लेट्स टाॅक

अलीकडेच चित्रकथीची 'लेट्स टाॅक' ही वेब सिरीज पाहिली. तशी जरा उशीराच पाहिली. कारण रिलीज होऊन सात आठ दिवस झाले आहेत. असो. तर पुष्कराज चिरपुटकर असल्याने ही पाहणे आलेच. कारण या अभिनेत्यामध्ये एक वेगळीच स्पार्क जाणवते. त्याविषयी नंतर कधीतरी. तूर्तास या वेब सिरीजविषयी.

पहिला एपिसोड सुरू होतो तो किचनमधील सीनने. यानंतर पुष्कराज थेट आपल्याशी बोलू लागतो. थोडक्यात, आपल्यातील आणि त्या कॅरेक्टरमधील भिंत तोडली जाते. हा प्रकारही आता फारसा नवीन नाहीच. पण यानंतर आपण त्याला सर्वत्र फाॅलो करत राहतो, म्हणजे आपणही स्वतःचा विचार त्यातील एक पात्र आणि प्रेक्षक याने दोनही दृष्टीने करतो. याची मांडणी आणि लेखन यामध्ये थोडं नावीन्य जाणवलं. पण हा एपिसोड आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होतो.

म्हणजे काय घडलंय याची आपल्याला जाणीव होते, पण आपण पुष्कराजला फाॅलो करत असणं हे आपल्या त्या अनुमानाला वारंवार छेद देत राहतं. आणि शेवटाकडे जाताना तसंच होतं. आता नक्की काय घडतं, ते ह्या वेब सिरीजमध्येच पाहणे योग्य ठरेल.
पुढील एपिसोड्सविषयी बोलणार नाही, कारण अनायासे का होईना पण स्पाॅयलर येतील. हे एपिसोडही एकदा पहावेत असेच आहेत. आणि निव्वळ पहावेतच नव्हे तर शेअरही करावेत असे आहेत.

वेब सिरीजची मांडणी रिअॅलिस्टिक आहे. संवादांवर चांगली मेहनत घेतली आहे. 'चौथी भिंत' तोडल्यामुळे ही गोष्ट आपल्यावर जास्त प्रभाव पाडते. एपिसोड्सची लेंग्थ पहिला आठ मिनिटांचा तर दुसरा सहा आणि तिसरा चार मिनिटांचा, अशी आहे. थोडक्यात, या वेब सिरीजमधील विषयाबाबत बोलताना आणि प्रत्यक्षात तसं घडत असताना कमी होत जाणारा वेळ, ही गोष्ट अधोरेखित करणे हा दिग्दर्शकाचा उद्देश असू शकतो. बॅकग्राऊंड स्कोअर चांगला वाटला, तो आपल्यावर ही सिरीज पाहताना एक वेगळाच प्रभाव पाडत राहतो.
थोडक्यात ही वेब सिरीज एकदा तरी पहाच. ती युट्यूबवर उपलब्ध आहे. लिंक पहिल्या कमेंटमध्ये देतोय.
अरविंद पाखले हे याचे निर्माते आहेत. या वेब सिरीजशिवाय त्यांची एक शाॅर्टफिल्म लवकरच येत आहे. तिचाही टीझर पहा. चित्रकथीकडून अपेक्षा वाढल्या आहेत...

- अ. ब. शेलार

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet