यंदा कर्तव्य आहे

(शर्वरी कुणाची तरी वाट बघत एकटीच एका कॉफी-हाउस मध्ये बसलीय. तिने पंजाबी ड्रेस किंवा not too modern, not too traditional अशा पोशाख घातलाय. अधून-मधून घड्याळाकडे बघतेय, इकडे-तिकडे बघतेय, कॉफीचा सिप घेतेय.. तिच्यासमोर एक बझ्झर ठेवलाय, गेम शोमध्ये असतो तसला. एक तरुण आत शिरतो, इकडे-तिकडे बघतो आणि शर्वरीपाशी येतो. एकच मुलगा सगळ्या मुलांची भूमिका करतो. मुलाने बोलण्या-वागण्यातल्या विविधतेने पात्रांमध्ये रंगत आणावी).
मुलगा १: आपण शर्वरी का?
शर्वरी: हो. आणि आपण...अविनाश?
मुलगा १: हॅलो (मुलगा हात पुढे करतो).
शर्वरी: (ती ओशाळून हात मिळवते. जरासं गोंधळून विचारते). तुम्ही कॉफी घेणार का?
मुलगा १: हो येताना मी वेटरला कॅफे मोका आणायला सांगितलंय.
शर्वरी: ओ, मीपण तेच पितेय.
मुलगा १: (दोघं एकमेकाकडे कुतुहुलाने बघतात) मला... (दोघं एकत्रच बोलतात) नाही तुम्ही सांगा.
शर्वरी: मला खरं तर घरात बोलवून चहा-पोह्याचा कार्यक्रम अजिबात आवडत नाही. शिवाय मोकळेपणाने बोलताही येत नाही.
मुलगा १: अगदी बरोबर आहे तुमचं.
शर्वरी: मी खरंतर आत्ता तयारच नव्हते लग्नाला. पण वाहिनीने तुमचं स्थळ सुचवलं. आणि बाबा म्हटले – सुनबाईच्या नात्यातला आहे म्हणजे मुलगा चांगलाच असणार.
मुलगा १: हो तुमच्या वहिनीच्या थोरल्या मावशीची धाकटी नणंद म्हणजे माझ्या बहिणीच्या सख्ख्या जावेची चुलत सासू.
शर्वरी: ओह, एवढ्या जवळचं नातं आहे तर...
मुलगा १: नाही म्हणजे जरा लांबचच नातं आहे, पण ओळख लहानपणापासूनची आहे.
शर्वरी: (थोडा नर्वस pause) मी तुम्हाला आधीच सांगते कि माझा एक बॉयफ्रेंड होता पण आमचं नुकतच ब्रेकअप झालंय.
मुलगा १: ओह, तुम्ही आणि तो किती वर्षं एकत्र होता?
शर्वरी: सहा
मुलगा १: ओ, wow.
शर्वरी: हो ना. वाहिनी तर बरेच दिवस लागलेली पण मी आणि गिरीश एकत्र होतो म्हणून टाळत होते. पण आत्ता...म्हटलं तुम्हाला एकदा भेटायला काय हरकत आहे.
मुलगा १: कधी झालं ब्रेकअप? म्हणजे मी आपलं सहज विचारलं हा...तुम्हाला सांगायचं नसेल तर.
शर्वरी: नाही असं काही नाही...हे आत्ताच...मंगळवारी.
मुलगा १: (आश्चर्याने) काय?
शर्वरी: (ओशाळून) मागच्या मंगळवारी. पण त्याला विसरण्याकरता मी लग्न करतेय असं बिलकुल नाहीय हा. तुम्ही प्लीज गैरसमज करू नका हं...हा म्हणजे एका दृष्टीने कदाचित मला होतंय थोडं दुखः. पण तशी आमची मनं कधी जुळलीच नाहीत. बऱ्याच दिवसापासून आम्हाला दोघांनाही कुठेतरी कळलं होतं कि its not going to work out.
(ती पटवून देण्याचा प्रयत्न करतेय. कुठेतरी ती स्वतःलाही पटवून देतेय. तो मध्येच हसतो).
का काय झालं? मी काही चुकीचं म्हंटले का?
मुलगा १: काही नाही, तुम्ही फारच निरागस आहात हो.
शर्वरी: मी खरंतर येताना फारच नर्वस होते. आपल्या आपणच भेटायचं म्हणजे...
मुलगा १: हो ना, कोण कसा असेल काय माहित?
शर्वरी: अगदी बरोबर बोललात. एक-एक अशी लोकं असतात. आणि नात्यांच्या बाबतीत तर मी फारच विशिष्ट आहे. पण तुम्ही अगदी नॉर्मल आहात, आणि बोलायला सुद्धा छान आहात.
(मध्येच विषय बदलत) तुम्ही सिगरेट तर नाही ना पीत? प्लीज नाही म्हणा, प्लीज नाही म्हणा...
मुलगा १: मी आयुष्यात कधी सिगरेटला हात लावलेला नाही.
शर्वरी: मला सिगरेट, सिगरेट पिणारी माणसं, इतकंच काय तर साधा सिगरेटचा वास सुद्धा मी सहन करू शकत नाही. आणि मला मांजरी फार आवडतात.
मुलगा १: काय सांगता? माझ्या घरी एक मांजर आहे.
शर्वरी: आणि मला शाहरुख खानचे पिच्चर फार आवडतात.
मुलगा १: मला ही.
शर्वरी: तुम्ही मस्करी करताय.
मुलगा १: नाही खरंच, मी त्याचा प्रत्येक पिच्चर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलाय.
शर्वरी: काय योगायोग आहे.
मुलगा १: आणि मी गे आहे.
शर्वरी: सॉरी?
मुलगा १: मी गे आहे हो. मी तुमच्या वाहिनीला म्हटलं कि मला तुम्हाला भेटण्यात इंटरेस्ट नाहीय. पण ती ऐकेनाच. प्लीज तिला कळलं तर ती घरी सांगेल आणि माझ्या घरच्यांना माहित नाहीय. प्लीज प्रॉमिस करा कि तुम्ही तुमच्या वाहिनीला सांगणार नाही.
शर्वरी: (शर्वरीला कळत नाहीय. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आहे) अं हं
मुलगा १: पण तुम्ही खरंच चांगल्या आहत. आपण पुढच्या आठवड्यात पिच्चरला जाऊया का?
शर्वरी: BUZZZZZZ (मुलगा उठून उभा राहतो आणि फिरून पुन्हा येतो).
मुलगा २: (पुणेरी शिष्ट माणूस). आपणच शर्वरी पाठक का?
शर्वरी: हो. आणि आपण.
मुलगा २: मी सुबोध. सुबोध गंगाधर मराठे. आपल्या वडिलांनी मला दूरध्वनीवरून कळवले कि आपण ह्या कॉफीगृहात मला यावेळी भेटाल.
शर्वरी: (पुन्हा नर्वस, पण यावेळी थोडी कमी) तुम्ही कोफी घेणार का?
मुलगा २: मी चहा-कॉफी सारखी उत्तेजक पेये पीत नाही. त्याने पित्त वाढते. मी वेटरला येताना एक कप दूध आणायला सांगितले आहे.
शर्वरी: मला खरं तर घरात बोलवून चहा-पोह्याचा कार्यक्रम अजिबात आवडत नाही. शिवाय मोकळेपणाने बोलताही येत नाही.
मुलगा २: हो तुमच्या वडिलांनी नमूद केले कि आपण स्वतंत्र विचाराच्या आहात. मी माझ्या आयुष्यात स्त्रीस्वातंत्र्याला नेहमीच पाठींबा दिला आहे त्यामुळे आपला ह्या निर्णयाची मी दाद देतो.
शर्वरी: मी तुम्हाला आधीच सांगते कि माझा एक बॉयफ्रेंड होता पण आमचं नुकतच ब्रेकअप झालंय.
मुलगा २: माझेही पूर्वी एक प्रेमप्रकरण होते. अर्थात आमचीही ताटातूट झालीय आता.
शर्वरी: काय झालीय?
मुलगा २: ब्रेकअप
शर्वरी: ओह
मुलगा २: आम्ही काही फार दिवस एकत्र होतो अशातला भाग नाही. जेमतेम सोळा दिवस आमचे प्रेम चालले. मी फार बोलतो या क्षुल्लक कारणावरून ती चक्क सोडून गेली. हे म्हणजे...असो. तुम्ही किती दिवस एकत्र होता?
शर्वरी: सहा वर्षं.
मुलगा २: बापरे! सहा वर्षं आणि सोळा दिवस (तिच्याकडे आणि स्वतःकडे हात दाखवतो). साधारणतः कधी झाली तुमची ताटातूट?
शर्वरी: हेच काही दिवसापूर्वी
मुलगा २: तरी एक अंदाजे?
शर्वरी: एखादा महिना झाला असेल...
मुलगा २: फक्त एक महिना? याचा अर्थ तुम्ही त्याला विसरण्याकरता हे लग्न करताय ना?
शर्वरी: नाही तसं नाहीय. मला वाटतं जास्त दिवस झाले, म्हणजे तीन-चार महिने कदाचित...नीटसं आठवत नाहीय.
मुलगा २: एक मिनिट. तुम्हाला तुमची ताटातूट कधी झाली हे निट आठवत नाहीय. आणि तुम्ही सहा वर्षं एकत्र होता? काहीतरी जुळत नाहीय. माझी ताटातूट झाल्याची तारीख मला चोख आठवतेय आणि आम्ही तर केवळ...
शर्वरी: (त्याला कापत म्हणते) मागच्या मंगळवारी.
मुलगा २: काय?
शर्वरी: मागच्या मंगळवारी झालं आमचं ब्रेकअप. आणि आता तुम्ही इथून...इथून जावा.
BUZZZZZZ
मुलगा ३: हाय..शर्वरी?
शर्वरी: हो आणि आपण?
मुलगा ३: मी आपण नाही, मी सिद्धार्थ, तू मला सिड म्हणू शकतेस.
शर्वरी: कॉफी घेणार?
मुलगा ३: हो मी छोटुला सांगितलंय. तो माझ्यासाठी गरमागरम भजी आणि चहा आणतोय.
शर्वरी: हे बघ, सिड. मला खरं तर घरात बोलवून चहा-पोह्याचा कार्यक्रम अजिबात आवडत नाही. शिवाय मोकळेपणाने बोलताही येत नाही. मी तुला आधीच सांगते कि माझा एक बॉयफ्रेंड होता पण माझं नुकतच ब्रेकअप झालंय. सहा वर्षं आम्ही एकत्र होतो. आमचं ब्रेकअप होऊन बरेच दिवस झाले, तुला तारीख पाहिजे का? १७ जानेवारी..१७ जानेवारीला झालं आमचं ब्रेकअप. बरेच दिवस झालेत, त्यामुळे मी त्याला विसरण्याकरता लग्न नाही करतेय.
मुलगा ३: आई शप्पथ..किती फास्ट बोलतेस तू. मग तुझा बि.एफ होता तर एवढी हायपर कशाला होतेयस? माझी पण गर्लफ्रेंड आहे त्यात काय.
शर्वरी: आहे म्हणजे?
मुलगा ३: आहे म्हणजे we are in a relationship, but we are not serious. She is just not marriage material you see, more like friends with benefits यार.
शर्वरी: आणि हे तिला माहितीय?
मुलगा ३: हो. तुला तिला भेटायचंय का? ती बघ ती त्या टेबलवर बसलीय तुला हाय म्हणतेय.
शर्वरी: BUZZZZZZ
मुलगा ४: हाय, आपण...
शर्वरी: हो मीच शर्वरी आणि तू? ते जाऊदे, मी तुला आधीच सांगते..मला घरी बोलवून चहा-पोह्याचा कार्यक्रम...नको जाऊदे...हे बघ माझा आधी बॉयफ्रेंड...नको ते ही जाऊदे...एक काम कर तूच बोल...
मुलगा ४: तुमचे फोटो छान आहेत तुमच्या प्रोफाईलवर.
शर्वरी: ओह, thanks.
मुलगा ४: मी मुलींबरोबर बोलायला खूप नर्वस फील करतो. तुम्ही बिलकुल नर्वस नाही आहात.
शर्वरी: माझा बॉयफ्रेंड होता सहा वर्षं त्यामुळे सगळा नर्वसनेस गेलाय आता.
मुलगा ४: अनुभवी दिसताय?
शर्वरी: हो सहा वर्षं एका रिलेशनशिप मध्ये असल्यावर येतात बरेच अनुभव.
मुलगा ४: मला बिलकुल अनुभव नाहीय. माझ्या सगळ्या मित्रांना अनुभव आहे. त्यामुळे सगळे मित्र मला चिडवतात. मलाही अनुभव घ्यायचाय हो. आपण करायचं का ढिचींग ढिचींग? माझ्या घरी आज कुणी नाहीय.
शर्वरी: BUZZZZZZ
मुलगा ५: (खिशातून सिगरेट काढतो) मी सिगरेट प्यालो तर तुझी काही हरकत नाही ना?
शर्वरी: (ती आता परिस्थितीला वैतागून म्हणते) नाही, काहीच हरकत नाही. आता काय हरकत असणार.
मुलगा ५: आणि मी आठवड्यातून तीनदा बियर पितो. तुझी काही हरकत नाहीय ना?
शर्वरी: काहीच नाही.
मुलगा ५: आणि मी दिवसातून दोन वेळा जिमला जातो. आणि एक वेळेला अंघोळ करतो..महिन्यातून. कधी कधी मी अंघोळ करताना बियर पितो. तुला काही..
शर्वरी: (त्याला कापत म्हणते) काहीच हरकत नाही.
मुलगा ५: आणि आजपर्यंत मी हेल्मेट न घालता बाईक...नेहमीच चालवलीय. एकदा मी बाईकवर बसलो, हातात बियर नो हेल्मेट. आणि मी पडलो, मला हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरनी मला ग्लुकोज चढवलं. मी डॉक्टरला बोललो – ए डॉक्टर ग्लुकोज नाही, मला बियर चढवा. या बॉडीला फक्त बियर कळते. समजलं का तुला? काही हरकत? (तिच्याकडे बोट दाखवतो).
शर्वरी: नाही या सगळ्याला एकवेळ माझी हरकत नसेल पण या attitude ला माझी हरकत आहे.
BUZZZZZZ
मुलगा ६: Hi! Are you Shar…vary
शर्वरी: हो आणि तू...
मुलगा ६: I am Chandra from Chicago
शर्वरी: का गो एवढ्या लांबसून का इलंस?
मुलगा ६: Its not big deal
शर्वरी: So what do you do in Chicago?
मुलगा ६: I passed university last year. Now I do like...whatever and stuff.
शर्वरी: म्हणजे टिपिकल अमेरिकन सारखा नसलेल्या पैशाने नको असलेल्या वस्तू विकत घेत मॉल्स मधून फिरतोयस राईट?
मुलगा ६: No, no no. Actually I am into research.
शर्वरी: कसला रिसर्च?
मुलगा ६: Being a millennial in America, I am currently doing a research on what I want from my own life.
I just like, I just want to try something different. I need that spark in my life. I am tired of American girls. I liked your profile, and thought to myself, maybe she is the one. So I came here to meet you.
शर्वरी: You know what, तू एकदम बरोबर बोललास. माझ्यापण आयुष्यात तो स्पार्क नाहीय. मी पण सहा वर्षं एकाच रिलेशनशिप मध्ये अडकून होते. त्यामुळे different काही करणं झालंच नाही.
मुलगा ६: Oh yeah, me too. But the only difference is you were in one relationship for six years, and I had six relationships in the last one year.
शर्वरी: मग आत्ता लग्न का करायचंय तुला?
मुलगा ६: No no, no lagn. I think we should just live in for a while, maybe year or so, and take it from there.
शर्वरी: लिव इन?
BUZZZZZZ
मुलगा ६: मी एक social media influencer आहे.
शर्वरी: BUZZZZZZ
मुलगा ७: social media influencer
शर्वरी: BUZZZZZZ
मुलगा ८: social media influencer
शर्वरी: BUZZZZZZ
मुलगा ९: (मुलगा काही बोलायला जातो तो पर्यंत शर्वरी बझर दाबायला जाते). अरे अरे पण काही बोललोच नाहीय अजून.
शर्वरी: मग बोल.
मुलगा ९: (ऐटीत) Whatsapp ग्रुप admin
शर्वरी: BUZZZZZZ
मुलगा १०: (राहुल गांधी action)
शर्वरी: राहुल गांधी?
(मुलगाच बझर वाजवतो) BUZZZZZZ
मुलगा ११: (कोल्हापुरी accent) नमस्कार, आम्ही राजवर्दन पाटील. मुकामपोस्ट करवीर, जिल्हा कोल्हापूर.
शर्वरी: बापरे एवढ्या लांबून का आलायस?
मुलगा ११: का म्हणजे? तुमास्नी लग्नाची मागणी घालाया.
शर्वरी: पण मी काय कोल्हापूरला का shift व्हायचं, मी इथे marketing analyst आहे.
मुलगा ११: marketing analyst म्हणजे टेपाच मारताय न्हवं. असाल तुम्ही इथं मोठ्या हुद्द्यावर. पण अख्ख्या कोल्हापुरात आमचाबी मान काय कमी न्हाई...
शर्वरी: का तू काय जॉब करतोस तिथे?
मुलगा ११: जॉब? आमच्या घराण्यात बाप-जलमात कुणी नोकरी केल्याल न्हाई. आमचं आबा कात्रज साखर कारखान्याचे मालक आणि कात्रजचे शिट्टींग एम.पी – आबासाहेब.
शर्वरी: यु मीन सिट्टींग?
मुलगा ११: त्येच ते.
शर्वरी: ओह ग्रेट, आणि तू काय करतोस?
मुलगा ११: पुढल्या विलेक्शनला आबांच्या जागेवर आपण उभा र्हानार हाई.
शर्वरी: तू नेहमीच अशा accent मध्ये बोलतोस?
मुलगा ११: का आपला accent आवडला का तुम्हाला?
शर्वरी: हो मग कोल्हापुरी accent कुणाला नाही आवडणार. Its just so romantic.
मुलगा ११: (accent मधून बाहेर येतो) मला वाटलंच होतं कि तुला कोल्हापुरी accent आवडणार म्हणून. आमचा accent अख्ख्या कोल्हापुरात world famous आहे.
शर्वरी: (तिला कळतं कि तो मुद्दाम accent काढून बोलत होता) ओह, तू मुद्दाम accent मध्ये बोलत होतास तर...
मुलगा ११: हो पण तुला आवडला ना? अगं मला बोलावं लागतं असं.
शर्वरी: का असं का बोलावं लागतं?
मुलगा ११: अगं सांगितलं ना मी पुढच्या इलेक्शनला आबांच्या जागेवर उभा राहतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबर बोलायला accent बरा पडतो.
शर्वरी: नुसतं असं बोललं कि कार्यकर्ते इम्प्रेस होतात?
मुलगा ११: नुसतं accent मारून कार्यकर्ते विम्प्रेस झाले असते तर सगळेच नेते झाले असते.
शर्वरी: मीपण तेच म्हणतेय.
मुलगा ११: अगं त्यासाठी भाषणामध्ये छत्रपती उभे करायला लागतात. भाषणात इस वेळा छत्रपतींचं नाव घ्यायचं. मग रात्री रॉयल स्टॅग च्या बाटल्या पोचल्या कि परतेकजण स्वतःच छत्रपती बनतोय.
एरवी वीस-वीसचं पेट्रोल ताणून कळ काढणारे कार्यकर्ते विलेक्शनच्या महिन्यात चिल्लर टाकली कि घरोघरी जाऊन मतं मिळवून आणत्यात. मी गणितात कधीच पास नाही झालो पण मतांचं गणित मला पक्कं कळतं.
शर्वरी: पण तू मला हे सगळे का सांगतोयस?
मुलगा ११: का म्हणजे? तुला पटवून देतोय कि आपलं future एकदम शेट हाये. एखाद्या राणीसारखं राज्य करशील तू.
शर्वरी: हा तरीपण कोल्हापूरला रहायचं म्हणजे?
मुलगा ११: कळलं मला. तुला कोल्हापूरला कसं रहायचं याचा विचार करतेयस ना. आमचं कोल्हापूर पण तुमच्या मुंबई-पुण्या एवढंच येडवांस हये. पोर्ची ऐकलंय का?
शर्वरी: कुणाच्या पोर्ची?
मुलगा ११: पोर्ची पानीमारा जी.टी.
शर्वरी: यु मीन पॉर्श पॅनमेरा !
मुलगा ११: आबांनी घेतल्या माझ्या वाढदिवसाला. अख्ख्या कोल्हापुरात फक्त तीन आहेत, त्यातली एक आपल्याकड आहे. तुला बाईकवरून फिरायला आवडत असेल तर हरली द्रविडसन पण आहे.
शर्वरी: BUZZZZZZ
(आता शर्वरी खूप वैतागलेली आहे).
मुलगा १२: मला तुमचं प्रोफ़ाईल आवडलं.
शर्वरी: त्यात आवडण्यासारखं काय होतं?
मुलगा १२: तुम्ही marketing analyst आहात?
शर्वरी: हो टेपा मारायचा जॉब करते. मला नाही बोलायचं त्याच्या बद्दल.
मुलगा १२: ओ..के. तुमचे फोटो छान आहेत तुमच्या प्रोफ़ाईलवर.
शर्वरी: सगळेच असंच म्हणतात.
मुलगा १२: ओह. (एकदम नर्वस होतो. थोडा वेळ जातो, कुणीच काही बोलत नाही).
मला वाटतं मी आता इथून गेलं पाहिजे..
शर्वरी: बरंय...ग्रेट...मला तुझं नाव सुद्धा माहित नाहीय. जाऊदे नाव जाणून तरी काय करणार आहे...
मुलगा १२: खरंतर तुमचे प्रोफाईल फोटोज बघून तुम्ही इंटरेस्टिंग वाटला म्हणून मी तुम्हाला भेटायचं ठरवलं.
अचानक सुरु झालेल्या वादळात सगळे सैरा-वैरा पळतायत आणि तुम्ही मनमोकळेपणाने हसताय..म्हणजे...you just seemed like this mad bubbly girl..पण वास्तवात तुम्ही तुमच्या प्रोफाईल सारख्या बिलकुल नाही आहात...anyway...it was nice meeting you.
शर्वरी: हे बघ थांब, नाव काय तुझं?
मुलगा १२: मानव..मानव भोसले.
शर्वरी: हे बघ मानव, its been a rough day for me. तू बस आणि कॉफी संपवून मग जा.
मुलगा १२: No, its okay.
शर्वरी: alright.
मुलगा १२: (मुलगा जातो, दोन-तीन पावलं पुढे जाऊन परत फिरून बसतो). नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी इथे मुळात यायलाच नको होतं. माझं नुकतंच ब्रेकअप झालंय.
शर्वरी: कधी झालं?
मुलगा १२: माहित नाही...म्हणजे तीनेक महिने..आठवडे..मागच्या मंगळवारी.
शर्वरी: तू इकडे येऊन अगदी योग्य केलंस.
मुलगा १२: मला कळत नाहीय मला काय हवंय.
शर्वरी: कळेल तुझं तुलाच हळूहळू.
मुलगा १२: मला वाटतं मी तिला विसरण्याकरताच इथे यायचं ठरवलं.
शर्वरी: नाही, तसं बिलकुल नाहीय. कुठल्या गाढवाने तुला हे सांगितलं?
मुलगा १२: नाही माझं मीच...तुम्हाला मांजरी आवडतात ना? म्हणून मी माझ्या मांजरीचे फोटो आणले होते तुम्हाला दाखवायला..
शर्वरी: मला आवडतील बघायला..(दोघे फोटो बघतात आणि स्माईल करतात).
शर्वरी: (फोटो बघता बघता दोघांचं संभाषण सुरुय) तू गे तर नाहीयस ना?
मुलगा १२: नाही हो, तसा वाटलो का मी तुम्हाला?
शर्वरी: नाही तसं नाही, सहजंच विचारलं. आणि तू मला तू म्हणू शकतोस.
(हळूहळू लाईट डिम होतात आणि पडदा पडतो).

कोल्हापुरी character end कसे करायचे? काहीतरी ज्याने शर्वरी वैतागते.
हे मी येत्या गुढी पाडव्याला करायचं म्हणतोय..चांगलं वाटेल का? एकदम कॉमेडी नाहीय. पण मला दुसऱ्यांची स्कीट करून कंटाळ आला, आता स्वतः लिहिलेलं करायचंय.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कुल्हापुरी - "आईसाहेबांनी सून बघून ठेवलीय. तिच्याशीच पुढच्या महिन्यात~~. हा एक चेंज म्हणून. "
शर्वरी- "आपण फिरायाला बाहेर पडु या का? बसून कंटाळा आलाय."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0