ताई

कित्येक लिहितात आईवर, कित्येक लिहितात प्रेमावर,
कित्येक लिहितात मैत्रीवर, कदाचितच लिहिलं जातं ताईवर.

आई म्हणजे श्वास, प्रेम म्हणजे ध्यास,
मैत्री म्हणजे खास, ताई म्हणजे.......?
इथं लिहिताना का अडखळले ते कळलंच नाही,
ताईची एका शब्दात व्याख्या करणं मला जमलंच नाही.

आईनं शिकवलं जगणं, प्रेमानं फुलणं,
मैत्रीनं जोडणं, आणि ताईनं.......?
परत एकदा काय लिहावं हे अडखळलं.

ताईचीच खेळणी हवी म्हणून केलेला मी हट्ट,
कधी नाराजीने, बरेचदा मोठेपणाने तिने पुरविला
तो आजही आहे मनात घट्ट.

लहान-सहान गोष्टींवरूनही जेव्हा होई वाद
मला वाटे माझंच खरं,
तेव्हा वादातून तीच होई बाद
मनातलं माझ्या समजून सारं.
तरीही कधी- कधी झालंच भांडण
थोडावेळ उगाच यायचा राग,
वाटायचं, ती बोलते मी लहान आहे म्हणून
पण जेव्हा कळायचं माझंच चुकलं तेव्हा
रडायचं तिच्याच मिठीत हमसून- हमसून.

ताईनं शिस्त लावताना
कधी वाटायची हिटलर,
पण आता त्या शिस्तीतूनही दिसते डोकावताना
खूपच मायाळू सिस्टर.

जाणवतंच आज मोठं होताना
पूर्वीच्या घटना तपशील तसेच राहिले
परंतु संदर्भ मात्र आज बदलले.

का अडखळले होते माझे शब्द
कारण आता कळतंय,
सा­या जगाला पाहताना
राहून गेली पहायची स्वत:ची सावली,
आणि म्हणूनच म्हणावसं वाटतं
ताई म्हणजे माऊली.

field_vote: 
0
No votes yet