सांग सांग भोलानाथ..

शंभर -दीडशे वर्षापूर्वीच्या काही पुस्तकात किंवा त्याकाळच्या नियतकालिकात वर्णन केलेली सामाजिक परिस्थिती, रीती-रिवाज, रूढी-परंपरा किंवा एकूणच विचार करण्याची पद्धत इत्यादीबद्दल वाचत असताना, काही अपवाद वगळता, त्या कालखंडातील आपले पूर्वज किती राक्षसीवृत्तीचे होते असे अनेकदा वाटू लागते. सती प्रथेचे समर्थन, रखेल ठेवण्याची फॅशन, विधवा स्त्रियांचे केशवपन, विधवेवर होणारे जुलूम-अत्याचार, वेठबिगारी, श्रीमंतांचे दुर्वर्तन, सावकारीचा पाश, भाऊबंदकी, घराणेशाही, जीव घेणारे मानापमानांचे मापदंड, उच्चवर्णीयांची अरेरावी, जातीव्यवस्थेतून लादलेली गुलामगिरी, शेतकऱ्यावर उगारलेले आसूड, बालविवाह, जरठविवाह, बहुपत्नित्वाची हाव, स्त्री-शूद्र यांना शिक्षणाचे दरवाजे बंद, सोवळे-ओवळे यांचा अतिरेक, जुलूम-अत्याचार-बलात्कारांना मिळत असलेले अभय, लुच्चेगिरी, भामटेगिरी, इ.इ. गोष्टी माणूस म्हणून सामान्य कसे काय सहन करत होते? अगतिकतेचा, अज्ञानाचा फायदा घेणाऱ्यात सहानुभूतीचा थोडा तरी अंश होता की नाही? थोडासा तरी कळवळा, करुणा शिल्लक होती की नाही? एकूण एक सगळे एवढे स्वार्थी कसे काय होते? माणुसकी नावाची काही चीज होती की नाही? का सर्व जण मनोविकृत (सायकोपाथ) होते? असले प्रश्न विचारावेसे वाटतात.

मासलेवाईक उदाहरणच द्यायचे असल्यास विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात प्रसिद्ध झालेल्या त्रिंबक नारायण अत्रे यांच्या गावगाडा या पुस्तकातील पेशवाई अखेरची खानदेशातील स्थिती संबंधीचा खालील परिच्छेदाचा देता येईल:
अगदी साध्या गोष्टीतसुद्धा खरे काय आहे हे लोकांच्या तोंडून काढून घेण्यास यातायात पडते. लौकर दाद मिळवण्याच्या आशेने ते नेहमीच राईचा पर्वत करतात. लांचलुचपती व एकमेकाशी अन्यायाचे वर्तन ह्यांचे प्रमाण इतके वाढले होते की ते सांगू गेल्यास कोणी खरेसुद्धा मानणार नाही. धाकटे घराण्यात अवश्य तितकी धूर्तता आणि रोकड मात्र पाहिजे की त्यानी वडील घराण्याच्या तोंडाला पाने पुसून त्याची मालमत्ता सरकारांतून आपल्याकडे ओढलीच समजा. त्यामुळे जिकडे तिकडे गृहकलहाचा वणवा पेटून सरकारी दप्तरातसुद्धा बनावट दस्तैवज घुसले. आणि अस्सल खरे दस्तैवज मिळविण्यासाठी मारामारी व ठोकाठोकी माजून राहिली. शेतकऱ्यांच्या अनाथ स्थितीला तोड उरली नाही असे झाले. मामलेदार, लष्करी लोक, सावकार, पाटील-कुळकर्णी, देशमुख-देशपांडे, ह्यांना मात्र अकरावा (भरभराटीचा काळ) आला. दुर्बल प्रबलांच्या झगड्यात लबाडी आणि कावेबाजपणा हीच काय ती हत्यारे दुर्बलाला कामास येतात. लोक जात्या लुच्चे किंवा पापपुण्याला न मानणारे असतात असे नाही. पण जुलमांतून कसेबसे निसटून जाण्याला त्यांना असत्याचा अवलंब करणे प्राप्त होते.

ज्ञानप्रसारकच्या जानेवारी, 1852च्या अंकात, स्त्रीशिक्षणामुळे होणाऱ्या ‘ दुष्परिणामां’ ची यादीच एका पत्रलेखकाने दिली आहे.
• अती विद्येने स्त्रिया व्यभिचारी होतील.
• स्त्रियांस सोडचिठ्ठी द्यावयाची असेल तरच शिक्षणाविषयी अनुमोदन करावे.
• अनेक स्त्रिया करण्याची पुरुषांना आज मोकळीक आहे, आपल्या हातून कदाचित परद्वारी गमन होते. स्त्रिया शिकल्या की त्या प्रश्न विचारतील, “आम्हाला मोकळीक का नसावी?”
• स्त्रियांस शिकवून (पुरुषांनी) भाकऱ्या भाजाव्या काय?
• स्त्रिया विद्वान झाल्या तर भ्रतार, आप्त पुरुष, वडील माणसे ह्यांचा वचक बाळगणार नाहीत.
• स्वयंवर, पुनर्विवाह, पुरुषासारखे अधिकार मागणे याकरिता स्त्री बंड करेल.
• बायका शिकू लागल्या तर त्यांचे नवरे मरतात (?) .
• बायकांना शाळेत पाठवले तर पुरुषांच्या दर्शनाने भीड मर्यादा राहणार नाही.
• शाळेमध्ये कलावंतीण/हीन जातीच्या संसर्गाने पवित्रता व सदाचार जाईल.

जाऊ दे, एवढे मनाला वाईट वाटून घेण्याचे, भूतकाळ उकरून मनस्ताप करून घेण्याचे कारण नाही. कुठल्यातरी काळात, कुठे तरी अपरिचित ठिकाणी वा परदेशात या गोष्टी घडल्या अशी मनाची समजूत करून घेतल्यास कदाचित त्रास होणार नाही. केव्हा तरी आपल्याला न कळत, आपल्या डोळ्यादेखत न झालेल्या गोष्टींचा एवढा त्रास का म्हणून करून घ्यायचा? फक्त त्याकाळची ती ‘माणसं’ आजच्या पिढीसारखी नव्हती एवढे लक्षात ठेवले तरी पुरे.

याचा अर्थ अगदी अलिकडे म्हणजे 20व्या शतकाच्या उत्तरार्धातच मानवी मेंदूची उत्क्रांती पूर्ण झाली असे म्हणता येईल का? सर्व सहानुभूती, कळवळा, करुणा, माणुसकी इत्यादी गोष्टी या पूर्ण झालेल्या उत्क्रांतीचे फलित असे समजायचे का? किंवा आपण सर्व मानव वंशातून (होमोसेपियन) बाहेर पडलेले एका वेगळ्या प्रजातीशी संबंधित असलेले प्राणी आहोत का?

तसे काही नसावे.

त्या काळच्या कथा-कादंबऱ्या, नाटकं वाचत असल्यास आपण त्याच प्राणीवंशातलेच आहोत, त्यांच्यातल्या भावनेसारख्याच आपल्याही भावना आहेत, चांगले वा वाईट समजण्याचे ‘शहाणपण’ त्यावेळी जेवढे होते तेवढे आजही आहे, असे म्हणता येईल. त्याकाळीसुद्दा समाजाच्या वाईट प्रथेवर, वाईट वागणुकीवर, टीका करणारे ह.ना.आपटे, लोकहितवादी देशमुख, बाळशास्त्री जांभेकर, धोंडो केशव कर्वे, महात्मा जोतीबा फुले, सुधारककार आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव गोविंद रानडे, वि. का. राजवाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादीसारखे मातब्बर लेखक, कादंबरीकार, पत्रकर्ते, इतिहासकार, समाज सुधारक होते व या विचारवंतानी त्या काळच्या अनिष्ट प्रथांचे कधीच समर्थन केले नाही. वेळ प्रसंगी यातील बहुतेक जण धोका पत्करून समाजाच्या विरोधात उभे होते. परंतु त्याकाळच्या राज्यकर्त्यांच्या दडपशाहीमुळे ही विरोधाची धार बोथट झाली व त्या काळच्या समाजात फार मोठे स्थित्यंतर झाले नाही.

पुढील काळात या समाजधुरीणांच्या विचारांचा सन्मान झाला. व माणसं बदलू लागली. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या रेट्यामुळे काही प्रथा गळून पडल्या व समाजव्यवस्था लवचिक होऊ लागली. त्या कालखंडातील व आताच्या समाजाची तुलना केल्यास फार मोठा फरक जाणवतो असे काहींना वाटते.

खरोखरच फरक पडला आहे का?
फरक असा नाही असेच म्हणता येईल.

कारण या पूर्वीच्या काळाइतकीच वाईट स्थिती आजही आहे. काही गोष्टीत कमी व काही गोष्टीत जास्त एवढाच तो फरक असेल. मुळातच त्या काळच्या जनसामाऩ्यांच्या भोवती सामाजिकरित्या रचलेली गपचुप सहन करत रहाण्याची एक अदृश्य भिंत उभी होती. चुपचाप सहन करण्याची व मूकपणे बघत राहण्याची ती भिंत होती. आतासुद्धा जे काही क्रौर्य घडत आहे, अन्याय, अत्याचार घडत आहेत, त्यांच्या विरोधात उच्चार न करण्याची वेगळ्या प्रकारची भिंत आपल्याभोवती उभी आहे. सामाजिक समस्याबद्दल कितीही ओरडून सांगितले तरीही आख्खा समाजच बहिरेपणाचे ढोंग करत असल्यास समस्यांचे गांभीर्यच लक्षात येईनासे झाले आहे. ज्यांची समस्या आहे तेच उघडपणे सांगण्यास पुढे येत नसल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळत आहे. ज्यांना या समस्या भेडसावत आहेत ते मात्र काहीही न घडल्यासारखे निःशब्द आहेत, मूकपणे सहन करत आहेत. (किंवा आत्महत्या करून जगाचा निरोप घेत आहेत.)

समाजाला लागलेली कीड असेच वर्णन करता येईल अशा रूढी-प्रथांच्या विरोधात आवाज उठवण्यापूर्वी या प्रथा चांगल्या की वाईट हेच समाजाला माहित नव्हते. या प्रथा पाळणाऱ्यांना त्या न्याय्य, नैतिक, व समाजाच्या स्थैर्यासाठी अत्यंत आवश्यक असेच वाटलेले असणार. त्यामुळे त्यांच्याविरोधात एकही शब्द न उच्चारता पिढ्यान पिढ्या त्या पाळल्या जात होत्या. यांच्या विरोधात कुणी ना कुणी तरी नक्कीच आवाज उठवला असेल. समाज मात्र त्यांना बाजूला सारून ऐकूनही न ऐकल्यासारखे केले असेल. काही वेळा या न्याय प्रथेविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल शिक्षाही केली असेल. उन्मत्त जमीनदार शेतमजूरांना चाबकाने मारत असताना इतर शेतमजूर त्याचे विव्हळणे नक्कीच ऐकत असतील. त्यांच्या तोंडावाटे एखादा सुस्काराही सुटला असेल. परंतु तुम्ही काही म्हणालात का? असे विचारल्यावर गांगरून जाऊन छे, छे, मला काही ऐकूच आले नाही. असे उत्तर दिले असेल. व तेथून सर्व जण निमूटपणे निघून गेले असतील.

स्त्रियांना व बहुजनांना शिक्षणाचे दरवाजे बंद ठेवण्यात कुठल्याही प्रकारचे अपराधीपण त्या पिढीतल्यांना जाणवत नव्हते. परंतु म. फुले पती-पत्नींनी यातील दोष दाखवल्यानंतर पहिल्या पहिल्यांदा विरोध झाला व नंतर हळू हळू त्यांच्या विधानातील सत्यांशाबद्दल खात्री पटली व नंतरच्या पिढ्यातील स्त्रिया व इतर बहुजन शिक्षित होऊ लागले. जात – धर्म यातील अंधश्रद्धांच्या विरोधात फुले आगरकरापासून दाभोलकरापर्यंत गेली दीडशे वर्षे प्रयत्न केले जात आहेत. परंतु समाज अजूनही ढिम्म आहे. उलट धर्मांधतेला खत-पाणी घालणाऱ्या गोष्टींचे उदात्तीकरण केले जात आहे.

या नंतरची पुढची पिढीसुद्धा आजच्या पिढीबद्दल असेच उद्गार काढेल. आपले पूर्वज इतके क्रूर कसे काय होते? एवढे प्रदूषण होत असताना या लोकांनी विरोध का केला नाही? एवढे शेतकरी आत्महत्या करत असताना ते थांबवता का आले नाही? जातीय हिंसाचाराचा प्रतिबंध का केला नाही? धार्मिक उन्मादामुळे शेकडोंची कत्तल होत असताना सत्ताधाऱ्यांना जाब का विचारला नाही? एवढा भ्रष्टाचार बोकाळलेला असताना वेळीच त्याला का थांबवता आला नाही? एवढी विषमता असताना जनता स्वस्थ कशी बसत होती? सर्वांच्यासाठी शौचालयांची सोय का केली नाही? काही देशात स्वच्छ रहा अशी सांगण्याची वेळ का आली? पृथ्वीला एवढे ओरबडताना यांचे कायदे कानून कुठे गेले होते? कुपोषण, भ्रूणहत्या, बालमृत्यू यांना कसे काय सहन केले जात होते? यांच्यात सहानुभूतीचा लवलेश होता की नाही? काही शहाणपण होते की नाही? का हे सर्व मनोविकृत होते?

खरे पाहता आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हासुद्धा त्यांच्याजवळ जीवनमूल्ये नव्हत्या, निर्णय घेण्याची कुवत नव्हती, न्यायिक बुद्धी नव्हती असे म्हणता येणार नाही. फक्त अन्याय, अत्याचारांच्या विरोधात लढा देण्यास ते असमर्थ होते. तीच स्थिती आजही आहे. आपण सर्व महत्वाच्या समस्याविषयी बधिर आहोत. गेंड्याची कातडी पांघरून निर्बुद्धासारखे वागत आहोत. जे काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाज ऐकू न आल्यासारखे आपण संवेदनाविहीन आहोत. उलट आपण त्यांची चेष्टा करतो, टर उडवतो, व प्रसंगी काही तरी असंबद्ध विधानं करून त्यांना नामोहरम करतो. मुळात आवाज उठवणाऱ्यांनासुद्धा हा निद्रिस्त समाज कृती करणार नाही याचा अंदाज असतो. कारण या जनसामाऩ्यांना – त्यातल्या त्यात मध्यम वर्गातल्यांना – कुठल्याही भानगडीत पडायचे नसते. परस्पर काम होत असेल तर त्याचे श्रेय घेण्यासाठी मात्र ते तत्पर असतात. नाहीतर कुठल्यातरी क्षुल्लक गोष्टीवर चार शब्द बोलून ते पळून जाण्याच्या पावित्र्यात असतात. समाजाशी त्यांचे देणे-घेणे नसते. विरोधकांचे ऐकावे, कृती प्रवण व्हावे, त्यासाठी वेळ द्यावा, श्रम करावे असे त्यांना अजिबात वाटत नाही. ज्या काही समस्या आपल्यासमोर ‘आ’ वासून उभे आहेत त्या समस्याच नाहीत अशी मानसिकता वाढत असल्यामुळे नैतिकदृष्ट्या त्या तातडीचे आहेत व त्यासाठी ताबडतोब कृती करायला हवी हा प्रश्नच त्यामुळे उद्भवत नाही.

आपण उभे असलेल्या पृथ्वीसंबंधीच्या काही महत्वाच्या समस्याकडे आपण वेळीच लक्ष न दिल्यास 6th Extinction फार दूर असणार नाही. कारण काही मानवनिर्मित गोष्टीमुळे हवामान, व भौगोलिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. वातावरण कलुषित होत आहे. व त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. जागतिक समस्यांचाच विचार केल्यास खाली नमूद केलेल्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेलः
• जमिनीखालील नैसर्गिक इंधनासाठी अजून किती काळ प्रयत्न करत राहायचे? किंवा याविरोधात आवाजच उठवायचे नाही?
• जगभरातील जमिनीचे धूप होत असून पुढील 50-60 वर्षात जगातील बहुतेक जमीन नापीक होण्याचा संभव आहे. हे थांबवणे शक्य होईल का?
• कृषीउद्योगातील कार्पोरेट्सचे खिसे भरणे थांबवून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल की नाही?
• वन्यजीवांच्या रक्षणाची जबाबदारी आपण घेणार की नाही? त्यासाठी जंगलतोड थांबवणार की नाही?
• जिभेचे चोचले पुरवण्यासाठी समुद्र वा महासागरातील जलजन्य प्राण्यांची कत्तल होत आहे. मासळींचे पुनरुत्पादन होणार की नाही, इतकी गंभीर ही समस्या आहे. याकडे लक्ष देणार की नाही?
• अण्वस्त्र व अणुऊर्जेच्या धोक्यापासून हे जग मुक्त होणार की नाही?

ही यादी अशीच वाढविता येईल.
या प्रकारच्या समस्या जगापुढे मांडण्यासाठी अनेक जण, अनेक संस्था आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु प्रत्येक वेळी केवळ हां..... हूं...... शिवाय दुसरे काही ऐकू येत नाही. या गोष्टींची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते दुर्लक्ष करत आहेत, तोंड उघडायलाही तयार नाहीत.

मुळात कुणीही, कुणाचेही ऐकण्याचा धोकाच पत्करत नाहीत. कारण ऐकले की आपण गुंतून जाऊ याची भीती सतत वाटत असते. माणसं अडचणींचा सामना करण्याऐवजी तेथून निसटण्याचे मार्ग शोधत आहेत. एका प्रकारे चेहऱ्यावर चिलखती मुखवटे चढवून वावरत आहेत. गांधीजींच्या माकडाच्या मूर्तीप्रमाणे ऐकणार नाही, बोलणार नाही व बघणार नाही या अवस्थेत आपण आहोत असे म्हणता येईल. त्यामुळे पुढच्या पिढ्या आपल्याला राक्षसी मनोवृत्तीचे ठरवल्यास वावगे ठरणार नाही. मानसिकवृत्त्या विकृत पिढी असे म्हटले तरी आपण ते निमूटपणे ऐकून घेऊ असे आपले आजचे वर्तन आहे.

यावर उपाय काय हा प्रश्न विचारल्यास पहिल्यांदा जनसामान्यांमध्ये ऐकून घेण्याची ताकद निर्माण करावा लागेल, त्यांना समस्येसंबंधी बोलते करावे लागेल. तज्ञ (बोलघेवड्या) जाणकारांची नव्हे तर, आजूबाजूला वावरत असलेल्या लोकांच्या व्यथा जाणून घेण्याची, मूकवेदना समजून घेण्याची, सहिष्णुता आपल्यात यायला हवी. प्रसिद्धी माध्यमात न झळकलेल्या घटनांची इत्थंभूत माहिती करून घेण्याची उत्सुकता हवी. केवळ शब्दानी नव्हे तर कृतीतूनही या स्मशान शांततेचा भंग करण्याची वेळ आता आली आहे. सामाजिकरित्या आपण बधिर नाही, आपल्यात अजूनही संवेदना शिल्लक आहेत, हे इतरांना कळण्याइतपत आपली कृती हवी. भविष्यातल्या पिढ्या भलत्याच देशातली माहिती वाचत आहेत असे त्यांना वाटू नये अशी कृती आपल्या हातून घडत रहावी.

तंत्रज्ञानामुळे जवळ येत असलेल्या या जगात कुठेही अन्याय, अत्याचार होत असल्यास एक माणूस म्हणून या अन्याय-अत्याचारांच्या विरोधात आवाज वठविणे आपले कर्तव्य आहे. दहा हजार किलोमीटर्स दूरवरील एका आडरानात ते घडले आहे म्हणून आपण गप्प बसल्यास ती दुष्ट प्रवृत्ती तुमच्या दारात कधी येईल, कशी येईल याचा अंदाज करता येत नाही. त्यामुळे वेळीच सावध राहण्याची नितांत गरज आहे. ज्या प्रकारे प्रदूषणात भर घातली जात आहे त्याविरुद्ध आवाज उठविणे गरजेचे ठरेल. आपल्या हातून वातावरणाला हानी पोहोचेल अशी कुठलिही कृती होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. सगळे जण करतात, मी का करू नये ही मानसिकता बदलायला हवी. वातावरणातील प्रदूषण, जमिनीची धूप, जंगल तोड, समुद्र-महासागरांचा बिघडलेला समतोल, इत्यादीमुळे जागतिक हवामानावर दुष्ट परिणाम होत आहेत, हे आता मान्य करण्याची वेळ आली आहे. आताच दुष्काळ, अतीवृष्टी, अनावृष्टी, ढगफुटी, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, इत्यादिंचे संकेत मिळत आहेत. कुठलेही तंत्रज्ञान यांना रोखू शकत नाही. वेळीच व सातत्याने सामूहिकरित्या कृती केल्यास व सत्ताधाऱ्यांवर दबाव आणल्यास काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे. आज ज्या समस्या स्थानिक आहेत असे वाटतात, त्याच यानंतर जागतिक समस्या म्हणून उग्रस्वरूप घेणारे ठरतात. या पुढच्या पिढ्या उपासमारीने मरून जाऊन नामशेष होऊ नये असे वाटत असल्यास आताच उपाय शोधावे लागतील.

आपली ही वसुंधरा मागच्या पिढीने देणगीच्या स्वरूपात आपल्या हातात सुपूर्द केलेली आहे. व हीच देणगी, त्याला धक्का न लावता, पुढच्या पिढीच्या हातात सोपवायची आहे, हे लक्षात ठेवूनच आपल्याला जीवन जगावे लागेल व त्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करायची वेळ आल्यास, त्याचीही तयारी ठेवावी लागेल. त्यामुळेच
सांग, सांग भोलानाथ,
माणसं सुधारतील का?

हा प्रश्न अत्यंत कळीचा ठरत आहे.

(पूर्व प्रसिद्धीः 'पुरोगामी जनगर्जना' मासिक)

field_vote: 
0
No votes yet

चिल मारा नानावटीजी.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नानावटी सर, तुमचे गणिताचे लेख वाचले असल्यामुळे हे शिर्षक वाचून मला आतमध्ये प्रोब्याबिलीटी है असं उगीचच वाटलं. आतमंदे येगळच है. निवांत वाचवं म्हंटो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

वरील लेखात 1852 सालच्या एका पत्राचा मजकूर आहे वाचकांच्या लक्षात आले असेलच. परंतु या प्रकारच्या मानसिकतेत 165 वर्षानंतरही फार बदल झाला नाही हे लोकसत्ता (15 डिसेंबर) या दैनिकातील अग्रलेखातील खाली दिलेला काही भाग वाचताना कळू शकेल. कदाचित जस्टीस रॉय मूर या पराभूत रिपब्लिकन उमेदवाराचे हे वैयक्तिक मत असू शकेल म्हणून दुर्लक्ष करता येईल. परंतु ही मानसिकता उघड वा सुप्तपणे अजूनही समाजात आहे याचे हे एक जिवंत उदाहरण असू शकेल.
‘‘महिलांना मतदानाचा हक्क हवाच कशाला’’, ‘‘महिलांचे स्थान मुदपाकखान्यात होते तोपर्यंतच जग सुखी होते’’, ‘‘महिलांचा जनजीवनात सहभाग वाढला आणि विश्वाचा सामाजिक स्तर ढासळू लागला’’, ‘‘अमेरिकेत गुलामी प्रथा होती तोपर्यंत हा देश आनंदी होता’’, ‘‘या देशात पुन्हा एकदा गुलामी प्रथेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे’’, ‘‘इस्लाम धर्म हा मानवजातीला दिला गेलेला एक शाप आहे..’’ असे अन्य अनेक विधानांचे दाखले देता येतील. ही कोणा बेजबाबदाराची विधाने नाहीत. तर या निवडणुकीत अलाबामा राज्याचे मुख्यमंत्रिपदसदृश नेतृत्व करू पाहणाऱ्या मूर यांची आहेत आणि ती मांडण्यात काही कमीपणा आहे असेही त्यांना वाटत नाही.
सुज्ञास सांगणे न लगे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मानवाने निसर्गाविरुद्ध इतके गुन्हे केले आहेत की या वसुंधरेवर बाकी सर्व प्राणी सोडून फक्त मानवाचेच 6th extinction झाले पाहिजे. मानव जात नाहीशी झाली तरच बाकीच्या सर्व प्राण्यांवर होणारे अन्याय थांबतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

लेख बिलकुल पटला नाही. मला समजलेला सारांश असा.

'पूर्वी प्रश्न होते, आता इतर काही प्रश्न आहेत, त्यामुळे अर्थातच परिस्थिती बदललेली नाही, ती पूर्वीइतकीच वाईट आहे.'

मी समांतर विधान करतो.

'मी पंचवीस वर्षांपूर्वी 10 लाखाचं कर्ज घेऊन घर विकत घेतलं. अजूनही 2 लाख कर्ज बाकी आहेच. तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती 25 वर्षांत बिलकुल सुधारलेली नाही. ती तितकीच वाईट आहे.'

अर्थातच मी इथे आकडे वापरले म्हणून या विधानातला फोलपणा सहज कळून येतो. लेखकाने लेखात पूर्वीचे प्रश्न किती घातक होते, आणि आत्ताचे किती घातक आहेत याची काहीएक मोजमाप करणं टाळून 'दोन्ही सारखेच' असं म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातही सध्याच्या अनेक शक्यतांना घातक म्हटलं आहे, तर पूर्वीच्या घातक वास्तवांशी त्यांची तुलना केलेली आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0