आमचा छापखाना - भाग २.

आमचा छापखाना - भाग २.

(पहिल्या भागाचा दुवा)

कंपोझिंगनंतरचे काम म्हणजे केलेल्या कामाची छपाई. येथे आम्हा पोरासोरांचे विशेष काही काम नसायचे. आमच्याकडे छपाईची तीन यन्त्रे होती - एक मोठे सिलिंडर मशीन, एक मोठे ट्रेडल आणि एक छोटे ट्रेडल. नवे मोठे ट्रेडल माझ्या डोळ्यासमोर ५०-५१ साली आले. सिलिंडरहि ५४-५५ साली आले. तत्पूर्वी एक जुने सिलिंडर होते. नंतरचे मुंबईच्या एका छापखान्याकडून सेकंड हॆंड घेतले होते. ह्या सिलिंडरवर एका वेळी पुस्तकाची आठ पाने छापली जात. म्हणजे पाठपोट १६-पानी फॉर्म ह्यावर निघत असे. भगवानरावच हे मशीन चालवत असत. ट्रेडल मशीन्स त्याहून लहान कामांना वापरली जात. हाताने कागद घालायचे ट्रेडल मशीन कसे काम करायचे ते ह्या विडीओमध्ये पहा.
सिलिंडर मशीनचे काम येथे पहा.

मला आठवणार्‍या अगदी जुन्या काळात म्हणजे ४६-४७ सालापर्यंत सातार्‍यात वीज पुरवठा अगदी मर्यादित असे. सातारा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी नावाच्या खाजगी कंपनीची वीजनिर्मिति सातार्‍याच्या वायव्य बाजूस असलेल्या बोगद्यावरच्या टेकडीवर जनरेटर बसवून केली जाई. सातार्‍याच्या पश्चिमेस गावापासून १५०० फूट उंचीवर यवतेश्वरचे पठार आहे. ह्या पठारावर कासचा तलाव आहे आणि ह्या तलावाचे पाणी खापरी नळाने सातार्‍यात उतरवून पिण्याचे पाणी म्हणून नळाने त्याचे वाटप होई. ह्याच पाण्याचा वापर करून बोगद्यावरच्या टेकडीवर वीजनिर्मिति कधी एकेकाळी केली जाई हे वीजनिर्मितिकेंद्र तेथे असण्याचे मूळ कारण. पण मला आठवते तसे पाण्यावर वीज निर्माण करणे केव्हातरी पूर्वीच थांबले होते आणि नंतर वीज डीझेल जनरेटर वापरून होई आणि त्या विजेवर गावात मिणमिणते दिवे कसेबसे लागत असत. आमच्याकडे मशीन्स चालविण्यासाठी ऑइल एंजिन बसविले होते आणि त्याची शक्ति Shaft-pulley-belt मार्गाने मशीनपर्यंत पोहोचविली जाई. ’मराविमं’ची स्थापना होऊन पुरेशी वाढ होईपर्यंत असेच चालू होते. नंतर ऑइल इंजिनाची जागा इलेक्ट्रिक मोटरने घेतली. तीन मशिनांपैकी एखादे तरी चालू असे. बोटीवर असतांना इंजिनाची सूक्ष्म थरथर सर्व वेळ जाणवत राहाते तसा मशीनचा लयबद्ध आवाज सर्व घरभर पोहोचत असे पण आम्हाला त्याचा कधी त्रास झाला नाही.

आमची इथली करमणूक म्हणजे मशीनची लयबद्ध हालचाल पाहण्यात आम्ही गुंगून जात असू. चटक-फटक आवाज करत वेगाने फिरणारे मशीनचे पट्टे, वर आलेला कागद उचलून तो इकडून तिकडे नेऊन पोहोचविणारा सिलिंडरचा लाकडी फणा, रुळावरून फिरणार्‍या आगगाडीच्या चाकासारखी सिलिंडरच्या पाट्याखालची चाके, एकमेकांना उलटसुलट फिरविणारी ट्रे्डलची दातेरी चाके अशा गोष्टी बघत बसायला आम्हाला मोठी मजा येई. ह्याच दातेरी चाकांमध्ये माझ्या काकांनी त्यांच्या लहानपणी आपले बोट घातले होते. त्या अव्यापारेषु व्यापाराचा परिणाम म्हणजे त्यांचे तर्जनीचे शेवटचे पेर पार चिरडलेले आणि असे तर्जनीचे बोट त्यांनी जन्मभर बाळगले.

छपाईनंतरच्या प्रक्रियांमध्ये आणि बाइंडिंगच्या पूर्वतयारीमध्ये मात्र आम्ही शाळेपासून मोकळा वेळ असेल तशी यथाशक्ति मदत करत असू. ह्या गोष्टी म्हणजे कागदांना घड्या घालणे आणि जुंपणी, नंबरिंग, परफोरटिंग आणि स्टिचिंग. १६ पानांचा फॉर्म घेऊन त्याला उजवीकडून डावीकडे तीन घड्या घातल्या की पुस्तकाच्या फॉर्मची १ ते १६, १७ ते ३२ अशी पाने एकमेकासमोर येत. त्यासाठी पानांची छपाई तशी आधीच केलेली असे. जमिनीवर मांडा मारून बसायचे, कागद समोर घ्यायचे आणि घड्या करायच्या. मी आणि माझा धाकटा भाऊ, कधीकधी आजोबाहि आम्हाला जमेल तितके हे काम उरकायचो. (बहिणींना ह्या कामात, किंबहुना छापखान्याच्या कसल्याहि कामात, exemption होते.) अशा शंभराच्या कट्ट्या करून एकेक फॉर्म हातावेगळा करायचा. सगळे फॉर्म घड्या घालून झाले की ते सभोवती आपापल्या गठ्ठ्यांमध्ये अर्धवर्तुळात मांडायचे आणि नंबरवारीने एकेक पुढे ओढून घेऊन पूर्ण पुस्तक जुळवायचे. एखाद्या व्यवसायाच्या बिलबुकासारखे काम असले तर तीनचार रंगांचे कागद जुंपणीत असायचे. बिल फाडता यावे यासाठी पर्फोरेटिंग मशीनने त्यांना भोके पाडायची आणि त्यांच्यावर हातात धरायच्या नंबरिंग मशीनने नंबर घालायचे. येथवरची काहीशी कंटाळवाणी पण सहज करता येण्याजोगी कामे करून आम्हीहि व्यवसायाला हातभार लावत असू. परफोरेटिंग मशीन असे दिसे:

आणि नंबरिंग मशीन असे:

इतके झाले बाइंडिंगचे काम सुरू होई. त्यासाठी पुस्तक लहान असेल तर सरळ स्टिचिंग मशीनकडे जायचे. ह्या मशीनमध्ये लोखंडाच्या वायरस्पूलमधून लोखंडी तुकडे पुस्तकातून घालून पुस्तकाची पाने स्टेपल केली जायची. अशा मशीनचे चित्र येथे पहा.

अधिक मोठे पुस्तक आमच्या बाइंडरकडे बाइंडिंगला दिले जाई, पुस्तकांचा एक गठ्ठा हॆंडप्रेसमध्ये दाबून धरून त्याच्या कडेला करवतीने कापून फॉर्ममध्ये दोरा ओवण्यासाठी भोके पाडली जात. नंतर एकेक पुस्तक समोर घेऊन बाइंडर त्यामध्ये दोरा ओवून बाइंडिंग करीत असे. हॆंडप्रेसचे चित्र येथे पहा.

स्टिचिंग/बाइंडिंग झाले की पुस्तकाची पाने सुटी करण्याचे काम होई. पुस्तकांचा एकेक गठ्ठा गिलोटिन कटिंग मशीनमध्ये दाबून धरून ब्लेड पाळीपाळीने त्याच्या तिन्ही कडांतून नेले की पाने सुटी होत. ह्यानंतर अखेरचे काम म्हणजे पुस्तकाचे कव्हर त्याला वरून चिकटवणे की झाले पुस्तक तयार. गिलोटिन कटिंग मशीनचे चित्र येथे पहा.

पुस्तकाचे कवर चिकटवण्यावरून आठवले. ह्यासाठी खास चिकट सरस आमचे बाइंडर स्टोववर तयार करीत असत आणि त्याचे साहित्य नैसर्गिक हाडामधून मिळवलेले असे. त्यामुळे ते स्टोववर पातळ करतांना त्याचा स्मशानात असतो तसा वास घरभर पोहोचत असे! पण त्याला काही इलाज नव्हता.

येथे ब्रॅंटफर्ड नावाच्या गावी उत्साही लोक एक Heritage Village चालवतात. १८५०च्या पुढेमागे कॅनडा कसा दिसत असे ते दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्याकडे एक प्रिंटरी - म्हणजे आपल्याकडचा छापखाना - आहे. तो पाहायला मी गेलो आणि मला सातार्‍यातील आमच्या छापखान्यात गेल्यासारखेच वाटले. त्याच केसेस आणि तीच मशिनरी. तेथील स्वयंसेवकाशी छापखाना ह्या विषयावर माझ्या खूप गप्पा झाल्या. आता भारतातील आमचा छापखाना पाहिलेले कोणी नातेवाईक कॅनडाभेटीवर आले की नायागरा धबधब्यासारखेच हे एक अवश्य भेट देण्याचे स्थळ झाले आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

वा!

एक प्रश्न: काही पुस्तकांत विशिष्ट पानांवर पान नंबराव्यतिरिक्त काही सांकेतिक अक्षरं लिहिलेली असतात. शक्यतो तळाशी. त्याचं काय प्रयोजन असतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

सीएम‌वाय‌के मार्क्सब‌द्द‌ल म्ह‌ण‌तोय‌स काय्? ते बुक‌व‌र्क‌व‌र न‌स‌तात कार‌ण बुक्स श‌क्य‌तो फ‌क्त ब्लॅक‌म‌ध्ये अस‌तात्. मात्र प्रिंट‌र त्यांच्या सोयिसाठी ड‌मी (आधि एक पुस्त‌क नंब‌रिंग‌स‌हित ब‌न‌व‌ले जाते) व‌र‌चे इन्स्ट्र‌क्श‌न्स मास्ट‌र/प्लेट‌व‌र घेतात्. म्ह‌ण‌जे क्वांटिटी, पेप‌र, इंक, ग्रिप‌र, प‌ल‌टी व‌गैरे माहिती. ती इन्फ‌र्मेश‌न नंत‌र क‌टिंग‌म‌ध्ये उड‌ते. क‌धेक‌धी राह‌ते ते असावे ब‌हुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या पानांबद्दल मला नेहमी प्रश्न पडायचा. कोणती दोन पानं एका कागदावर छापायची हे कसं ठरवत असतील. पुस्तकांची एकंदर पृष्ठसंख्या बघून ठरवतात, का कसं. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.

(पहिल्या भागाचा दुवा धाग्याच्या मजकुरात डकवला आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म‌स्त‌ धागा. ह्यातील सिलिंड‌रप्रेस मी क‌धी नाही ब‌घाय‌ला प‌ण बाकी प्रोसेस हाताळ‌ल्या आहेत्.
तीन पार्ट प‌ड‌तात प्रिंटिंगचे. प्रीप्रेस्. ह्यात डिझाईन, लेआऊट, पेजिनेश‌न, सेप‌रेश‌न, प्लेट‌ मेकिंग हे येते. नंत‌र प्रेस म्ह‌ण‌जे छाप‌णे. म‌ग पोस्ट प्रेस्. ह्यात लॅमिनेश‌न, बाईंडिंग, क्रीजींग (घ‌ड्या घाल‌णे), प‌र‌फोरेटिंग, रिव्हेटिंग, नंब‌रिंग, डाय‌क‌ट, ग्रेनिंग(लॅमिनेश‌न‌व‌र प्रेस क‌रुन एक प्र‌कार‌चे टेक्श्छ‌र उम‌ट्व‌ले जाते) क‌टिंग व‌गैरे प्रोसीज‌र्स येतात्.
पुस्त‌काची ड‌मी ब‌न‌व‌णे आणि पुस्त‌काची प्राईस कोट क‌र‌णे हे कौश‌ल्याचे काम आहे. प्रॉप‌र ड‌मी ब‌न‌ल्याशिवाय आज‌ही प्रिंट‌र्स मुख्य छ‌पाईला हात घाल‌त नाहीत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे! संपलासुद्धा हा भाग. अजून वाचायचं होतं. किती छान वाटत होतं वाचताना. आमच्या लहानपणी हे प्रिंटिंगप्रेस चालताना पाहिलेत, जेव्हा आम्ही शाळेची पुस्तकं बाईंडिंग करायला प्रिंटींगप्रेसमध्ये जात असू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0