कांदेपोहे

अनेक दिवस हे लिहावं असं वाटत होतं, कंटाळा तर होताच, पण इतकं खाजगी लिहावं की नाही असाही एक प्रश्न पडत होताच. पण काही मित्रमैत्रिणींच्या आग्रहास्तव आज लिहायला सुरूवात केलीये. या सगळ्यात काही गमतीजमतीचे अनुभव आहेत काही तिरस्कार करण्याजोगे, काही लाथाच मारून हकलून द्यावं अशी माणसं भेटली तर काहींना "(होप यू) गेट वेल 'सून' " असं म्हणावंसं वाटलं वगैरे. त्यातले हे काहीच अनुभव. आठवतील आणि जमेल तसं बाकीचेही लिहिनंच.
==========
माझ्या आणि माझ्या काही मित्रमैत्रिणींच्या बघाबघी कार्यक्रम आणि लग्न ठरवणे इत्यादी प्रकारातले हे फर्स्टहॅण्ड अनुभव...
१.
मी पुण्यातल्या एका मुलाला भेटायला गेले होते. म्हणजे आम्ही सारेच मी आईबाबा वगैरे. त्या मुलाला आधी बोलायला सवड नव्हती आणि त्यांना कुटुंबीयांसमवेत भेटायचं होतं म्हणूनही आम्ही गेलो. कोथरूडस्थित एका भल्याच मोठ्या आठ खोल्यांच्या प्रशस्त फ्लॅट मधे हा मुलगा आणि त्याचे आईवडील रहात होते. गेल्यागेल्या "आमची अमुक इतकी प्राॅपर्टी आहे, गावाकडं इतकी एकर शेती आहे, घर आहे शेतातही बंगला आहे. लक्ष्मीरोडवर वाडा होता तो पाडून आता तिथे एक मोठी अपार्टमेंट झालीये ती ही आमचीच आहे." इत्यादी वगैरे सांगून त्या मुलाच्या पूज्य पिताश्रींनी पकवलं आम्हाला. गेल्यापासून ती वृद्ध व्यक्ती फक्त माझ्याकडं आणि माझ्या आईकडंच पहात होती. मग मुलाची आई स्वतःच्या संपत्तीचं प्रदर्शन वगैरे करण्यात गुंगून गेली. मी कपाळाला हात लावून खिडकीतून बाहेर बघत बसले. या सगळ्यात मुलाचा पत्ताच नव्हता. नंतर तो आला. समोर बसला. एकच वाक्य साधारणपणे चार ते पाचवेळा बोलत होता तो. आणि बोलताना सतत पॅन्ट वर ओढत होता, मिस्टर धोंड सारखी. मला मि. धोंड आठवून हसायला आलं. तसं मी फिसकन् हसलेपण आणि आईनं ढोपर मारल्यावर गप्पही बसले. अजूनपर्यंत मी तोंड उघडलंच नव्हतं बडबड करायला. तशी इच्छाही नव्हती. नाईलाजानी आम्ही तिघेही तिथं अडकून पडल्यासारखे बसलो होतो. मग तो मुलगा घर दाखवायला म्हणून मला चल म्हणाला. त्यांच्या खिडकीतून भारी व्ह्यू होता. खूप मस्त झाडं बिडं होती. मला त्या वृद्ध व्यक्तीची सतत माझ्याकडं बघणारी स्कॅनिंग मशिन सारखी नजर खटकत होती आणि मी तोंड उघडून फाटदिशीन् काहीतरी बोलेन म्हणून घाबरून आई मला जा म्हणाली. मी गेले शा.मु.सारखी. तर काहीतरी बोलायचं म्हणून तो मुलगा मला आवड निवड विचारू लागला. आवड निवड म्हणजे खायला प्यायला काय आवडतंय ते. पहीलाच प्रश्न असला भारी होता. मुलगा म्हणे "तू काय पितेस?" माझ्या मनात आलेलं सांगावं सकाळी जागी झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी टल्लीच असते , फक्त आणि फक्त दारूच पिते, ती पण देशी संत्री मोसंबी वगैरे परत शा.मु.सारखं खरं खरं उत्तर दिलं. तर हे महाशय जे बोलले त्यानं मला हसू कंट्रोल करणं अवघड होऊन बसलं. हा मुलगा मी त्याला न विचारताच म्हणाला " मी रोऽऽज हाॅर्लिक्स पितो, हाॅर्लिक्स केसर बादाम." पाच दहा सेकंदांनी लाजत म्हणाला, "ताकद यायला पाहीजे ना आता, म्हणून." मला एकाचवेळी संमिश्र भावना म्हणजे कीळस, चीड, तिरस्कार, कीव, हसू इ. काय असतंय ते समजलं आणि हस्यानी विजय मिळवला. मी हसत तिथून बाहेर पडले आणि आईबाबांना आता बास म्हणून घेऊन गेले.
त्यानंतर न बोलता कुणालाही भेटणं टाळलं.

२.
एका मुलाला भेटण्याचा योग आला. प्रथमदर्शनी फार छान वाटला, बोलायला वगैरे. थोडे दिवस बोलल्यावर म्हणाला, "हे चित्रं काढणं तुला बंद करावं लागेल. चित्रकार/कलाकार लोकं सणकी असतात. पुढं जाऊन ते नशापाणी करतात. आणि तरीही तुला चित्रं काढायचीच असतील तर निसर्गचित्रं काढ, धबधबे, डोंगर, नारळाची झाडं असं. पण हे नको. हे नाहीच काढायचंस तू. तू वाचतेस ते लेखक पण चांगले नाहीत, जरा चांगलं वाचावं लागेल तुला." त्याक्षणी त्या मुलाला बाय म्हणणंच योग्य होतं, तेच केलं.

३.
एका मैत्रिणीचं लग्न ठरलं. साखरपुडा जवळ आला. तिचा होणारा नवरा कॅनडात होता. तिची होणारी सासू आणि सासूची बहीण एकेदिवशी तिच्या घरी आल्या. म्हणाल्या 'चल जरा खरेदीला जाऊयात, आवरून ये." ही अवरून त्यांच्यासोबत गेली. त्यांनी तिला बाजारात/मार्केटात/ दुकानात वगैरे न नेता गायनॅक. कडे नेलं तिची व्हर्जिनीटी टेस्ट करायला. ही संतापून बेभान झाली. तिनं त्या कॅनडास्थित होऊ घातलेल्या नवऱ्यामुलाला फोन केला आणि 'हा काय फालतूपणा चालला आहे' असं विचारलं. तो मुलगा म्हणे, " घे ना करून काय त्यात काय बिघडतंय?" त्या गायनॅक.कडेच तिने 'हे लग्न मोडलं' असं जाहीर करून टाकलं.

४.
एका मैत्रिणीचं लग्नाचं बघत होते. ती पुण्यात एका मुलाला भेटायला गेली. त्याआधी जवळपास महीना दीडमहीना ते दोघं फोनवर, व्हाॅट्सअॅपवर वगैरे बोलत होते. भेट झाली. तिला तो आवडला. परत एकदा भेटूया म्हणाला तोच. ती बर म्हणाली. ती परत पुण्याला गेली रजा काढून. असं तिन चारवेळा ते भेटले. चारचार तास गप्पा मारल्या. पाचव्या वेळी भेटल्यावर तो मुलगा म्हणाला, "तसं सगळं ठीकच आहे, आता आपण इतके दिवस भेटतो आहोत, एकमेकांना ओळखतो आहोत, आपण पुढे जायला काहीच हरकत नाही, पण मी गे आहे, आपण लग्न करू पण मी नवरा म्हणून तुला 'ते' सुख नाही देऊ शकणार. पण मला बायको म्हणून तू आवडलीस. 'त्या' व्यतिरिक्त आपण एकत्र राहू आपापल्या कुटुंबांसाठी. तुला तर मी आवडलोच आहे त्यामुळं तसा तुला प्राॅब्लेम नसेलच." पुढे हे लग्न काही झालं नाही हे नक्कीच.

५.
एका मित्राचं लग्न ठरवणं सुरू होतं. त्याला वडील नाहीत. आई आहे फक्त आणि त्या काकू एकदम कूल वगैरे असतात तश्या आहेत. त्याने मुली बघण्यापूर्वीच सांगितलं होतं की "माझी आई सोबत राहणार. ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, दिवसातले बारा तास तरी ती बाहेरच असते, पण रहाणार एकाच घरात." एक मुलगी आली होती याला बघायला. हा आवडण्यासारखा आहेच. तशी ती याच्या दिसण्यावर भाळली होती. मग मुलीचे आई वडील आणि मुलगी म्हणाले, "आम्हाला घरात कचरा आवडत नाही." याला वाटलं स्वच्छताप्रिय वगैरे दिसतायेत, चांगलंच आहे हे! पण हा समज तिसऱ्या सेकंदाला दूर झाला. मुलगी म्हणाली, "निरूपयोगी गोष्टी म्हणजे कचराच, म्हातारी माणसं पण निरूपयोगीच असतात, तुझी आई तसलीचे, ती बाई घरात नकोत आम्हाला. कचरा कचऱ्याच्या जागीच ठेवावा." त्यानं पुढे काय केलं हे सांगायची गरज नाही.

६.
एका मित्राचं लग्न ठरलं, लग्न झालं. हनिमूनला पॅरीस, स्विट्झर्लंड वगैरेला गेला. हनिमून वगैरे व्यवस्थित पार पडला आणि मुंबईहून परत येताना मुलगी तिच्या आधीच्या प्रियकरासोबत पळून गेली. नंतर यांना पोलिसांनी बराच त्रास दिला. मुलीच्या घरच्यांनी 'तुझ्यातच प्राॅब्लेम असणार' असंही म्हण्टलं याला. पण डायव्होर्स घेतेवेळी मुलगीनं कबूल केलं की युरोपला काय तिचा प्रियकर घेऊन जाऊ शकला नसता म्हणून हनिमून होईपर्यंत गप्प बसली ती आणि मग पळून गेली. मुलाचा यात काहीच दोष नाही वगैरे. या सगळ्यात त्याचं आर्थिक, मानसिक वगैरे नुकसान झालं ते वेगळंच आहे खरं.

~अवंती

(सोशल नेटवर्कींग अर्थात फेसबुकवर हे आधी पोस्ट केलेलं आहे.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

जुने संवाद क‌से असाय‌चे त्याची झ‌ल‌क‌ लिहिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेव्हा अत्याकाकू लोक मुला मुलीला एकांतात जाऊन बोलायला पाठवतात, तेव्हा नक्की काय बोलणं होत बरे?
१-२ वर्षांनी मला पण कांदेपोहे खायला जायचं आहे.म्हातार्या माणसांनी सल्ला द्यावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने