धूम्राक्ष : अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम

मानव ऋषीने मोठ्या प्रयत्नाने दगडांना घासून अग्नी प्रज्वलित केली. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना सुरु केली. हे अग्नी, सर्व संसारिक सुख आम्हाला प्रदान कर, गाई- म्हशी, दूध-तूप, धन-धान्य प्रदान कर. आम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंवर विजय मिळवून दे. "अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम:". 'तथास्तु' एक आवाज ऐकू आला. मानव ऋषीने पाहिले, हवन कुंडातून एक धुम्र्वर्णी अशरीरी आकृती, हात जोडून उभी होती. मानव ऋषीने प्रश्नार्थक नजरेने बघितले. मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझे भोजन आणि मानवाच्या इच्छा पूर्ण करणे, हाच माझा धर्म. आज्ञा करा, ऋषिवर. मानव ऋषीने सांशक होऊन विचारले, खरंच! तू सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. धूम्राक्ष म्हणाला, प्रत्यक्षला प्रमाण कशाला. तुमच्या मनात मध खाण्याची इच्छा आहे, याच झाडावरच मधमाश्यांचा पोळआहे. 'नको रे, भयंकर दंश देतात मधु माश्या'. आता मधु-माश्यांची भीती नाही. मधाच्या पोळां खाली लाकडे जाळली, धूर निघाला, मानव ऋषी धुर्यामुळे खोकलू लागले. मधुमाश्या पोळ सोडून निघून गेल्या, मधुर मधु चाखायला मिळाले. मानव ऋषी आनंदी झाले. धूम्राक्ष हात जोडून मानव ऋषी समोर उभा राहिला पुढच्या आदेशासाठी.

खांडववन जळत होते, आगीचे डोंब आकाशाला भिडत होते. काळाकुट्ट धूर सर्वत्र पसरला होता. अर्जुनाचा आवाज गुंजला, माणसाला त्रास देणारा एक हि हिंस्त्र पशु जिवंत राहिला नाही पाहिजे. धूम्राक्ष एक-एक करून वनातील सर्व जीव-जंतूंना गिळू लागला. प्राण कासावीस झाल्याने काही वनवासी वनातून बाहेर पडले.अर्जुनाला शरण गेले. बहुतेक जगातील पहिले विस्थापित. खांडववनाच्या राखेवर नवीन भव्यदिव्य विशाल इंद्रप्रस्थ नगर उभे राहिले. नवी मुंबई आणि अमरावती सारखे भव्य महानगर हि उभे राहिले. हिरोशिमा आणि नागासाकी वर अणुबॉम्ब टाकला. आग आणि धुर्यात गुदमरून लक्षावधी लोग मरण पावलें. धूम्राक्षाच्या मदतीने विजय हि मिळाला. माणसाची प्रत्येक इच्छा हा पूर्ण करता-करता, धूम्राक्ष धूर गिळत-गिळत एवढा मोठा झाला आहे, कि आज संपूर्ण पृथ्वी त्याच्या अशरीरी शरीराने झाकल्या गेली आहे.

काल संध्याकाळी गच्ची वर उभा होतो, दिसला मला तो धूम्राक्ष. विचारले, अरे तुझ्यामुळे प्राण कासावीस झाला आहें, श्वास हि घेता येत नाही आहे, दिवस रात्र खोकलत राहतो, अस्थमा झाला आहे, मला. तो म्हणाला मालक यात माझा काय कसूर. तुमच्या इच्छा पूर्ण करता करता मी एवढा मोठा झालो आहे. मला रागच आला, त्याचा, तुझ्या कृत्यांना मी कसा काय दोषी. तो म्हणाला, घरात AC आहे का. मी म्हणालो, संपूर्ण घर ACच आहे. बाहेरची प्रदूषित हवा घरात येऊ नये म्हणून लावला. हो पण त्या AC साठी वीज कुठून येते. कोळसा जळतो, धूर निघतो, मगच वीज मिळते, म्हणत धूम्राक्ष जोरात हसला. पुढे म्हणाला,मालक समोर पहा काय दिसत आहे, मी म्हणालो दूर मायापुरीतील कारखान्यांच्या धूर ओकणाऱ्या चिमण्या. तुझे सातमंजली घर मायापुरीतल्या लोखंडी सळ्यानींच बनले आहे. किती गाड्यला आहेत घरी? मी उतरलो, एक माझी, एक माझ्या सौची, एक चिरंजीवाची आणि एक मोठी कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तर. तो म्हणाला, पेट्रोल जळते, धूर निघतो, मगच कार चालते. मी चिडून म्हणालो, माझ्या अस्थम्यासाठी मीच दोषी आहें, हेच म्हणायचे आहे का तुला? मालिक चिडू नका शांत व्हा. सत्य तेच सांगतो आहे. बाकी मला काय, मी दास आहे, मानवाच्या आदेशाचे पालन करणें माझे कर्तव्य. आपण आदेश द्या. मी पुढे काही न बोलता गुपचूप खाली उतरलो. खोलीत येऊन AC सुरु केला. पण तरीही रात्री मला झोप आली नाही.

अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम. मंत्राचा अर्थच कळला नाही. सर्व मलाच पाहिजे. त्या साठी कितीही किमंत आपण मोजायला तैयार असतो. कदाचित मानवाच्या अपरमित इच्छांची पूर्ती करता-करता एक दिवस धूम्राक्ष मानवाला हि गिळून टाकेल.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मौलिक विचार करणारे आणि करायला लावणारे लेखन आहे. पण त्यातील अखेरचा 'कदाचित मानवाच्या अपरमित इच्छांची पूर्ती करता-करता एक दिवस धूम्राक्ष मानवालाहि गिळून टाकेल' हा निराशेचा मार्ग दाखवणारा समारोप पटला नाही.

उपलब्ध साधनांचा उपयोग करून सुखाचा मार्ग शोधायचा हे नैसर्गिक आहे आणि ह्यामध्ये कानकोंडे (apologetic) वाटण्याजोगते काही नाही. सुखाचा मार्ग शोधतांना निसर्गामध्ये असलेली अमर्याद ऊर्जा ह्या ना त्या मार्गाने वापरावी लागते. प्रारंभी अग्नि निर्माण करून त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा वापरणे हे सर्वात सुकर होते आणि म्हणून तेच वापरले गेले. आजहि हे ना ते इंधन जाळून ऊर्जा निर्माण करण्याची पद्धत आपले स्थान टिकवून आहे. पण त्यातून निर्माण होणारे तोटेहि - पर्यावरणाचा ह्रास, खनिज तेलासारखी वापरायला सोपी इंधने केव्हाना केबव्हा संपुष्टात येणे - हेहि विचारी लोकांच्या लोकांच्या ध्यानात आलेले आहेत आणि त्याविरुद्ध उपाययोजना - वारा, सूर्यप्रकाश, गुरुत्वाकर्षण अशा अक्षय ऊर्जांचा वापर करणे ह्या दिशेनेहि कामास सुरुवात झाली आहे. तेव्हा भविष्यकाळ उज्ज्वलच दिसतो. मनुष्यांची उपभोगलोलुपता वाढत चालली आहे, तिला आळा घालणे आवश्यक आहे असल्या प्रगतीची दिशा उलटी करणाऱ्या विचारांपासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे लेखन, त्यावरचा कोल्हटकरांचा प्रतिसाद, दोन्ही आवडले. धन्यवाद, माझ्या शब्दसंग्रहात भर घातल्याबद्दल. 'खोकलत' हा शब्द मला नवीन आहे. आम्ही फक्त, 'कोकलत' हा शब्द ऐकून होतो. त्याचा अर्थ, अर्थातच वेगळा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

छान लिहिलंय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगले लिहीले आहे. पुराण काळापासून माणसात काही बदल घडलेला नाही असच म्हणायचे ...

स्वत:च्या अमर्याद इच्छा, आकांक्षांना मुरड घातली तर अजून काही चांगले होऊ शकते, पण तसे न करता माणूस परग्रहावर अतिक्रमण करण्याच्या योजना आखतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. अजूनही उशीर झालेला नाही. अधिकांश समस्या आपण सोडवू शकतो. गेल्या ५ वर्षांपासून मी मातीचा गणपती बसवतो आणि घरातच विसर्जित करतो. माती गमल्यांमध्ये वापरतो. अंघोळ ५-६ लिटर पाण्यात करतो. मशीन मधून आधी कपडे व्यवस्थित पिळून मग ड्रायर मध्ये टाकतो. पाणी कमी लागते. उन्हाळ्यात संध्याकाळी चार पाच वाजता टाकी चे पाणी भरपूर गरम असते. खूप कमी साबणात कपडे व्यवस्थित निघतात. कचर्याचा दोन पेट्या घरात आहे. स्वैपाक घरातला आणि बाकी कचरा वेगळा करून देतो. अश्या छोट्या छोट्या गोष्टी प्रदूषण दूर करण्यात सहायक होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मशीन मधून आधी कपडे व्यवस्थित पिळून मग ड्रायर मध्ये टाकतो. पाणी कमी लागते.

हे कसं काय? जेवढं पाणी लागायचं ते मशीनमध्ये लागलंच ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

पटाईतकाका, तुम्हाला काय म्हणायचे आहे ह्याबाबत तुमचे लेखन पुरेसे स्पष्ट नाही असे वाटते. कपडे सुकविण्याच्या मशीनचा विजेचा वापर कमी करण्यासाठी तुम्ही आधी वेळ आणि शक्ति खर्च करून कपडे पिळत बसता. विजेचे बिल वाचते हा त्याचा एक उघड लाभ दिसतोच आहे पण हा विचार आणखी थोडा पुढे नेला तर तुम्हाला तो Luddite बनवू शकतो आणि तुम्हाला ती दिशा अपेक्षित आहे असे वाटत नाही.

संसाधनांचा अम्रर्याद उपयोग करून सुखे निर्माण करणे आणि त्यासाठी पर्यावरणाचा विनाश करणे हे चूक आहे असेहि तुम्ही ध्वनित करता आणि तितक्या मर्यादित अर्थाने ते मान्यहि आहे. पण त्यापुढे जाऊन सुखांचा मार्गच सोडायला हवा असा संन्यासी आणि प्रतिगामी विचारहि त्याबरोबरच येत असला तर ते मात्र अमान्य करायला हवे. मेलेल्या पशूचे कातडे पांघरून थंडीपासून बचाव करायला आदिमानवाने सुरुवात केला तेव्हापासून हा संसाधनांचा विनाश सुरू झाला आहे आणि त्यात चुकीचे काही नाही. मी वर लिहिल्याप्रमाणे संसाधनांचा विनाश न करता ऊर्जा आणि त्यातून सुखांची निर्मिति ही प्रक्रिया आत्ताआत्ता सुरू झाली आहे. कालान्तराने हीच आणखी दृढ होऊन 'संसाधनांचा विनाश न करता सुख' असे दिवस आणेल.

सारांश काय की कपडे हाताने पिळून मशीनमध्ये टाकणे आणि Earth Day चे निमित्त करून रात्री अंधार करून बसणे अशा गोष्टी दात कोरून पोट भरण्यासारख्या निरर्थक वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0