एक कागद

एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ।। धृ ।।

एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।

उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।

वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।

इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।

गगन ठेंगणे खुणवी तारे
मांजा परी तो रोखुनी धरे
दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।।

उंच उंच तो जातच राही
स्वानंदी मग तल्लीन होई
कासावीस ते बालक धावे, कैसे कळणे त्याला ।। ६ ।।

सोसाट्याचा सुटला वारा
कधीच मुकला परी आधारा
भरकटलेला गोंधळलेला, लटके बाभळीला ।। ७ ।।

धावत धावत बालक येई
अलगद त्यासी कवेत घेई
घाव पुसुनि तया मनीचे, सज्ज करी उडण्याला ।। ८ ।।

उंची कितीही गाठो कोणी
बाहुबली वा अगाध ज्ञानी
मातीशी या नाळ तोडुनी, सफल न कोणी झाला ।। ९ ।।

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला...
कागदाचे आत्मचरीत्र

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

अर्थात शेवटच्या कडव्यावरून हे तुमच्या लक्षात आले असेलच. माणसाला कागदाचे रूपक दिले आहे. खाली थोडे विस्तारित रसग्रहण देत आहे. ( कवी ला स्वतःची कविता स्वतःच रसग्रहित करून दुसऱ्यांसमोर आणायची वेळ येते यावरून कवी काय लायकीचा आहे हे लक्षात येईल - कस्पट Smile , त्यामुळे हे रूपक जर तुमच्या लक्षात आले नसेल तर त्यात तुमची काही चूक नाही, तो माझ्या कवितेचा कमीपणा आहे. )

एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ।। धृ ।।
(रूपक => कागद: माणूस , बालक: आप्त - मुख्यत्वे आई वडील आणि काही प्रमाणात गुरुजन, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीणी )

एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।

( माणूस हा जन्मतःच ओबडधोबड असतो. बाकी प्राण्यांप्रमाणेच तोही एक प्राणी असतो. परंतु आईवडील, गुरुजन, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीणी, समाज, संस्कृती या सगळ्या गोष्टी त्याला आकार देऊन घडवत असतात. एका कस्पटाचे विमानात रूपांतर करतात. )

उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।

( माणसाने जरा कोणती गोष्ट साध्य केली कि त्याला वाटायला लागते कि आपण कोणीतरी खास आहोत, बाकीच्यांपेक्षा वेगळे आहोत. आपण ज्या ठिकाणहून आलो आहोत, ज्या लोकांमधून आलो आहोत ते खालच्या दर्जाचे आणि आपण दैवी देणगी लाभलेले असा समज व्हायला लागतो. फक्त आपल्यालाच हे पंख, उडण्याची शक्ती आणि कला लाभली आहे असे वाटायला लागते)

वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।

( थोडी प्रगती केल्यावर आणि आपण कोणीतरी खास आहोत असा समाज झाल्यावर, मग माणसाला अजून जास्त प्रगती करावीशी वाटते. वेगवेगळी शिखरे पादाक्रांत करावीशी वाटतात. प्रत्येक आईवडिलांनाही आपल्या मुलाने अजून मोठे व्हावे असे वाटत असते. त्यांनाही वाटत असते कि आपले मूल खूप बुद्धिमान आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार करून ते त्याला जीवनात सफल होण्यासाठी तयार करतात. विद्या, आत्मविश्वास, जिद्ध अशा विविध संस्कारांचा कणा देऊन आणखी उंच उडू शकणाऱ्या सुंदर पतंगामध्ये त्याचे रूपांतर करतात. )

इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।

( बऱ्याचदा प्रगती करता करता माणूस इतकी उंची गाठतो कि नकळत दोघांमध्ये खूप अंतर तयार होतं. वेगवेगळ्या परिस्थिमधून गेल्यामुळे विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या होतात, आयुष्यातली प्राधान्ये बदलतात, इच्छा/अपेक्षा यामध्ये तफावत निर्माण होते. आणि मग असं वाटायला लागतं कि आपण कितीही प्रयत्न केला तरी आपला आवाज समोरच्या व्यक्ती पर्येंत पोहचतच नाहीये. आपल्याला नेमकं काय म्हणायचंय ते त्याला कळतच नाहीये. आईवडील मात्र आपल्या मुलाने आणखी प्रगती करावी म्हणून शक्य तेवढे बळ देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु परिस्थितीमुळे, किंवा त्या-त्या क्षेत्राची माहिती नसल्यामुळे किंवा संबंधित अनुभवांची कमतरता असल्यामुळे किंवा इतर काही कारणास्तव त्यांच्या प्रयत्नांना एक सीमा असते. त्यांचा मांजा अपुरा पडतो, संपून जातो. )

गगन ठेंगणे खुणवी तारे
मांजा परी तो रोखुनी धरे
दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।।

( कितीही प्रगती केली तरी नेहमी त्याच्याहि पुढची गोष्ट खुणावत असते. बऱ्याचदा असे वाटायला लागते कि आपली माणसे, त्यांचे विचार, आपल्या श्रद्धा, संस्कृती किंवा संस्कार हे आपल्या प्रगतीच्या आड येतायत. पुढे जायचे असेल तर ते सोडणे आवश्यक आहे असे वाटायला लागते आणि त्यातूनच या सगळ्या गोष्टींची नाळ तुटते. )

उंच उंच तो जातच राही
स्वानंदी मग तल्लीन होई
कासावीस ते बालक धावे, कैसे कळणे त्याला ।। ६ ।।

( सगळे पाश तोडल्यानंतर प्रगतीचे मार्ग सुकर झाल्यासारखे वाटतात. एका पाठोपाठ शिखरे पादाक्रांत होतायत असे वाटायला लागते. पण या सगळ्या अनाकलनीय गोष्टी आप्तांना कशा कळणार? त्यांचा जीव कासावीस होतो, तळमळून जातो. परंतु आपल्याच विश्वात रममाण होणाऱ्या, आपली सुखे आणि स्वत्वामध्ये मश्गुल होणाऱ्या त्या उंचीवरच्या माणसाला जमीनवरची ही घालमेल कशी दिसावी आणि कशी समजावी?)

सोसाट्याचा सुटला वारा
कधीच मुकला परी आधारा
भरकटलेला गोंधळलेला, लटके बाभळीला ।। ७ ।।

( प्रत्येकाच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग येतात, अपयश येतं. सगळे फासे उलटे पडताहेत असे वाटायला लागते. अशा वेळी गरज असते ती आपल्या माणसांच्या आधाराची. त्यांनी मायने पाठीवरून हात फिरवण्याची. पण असा आधार जर आधीच तोडला असेल तर माणूस कोलमडून जातो, मोडून जातो. बाभळीचे काटे टोचून पतंग ठिकठिकाणी फाटल्यावर जसा उडायची क्षमता गमावतो, अगदी तसे होऊन जाते.)

धावत धावत बालक येई
अलगद त्यासी कवेत घेई
घाव पुसुनि तया मनीचे, सज्ज करी उडण्याला ।। ८ ।।
( अशा कठीण प्रसंगी आपले लोक, जे आपल्यावर निःस्पृह प्रेम करतात ते न बोलावता मदतीला धावून येतात. आपल्या मनावरच्या जखमा पुसून नवी उमेद आणतात. गमावलेला आत्मविश्वास जागा करून पुन्हा नव्याने डाव मांडायला सज्ज करतात)

उंची कितीही गाठो कोणी
बाहुबली वा अगाध ज्ञानी
मातीशी या नाळ तोडुनी, सफल न कोणी झाला ।। ९ ।।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविनी कविता अशी विस्कटुन समजावुन सांगणे फार्फार आवडले. नाहीतर बऱ्याच कविता खुद्द कविला तरी समजल्या आहेत का अशी शंका येते, ह्या केस मधे कमीतकमी असे तरी म्हणता येणार नाही.

चिंजं, ऐसीवर असा नियमच केला पाहिजे ना की कविता धाग्यावर टाकायची असेल तर विवेचना सकटच टाकायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विस्तारित अनुवाद तुम्हाला आवडला हे वाचून बरे वाटले. खरे तर कावीला कविता समजावून सांगावी लागते हे कवीचे अपयश आहे असे माझे (वैयक्तिक) मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता सुंदर आहे.

खरे तर कावीला कविता समजावून सांगावी लागते हे कवीचे अपयश आहे असे माझे (वैयक्तिक) मत आहे.

याच्याशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

सैराट भाऊ, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. तुमचे आणखी काही प्रतिसाद पाहून, एकंदरीतच तुम्हाला कवितांची आवड आहे असे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कवीच समजाऊन सांगत असल्यास??? वाचणारे...???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

वाचणारे हे त्यांच्या जागी योग्यच असतात. कवी स्वतःचे विचार, कल्पना, भावना कवीता रूपे दुसऱ्यांसमोर आणू इच्छित असतो त्यामुळे साध्या, सरळ आणि सहजपणे आकलन होणाऱ्या कविता वाचकांपुढे आणणे ही कवीची जबाबदारी ठरते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. प्रत्येक कवीचे मत आणि कविता करण्यामागचे कारण वेगळे असू शकेल. अवघड, बोजड आणि सर्वसामान्यांना अगम्य वाटणारे शब्द वापरण्यात धन्यता मानणारे कवी सुद्धा आहेत आणि तशाच प्रकारच्या कविता आवडणारे रसिक सुद्धा आहेत. (अर्थात म्हणून ते श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाहीत. हा बऱ्याच अंशी वैयक्तिक आवडीचा आणि प्राधान्याचा प्रश्न आहे.)

एकूण काय कि माझ्या मते कवीला कविता समजावून सांगत लागावी असेल तर ती फक्त कवीची हार आहे. त्यात वाचकाचा काही दोष नाही. रसिक श्रेष्ठच आहे. (रसिका शिवाय कवितेला काय अर्थ उरतो ? अशी कविता मग फक्त कवीच्या वैयक्तिक पातळीवरच राहते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

mastach!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिलिंदराव, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0