प्लियाडाइन्स आणि प्रुफरीडिंग

लेखकमहोदयांनी प्रकाशन कार्यालयात प्रवेश केला अन मनगटी घड्याळाकडे नजर टाकली. नियोजित वेळेच्या पाच मिनीटं आधीच ते पोहोचले होते. इथे आलं की त्यांना एकाचवेळी माहेरी आल्यासारखं अन चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आल्यासारखं असं संमिश्र काहीतरी वाटायचं. आताही तसंच वाटलं. बंद पडलेल्या फिल्टरमधलं पेलाभर पाणी घटाघट पिऊन त्यांनी संपादकांचं ऑफिस गाठलं. दरवाजाबाहेर जुनाट लाकडी पाटी ठोकलेली होती. त्यावर ‘वामन निळकंठ महाशब्दे’ हे नाव स्टार वॉर्स चित्रपटाच्या फ़ॉन्टमध्ये पेंटलेलं होतं.

'ठक ठक ठक' लेखकांनी केबिनचा दरवाजा जरा जोरातच ठोठावला. दरवाजा उघडल्यावर संपादक झोपलेले दिसू नये हा उद्देश्य. अन्यथा मराठी साहित्याला सुस्ती आलीये असं वाटण्याचा धोका होता.

“कम इन” आतून येणारा आवाज इको झाला. संपादक कार्यालयात बसलेत की रांजणात अशी काहीशी शंका बाजूला झटकून लेखकांनी दरवाजा उघडला. आत महाशब्दे त्यांच्याच प्रकाशनाचे काही फ्लॉप पुस्तकं वाचण्यात दंग होते. त्यांनी मुद्दाम काही सेकंद जाऊ दिले अन नंतर चष्म्याच्या वरून लेखकांकडे पाहिलं.

“या या ट्रेन लेखक. तुमचीच वाट पाहत होतो.”

“ट्रेन लेखक ?!”

“हो, म्हणजे बघा न- एकतर तुम्ही निष्णात लेखक आहात आणि दुसरं म्हणजे लोकल ट्रेनच्या प्रवासात लिहता म्हणून म्हटलं.”

“बरं झालं लोकलमध्ये लिहतो म्हणून लोकल लेखक नाही म्हटलं.” लेखकाने मनातल्या मनात हुश्श केलं अन चेहऱ्यावर कॅडबरी स्माईल आणलं

“धन्यवाद सर. रोज ऑफिसला जाण्यायेण्यात मला दोन तास मिळतात, तेवढ्या वेळेत लिहून घेतो. मग जागा मिळो अगर ना मिळो. गर्दीमध्ये कधीकधी माझं तोंड एकीकडे असतं तर हात दुसरीकडे. पण सराव एवढा झालाय की मोबाईलकडे न बघताही मी टायपिंग करू शकतो. याआधीच्या दोन्ही कादंबऱ्या अशाच लिहल्यात मी.”

“वा! वा! तंत्रज्ञानावर स्वार झाले आहात तुम्ही तर. विज्ञानकथा लेखक शोभता खरे. शिवाय एवढ्या विपरीत परिस्थितीत लिहूनही तुमच्या कादंबरीतली वर्णनं अगदी जिवंत असतात.”

प्रत्यक्ष संपादकांच्या तोंडून स्तुती ऐकून लेखकांची बॅटरी फुल चार्ज झाली.

“आता माझीच स्तुती मी काय करू पण आजूबाजूची परिस्थिती मी लिटमस पेपरसारखी टिपून घेतो. उदाहरणार्थ माझ्या ‘एक बाई अन दहा एलीयन्स’ या कादंबरीत नायिकेच्या मनातल्या घुसमटीचा प्रसंग मी उभ्याउभ्या, गर्दीत घुसमटलेलो असतांना लिहलाय. कोळी लोकांची भांडणं बघता बघता मी ऑप्टोपस विरुद्धची लढाई रंगवलीये. प्लियाडाइन्स ग्रहवासियांचे झुकझुक करत उडणारे स्पेसशिप्स, आवाज न करता फुटणारे बॉम्ब, टियर गॅस यांची प्रेरणासुद्धा आजुबाजुनेच मिळालीये.”

“अहाहा! काय ती प्रतिभा. अजून एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तुमच्या कादंबरीतील नायिकांची वर्णनं. त्यांच्या सॅंडलपासून इअरिंग्स पर्यंत अन नेलपॉलिश पासून परफ्युम पर्यंत सगळी वर्णनं, आतपासून बाहेरपर्यंतच्या सगळ्या कपड्यांचे ब्रॅंड्स अगदी तपशीलात मांडता तुम्ही. तेसुद्धा पुनरावृत्ती न करता. कुठे बघता हो हे सगळं?”

“लेडीज डब्ब्याच्या शेजारी बसून.” तोंडाबाहेर पडणारे शब्द त्यांनी कसेबसे मागे खेचले.
“कल्पनेचे घोडे दौडवतो आणि बघून येतो. प्रतिभावंतांना निरीक्षणाची गरज नसते.” लेखक विश्वमित्राच्या तोऱ्यात बोलले.

महाशब्दे अजून स्तुती करणार होते पण तेवढ्यात आपण संपादक आहोत हे त्यांच्या लक्षात आलं.
“छान. चला आता मुद्द्याचं बोलू.” त्यांनी स्तुती आटोपती घेत म्हटलं.

“चालेल. सांगा काय चुका आहेत.”

संपादक जरा दचकलेच.

“तुम्हाला कसं कळालं मी तुम्हाला कादंबरीतल्या चुका सांगायला बोलावलंय?”

“सोपंय. टंकलिखित जमा केल्यानंतर आठच दिवसांत संपादक तुम्हाला बोलावतात ते काही मानधनाचा चेक देण्यासाठी नक्कीच नाही, खी: खी: “
लेखक खिदळणाऱ्या स्माइलीसारखं हसले.

महाशब्देंनी निर्विकारपणे सिगारेटचं पाकीट खिशातून काढलं.
“घेणार?”

“नाही मी घेत नाही.” ते ‘फुकटची’ हा शब्द गाळून उत्तरले. ©

“ठीक आहे.” संपादकांनी सिगारेट शिलगावली आणि एक कश मारला.
नंतर टेबलाच्या खणातून काही कागद बाहेर काढले. वाचनकर्तव्य बजावायला नाकावरचा चष्मा पुन्हा खाली घसरला.

“माझा अनुभव सांगतो. मराठी वाचक हा पहिल्यासारखा बाळबोध राहिला नाही. तो फार सुज्ञ झालाय. त्यातल्या त्यात विज्ञानकथा वाचणारा तर जरा जास्तच जिज्ञासू. त्यामुळे लेखकाला बारकाईने विचार करावा लागतो. मी तर म्हणेन विज्ञानकथांचे वाचक गॅलीलिओचा टेलिस्कोप घेऊनच बसलेले असतात, चुका शोधायला.”

आपणच दिलेली उपमा पचवायला त्यांनी थोडा पॉज घेतला.

“असो. आता मला जाणवलेली पहिली चुक सांगतो- कादंबरीत तुम्ही असं म्हटलंय की एलीयन्सची यानं प्रकाशापेक्षाही जास्त वेगाने उडतात. पण आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार तर हे शक्य नाही.”

“बरोबर पण सर त्या प्लियाडाइन्सचं यान काळाऐवजी मन ही चौथी मिती म्हणून वापरतं. हायपर स्पेस नावाची थेअरी आहे. इतका वेग असल्यामुळेच ते नेहमी पृथ्वीवर येणंजाणं करतात. तुमची इच्छा असेल तर मी कादंबरीच्या शेवटी याबद्दल विस्तृत माहिती टाकू शकतो.”

“ठिक आहे, हरकत नाही.”
त्यांच्या चेहऱ्यावर मात्र “हरकत आहे पण इलाज नाही” असं वाक्य उमटलं होतं. सिगारेटचा एक झुरका ओढून अन नाकातून धूर सोडत पुढे बोलू लागले.

“दुसरा मुद्दा- तुम्ही अवकाशवीरांचे पोषाख खुपच फॅन्सी दाखवलेत. पृथ्वीवरची जी नायिका आहे…सुशीला, तिचा स्पेससूट तर लो वेस्ट मिनीस्कर्ट आणि वरती वगैरे असा आहे. ती एलीयन अॅस्लीना लोणार सरोवरात बिकिनी घालून डुंबते !”

“यात माझा काही दोष नाही. मी फक्त तुमच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केलाय.”

“तो कसाकाय?”

“तुमच्या प्रत्येक पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अन आतमध्ये अर्धनग्न ललनांची सुंदर चित्र असतात, एका पुस्तकावर तर चक्क…”

“ठिके ठीके.”
संपादकांनी विषय आवरता घेतला.

“तिसरी गोष्ट. पेज नंबर ५८ ते ८४ दरम्यान बुधवारपेठेत लागलेल्या आगीचं वर्णन आहे. कितीतरी लोकं जळतात पण तिथल्या एलीयन्सना काहीच कसं होत नाही.”

“कारण त्यांची त्वचा आगीमुळे भाजत नाही.”

“त्वचेतल्या विशेष पिग्मेंट्समुळे असं होतं का ?”

“हो.”

“पण पिग्मेंट्स बदलले तर त्वचेचा रंगही बदलायला पाहिजे न? तुम्ही त्या एलीयन्सच्या त्वचेचा रंग हुबेहुब आपल्यासारखाच दाखवलाय.”

“यामागेपण एक थेअरी आहे. विस्तृतपणे ती कादंबरीत मांडलेली आहे. “

“वाचलं मी पण मला ते फारसं पटलं नाही.त्यापेक्षा तुम्ही वेगळा रंग दाखवा त्वचेचा.”

“पण त्याला वैज्ञानिक…”

किंचित लालसर दाखवा त्वचेचा रंग.”
अंतिम फर्मान सुटलं.

लेखकाने नाईलाजाने होकार दिला.

“चौथी चुक…”

“अजून किती चुका आहेत?”

“दोन पानं आहेत.” संपादक मागूनपुढून पानं चाळंत बोलले. लेखकांनी प्रयोगशाळेतल्या बेडकासारखी उडी मारली अन कागद ओढून घेतले.

“मी वाचून घेतो सगळं. सुधारणा करून नवीन प्रत करतो जमा.”

“चालेल. हे तर उत्तमच आहे. किती दिवसांत कराल जमा ?”

लेखकांनी जरा विचार केला
“आठ दिवसांत”

“आठ दिवस खुप झाले. जागतिक विज्ञानदिनी पुस्तक मार्केटमध्ये आलंच पहिजे. दोन हजार प्रती छापणार आहोत आपण पहिल्याच धडाक्यात.”

लेखकाच्या चेहऱ्यावर मंगळावर पाणी सापडल्याचा आनंद तरळला.
“काय सांगताय !”

“हो आणि मार्केटींग भरपूर केलंय त्यामुळे पुस्तकं खपतीलच.”

“तुमच्या तोंडात साखर पडो.”

“नको, मला डायबेटीक्स आहे.”

“ठिकेय मग सॅकरीन पडो. चिंताच सोडा तुम्ही. चार दिवस सेमीफास्ट लोकलने जाण्याऐवजी स्लो लोकलने जातो, रविवारचा अख्खा दिवस डब्ब्यात घालवतो. चार दिवसांत सुधारीत प्रत तोंडावर मारतो आय मीन हवाली करतो तुमच्या.”

“शाबास. विज्ञानाची प्रगती वेगात होतेय असं म्हणतात ते काही खोटं नाही.”

“इथून पुढे विज्ञानलेखकांची पण होईल. डोन्ट वरी.”
लेखकांनी चुकांची पुंगळी करून खिशात घातली.
“ठिकेय तर मग, निरोप घेतो..भेटू लवकरच.”

“चहा कॉफी काही?”

“नको. आधी लगीन कोंढाण्याचं.”
लेखक महोदय हवेत तरंगत निघून गेले.

त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघता बघता संपादकांनी सिगारेटचं जळतं थोटूक गालावर रगडलं. त्वचा अजिबात भाजली नाही.

-----------------------------------------------------------------

© (©hetavani) : सिगारेट न पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे .

प्लियाडाइन्स लेखक विनय खंडागळे यांच्या ‘परग्रहावरील लेखकांना कसे हाताळावे’ या पुस्तकातून साभार

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान!
चुका काढल्या असत्या पण सिगरेट पीत नाही.
मजेदार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आव‌ड‌ली. शेव‌ट‌ त‌र‌ बाप‌ रे. ते स‌ंपाद‌क‌ एलिअन आहेत का काय्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही हो, ते लेखक एलीयन आहेत. संपादक तर आपल्याच प्लियाडाइन ग्रहावरचे
----------------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहा हीही हूहू हेहै फीस्स

होय‌ मी ते चुकुन लिहीले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही हो, ते लेखक एलीयन आहेत.

त्यात काय मोठे? एके काळी आम्हीसुद्धा होतो. (म‌ग पुढे न्याचर‌लाइझ झालो.)

फार‌ क‌शाला, (क‌रेक्ट मी इफ आय अॅम रॉंग, प‌ण) शुचितैसुद्धा ब‌हुधा एलिय‌न‌च आहेत. (पुन‌श्च चूभूद्याघ्या.)

----------

मुळात‌ अन‌न्याच‌र‌ल अस‌ल्याची ही प्रांज‌ळ क‌बुली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

क‌था आव‌ड‌ली. त‌रीही अजून विस्तार ह‌वा होता. शेव‌ट‌च्या क‌ळ‌सासाठी मंदिर‌च बांध‌लं नाहीये असं काहीसं वाटून जातं. क‌था ज‌य‌व‌ंत द‌ळ‌वींच्या ढ‌ंगाने जाताना म‌ध्येच ज‌य‌ंत नार‌ळीक‌रांच्या वाटेने जाते. त्या वाटेचा चांग‌ला हाय‌वे व्हाय‌ला ह‌वा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

आपली कथा कसंही करून छापून आल्लीच पाहिजे या विचाराचा लेखक आहे त्यामुळे जयवंत दळवींच्या वळणाने जात नाही. जयंतरावांसारखा आज्ञाधारक आहे तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्ह‌ण‌जे, ज‌य‌व‌ंत द‌ळ‌वींच्या पुस्तकांत क‌सा नायक काय्य‌म संपाद‌कांव‌र विनोद क‌र‌त असतो, ते आठ‌व‌लं म्ह‌णून लिहीलं झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

मस्त..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

शरदजी, सही पकड़े है l

बादवे जयंत नारळीकरांच्या कादंबर्या खुप फेमस आहेत आमच्या ग्रहावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहा हीही हूहू हेहै फीस्स