पाच रुपयांची भिंत

गटाची मीटिंग संपली. आम्ही सगळ्याजणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून बाहेर पडलो. 'स्वयं सहाय्यता गट' अस अधिकृत भारदस्त नाव असल, तरी बायांसाठी मात्र हा 'गट'च - फार फार तर 'बचत गट'.

राहीबाई हळूच माझ्याजवळ आली. माझ्या खांद्यावर तिने अलगद तिचा हात ठेवला. मी तिच्याकडे पाहून हसले.
"काय राहीबाई, आज शेळ्यांना चरायला सुट्टी द्यायचा विचार आहे काय?" मी सहज विचारलं.
राहीबाई आज खुषीत दिसत होती. तिचे डोळे चमकत होते. रापलेल्या चेहऱ्यावर सुरकुत्यांच्या साथीला आज हसू होत!

"तुझा हात पुढे कर", राहीबाईने मला हुकूम सोडला.
"डावा नाही, ताई, नेहमी उजवा हात पुढे करावा" राहीबाईची प्रतिक्रिया.
मी डावखुरी नाही पण अनेक गोष्टी मी डाव्या हाताने करते. आत्ताही अभावितपणे माझा डावा हात पुढे आला होता. आता यावर राहीबाईशी वाद घालण्यात फारसा मुद्दा नव्हता. राहीबाईच्या आज्ञेनुसार मी उजवा हात पुढे केला.

माझा उजवा हात राहीबाईने तिच्या डाव्या हाताने पकडला. त्यावर स्वत:ची उजवी मूठ ठेवली. ती कोणाला दिसू नये अशा रीतीने तिने माझ्या तळहातावर उघडली. माझ्या हातात कागदाचा एक तुकडा पडल्याचे मला जाणवले. राहीबाईने मग त्या हाताने माझी उजवी मूठ बंद केली.

भोवतालच्या सगळ्या बाया आणि डझनभर पोरसोर मजेत हसायला लागली.
मला काही समजेना. काय रहस्य होत?

"काय आहे राहीबाई हे?" मी झाकलेली मूठ तशीच ठेवत विचारलं.
"उघडून बघ की ताई आता," रखमाने दिलेल्या सल्ल्यावर सगळे परत जोरजोरात हसले. रस्त्यावरून जाता जाता गंमत बघणारे दोन चार पुरुष पण त्यात सामील झाले.
बऱ्याचदा मी साध्या गोष्टी उगीच गुंतागुंतीच्या करते हे जाणवून मला पण हसायला आल.

उजवी मूठ मी उघडली. त्यात दहा घड्या पडलेली, मळकट, फाटकी अशी पाच रुपयांची एक नोट होती.
"हे काय राहीबाई? हे कसले पैसे? गटाचा हिशोब तर झाला नाही का नुकताच?" मी आश्चर्यचकित होऊन, काहीस भांबावून जात राहीबाईकड पाहिलं.
"ताई, गटाचा हिशोब संपला मघाच. हे पैसे तुझ्यासाठी आहेत." सांगताना राहीबाईच्या नजरेत कसली तरी शंका होती, कसल तरी दु:ख होत.
"मला? मला कशाला पैसे राहीबाई?" माझा गोंधळ वाढला होता.
"तू चहा पी त्या पाच रुपयांचा", हे म्हणताना राहीबाईने माझी नजर चुकवली.

तोवर इतर बायांनी गलका सुरु केला होता. "ताई, नाही म्हणू नकोस तिला. बिचारीने मोठ्या कष्टाने जमवले आहेत ते पैसे," रखमा कधी नाही ते आर्जवाने म्हणाली.
"मागच्याच वेळी देणार होती ती, पण तुला घाबरत होती बिचारी," कुसुम म्हणाली.
"अग पण राहीबाई, चहा प्यायला मी तुझ्या घरी येते की, पैसे कशाला?" म्हणत मी ती नोट राहीबाईला परत द्यायचा प्रयत्न केला.

"तू कशी येशील माझ्या घरी?" राहीबाईचा स्वर हळवा झाला होता.
मला काहीच समजेना.

सोलापूर जिल्ह्यातलं ते एक छोट गाव. तालुक्याच्या ठिकाणाहून दिवसातून चार वेळा बस या गावात यायची. मागच्या दीड वर्षापासून मी या गावात येत होते. पहिले तीन चार महिने पहिल्या 'गटा'ची स्थापना करण्यात गेले. गट म्हणजे काय, बचतीचे महत्त्व, एकत्र बचत करण्याचे फायदे .. अशा अनेक चर्चांमधून पहिला गट तयार झाला होता. पहिल्या गटातल्या वीसही बाया उत्साही होत्या. सगळ्या वेळेत बचत करत होत्या, अडीअडचणीला घेतलेले कर्ज वेळेत परत देत होत्या. त्यांना होणारा फायदा पाहून आणखी दोन गट तयार झाले.

राहीबाई पहिल्या गटाची सभासद होती. पन्नाशीच्या आसपास तिचे वय असेल. नवरा दहा वर्षांपूर्वी गेला होता. एक मुलगा होता पण तो आईची विचारपूस करत नव्हता. जमीन नाही, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. राहीबाई आणि तिच्या दोन चार शेळ्या एका खोपटात रहात. राहीबाई स्वभावाने सौम्य होती. इतर बायांना वेळप्रसंगी शेतातल्या आणि घरातल्या कामात मदत करत असे. बायाही तिची कदर करत. सणासुदीला पक्क्वान्नाचे ताट राहीबाईला वाढून दिले जाई, लग्नप्रसंगी आठवणीने तिला लुगडे चोळी दिली जाई.

या गावात मी संध्याकाळच्या शेवटच्या बसने - इथल्या भाषेत मुक्कामाच्या बसने - येत असे. जेवण गटातल्या वेगवेगळ्या बायांकडे असायचे. पण मी राहायचे ते अनिताबाईच्या घरी -अस त्या सर्वानी ठरवल होत. इतर घरात दारुडा नवरा होता , घरात जनावर होती, लेकर फार लहान होती, आजारी म्हातार माणूस होत ....म्हणून कदाचित मी अनिताबाईच्या घरी त्यांना जास्त सोयीची होते. अनिताबाईचा नवरा माळकरी होता, शाळेत जाणारी मोठी मुल होती, दोन पक्क्या खोल्या होत्या, घरात gas होता, मुख्य म्हणजे संडास आणि बाथरुमची सोय होती. मी फार खोलात न जाता ही व्यवस्था मान्य केली होती. मात्र जेवायला मी सगळ्यांकडे जात होते.

मात्र या दीड वर्षात मी एकदाही राहीबाईच्या घरी गेले नव्हते. एक तर तिच्या घरी दुसर कोणी नव्हत - त्यामुळे कोणाला भेटायला जाण्याचा प्रश्न नव्हता. दुसर म्हणजे मीटिंग संपली की राहीबाई तिच्या शेळ्या चारायला घेऊन जायची - ती थेट दिवस मावळल्यावर परत यायची. राहीबाईची परिस्थिती मला माहित असल्याने मीही तिच्याकडे जायचा विषय कधी काढला नव्हता.

आणि हीच राहीबाई आता मला 'चहासाठी' मोठ्या कष्टाने जमा केलेले पाच रुपये देत होती.
"न यायला काय झाल तुझ्या घरी? चल, आत्ता येते. साखरेची चिंता करू नकोस. मला गुळाचा चहा आवडतो," मी हसत हसत राहीबाईला म्हटले.
पण राहीबाईचा चेहरा चिंताग्रस्तच होता.
"हं! आणि मला कोरा चहा आवडतो. हल्ली शहरात कोराच चहा पितात," मी आश्वासक स्वरात बोलतच होते.
राहीबाईची मान खाली होती.

एरवी टणाटण बोलणारी रखमा पण गप्प होती.
कुसुम, शारदा, मंगल, शेवंता .... सगळ्या गप्प होत्या.
पोरही शांत होती.
जो तो माझ्याकडे कुतुहलाने पहात होता.
वातावरणात तणाव होता.

"ताई, घेऊन टाका पैसे. राहीबाई प्रेमान देतेय, तिचा मान राखा," न राहवून ग्रामसेवक बोलले.
सगळ्यांचे चेहरे उजळले.
गावातल्या त्या छोट्याशा रस्त्यात आता दोन बैलगाड्या, चार सायकली, दोन कुत्री, असंख्य माणस जमा झाली होती.
माझ्या उजव्या तळहातात अजूनही ती पाच रुपयांची नोट होती.

"ताई, उगीच हटून बसू नको, घे ते पैसे," रखमाने आज्ञा केली.
मी नकार दिला.
मला हा सगळा प्रकारच काही समजत नव्हता.
चहापाण्यासाठी मी पैसे घेईन अस या लोकांना का वाटलं असेल?

"चल राहीबाई, आज तुझ्याकडेच चहा पिणार मी", मीही आता हट्टाला पेटले होते.
"ताई, तुम्ही कशा जाल राहीबाईच्या घरी चहा प्यायला?" आता सरपंचही आले होते.
"का? काय झाल? मला तर काही अडचण नाही," मी मोठ्या आवाजात बोलले.
पुन्हा एकदा भीषण शांतता पसरली.

सरपंच, ग्रामसेवक, रखमाबाई, कुसुम, शारदा यांची आपापसात नजरानजर झाली.
राहीबाईचा चेहरा विदीर्ण झाला होता.

"अहो ताई, मांग जातीची आहे राहीबाई, तुम्ही कस तिच्या घरच अन्न पाणी घ्याल?" एका शिक्षकाने कोंडी फोडली.

जमलेल्या सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकलेला मला जाणवला.
त्यांनी 'सत्य' सांगितल्यावर मला काही पर्याय राहणार नाही, माझा सगळा युक्तिवाद संपेल याची त्यांना पुरेपूर खात्री होती.

मी उजव्या तळहातावरच्या त्या जीर्ण नोटेकड पाहिलं.
तो केवळ एक निर्जीव कागद नव्हता.
त्या पाच रुपयांच्या नोटेमाग एक मोठा इतिहास दडलेला होता.

विषमतेचा इतिहास.

अन्यायाचा इतिहास.

शोषणाचा इतिहास.

दांभिकतेचा इतिहास.

"ईशावास्यमिदम सर्वम" तत्त्वज्ञानाशी प्रतारणेचा इतिहास.

किती वेदना, किती अश्रू, किती दु:ख, किती अपमान, किती असहाय्यता, किती विद्वेष .. त्या एका क्षणात मला ते सगळ दिसलं!

ती पाच रुपयांची नोट ही आमच्या परंपरेन निर्माण केलेली एक भिंत होती. अवाढव्य. बोजड. भक्कम.

मी हसले. राहीबाईच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हटल, "ठीक आहे, घेते मी हे पैसे,"
माझ वाक्य पूर्ण व्हायच्या आत सगळे परत हसायला लागले.
"पण एका अटीवर," मी म्हटल .. परत सगळे चिंतीत झाले.

"राहीबाई, आज मी तुमच्या घरचा चहा प्यायल्याशिवाय गावातून जाणार नाही तुमच्या," माझ्या या बोलण्यावर राहीबाई हसली. पण तिच्या डोळ्यांत पाणी तरारल होत!

दोन क्षण तसेच गेले, मग रखमा म्हणाली, 'चला, ताईबरोबर आपण सगळ्याच जाऊ राहीकडे चहा प्यायला."
शारदा दूध आणायला गेली. कुसुम कप आणायला पळाली. वीस जणी चहा प्यायच्या तर सगळ्यांचीच मदत लागणार!

त्यादिवशी राहीबाईच्या खोपटात आम्ही मावत नव्हतो.
राहीबाईच्या चेहऱ्यावर हसू ओसंडून वाहत होत.
तसा चहा आजवर परत मला कधी मिळाला नाही!

पूर्वप्रकाशितः http://abdashabda.blogspot.com/2010/12/blog-post_20.html

field_vote: 
4.142855
Your rating: None Average: 4.1 (7 votes)

प्रतिक्रिया

छान लेख. Smile

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
(हा श्रामो, बेनं लई लबाड हाय!!आश्या प्रतिक्रिया देतो की सहमती की उपहास हे पण कळत नाय!! आपण याच्याशी सहमत होणंच आपल्या भल्याचं!!!)

मी डावखुरी नाही पण अनेक गोष्टी मी डाव्या हाताने करते.
मी सुद्धा! उजवा हात तर देवाचा!! तो सगळ्याच कामी कसा काय वापरायचा?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(हा श्रामो, बेनं लई लबाड हाय!!आश्या प्रतिक्रिया देतो की सहमती की उपहास हे पण कळत नाय!! आपण याच्याशी सहमत होणंच आपल्या भल्याचं!!!)

प्रतिसादाला मार्मीक अशी श्रेणी दिली आहे. Wink हे वाक्य खरं करण्यासाठी त्याशिवाय पर्यायच नव्हता, काका! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बघा, मी बोल्लो नव्हतो?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"...मी सुद्धा! उजवा हात तर देवाचा!! तो सगळ्याच कामी कसा काय वापरायचा?..."
ROFL 'पक्का डांबिस' जास्त रास्त झालं असतं !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदरीतच तुमच्या कार्यामुळे घडणार्‍या अश्या प्रवासामुळे तुमच्या कडे अश्या अनुभवांचे गाठोडे असणार ह्या विचाराने आनंद झाल आहे.
तुमच्या शैलीदार लिहिण्यामुळे वाचायलाही मस्त वाटते आहे.

- (आनंदी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोतडीतून अजून चिजा बाहेर येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही भिँत वर्षानुवर्षे भ्रामक समजुतीच्या खोट्या गौरवाच्या परंपरेच्या वृथा अभिमानाच्या सिमेँटने लिँपली आहे
तिच खच्चीकरण होणं अवघड आहे

लेखन आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

हे सुद्धा लेखन खूप आवडले. तुमच्याशी या बचत गटांबद्दल चर्चा करायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका, श्रावण मोडक, सेरेपी, सोकाजीराव, राजेश घासकडवी, जाई, व्हाईट बर्च,

तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेखही आवडला.
<<मी उजव्या तळहातावरच्या त्या जीर्ण नोटेकड पाहिलं.
तो केवळ एक निर्जीव कागद नव्हता.
त्या पाच रुपयांच्या नोटेमाग एक मोठा इतिहास दडलेला होता.
विषमतेचा इतिहास.
अन्यायाचा इतिहास.
शोषणाचा इतिहास.
दांभिकतेचा इतिहास.
>>
हे सुरेख लिहिलं आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशीच पोतडी उघडत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गोष्ट छान आहे. (तरीपण बचत गटाचा कालखंड व पुर्वीची अस्पृष्य जात हे कॉम्बीनेशन थोडसं पचायला जडच जातंय. येथे जाणीवपुर्वक 'पुर्वीची' हा शब्द टाकलाय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

लेख खूप आवडला.
जो पर्यंत या भिंती तोडणारे तुमच्यासारखे लोक आहेत तोपर्यंत आशेला वाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंतर रोखठोक लेख आहे.. अलंकारीक, भावनाप्रधान - काळाजाला हात घालणारी वाक्य असे काहि नसूनही सुखान्तामुळे डोळ्यात पाणी येणं थांबवू शकलो नाही.
सुरेख लेखन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भिंत पाडायला कधी कधी असेच अलगद धक्के लागतात, हे खरे. लेख आवडला.
तुमच्या निर्णयाला गावातल्या बाकीच्यांचा (जातीचा उल्लेख केलेल्या शिक्षकाने, उदा.) प्रतिसाद काय होता? बाकीच्या बायका नंतर ही एकत्र राहीबाईंकडे चहा पीत असाव्यात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेखही आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

धनंजय, रुची, अदिति, पाषाणभेद, नगरी निरंजन, ऋषिकेश, रोचना, सन्जोप राव - सर्वांचे आभार.

पाषाणभेद, ही गोष्ट म्हणजे 'कथा' या अर्थाने नसून मला आलेला अनुभव आहे. आपल्याला अशक्य वाटणा-या ब-याच गोष्टी अजूनही आपल्या भोवताली घडत असतात!

रोचना, 'पुढे काय झाल' हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे. पण कोणताच बदल असा एकदम घडत नाही. बरेचदा समोरच्याच मन (किंवा मान) राखण्यासाठी काही गोष्टी एक-दोन वेळा केल्या जातात, बरेचदा पहिले पाढे पंचावन्न होतातही. बदल अनेक वेगवेगळ्या गोष्टींमुळे, घटनांमुळे, अनुभवांमुळॅ होतो, अपरिहार्यता म्हणून होतो. म्हणून माझ्या एका अनुभवातून लगेच काही निष्कर्ष काढणे घाईचे होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी बरोबर आहे. म्हणूनच या बायकांच्या समूहात पुढे काय झालं या बद्दल कुतूहल वाटलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी बरोबर आहे. म्हणूनच या बायकांच्या समूहात पुढे काय झालं या बद्दल कुतूहल वाटलं!

मलाही.

मग अतिवासताई, पुढच्या कहाणीचा लेख कधी टाकताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा सुद्धा लेख आवडला. असे आणखी सत्यानुभव येऊ द्या.

बाकी श्रामोंच्या फक्त स्मायलीचं कारण काही कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

रोचना, शहराजाद, स्मिता ... लिहीन; पण कधी ते माहिती नाही. काहीतरी कारणाने त्या गावाची आठवण आली की लिहीन. ठरवून लिहिता येत नाही मला, शिकायचय अजून ते!

स्मिता, श्रावण मोडक यांच्या स्मायलीचा अर्थ मलाही समजला नाही. पण अर्थ लावायच स्वातंत्र्य असतं तेव्हा मी त्यातून चांगला अर्थ काढते - त्यामुळे ती स्मायली प्रोत्साहनपर आहे अस मी आपलं मानून घेतलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसा कोण जाणे, हा छान लेख वाचायचा राहून गेला होता. लिखाणाची शैलीही आवडली. अजून येऊद्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0