हॉल -मॉल

जिकडेतिकडे बांधलेयत मोठे मोठे हॉल
भव्य-विस्तीर्ण आणि एकदम टॉल
चहूबाजूंनी बांधलीय काचेची वॉल
तयार आहेत झकास मॉल
चकचकीत फरशी , बाहेर खुरटी हिरवळ
भव्यदिव्य टॉयलेट मध्ये केमिकल चा दरवळ
कोट्यवधी LED ची असह्य प्रभावळ
खरेदी-खरेदी-खरेदी
सर्वांच्या मनातली एकसुरी वळवळ
मॉलमध्ये हिंडताना
कविता सुचते का
पाहू लागतो
शब्द शोधू लागतो
शोधात गुंग होऊन
प्रत्येक दुकानात घुसू लागतो
अधाशा सारखा वस्तूंकडे पाहू लागतो
चाळीस दुकानं फिरून ही
काहीच न सुचल्यावर
दुसऱ्या मजल्यावरच्या काचेच्या बंद खिडकीतून
बाहेरचं तळं, त्यावर उडणारे शुभ्र बगळे
पाहून
आपसूकच गाऊ लागतो ...
झालाच आत्ता भूकंप,
आदळला अशनी याच क्षणी
तर भटकत राहील
माझं भूत
मॉलच्या कचकडी अवशेषांमध्ये
शोधत राहील
चकचकीत फरशांसारखी
चकचकीत चपट्या मितीची कविता
कृत्रिम हिरवळी सारखी
मुद्दाम पेरलेल्या शब्दांची कविता
LED च्या भपकेदार प्रकाशाची कविता
बाहेरच्या तळ्याकडे,
त्यावर उडणाऱ्या बगळ्यांकडे
दुर्लक्ष करून बंद काचेत
विस्तारणारी कविता
..... ...... ...... ..... .......
पण इतका उद्वेग कशासाठी ?
कदाचित मॉल च्या पण स्वतःच्या कविता असतील
आज ना उद्या कुणाला तरी त्या गवसतील
मॉलभोवती अखंड फिरणाऱ्या गाड्यांच्या आवाजातून
कवितेच्या फ्रिक्वेन्सया प्रसवतील
चपट्या फरशीला ही तिच्या मिती असतील
गुळगुळीत काचेच्या भिंतींवर कुठेतरी ओरखडे असतील
वरखाली करणारी
वस्तूंचा हव्यास धरणारी,
जाहिरातीतल्या अंतर्वस्त्राकडे एकटक पाहणारी
माणसंच आहेत ,
माणसंच असतील
.... ..... ... ........
खूप मॉल आहेत शहरात
आपण आपले भटकत राहू
कविता की काय ते शोधत राहू

field_vote: 
0
No votes yet