गरिबीचा विळखा

सकाळ सकाळचं उन्हं चटकतं होतं. रायबानं दोन तीन पोती कांदयाची आणली होती. रातचं त्यानं कोठयावर आणून ठेवली होती.आज आठडयाचा बाजार.आठ दिवसा पासून त्यानं कांद काढून ठेवलं होतं. तसचं चांगलं चांगलं निवडून ठेवलं होतं. लालजरीत कांदं.. चमकत होतं. लयचं प्यूअर कांदा आला होता. बरं ते पोसला भी चांगला होता.खाताडाचा जोर होता. आंवदा त्यानं कारखान्याची गाडी बंद केली.. शेतातच डोकं लावलं होतं.दोघ नवरा बायको आणि एकुतली एक पोरगी. सारचं शेतात राबत होतं. उषीची शाळा म्हणजे नावला साळा. परीक्षा बीरीक्षा असली की त्यावढया पुरतं साळात जायचं. नाहीतर सारख रानातच खपायचं. मास्तरं भी चांगलेत. घेतेत ॲडजेस्ट करून… त्यांना भी महीती गडयाची लयं तारांरबळ आसती.पोरी लयं लांबच्या साळात पाठवीणं भी जरा रीस्कचं कामं. आताचं पोरं आसली निघालीत. सैराटी कोंढूळी…. बरं ‘शिकून तरी काय होतं? कुठं नवका-या लागत्यात आता?
दोनचार पोताड अस डोक्यावरचं वाहील्या मूळं त्याचा घामाघूम झाला होता.रानतून पार सडकाला आणयचं म्हणजे…सोप्प् काम नव्हतं.बैलगाडी नाय. आंवदा गाडीचं नाय म्हणल्यावर बैलं तरी ठेवता येतत का ? टाकलं ते अघोटीतचं फुकून. गाडी दिली अंकुश्याला.जीतराब भी संभाळयाचं सोप काम नाही राहील.उग ज्यारं होतं माणूस.तेवढं लयं आडतं भी नाय त्याच्यावरून. टमटम आलं की त्यात टाकून ते जायचं होतं.आता कशाला भी टॅक्टरं नि टमटमच आसत्यात. राती घरी जाऊन त्यानं शाम्याला इचारलं होतं. दोन चार पोताड कांदयाची तेवढं… रामपूरी पर्यतं घे सकाळ सकाळ गेलं तर मग बरं पडतं.त्यांचा भी धंदाच राहतो.ते कशाला नाय म्हणतेत.आता हयो माळावर थांबलेला.सारं पोताडी आणलेली. मेथीचं भी एक बाचकं आणलं होतं.टमटम आलं पण जॅम आलं. सारं गच्चं भरलेलं.. उलटं.. दोघ तिघं… त्याला मागून लटकलेले.. सारं पॅक झालेल.जॅमच.शाम्या नुसता हासला. आता तेव्हं तरी काय करणार? कुणाला उतरं म्हणता येतं का? तेव्हं म्हणल्यानं कुणी उतरत तरी असतं का? बाजकी नी बोचकीनं…मुंगीला शिरायला जागा नाही.
“शामा, आता म्या कशात पोतं टाकू ?”
“आयला. तुझं खरं लका पण म्या तरी काय करू. गाडी लाऊस्तोवरचं जॅम झाली.भरं एकदा माणसं बसलयावरं…काय करता येतं?”
“आयला,तुझ्या भरोश्यावरच थांबलो होतो.”
“तुझं खरं पण… म्या काय करू. ये कशानं तरी.”
“असं आसतं का रं? भरोश्याच्या म्हशीला टोणगा.लका परत तरी ये.”
“ छया..छया..!! कसलं परत येतुस? परत आल्यावर… स्पेशलं भाड पडंनं. ते तुला काय परतळं खातं.”
“आयला शामा, तुवा लयं झोपीत डोक्यात धोंडा घातल गडया.” आता सारं पॅक झालेले. टम टम.. लोकं कुठं टायेम पास करून देत आसतेतं व्हयं? बाराची बारा.
“आरं ,शाम्या, शहण्या,,तेव्हं पैसं देणारं ने आमही काय कवडया.. देणारेत व्हयं?” जग्गू दादा उगचं म्हणाला.त्व्हं असाचं पाऊर हाणीत आसतो कुठं भी.
“तसं नाय. त्याला सांगावा आपलं. नायतर तेव्हं बसायचा आपल्याचं भरोश्यावर.” सारचं गडी गडबड करायला लागली. त्यांच बरूबर होतं. आता इथचं नऊ वाजलं होतं. बाजारात पोहचायला. पार दहा वाजायच्या. भर लवकर गेलं तरं चांगली जागा भेटती नाय तर.. मग बोंबलच्या रांगाकडं नाय तर मिरच्याच्या हारमळीला बसावं लागतं.त्यामुळं सारचं जणाचीं घाई आसती. शाम्याला काय तेवढचं पायजे होतं.त्यानं लगेच सेल्फ मारला. ते डुगडुग करीत हाललं.त्यातं लोडचं तेवढा होता.ते हाललं पण रायबाचा जीव मात्र घोरात पडला.उगचं कुणी तरी मोठा डोंगूर पुढं टाकलाय आणि आता तेव्हं चढयाचा असं झालं.
त्याची बायको कुशी,पोरगी उषी पण बाजाराला ‍निघाल्या होत्या. उषीचा लय नाद होता.तिनं उग घोकं घेतला होता. कामं काय होतं तर तिला डेस घ्यायचा होता. आत्याच्या पोराच्या लग्नातला एक भारी ड्रेस होता. तिला पण तेव्हं पार वीरला होता. धूवू धूवू तेव्हचं घालायचा.भारीतला असला तरी रोजच त्याचं धूणं झाल्यावर. पोथारा व्हायला काय लागतं? भरं जी गाडी येई ती.पॅकचं येई. यांचं चार पोती. तीनं सीटं… लोडचं व्हायचा.एखादं आसतं तर कसं लटकून फिटकून जाता येतं. गाडीचं थांबत नसं.तास झाला. दीड तास झाला. आजून ते माळावरचं… आता काय बाजार सोडयला जायचं का ? त्यांच्या जीवाची नुसती घालमेल व्हायला लागली. बायकोनं पोरगी म्हणल्या आम्ही परत जातोत पण हयो गडी ऐकाना. आसला हीरमूड आसतो काय?जाऊ उग परत जायचं म्हणजी बरं नाय.
तेवढयात एक डबरीवरला ट्रक आला.त्याला हात केला.ते निघालं भीमा वड-याच्या पोरग.त्यान वळखील.बरं त्यात भी डबर आणलेली.शामा लयचं काकूळती आला. तेव्हं झाला राजी पण आता डबरांनी भरलेल्या ट्रकवर पोतं उचलयचं कसं ? त्या पोरांनी मदत केली पण शामाची आताडीनं आताडी गोळा झाली. कशी बशी डबरीवर तिघं माय लेकरं बसलं. त्या ट्रकातली पोरं नुसती मागं माग वळू वळू बघायची. पोरचं ती. नवाट पोरगी दिसल्यावर चेकाळलं.शामाला मस्स राग यायचा पण बायकोनं आवरला. नाय तरी त्याचा राग काय कामाच होता.लयं शहाणपणा केला आसता तर दिलं असतं मध्येच उतरून. काढलं असतं पीसून.ते चांगलं नवाट चार पाच जण होतं. याचं काय चालायचं त्यांच्य पुढं.
डबीरीनं भरलेला ट्रक गावात कशाला जातोय. ते बाय पासनचं जाणारं. पैसं थोडचं कमी घेतोय.एका पोत्याचं तीस. असं चार पोत्याचं. एकसं वीसं. तीन सीटाचं नव्वदं. असं दोनशे दहा रपये घेतलं. मेथीच्या बाचक्याचं काहीचं नाय घेतलं. रायबानं त्याचं उपकार मानलं.परात भर कांद त्यांना दिलं. जर ट्रक आला नसता तर कशाचा बाजार कशाच फीजारं. राहीलो आसतो माळावर.त्या शेरीच्या पूलाजवळ त्यानं उतरीलं. तिथून काय बाजार जवळ नव्हता. रीक्षावाले अश्या टायमला आडूनचं बघणारं. बर आता खिशात खडकू भी नव्हता राहीला.चाळीस पन्नास रूपये राहीले होतं. ते गेलं की कमीटीवालं मागं लागतेल. ते भी पोतयावर पटटी आकरेत. दहा रूपायला पोतं. त्यांचं काय ? मनचं राजं ते. पार त्वांड वाळून गेलं होतं. अकरा वाजून गेलं होतं.
“उषे, पळ भर जाग धर.” कुशीला पुढचं मराणं दिसतं होतं.जागाचं नाय चांगली मिळाल्यावर…
“तुझं तर काही निघत. लेकरू कसं जागा धरीन.तिला कोण मेळ लागून देत आसतं व्हयं?” रायबा लागलीच कुशीवर वसकला.
“मग काय करायचं? जागाच नाय ना मिळायची. बसा बोंबलत.”
“उग नक्कू शाहणपणा हाणू. चल लाव हात.” असं म्हणला. ताणताणच एका पोत्याला हात लावला. बळचं दात खावून पोत उचललं.आतडी पार पिळाटून गेली.उषीनं हात लावला.मधून शिरले. रस्ता मस्सं शॉर्ट कटचा पण लयं खराब. खडी सारी वर आलेली. याडपाट ची काटं जागजागी. हागणदारी भी त्याचं रस्त्याला. पायाची गोळ पार पिंढरी पर्यंत आले आसतील.त्याचा पायचं उचलत नव्हता. धाप लागली होती. काही आलं की त्याचं पाय तीरघडयाची. तसं उषीच्या जीवाची घालमेल व्हायची. मोठया मोठया कार मध्ये माणसं ऐटीत बसून जात होती. हॉर्न वाजत होती. आपल्या बापाची कधी दयीना फिडनं असं वाटायचं. लयं शिकलं पायजे. मोठं साहेबीणं झालं पायजे असं तिला वाटं.नुसतं वाटून काय उपेग ?

बाजारात आलं तर सारी गर्दीचं गर्दीं होती. सारं इकडचं ट्रॅफीक जॅम झालेलं. आत घुसताच येईना. उषी पुढं सरकून वाट काढीत होती.काही पुढं सरकायची. काही रगेल वाणी तिथचं उभा राहीयची. कडीकडनं रस्ता काढीत ते घुसले खरे पण पुढं. त्या चहाच्या टपरी पाशी सारं पाणीचं सांडलेले.सारा रेंधा झालेला. कसं काय झालं न कासं काय माहीत ? गापकुणी पोतचं खाली पडलं. तसा रायबा भी खाली पडला.पोत खाली पडल्या मळं रेंधा उडाला. एका मामूच्या पांढ-याफॅक पायजम्यावर गेला. तसा तेव्ह ओरडतचं अंगावर धावत आला. रायबा खाली पडल्यामुळं सारी पँन्टं भरली. बळचं तीरघडत उठला.हात जोडलं. हात जोडलं तरी मामूचा तवा चांगलाचं तापला व्हता.
“मादर चोद.. हरामखोर दिखता नही का?” सारचं मुसलमानं गोळा झालं. नुसती चॅवचॅव करायला लागले.पांढ-या शुभ्रपठाणी ड्रेस. त्याच्यावरचं चित्रं उमाटलं होती. तेव्हं अंगावर धावत आला. रायबबाला काहीचं कळत नव्हतं. त्यानं आपलं नुसतं हात जोडलं.
“नाय हो. मामू, पाय घसरला.” उषीनं त्या मामूचं पाय धरलं.गयावया करू लागली. सारं लोक जमलेली… आता बाराची बारा. कुणी काही. कुणी काही म्हणं.
“नका हो मामू. नका हो मामू.नका हाणू. त्यानं धाप लागली.” सा-यानाचं कीव आली. “सारचं जाऊ दया. दया. वझं झालं आसलं. पाय घसरला आसलं”. असं म्हणायला लागले. मामू लयं पावरात होता पण जरा नरमला व डाफरतचं म्हणाला,” छोकरी के वास्ते छोड देताय.” सा-यानीचं त्याची कीव केली. एवढं ओझं कशाला डोक्यावर आणायच रिक्षा करायचा. असं काही बाही म्हणायला लागली. रायबा कधी नाय ते इरमाटून गेला. पोतं बाजूला वढीलं.उषीला तिथंच बसून तेव्हं बाजारात गेला. जागा धरायची होती. फुल्ल् बाजारं भरलेला… आता कशाची जागा. सारी कडं फिरला. बोंबलाच्या आळीच्या आलीकडं कासारीचं काही दुकानं होती.त्या दुकानाच्या हारमळीत पलीकडं माग आडोश्यला लघवीला जात तिथं थोडी जागा होती. ते कासारं कसं बसून देतेल? बरं त्या आळील एक माळयाचं दुकानं नाही. भेतं भेत कासाराला त्यानं इचारलं. ते सुभा कासाराचं पोरग होतं. सुभा कासारं. रायबाच्या वडीलाचां लयं दोस्तना. ते आता सुधारलं. रामपूरीत त्याचं दोनं दुकानं. बाजारं भी करत्यातं. सुभा कासारं थकलाय आता. त्यालाच इचारावं अम्हणून त्यानं त्या पोराल इचारलं. “मांडा माझी काय हरकत नाय.” अशी परवागी दिली.वळखं कामाला आली.
त्यानं लगेचं तळवट आथरीला. काटा मांडला नंतर उषीला हाका मारल्या. आता तसल्या गर्दीत तिला कसं ऐकू जाणारं… पळत गेला. उषीला आणलं. कांदयाचं पोतं अर्ध ओतलं. लाल जरीत कांद नुसतं चमकायची. लोंकाची कांदं एवढी तेजदार नाहीत.असं त्याची त्यालाच वाटलं. लोंकानी पाहीलं की कांदं घेतल्याशी कोण पुढं जात. कांदचं लयं भरी होतं. चांगलं निबारे पोसलेलं. लोकासारख्या चींगळया नाहीत. उषी नळावर गेली. पाणी आणलं.रायबा पाणी प्याला. उन्हं चटकायला लागलं होत. च्याचं फुळूक पाणी प्याला. तसं त्याला थोडी तरतर आली. खरं तर तरतरी त्याला आपलं दुकानं थाटल्यामुळे आली होती. त्याचा जीव हुरूळून गेला. उग पळतचं परत गेला. दुसरी पोतं आणयची होती. मेथीचं बाचक आणायचं होतं.
उषी दुकानं मांडून बसली. कुणी गि-हाईकच येत नव्हतं. बोंबलाच्या आळीला लोक सारं माळं घेतल्यावरच येणार. आलं तरी नाकचं दाबून येणारं.आलचं एखाद तर उग चौकशी करं. उग भाव करीत बसं. भाव पाडून माग. तेवढयात कमीटीवाली पोरं आली. लगेच ते लागले पटटी मागायला. उषी जवळ कशाचं पैसेत.आताचं दुकानं मांडलं. भवानीचं झाली नाय असं ती मस्स् काकुळतली येउन सांगायचे पण ते पोरं ऐकेनात. आता ते पोरं नी पोरगी…. ते उगचं मज्जा घ्यायला लागले. ती पार ज्यारं झाले. गडी काय ऐकेनात. हे सारं त्या कासा-याच्या पोरानं पाहीलं.ते तिथूनचं खवळला,”सांगू काय चेअरमनला ?लयं झालं काय ?” आता त्याचा वठ होता मार्कटमध्ये.ते पोरं तक्काडं पळाली.
“तायडे, आसल्याला भ्याचं नाय. रगडून बोलयचं. भाकरीपायी हमाल्या करेतत. उग हाणेत शहाणपणा.”
त्याचं बोलण्यानं तिला धीर वाटला.
मेथीचं बाचकं.पोतं आणलं.पुन्हा दोघ जणं आलं. बाजार चांगलाच भरला होता. यांच्या हरामळीला कुणी येत नव्हतं. बरं मेथी उन्हात तळून गेली होती. पार सुकल्यामुळं.तिला कुणी इचारीना.रायबबला पोटातचं कसं तरी व्हायला लागलं. पोटातचं काय नव्हतं. वझं तसलं उचलीलं होत. पोटात कालीत होतं.तिथचं भाकर सोडली वांग्याचं भरीत होतं. खाल्ल् दोनचार घास.तसल्या टायमाला घास गिळत असतो व्हयं कुठं ? कुशी तरं नुसती तवांडच पाणीच गिळीत बसली. इकलंच नाय असं नाय पण उग चार पाच किलो कांद विकलं. मेथी तर फुकटचं दील्यावाणी दिली. रूपायला जुडी. बाजार ओसरू लागला. तशी त्यांची तग मग वाढली. बाजार हाट नाय. ड्रेस नाय. कापड नाय.उषी कधी आपल्या ड्रेसं कडं पगायची तर कधी तिच्या बापाच्या बंडीकडं.तिची तगमग वाढली. लाजाळू पोरगी पण मोठयानं ओरडू लागली.
“कांद घ्या. लाल कांद. घ्या.”
काही माणसं येईत. भाव करीत. कुणी घेई. एक पोत विकलं होतं. अजून तीन पोती कसं विकायचं.
ती आरडून विकालया लागली.रायबबाला नव्हतं जमतं.त्याला उगचं कसं तरी वाटायचं. काय आपलं नशीब. काय पोरीवर येळ आणली. उगचं जीवाला खायाच. नशीबबाला दोष दयायचा. त्याची घालमेल पाहून त्या कासाराच पोरालाच त्यांची दया आली.
“रायबा मामा, आता बाजार ओसरला.इतकं पोती कवा खपायची.धाब्यावाल्याला दयाची का गुतचं. त्याला लावतो घ्याला.”
“ घेईल का ?”
“त्याना काय कीती आसलं तरी कमीचं पडतेत. घे म्हणतो. जरा भाव कमी करीन.”
“लाव बब्बा. नाय नाय कशला म्हणू. आता हे परत कसं नेऊ.कसं भी दे.”
दहा पंधरा मीनीटात तेव्हं धाब्यावाला आला. राहीलेल्या पोत्याचं दोनशे दिलं. मेथी. गुत्तीचं पंधरा रूपायला दिली.सारं अडीशे रपये आलं. सकाळी खर्चीलाचं घेतल होंत उसनं जालू आण्णंकडून. तेवढं ही नाही मिळालं.तिघ परत आलं. पोटात आग पडली होती. कापडं नाय. बाजार हाट नाय. तसचं परत फिरले.रायबबाला चालणं होतं नव्हतं.
दोघीनं त्याचं हात खांदयावर घेतलं.तो फरकत फरकत चालत होता. स्टँडवर आले.एस. टी कवाच गेली होती. बाकडावर ते बसले होते.रायबाला दम लागत होता तर. शीळया भाकरीचं तुकडं पाण्याबरूबर कुशी गिळतं होती.पोटातील आग कशी तरी गार करावीचं लारगणारं होती. उषी मात्र इचारत पडली होती.हा अंधार काही तासात निव्वळलं. पृथ्वी स्वत:भोवती फिरली की रात जाईल दिवस येईल पण हयो दाद्रियाचं अंधार कसा दूर होईल?
अंधार गच्च दाटून आला होता.
परशुराम सोंडगे,पाटोदा
९५२७४६०३५८

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अस्सल लेखन. फार हृदयद्रावक. लिहीत रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0