संगीतकार

आमच्या समोरची तिशीतली एक मुलगी दीडशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एक संगीतकाराबद्दल सांगत होती. निळसर डोळे , सुरेख पातळसर केस , लांब जिवणी, ती स्वतः पियानो वादक होती. तर त्या जुन्या संगीतकारानं त्या काळच्या ऑपेरा मध्ये केलेली कामगिरी, तंत्रावरील त्याची हुकूमत, कमी वाद्यांचा वापर करून जास्तीतजास्त प्रभावी संगीत देण्याचं त्याचं वैशिष्ट्य, त्याच्या सवयी याबद्दल ती भरभरून , ओसंडून बोलत होती. वास्तविक या संगीतकाराबद्दल आज फारशी माहिती उपलब्ध नाही. तरीही ही मुलगी त्याच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीबद्दल ना थांबता बोलतच होती. तिच्या डोळ्यातला निळा रंग ढवळल्यासारखा होत होता, तिच्या हातवाऱ्यांची लय किंचित वाढत होती. तिचं लेक्चर ऐकायला या छोट्या हॉल मध्ये मोजकेच लोक होते. त्यामुळे तिचा खर्जाची किनार असलेला पण मऊसर आवाज आमच्यावर जणू जादू करीत होता. याआधीचे बोलणारे संगीतासारख्या रसील्या विषयावर अत्यंत रुक्ष पणे बोलून गेले होते, त्या पार्श्वभूमीवर या मुलीचं असणं, तिचा आवाज , तिचे हातवारे, तिची किंचित आग्रही नजर हे सर्व लक्षवेधी होतं आणि आधीचा कॉन्फरन्सीय कंटाळा त्यानं क्षणार्धात पळून गेला होता. मी अगदी पुढेच बसलो होतो, तिचा आवाज माझ्यावर थेट आदळत होता. या मुलीच्या आवाजाचा धागा पकडून हिच्या जांभळ्या-किरमिजी मनात आपण उतरलो तर तिथे काही अनाकलनीय असं सापडेल असं मला लक्ककन वाटून गेलं.

आता ती त्या संगीतकाराचे फोटो दाखवत होती. युद्धामुळे त्याच्याबद्दलचं पुष्कळ साहित्य नष्ट झालं होतं; काही मोजके कृष्णधवल फोटो,आता उरलेल्या कुटुंबात असलेल्या काही निवडक घरगुती आठवणी, बस्स इतकंच आज बाकी होतं. तरीही त्या निवडक घरगुती आठवणी तिनं इतक्या खुलवून, रंगवून सांगितल्या की जणू ती त्याला भेटली असावी…. किंवा …

तिच्या डोळ्यातल्या निळ्या-हिरव्या रंगांची वर्तुळं उठत होती. मग तिनं एक खूप जुनी, जाडसर अशी फुलस्केप पेक्षा ही किंचित जास्त आकाराची वही काढली. हे त्या संगीतकाराचं एक महत्वाचं काम. यातल्या रचना आता विस्मृतीत गेल्या असल्या तरी त्या फार सुंदर आहेत असं तिनं सांगितलं तेव्हा त्या रचना तिला अगदी पाठच असाव्यात , किंवा ती या रचना जन्मजात घेऊनच आली असावी असा भास होऊ लागला. ही वही नक्की कुठे आणि कशी मिळाली हे एक गुपित असून ते कुणालाच सांगायचं नाहीए , असं स्पष्ट करून आम्हाला दाखवण्यासाठी म्हणून तिनं ती वही फिरवली. जुने कागद , त्यावरची जुनी अक्षरं ,स्टाफ च्या सुरेख लायनी, हस्ताक्षरातल्या काही नोंदी, कागदाचा वास , त्याचा खरखरीत पोत; या सगळ्यावरून हात फिरवताना हे नुसतेच लिहिलेले सूर एकदम कचकन आपल्यात घुसतील अशी हुरहुरयुक्त भीतीच वाटली मला आणि मी ताबडतोब वही शेजारच्या राखाडी कोट वाल्या एका प्रोफेसरांना दिली. वही आमच्या मध्ये फिरत असताना ती मुलगी वरून शांत होती पण आतून तिला कसलासा गुप्त आनंद झाला असावा! आतापर्यंत अखंड चालणारं तिचं बोलणं एकदम थांबलं होतं, आणि ती सर्वांकडेच निरखून पाहत होती. त्या वहीची पानं उलटताना प्रत्येक जण काही ना काही बोलत होताच , कौतुकाचं , विस्मयाचं. ते सर्व ती शांतपणे ऐकत होती . वही फिरून पुन्हा तिच्या कडे आली; तिनं त्या वहीला जणू कुरवाळलं आणि पुन्हा तिच्या टेबलावरच्या बॅग मध्ये ठेवून दिली. मी पहिल्याच बाकावर बसलो होतो. तिने लेक्चर साठी ज्या नोंदी काढून आणल्या होत्या ते कागद टेबल वर होते. माझी त्यावर सहज नजर गेली आणि त्यावरचं अक्षर अगदी ओळखीचं वाटलं , नुकतंच पाहिल्यासारखं; नुकतंच पाहिलं होतं, वहीत.

एव्हाना लेक्चर संपलं होतंच. शेवटचे दोन शब्द सांगते असं म्हणाली.
त्या संगीतकाराच्या मनात ऑपेरा बद्दल अनेक योजना होत्या. पण आजारपणामुळे त्याला त्या पूर्ण करता आल्या नाहीत. त्या योजना मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

सर्वांनी टाळ्या वाजवल्या , हॉल मध्ये ब्रावो ब्रावो घुमू लागलं.
( August2017)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गुड ट्विस्ट्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मस्त!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तो ट्विस्ट जितका द्यायचा प्रयत्न केलाय तितका त्याचा प्रभाव अजिबात जाणवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
ट्विंकल ट्विंकल लिट्टल स्टार, गणपतीबाप्पा सुप्परस्टार