The Reader: वाचाल तर वाचवाल

Kate Winslet म्हटली, कि Titanic मधली उच्चभ्रू, सुसंस्कृत तरुणी आठवते. तिच्यातली उत्स्फूर्त, प्रखर अस्मिता असलेली प्रेयसी जॅक च्या सान्निध्यात समोर येते. त्या व्यक्तिरेखेचा इतका पगडा मनावर होता, की पुढची अनेक वर्ष अभिनेत्री आणि व्यक्तिरेखेतली सीमारेषाच धूसर होती.

पण The Reader मधली केट, बघताक्षणीच वेगळी व्यक्ती असते. हॅना श्मिट्झ. जर्मनीतली, दुसऱ्या महायुद्धातली साधी ट्राम कंडक्टर असलेली ही एकसूरी जगणारी मध्यमवयीन बाई. पण तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या एका मुलाची तिच्याकडे चोरून बघणारी नजर ती ओळखते. आधी निरुपद्रवी विरंगुळा म्हणून त्यांचं 'प्रेमप्रकरण' सुरु होतं. पण कोवळ्या वयाचा हा मुलगा तिच्यात गुंतत जातो, ते त्याचं त्यालाही कळत नाही. ती मात्र कायम रोकठोक अंतर राखूनच वागते. प्रत्येक भेटीत त्याला विचारते, "तुझ्या शाळेत कोणतं पुस्तक चाललंय सध्या? वाचून दाखव बरं!" तो वाचतो:
"Sing to me, Muse, of the man of twists and turns........"
ती म्हणते, "किती सुंदर हे शब्द! छान वाचतोस...." तो तिला बरेचदा पुस्तकं देऊ करतो, पण ती म्हणते, "नको, मला तू वाचून दाखवलेलंच आवडतं!"

The Reader हा चित्रपट मूळ कादंबरी Der Vorleser वर आधारित आहे, आणि Der Vorleser चा अनुवाद "वाचणारा" असा नसून "वाचून दाखवणारा/पाठक" असा होतो. हा मुलगा उन्हाळी सुट्टीतला 'पाठक' होतो. हॅना श्मिट्झवरच्या प्रेमापोटी, आपण वाचून दाखवताना बदलणारे, तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायचा प्रयत्न करतो. पण एके दिवशी ती अचानक दुसऱ्या गावी बदली होऊन निघून जाते.

मुलगा पहिल्या प्रेमभंगातून सावरतो, मोठा होतो, आणि नामांकित 'न्यायशाळेत' वकीली शिकू लागतो. दुसरं महायुद्ध संपलेलं असतं. आउश्वित्झचे खटले (The Auschwitz Trials) सुरु असतात, तिथे सगळे न्यायशास्त्राचे विद्यार्थी उपस्थित असतात, त्यात हा मुलगाही असतो. आणि तिथे त्याला दिसते- हॅना श्मिट्झ. ती तिथे का आलेली असते, हे रहस्य भंग करीत नाही. मात्र मुलाला अचानक साक्षात्कार होतो, की ....... अ)...........आणि ब)............!!!

बरेचदा हिन्दी चित्रपटात (रहस्यकथा असो किंवा थरार) प्रत्येक प्रतीक, प्रत्येक घटना, प्रेक्षक ४ वर्षाचे असल्याचे गृहित धरून अती स्पष्टीकरण केले जाते. "द रीडर" तसे स्पष्टीकरण देत बसत नाही, आणि ह्यामुळेच तो विचारप्रवर्तक होतो, हे आवडलं!

ह्यापुढील चित्रपट नायकाच्या अस्वस्थतेचं चित्रण करतो. एकेकाळी आपली प्रेमस्वरूप असलेली "मायभू" जर्मनी (जरी जर्मनीला पितृभूमी म्हणतात, तरी, इथे मायभू म्हणणे समर्पक ठरेल). युद्धानंतर देशप्रेमाचं परिवर्तन लज्जा आणि संभ्रमात झालेल्या पिढीचं प्रतीक आपला नायक आहे. ह्या पिढीला आपल्या इतिहासाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग हवाय, म्हणूनच, आपला तरुण नायक स्वतःलाच प्रश्न विचारून आत्मपरीक्षण करतो आहे, की "ज्यू लोकांचं शिरकाण करणाऱ्या माझ्या देशावर मी प्रेम कसे करू???" माझ्या देशाने हे अघोरी कृत्य केलंच कसं? का केलं?

"वाचाल तर वाचाल" हे आपण ऐकलेलं आहे, पण "वाचाल तर वाचवाल" हे द रीडर बघून कळलं. आपण वाचतो, वाचन खूप महत्वाचं आहे वगैरे सर्वांना माहिती आहे, पण वाचनाचा खरा अर्थ म्हणजे केवळ माहिती मिळवणे नसून, पुस्तकातील व्यक्तींशी, घटनांशी एकरूप होणे. पुस्तकांच्या स्थल-कालाबाधित अस्तित्वातून जेव्हा आपण समग्र मानवी जीवनाशी जोडलेजातो, तेव्हा 'सहानुभूती' चा खरा अर्थ वाचनातून जाणवतो. एखाद्या सर्वस्वी वेगळ्या संस्कृती/काळातल्या व्यक्तिरेखेच्या भावानुभवाशी जोडल्या गेल्यावर 'नीती' 'दया', ह्या स्थलकालाबाधित 'मानवी मूल्यांची' किंमत कळते.

कथा इतकी सशक्त असल्यावर अभिनय त्या तोडीचा नसेल तर अतिशय त्रासदायक अनुभव येतो, पण इथे केवळ २-३ प्रमुख व्यक्तिरेखा असूनही त्या कलाकारांनी आपल्या अभिनयातून कथा फार ताकदीने पेलली आहे. तरुण नायकाचा (डेव्हिड क्रॉस) अभिनय नंतरच्या राल्फ फिनेसपेक्षाही फार भावला- पण आधीची निरागसता आणि नंतरची प्रौढ निराशा यातील विरोधाभासामुळेही असेल. युरोपचं सुंदर चित्रण, शिवाय हॅनाच्या खोपटेवजा घरातून अप्रतीम वातावरणनिर्मिती होते कारण ते घर, तिच्या रुक्ष जीवनाचा आरसा असतं. पार्श्वसंगीताचं अस्तित्व जाणवू नये, पण त्याने भावनिक उंची नेमकी टिपावी हा ही तोल समर्थपणे सांभाळला गेला आहे. ह्या सर्वांतून दिग्दर्शक स्टीफन डालड्री ची पकड जाणवते.

पुढील वाक्यांतून रहस्यभेद होऊ शकेल, त्यामुळे चित्रपट पाहिला नसल्यास वाचू नये:

हॅनासाठी अधिक लज्जास्पद काय होतं? निरक्षरता? की निर्दयता? जी व्यक्ती आपल्या कर्माचा 'अर्थ' समजून घेऊ शकत नाही, तिला त्यातली निर्दयताही दिसली नाही, त्यात नवल ते काय? पापणीसुद्धा न मिटता तीजन्मठेपेचा स्वीकार करते, पण शिक्षा भोगतांनाही तिच्या मनात खरा पश्चात्ताप निर्माण होत नाही. त्या अर्थी तिचा आत्मा कधीच त्या कृत्यातून मोकळा होऊ शकत नाही.

हॅना ला 'वाचवण्यासाठी', तिला 'वाचता' यावं लागणं अपरिहार्य असतं. अनेक वर्ष हा मुलगा, हॅनावरील प्रेमापोटी, पुस्तकांचा खजिना स्वतः 'वाचून', ध्वनिमुद्रित करून तिला पाठवत राहतो. तिला वाचनाची गोडी लागावी म्हणून धडपडतो. आणि एक दिवस तिचा 'आत्मा' जागृत करण्याचं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये असतं. त्या अर्थी दुःखांतसुद्धा अतिशय समर्पक वाटतो. नायक आपल्या मुलीला ही गोष्ट सांगतांना स्वतः त्या अनुभवाचा स्वीकार करतो, आणि तीच पुढे जाण्याची एकमेव वाट असते...

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लगेच पाहीला. मस्त आहे. सिनेमा आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मात्र मुलाला अचानक साक्षात्कार होतो, की ज्या व्यक्तीवर त्याचं पाहिलं प्रेम होतं,

ह्यापुढे तुम्ही जे लिहिलं आहे तेसुद्धा चित्रपट पाहताना रसभंग करू शकेल असा तपशील आहे. ते वेगळ्या रंगात दाखवून किंवा रहस्यभेद असल्याची सूचना देऊन मगच सांगावं अशी विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

असं आपलं मला वाटलं.
पण सूचनेनुसार बदल करीत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर्मनीमध्ये आता नवनाझी किती जोरात आहेत, माहीत नाही. काही वर्षांपूर्वी एक मित्र तिथे होता; त्याचं म्हणणं, अगदी फारच क्वचित, तुरळक असतात आणि फार आवाजही नाही. त्याबद्दल आनंद मानला पाहिजे. मात्र हिटलरबद्दल फार बोललंही जात नाही; सगळं कार्पेटखाली सारून दिल्यासारखं; असं काहीसं त्याचं म्हणणं होतं.

हाना त्याची प्रतीक वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.