सद्गुरू आणि स्मोकिंग!
सद्गुरू आणि स्मोकिंग!
(Disclaimer- हा लेख विनोदी, उपहासात्मक, व्यंगात्मक वगैरे वगैरे आहे म्हणजे थोडक्यात यात सांगितलेल्या गोष्टी सिरीयसली मनावर घेणार असाल तर परिणामांना अस्मादिक जबाबदार असणार नाहीत. विशेषत: जे लोक शंकर महाराजांचे किंवा अन्य कोणत्याही महाराजांचे/मातांचे निस्सीम वगैरे उपासक आहेत त्यांनी हा लेख वाचू नये किंवा आपल्या जबाबदारीवर वाचवा.तरीही वाचून भावना दुखावल्या म्हणून बोंबाबोंब करणार असाल तर जशी करणी सेना आहे तशी आम्ही बरणी सेना उभारू आणि दुखावलेल्या भावनांचे लोणचे घालून देऊ .... फुकट.)
हे फेसबुक, whats app, वगैरे सोशल नेट्वर्किंग च्या चलती मुळे आमची आणि आमच्या सारख्या सश्रद्ध लोकांची पुण्यार्जनाची भलतीच सोय होऊन राहिली आहे. (तुम्ही लगेच अंधश्रद्धाळू म्हणून हिणवाल आम्हाला पण मृत्यू नंतर रौरव नरकातल्या तेलात तळून निघताना कळेल तुम्हाला, आम्ही तेव्हा स्वर्गात सोमरस on the rocks घेताना अप्सरांचा कॅबरे बघत असणार...)म्हणजे बघाना कुठल्या कुठल्या देवाचे नाहीतर बाबा, बुवा, माता, भगीन्यांचे फोटू पाहायला मिळतात. ते जास्तीजास्त लोकान्ना शेअर करायची “देवाज्ञा” असते, नाही केले तर “४२ पिढ्यांचे तळपट होईल”, “धंद्यात खोट येईल”, अशी इशारा वजा (धमकी नाही बरं) प्रेमळ सूचना असते. आम्ही तर बाबा असे पुण्य कमवायची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे आमच्या पुण्याचा निधी हल्ली हल्ली अगदी ओसंडून वाहू लागला आहे. आताशा सरकारने जशी ५००, १००० ची नोट बंद करून अनेक पुण्य(!)वान लोकांची गोची केली, तशी काही तरी देवाज्ञा/ आकाशवाणी(‘मन कि बात’ नव्हे ...तुम्ही पण ना!) करून आमची गोची त्या जगण्नियन्त्याने आणि त्याच्या ह्या भूतलावराच्या एजंटांनी करु नये हि कळकळीची विनंती.
आम्ही राहतो तेथे म्हणजे, सातारा रोड, पद्मावती इथे एक सद्गुरू शंकर महाराज मठ आहे. हि एका महान साधुपुरुषाची समाधी आहे. हे शंकर महाराज मोठे सिद्ध पुरुष होते बरका.आम्ही त्यांचे महान भक्त. पण आमच्या पत्नीच्या मते, आम्ही त्यांचे भक्त बनायचे खरे कारण म्हणजे महाराज स्वत: सिगारेट ओढत असत, इतकी की आज ते गेल्यावरही लोक त्यांच्या मठात सिगारेटी लावतात. उदबत्ती सारख्या, प्रसाद म्हणून, आणि आम्हाला लग्नाआधी सिगारेट ओढायची फार सवय पण लग्नानंतर बायकोने सिगारेट ओढण्यावर बंधने घातली आणि मग आम्ही मठात जाऊन तेथे एकाच वेळी पेटलेल्या शेकडो सिगारेटीच्या धुपात श्वास घेऊ लागलो.सिगारेटचे पैसे हि वाचले आणि बायकोचे शापही. असो तर ह्या शंकर महाराजांनी म्हणे अवतार घेतला तो १८०० साली कधीतरी आणि समाधी घेतली १९४७ साली. चांगले १५० वर्षे वगैरे जगले महाराज... आहात कुठे!. बर समाधी घेऊन असे सिद्ध पुरुष स्वस्थ का बसतात? अधून मधून भक्तांना संकटातून सोडवण्यासाठी, येऊ घातलेल्या संकटाची आगाऊ सूचना देण्यासाठी ते पुन्हा पुन्हा धरतीवर येतच असतात. काय म्हणालात? एखादा मेसेज किंवा स्टेटस अपडेट का नाही टाकत? केली ना नास्तिकांसारखी शंका उपस्थित? अहो हि दैवी माणसं, त्यांच्या लीला अगाध. त्यांना फार डिवचू नये, श्रद्धा ठेवावी आणि आमचा विश्वास आहे बर का, आमच्या भावना दुखावल्या तर महाराज आम्हाला तुमचे डोके फोडायची बुद्धी देतील आणि नंतर रौरवातली उकळत्या तेलाची कढई आहेच. विसरु नका.
तर झाले असे कि नुकताच whats app वर एक विडीयो आमच्या पाहण्यात आला. ज्यात महाराजांची एक छोटी मूर्ती होती.( आम्ही लगेच भक्तिभावाने हात जोडले-त्यामुळे फोन पडला पण फुटला नाही, महाराजांची कृपा!) त्यातले सद्गृहस्थ सांगत होते कि एक माणूस त्यांच्या कडे काही पैसे मागण्यासाठी आला. आता हे काही त्याला ओळखत नव्हते, पण तो माणूस म्हणाला माझ्याकडे हि सद्गुरूंची मूर्ती आहे, ती मी तुमच्या कडे ठेवतो त्याबदल्यात मला पैसे द्या मी नंतर पैसे फेडून मूर्ती घेऊन जाईल. आता हे पडले स्वामी भक्त(सॉरी सॉरी, सद्गुरू भक्त, स्वामी शब्दाचे कॉपीराईट सध्या अक्कलकोटी आहेत.) आमच्या एका नास्तिक मित्राने अक्कलकोट म्हणजे माणसाच्या अकलेला जिथे कोट(भिंती/ तटबंदी) पडतात ती जागा असे आम्हाला सांगितले. त्याची जागा नरकात कुठे मुक्रर केली आहे ते वर सांगितलेच आहे.) त्यांनी लगेच पैसे काढून दिले. काही दिवसांनी हे सद्गृहस्थ घरात काही काम करत असताना अचानक त्यांना सिगरेटचा वास आला. (अहो खरे सांगतो, आम्हालाही लग्नानंतर, म्हणजे घरात सिगरेट-बंदी झाल्यानंतर अचानक असा वास येतो आणि गुरु माउलींची हाक आली असे ओळखून आम्ही लगेच मठात धावतो बरं...असो) आता ह्या गृहस्थांच्या घरात कोणी धुम्रपान करीत नाही, आजूबाजूला कोणी करते का? जवळपास एखादी पानटपरी आहेका / असले अश्रद्ध प्रश्न विचाराल तर आमच्या श्रद्धा दुखावतील आणि मग तुम्हाला माहिती आहेच. मग त्यांनी सद्गुरू आज्ञा ओळखून एक सिगारेट आणली आणि पेटवून महाराजांच्या मूर्तीच्या तोंडाला लावली तर काय आश्चर्य ती सिगारेट त्या मूर्तीच्या तोंडाला चिकटली आणि संपूर्ण राख होई पर्यंत तिथेच तशी चिकटून राहिली.
अहाहा! हा प्रसंग आम्ही पुन:पुन्हा पहिला. पाहताना आमचे अष्टसात्विक भाव उफाळून आले. अंगावर उन्मनी अवस्थेतल्या योग्याप्रमाणे रोमांच उभे राहिले.(हे वाक्य पु.ल. देशपांडे ह्यांनी आमच्या कडून चोरले आणि त्यांच्या पानवाला ह्या कथेत वापरले- त्यांच्याकडे time travel ची विद्या होती.खरच!) महाराज आजही आम्हा भक्तांना निरनिराळ्या प्रकारे दर्शन देत असतात. आजूबाजूला इतके दैन्य, रोगराई, दुष्काळ, उपासमारी, अज्ञान असताना त्याचे निवारण करण्याच्या कामातून सवड काढून आम्हा पामराच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महाराज असे मूर्तीत येऊन सिगारेट ओढतात.
महाsssराssssज! धन्य आहाततुम्ही. तुमच्यासारखे गुरु आम्हाला भेटले हे आमचे अहोभाग्य. वाड वडलांची पुण्याई फळाला आली.( बायकोने विचारले ,”ते सगळे ठीक आहे. पण ते पैसे उधार घेतले होते त्या माणसाने? ते परत केले कि नाही? आणि असे किती उधार पैसे घेतले होते, मूर्ती तारण ठेवून? ” अश्रद्ध आहे आमची बायको, तिची पण जागा ....काही नाही, काही नाही!)
--आदित्य
प्रतिक्रिया
रौरव नरकाची धमकी वाजवीपेक्षा
रौरव नरकाची धमकी वाजवीपेक्षा जास्त वेळा आली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
'जौक' जो मदरसे के बिगड़े हुए
'जौक' जो मदरसे के बिगड़े हुए हैं मुल्ला
उनको मैख़ाने में ले जाओ,संवर जाएँगे।
लिखाणाची पद्धत आवडली.
लिखाणाची पद्धत आवडली.
लेख आवडला, तूमी दूश्ट आहात.
लेख आवडला. खूप थेट आणि खूप झक्कास लिहीलेला आहे. पुलंची आठवण करून दिलीत. मुख्य म्हणजे असं लिहायला धाडस पाहिजे. असेच अजून लेख आल्यास खूप आवडेल. अत्र्यांचीही आठवण आली, त्यांनी कोणा एका पुस्तकात एका बाबाची प्रचंड तासली आहे ते आठवलं.
बाकी तूमी दूश्ट आहात कारण-
मला जरा वेळ मिळालाय तेव्हा मी माझे अध्यात्म आणि एकूणच दैवाबद्दलच्या प्रयोगांवर दोन-तीन लेख पाडायच्या
प्रयत्नातविचारात होतो. तुम्ही ते सुरू करून माझा नंबर हिसकावलात.- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
अत्र्यांचीही आठवण आली,
केडगावच्या नारायण महाराजाची.
हे तासणे एवढे 'प्रचंड' होते की आज जर कुठल्या बाबाविषयी असे लिहिले तर त्याचा खुनच पडेल.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
लेख आवडला. खुसखुशीत अगदी.हा
लेख आवडला. खुसखुशीत अगदी.
हा बाबा अट्टल गंजाडा दिसतो. बसला देखिल तसाच आहे. नक्की का म्हणून लोक ह्याला देव- संत- सदगुरू वगैरे मानतात काय कळत नाई.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
के० महाराज काही न करता
के० महाराज काही न करता छत्रचामरंसुग्रासअन्नसुख उपभोगायचे म्हणून बरेचजण त्यांच्यावर जळायचे.
आम्हीही
आम्हीही छोटाप्याकबडाधमाकाबाबाच आहोत. कुणालाही धमकी देत नाही.