मरणाचा बाजार

लहानपणापासून एक गोष्ट माझ्या लक्षात आलीये, कोणीही गेलं, वारलं, मेलं, खपलं, गचकलं वगैरे तर मला रडायलाच येत नाही. हे माझ्या खूप जवळच्या लोकांना म्हणजे ज्यांनी मला विनाकारण रडताना पाहिलंय त्यांना पटणारही नाही, बाकीच्यांचं तर जाऊचदे! पण नाहीच येत मला रडायला कोणीही गेलं तरी. म्हणून मला ती व्यक्ती प्रिय असत नाही असं नसतं. कितीही प्रिय व्यक्ती असली तरी असंच होतं. हे बहुतेक मरणाचा आणि इमोशन्सचा बाजार मांडलेला बघून होत असावं. तर ते असो.
असं कोणी गेलं की भेटायला येणारी माणसं फार मनोरंजक असतात. त्यामुळं रडणं सोडाच काहीवेळा हसायलाही येतं. आज्जी गेली तेव्हा मी माझं जवळचं माणूस गमावलं ते पहिल्यांदा. तेव्हा भेटायला खूप लोकं यायचे. एक आन्टी आलेल्या फुलऑन मेकअप वगैरे करून. मला अजूनही त्यांनी नेसलेली बाॅटलग्रीन रंगाची झुळझुळीत साडी आठवतेय आणि मरून रंगाची लिपस्टीकसुद्धा. तर त्या आन्टी आणि अजून दोन काकू यांच्यात संवाद 'साडी कुठून घेतली, कितीला घेतली, लिपस्टीकचा ब्रॅण्ड' वगैरेवर चर्चा सुरू होती. मला गंमत वाटलेली. आणि मी विचित्रच चेहराकरून त्यांच्याकडं बघत बसले होते नंतर आन्टीला ते जाणवलं आणि ती आन्टी खूपच खजील झाली होती.
एकदा माहितीतले एकजण गेले, जरा जवळचे होते म्हणून समजल्या समजल्या गेले. तर गेलेल्या व्यक्तीच्या अंगावर हात आपटून आपटून त्यांच्या नात्यातली एक मुलगी खूप जास्त रडत होती. खूप वाईट वाटलेलं तिला, खूपच दुःख झालेलं दिसत होतं. तिथं जमलेल्या बायकांच्यात 'होणार सून मी या घरची' बद्दल चर्चा सुरू होती. एक काकू म्हणे, "त्या जान्हवीच्या सासरसारखं सासर पाहीजे बघा सगळ्यांना" दुसरी काकू म्हणे, "हो तर! किती भाग्यवान ती, इतक्या सासवा असून जाच नाही की कटकट नाही. पण मेले या आठवड्यातले एपिसोड बघायलाच मिळाले नाहीत ओ, काय झालं काही कळेना." तर ती हात आपटून आपटून रडणारी मुलगी एकदम म्हणाली, "श्री आणि जान्हवी आता वेगळे राहणार की ओ..." असं म्हणून त्या काकांच्या अंगावर हात आपटून, "कसं होईल ओ आता काकाऽऽऽऽऽ" पुन्हा रडायला लागली. मला जोराचं हसू आलेलं तिथं. 'मी आलेच' असं सांगून बाहेर पडून एकटीनंच हसून घेतलेलं आणि परत आत जाऊन गंभीर तोंड करून बसले होते. हे असे प्रसंग होतच असतात.
एक ऐकीव किस्सा आहे, एका गावाकडं एक बाई गेल्या, तर त्यांच्याकडं कामाला मदत करायला येणाऱ्या बाईने दारातूनच गळा काढला, "दिवाळीत मला जरीची साडी देतो म्हनलेल्या की वैनी, आता कोन दील मला जरीची साडी, वैनी असं कसं गेलात ओऽऽऽऽऽ." तिथं असणाऱ्या शहाण्यासुरत्या लोकांची हसून मुरकुंडी वळली असेल यात शंका नाही.
हे तर एक झालंच, घरातली माणसंसुद्धा ताळतंत्र सोडून वागणारी असतात. घरातलीच व्यक्ती गेली समजा ती बाई असेल तर तिचं प्रेत, शव, मढं इ. जे काही असेल ते घरात असतानाच तिच्या दागिन्यांची वासलात कशी लावायची, कपड्यांची वाटणी करायची की नाही, बॅन्केचे डिटेल्स वगैरे घेणे यावर चर्चा सुरू असतेच. पुरुष असेल तरी जरा फरकानं हे असंच असतं. एक ओळखीतले आजोबा परगावी असताना गेले, पण त्यांना इथं त्यांच्या निवासस्थानी आणणार होते. ते येईपर्यंत सात तास त्यांच्या घरातले लोक आळीपाळीनं ते कसे छळवादी आहेत, ते कसे गरीब स्वभावाचे आहेत, ते कसे तऱ्हेवाईक वागतात, ते कसे शांत आहेत इ. असं बोलत होते. आणि ते आल्यावर अचानक हमसाहमशी रडणं वगैरे. मला प्रश्न पडतो हे कसं जमतं? मला येतच नाही माणूस मेला की रडता.
ते असो. पुढची गंमत अजून भयाण असते. ते दिवसकार्य वगैरे प्रकार. कावळा शिवणे इ. आता कावळ्यांना बोर होत नसेल काय तेच ते भात खाऊन मग ते का येऊन चोच मारतील पिंडाला? हा आपला मला पडलेला प्रश्न, विचारला तर "जास्त अक्कल आलीये?" असं ऐकावं लागणार हे माहित असल्यानं गप्प बसलेलं बरं. एखादवेळेस कावळा शिवत नसला तर भटजी लोकं तूपाची धार सोडतात पिंडावर त्या वासानी कावळे भसाभस येतात हे माझं निरिक्षण. एखाद्यावेळेस सगळे सोपस्कार पूर्ण व्हायच्या आतच कावळा शिवला तर, "काहीसुद्धा इच्छा राहिली नव्हती हो! किती शांत, समाधानी!!" असं म्हणून लोकं गळे काढतात. आणि शिवलाच नाही कावळा तर "काय इच्छा राहिली असेल हो? कुणात जीव अडकला असेल?" असं म्हणून पुन्हा गळे काढताना दिसतात लोकं. काही समाजात यावेळी खाद्यपदार्थ ठेवण्याची पद्धत असते. म्हणजे त्यावेळी तिथं येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकानं, संबंधितानं येताना काहीतरी पदार्थ आणायचा असतो. मग ते पदार्थ तिथे मांडून ठेवायचे असतात आणि कावळा मग कुठल्यातरी व्यक्तीने आणलेल्या पदार्थाला आधी शिवेल (चोच मारेल) ती व्यक्ती खूष होऊन, "माझ्यावर खरंच जीव होता त्यांचा माझ्या हातचं अमुक आवडायचंच त्यांना" असं म्हणून परत कढ... इथं घाटावर गेलं की या ठीकाणी दारूच्या बाटल्या आणि सिग्रेटची पाकिटंही दिसतातच. ते सुद्धा आवडते पदार्थ असूच शकतात ना! त्यातही जीव अडकलेला असूच शकतो ना!!.
माणूस गेल्यावर एक कोपरा सारवून घेऊन त्यावर दिवा लावून ठेवतात दहा दिवस अखंड आणि त्या सारवल्या जागेवर म्हणे चिमणीचे पाय उमटले तर मोक्ष मिळालाच, चिमणीचा की कुठला अवतार घेऊन जन्माला आलेली असते म्हणे ती व्यक्ती, इतक्या चिमण्या असत्या तर "चिमणी वाचवा" म्हणून सांगायला कशाला लागलं असतं? काहीतरी एकेक समजूती असतात खरं लोकांच्या.
हे सगळं होत असताना आपसूक, विनाआजार एखादी व्यक्ती गेली असेल तर "चांगलं मरण आलं बघा.पुण्यवान हो फार पुण्यवान!" आजारी पडून गेली असेल एखादी व्यक्ती तर "फार सोसलं हो, सुटकाच केली देवानं, पुण्यवान हो पुण्यवान म्हणून लेकराबाळांकडून सेवा झाली." सगळीच माणसं पुण्यवान कशी? त्या व्यक्तीला अजून जगायचं असेल तर? मग ती आजारी असो नसो, तिची सुटका झाली हे चांगलं कसं? हे असं पाप पुण्याच्या प्रतवारीत कसं काय तोलता येत? हे असे बाळबोध प्रश्न मला पडतात पण ते गिळून टाकण्यात येतात.
या सर्वात लहान मुलं असतील आजूबाजूला तर त्यांचे प्रश्न तर महान आणि थोरच असतात! एक पाच सहा वर्षांचा मुलगा त्याच्या बाबाची आई गेल्यावर त्याच्या आईच्या आईबाबाला म्हणाला "आता ही आज्जी गेली म्हणजे देवाघरी गेली, म्हणजे आता ती फोटोत जाणार, तुम्ही कधी जाणार आहात आता फोटोत? मला परत एकदा नीट बघायचेय सगळी प्रोसेस" ते आज्जीआजोबा आचंबित होऊन तिथून उठून गेले बिचारे.
नुकतंच अशा काही प्रसंगाना डोळ्यादेखत पाहीलं. घाटावर जावं लागलं. तिथे फक्त आमचंच कुटुंब नव्हतं. इतरही अनेक कुटुंबं होती कावळ्याची वाट बघत, आपापलं माणूस मुक्त होण्याची, त्याला मोक्ष वगैरे मिळण्याची वाट पाहत उन्हात चटके सोसत उभी होती. तिथं फक्त एक माणूस एकटा होता. त्याच्यासोबत एकही माणूस, नातेवाईक, मित्रमंडळ असं कोणीच नव्हतं. ते पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं मात्र. एकाकीपणापेक्षा, एकटेपणापेक्षा मरण सुसह्य असावं असं मला वाटतं म्हणून असेल कदाचित पण तेवढ्यापुरतं माझ्या डोळ्यात पाणी आलं.

~अवंती

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांग‌ल‌य ऑब्झ‌र्वेश‌न
म‌स्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्त‌म‌ निरीक्ष‌ण‌. अडाण‌चोटांचा ग‌ल्ब‌ला अस‌ताना हे असेच‌ चालाय‌चे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान लिहीलंय. तीच अलिप्त‌ता. आज‌काल आंजाव‌र म‌राठी लेख‌न क‌र‌णारे अग‌तिक लेख‌क‌च इतके माज‌लेत, की असे लेख व्य‌वस्थित म‌नात जागा क‌रून जातात. विनोदाची प‌ख‌र‌णही झ‌कास. अजून लेखांच्या प्र‌तिक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

सगळीच माणसं पुण्यवान कशी? त्या व्यक्तीला अजून जगायचं असेल तर? मग ती आजारी असो नसो, तिची सुटका झाली हे चांगलं कसं?

या विषयावर अतुल गावंडे नामक अमेरिकी सर्जननं बरंच लिहिलं आहे. बहुदा हा लेख - Letting Go

मृत्युनंतर झालेल्या गमतीशीर गोष्टींपैकी दोन मला लख्ख आठवतात. पहिली माझी आई गेली तेव्हाची. माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी मोठी असलेली चुलतबहीण माझ्या गळ्यात पडून, "रड ना, रड अदिती" म्हणत होती. आणि त्या प्रसंगीही मला खाजकुयली लागल्यासारखं वाटत होतं. "मला रडायचं तर मी रडेन. सिनेमे बघून उगाच माझ्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखी वागू नकोस." असं माझ्या तोंडात सतत येत होतं. गिळलं.

दुसरा प्रसंग माझे वडील गेले तेव्हाचा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना नेणार होते. तेव्हा माझ्या दोन मावश्या मला भेटायला आल्या. दोघींनाही खरोखर दुःख झाल्याचं दिसत होतं. एकीनं मला मिठी मारली. मी तिच्या पाठीवरून हात फिरवत होते. तेव्हा माझ्या शेजारी दोन मैत्रिणी बसल्या होत्या. आदल्या रात्री कोणी नीट जेवलं नव्हतं, सकाळीही पोटात काही गेलं नव्हतं. एकीच्या पोटातून गुडगुड आवाज यायला लागले. दोघीही तोंडावर हात धरून, हसण्यासाठी तिथून पळून गेल्या. मला मात्र तोंड दाबून गुदगुल्या करणं म्हणजे काय हे नीट समजलं. मावश्यांना ऐकायला येत नव्हतं का त्यांचा भावनातिरेक वरचढ ठरला हे विचारण्याची मला फार इच्छा होते. पण ते विचारण्याची सोय नाही. त्या दोघी पापभीरू स्त्रिया तशा गोड आहेत; उगाच का त्यांना घाबरवायचं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त मस्त मस्त. मला बऱ्याच वेळेला खूप मस्त मस्त कॉमेडी काही वाचलं, बघितलं कि फार फार हेवा वाटतो. कि काश आपण पण असं लिहावं. पु.लं, राजू श्रीवास्तव, जेरी साईनफेल्ड, विपुल गोयल यांच्या टाईपचं. मला हे आर्टिकल वाचून अगदी तसं तसंच वाटलं.

obeservational कॉमेडी माझी एकदम फेवरेट आहे. हे अगदी असंच्या असं वाचलं ना तरी अगदी मस्त standup होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

निरीक्षण अचूक आहे. मला वाटतं, आमच्यासारखे जुन्या पिढीचे लोक्स एकदा का टपकले, की हे हळूहळू कमी होईल.

अस्थी गोळा करायला मी येणार नाही, असे स्मशानवाल्याला सांगितल्यावर त्याला आश्चर्य वाटले होते. आणि दिवसभरांत, इतकी प्रेते जाळल्यावर, माझ्या आप्ताची हाडे कशी ओळखायची, असे विचारल्यावर तर ,लोकांना माझ्यातच भूत दिसले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्र‌श्न‌ एक‌दा वैकुंठात विचार‌ल्याव‌र‌ "प्र‌त्येक‌ 'खेपे'न‌ंत‌र‌ आम्ही विद्युत‌दाहिनीचं ते पात्र‌ साफ‌ क‌र‌तो आणि अस्थी वेग‌ळ्या काढून‌ ठेव‌तो" असं उत्त‌र‌ मिळालं होतं. ब‌हुदा चाळ‌णीत‌ ठेवून‌ पाणी घाल‌त‌ असावेत‌, कार‌ण अस्थी एक‌द‌म‌ च‌काच‌क‌ होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अलीकडे स्वाक्षऱ्या (सोप्या-सुटसुटीत पण) अनाकलनीय (गेला बाजार दुर्बोध) होण्याकडे जो कल आहे, त्यामागील रहस्य नेमके काय आहे?

बोले तो, 'एकच गवि, बाकी सारे जवि' काय किंवा 'आलं का आलं आलं?' काय, या सर्वांचा अर्थ/संदर्भ/आगापिछा नेमका काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आलं का आलं आलं?'

हे ऐसी नव्या रूपात येताना मध्येच नवनवे विभ्रम दाखवत होतं त्याच्या संदर्भात आहे. (विशेषतः द्रुपाळाचा आत्मा तोच होता, पण नवनव्या थीमची वस्त्रं बदलली जात होती तेव्हा.) नंतर बदलायचा कंटाळा केलाय.

एकच गवि, बाकी सारे जवि

यातले जवि म्हणजे "आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ" लिहिणारे ज वि पवार असावेत. खखोतिमाजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे ऐसी नव्या रूपात येताना मध्येच नवनवे विभ्रम दाखवत होतं त्याच्या संदर्भात आहे. (विशेषतः द्रुपाळाचा आत्मा तोच होता, पण नवनव्या थीमची वस्त्रं बदलली जात होती तेव्हा.)

बोले तो, जुन्या ज‌मान्यात एक‌ ज‌ण छप‌राव‌र‌ च‌ढून अॅंटेना फिर‌वाय‌चा, नि दुस‌रा दिवाण‌खान्यात‌ ब‌सून‌ क्रिकेट‌ची म्याच नीट‌ दिस‌तेय‌ काय‌ (किंवा इन ज‌न‌र‌ल रिसेप्श‌न नीट येतेय काय‌ - प‌ण त‌सेही त्या ज‌मान्यात क्रिकेट‌ची म्याच व‌ग‌ळ‌ता ब‌ऱ्यावाईट रिसेप्श‌न‌ब‌द्द‌ल‌ प‌र्वा क‌र‌ण्याचे प्र‌योज‌न कितीश्या ज‌णांस असावे?) हे तिथून‌च‌ बोंब‌लून सांगाय‌चा, त्यातील स‌वाल‌ज‌वाबाची आठ‌व‌ण झाली.

नंतर बदलायचा कंटाळा केलाय.

त‌शीही प‌रिस्थिती अजून‌ही फार‌शी ब‌द‌ल‌लेली नाहीच‌, म्ह‌णा. फ‌क्त‌, एव्ह‌रीब‌डी ह्याज‌ ष्टॉप्ड‌ टू बॉद‌र. (आम्ही आज‌काल‌ मुंब‌ई+क‌राची मिश्र‌ रिसेप्श‌न विनात‌क्रार‌ चाल‌वून घेतो.)

यातले जवि म्हणजे "आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ" लिहिणारे ज वि पवार असावेत.

हे कोण म्ह‌णे? नाव‌ त‌र‌ ऐक‌ले नाही बुवा क‌धी. (लेख‌काचेही, आणि पुस्त‌काचेही.)

----------

याचा स‌ंद‌र्भ‌ जुन्या - बोले तो ब्ल्याक‍-न‍-व्हैट्ट दूर‌द‌र्श‌न‌च्या ज‌मान्यात‌ल्या - पुणेक‌रांस स‌ह‌ज लागेल. इत‌रांनी क्षमा क‌रावी.

कार‌ण‌, पु.लं.नी म्ह‌ट‌ल्याप्र‌माणे, शेव‌टी आम्ही भ‌टेच‌. त्याला काय क‌र‌णार‌? शेव‌टी 'ब्राह्म‌णी व्य‌व‌स्थे'स म‌र‌ण‌ नाही, हेच ख‌रे. चालाय‌चेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आलं का आलं आलं?

लहानपणी एस.टी प्रवासाचा कंटाळा यायच्या. कोल्हापुरातून कोकणात जाताना दोन तासाचा प्रवास खड्डेधारी रस्त्यातून करतानाची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

मिर‌जेहून र‌त्नागिरीला जाताना कोल्हापूर‌, म‌ग‌ ते म‌ल‌कापूर‌, बांब‌व‌डे व‌गैरे क‌र‌त‌ अंबा घाट‌ लागाय‌चा तेव्हा जीव‌ न‌को व्हाय‌चा राव‌. ज‌व‌ळ‌पास‌ प्र‌त्येक‌ वेळेस तेव्हा ब‌स‌म‌ध्ये ओक‌लेलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज‌व‌ळ‌पास‌ प्र‌त्येक‌ वेळेस तेव्हा ब‌स‌म‌ध्ये ओक‌लेलो आहे.

चित्र मनश्चक्षूंसमोर उभे राहिले. धन्यवाद. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय‌मीन‌ अंबा घाट‌ लाग‌ला की ओकाय‌चो. प‌र‌ र‌त्नागिरी खेप‌ एक‌दा. एकाच खेपेत‌ प्र‌त्येक‌ स्टॉप‌निशी न‌व्हे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रत्येक घाटवळणावर साइनबोर्ड लावत नव्हता तर! " घाट निसरडा आहे ,वाहाने हळू चालवा"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तपशीलांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

(आज श्रेणीव्यवस्थेची उणीव प्रकर्षाने जाणवते. पण लक्षात कोण घेतो? Wink

असो. श्रेणीव्यवस्थेच्या पुनरुत्थानाची आशा फार पूर्वी सोडून दिलेली असून, अशी श्रेणीव्यवस्था दशसहस्र वर्षांत पुन्हा येणे नाही हे वास्तव विनातक्रार निमूटपणे स्वीकारलेले आहे. It was too good to last. Sad असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रेणी म‌नात अस‌ते तेच ब‌रंय‌. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक‌च .... ही माझी थीम आहे. उदाह‌र‌णार्थ्: एक‌च‌ न‌बा, बाकी सारे ड‌ब्बा....... त्यानुसार‌,
एक‌च‌ ग‌वि म्ह‌ण‌जे ग‌ग‌न‌विहारी
बाकी सारे ज‌मीन‌विहारी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकच राहुल गांधी, बाकी सगळे तुटकी फांदी
एकच सलमान बाकी गये सीधे समशान
एकच मोदी बाकीच्यांची पळवली गादी
एकच विराट बाकी करतात नुसतीच जाहिरात
एकच विदितै बाकीचे पाणी कम चै

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

एकच विदितै बाकीचे पाणी कम चै

ROFL Sad
राव‌साहेब‌ म्ह‌ण‌त्यात्
त्यांना आता स‌म‌द्या ताया मिळून हान‌त्यात ,)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकच शुचीमामी बाकी सगळे बिनकामी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

थॅंक्स Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार लौकर प्रगतिपुस्तक छापलेत!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महानिर्वाण कोणी कोणी बघितलय ?( हा प्रश्न जंतु सोडून ईतरांकरिता आहे . कुणी सांगावं , जंतू नी त्यात काम ही केलं असू शकेल .....)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>महानिर्वाण कोणी कोणी बघितलय ?( हा प्रश्न जंतु सोडून ईतरांकरिता आहे . कुणी सांगावं , जंतू नी त्यात काम ही केलं असू शकेल .....)<<

पुण्यात‌ पुष्क‌ळ‌ साप‌ड‌तील, आणि काही व‌र्षांपूर्वी ज‌व‌ळ‌पास जुन्याच संचात पुन्हा साद‌र‌ झाल्यामुळे तिशीत‌ले लोक‌ही साप‌ड‌तील. प‌ण ऐसीव‌र फारसं कुणी पाहिलेलं न‌स‌लं त‌र म‌ला आश्च‌र्य‌ वाट‌णार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी ब‌घित‌ले आहे ज‌ंतु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणी आळेकरांची त्या संबंधीच्या दीर्घ मुलाखतीचा व्हीडीओ नेट वर पायलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ब‌घित‌लं आहे - कालेजात अस‌ताना. अता फार आठ‌व‌त नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकाने "अजून लेखांच्या प्रतिक्षेत." लिहिलं आहे. !!
शहरात नाही परंतू गावांत मयतानंतर पर्वणी असते वसुल करायची त्यातीलच रडारड हा एक भाग असतो. यावर बरेच किस्से आहेत.
( शहरात श्रीमंत होणे सोपे असते,गावात नाही. टपलेले कावळे. दुसरे कोण?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टपलेले कावळे. दुसरे कोण?

...काव‌ळे पिंडाला शिवाय‌ला मुळीच‌ येत नाहीत‌ (प‌क्षी: ट‌प‌लेले न‌स‌तात‌), असे व‌र‌तीच कोणीत‌री म्ह‌ट‌लेले ना?

|
|

काव‌ळ्यांची ब‌द‌नामी थांब‌वा!!!!!!

----------

काव‌ळे हे प‌क्षी आहेत‌, हे आतापावेतो व‌स्तुत: स‌र्वांस‌ ठाऊक‌ असाव‌यास हवे, स‌ब‌ब‌ ही ख‌रे त‌र द्विरुक्ती झाली; प‌र‌ंतु 'अस‌तात‌ काही ज‌ण विल‌ंबित‌विद्युत्प्र‌वाही' म्ह‌णून त‌रीही लिहिले आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म्।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान‌ उत‌र‌ले आहेत विचार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रवाही आणि प्रांजळ लिखाण आवडलं. समाजाला रिच्युअलं, कर्मकांडं प्रिय असतात. ती अगदी गळ्यातली साखळी घट्ट धरत पाळली जातात. विशिष्ट वर्तणुकींची विशिष्ट मापं टाकली की सगळे समाधानी होतात. मग त्या वागणुकीच्या मागची भावना वगैरे तेल लावत गेली तरी चालते. स्वतःच्या विचारांशी सच्चं राहून खरोखरच दुःख झालं तरच रडणारे फार थोडे असतात. पण तसं योग्य प्रमाणात रडलं नाही तर मात्र सगळ्यांना आपल्या पदरी पुरेसं माप न पडल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना होते. ती मापं योग्य पद्धतीने टाकण्यासाठी मग विनावेतन रुदालीपण निभवावं लागतं. हा खोटेपणा बहुतेक त्रयस्थांना करावा लागत असल्यामुळे कोणालाच त्या खोटेपणाची चीड येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0