तुटलेला कान , ऍबसिन्थ , थिओ , कॅनव्हास , वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट !

तुटलेला कान , ऍबसिन्थ , थिओ , कॅनव्हास , वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट !

नव्वद च्या दशकात पुण्यातल्या अनेक रद्दीच्या दुकानांमध्ये भटकून नवी-जुनी (जास्तकरून जुनीच ) पुस्तकं शोधत बसण्याची सवय लागली होतीच. रद्दीची दुकानं ( एखाद दुसरं सोडल्यास ) ही अजिबातच ऑर्गनाइज्ड नव्हती. इंजिनीअरिंग , इकॉनॉमिक्स , इतिहास , कला अशा सर्व प्रकारच्या विषयांची पुस्तकं कशीही अस्ताव्यस्त ठेवलेली असत. त्यामुळे या जंजाळातून आपल्याला हवं असणारं संगीताचं , चित्रकलेचं, नाटकाचं पुस्तक शोधून काढावं लागे. मासा गळाला लागण्यासाठी जशी वाट पाहावी लागते तशी हवं ते पुस्तक हाती येण्यासाठी वाट पाहावी लगे. नंतरचा एपिसोड म्हणजे भावात घासाघीस! आणि नंतर खुश होऊन हीरो सायकलला टांग मारून घरी ! या रद्दी-दुकान वारी मध्ये जी अनमोल रत्नं हाती आली त्यात कधीतरी - द ग्रेट आर्टिस्ट्स - या सिरीज ची पुस्तकं ही सापडली. साधारण पणे 2५ रु पासून याची किंमत सुरु होत असे. इटालियन , जर्मन , इंग्लिश , डच अशा अनेक युरोपियन चित्रकारांनी वेगवेगळ्या शतकात अनेकविध इझम मध्ये केलेली महान आणि महत्वपूर्ण चित्रं, शिल्पं याची अप्रतिम ओळख ही पुस्तकं करून देत असत. पुस्तकांची छपाई, त्यांचं डिझाईन अप्रतिम होतंच , पण चित्रांचं , शिल्पांचं रसग्रहण करण्याची खास पद्धत, त्यातले काही भाग क्लोज अप सारखे दाखवून त्याचा इतिहास , त्याची अधिक बैजवार माहिती देऊन ही पुस्तकं एखाद्या ऑक्टोपस सारखी बांधून ठेवत असत. अल्ब्रेख्त डयूरर या जर्मन चित्रकाराचं पुस्तक मी सर्वात आधी घेतलं होतं आणि त्यातल्या सेल्फ पोर्ट्रेट च्या अभ्यासावरून काही स्केचेस करण्याचा प्रयत्न केला होता. मग हळू हळू यात अनेक चित्रकार येत गेले आणि होता होता कधीतरी व्हिन्सेंट ची वर्णी लागलीच आणि त्याच्या स्टारी नाईट च्या चमकणाऱ्या ताऱ्यांभोवतीच्या जाडसर , वर्तुळाकार रेघांनी मला कधी आपल्यात खेचून घेतलं ते समजलं नाही. या वारी मध्ये नंतर किरण भुजबळ , प्रवीण भोळे असे अनेक मित्र सामील होत गेले;त्यात काही स्वतः चित्रकार होते , तर काही चित्रकलेचे रसिक. मग आम्ही कधी सामूहिक पद्धतीनं ग्रेट आर्टिस्ट विकत घेऊ लागलो , तर कधी सामूहिक पद्धतीनं वाचू लागलो, त्यावर चर्चा करू लागलो. आमच्या उच्चारांमध्ये वन गॉ , वॅन गॉख , व्हॅन गॉघ अशी व्हरायटी असली तरी त्याच्या ग्रेट असण्याबद्दल आमच्यात एकमत होतंच आणि मुख्य म्हणजे आम्हा सर्वांचं त्यावर खूप प्रेम होतं , आजही आहे. व्हिन्सेंट , पॉल गोगँ, त्यांच्यातली भांडणं , आबसिंथ ची व्यसनं या कहाण्या वाचायला भारी वाटत होत्या. व्हिन्सेंट नंतर ही अनेक रूपांनी भेटत राहिला , कधी त्याची, त्याच्या शैलीची खराब कॉपी करणाऱ्या चित्रकारांमुळे देखील. माधुरी पुरंदरे यांनी “व्हिन्सेंट” मराठी भाषेत आणून आमची फार सोय करून ठेवली. या पुस्तकामुळे त्या काळातल्या पॅरिस मधील कला क्षेत्रातल्या घडामोडी जवळून पाहायला मिळाल्या , अनेक ज्ञात-अज्ञात कलाकारांची नावं समजली, त्यातले प्रयोग , त्यांच्या संबंधातलं नाट्य , त्यातले पेच दिसू लागले. कधी कवितेतून ही व्हिन्सेंट भेटत गेला. मग एखाद दुसरे इंग्लिश पिक्चर पण पहिले , पण ते थोडे बोर झाले, म्हणजे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. २००१ मध्ये ऍमस्टरडॅम ला जायचा योग आला आणि दिवसभर वन गॉग म्यूजियम मध्ये काढला. त्यावेळी मी एकटाच होतो , म्हणायला अमित धरवाडकर आणि अजून कोणीतरी होतं , ते दुसरं एक म्युझियम पहायला गेले, मी निवांत एकटाच वन गॉग चे कॅनवास डोळ्यात भरून घेत होतो , खायचं प्यायचं भानच नव्हतं. तिथून च काही कॅलेंडर विकत घेतली होती व्हिन्सेंट प्रेमी मित्रांसाठी. अर्थात या ट्रिप मध्ये व्हिन्सेंट चा काय अनेक इतर चित्रकार अनेक नव्या शैली पाहायला मिळाल्या , तरीही माझ्यासाठी गाण्यात कुमार आणि चित्रकलेत व्हिन्सेंट नंबर एक वर होतेच.

दोन आठवड्यांपूर्वी बायको म्हणाली, आज संध्याकाळी पिक्चर ला जाऊया. मी लगेच ओळखलं “तवूय व्हिन्सेंट” पाहायला जायचंय. पण मुलांसोबत ? आमची मुलं ( दोघेही) साडेआठ वर्षांची आहेत. एकुणातच आम्ही नाटकं आणि संगीताच्या कन्सर्ट ज्या नेमाने पाहतो त्या नेमाने आणि आवडीने चित्रपट पाहत नाही. बायकोने आणि मी मिळून आजवरच्या दहा वर्षांत दहा पिक्चर देखील किनो मध्ये जाऊन पाहिलेले नाहीत. पण व्हिन्सेंट पाहायला हवाच ! आमच्या घराजवळ लेख ( मला ब्रह्मज्ञान झालं तरी या पोलिश ch चा उच्चार [ह की ख की दोन्ही च्या मधला ??] लिहायला जमायचं नाही ) स्टेडियम आहे आणि त्याजवळच एक छोटेखानी थिएटर आहे. ३०-३५ शिटा बसत असतील, छोटी सिंगल स्क्रीन आहे. तिकीट ही बऱ्यापैकी स्वस्त, पुन्हा इथे फालतू पॉप कॉर्न वगैरे ची लफडी नाहीत. पिक्चर पाहिला आणि व्हिन्सेंट बरोबरचा माझा प्रवास आपोपाप आठवला.

शीर्षक : या चित्रपटाचं इंग्लिश नाव आहे - लविंग व्हिन्सेंट , यात काही अर्थछटा येऊ शकतात. प्रेम करणारा ( अर्थात चित्रकलेवर प्रेम करणारा) व्हिन्सेंट , आणि जिरंड च्या अर्थाने - व्हिन्सेंट वर प्रेम करता करता. दोन्ही छटा सुरेख आहेत आणि योग्य ही कारण दोरोता कोबीएला या दिग्दर्शिकेने व्हिन्सेंट च्या आणि पेंटिंग च्या प्रेमाखातर हा चित्रपट बनवला आहे. आम्ही अर्थातच याची पोलिश आवृत्ती पहिली , याचं पोलिश नाव आहे - Twój Wincent- अर्थात तुझा व्हिन्सेंट. म्हणजे एक तर हे व्हिन्सेंट च्या बाजूने ही प्रत्येक प्रेक्षकांसाठी असू शकतं आणि दिग्दर्शिकेच्या बाजू ने ही. अर्थात थिओ ला पाठवलेल्या अनेक पत्रांचा शेवट तुझा व्हिन्सेंट असाच आहे. शीर्षक हे कलाकृती कडे , कवितेकडे, कथेकडे निरनिराळ्या प्रकारे इंगित करू शकतं, कधी त्याकडे पाहण्याची दृष्टी देऊ शकतं.

आमच्या पोलिश घरात मुलांनी , खासकरून रॉय ने काढलेली चित्र आहेतच, पण व्हिन्सेंट च्या चित्रांच्या कॉपी सगळीकडे आहेत, त्यामुळे व्हिन्सेंट वन गॉग हे नाव आमच्या मुलांना नवीन नाही आणि हा चित्रपट आमच्या या साडेआठ वर्षाच्या मुलांना दाखवला हे बरंच झालं, आमची मुलं माझ्या यात्रेत सामील झाली असं आपलं मला तरी वाटलं. आधुनिक तंत्रज्ञान, पेंटिंग वरील प्रेम आणि आठ वर्षांची अथक मेहनत यातून ही ८० मिनिटांची अत्यंत चित्तवेधक कलाकृती तयार झाली आहे. चित्रपट म्हणजे हलती चित्रे अशी व्याख्या हा चित्रपट वेगळ्या अर्थाने सार्थ ठरवतो. अर्थात कथेने माझी थोडी निराशा केली. हा चित्रपट म्हणजे एखादा गुन्हेगारी पट असावा अशीच याच्या कथेची रचना आहे. व्हिन्सेंट च्या रहस्यमय मृत्यूचा छडा लावताना , त्याच्या आजूबाजूच्या लोकांचे त्याच्याशी , एकमेकांशी, थिओ शी , चित्रांशी असलेले संबंध यातून उलगडत जातात. पण माझी मुख्य निराशा अशी की यात पॉल गोगँ येतच नाही , म्हणजे अगदीच एका फ्रेम मध्ये नावाला येऊन जातो Sad मला यात पाहायचे होते पॉल गोगँ, वेशेनब्रुख, माने असे चित्रकार, पॅरिस मधलं त्याकाळी असलेलं वातावरण, त्यात व्हिन्सेंट ची होणारी घुसमट , त्याचा स्वतःचा शोध. सुरुवातीला जुन्या चित्रकारांची कॉपी करणाऱ्या व्हिन्सेंट ला स्वतःच्या रेषेचा साक्षात्कार कसा आणि कधी होतो हे रहस्य आणखी महत्वाचं रहस्य आहे, कारण या साक्षात्कारावरच त्याचा पुढचा सर्व प्रवास आधारित आहे. अर्थात या चित्रकाराच्या उण्यापुऱ्या दहा वर्षाच्या वादळी आयुष्याला पकडायचं तर सात आठ तासाचा तरी पिक्चर काढावा लागेल बहुधा ! तरीही आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीला अनुसरून आजच्या माणसाला त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचा आणि तत्कालीन चित्रकलेचा प्रवास दाखवायला हवा, जेणेकरून त्याला आजच्या आपल्या भवतालच्या आणि त्यात चित्रकलेला असलेल्या स्थानाची व्यवस्थित जण येईल आणि त्यासाठी चित्रपट हे माध्यम फार उत्तम काम करू शकतं; पण या चित्रपटाने मात्र ही संधी घालवली असं मला दुर्दैवाने जाणवतं. पिक्चर संपवून आम्ही सर्व निवांत चालत घरी येत होतो. येताना मुलं पिक्चर बद्दल भारावून बोलत होतीच पण एकूणातच व्हिन्सेंट चा मृत्यू नक्की कसा झाला हा त्यांच्या गप्पांचा मुख्य विषय होता. याचं मला जरा वाईट वाटलं इतकंच. आज साडेआठ वर्ष वयातच या मुलांना इतक्या भारी गोष्टी पाहायला मिळताहेत तर त्यांचा पुढचा प्रवास नक्की कसा असेल, ते चित्रांवर ,चित्रकलेवर कशा प्रकारे प्रेम करतील, त्यात माझा काय रोल असेल , असेल की नसेल याची उत्सुकता , भीती , उत्कंठा माझ्या मनात कायम आहे.

घरी आल्यावर दिग्दर्शिका दोरोता कोबीएला यांचे काही इंटरव्यू वाचले त्यातून काही मजेदार माहिती मिळाली. पेंटिंग मध्ये शिक्षण घेऊन पेंटिंग वर अत्यंत प्रेम करणारी ही बाई नंतर रोजीरोटी च्या निमित्ताने फिल्म शी निगडित कामे करू लागली. काही वर्षे काम केल्यानंतर पेंटिंग पासून दूर गेल्यासारखं , हरवून गेल्यासारखं वाटू लागलं, आणि फिल्म आणि पेंटिंग एकत्र आणून काही करता येईल का अशा विचारातून या चित्रपटाच्या कथेचा , कन्सेप्ट चा जन्म झाला. दिग्दर्शिकेचं म्हणणं आहे की व्हिन्सेंट ची चित्रं ही आपल्याला थेट त्याच्या भाव विश्वात घेऊन जातात. शंभर हुन अधिक चित्रकारांच्या, ग्राफिक डिझाइनर च्या टीम ला घेऊन अशी कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शिकेचं , निर्मात्यांचं आणि यात सहभागी झालेल्या सर्व लोकांचं खूप अभिनंदन!

मी सोळा सतरा वर्षांचा असताना व्हिन्सेंट मला भेटला, आज इतक्या वर्षांनी ही त्याने माझी पाठ सोडलेली नाही. इथे गेली दहा वर्षे मी अनेक नवे जुने चित्रकार पहिले , त्यातले अनेक माझे आवडते आहेत देखील , तरीही व्हिन्सेंट साठी एक स्पेशल जागा आहे, ती कोणी घेऊ शकेल असं वाटत नाही. चित्रकलेचे आजचे प्रवाह फार निराळे आहेत , एकुणातच दृश्य हे पूर्वीपेक्षा फार सोपं, अस्थिर , बदलणारं, कधी अंगावर येणारं झालं आहे, त्यात शोधाचा सत्याचा अंश असेलच असं सांगता येत नाही. निसर्गदत्त महाराज की रामकृष्ण परमहंस अशा कोणा फार पोहोचलेल्या मनुष्याने साधने बद्दल सांगितलं आहे की आजूबाजूची परिस्थिती कितीही विषम असली तरी स्वतःची श्रद्धा न सोडणारा मनुष्य उत्तम साधक असतो. व्हिन्सेंट च्या बाबतीत मला हेच वाटतं, आजूबाजूची इतकी हलती दृश्य मला भुरळ घालत नाहीत. एकेकाळी ठार वेडा ठरवलेल्या या चित्रकाराच्या रेघा आजच्या वेडेपणाचे ही पलीकडे गेलेल्या दृश्य व्यवहाराच्या भानगडी तुन मला वाचवू शकतात . व्हिन्सेंट च्या स्टारी नाईट मधल्या चांदण्याभोवतीच्या किंचित जाडसर वर्तुळांनी कधीच खेचून घेतलंय मला.- 04.11.2017

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काय छान लिहिलंय! हा चित्रपट पाहतो आता.

बादवे मला माधुरी पुरंदऱ्यांचं 'व्हिन्सेंट' एका रद्दीच्या दुकानातच मिळालं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
बॉईस प्लेड वेल.

"बादवे मला माधुरी पुरंदऱ्यांचं 'व्हिन्सेंट' एका रद्दीच्या दुकानातच मिळालं होतं"...:) समानशीले व्यसनेषु ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

तुमच्यासाठी भेट -
https://www.youtube.com/watch?v=4dKy7HNU4vk

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच मस्त Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

ते पुरंदरेंचं पुस्तक वाचलय. मला लहानपणी बाबांनी मायकेल एंजेलो दाखवलेला. '६६.
लेख आवडला.
क्रॅनॅक, ड्युरर च्या डॅाक्यु dw tv( बय्राच दाखवतात) चानेलच्या युट्युबवर आहेतच. पिकासोचं चरित्रही वाचलय.
लिहित राहा. मायबोलीवर एक चित्रगुप्त चित्रांविषयी लिहितात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला आहे. मी नेटफ्लिक्सवरती शोधला पण सिनेमा नाही सापडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरीच नवीन माहिती मिळाली. धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0