डोक्यात जाणारी व्यक्तिमत्त्वं आणि प्रवृत्ती

ललित

डोक्यात जाणारी व्यक्तिमत्त्वं आणि प्रवृत्ती

- परिकथेतील राजकुमार

सोशल मीडिया हा ताप आहेच पण तिथे वावरणारे काही महाभाग हा तर महाताप आहे. ही माणसे कधी झुक्याच्या नजरेत आली ना, तर तो थेट फेसबुक आणि व्हॉट्सएप बंद करून जगाची जाहीर माफी मागेल हे नक्की. वेळोवेळी अशा प्रवृत्तींना ’ठेचण्याचे’ कार्य आम्ही उदारहस्ते करत असतोच. त्या प्रसंगांचाच गुंफलेला हा (प्र) हार...

गणपती आणि दिवाळीला हमखास मनात येणारा विचार म्हणजे...

आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त.
आजच्या दिवसापुरती ’Facebook Live' ची सेवा कोलमडून पडायला हवी.

आणि पावसाळ्यातल्या सोशल बेडकांचा आनंद तर काही निराळाच. पूर्वी पाऊस पडला, की दर दोन घरे किंवा झाडे सोडून कुत्र्याच्या छत्र्या उगवायच्या, आता कवी आणि चारोळीकार उगवतात, ’माझ्या मनातला पाऊस... ’

मनातच ठेव की तो भोसडीच्या! सगळ्या फेसबुकभर कशाला चिखल करतो? मुळात ह्यांना माणूस म्हणून देखील कोणी ओळखत नसते. पण हे हार न मानता स्वत:च्या नावामागे स्वत:च कवी वैग्रे लावून हिंडत असतात. असेच काही इसम आणि इसम्या स्वत:च्या नावामागे DR वैग्रे लावून हिंडत असतात. खरं सांगू का, हा प्रकार म्हणजे, ते गावाकडे मूळव्याध किंवा कमजोरी का इलाज करणारे स्वत:च्या नावामागे राजवैद्य लावतात ना तसे वाटते.

शेणसडा
आला आला पाऊस
मी जवळ केला कीबोर्ड माऊस
झाल्या सुरू पोटात कळा
काय प्रसवू कांदाभजीचे फोटो का चारोळ्या?
किती हौसेने मी टॅगले लोकांना
वदलो.. या कौतुके कराया
कवी मित्र आले धावून
म्हणती, काय छान फुलवला केवडा..
काही तुच्छ ही आले,
वदले.. अरे हा तर निव्वळ शेणसडा!

फेसबुकवरती विदेशी कल्पनांना भिकारडे देशी रूप देण्याचा प्रयत्न तर बघायलाच नको. उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तकदिंडी!

ह्या प्रकाराखाली जाहिरात करायची असते, की आपण किती सुशिक्षित, साक्षर आहोत.. आपले वाचन, आवडी किती संवेदनशील आहेत इ. इ. ह्यासाठी वापर केला जातो ते आपल्या आवडीच्या दहा पुस्तकांची यादी सार्वजनिक करण्याचा. बरं, ह्यात आपली यादी द्यायची आणि त्यात एखाद्या मित्र मैत्रिणीचे नाव टॅग करून त्याला पण हे चाळे करायला लावायचे. आणि दहा पुस्तकांची यादी दिली की झाले? दहा पुस्तकांनी तुमचे जीवन प्रगल्भ बनवल्यावर मग इतर पुस्तके काय झक मारायला वाचलीत?

मला आजही चंपक, चांदोबा वाचायला आवडतात. पु. लं. चे कुठलेही पुस्तक दिसलं तरी चाळल्याशिवाय राहवत नाही, आणि अगदी हेच 'प्लेबॉय'च्या बाबतीत देखील घडतंच. मग उद्या जर मी आवडती पुस्तके मध्ये एक नंबर 'दुनियादारी', दोन नंबर 'व्यक्ती आणि वल्ली', तीन नंबर 'हैदोसचा २००३ चा दिवाळी अंक', चार नंबरला 'हस्तमैथुन शाप की वरदान? ', पाच नंबरला 'एका तेलीयाने', सहा नंबरला.. अशी यादी प्रामाणिकपणे बनवून टाकली, तर मला खो देणारा स्वत:च धोबीपछाड खाणार नाही का? फिट वैग्रे येऊन पडला कुठे तर मला पाप लागणार नाही का?

मग नंबर असतो गुरुपौर्णिमा, चतुर्थी, एकादशी शुभेच्छांचा.

गुरुपौर्णिमेला लोकांनी प्रामाणिकपणे वंदन करायचे ठरवले, तर सोशल मीडियावरती विजय माल्ल्या, रतन खत्री, वात्स्यायन, नारदमुनी, आनंदीबाई पेशवे, मंथरा, सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी इ. इ. सुंदर सुंदर व्यक्तिमत्त्वांचे फोटो बघायला मिळतील.

काही नार्सिसस स्वत:चाच फोटो टाकून देखील वंदन करतील.

मग नंबर लागतो, ’कित्ती कित्ती छळतात लोक मला.. ’ असे भोकाड पसरणाऱ्यांचा.

फेसबुकवरची एखादी फ्रेंड रिक्वेस्ट लोकं नक्की काय मापदंड लावून स्वीकारतात? सगळ्याच नाही पण काही लोकांच्या बुद्धिचातुर्याविषयी मला खरंच आजकाल शंका यायला लागली आहे. एखाद्या कट्टर विचारसरणीचे, पक्षाचे किंवा विशेषत: प्रौढ स्त्रिया यांची रोजची रडगाणी, ती पण पन्नास पन्नास लोकांना टॅग करून गायलेली पाहिली की वैतागच येतो.

"किती लोचट लोकं असतात? उत्तर दिले नाही तरी पन्नास वेळा मेसेज करतात. किळसच वाटते बै! " अमकी तमकी विथ प्रसाद ताम्हनकर आणि पाच इतर.

आता कोणा पन्नाशीच्या बाईने अशी पोस्ट टाकली तर वाचणाऱ्यांपैकी काही मतिमंदाचा असा समज होणार नाही का, की हा ताम्हनकर आणि इतर पाच पांडव या बाईला छळून राहिलेत. तुमचा उद्वेग समजू शकतो, पण त्यात आम्हाला कशाला हिस्सेदार करता? वाल्या कोळी साल्या...

"काही फालतू आणि बेअक्कल डुकरांना पुन्हा समज देतोय. तुमची फलाणा फलाणा पक्ष / नेता ह्या विषयीची मते तुमच्यापाशीच ठेवा. माझ्या वॉलवरती येऊन ओकाऱ्या काढू नयेत. " अमका तमका विथ प्रसाद ताम्हनकर आणि इतर सोळाजण.

"फ्रेंडलिस्ट मधली घाण साफ करायला सुरुवात केली आहे. सावध... " फलाणा ढिमका विथ प्रसाद ताम्हनकर आणि पाचपन्नास इतर.

ह्या सगळ्याच पोस्टमध्ये मी टॅग असतो असे नाही, पण जे होतात त्यांचं दु:ख वेगळं नसावं. अरे का टॅग करता बाबा? ह्यातल्या कित्येकांची तर कधी प्रोफाइल देखील उघडून बघायचा महिनोंमहिने योग आलेला नसतो. ही लोकं अशी दवंडी पिटून पिटून आपलीच अब्रू चव्हाट्यावरती का मांडतात? तुमच्या मित्रयादीत किती मजनू आहेत, किती धर्मरक्षक आहेत, किती ओकाऱ्या काढणारे आहेत ह्याची माहिती आम्ही विचारली आहे का? तुमच्याच घरात, तुम्हीच आणलेला कचरा आहे ना? मग साफ करा आणि गप्प बसा की.

वैयक्तिक टीका वाईटच, पण तरी खरंच सांगतो, पन्नाशी उलटलेल्या आणि बिना मेकअप चेटकिणीचा रोल ऑफर होऊ शकेल अशा बाया, रोज उठून कोण तरी नवीन त्यांना इश्कबाजीचे मेसेज पाठवतोय, किंवा फोन नंबर मागतोय अशा 'लडिवाळ' तक्रारी जाहीरपणे करायला लागल्या, की एकतर ह्यांना म्हातारचळ लागलाय किंवा ह्याच्या मित्रयादीत बरेचशे मोतीबिंदू रुग्ण आहेत ह्याची खात्री पटते. बरं, ह्यांना नावे जाहीर करा, स्क्रीनशॉट टाका, सहन करू नका.. कायदेशीर तक्रार करा असे सुचवले रे सुचवले की लगेच "बघू.. आता सकाळपासून काही मेसेज नाही. " किंवा "हो, विचार चालू आहे, मिस्टरांशी बोलते. " असली कारणे देऊन पसार. ज्या ताया-माया-आज्यांना खरंच त्रास होतो ना, त्या तर अशा त्रास देणाऱ्यांची सरळ अब्रू काढून मोकळ्या होताना दिसतात. मी असं म्हणत नाही, की ह्या बायांना त्रास होतच नसेल, पण मग उगाच मित्र यादीतल्या सगळ्यांविषयीच संशयाचे वातावरण कशाला निर्माण करायचं? तुम्हाला काही प्रतिकार करायचाच नसेल, तर निदान डिलिट / ब्लॉक करून टाका की अशा इसमाला.

'पऱ्या तुला ना कोणाचेच कौतुक नाही' असा आरोप नको, म्हणून जाता जाता मला कोणाकोणाचे कौतुक आहे त्याची एक यादी :

१) वल्हीसारखे दोन्ही पाय गाडीच्या बाजूला लोंबकळत दुचाकी चालवणाऱ्या बायकांचे, रस्त्यातच एकदम गाडी लावत आजूबाजूला अशी कावळ्यासारखी मान वळवत पत्ता शोधणाऱ्या पुरुषांचं, विन डिझेल आपला शिष्य असल्याच्या थाटात वेगाने गाड्या हाकणाऱ्या तरुणाईचं.
२) पानी-पानी-पानी, आयपीएलची तुतारी, टिकटिक वाजते डोक्यात असले रिंगटोन ठेवणाऱ्यांचं.
३) स्वत:च्या पोस्टला लाइक करणाऱ्यांचं, 'आई-वडिल गेल्याची' पोस्ट टाकणाऱ्या साठपासष्ट वयाच्या नववृद्धांना 'अरे ते कुठे नाही गेले, इथेच आहेत.. आपल्यात. तुझ्याकडे बघतायत' असले खुळचट आणि बालिश रिप्लाय देणाऱ्यांचं. अत्यंत टुकार भिकार फोटो काढून गौतम राजाध्यक्षांच्या थाटात ते फेसबुकवर टाकणाऱ्यांचं आणि त्या फोटोवर त्याला साजेशीच स्वत:ची भिकार चारोळी प्रतिसाद म्हणून देणाऱ्यांचं.
४) खिडकीतल्या फुटक्या कुंडीतल्या छाडमाड फुलाचं ते सुवर्णकमळ असल्यागत कौतुक करणाऱ्यांचं, गाढवापासून कावळ्यांपर्यंतचे फोटो भीषण भीषण कॅप्शन्ससह टाकणाऱ्यांचं, रोमिओ ज्युलिएटनंतर किंवा कदाचित त्याआधीचे आपणच अशा थाटात हनीमूनचे फोटो टाकणाऱ्यांचं.
५) राखी सावंत, पूनम पांडेंच्या पेजला लाइक करणाऱ्यांचं, साईबाबा-हनुमानाचे 'ओरिजिनल' फोटो शेअर करणाऱ्यांचं.
६) 'श्री-जान्हवीच्या लग्नाला यायचे हां! ' किंवा 'रोडीज न्यू सीझन ऑसम' सारखे स्टेटस टाकणाऱ्यांचे.
७) मराठी चित्रपट आज कोटीच्या घरात यश खेचून आणतोय ह्याचे कौतुक करून, शेवटी 'चित्रपटाचे टोरेंट कुठे मिळेल? ' विचारणाऱ्यांचं.
८) सल्लागाराच्या वेषात संपादक म्हणून वावरणाऱ्यांचं, आणि आंतरजालावरील जुन्या दिवसांच्या आठवणीने उगाचच उसासे टाकत बसणाऱ्यांचं.
९) सावरकर जयंतीला गांधींचे गोडवे गाणाऱ्यांचं आणि ड्रायडेला त्याच गांधींना शिव्या घालणाऱ्यांचं.
१०) 'तुम्ही मला फ़्रेंड रीक्वेस्ट पाठवली आहेत, पण तुम्ही मला ओळखता का नक्की? ' ह्या प्रश्नाला 'तुमच्याकडच्या मित्र यादीत माझे पण तीन मित्र आहेत' असे उत्तर देणाऱ्यांचं.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet