धार्मिक वांग्मय आणि मार्क्सिस्ट मॅनिफेस्टोची पानं.

मार्क्सवाद आणि भक्तिवांग्मय(१) यांच्या परस्परसंबंधांतील ताण्याबाण्यांचा उलगडा करणारा नाही, पण निदान तो गुंता चिवडणारा लेख कधीतरी श्री. बनसोडे लिहितील याची मला खात्रीच होती. तसा तो त्यांनी लिहिलाच. त्यात भक्तिवांग्मयाच्या पुस्तकांतली मधली काही पानं कम्युनिस्ट मॅनिफेस्टोची का असतात? हा कळीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. (कम्युनिस्ट वुमनीफेस्टो का नसतो हा तितकाच ज्वलंत प्रश्न मात्र चातुर्याने टाळलेला आहे.) तर बाइंडरच्या चुकांबद्दल त्यांनी एक शंका उपस्थित केलेली आहे. बाइंडर पुस्तकं घट्ट बसण्यासाठी एकेकाळी चुका मारायचे. पण अख्ख्या बाइंडर समाजाला सतत 'या तुमच्या चुका' असं देशीवादी लेखकांपासून ते पर्यटनपुस्तकपाडकांपर्यंत; पीतपुस्तकजनकांपासून ते आईच्या आठवणी खाजगी वितरणासाठी छापवून घेणारांपर्यंत सर्वांनी म्हटल्यामुळे बाइंडरांनी चुका टाकून दिल्या आणि जाड धागे वापरून बांधणी करायला सुरूवात केली. किंबहुना तेंडुलकरांनी मुळात 'सखाराम बाइंडर'चं नाव 'चुकामार बाइंडर' असंच ठेवलं होतं, पण अखिल भारतीय बाइंडर्स असोसिएशनने आंदोलन करून ते बदलायला लावलं होतं. बाइंडरांनी चुका टाकल्यावर मागणीत घट झाली आणि अचानक 'इतक्या लोखंडाचं करायचं काय?' असा अनेकांना प्रश्न पडला. मग त्यांनी औद्योगिक क्रांती करून टाकली.

पण या सर्व विश्लेषणानंतरही मुळात 'मै तो आरती उतारू रे, संतोषी माता की' आणि 'दीपावली मनाई सुहानी, मेरे साई के हातों में जादू का पानी' या दोन पवित्र गाण्यांच्या मध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो का घालावा हा प्रश्न सुटत नाही. घट्ट बाइंड केलेल्या पुस्तकाच्या पानांप्रमाणे तो आहे तिथेच राहातो. तर तो सोडवण्यासाठी आपल्याला अर्थशास्त्र, आणि ध्येयधोरणशास्त्र यांचा आधार घ्यावा लागतो.

अर्थशास्त्राचा मुख्य गाभा असा 'अमुकतमुक गोष्ट विशिष्ट पद्धतीने घडली, याचा नक्की अर्थ काय?' त्यामुळे अर्थशास्त्र हे अर्थाविषयी प्रश्न उपस्थित करणं, आणि अर्थोत्पत्तीच्या एका केसाला वेगवेगळे छेद देऊन त्यांची एक रेखीव गुंतवळ तयार करणं इतपतच मर्यादेत काम करतं. त्याचं उत्तर देण्यासाठी ध्येयधोरण अथवा मोटिव्हेशन अर्थातच व्हिजन स्टेटमेंट शास्त्राचा उपयोग होतो. अमुकतमुक गोष्टींचा अर्थ समजण्यासाठी कोणी ना कोणी त्या गोष्टीला जबाबदार आहे, आणि त्या व्यक्तीने ती गोष्ट आपली ध्येयधोरणं पुढे नेण्यासाठी मुद्दामच केलेली आहे हे गृहितक त्यात वापरलं जातं. हे शास्त्र परजणाऱ्या लोकांसाठी 'नेव्हर अस्क्राइब टु मॅलिस व्हॉट कॅन बी एक्स्प्लेन्ड बाय इनकॉंपिटन्स' हे वाक्य हराम आहे. 'सगळ्या जगाचा नियंता, कर्ता करवता परमेश्वर आहे.' या वाक्याबाबत काही पाठिंबा देणारे गट आहेत, तर काही कडाडून विरोध करणारे गट आहेत. मात्र भक्तिवांग्मयाच्या पुस्तकात मार्क्सवादी पानं का भरली जातात याबद्दल त्यांच्यात असलेल्या अनेकमतांचं 'विविधतेतून एकता' साधून त्यांनी उत्कृष्ट विश्लेषण केलेलं आहे. 'कोणाची उद्दिष्टं?' हा कळीचा प्रश्न विचारून त्यांनी यामागची बहुपैलवी कारणमीमांसा मांडलेली आहे.

प्रकाशकाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यांचं उद्दिष्ट हे वरकरणीतरी अधिकाधिक पुस्तकं खपवणं आणि त्यातून जास्तीत जास्त अर्थप्राप्ती करून घेणं हे असतं. अर्थातच काही प्रकाशक आपला कॉपीराइटचा अधिकार बजावण्यासाठी ते अधिकार विकत घेतात, असंही दिसून आलेलं आहे. पण ती झाली मराठी साहित्याची बाब. खरी खपणारी पुस्तकं ही गाइडं आणि धार्मिक वांग्मय इतकीच असतात हे कोणी शेंबडं पोरही सांगेल. आता कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचा पुस्तकं विकायला कसा उपयोग होतो? हे पाहाण्यासाठी वाचकांची, आणि विकत घेणारांची उद्दिष्टं समजावून घ्यावी लागतात. कारण शेवटी पुणं सोडलं तर बाकीच्या सर्व जगात कष्टमर हा किंग असतो अशी धारणा असते.

वाचकांच्या सर्वेक्षणात असं आढळून आलं की त्यांना ही पानं म्हणजे केंद्रदुभाजन वाटतं. अमेरिकेतल्या प्लेबॉयसारख्या नामवंत मासिकाने आपलं दर्जेदार साहित्य विकण्यासाठी असे केंद्रदुभाजक (सेंटरफोल्ड) घालायला सुरुवात केली होती. त्यांचा खप जोरदार वाढला कारण वाचकांना असे मूळ विषयापासून विचलित करणारे केंद्रदुभाजक आवडतात. अनेक तरुणांनी आणि स्वतःला तरुण समजणाऱ्या मध्यमवयीनांनी हे केंद्रदुभाजक जपून ठेवले. दुभागलेल्या केंद्रांच्या डाव्या-उजव्या बाजूंना आणि वर-खाली त्यांची दृष्टी भरकटायला लागली. वाचकांच्या एकंदरीत चिंतनक्षमतेत या दुभाजकांमुळे वाढ झाली. म्हणून प्लेबॉयच्या प्रकाशकांनी आपली ही प्रथा अधिकाधिक जोमाने चालू ठेवली. याच कारणास्तव मार्क्सवादी चित्रणही लोकांच्या बुद्धीला उद्दीपित करून बाकीच्या धार्मिक वांग्मयाला उभारी देतं.

इतर वाचकांपैकी काही खर्रेखुर्रे उजवे धर्मप्रिय आहेत तर काही खर्रेखुर्रे डावे धर्मद्वेष्टे आहेत. ते लोक इतरांवर या मधल्या पानांचा वापर करतात. नीरक्षीरविवेकबुद्धीप्रमाणे त्यांना या पानांमुळे वामोत्तरविवेकबुद्धी मिळते. मग अशांपैकी कोणाला फेसबुकावर आपल्या मित्रयादीत ठेवायचं आणि कोणाला काढून टाकायचं या सतत ऐरणीवर असलेल्या कळीच्या प्रश्नाला उत्तर त्यातून त्यांना मिळतं. हा प्रकार इतका प्रभावी आहे की ही फीचर फेसबुकात कुठेतरी ठेवण्याची जोरदार मागणी झुकरबर्गकडे दोन्ही गटांकडून करण्यात आलेली आहे. अर्थात या खर्ऱ्याखुर्ऱ्या लोकांची संख्या फारच कमी असल्यामुळे ही मागणी 'सर्व फेमस मंडळींना सर्व पोस्टी वाचून त्यावर प्रतिक्रिया देण्याची सक्ती केली जावी' या मागणीपेक्षा रांगेत बरीच मागे आहे.

वाचकांचा तिसरा आणि सर्वात मोठा गट म्हणजे स्वयंघोषित विचारवंत आणि स्वयंघोषित उजवे. यांची उद्दिष्टं केवळ स्वतःला मिरवण्याची असल्यामुळे त्यांना ती पुस्तकं केवळ विकत घेऊन शेल्फवर ठेवण्यात रस असतो. त्यामुळे हे लोक मार्क्सवादी मॅनिफेस्टो धार्मिक वांग्मयात असला काय, किंवा 'दासाचं भांडवल' पुस्तकाच्या कव्हराच्या आत फक्त 'गं गं गणात बोते' असं लाखवेळा छापलेलं असलं काय, यांना काहीच फरक पडत नाही. हे लोक आत नक्की काय आहे यापेक्षा बरणीवर लेबल काय लावलं आहे यावरूनच आपली मतं बनवतात. त्यांना 'माणूस नावाची गुंतागुंत' समजत नाही. अर्थातच त्यामुळे त्यांचं आयुष्यात काहीही बिघडतही नाही.

असो. थोडक्यात काय, तर बनसोड्यांच्या एका लेखाने जितक्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा जास्त प्रश्न निर्माण केलेले आहेत. चार्वाकाचं नावही न घेता त्यातल्या एका उपमुद्द्यावर इतका मोठा लेख लिहिता आला. त्यांच्या या लेखातल्या बऱ्याच प्रश्नांचे परामर्श घेणारे बरेच लेख लिहिण्याचा मानस आहे. त्यातून एखादं पुस्तकही तयार होईल. त्यातून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर मग बनसोडे एक सहाखंडी ग्रंथराज लिहू शकतील. हे अनंतकाळपर्यंत चालू राहील. विद्वत्ता अशीच वाढत राहाते, ज्ञानाची प्रगती अशीच होते.

ता. क. मी लिहीत असलेलं पुस्तक तुम्ही वाचावं यासाठी त्यात वेगवेगळ्या केंद्रदुभाजकांची सोय करणार आहे, हे आधीच जाहीर करतो.

(१) वांग्मय हा शब्द काहीजण 'वांडमय'सारखाही लिहितात ते काही मला आवडत नाही. 'बोले तैसा लिहे त्याची वंदावी पाऊले' या मताचा मी आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वांग्मय हा शब्द काहीजण 'वांडमय'सारखाही लिहितात ते काही मला आवडत नाही. 'बोले तैसा लिहे त्याची वंदावी पाऊले' या मताचा मी आहे.

काही? सग्ग्ग्गळीकडे वाङ्मय असाच लिहीतात. तत्सम असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मेलेल्याविषयी वाईट बोलू नये म्हणतात, पण तसा तो फार चांगला नव्हता. मात्र त्याची अशा निर्घृण पद्धतीने हत्या व्हावी? कोणाच्या कपाळी काय लिहिलेलं असावं हे शेवटी कोणाला सांगता आलेलं आहे? असो. दोन मिनिटं शांतता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख महत्त्वाचा आहे आणी त्याचे सुर हे डाव्या तत्त्वज्ञानाच्या कुठल्याही प्रारंभिक नांदीप्रमाणेच आहेत हे आगोदर नमुद करतो. वरती प्लेबॉय व सेंटरफोल्डचा उल्लेख आला आहे आणि अमेरीकन पोर्नोग्राफीचा संदर्भ वापरलेला आहे. हा संदर्भ रशियन असु शकत होता. भारतातल्या निरनिराळ्या ग्रामिण जाहीरांतीत बॅकग्राउंडमध्ये दिसणारे, उच्च दाबाची वीज देशभर घेउन जाणारे ते उंच उंच इलेक्ट्रीक खांबाचे तंत्रज्ञान आपण रशियाकडुन मिळविले होते ह्याबद्दल कुणी कधीही आठवण काढीत नाही. जे विजेच्या खांबाचे तेच पोर्नोग्राफीचे. भारतात ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आलेली २५% पोर्नोग्राफी रशियन होती ६०% अमेरीकन आणि उरलेली १५% युरोपीयन. अमेरीकन पोर्नोग्राफीक प्रपोगंडात बॅकग्राउंडमध्ये कोका कोला, ड्युरासेल, प्रिंगल्स इत्यादी उत्पादनांची एम्बेंडेड अ‍ॅडव्हर्टायजिंग असे. रशियन पोर्नोग्राफीत असे काही नव्हते त्यामुळे जागतिकीकरण सुरु झाल्यानंतर अमेरीकेची आपसुकच सरशी झाली आणि एम्बेडेड अ‍ॅडव्हर्टायजींग न विकता आल्याने सोव्हीयट संघाचे पतन. हा मुद्दा विस्ताराने घेउन त्यानंतर त्याचा संबध अनेक जागतिक गोष्टींशी लावता येतो आणीक हे सगळे प्राचीन भारतीय संस्कृतीशी कसे आगोदरपासुन रिलेटेड आहे ह्यासंबधीही बोलता येईल. एकुण एका मोठ्य शोधनिबंधाच्या शक्यता इथे आहेत. तुम्ही तुमचे लिखाण चालु ठेवा आणि मी माझे चालु ठेवतो. इव्हेंच्युअली त्याचे 'रेन अँड मार्टीन' सारखे काहीतरी होईल ह्याची अपेक्षा करुयात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गांधिलमाशा कम्युनिझम पाळतात. म्हणजे त्यातल्या नव्वद टक्के माशांना तो पाळावा लागतो. त्यांना कामकरी म्हणतात. बाकीच्या फक्त मध खाण्याचे काम करतात. ते काम त्यांनी स्वत:वर लादून घेतले आहे समस्त गांधिलमाशा समाजाच्या समतेसाठी उन्नतेसाठी.
हा कॅाम्युनिस्ट प्रचार तुम्हाला एखादवेळेस धार्मिक पुस्तकात सापडण्याची शक्यता आहे. खरं म्हणजे ते अध्यात्म आहे. कर्म ,आत्मा ,मोक्ष याचं इथे निरुपण सापडेल. मोह माया लोभ सर्वांची उकल असेल. मधुरूपी ज्ञानावर पोसलेली पिल्ले त्या परमेश्वराचे चिंतन करत कशी आपलं जीवन इतरांच्या कल्याणासाठी समर्पित करून स्वर्ग गाठण्याची पुंजी साठवतात हे वाचून या भवसागरात गटांगळ्या खाणारा पामर आपली उन्नती करून घेतो. तिन्ही लोकी त्यांचा डंका वाजत राहातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास
अवांतर - चावल्यावर गांध येते त्या मधमाश्यांना गांधील माश्या म्हणतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधुमक्षिकापालनच्या माशा फार त्रासदायक नसतात. कडेकपारीतल्या आग्या मोहोळच्या चावतात डंख मारतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी ते मॅनिफेस्टो नसून माणेफेस्टो असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0