रयुक्त्या लढवल्या आहोत! स्त्रियांना तर मुहूर्ताच्या जंजाळात घट्टपणे पकडून ठेवत आहात. वेणी घालण्यासाठी केशबंधन मुहूर्त! चूल बेटवण्यासाठी चुल्हीकास्थापन मुहूर्त! आंघोळीसाठी स्नान मुहूर्त! बाळाला दूध पाजायचे असले तरी त्यासाठीसुद्धा स्तनपान मुहूर्त!” असे सांगू लागले.
माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे बघतच काका पुढे सांगू लागले. “मी काही चेष्टा करत नाही. स्तनावरही या ज्योतिषांची मालकी आहे की काय? दुधपित्या लहान बाळाला सुध्दा यांच्या मुहुर्तापासून सुटका नाही. विश्वास वाटत नसेल तर देवज्ञवल्लभ, बृहज्योतिषसार हे ग्रंथ वाच. ही कसली चेष्टा? एखादी बाळतींण आपल्या बाळाला मंगळवारी दूध पाजणार असेल तर मंगळ ग्रह आडवा येणार? त्याला काय स्तनपानाशी वैर आहे की काय?”
“कदाचित असेलही.” मी मध्येच बोललो, “ग्रह-नक्षत्रांचा सूक्ष्म प्रभाव पडू शकतो म्हणून तरच काळ-वेळ यांचा विचार केला जात असावा.”
“अरे कसलं काळ आणि कसली वेळ? हा काळच आपल्यासाठी महाकाळ झाला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी काळ आणि वेळ बाहेर जाण्यासाठी मुहूर्त, आत येण्यासाठी मुहूर्त, लग्न करता, मुहूर्त बघा, घर बांधता मुहूर्त बघा, गृहप्रवेश करता मुहूर्त बघा, एवढेच नव्हे तर मधुचंद्रासाठीसुध्दा मुहूर्त, हा कसला मूर्खपणा!”
“काका, मला नाही वाटत मधुचंद्रासाठीसुध्दा मुहूर्त बघत असतील.”
“अरे, आता तुम्ही मधुचंद्र म्हणता. परंतु पूर्वीच्या काळी याला गर्भदान म्हणत. ज्योतिषाच्या मते षष्टी, अष्टमी, पूर्णिमा, अमावस्या, चतुर्दशीच्या दिवशी अनुमती नाही! आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवारी फक्त लायसेन्स! पौर्णिमेच्या पिठुर चांदण्यात वर-कन्या मिथुन लग्न करत असतील तर च्रंदाला ग्रहण लागेल का? का आकाश कोसळून पडेल? रविवारी दांपत्य संयोग झाल्यास सूर्याचा रथ मोडून जाईल का? की रथाच्या घोड्याचे पाय मोडून जातील? तरीसुध्दा हे ज्योतिषी गप्प बसत नाहीत? या राशी भविष्याचे थोतांड का म्हणून सहन केले जाते?”
“काका, तुमचा राशीफलावर विश्वास नाही का?”
“राशीफल खरोखरच फल सांगत असेल तर आतापर्यंत मी दोन-अडीच हजार वेळा मरून जायला हवे होते.”
“ते कसे काय?”
“माझ्या राशीच्याबद्दल हे लोक काय लिहितात ते बघ. रविवारी तेल लावून आंघोळ करू नये म्हणून लिहितात. सोमवारी, अमुक रंगाचे कपडे वापरू नये, मंगळवारी मृत्युयोग, बुधवारी, लक्ष्मी पळून जाईल, गुरुवारी, दारिद्र्य, शुक्रवारी, कामात अडचणी, शनिवार सुखाचा.. असे काहीबाही लिहिलेले सापडेल. यांच्यात एकमेकाशी कुठला कार्य-कारण संबंध असेल हे त्यांच्या देवालाच माहित असेल. गेली पन्नास वर्षे मी तेल लावून आंघोळ करतो. मला काहीही झाले नाही. या पन्नास वर्षात सुमारे अडीच हजार मंगळवार आले असतील, तरीसुद्धा मी अजून जिवंत आहे. आणि तू म्हणतोस की राशीभविष्यावर विश्वास ठेवा!”
“काका, याचे उत्तर ज्योतिषीच देवू शकतील.”
“ज्योतिषी कसले उत्तर देणार? ते स्वतःच या जंजाळात पूर्णपणे फसलेले आहेत. या मुहूर्तवाल्यांचे एकेक कारनामे ऐकल्यास भोवळ येईल. स्त्रियांच्या पहिल्या मासिक पाळी संबंधात तर यांनी कहर केला आहे. एखादी स्त्री रविवारी ऋतुमती झाल्यास विधवा होईल असे लिहिले आहे. आणि अजून एके ठिकाणी पंचमीला ऋतुमती झाल्यास सौभाग्यवती होईल असे नमूद केले आहे. मला या ज्योतिष महाराजाला विचारायचे आहे की जर पंचमी तिथी रविवारी आल्यास व एखादी स्त्री ऋतुमती झाल्यास तिचे काय होईल? एवढेच नव्हे, अजून एके ठिकाणी माघ महिन्यात रजोदर्शन झाल्यास स्त्री पुत्रवती होईल आणि कृतिका नक्षत्रच्या दिवशी झाल्यास वांझ राहील असे लिहिले आहे. आता तूच सांग, माघ महिन्यातील कृतिका नक्षत्राच्या दिवशी एखादी स्त्री ऋतुमती झाल्यामुळे तिला जे मूल होईल त्याला वांझपुत्र म्हणणार की काय?”
भटजीबुवा गप्प बसून ऐकत होते.
“तर मी काय सांगत होतो? हाँ, आणखी एके ठिकाणी धनुराशीची बाई शनिवारी रजस्वला झाल्यास ती व्यभिचारी होईल असे लिहिले आहे. समज, एखादी बाई त्या दिवशी रजस्वला झाल्यास तिने जीव द्यायचा की काय? असले चित्र विचित्र वर्णन अगदी महापुराणातसुद्धा सापडतील. तरीसुद्धा आपण प्रत्येक गोष्टीसाठी या लोकांचे पाय धरतो.”
इतक्यात आमच्याच नात्यातला एक जण पळत पळत भटजीबुवाकडे आला व धापा टाकतच म्हणाला, “भटजीबुवा, आताच माझ्या घरी एक बाळ जन्माला आलाय. मुलगा आहे. त्या बाळाची जन्मकुंडली मांडून काय गुणदोष आहेत ते सांगाल का?”
“किती वाजता बाळ जन्मला आला?”
“अहो, आताच. 10-15 मिनिटंसुद्धा झाले नसतील.”
भटजीबुवा पंचांगातील काही पाने उलटत कागदावर आकडेमोड करत काही तरी हिशोब करू लागले. व गप्प बसले. हा आमचा नातेवाईक ओरडलाच, “काय झालं? आपण गप्प का?”
“काय झालं? विंचू बिंचू चावला की काय?” काका विचारले.
“मी काय बोलणार? मूळा नक्षत्राच्या प्रथम चरणी मुलाचा जन्म झाला आहे. मृत्युयोग आहे. स्वतःही जाईल व बापालाही गिळंकृत करेल.”
हा नातेवाईक अगदीच रडकुंडीला आला. भटजीबुवा पुढे बोलू लागले. “हे मूल तुमच्या जिवावर उठणार. पंचागच सांगत आहे. परंतु यावर एक उपाय आहे. या बाळाला दुर कुठेतरी पाठवून द्या. आठ वर्षे त्याचे तोंडसुद्धा पाहू नका. आणि आतापासून गोदान, स्वर्णदान, नवग्रहपूजा हे सर्व करण्याच्या तयारीला लागा. कदाचित मृत्युयोग टळून जाईल.”
काकांना राहवले नाही. “अरे, हे मुहूर्त व कुंडलीच्या नावे जे काही लिहिले असेल ते सपशेल खोटे आहे. लिहिणारा तुम्हाला लुटत आहे. तुम्हीच मुळा नक्षत्राचा उगीचच बाऊ करत आहात. लोकांना भीती घालत आहात. नक्षत्राच्या नावाचा गैरवापर करून आपला फायदा करून घेत आहात. का म्हणून या बिचाऱ्याला घाबरवता व तुमच्या जंजाळात अडकवत आहात?”
तो बिचारा निघून गेला.
“तुमचा जन्मकुंडलीवर विश्वास नाही का?”, भटजीबुवा
“मला कुंडली-बिंडली काही माहित नाही. कुंडलीच्या नावे जे काही लिहिले जात आहे वा सांगितले जात आहे ते तद्दन खोटे आहे. या क्षणी जगभर लाखो मुलं जन्माला आले असतील. ती मुलं आणि त्यांचे बाप, सगळे मरतील की काय? त्या सर्वांचे भाग्य-कर्म एकच असू शकेल का? अहो एकाच पोटातून जन्माला आलेल्या जुळ्यापैकी एक मरतो व दुसरा जिवंत राहतो. एकच जन्मवेळ, एकच ठिकाण, एकच जन्मकुंडली असूनसुद्धा परस्पर विरोधातील फळ कसे काय असू शकेल?”
भटजीबुवांना राहवले नाही, “भृगू - पराशर या ऋषीमुनींनी विचार करून मांडलेले जातक विचार खोटे आहेत की काय?”
“याच ऋषी-मुनींच्या नावांचा वापर करून गेली हजार वर्षे आपण दुकान मांडून बसलेले आहात. राजरोसपणे लोकांना फसवत आहात. मनाला येईल तो श्लोक म्हणायचे व पाराशर यांच्या नावाने खपवायचे. मीसुद्धा ज्योतिषावरील अनेक ग्रंथ चाळलेले आहेत व ते सर्व लबाडांनी लिहिलेले आहेत असे माझे स्वच्छ मत आहे. घरातल्या एकूण एक लोकांना फसवण्याचा हा धंदा आहे.”
भटजीबुवांना राग आवरेना. “फसवणुकीच एखादं तरी उदाहरणं सांगा”
“एक दोन नव्हे तर भरपूर उदाहरण यांच्या पुस्तकातच सापडतील. कुंडलीच्या पायी खून पडलेले आहेत. नरबळी दिल्या जातात. पत्नीचा खून, बहिण-भावंडांचे खून झालेले आहेत. हे सर्व यांच्या ग्रंथातील श्लोकापायी!”
“खरोखरच असे काही पुस्तकात लिहिले आहे का?” माझा प्रश्न.
“मी काय माझ्या पदरचे सांगत आहे की काय? त्यांनाच विचार, अशा अर्थाची पदं पाराशर होरासार या ग्रंथात आहेत की नाही?”
“अशा प्रकारचे श्लोक आहेत हे मात्र खरे. खरे पाहता पाराशर होरासार हे एक अभ्यासपूर्वक ग्रंथ आहे. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेणे योग्य वाटत नाही. परंतु तुम्ही त्याला खोटे पाडता.”
“केवळ खोटेच नव्हे तर हा ग्रंथ अश्लीलसुद्धा आहे. इतकी घाण - घाण वर्णनं आहेत की पुन्हा कधी वाचावेसे वाटणार नाही. आई – बहिणींना शिव्या शाप दिलेल्या आहेत. स्त्रियांचा अपमान केला आहे. महिलांबद्दल अनादरयुक्त भाषा हे विद्वानांना शोभत नाही.”
“शास्त्रात अशा गोष्टी असू शकतात यावर माझा विश्वास नाही,” मी मध्येच म्हणालो.
“तू कधी ज्योतिषाचा अभ्यास केला आहेस का? बृहज्जातक पाराशर वाचल्यास तुला कळेल.”
“हे सर्व खोटे आहे याला पुरावा काय?” भटजीबुवांचा प्रश्न
“मी स्वतःच एक पुरावा आहे. माझ्या कुंडलीनुसार मला राजयोग आहे. राजा जाऊ दे, एक चपराशी म्हणूनसुद्धा कुणी मला ठेवून घेत नाहीत. राजयोगाऐवजी मला प्रत्येक गोष्टीसाठी हठयोग करावा लागतो. सगळ्या गोष्टीसाठी हट्ट. पूर्वीच्या काळी ज्योतिष वर्तविणाऱ्यांना गणक म्हणजे मोजणारे या अर्थाने म्हणत होते. व वेश्यांना गणिका म्हणत होते. आणि हे गणक व गणिका लोकांना मोहित करून खिसे रिकामे करत होते. गणक कुंडली उघडून दाखवतो व गणिका छाती!”
“तुम्ही काहीही म्हणा, ज्योतिष हे एक खरेखुरे शास्त्र आहे व ते लिहिणारे भृगुमुनी त्रिकालज्ञानी होते.” भटजीबुवांची निर्वाणीची भाषा.
“बुवा, तुमचा तरी तुमच्या कुंडलीवर विश्वास आहे का?”
“पूर्णपणे!”
“मांडा बघू तुमची कुंडली.”
थोडेसे घाबरतच बुवा कुंडली मांडतात.
कुंडलीकडे बघत “भटजीबुवा, मी या कुंडलीप्रमाणे फळ सांगू का? पळून तर जाणार नाही ना?”
“मी कशाला पळून जाईन?”
खट्टर काका तोंडातच काही तरी पुटपुटत होते व ते फक्त भटजीबुवाना ऐकू जात होते. बघता बघता बुवा उठले आणि आपले सामान घेऊन पसार झाले.
काका त्यांच्या मागे “बुवा सुपारी तरी खाऊन जा...” असे म्हणत म्हणत गेले.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

वाचून फारच मजा आली.

गणक कुंडली उघडून दाखवतो व गणिका छाती!”

मग आमची पसंती गणिकांनाच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे आहे विनोदी लेख आहे.

“ज्योतिषी कसले उत्तर देणार? ते स्वतःच या जंजाळात पूर्णपणे फसलेले आहेत. या मुहूर्तवाल्यांचे एकेक कारनामे ऐकल्यास भोवळ येईल. स्त्रियांच्या पहिल्या मासिक पाळी संबंधात तर यांनी कहर केला आहे. एखादी स्त्री रविवारी ऋतुमती झाल्यास विधवा होईल असे लिहिले आहे. आणि अजून एके ठिकाणी पंचमीला ऋतुमती झाल्यास सौभाग्यवती होईल असे नमूद केले आहे. मला या ज्योतिष महाराजाला विचारायचे आहे की जर पंचमी तिथी रविवारी आल्यास व एखादी स्त्री ऋतुमती झाल्यास तिचे काय होईल? एवढेच नव्हे, अजून एके ठिकाणी माघ महिन्यात रजोदर्शन झाल्यास स्त्री पुत्रवती होईल आणि कृतिका नक्षत्रच्या दिवशी झाल्यास वांझ राहील असे लिहिले आहे. आता तूच सांग, माघ महिन्यातील कृतिका नक्षत्राच्या दिवशी एखादी स्त्री ऋतुमती जाल्यामुळे तिला जे मूल होईल त्याला वांझपुत्र म्हणणार की काय?”
भटजीबुवा गप्प बसून ऐकत होते.

हे वाचून फार हसले.
___________
बाकी अंतर्मुख वगैरे म्हणाल तर - प्रत्येक व्यक्ती जिच्या तिच्या बुद्धी/समजी नुसार आजूबाजूच्या जगाचा अर्थ लावण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. ती व्यक्ती जोवर कोणाला जिवीत अथवा मानसिक हानी पोहोचवत नाही तोवर तिचे ज्ञानार्जनाचे स्वातंत्र्य अबाधित असते. खरं तर जस्टिफिकेशनची गरजच नव्हती.
.
बाकी अमका मुहूर्त तमके कपडे, ऋतुमती होण्याची तिथी आदिंवरती विश्वास नाही.
_____
नानावटींचे मात्र कौतुक वाटते अंधश्रद्धा दूर करण्याचे अथक परिश्रम, वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करण्याची पराकाष्ठा. नानावटी तुम्ही Peaceful Warrior आहात हे सत्य आहे. जग अगदी बदलूनच जाइल असे नाही पण दगडावर जर पाण्याची संततधार धरली तर कधी ना कधी दगड झिजण्याची निदान शक्यता तरी असते - यावर आपला आढळ विश्वास आहे असे जाणवते.
____________
सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने, आम्ही ज्योतिषाच्या बाबतीत दगडाची भूमिका निभावतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खट्टर काकांचा निषेध ! त्यांनी

"अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं"

हे गाणं ऐकलं नाही बहुधा आयुष्यात त्यामुळे ते मुलीला लवकरात लवकर सासरी धाडायच्या मागे लागलेत. मात्र ज्योतिषीबुवा वरुन अंधश्रद्ध दिसले तरी त्यांना पोरीची किती माया आहे. शेवटी मुलगी हे परक्याचे धन असे मानण्याच्या युगात पण ते मुलीला चार दिवस जास्तीचे माहेरी राहावयाला मिळावे म्हणून अगदी पंचमहाभुतांना नडायला निघालेत. ब्राव्हो ! जियो !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0