वेगळी केस

(कृपया हा लेख परवानगीशिवाय मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)
©®™ मंगेश पंचाक्षरी, नासिक.

लहानपणी शाळेत एक सुविचार वाचण्यात आला होता. " केस वाढवून देवानंद होण्या पेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा". या सुविचाराचा माझ्या मनावर खूप खोल परिणाम झाला आणि मला देवानंद बद्दल विलक्षण कुतूहल निर्माण झालं. कारण मला फक्त केस वाढवणं च शक्य आणि सोपं होतं. इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळेत केस वाढवलेले चालायचे. त्यामुळे मी छान केस वाढवले. माझे लहाने काका माझ्या केसांना तेल आणि पाणी लावून स्टायलिश भांग पाडून द्यायचे. माझे वडील कामावर गेले की माझ्या केसांचा चक्क देवानंद प्रमाणे ते 'कोंबडा' ही पाडायचे. वडील कामावरून यायची वेळ झाली की पुनः माझे केस मूळ रुपात यायचे. चार पाच दिवस आम्ही हा खेळ केला. पण केसांचं कोंबडं कितीही झाकलं तरी एकदिवस सूर्य उगवायचा तो उगवलाच आणि वडिलांनी आमच्या डोळ्यापुढे काजवे चमकवले. पुढे पाचवी नंतर शाळेत मोठे केस वाढवण्यास परवानगी नव्हती. मागच्या बाजूचे केस हाताच्या मुठीत पकडून आमचे सर आम्हाला चोप द्यायचे. असे केस वाढवलेल्या मुलांना ते 'हिप्पी' म्हणायचे. त्यामुळे आमचं हिप्पी जमाती बद्दल चं कुतूहल जागं झालं पण नशिबाने तेव्हा इंटरनेट नसल्याने आम्ही ऐकीव महितीवरच भागवलं. जी मुलं शाळेत कटिंग करून यायची नाहीत त्यांना शिक्षा म्हणून वर्ग चालू असताना सरांनी घरी पाठवण्यास सुरुवात केली. पण वर्ग चालू असताना मधूनच घरी जाण्यासाठी ही सुसंधी समजून आम्ही मुद्दामच केस वाढवून शाळेत जाऊ लागलो. यावर उपाय म्हणून सरांनी शाळेतच कटिंग वाला बोलावून ज्यांचे केस वाढले होते त्यांची घाऊक रित्या कटिंग करवून घेतली. आतातरी मुलं आणि पालक सुधारतील असं सरांना वाटलं पण उधारीत आणि शाळेच्या वेळेतच मुलांची कटिंग होते आहे हे बघून पालक अधिकच आनंदून गेले. एकूणच या सर्व प्रकारात शिक्षक च (कटिंगच्या) कात्रीत सापडत गेले.

जनरली लोकांच्या त्वचेचा रंग गोरा (पांढरा) आणि केस काळे असतात. पण आमच्या बाबतीत विधात्याने उलट केले. जर आमचे केस काळे, रंग गोरा, उंची जरा अधिक, बॉडी बांधेसूद आणि चेहरा रेखीव असता तर आज आम्ही देखील चित्रपटात 'हिरो' असतो पण ही संधी थोडकयात हुकली. तसे आम्हाला सलून मध्ये जायला कधीच आवडायचे नाही पण एकदा एका अमेरिकन चित्रपटांत परग्रहावरच्या स्त्री चा रोल करण्यासाठी 'परसिस खंबाटा' या भारतीय अभिनेत्री ने चमन गोटा केलेला बघितला आणि आमचं कुतूहल जागं झालं. काही लोकांना टक्कल असते. ते बिचारे केस वाढावेत म्हणून प्रयत्नशील असतात. आम्हाला मात्र कटिंग ला जायचा फार कंटाळा आहे. आपल्या चलनावर गांधीजींचा फोटो असतो. त्याचे डिझाईन ठरलेले असते. काही वर्षांपूर्वी एकदा नोटेच्या नवीन डिझाईन मध्ये गांधीजींच्या डोक्यावर जरा जास्त केस दाखवल्याने त्या नोटा रद्द कराव्या लागल्या होत्या. केसांची महती इतकी अगाध आहे.

सलून मधल्या वातावरणाचा आम्ही फार बारकाईने अभ्यास केला. लहानपणी आम्ही सलून मध्ये आमचा नंबर येण्याची वाट बघत बसायचो तेव्हा तिथे 'मायापुरी' नावाचं हिंदी चित्रपटांच्या माहितीवर आधारित एक हिंदी मासिक असायचं. ते वाचून आम्हाला गॉसिप म्हणजे काय ते कळायला लागलं. त्यात एक सदर असायचं. त्याचं नाव होतं 'लिहाजा हम तो चूप ही रहेंगे'. एखाद्यावर सर्व काही 'भाष्य ' करून शेवटी ही ओळ त्यात असायची. या सदरातून आम्ही बरेच काही शिकलो. कधी कधी मायापुरी वाचताना आम्ही इतके रंगून जायचो की कटिंगसाठी आपला नंबर लवकर येऊच नाही असं वाटायचं. तसं ही छान वाढलेले केस कापायची इच्छा नसायचीच. पण वडिलांनी आधीच मालकाला बारीक कटिंग करायला सांगून ठेवलेलं असायचं. कटिंगच्या खुर्चीत बसलं की आमच्या 'केसांवर' आणि ते वाढवण्याच्या 'इच्छेवर' सलुनवाला पाणी फिरवायचा. त्या काळी अंगावर पांढरा कपडा गुंडाळायचे. हल्ली कोणत्यातरी 'डाय' च्या कंपनीने स्पॉन्सर केलेला काळा कपडा आपल्या भोवती गुंडाळतात. आपण त्यात हाय कोर्ट च्या वकीलासारखे दिसायला लागतो. नेमका तो कपडा गुंडाळला की नाकावर, गालावर किंवा हनुवटीवर खाज येते. किंवा आपला मोबाईल वाजायला लागतो. केस काळे करायचे असतील तर हा वेळ (आणि त्रास) दुप्पट वाढतो. आम्ही केसांना 'कलप' म्हणजे 'डाय' करायला बिलकुल तयार नव्हतो पण तरुण मुलं आमच्या तिशीतच पांढऱ्या केसांमुळे आम्हाला 'काका' म्हणू लागले आणि पर्यायाने आमच्या सौ ला 'काकू' म्हणायला लागले तेव्हा मात्र आमच्या सौ ने आम्हाला "डु ऑर डाय" म्हणजे "डाय करा नाहीतर मरा" असा निर्वाणीचा इशारा दिल्याने 'घरातून तोंड काळं करण्यापेक्षा केस काळे' करण्यास आम्ही प्राधान्य दिले.

सलून मध्ये समोरा समोर आरसे असतात. त्यात असंख्य प्रतिमा एकात एक दिसत रहातात. ते दृश्य फार मजेशीर असते. सलून मध्ये आपल्या मागे एक छोटासा टीव्ही बसवलेला असतो. आपल्याला तो आरशात उलटा दिसत असतो. त्यामुळे त्यावर क्रिकेट ची मॅच चालू असेल तर समोरच्या आरशात आपल्याला मुळीच स्कोअर वाचता येत नाही. ते ही ठीक आहे पण आपले जेे 'लेफ्टी' खेळाडू असतात ते 'रायटी' आणि 'रायटी' खेळाडू असतात ते 'लेफ्टी' खेळताना दिसतात. त्यामुळे नक्की कोण आऊट झालं तेच समजेनासे होतं. सलुनमध्ये जी मुलं कामाला असतात त्यांना 'कारागीर' म्हणतात. हे कारागीर लोकं हल्ली भिंतीला लावायला 'तुंबड्या' नसल्याने सतत इतर रिकामी कामं करत असतात. एक मेकांशी बोलताना त्यांचा हात थांबतो अन आपला खोळंबा होतो. एका नवीन कारागिराने एकदा मला कात्री चालवता चालवता माझे आडनाव विचारले. "तुमच्यात तर शेंडी ठेवतात, मग तुम्ही का नाही ठेवत?" त्याने मला डिवचले. मग मी पण त्याला "तुम्ही इतक्या लोकांचं टक्कल करतात, मग तुमच्यात 'टकले ' आडनाव का नसतं?" असं विचारून निरुत्तर केलं. परिणामी त्याने माझी उर्वरित हजामत 'बीन' पाण्याने केली. मागे मी सिंगापूर ला असताना तिथल्या कारागिराने "तू मलेशियन आहेस काय?" असे विचारून माझी अशीच खोडी काढली होती " मी कोणत्याही अँगल ने मलेशियन दिसत नाही पण अशी खोडी काढणं हा सलून वाल्यांचा जागतिक छंद आहे. मी पण मग त्याला "तू आफ्रिकन आहेस का?" असं विचारून परतफेड केली होती. एकदा तर एका कारागिराने मला डाय करताना विचारले होतं "तुमचे केस पांढरे झाले मग मिशी कशी काळी आहे अजून?" मी त्याला "मिशी वीस वर्षे उशिरा आल्याने अजून पांढरी झाली नाहीये" असं लॉजिकल उत्तर दिलं होतं. साधारणपणे 'चाळीशी' च्या आसपास मिशीत पांढरे केस डोकावू लागतात आणि पुरुष अस्वस्थ होतात. मग इतकी वर्षे रुबाबात बाळगलेली मिशी या दरम्यान ते काढून टाकतात आणि पुनः तरुण दिसण्याचा प्रयत्न करतात. हल्ली दाढी - मिशी राखण्यात पण खूप फॅशन आलेल्या आहेत. त्यातून धर्म ही प्रतीत होत असतो. काही हिंदू दाढी काढून मिशी राखतात तर काही मुस्लिम मिशी काढून दाढी राखतात. बोहरी लोकांची पद्धत अजूनच थोडी वेगळी असते. असो!

केस पांढरे होणं हे अनुभवी असल्याचं लक्षण मानलं जातं. आमच्या बँकेत एक कर्मचारी सर्वांसमोर साहेबाना म्हणाला "साहेब इथेच आमचे काळ्याचे पांढरे झाले, आता पगार वाढवा" साहेब मिश्किल होते. साहेबानी त्यांना खिशातून चाळीस रुपये काढून दिले आणि सांगितले "एक डाय विकत घ्या आणि तासाभरात पुनः पांढऱ्याचे काळे करून या. एक कर्मचारी तर ऑन ड्युटी केस कापायला गेला. साहेब भडकले, म्हणाले "ऑन ड्युटी का केस कापायला गेलास?" तर तो म्हणाला "साहेब, केस ऑन ड्युटी पण वाढतात ना!" तेव्हा साहेबानी त्याला विचारलं "पूर्ण केस काही ऑन ड्युटी च थोडीच वाढतात?" त्यावर तो बोलला "मी फक्त ऑन ड्युटी वाढलेलेच केस कापून आलोय सर" सलून च्या बाबतीत अशा गमती जमती घडत असतात. याच क्षेत्रातील 'राम नगरकर ' नावाचे एक सलून मालक अत्यंत उत्तम विनोदी लेखन करत. त्यांच्या 'रामनगरी' या पुस्तकावर मराठीत एक सिनेमा देखील प्रदर्शित झालेला आहे.

एकदा मी नेहमीच्या सलून जवळ एक नवीन सलून उघडलेले पाहिलं. पूर्वीच्या मालकाकडे काम करणाऱ्या त्याच्या नातेवाईकाने च 'केसाने गळा कापला होता' हे माझ्या लक्ष्यात आलं. पण ग्राहक काही तिकडे फिरकले नाहीत कारण फॅमिली डॉक्टर सारखे कटिंग वाले ही ठरलेले असतात. जावळ, मुंजी पासून दहाव्या पर्यंत ही जबाबदारी ते पेलत असतात. 'केश कर्तनालय, पार्लर, सलून, हेअर ड्रेसर' अशी नावे ही दुकानं मिरवत असतात. मराठी भाषेत इंग्रजी शब्दांची भरताड काही कमी नाहीये पण म्हणून ज्याला पूर्ण 'टक्कल' आहे त्याला 'गॉन केस' म्हणणं म्हणजे टू मच हं! आमच्या केसांचा वाढण्याचा वेग खूप जास्त असल्याने आम्हाला दर तीन आठवड्याला कटिंगचा खर्च येतो. 'खल्वदो क्वचितम निर्धनम' म्हणजे 'टक्कला माणूस क्वचितच निर्धन असतो ' असं एक संस्कृत वचन आहे. आम्हाला ही आता लवकरच टक्कल पडेल आणि मग आमच्या कडेही भरपूर पैसे येतील या आशेवर आम्ही भरपूर उधारी करून ठेवली आहे. आमची 'केस'च वेगळी आहे.

©मंगेश पंचाक्षरी, नासिक.
Email:- mangeshp11@gmail.com

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

. नेमका तो कपडा गुंडाळला की नाकावर, गालावर किंवा हनुवटीवर खाज येते. किंवा आपला मोबाईल वाजायला लागतो.

ख्याख्याख्या.. मस्त ऑब्झर्वेशन..
लेखदेखिल फक्कड जमलाय..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हे निरीक्षण म्हणजे अनुच्चारित आर्यसत्यांपैकी धरले जावे. अफाट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

haahaaha..
खरोखर..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

रामनगरी पुस्तक वाचले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकदम झकास! Smile
हापिसातून कटिंगला जाण्याचे जोक्स जुने आहेत, पण फिट्ट बसवलेत!
रामनगरी वाचले नसेल त्यांनी वाचा, रामभाऊंची मस्त शैली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मंगेशजी, लेख छान जमलाय...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग