धर्मांतराची कथा आणि व्यथा

परवा वि ग कानिटकरांची एक वेगळीच कादंबरी मला पुण्याच्या अक्षरधारा या पुस्तक-तीर्थामध्ये(हो, पुस्तकचे दुकान म्हणणे कसे तरी वाटते!) मध्ये पुस्तके चाळता चाळता हाती लागली. शीर्षक होते होरपळ, आणि ती एका धर्मांतराची कथा होती. मी ती कादंबरी घेतली आणि वाचली. तुम्ही म्हणाल धर्मांतर हा काय विषय आहे का आज-कालच्या जागतिकीकरणाच्या जगात. पण धर्माच्या संबंधित दहशतवाद आपल्या आसपास आहेच. त्यामुळे हा विषय आजही लागू आहेच. धर्मांतर म्हटले की आपल्याला आठवते ते बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धधर्म स्वीकारणे, आदिवासी, पददलित समाजाचे कधी मन वळवून, तर कधी जबरदस्तीने मिशनर्‍यांनी केले धर्मांतर. ज्यांना थोडाफार इतिहास माहिती आहे, त्यांना, भारतीय पुनरुत्थानाच्या(Indian Renaissance) काळात शिकलेल्या, उच्च वर्णीयांचे, जसे रेव्हरंड टिळक, पंडित रमाबाई, बाबा पदमनजी इत्यादीनी केलेले धर्मांतर माहिती असते. पण अश्या लोकांनी का असे धर्मांतर केले, ते कोठल्या मनस्थितीतून गेले, मानसिक उलथापालथ काय काय झाली, त्यातून ते कसे होरपळले गेले, ह्याचे दस्तावेजीकरण विशेष झालेले दिसत नाही. ह्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी त्यातील या गोष्टींच्या चित्रणामुळे मला भावली. कानिटकरांनी त्यांच्या पूर्वज आणि आणखी पूर्वज या लेख/कथा संग्रहातून अश्याच विस्मृतीत गेलेल्या व्यक्तींची चित्रणे कथारुपाने उभी केली आहेत.

ही कथा आहे ती नीलकंठशास्त्री गोऱ्हे नावाच्या कर्मठ चित्पावन ब्राम्हणाची आणि त्यांच्या ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची. हे ख्रिस्ती झालेले पहिले विद्वान कर्मठ ब्राम्हण. ही कादंबरी म्हणजे त्याचे चरित्र नाही हे लेखकाने आधीच स्पष्ट केले आहे. वास्तव आणि कल्पना यांची सरमिसळ आहे. नीलकंठशास्त्री गोऱ्हे ही अर्थात वास्तवातील व्यक्ती होती. १८२५ मध्ये जन्मलेली आणि तेही उत्तर प्रदेशात, काशी(वाराणसी, बनारस) येथे. आपल्याला इतिहास असे सांगतो की मराठी लोकं, कुटुंबं, कित्येक शतकापासून काशीला वास्तव्य करत आहेत. त्यातच परत पानिपत युद्धानंतर तर हे प्रमाण बरेच वाढले. मराठी सरदार, आणि पेशवे हे काशी मधील मंदिरांना दान देत असत, तसेच तेथील मराठी ब्राम्हण कुटुंबाना वैदिक धर्माच्या कार्यासाठी मदत करत असत. त्यापैकीच एक हे गोऱ्हे कुटुंब जे बुंदेलखंड नवाबाच्या दरबारात होते. जसा जसा इंग्रजांचा भारतात शिरकाव होत राहिला, तसा तसा धर्म प्रचाराकरिता मिशनरी लोक ही येवू लागली आणि आपले बस्तान बसवू लागली. काशी मध्येही तसेच झाले. नीलकंठशास्त्री गोऱ्हे हे जरी कर्मठ वैदिक कर्मकांडाचे काटेकोर पालन करणारे असले तरी ते चिकित्सा करणारे, प्रश्न विचारणारे, शैव वैष्णव आणि इतर तात्विक वाद जे त्यावेळेस प्रसिद्ध होते, त्यात तर्कबुद्धीने वाद करणारे, असे संस्कृत पंडित होते. साहजिकच जेव्हा त्यांचा आणि ख्रिस्ती मिशनरी यांचा संबंध आला, त्यामुळे चर्चा होऊ लागल्या आणि वाद होऊ लागले. साहजिकच दोन्ही धर्मातील चांगल्या आणि वाईट गोष्टींची तुलना होऊ लागली. ह्या सर्वांचे कानिटकरांनी कादंबरीत वर्णन केले आहे. त्यातील कित्येक गोष्टी सत्यावर आधारित आहेत. जसे की गोऱ्हे यांनी संस्कृत मधून John Muir(Indologist) याच्या संस्कृत मधील १८३९ च्या मतपरीक्षा या पुस्तकाला दिलेले उत्तर. याचे दाखले इतिहासात मिळतात. गोऱ्हे इंग्लंडला ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या महाराजा दुलीपसिंग यांच्या बरोबर इंग्लंडला गेले असता, प्रसिद्ध संस्कृत तज्ञ Max Muller याला पण भेटून, त्यांच्या जो वाद झाला त्याचे देखील थोडेसे वर्णन कादंबरीत आले आहे.

हे सर्व चित्रण, तसेच तो काळ, त्यानंतर १८५७च्या उठावाच्या धामधुमीचा काळ याचे चित्रण या कादंबरीत आहे. गोऱ्हे यांच्या मानसिकतेत, ख्रिस्ती मिशनरी यांची कार्य पद्धती, त्या धर्मातील गोऱ्हे यांना चांगले वाटणारे, पटणारे मुद्दे याचे छान वर्णन यात आले आहे. त्यांच्या कुटुंबातील वातावरण, घरातील वाद, तथाकथीत धर्म भ्रष्ट करणाऱ्या कृती, बाटण्याशी निगडीत मानसिकता इत्यादी विविध प्रसंगातून त्यांनी कादंबरी सजली आहे. नीलकंठशास्त्री गोऱ्हे ह्या सर्व मानसिक उलथपालथ होत असलेल्या अवस्थेतून ख्रिस्ती धर्म स्वीकारतात. त्यांना नेहेमिया नीलकंठशास्त्री गोऱ्हे हे नवीन नाव मिळते. ओल्ड टेस्टामेंट मध्ये नेहेमिया(Nehemiah) नावाच्या व्यक्तीची कथा आहे, ज्याने जेरुसलेम परत उभे केले असते. अश्या नेहेमियाचे नाव गोऱ्हे यांना मिळालेले असते. ही कादंबरी गोऱ्हे यांच्या जीवनातील पहिल्या ३२ वर्षांची कथा सांगते. ख्रिस्ती झाल्यानंतर देखील त्यांच्या जन्मजात बुद्धीप्रमाणे त्या धर्माची देखील ते चिकित्सा करत राहतात. १८५७ चा उठाव, त्याचा इंग्रज, आणि मिशनरी लोकांवर झालेला परिणाम, मिशनरी लोकांची प्रतिक्रिया, या सर्वांचा देखील त्यांच्या मनावर परिणाम झाला, त्यांच्या मनाची होरपळ होत राहते. पण कादंबरी नेमकी तेथेच थांबते. इतिहास असे सांगतो की नीलकंठशास्त्री गोऱ्हे यांनी परत एकदा पंथ बदलला. इंग्लिश चर्च सोडून ते Roman Catholic बनतात आणि भरीव कार्य करतात. कानिटकरांनी नमूद केल्या प्रमाणे C E Gardner यांनी लिहिले त्यांचे एक चरित्र १९०० मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ते परत एकदा आले पाहिजे आणि मराठी देखील आले पाहिजे. पंडिता रमाबाई यानी जसे ख्रिस्ती धर्माची सामाजिक सेवेची बाजू पुढे आणली त्यात कार्य केले, त्याप्रमाणे, नीलकंठशास्त्री गोऱ्हे यांनी तर्कबुद्धीने ख्रिस्ती धर्माची चिकित्सा केली. त्यांचे divinity या विषयावरचे चिंतन प्रसिद्ध आहे असे एकूण इंटरनेटवर संदर्भ तपासता दिसते. हिंदू धर्म, आणि ख्रिस्ती धर्म यांच्या भारतातील देवाणघेवाणीच्या संदर्भात त्यांचे आयुष्य एक महत्वाचा टप्पा आहे जे आता विस्मृतीत गेले आहे. त्याचा इतिहास आणि त्यांचे कार्य सर्व परत समोर आले पाहिजे. मला तत्वज्ञानाच्या क्षेत्रात रस असल्याने, आणि त्यातल्या त्यात तुलनात्मक (comparative philosophy) पद्धतीने त्याकडे पाहण्यात रस असल्याने, धर्माचे तत्वज्ञान हा विषय पाहताना Theology या विषयाची ओळख झाली, त्यामुळे मला हे सर्व खूप भावले. पुढे मागे त्याचा अभ्यास करायचा आहे. पाहुयात, कसे काय जमते!

माझे चाळीत बालपण गेले आहे. माझ्या आसपास दाक्षिणात्य ख्रिश्चन कुटुंबे राहत असत. माझा भाऊ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी म्हणून जवळच्या चर्च तर्फे चालवण्यात येणाऱ्या कॉन्वेंट शाळेत शिकत असे. त्यानिमित्ताने मी नेहमी तेथे जात असे. मी खुद्द जैन समुदायाने चालवलेल्या शाळेत जात असे. मी लहानपणी कसा कोणास ठाऊक, ख्रिस्ती धर्माची शिकवण देणाऱ्या संस्थांच्यातर्फे चालणाऱ्या टपालाद्वारे असणारे २-३ अभ्यासक्रम पुरे केले, जसे की तारणाचा मार्ग, Indian Bible Literature चे प्रमाणपत्र, वगैरे. त्यामुळे मिशनर्‍यांचे माहिती पसरवण्याचे, आवाहन आणि पद्धती(ज्याचे वर्णन या कादंबरीत आले आहे) करण्याचे काम मला थोडेफार जवळून पाहता आले. ही कादंबरी वाचताना हे सर्व आठवत राहिले. ह्या सर्व गोष्टी चांगली की वाईट, किंवा चूक की बरोबर ह्या भानगडीत मी पडत नाही. पण हे सर्व राजकारण, समाजकारण आपल्या भारताच्या इतिहासाच्या संचिताचा भाग आहे, आणि ह्या संदर्भात गोऱ्हे यांचे विस्मृतीत गेलेले जीवन आणि कार्य पुढे आले पाहिजे असे खचितच वाटते.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारी!

कानिटकरांनी नमूद केल्या प्रमाणे C E Gardner यांनी लिहिले त्यांचे एक चरित्र १९०० मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

हे साप‌ड‌लं. ही काद‌ंब‌री इत‌क्यात‌ मिळाय‌ची श‌क्य‌ता नाही, प‌ण हे च‌रित्र‌ मिळ‌त‌ंय‌ का पाह‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! कादंबरी मिळू शकते...चरित्र खुपच जुने आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

फार‌च सुंद‌र लेख‌.. पुस्त‌क ज‌रूर मिळ‌वून वाचावेसे वाटावे इत‌क‌ं सुंद‌र प‌रिक्ष‌ण लिहिले आहे आप‌ण‌.
अवांत‌र: मॅक्स‌म्युल‌र‌ च्या भार‌तिय विचार‌कांब‌रोब‌र झालेल्या वाद‍ स‌ंवादाब‌द्द‌ल‌, त्याच्या भार‌तातील वास्त‌व्याब‌द्द‌ल एखादे पुस्त‌क आहे का? इंट‌रेस्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! मलाही आवडेल वाचायला...तसे काही पुस्तक असेल तर..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

Ellen Lakshmi Goreh (१८५३-१९३७) ह्या नील‌क‌ंठ‌शास्त्रींच्या क‌न्या. ह्या नावाने शोध‌ घेत‌ल्यास‌ त्यांच्याब‌द्द‌ल‌ ब‌रीच‌ माहिती मिळ‌ते. त्यांची आई त्यांच्या ज‌न्मान‌ंत‌र‌ तीन‌ म‌हिन्यांम‌ध्ये वार‌ली. त‌द‌न‌ंत‌र‌ दोन‌ मिश‌न‌री कुटुंबांनी त्यांना आप‌ल्या घ‌रात‌ घेत‌ले. त्याहि मिश‌न‌री होत्या आणि ब‌रीच‌ प्रार्थ‌नागीते (Hymns) त्यांनी लिहिली आहेत‌. मोठ्या झाल्याव‌र‌ आप‌ले पुढील‌ आयुष्य‌ त्यांनी हिंदुस्तानात‌च‌ मिश‌न‌री कार्यात‌ काढ‌ले.
https://wordwisehymns.com/2010/09/11/today-in-1853-ellen-goreh-born/

https://hymnology.hymnsam.co.uk/e/ellen-lakshmi-goreh (येथे त्यांचा फोटोहि आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या माहितीबद्दल धन्यवाद...त्यांच्या नावात आईचे नाव आहे(नीलकंठशास्त्री हे नाही)...इंटरेस्टिंग...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

व‌रील‌ नावाचे पुस्त‌क‌ जी.न‌टेस‌न आणि क‌ं ह्या म‌द्रास‌म‌धील‌ प्र‌काश‌काने १८९७ म‌ध्ये प्र‌काशित‌ केले होते. त्याम‌ध्ये गोऱ्हेंच्या व‌र‌ एक‌ ४ पानांचा लेख‌ आहे. त्यातून‌ गोऱ्हेंच्या जीव‌नाचा पूर्ण‌ आराख‌डा, त्यांचे हिंदुस्तान‌ आणि इंग्ल‌ंड‌म‌धील‌ प्र‌वास‌, त्यांचे लेख‌न‌ आणि उत्त‌रायुष्य‌ अशी माहिती मिळ‌ते. १८७९ न‌ंत‌र‌ ८९५ म‌धील‌ मृत्यूप‌र्य‌ंत‌ त्यांचा निवास‌ पुण्याम‌ध्ये प‌ंच‌हौद‌ मिश‌न‌म‌ध्ये झाला.

हे पुस्त‌क‌ येथे पूर्वाव‌लोक‌नासाठी उप‌ल‌ब्ध‌ आहे. सुदैवाने १४७ ते १५१ ही त्यांच्याब‌द्द‌ल‌ची चार‌ पाने वाचाव‌यास‌ मिळ‌तात‌.

१८९१ साल‌च्या प‌ंच‌हौद‌ मिश‌न‌ च‌हापान‌ ग्राम‌ण्याच्या वेळी गोऱ्हे त्या मिश‌न‌म‌ध्ये आणि पुण्यात‌ अस‌णार‌. त्या निमित्ताने गोऱ्हेंच्याब‌द्द‌ल‌ काही लिहून‌ आलेले मिळ‌ते का असे शोध‌ण्याचा प्र‌य‌त्न‌ केला प‌ण‌ य‌श‌ आले नाही.

१९व्या श‌त‌कातील‌ ख्रिश्च‌न‌ ध‌र्म‌ स्वीकार‌ण्याच्या स‌ंद‌र्भाम‌ध्ये मी 'ऐसी'म‌ध्ये पूर्वी लिहिलेले पंडिता 'रमाबाई आणि अमेरिकन रमाबाई असोसिएशन भाग १ आणि भाग‌ २' हे दोन‌ लेख‌ उप‌ल‌ब्ध‌ आहेत‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पंडिता रमाबाई यांच्यावरील लेख चाळून पहिले...बसून वाचले पाहिजेत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com