होमकमिंगला जाण्यापूर्वी

तुझ्या आतमधी विस्तव सापडतो
जगण्याच्या सक्तीनं रेंगाळलेला कल्लोळ
रातच्या सैपाकातनं वायला पडून राखेखाली
रातभर मुसमुसत फुलवलेली विषन्न उमेदीची जाळी

स्टॅन लीच्या पिलावळींत इतका इतका आपलासा
गजबजून टाकलंस वय ओलांडणारं शरीर माझं
टुमल्या इमारतींच्या पिंपरीतही टिकलास
जिथं तुझ्या वेबआधी आमच्या खिडक्यांना लटकून असतात
ITचे अदृश्य भोंगे
गजरणाऱ्या मोबाईलांची अलार्मिय किरकिर
वाळू घातलेले बिनसुके परकर
पार्करा,
आपल्या भूगोलात काही काही सारखं सारखं नव्हतं
पीटर एकलव्या,
सांगणारी सावली नसताना पोराटोरांशी तंडताना
आपल्यात वेगळं वेगळं काही काहीच ठेवलं नाहीस
ग्रेट पावरच्या ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिट्या लोंबकळल्या
वाहून जाणाऱ्या तारुण्यात आपण कुणाची आयुष्य जगत राहिलो आहोत!

मार्व्हल आमदनीत एकुलता एक हिंदू घावलास.
मेरी जेन अन अंकल बेन : दोन्ही भळभळती गंडस्थळं
पाटाइतकी भरत र्ह्यायली लांबलांब वर्षांचे वाफे
दुख पेलत पळत पेरत राहिलास माणुसकीची बीजं
जीव्व मारलं नाहीस कुणालाच
माफ माफ करून उचलून फेकलीस
मनाची प्रतिशोधि जळमटं

लोक मलाही हॅरीगत उगच सोडून गेले
मीही काही काळ अस्पष्ट वचनं पाळली
मेरी जेनच्या, हॅरीच्या बापाला दिलेली दुष्कर वचनं

अंकलला शिव्या देताना एकदाच मनमानी केलीस
वाचवता येत असताना ओथंबलास
आयुष्याचं मढं बोकांडी बसलं
बापाच्या रक्ताचे न पुसणारे डाग माझ्याही हातावर
तरी परवडलास, भोळ्या चेहऱ्याच्या माणसा
कसं जगवलं असतंस म्हाताऱ्याला
आंटी आधी मेली असती तर

मॅनेजरांच्या कोंडवळ्यात डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी शोभलास
आता नांदायला जाशील
अव्हेंजरांच्या नव्या गोतावळ्यात संसार करशील
प्रोफेशनॅलिझमच्या आयचा घोडा
वापरतील हसण्या-खिदळण्याला तुला

अकाली शहाणपणाचं दुख असतंच
नव्या तरण्या आंटीसंगं नवी दुखं जप

एकविरा,
येश दे झाडाला- कोळीमाणसाला!
तुह्यामागं लपलेल्या बुद्धाचा कानुसा घे
बाप दिऊ नकंस, वाट दावू नकंस
पाथरवटाच्या यकलेपणाचं माप दे
यंदापण पश्यात दुख वाढ माये.

मनात सलणारी दुःख नसतील तर आमची आयुष्ये बाद म्हण
अश्या दुखण्यांखेरीज स्पायडरमेन-वुमेन जगत नसतात.

संदर्भ :
स्टॅन ली : मार्व्हलचे कुलगुरू

एकविरा मंदिरामागची भाजे बुद्ध लेणी.
किंवा त्या लेण्यांमध्ये असणारं एकविरा मंदीर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता वाचली...मी विशेष कविता वाचत नाही...पण ही नेटाने वाचली. नाही कळली. परत नंतर वाचेन. परवा मटा मध्ये श्याम मनोहर यांचे कविता वाचन याबद्दल एक मुक्तचिंतन आले आहे. ते नक्कीच पटणारे आहे. कविता वाचनाकडे वळवणारे आहे. मला देखील नक्कीच वळायचे आहे, अधून मधून वळतो आहे..पण हवे तेवढे नाहीच. पाहुयात, कसे काय जमते ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

लोकसत्तेतला लेख वाचला मनोहरांचा. मटा मधला मिळाला नाही. बहुतेक एकच असावा असं मराठी पेपरांबाबत म्हणता येईल. कवीचं उदात्तीकरण वाचलं. सुंदर प्रश्न पेरलेत. काही FYMAच्या विद्यार्थ्यांसारखे वाटतात.

"कविता वाचून टाकायची नाही, संबंध सोडायचा नाही."

हे विशेष आवडलं. काही अगदी वय झालंय असं सुचवणारी वाक्यं आहेत :

"कवितेत करमणूक मूल्य नसते. नसते?
यावर संशोधन व्हायला हवे.
हल्लीच्या कवितेत भलतेसलते शब्द असतात.
गहन प्रश्नांचा वेध घेऊन थेट नागरिकांपर्यंत पोचले पाहिजे, तेव्हा लोकशाही सिद्ध होईल.
प्रगत सभ्यतेतले संशोधन आपण अभ्यासावे. "

यातल्या बऱ्याच प्रश्नांना भरपूर उत्तरं मिळून गेली आहेत. ती जर अशा कवींपर्यंत पोचली नसतील तर कवीला कैच्या कै महत्त्व द्यायची खरंच गरज आहे का? का आहे? असले काही प्रश्न यातल्या शेवटच्या "कवी काय काम करतो?" लेखात चित्रेंनी विचारलेत. अभ्यासता येतील.

सोविएत व्यवस्थेत कवी या मुद्द्याहून सुरु होत मनोहरांनी म्हटलेलं नागरिक-कवी संबंध वगैरे व्यवस्थित विच्छेदन करून दाखवलंय. प्रतिमा-कथानक-लय(भाषेनुरूप)-आशय म्हणजे कविता असं समजून लिहिलं आणि वाचलं तर प्रत्येक कवितेची लायकी काढता येते असा आमचा अनुभव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आस्तिक नास्तिक लोकांनी एकमेकांच्या परंपरेचा काचून नव्हे पण निदान वरवर आदर करणं महत्वाचं वाटतं. सिंगल लोकांनी कपलचा आदर करण्याचं सौजन्य निदान दाखवावं ह्यात वावगं काही नसतंय.

कविता आवडली.
पाडली असली तरी आवडली.
एकविरेचा काय संबंध हे कळले नाही. फारफारतर बुद्ध- इंद्र आणि इंद्रजाल ओढून ताणून लिंकता आले.
कविता वेगळी असली तरी उंचवर जात नाही. मध्येच कुठेतरी लोंबकळते असे वाटते. माझ्यासाठी

"स्टॅन लीच्या पिलावळींत इतका इतका आपलासा
गजबजून टाकलंस वय ओलांडणारं शरीर माझं
टुमल्या इमारतींच्या पिंपरीतही टिकलास
जिथं तुझ्या वेबआधी आमच्या खिडक्यांना लटकून असतात
ITचे अदृश्य भोंगे
गजरणाऱ्या मोबाईलांची अलार्मिय किरकिर
वाळू घातलेले बिनसुके परकर"

एवढीच कविता वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0