Skip to main content

मांडतो आहे नव्याने...

चाललो शहराकडे मी..गाव सांभाळून घे
मांडतो आहे नव्याने..डाव सांभाळून घे!

सवय झाली एकदा की क्षीण होते वेदना
लागतो जो जो जिव्हारी..घाव सांभाळून घे!

जीव तुटतो त्या क्षणीही याद मी येईल पण
तू उखाणे घेत असता,नाव सांभाळून घे!

वेगळ्या वाटा तुझ्या अन् वेगळ्या माझ्या सही
टाळ तू प्रत्येक काटा..धाव सांभाळून घे!

काजळाची रेघसुद्धा वाटते आहे गझल
तू तुझ्या नजरेत माझे भाव सांभाळून घे!

—सत्यजित