Dead Man's Hand - ९

रोहितचा चेहरा पाहताच काहीतरी भानगड आहे याची कदमना कल्पना आली होती. त्याने पुढे केलेल्या कागदावरच्या त्या मेसेजचा अर्थ लक्षात येताच ते सुन्नपणे त्याच्याकडे पाहतच राहीले.

एक शब्दही न बोलता त्याने खंडाळा पोलीस स्टेशनला फोन केला आणि फोन आढळलेल्या जागेचं साधारण लोकेशन सांगून त्यांना चौकशी करण्याची विनंती केली. पाठोपाठ मुंबईला येण्यासाठी निघालेल्या देशपांडेंना खंडाळा गाठण्याची सूचना देण्यासही तो विसरला नाही. दरम्यान कदमनी किरणच्या मोबाईलला कॉल लावला होता. रिंग जात होती पण किमान पाच - सहा वेळा प्रयत्नं करुनही किरण फोन उचलत नव्हता. त्यांनी स्वप्नाचा नंबरही डायल केला, पण अपेक्षेप्रमाणे तिचा फोन ऑफ येत होता.

"कदम, तुम्ही फ्रेश व्हा! आपल्याला शक्यं तितक्या लवकर खंडाळ्याला निघावं लागणार आहे."

तासाभराने कंट्रोलरुमचा मेसेज आला तेव्हा त्याची कार वाशीच्या फ्लायओव्हरवर होती.... खंडाळा पोलीसांना जुन्या मुंबई - पुणे हायवेपासून जवळच एका रिसॉर्टच्या रुममध्ये किरणचा मृतदेह आढळला होता! त्याच्या पाकीटात सापडलेल्या ड्रायव्हींग लायसन्समुळे त्याच्या मृतदेहाची अगदी सहजच ओळख पटली होती.

"शेवटी स्वप्नाने आपल्यावर मात केली कदम! फेअर अ‍ॅन्ड स्क्वेअर!" रोहित दीर्घ नि:श्वास सोडत म्हणाला, "किरण इज डेड! खंडाळ्याच्या एका रिसॉर्टमध्ये त्याची डेडबॉडी सापडली आहे! अ‍ॅन्ड आय अ‍ॅम शुअर, स्वप्ना एव्हाना तिथून गायब झाली असेल!"

"सर...." कदमना काय बोलावं सुचेना!

रोहितने कमिशनर मेहेंदळेंना फोन करुन थोडक्यात सगळी कल्पना दिली. सकाळी-सकाळी ही बातमी ऐकताच मेहेंदळेही हादरुन गेले. आपण घटनास्थळी जात असून आमदार चव्हाणांना ही बातमी कळवण्याचं कर्तव्य त्यांनीच पार पाडावं अशी त्याने विनंतीही केली. त्याचा फोन येऊन गेल्यावर कमिशनर मेहेंदळे पाच मिनिटं डोक्याला हात लावून बसले. आमदार चव्हाणांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने आणि गृहमंत्र्यांशी असलेले त्यांचे अत्यंत जवळचे संबंध यामुळे आता हे प्रकरण अत्यंत तापदायक ठरणार याची त्यांना कल्पना आली होती.

रोहितची कार खंडाळ्याच्या त्या रिसॉर्टमध्ये पोहोचली तेव्हा साडेनऊ वाजत आले होते. खंडाळा पोलीस स्टेशनचे इन्स्पे. भोपटकर, सब्. इन्स्पे पारखे तिथे पोहोचलेले होते. प्राथमिक पंचनाम्याचं काम सुरु झालेलं होतं. पोलीसांनी रिसॉर्टच्या परिसरात कडेकोट बंदोबस्तं ठेवलेला होता. पोलिसांच्या परवानगीविना कोणालाही रिसॉर्टमध्ये येण्यास किंवा बाहेर पडण्यास सक्तं मनाई करण्यात आली होती. रोहितने भोपटकरांना आपली ओळख करुन देताच ते म्हणाले,

"प्रधानसाहेब, तुमचा फोन येताच आम्ही शोधाशोध करण्यास सुरवात केली. मोबाईलच्या लोकेशनवरुन आम्ही इथे आलो तो इथे किरण चव्हाण या नावाची एन्ट्री सापडली सर! आम्ही त्याला फोन केला, रिंगटोन वाजतही होती, पण तो फोन घेत नव्हता. अखेर मास्टर कीने दार उघडून आम्ही रुममध्ये आलो तोपर्यंत तो एक्स्पायर झाला होता. मग माझ्याबरोबरच्या काही माणसांना मी खंडाळा आणि लोणावळा स्टेशन आणि एस टी स्टँडवर पाठवलं. ते लोक अद्यापही त्या एरीयातच चौकशी.... "

"त्याचा काही उपयोग होणार नाही भोपटकर. आतापर्यंतच्या आमच्या अनुभवावरुन तुम्ही इथे येण्यापूर्वीच स्वप्नाने खंडाळा-लोणावळा सोडलं असणार हे नक्की! एनी वे लेट्स सी द बॉडी!"

किरणचा मृतदेह बेडवरच झोपलेल्या अवस्थेत पडलेला होता. पांढरा पायजमा आणि कुर्ता त्याच्या देहावर होता. त्याच्या चेहर्‍यावर भय आणि वेदना असे संमिश्र भाव होते. मृत्यूपूर्वी भितीदायक असं काहीतरी त्याने पाहीलेलं असावं असा सहज तर्क करता येत होता. त्याची बाकीची रुम व्यवस्थित होती. प्रत्येक वस्तू जागच्या जागी होती. मारामारी किंवा साधी धक्काबुक्की झाल्याचं एकही लक्षण तिथे आढळून येत नव्हतं. पोलीस फोटोग्राफर मृतदेहाचे आणि रुमचे फोटो काढण्यात मग्नं होता. बेडशेजारी असलेल्या टेबलवर नजर जाताच रोहितच्या चेहर्‍यावर नकळत हलकीशी स्मितरेषा चमकून गेली. टेबलवर मुद्दाम पालथा ठेवलेला पत्ता! कदमांकडे अर्थपूर्ण दृष्टीक्षेप टाकून त्याने तो पत्ता उचलला.

चौकटचा गुलाम!

"अ‍ॅज एक्स्पेक्टेड, डेड मॅन्स हँड इज कंप्लीट!"

रुमला लागून असलेल्या बाल्कनीचं त्याने काळजीपूर्व़क निरीक्षण केलं, पण त्याला विशेष असं काही आढळलं नाही. तो रुममध्ये परत आला तेव्हा कदमांच्या हातात किरणचा फोन होता. त्याच्याशी नजरानजर होताच त्यांनी फोन पुढे केला. तो काय ते समजून गेला.

तोच मेसेज, तोच नंबर आणि तेच भवितव्यं..... मृत्यू!

Game over. Your time is up – Swapna.

"किरणचा फोन सकाळी सहा वीसला ऑन झाला आहे सर! स्वप्नाने त्याला साडे सहा वाजता मेसेज केला आहे. त्यावेळेस ती इथेच होती! त्यानंतर ती पावणे सात ते सव्वा सातच्या दरम्यान ती लोणावळा एस टी स्टँड आणि रेल्वे स्टेशनच्या एरीयात होती. सात वीसला खंडाळा रेल्वे स्टेशनच्या एरीयात तिचा फोन स्विच ऑफ झाला आहे.

"भोपटकर, तुम्ही इथे किती वाजता आलात?"

"साडेसातला सर!"

"साडेसात...." रोहित विचार करत म्हणाला, "सात ते साडेसातच्या दरम्यान लोणावळा स्टॅंडवरुन किंवा स्टेशनवरुन बाहेर जाणार्‍या किती बसेस किंवा ट्रेन्स आणि टॅक्सी असतील? एनी आयडीया?"

"बसेस बर्‍याच असतील सर! खासकरुन पुण्याकडे जाणार्‍या बसेस सतत असतात. स्टँंडपासून जवळच काळ्या-पिवळ्या सिक्स सीटर्सही मिळतात. ट्रेन म्हणाल तर पुण्याला जाण्यासाठी सव्वासातची पहिली लोकल आहे आणि त्याच वेळेला मुंबईला जायला सिंहगड आहे."

रोहितने आपल्या रिस्टवॉचवर नजर टाकली. साडेदहा वाजत आले होते. स्वप्ना लोणावळा स्टेशनवर होती आणि त्यानंतर दहा मिनिटांनी तिचा फोन खंडाळा परिसरात होता याचा अर्थ तिने सिंहगड एक्सप्रेसने मुंबई गाठली असावी. आता ती सहजासहजी हाती लागणं अशक्यं होतं! रुममधून बाहेर पडून त्याने रिसेप्शन काऊंटर गाठला आणि मॅनेजरला आता रिसॉर्टमध्ये हजर असलेल्या सर्व कर्मचार्‍यांना बोलावण्याची सूचना दिली. अर्थात रिसॉर्टमध्ये हजर असलेले सर्व कर्मचारी एकत्रं येईपर्यंत थोडा वेळ लागणार होता याची त्याला कल्पना होती. दरम्यान त्याने नाईट शिफ्टच्या अटेंडंटला आपल्यासमोर बोलावलं. तो साधारण तिशीचा तरुण होता. त्याच्या शिफ्टमध्ये ही सर्व भानगड झाल्यामुळे तो चांगलाच नर्व्हस झालेला दिसत होता.

"तुझं नाव?"

"जतिन गोयल सर."

"जतिन, काल रात्री किरण आल्यापासून काय-काय झालं ते सगळं मला जाणून घ्यायचं आहे. लहानातली लहान, अगदी कितीही क्षुल्लक वाटणारी घटना असली तरीही! सांगू शकशील?"

"काल रात्री आठपासून मी ड्यूटीवर होतो सर!" जतिन सांगू लागला, "रात्री पावणेनऊच्या सुमाराला चौहानसाब आले. त्यांनी व्हॅलीच्या साईडची आणि अजिबात डिस्टर्ब होणार नाही अशी रुम मागितली. मी त्यांना १०८ नंबरची डिलक्स रुम दिली सर! आपण रुममध्ये गेल्यावर डिनर मागवू, पण तोपर्यंत आपल्याला कोणीही डिस्टर्ब करु नये असं त्यांनी बजावलं होतं. त्याप्रमाणे सव्वानऊच्या सुमाराला त्यांनी डिनरची ऑर्डर दिली होती आणि ती त्यांना रुममध्ये सर्व्ह करण्यात आली. त्यानंतर त्यांनी रुमबाहेर डू नॉट डिस्टर्ब कार्ड लावलं होतं सर!"

"किरण आल्यानंतर रात्रभरात अजून कोणी आलं होतं?"

"फक्तं एक मुलगी आली होती सर! चौहानसाब आल्यानंतर अर्ध्या तासाने ती आली होती. सकाळी लवकरच चेक-आऊट करुन गेली. तिने सकाळी सिक्स थर्टीला लोणावला स्टँडला जाण्यासाठी कॅब बूक केली होती. शी वॉन्टेड टू गो टू पूना."

"मुलगी?" रोहित सावध झाला, "तू पाहिलीस तिला? तिचं वर्णन करु शकशील?"

"सॉरी सर! काल रात्री ती आली तेव्हा तिने डोक्यापासून पायापर्यंत काळा बुरखा घातला होता. मी फक्तं तिचे डोळेच पाहू शकलो सर! आज सकाळी चेक-आऊट करतानाही तोच बुरखा तिच्या अंगावर होता!"

"बुरखा...." तो चकीत झाला. उदयचा अ‍ॅक्सिडेंट झाला त्या संध्याकाळी मोतीमहल रेस्टॉरंटमधल्या त्या मुलीनेही बुरखा घातला होता हे त्याला क्षणार्धात आठवलं. बुरख्याआड दडलेली ती मुलगी स्वप्नाच असणार!

"रजिस्टरमध्ये तिने नाव काय नोंदवलं होतं? काही फोटो आयडेंटीटी तर दाखवली असेलच ना?"

"येस सर!" जतिन रजिस्टर घेऊन आला, "सईदा नाव होतं सर! सईदा रिझवान खान! नाऊ आय रिमेंबर, तिने आपल्या नावाची उर्दूत एन्ट्री केली होती आणि साईन देखिल उर्दूत केली होती. मग मी तिला विचारुन तिचं नाव इथे नोट केलं होतं सर!"

"सईदा रिझवान खान?"

रोहितला आश्चर्याचा धक्का बसला. रिझवानची बायको? स्वप्ना? आता ही काय नविन भानगड होती?

"ही सईदा सकाळी कधी चेक-आऊट करुन गेली?"

"शार्प सिक्स थर्टी सर! पण त्याच्या आधी दहा-पंधरा मिनिटं ती मागच्या लॉनवर फिरत होती."

"मागच्या लॉनवर?"

रोहितच्या डोळ्यासमोर किरणच्या रुमची बाल्कनी उभी राहिली. काहीतरी आठवल्यासारखं त्याने भोपटकरांना विचारलं,

"भोपटकर, किरणचा मोबाईल त्याच्या रुममध्ये नेमका कुठे सापडला?"

"रुममध्ये नाही सर, बाल्कनीत! आम्ही मास्टर कीने रुमचा दरवाजा उघडून आत आलो तेव्हा आम्हाला मोबाईल दिसला नाही म्हणून मी त्याच्या नंबर डायल केला. रिंग वाजली तेव्हा तो बाल्कनीत असल्याचं आमच्या लक्षात आलं."

"आय थॉट सो!" रोहित स्वत:शीच म्हणाला, "जतिन, काल रात्री स्वप्ना... आय मिन सईदा हॉटेलमध्ये कशी आली होती? म्हणजे स्वत:च्या कारने आली का रिक्षा किंवा टॅक्सीने?"

"रिक्षाने आली होती सर!"

"आणि सकाळी चेक-आऊट करुन जाताना?"

"काल रात्रीच तिने रिसेप्शनला फोन करुन कॅबसाठी चौकशी केली होती. आम्ही चेक-आऊट करणार्‍या गेस्ट्सना लोणावळा किंवा खंडाळ्यापर्यंत कॉम्लिमेंटरी ड्रॉप देतो. सकाळी आमचा ड्रायव्हर तिला लोणावळा बस स्टँडवर सोडून आला होता."

"मला या सईदाची रुम पाहयची आहे. किती रुम नंबर आहे तिचा?"

"रुम नं ११०! चौहानसाबच्या शेजारची! ते दोघं लागोपाठ आल्यामुळे त्यांना शेजारच्या रुम्सच अ‍ॅलॉट झाल्या होत्या सर!"

"व्हॉट अ कोइन्सिडन्स! तिचं काम तू आणखिनच सोपं करुन टाकलंस जतिन! लेट्स सी द रुम!"

रुम नं ११० म्हणजे किरणच्या रुमची दुसरी आवृत्तीच होती. रोहितने अत्यंत काळजीपूर्वक रुम तपासून पाहिली. पण त्याच्या हाती काही लागलं नाही. अर्थात स्वप्ना किती हुशार आणि डोकेबाज आहे याची पूर्ण कल्पना असल्याने त्याला ते अपेक्षितच होतं. तो रिसेप्शनला परत आला तेव्हा त्याच्या सूचनेप्रमाणे मॅनेजरने रिसॉर्टमध्ये हजर असलेल्या एकूण एक कर्मचार्‍याला तिथे हजर केलं होतं. रोहितने एकवार सर्वांवरुन नजर फिरवली आणि अगदी सहज स्वरात विचारलं,

"किरणने रात्री काय जेवण ऑर्डर केलं होतं?"

हा प्रश्नं कोणालाच अपेक्षित नव्हता. किचन अटेंडंट आपलं रजिस्टार घेवून आला आणि त्याने किरणची ऑर्डर वाचून दाखवली.

"यात वाईनची बॉटल नाही? त्याने बारमधून मागवली होती का?"

"नो सर!" बारटेंडर नकारार्थी मान हलवत म्हणाला.

"मग त्याच्या रुममध्ये वाईनची बॉटल कशी पोहोचली?" रोहितने पूर्वीइतक्याच सहजपणे विचारलं.

"सर... " एक बैरा पुढे आला, "ती बॉटल मी घेऊन गेलो होतो सर!"

"तू?" रोहितने त्याला आपादमस्तंक न्याहाळत विचारलं, "कोणाच्या सांगण्यावरुन?"

"सर, रुम नं ११० मधल्या मॅडमनी ती बॉटल मला दिली आणि १०८ मधल्या गेस्टना देण्याची सूचना केली. ते आपले मित्रं आहेत, पण सध्या आमचं भांडण झालं असल्यामुळे मी स्वत: त्यांना बॉटल दिली तर ते घेणार नाहीत असं त्यांनी सांगितलं सर. मी त्यांना बॉटल द्यावी आणि ती रिसॉर्टतर्फे कॉम्प्लीमेंटरी म्हणून पाठवण्यात आली आहे असं त्यांना सांगावं अशीही त्यांची सूचना होती सर!"

"आणि म्हणून तू ती बॉटल किरणला आणून दिलीस?"

"त्या मॅडमनी मला दोनशे रुपये टीप दिली होती सर...." बैरा मॅनेजरकडे पाहत अडखळत म्हणाला.

"दोनशे रुपये?" रोहित भडकला, "यू इडीयट! तुझ्या दोनशे रुपयांमुळे त्या किरणचा जीव गेला आणि स्वप्ना आरामात इथून निघून गेली! भोपटकर, या माणसाला अ‍ॅसेसरी फॉर मर्डर म्हणून अ‍ॅरेस्ट करा! चांगली दहा वर्ष खडी फोडायला जेलमध्ये जाऊ देत!"

"साहेब!" बैरा त्याच्या पायावर पडून गयावया करत रडत म्हणाला, "प्लीज मला माफ करा! माझी चूक झाली! पुन्हा मी कधी असं करणार नाही साहेब! फक्तं एकदा मला माफ करा!"

"त्या रुम नं ११० मधल्या मुलीचं वर्णन करु शकशील?"

"नाही साहेब! तिने बुरखा घातला होता. मला फक्तं तिचे डोळेच दिसले!"

"पुन्हा बुरखा.... त्या स्वप्नाने बुरख्याआड तुम्हा सगळ्यांना मूर्ख बनवलं, आरामात किरणचा खून करुन पसार झाली आणि तुम्ही फक्तं टीप गोळा करत बसलात!" रोहित वैतागून म्हणाला. मग एकदम जतिनकडे वळून त्याने विचारलं, "जतिन, त्या सईदाचा चेहरा तू पाहिला नाहीस हे मान्यं, पण तिने चेक-इन करताना आयडेंटीफिकेशन म्हणून काहीतरी दाखवलं असेलच ना? ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड वगैरे?"

"येस सर!" जतिन एक पेपर घेऊन आला, "पॅन कार्डची कॉपी आहे सर!"

रोहितने त्या झेरॉक्सवर नजर टाकली आणि तो वेड्यासारखा पाहतच राहीला. आतापर्यंतच्या त्याच्या करीयसमध्ये अनेक वेगवेगळ्या केसेस त्याने हाताळल्या होत्या, पण या केसमध्ये त्याला एकापाठोपाठ एक धक्के बसत होते. त्याचं डोकं पार चक्रावलं होतं. पॅनकार्डच्या झेरॉक्सवरचं सईदा रिझवान खान हे नाव बरोबर होतं आणि सहीदेखिल उर्दूत केलेली दिसत होती पण तो फोटो.... हाऊ द हेल इज दॅट पॉसिबल?

सईदाच्या पॅनकार्डच्या झेरॉक्सवर असलेला फोटो प्रिया मल्होत्राचा होता!

"हा फोटो... " काय बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं. डोळे मिटून एक दीर्घ नि:श्वास सोडल्यावर तो जरा भानावर आला, "जतिन, ही कॉपी... आय मिन झेरॉक्स - तू काढलीस? तुला तिने ओरीजनल पॅन कार्ड दाखवलं होतं?"

"येस सर! तिने पॅन कार्ड दाखवलं होतं, पण त्यावरचा फोटो अस्पष्टं होता. फॉर्चुनेटली तिच्याकडे एक फोटोकॉपी होती. त्या कॉपीवरुनच मी ही कॉपी काढून घेतली."

रोहित काहीच बोलला नाही. स्वप्नाच्या धूर्तपणाचा आणखीन एक नमुना त्याला पाहायला मिळाला होता. हे पॅन कार्ड नकली असणार यात काही शंकाच नव्हती! अत्यंत चलाखीने जतिनला गुंडाळत तिने रिसॉर्टमध्ये रुम मिळवली होती आणि त्या बैरामार्फत वाईनची बॉटल किरणच्या रुममध्ये पोहोचवली होती. दिवसभराच्या धावपळीने वैतागलेला आणि अखेरीस आपण 'स्वप्ना'ला झुकांडी दिल्याच्या समजुतीने बेफिकीर झालेला किरण सगळी बाटली संपवणार होता आणि आपोआपच मरणाच्या दारात पोहोचणार होता! त्या वाईनच्या बॉटलमध्ये ते ड्रग - सोडीयम थिओपेन्टल मिसळलेलं असणार यात शंकाच नाही! किरणचा मोबाईल ऑन करुन आणि त्याच्या रुमच्या बाल्कनीत ठेवल्यावर लगेच रुम चेक-आऊट करुन तिने रिसॉर्ट सोडलं होतं. खंडाळा पोलीस इथे पोहोचण्यापूर्वीच सिंहगड एक्सप्रेसने ती मुंबईला सटकली होती.

स्वप्नाला लोणावळा स्टँडवर सोडणार्‍या रिसॉर्टच्या ड्रायव्हरकडून काहीच विशेष माहिती हाती लागली नाही. रिसॉर्टमधून निघाल्यावर जेमतेम दहा-पंधरा मिनिटांतच तो स्टँडवर पोहोचला होता. तिने बुरखा घातलेल असल्याने तिचं वर्णन तो अर्थात करु शकत नव्हता, पण कारमधून उतरण्यापूर्वी तिने त्याला शंभर रुपये टीप म्हणून दिल्याचं मात्रं त्याने प्रामाणिकपणे कबूल केलं.

रोहित किरणच्या रुममध्ये परतला तेव्हा पोलीस फोटोग्राफर आणि फिंगर प्रिंट एक्स्पर्ट्सचं काम आटपलं होतं. अर्थात या केसमध्ये त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही याची आतापर्यंतच्या अनुभवाने त्याला कल्पना होती. किरणचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी मुंबईला पाठवण्याची त्याने इन्स्पे. भोपटकरांना सूचना दिली. खंडाळा पोलीसांनी नोंदवलेल्या एफआयआर् पासून ते किरणच्या मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आणि सर्वांचे जबाब नोंदवलेले कागदपत्रं त्यांच्याकडून ताब्यात घेऊन क्राईम ब्रँचच्या आपल्या ऑफीसात आणण्याच्या दृष्टीने त्याने नाईकना तिथेच ठेवलं. पुन्हा एकदा किरण आणि स्वप्ना दोघांच्याही रुम्स काळजीपूर्वक तपासल्यावर कदम आणि दरम्यान तिथे पोहोचलेल्या देशपांडेंसह तो रिसॉर्टमधून बाहेर पडला आणि त्याची कार मुंबईच्या दिशेने धावू लागली.

"बोला कदम, काय अंदाज आहे?"

"खरं सांगू सर? माझं अजिबात डोकं चालेनासं झालं आहे!" कदम निराशेच्या सुरात म्हणाले.

"गुड! व्हॉट अबाऊट यू मॅडम?"

"माझीही अवस्था कदमसाहेबांपेक्षा फारशी वेगळी नाही सर!" देशपांडे म्हणाल्या, "दर वेळेस ती जितक्या अचानकपणे प्रगट होते आणि एखाद्याला खलास करते तितक्याच वेगात कोणताही ट्रेस न ठेवता आपण काही हालचाल करण्यापूर्वीच गडप होते. तिला कुठे आणि कसं शोधावं हेच कळत नाही! तुम्हाला काय वाटतं सर?"

"वेल, सध्यातरी आपण काहीतरी पोटभर खावं असं मला वाटतं आहे!" रोहित मिस्कीलपणे म्हणाला, " एकतर काल दुपारपासून आपली सगळ्यांचीच नुसती धावपळ सुरु आहे आणि एवढं करुन हाती काय लागलं तर किरणची डेडबॉडी! आता ऑफीसमध्ये पोहोचल्यावर होम मिनिस्टर पासून सर्वजण आपल्या डोक्यावर बसतील यात काहीच डाऊट नाही. मिडीयामध्ये बोंबाबोंब सुरु होईल ती वेगळीच! त्याआधी वाटेत एक ब्रेक घेऊनच ऑफीसमध्ये गेलेलं चांगलं. शांतपणे बसून बोलता तरी येईल!"

खोपोलीच्या बायपासला एका बर्‍यापैकी हॉटेलसमोर रोहितने कार थांबवली. तिघंजण आत शिरले आणि त्यांनी कोपर्‍यातलं टेबल गाठून वेटरला कॉफी आणि जेवणाची ऑर्डर दिली.

"स्वप्नाच्या दृष्टीने विचार केला तर तिने एकेक करुन किरण आणि त्याच्या सर्व मित्रांना संपवलेलं आहे." ऑर्डर घेऊन वेटर गेल्यावर तो गंभीरपणे म्हणाला, "प्रियाच्या खुनानंतर तिने जशी आठ - नऊ महिने दडी मारली होती तशीच ती पुन्हा गायब होण्याची शक्यता आहे. मात्रं यावेळेस तिच्यावर एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच खुनांचे आरोप आहेत! अशा परिस्थितीत तिच्यापुढे कोणता मार्ग शिल्लक राहतो? एक ऑप्शन म्हणजे परदेशात पळून जाणं! अर्थात हे बोलायला सोपं असलं तरी नेपाळ आणि भूतान सोडले तर इतर कुठेही जाणं प्रत्यक्षात तितकंसं सोपं नाही. त्यापेक्षा सोपा असलेला दुसरा मार्ग म्हणजे ऑफीशियली स्वत:चं अस्तित्वं संपवणं! एकदा का ती मरण पावल्याचं सिद्धं झालं की पोलीसांनी तिला अ‍ॅरेस्ट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वी हॅव सीन हाऊ ब्रिलीयंट शी इज! त्यातून आजकाल सायन्स इतकं पुढे गेलं आहे की प्लॅस्टीक सर्जरी करुन जवळपास संपूर्ण चेहरा बदलणं शक्यं आहे! स्वप्नाने असं काही केलं तर ती राजरोसपणे आपल्या समोर वावरत राहिली तरी आपणच काय, पण कोणीच तिला ओळखू शकणार नाही!"

"पण मग सर, आता करायचं काय?"

"कीप अ वॉच ऑन हर बँक अकाऊंट्स!" रोहित गंभीरपणे म्हणाला, "गेल्या जवळपास वर्षभरात तिच्या दोन्ही अकाऊंट्सपैकी एकही अकाऊंट तिने ऑपरेट केलेला नाही हे खरं असलं तरी ती करणारच नाही असं धरुन चालणार नाही. आफ्टर ऑल तिच्या अकाऊंट्समध्ये जवळपास आठ लाख रुपये जमा आहेत! माझ्या अंदाजाप्रमाणे तिचा आणखीन किमान एकतरी अकाऊंट असावा आणि सध्या ती तो अकाऊंट ऑपरेट करत असावी. हे सगळे उद्योग करण्यासाठी तिला पैसे तर लागतच असणार! एक काम करा कदम, ऑफीसमध्ये पोहोचल्यावर तुम्ही आरबीआयचं ऑफीस गाठा आणि संपूर्ण देशभरात असलेल्या सगळ्या बँकांची लिस्ट काढून आणा! एकदा ही लिस्ट मिळाली की त्यातल्या प्रत्येक बँकेला कॉन्टॅक्ट करुन त्यांच्या कस्टमर्सपैकी स्वप्ना देशमुख या नावाचे जेवढे म्हणून कस्टमर्स आहेत, त्या सर्वांचे डीटेल्स - पर्टीक्युलर्ली अ‍ॅड्रेस आणि फोटोग्राफ्स मागवून घ्या. आय नो इट्स् अ टफ जॉब, पण हे काम अत्यंत किचकट आणि डोकेफोड करायला लागणारं असलं तरी त्यावाचून सध्यातरी आपल्याकडे पर्याय नाही! एकदा का स्वप्नाच्या दुसर्‍या अकाऊंटचा पत्ता लागला, की आपल्याला तिच्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग मिळेल. आय अ‍ॅम शुअर, हर पॅन कार्ड इज बोगस, पण तरीही त्या झेरॉक्सवरचा पॅन नंबर कोणाचा आहे हे शोधून काढता येतं का ते पहा!"

"सर, स्वप्नाच्या नावावर अकाऊंट नसेल आणि दुसरं कोणी तिला पैसे देत असेल तर?" कदमनी शंका व्यक्तं केली.

"दॅट इज ऑल्वेज पॉसिबल कदम, बट वी हॅव टू टेक द चान्स! आपल्या दृष्टीने विचार केला तर कोणत्याही परिस्थितीत स्वप्नाला गाठणं हे सर्वात मोठं आव्हान आपल्यापुढे आहे अ‍ॅन्ड आय डोन्ट वॉन्ट टू लीव्ह एनी स्टोन्स अनटर्न्ड! तिने या पाचजणांचे खून का केले आणि या सगळ्याशी प्रियाच्या खुनाचा नेमका काय संबंध आहे हे ती स्वत: हाती सापडेपर्यंत आपल्याला कळू शकणार नाही. आणि किरणचा खून झाल्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला एक पॉलिटीकल अँगलही येणार आहे. त्यातून ते एमएलए चव्हाण होम मिनिस्टरच्या जवळचे त्यामुळे मी आधीच म्हणालो तसे ते आपल्या खनपटीला बसणार! ऑपोझिशनला तर काय, माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखंच आहे. खुद्दं रुलिंग पार्टीच्या एमएलएच्या मुलाचा खून होतो, कायद्याचा धाक उरलेला नाही, कमिशनर साहेबांची बदली करा वगैरे त्यांचा नेहमीचा सूर लागेलच! बट अ‍ॅज फार अ‍ॅज आय अ‍ॅम कन्सर्न्ड, टॉप प्रायॉरीटी इज स्वप्ना!

******

खंडाळ्याच्या रिसॉर्टमध्ये किरण चव्हाणचा मृत्यू झाल्याच्या बातमीने मुंबईच्या राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला होता. आमदार भरतदादा चव्हाण हे सत्ताधारी पक्षाचे महत्वाचे नेते असल्याने त्यांच्या सांत्वनासाठी सर्वपक्षीय नेते, पत्रकार आणि अनेक सेलेब्रेटींचीही रीघ लागली होती. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनीही आमदार चव्हाणांची भेट घेतली होती आणि सहवेदना व्यक्तं करुन त्यांचं सांत्वन केलं होतं. मात्रं या प्रसंगीही राजकीय हिशोब चुकते करण्याची संधी विरोधकांनी सोडली नाही. आमदार चव्हाणांच्या घराबाहेर तळ ठोकून बसलेल्या आणि येणार्‍या प्रत्येक राजकीय नेत्याचा 'बाईट' घेणार्‍या मिडीयाशी बोलताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील कायदा - सुव्यवस्थेवर टीकेची झोड उठवली होती. इतकंच नव्हे तर नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री बबनराव पवार यांनी राजीनामा द्यावा अशीही त्यांनी जोरदार मागणी केली. गृहमंत्र्यांचे स्वपक्षीय विरोधक आणि पक्षातील असंतुष्टंही एकदम सक्रीय झाले होते. गृहमंत्र्यांवर उघड टीका करणं त्यांनी टाळलं असलं तरी या सगळ्या प्रकरणाचं भांडवल करुन दिल्लीत हायकमांड कडे तक्रारी करण्यास त्यांनी अजिबात कसूर केली नव्हती.

मिडीयाच्या दृष्टीने तर ही पर्वणीच होती. त्यांना किमान दोन दिवस तरी चघळता येईल असा विषय मिळाला होता. त्यातून बरीच मिडीया चॅनल्स ही सत्ताधारी पक्षाची मिंधी होती त्यामुळे त्यावरुन किरणच्या जन्मापासून, त्याचं बालपण, शाळेपासून दिसून येणारे नेतृत्वगुण, कॉलेजमध्ये त्याने केलेलं तथाकथित आंदोलन, उगवता राजकीय नेता म्हणून सुरु असलेला त्याचा प्रवास याचं गुणगान सुरु होतं. आमदार चव्हाणांच्या एका स्थानिक समर्थक नेत्याने किरणदादांच्या मृत्यूमुळे राज्याचं तरुण नेतृत्वं अकाली हरपलं असल्याचाही शोध लावला होता. लगेच दुसर्‍या समर्थकाने आपण जास्तं निष्ठावान आहोत हे दाखवण्यासाठी त्याच्या मृत्यूमुळे देशाच्या राजकारणावर विपरीत परिणाम होणार असल्याचीही एक ठेवून दिली! परंतु सर्वात कडी केली ती किरणच्या सेक्रेटरीने! जागतिक राजकारणावर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेलं नेतृत्व हरपल्याबद्दल त्याने एका चॅनलवर चक्कं भोकाड पसरलं होतं! किरणची दादागिरी आणि त्याच्या इतर उपद्व्यापांबद्दल मात्रं चॅनलच्या प्रतिनिधींसह सर्वांनी सोईस्कररित्या मौन बाळगलं होतं.

मुंबई सीआयडींना तर मिडीयाने अक्षरश: धारेवर धरलं होतं. किरणच्या मृत्यूआधी त्याचे चार मित्रं - धीरज, कौशल, उदय आणि रिझवान यांच्या गूढ मृत्यूचाही तपास लावण्यात पोलीसांना अपयश आल्यावर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. खुद्दं राजकारणी आणि त्यांचे कुटुंबियच सुरक्षित नसतील तर सामान्यं जनतेची काय कथा असा एकंदर टीकेचा सूर होता. एका न्यूज चॅनलवर तर या सगळ्यामागे एखादा सिरीयल किलर असण्याची आणि तरुण आणि श्रीमंत लोकांनाच टार्गेट करत असल्याचीही शक्यता व्यक्तं केली होती. एका चॅनलवर एका स्वयंघोषित गुरुने हा सगळा प्रकार म्हणजे पृथ्वीवरील परग्रहवासियांच्या हल्ल्याची सुरवात असल्याचा दावा केला! आपल्या दैवी सामर्थ्यामुळे फक्तं आपणच या हल्ल्याचा मुकाबला करु शकतो असं त्याने जाहीर केलं. इतकंच नव्हे तर पोलीसांनी निष्कारण तपासकामात वेळ वाया घालवू नये असा फुकटचा सल्लाही देऊन टाकला!

किरणच्या पोस्टमॉर्टेममध्ये डॉ. भरुचांना त्याच्या पोटात भरपूर प्रमाणात सोडीयम थिओपेन्टल सापडलं होतं. रोहितच्या अंदाजाप्रमाणे ते वाईनमध्ये मिसळून त्याला पाजण्यात आलेलं होतं. वाईन त्याच्या पोटात गेल्यावर सुमारे तास - दीड तासाने त्याचा परिणाम होण्यास सुरवात झाली होती आणि पॅरॅलिसीसचा अ‍ॅटॅक येऊन अखेर त्याची परिणिती कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमध्ये झाली होती. त्याच्या पोटात अर्धवट पचलेले चिकनचे तुकडे आढळलेले होते. त्यावरुन सोडीयम थिओपेन्टल पोटात गेल्यापासून साधारण तीन ते चार तासांनी - रात्री दोन ते तीनच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला असावा असा डॉ. भरुचांचा अंदाज होता. किरणच्या बॉडीवर कुठेही जखम अथवा वण आढळून आलेला नव्हता.

स्वप्नाचा शोध युद्धपातळीवर सुरु होता. संपूर्ण भारतभर तिच्यासाठी इमर्जन्सी हाय प्रायॉरीटी अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. ती परदेशी पलायन करण्याची शक्यता गृहीत धरून एकूण एक आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्तपणे नजर ठेवण्यात येत होती. किरणचा मृत्यू झाल्यावर स्वप्नाचा मोबाईल खंडाळा रेल्वे स्टेशनपर्यंत सुरु होता, पण त्यानंतर मात्रं तो बंद झाला होता. सीआयडींनी पुन्हा एकदा स्वप्नाचे नातेवाईक, ती बोरीवलीला राहत होती तिथले घरमालक, तिच्या चॅनलमधल्या मैत्रिणी, मल्होत्रा आणि त्रिवेदी कुटुंबिय यांच्याकडे कसून चौकशी केली होती, परंतु त्याचा काही उपयोग झाला नव्हता. रिझवानची पत्नी सईदाकडेही चौकशी करण्यात आली, परंतु किरणचा मृत्यू झाला त्या दिवशी ती मुंबईत असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने तिच्यावरच्या संशयाचं आपसूकच निराकरण झालं होतं.

किरणच्या मृत्यूनंतर तिसर्‍याच दिवशी सकाळी रोहितला एक फोन आला.

"प्रधानसाहेब, मी गुजरातमधल्या सापुतारा पोलीस स्टेशनमधून इन्स्पे. पटेल बोलतो आहे..... "

"व्हॉट SS ?...." रोहित उडालाच, "आर यू शुअर तीच....."

"......."

"ऑलराईट पटेलसाहेब, मी लगेच निघतो आहे. तुम्ही त्या लोकांना बोलावून घ्या!"

******

फर्झाना बाटलीवाला न्यूज चॅनलवर किरण चव्हाणच्या मृत्यूची बातमी पाहत होती.

त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये त्या तिघांना पाहिल्यावर तिच्या डोक्यात तिडीक गेली होती. मनाच्या तळाशी दाबून टाकलेल्या सगळ्या वेदनादायक आठवणी उफाळून वर आल्या होत्या. कॉलेजमध्ये असताना एका बेसावध क्षणी ती त्यांच्या जाळ्यात सापडली होती आणि त्यानंतरचं वर्ष तिच्यासाठी एखाद्या भयानक दु:स्वप्नासारखं ठरलं होतं. त्या नरकातून कायमची सुटका करुन घेण्यासाठी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्नं केला, पण सुदैवाने ती वाचली होती. तब्बल तीन वर्षांनी महत्प्रयासाने डिप्रेशनमधून बाहेर पडल्यावर सहा महिन्यांपूर्वी तिचा निकाह झाला होता. एकापाठोपाठ एक झालेल्या सर्वांच्या मृत्यूची प्रत्येक बातमी तिने काळजीपूर्वक वाचली आणि पाहिली होती. अखेर आज त्या पाचजणांपैकी शेवटचा क्रूरकर्मा जहान्नम मध्ये गेला होता!

समाधानाने मान हलवत टी व्ही चं चॅनल बदलण्यासाठी तिने रिमोट उचलला.

******

रोहित सापुतारा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा संध्याकाळचे साडेसात वाजले होते. सापुतारा हे गुजरात मधलं प्रसिद्धं हिलस्टेशन असल्याने वर्षातले बाराही महिने इथे पर्यटकांचा ओघ सुरु असे, त्यामुळे सापुतारा पोलिसांना कायम काही ना काही भानगडींना तोंड द्यावं लागत होतं. त्यातच तो सिव्हील ड्रेसमध्ये असल्याने आणि पोलीस जीपने न येता आपल्या कारने तिथे पोहोचल्याने काहीतरी तक्रार नोंदवण्यासाठी आलेला असावा अशी ड्यूटीवर असलेल्या सब् इन्स्पे. शहांची समजूत झाली होती. पण त्याने आपली ओळख सांगून आपलं आयकार्ड त्यांच्यासमोर धरल्यावर ते आश्चर्याने चकीत झाले. इन्स्पे. पटेल नुकतेच घरी गेले होते, पण शहांनी फोन करताच ते दहा मिनिटांतच पोलीस स्टेशनवर पोहोचले.

"वेलकम् टू सापुतारा प्रधानसाहेब! तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलं आहे आम्ही!" रोहितशी हात मिळवत इन्स्पे. पटेल म्हणाले, "पण तुमच्या प्रत्यक्ष भेटीचा आज योग आला."

"थँक्स पटेल! स्वप्ना कधी आलॉ होती इथे?" रोहितने थेट मुद्द्याला हात घातला.

"सर, ती मुलगी ६ ऑक्टोबरला इथे आली होती. त्यावेळी मी वघईला होतो. गेल्या महिन्यातच माझी इथे ट्रान्स्फर झाली आहे. माझ्यापेक्षा हे सब् इन्स्पे. शहाच तुम्हाला जास्तं माहीती देतील."

"सर, पटेल सर म्हणाले त्याप्रमाणे ६ ऑक्टोबरच्या सकाळी दहाच्या सुमाराला ती इथे आली होती." शहा म्हणाले, "आदल्या दिवशी रात्री वापीकडे जाणार्‍या हायवेवर एक फेटल अ‍ॅक्सिडेंट झाला होता, त्यामुळे रात्रभर मी त्याच इन्क्वायरीमध्ये अडकलो होतो. ते सगळं आटपून मी जेमतेम परत आलो आणि घरी जाण्याच्या तयारी असताना नेमक्या त्याच वेळेला ती पोलीस स्टेशनला आली होती. आपण एक चॅनल रिपोर्टर असून एका केसच्या बद्दल इन्फॉर्मेशन हवी असल्याचं तिने मला सांगितलं. तिच्याजवळ चॅनलचं कार्डही होती!"

"केस?" रोहित चकीत झाला, "कोणती केस?"

"सर, या वर्षाच्या सुरवातीला.... " शहा फाईलमधली नोंद पाहत म्हणाले, "१७ जानेवारीला सकाळी फॉरेस्ट खात्याच्या लोकांना सनराईज पॉइंटखालच्या जंगलामध्ये एक स्केलेटन सापडला होता. त्यांनी इन्फॉर्म केल्यावर पोलिसांनी तो स्केलेटन ताब्यात घेतला. त्याच्यावरचे कपडे फाटून लक्तरं झालेली होती. ओळख पटू शकेल असं काहिही तिथे आढळलं नाही. पोस्टमॉर्टेममध्ये तो स्केलेटन एका मुलीचा असल्याचं तेवढं कळलं!"

"मुलीचा स्केलेटन?" रोहित सावध झाला, "तुम्ही पाहिला तो स्केलेटन शहा?"

"नाही सर! माझी पण तीन महिन्यांपूर्वीच इथे ट्रान्स्फर झाली आहे. आमच्या लोकांनी आसपासच्या एरीयात बराच शोध घेतला, पण काहीच सापडलं नाही. डांग जिल्ह्यात आणि संपूर्ण गुजरातमध्ये त्या संदर्भात मेसेजेस पाठवले पण काही रिस्पॉन्स आला नाही. ही मुलगी कदाचित महाराष्ट्रातली असेल म्हणून आम्ही नासिक, नंदुरबार जिल्ह्यांमध्येही चौकशी केली, पण तिथेही तिच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाही. शेवटी केस फाईल करावी लागली. याच केसच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी ती आली होती!"

रोहितने केसची फाईल बारकाईने वाचून काढली. वनखात्याच्या लोकांना जंगलात एक सांगाडा आढळून आल्यावर त्यांनी पोलीसांना कळवलं होतं. पोस्टमॉर्टेम करणार्‍या डॉक्टरांनी आपल्या रिपोर्टमध्ये तो सांगाडा एका मुलीचा असून ती २५ - २६ वर्षांची असं नमूद केलं होतं. त्या तरुणीच्या गळ्याजवळची हाडं तुटलेली होती, त्यावरुन तिचा गळा आवळून खून करण्यात आला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्तं केला होता. मात्रं केवळ सांगाडाच हाती लागल्यामुळे तिचा मृत्यू नेमका कधी झाला हे मात्रं ते सांगू शकत नव्हते. सापुतारा पोलीसांनी सर्व प्रकारे तपास करुनही तिची ओळख न पटल्याने अखेर केस बंद केली होती. केसच्या फाईलबरोबरच त्या सांगाड्याच्या हातात आढळून आलेल्या सोन्याच्या दोन बांगड्या आणि गळ्यातलं लॉकेटही होतं. सांगाड्यापासून काही अंतरावर एक पूर्णपणे छिन्न विच्छीन्न झालेला मोबाईल फोन सापडला होता. परंतु त्याची अवस्था इतकी बेकार होती, की त्याचा काहीच उपयोग नव्हता.

रोहितने ते लॉकेट काळजीपूर्वक तपासून पाहीलं, पण त्याला त्यात काही संशयास्पद आढळलं नाही. पण ते लॉकेट पाहिल्यावर तो चांगलाच अस्वस्थं मात्रं झाला होता. आपण हे लॉकेट आधी कुठेतरी पाहिलेलं आहे असं त्याला राहून राहून वाटत होतं. पण नेमकं कुठे? केसची फाईल वाचल्यावर तो अधिकच गंभीर झाला. हा आणखीन एक खून उजेडात आला होता. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट वाचल्यावर या केसचं प्रिया आणि सुनेहाच्या खुनाशी असलेलं साधर्म्य त्याच्या ध्यानात आलं होतं. आता प्रश्नं होता की ही तरुणी कोण? या तरुणीलाही प्रिया आणि सुनेहा या दोघींप्रमाणेच गळा आवळून ठार मारण्यात आलं होतं. कदाचित त्या दोघींप्रमाणे हिच्यावरही बलात्कार झाला असावा, पण केवळ सांगाड्यावरुन डॉक्टरांना ते कळू शकणार नव्हतं हे उघड होतं. प्रिया आणि सुनेहाच्या मृत्यूप्रमाणे किरण आणि त्याच्या मित्रांचा तर यात हात नव्हता? सर्वात महत्वाचं म्हणजे, या तरुणीचा आणि स्वप्नाचा काय संबंध होता?

"प्रधानसाहेब.... "

पटेलांच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. त्यांच्या केबिनमध्ये आणखीन दोन माणसं आली होती. त्यांच्या कपड्यांवरुन ते वनखात्याचे लोक असावेत याची त्याला कल्पना आली.

"हे डीएफओ त्रिवेदी आणि रेंजर भानवडीया! यांनाच तो स्केलेटन सापडला होता सर!"

रेंजर भानवडीयानी मग ती सगळी हकीकत सांगितली. आदल्या वर्षी डिसेंबरच्या मध्यावर सापुतार्‍याभोवतीच्या जंगलात एका बिबळ्याची चोरटी शिकार झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाची बरीच बोंबाबोंब झाल्यावर वनखात्याने जंगलात गस्तं घालण्यास सुरवात केली होती. १७ जानेवारीला तो सांगाडा आढळला होता, त्या दिवशी जंगलात आपली गस्तं आटपून परत येत असताना त्यांना उशीर झाल्यामुळे नेहमीच्या मार्गाने न येता सनराईज पॉईंटखालच्या जंगलातून त्यांनी शॉर्टकट घेतला होता आणि त्यामुळे तो सांगाडा त्यांच्या नेमका दृष्टीस पडला होता. त्या सांगाड्यावर मांसाचा एक कणही शिल्लक नव्हता. काही हाडं तुटून इकडे-तिकडे विखुरलेली होती त्यावरुन तरस आणि कोल्ह्यासारख्या प्राण्यांनी त्यावर ताव मारला असावा असा त्यांचा अंदाज होता. तिच्या देहावरचे कपडे प्राण्यांनी फाडून त्याच्या चिंध्या केल्या होत्या. आपल्या चौकीवर परतल्यावर त्यांनी त्रिवेदींबरोबर पोलीस स्टेशन गाठलं होतं.

रोहितने स्वप्नाविषयी त्यांच्याकडे चौकशी केली. शहांकडून त्रिवेदी आणि भानवडीयांबद्दल माहिती मिळाल्यावर पोलीस स्टेशनमधून बाहेर पडून तिने थेट वनखात्याचं ऑफीस गाठून दोघांची भेट घेतली होती. चॅनल रिपोर्टर असल्याची बतावणी करुन तिने दोघांनाही त्या सांगाड्यासंदर्भात अनेक बारीकसारीक प्रश्नं विचारले होते. इतकंच नव्हे तर त्यांच्याबरोबर जंगल तुडवत तो सांगाडा आढळलेली नेमकी जागाही तिने नजरेखालून घातली होती आणि त्या जागेचे अनेक फोटोही काढले होते!

"हीच मुलगी होती का ती?" रोहितने आपल्या मोबाईलमधला स्वप्नाचा फोटो भानवडीयासमोर धरला.

"मी नक्की सांगू शकणार नाही साहेब! ती मुलगी थोडी विचित्रंच होती. भर दुपारी बाराची वेळ असूनही तिने नाका-तोंडाभोवती जाड स्कार्फ गुंडाळलेला होता आणि डोळ्यावर गॉगल होता! आणि हे सगळं कमी होतं म्हणून की काय, भला मोठा ओव्हरकोट घालून त्याची टोपी डोक्यावर ओढून घेतली होती! या सगळ्या सरंजामात तिला उकडत कसं नाही याचंच मला आश्चर्य वाटत होतं! आमच्या ऑफीसमध्ये आल्यापासून ते पार जंगलातून परत येईपर्यंत तिचा हा अवतार तसाच टिकून होता!"

"येस सर!" शहा त्यांना दुजोरा देत म्हणाले, "ती पोलीस स्टेशनला आली तेव्हाही तिने ओव्हरकोट आणि स्कार्फ घातलेला होता आणि पोलीस स्टेशनमध्येही गॉगल लावलेला होता! मी सहज म्हणून चौकशी केली, तेव्हा नुकतंच आपल्या डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्याने डॉक्टरनी महिनाभर गॉगल वापरण्याचा सल्ला दिला आहे आणि थंडीमुळे होणार्‍या अ‍ॅलर्जीचा त्रास टाळण्यासाठी आपण ओव्हरकोट आणि स्कार्फ वापरत असल्याचं तिने मला सांगितलं. अर्थात तो तिचा वैयक्तीक प्रश्नं असल्यामुळे मी फारसं लक्षं दिलं नाही. असंही ती वीस-पंचवीस मिनिटांतच इथून बाहेर पडली होती! तिने नाव सांगितल्यावर खरंतर मी ओळखायला हवं होतं, आठ - नऊ महिन्यांपूर्वीही तिच्याबद्दल तुमचा मेसेज आला होता, पण त्या अ‍ॅक्सिडेंटच्या केसमुळे मी पार थकलो होतो. कधी एकदा ती बाहेर पडते आणि मी घरी जातो असं झालं होतं. सॉरी सर!"

रोहित काहीच बोलला नाही. डोळ्याचं ऑपरेशन, अ‍ॅलर्जी ही स्वप्नाने सरळसरळ थाप मारली होती याबद्दल त्याला कोणतीच शंका नव्हती. आपला चेहरा कोणाच्याही दृष्टीस पडू नये याची ती खबरदारी घेत होती हे उघड होतं. त्याने आपल्या रिस्टवॉचवर नजर टाकली. रात्रीचे दहा वाजत आले होते. आता तिथे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता. आपल्याला आणखीन काही माहिती मिळणार नाही हे याची त्याला कल्पना होती. वनखात्याच्या लोकांना तो सांगाडा सापडला होता, त्या जागेला भेट देण्याचा विचार त्याच्या मनात आला होता, पण त्याचा फारसा उपयोग होणार नव्हता. आतापर्यंतच्या अनुभवावरुन स्वप्ना एकही खूण मागे ठेवणार नाही याबद्दल त्याला पक्की खात्री होती. या केसच्या पेपर्सची एक कॉपी आपल्या ऑफीसमध्ये पाठवण्याची त्याने पटेलना विनंती केली आणि तो बाहेर पडणार तोच त्याला काहीतरी आठवलं.

"एक शेवटचा प्रश्नं, स्वप्ना इथे पब्लिक ट्रान्सपोर्टने आली होती का स्वत:च्या गाडीने?"

"बहुतेक पब्लीक ट्रान्सपोर्टने सर," भानवडीया उत्तरले, "ती आमच्या ऑफीसमध्ये ऑटोरीक्षाने आली होती आणि जंगलातून आम्ही परत आलो तेव्हा तिने बस स्टँडकडे जाणार्‍या रस्त्याची चौकशी केली होती."

कार ड्राईव्ह करताना रोहितचं विचारचक्रं सुरु होतं....

धीरज सक्सेनाचा खून ६ ऑक्टोबरला सकाळी सव्वातीनच्या सुमाराला झाला आहे. त्यावेळेस स्वप्ना अर्थातच त्याच्या घरात होती. त्यानंतर सव्वाचार वाजता ती बोरीवली स्टेशनच्या एरीयात होती आणि त्याच दिवशी सकाळी दहा वाजता ती सब् इन्स्पे. शहांना भेटली आहे. याचा अर्थ धीरजचा खून केल्यावर बोरीवलीहून ट्रेन पकडून वापी आणि तिथून टॅक्सीने सापुतार्‍याला गेली असावी. शहांकडून त्या केससंदर्भात माहिती गोळा करुन तिने त्रिवेदी-भनवडीयाची गाठ घेतली होती आणि त्यांच्याबरोबर जंगलातली ती जागा पाहिली होती. त्यानंतर ती अर्थातच सापुतार्‍याहून गायब झाली असणार!

या मुलीच्या मृत्यूमध्ये स्वप्नाला एवढा इंट्रेस्ट का?
आणि
आपण ते लॉकेट नेमकं कोणाच्या गळ्यात पाहीलं आहे?

******

गृहमंत्री पवार रोज सकाळी - संध्याकाळी फोन करुन कमिशनर मेहेंदळेंकडे चौकशी करत होते. त्यांना रोजच्या रोज तपासाचा रिपोर्ट मिळत होता, पण पवारांचं त्यावर समाधान होत नव्हतं. पोलीस खातं त्यांच्या अखत्यारीत असल्याने मिडीयाच्या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागत होतं. त्यातच पक्षांतर्गत विरोधकांनी कान फुंकल्यामुळे हायकमांडचाही त्यांच्यावर सतत दबाव येत होता. चार दिवस कशीबशी कळ काढून अखेर आमदार चव्हाणांना जोडीला घेऊन ते सीआयडी ऑफीसात येऊन धड्कले.

"मेहेंदळेसाहेब, हा काय प्रकार आहे? आज चार दिवस झाले, पण एक तुमची प्रगती शून्य आहे. तुमचे सगळे हुशार लोक काय करत आहेत? आम्ही पब्लिकला काय उत्तर द्यायचं?" गृहमंत्री पवारांनी आल्याआल्या तोफ डागली.

"आमचे शक्यं ते सर्व प्रयत्नं सुरु आहेत सर! संपूर्ण देशभरात आम्ही हाय लेव्हल अ‍ॅलर्ट पाठवला आहे. सर्व एअरपोर्ट्स, महत्वाची रेल्वे स्टेशन्स, एस टी बस स्टँड्स आम्ही कव्हर केले आहेत. प्रायव्हेट टूरीस्ट ऑपरेटर्सनाही वॉर्न केलेलं आहे. त्याशिवाय...."

"तुम्ही काय केलं आहे हे जाणून घेण्यात आम्हाला अजिबात इंट्रेस्ट नाही!" त्यांचं वाक्यं अर्ध्यावरच तोडत गृहमंत्री म्हणाले, "यापुढे तुम्ही काय करणार आहात ते जाणून घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. या आमच्या चव्हाणसाहेबांनी आपला कर्तासवरता तरूण मुलगा गमावला आहे. त्यांना आम्ही काय उत्तर द्यावं अशी तुमची अपेक्षा आहे? तुमचा कोण ऑफीसर तपास करतो आहे या केसचा? जरा बोलवा त्याला इथे ताबडतोब!"

कमिशनर मेहेंदळेंनी आपल्या ऑर्डर्लीला रोहितला बोलावण्याची सूचना केली. तो नुकताच ऑफीसमध्ये पोहोचला होता. कमिशनरसाहेबांचं बोलावणं येताच तो तातडीने त्यांच्या ऑफीसमध्ये आला. आत पाऊल टाकताच गृहमंत्री पवार आणि आमदार चव्हाण यांना बसलेले पाहून त्याने कमिशनरसाहेबांकडे एक कटाक्ष टाकला. कमिशनरांनी फक्तं त्यालाच समजेल अशी खूण केली. अशी बात आहे तर.... आपल्याला तोफेच्या तोंडी जाण्यासाठी बोलावण्यात आलं आहे! ठीक आहे. लेट्स फेस इट!

"सर, हे सिनियर इन्स्पेक्टर प्रधान! या केसची इन्क्वायरी हेच करत आहेत!"

"हेच का ते प्रधान, मेहेंदळे? आजपर्यंत यांच्यावर सोपवण्यात आलेली प्रत्येक केस ते शेवटपर्यंत तपास करुन पूर्ण करतात असं आमच्या कानावर आलं आहे. आनंद आहे! पण मग याच केसच्या बाबतीत काय झालं हो?"

"थँक्स फॉर द कॉम्प्लीमेंट्स! आणि अ‍ॅज फार अ‍ॅज द केस इज कन्सर्न्ड, शक्यं तितक्या लवकर केस संपवण्याची आणि या प्रकरणाची तड लावण्याची तुमच्याइतकीच माझीही इच्छा आहे!"

"अहो पण तसं काही होताना दिसत नाही त्याचं काय? आम्हाला पब्लिकला उत्तरं द्यावी लागतात. तिकडे विधानसभेत विरोधक आमच्या नावाने बोंबा मारतात. मुंबईत एक-दीड महिन्यांत पाच-पाच खून होतात आणि आमच्या हुशार अधिकार्‍यांना त्याचा तपास लावता येत नाही? काय समजायचं आम्ही आणि लोकांनी? खुद्दं एका आमदाराचाच मुलगा सुरक्षित नाही तिथे जनतेने कोणावर भरवसा ठेवायचा?"

"एक्सक्यूज मी सर!" रोहितचा आवाज नकळत चढला, "रिझवान खानचा मृत्यू झाला त्यावेळेस इन्क्वायरी करतानाच आम्ही मिस्टर चव्हाणना मुंबई सोडून बाहेर पडू नका, त्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे इतक्या स्पष्टं शब्दांत कल्पना दिलेली होती. इतकंच नव्हे तर त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता गृहीत धरुन त्यांच्या नकळत त्यांना प्रोटेक्शनही दिलेलं होतं. परंतु आमच्या सूचनेकडे दुर्लक्षं करुन कोणालाही काही न कळवता ते मुंबई सोडून बाहेर गेले. तरीही आम्ही त्यांना वाचवू शकलो असतो सर, पण त्यांनी स्वत:च्या जागी आपल्या ड्रायव्हरला बसवलं आणि मध्येच गायब झाले. त्यांनी मोबाईलही स्विच ऑफ केल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे ट्रेस करणं अशक्यं झालं होतं. रात्रभर आम्ही त्यांचा शोध घेत होतो, बट बाय देन इट वॉज टू लेट!"

"आमच्या चिरंजीवांनी कधी कुठे जावं यासाठी पोलिसांच्या परवानगीची आवश्यकता नाही!" आमदार चव्हाण रागीट सुरात म्हणाले, "तुमच्या अपयशाचं खापर आमच्या दिवंगत चिरंजीवांच्या डोक्यावर फोडू नका! पवारसाहेब, ही केस सीबीआयवर सोपवण्यात यावी अशी आमची मागणी आहे! ह्यांच्याकडून काही होईल असं आम्हाला वाटत नाही."

"सीबीआयवर केस जरुर सोपवा सर!" रोहित कठोर स्वरात म्हणाला, "आम्ही आनंदाने त्यांना कोऑपरेट करु! फक्तं सीबीआय तुम्हाला एक्स्पेक्टेड आहे तेवढाच आणि तसाच तपास करणार नाही! या सर्व प्रकरणाचं मूळ गेल्या डिसेंबरमध्ये मढ आयलंडवर झालेल्या प्रिया मल्होत्रा या मुलीच्या मर्डर केसमध्ये आहे. त्यावेळी आमच्या इन्क्वायरीत इतरही बर्‍याच गोष्टी समोर आल्या होत्या, पण त्यावेळी आम्हाला केस फाईल करावी लागली कारण त्यातला एक महत्वाचा साक्षीदार आयत्यावेळेस गायब झाला! त्यानंतर गेल्या दीड महिन्यांत चार जणांचे वेगवेगळ्या प्रकारे मृत्यू झालेले आहेत आणि याच मालिकेतला पाचवा मृत्यू किरण चव्हाणांचा झाला आहे. या पाचही मृत्यूंचा प्रियाच्या खुनाशी थेट संबंध होता अशी आमची इन्फॉर्मेशन आहे जी आम्ही सीबीआयला द्यायला तयार आहोत. सीबीआयच्या इन्क्वायरीत फॅक्ट्स काय आहेत त्या समोर येतीलच, पण चव्हाणसाहेब, तुमच्या दृष्टीने त्या बर्‍याच अडचणीच्या ठरतील हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो! आफ्टर ऑल चॉईस इज युवर्स!"

तो इतक्या ठामपणे बोलत होता, की कमिशनर मेहेंदळेही क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहीले. गृहमंत्री पवारांच्या डोक्यात मात्रं एक वेगळंच चक्रं फिरु लागलं होतं. त्याच्या बोलण्याचा अर्थ त्यांच्या अचूक लक्षात आला होता. प्रिया मल्होत्रा मर्डर केसमध्ये आपल्याला भरीला घालून चव्हाणांनीच तपासकामात खो घातला होता हे त्यांना बरोबर आठवलं. चव्हाणांना मात्रं त्याला खाऊ की गिळू असं झालं होतं. आजपर्यंत कोणाचीही इतक्या स्पष्टं शब्दांत त्यांना सुनावण्याची हिम्मत झाली नव्हती.

"पवारसाहेब, आम्ही केवळ तुमच्या शब्दाखातर इथे आलो होतो," चव्हाण धुमसत म्हणाले, "पण तुमच्या पोलिसांनी आम्हालाच धमक्या देण्यास सुरवात केली. आम्हांला? भरतदादा चव्हाणांना? इतकी वर्ष राज्याच्या राजकारणात आम्ही उगीच काढलेली नाहीत! आता जे काही करायचं ते आमचं आम्हीच करु आणि आमच्या दिवंगत चिरंजीवांच्या स्मृतीला स्मरुन सांगतो, तुमच्या पोलीसांना ते महागात पडेल!"

संतापाने पाय आपटत चव्हाण निघून गेले. त्यांच्यापाठोपाठ गृहमंत्रीही जातील अशी कमिशनर मेहेंदळेंची अपेक्षा होती, पण पवार आपल्या जागेवरुन उठले देखिल नाहीत.

"आमचे चव्हाणसाहेब जरा भडक डोक्याचे आहेत," मेहेंदळे आणि रोहित कडे पाहून हलकेच स्मित करत ते म्हणाले, "त्यातून नुकताच तरुण मुलाचा असा मृत्यू झाल्याने ते भानावर नाहीत! त्यांचं बोलणं तुम्ही फारसं मनावर घेवू नका!"

"आम्ही सर्व त्यांच्या दु:खात सहभागी आहोत!" रोहित पूर्वीइतक्याच शांतपणे म्हणाला, "पण याचा अर्थ त्यांनी वाटेल ते बोलावं आणि आम्ही ऐकून घ्यावं ही अपेक्षा असेल तर ते जमणार नाही! किरण आमच्या योजनेप्रमाणे वागला असता आणि आम्हाला कळवल्याविना मुंबईबाहेर पडला नसता तर त्याचा मृत्यू टाळता आला असता आणि स्वप्नाही आमच्या हाती लागली असती!"

"प्रधान, या केसमध्ये असं नेमकं काय दडलेलं आहे जे चव्हाणांना अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे?" पवारांनी अगदी सहज सुरात पण उत्सुकतेने विचारलं. रोहित क्षणात सावध झाला. त्यांच्या प्रश्नाचा रोख त्याने बरोबर ओळखला होता.

"वेल, प्रिया मल्होत्राच्या मर्डर केसमध्ये किरण चव्हाणची काहितरी इन्व्हॉलमेंट होती हे निर्विवाद सत्यं आहे!" एकेक शब्दं सावकाश आणि सावधपणे उच्चारत तो म्हणाला, "फक्तं तो नेमका किती लेव्हलपर्यंत गुंतला होता हे समजून घेण्यासाठी स्वप्ना हाती सापडणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनेच आमची इन्क्वायरी सुरु आहे. तेवढ्यात आता जर सीबीआय यात उतरली तर त्यांना केसचे सगळे डिटेल्स हॅन्डओव्हर करण्यात जितका वेळ जाईल तितकं स्वप्नापर्यंत पोहोचणं कठीण जाईल सर!"

"ठीक आहे! तुमचा तपास तुम्ही सुरू ठेवा!" पवार उठत म्हणाले, "चव्हाणसाहेबांची काळजी करु नका. त्यांना काय सांगायचं ते मी पाहून घेईन! लवकरात लवकर त्या मुलीला ताब्यात पकडून तिच्याकडून सत्य वदवून घ्या! मलाही विधानसभेत उत्तरं द्यावी लागतात एवढं विसरु नका!"

पवार निघून गेल्यावर कमिशनर मेहेंदळेंनी रोहितच्या पाठीवर थाप मारली. चव्हाणांच्या अरेरावीचा त्यांनाही मनातून संताप आला होता, पण इतक्या बेधडकपणे आपणही त्यांना सुनावू शकलो नसतो याची त्यांना पक्की खात्री होती!

"रोहित, जरा जपून!" कमिशनरसाहेब म्हणाले, "त्या आमदार चव्हाणांचे दिल्लीपर्यंत काँटॅक्ट्स आहेत. काही ना काही खटपटी करुन ते सीबीआयला या केसमध्ये आणायचा प्रयत्नं करणार हे नक्की! त्यापूर्वीच त्या स्वप्नाला गाठा आणि केस क्लोज करा!"

"शुअर सर! पण माय गट् फिलींग इज, होम मिनिस्टरच्या पोस्टवर जोपर्यंत पवार आहेत, तो पर्यंत ही केस सीबीआयकडे जात नाही! इनफॅक्ट इफ द क्वेश्चन कम्स, पवार सीबीआयकडे केस देण्यास विरोध करतील."

कमिशनर मेहेंदळेंच्या ऑफीसमधून रोहित आपल्या केबिनमध्ये परतला तसे कदम त्याच्यापाठोपाठ आत शिरले. आमदार चव्हाण धुमसत बाहेर पडलेले पाहून ते चरकले होते. अर्ध्या तासाने गृहमंत्री पवारांना मात्रं स्मितवदनाने बाहेर पडताना पाहून मात्रं ते थक्कं झाले होते. नेमकं काय झालं असावं याचा त्यांना काहीच अंदाज येत नव्हता. सापुतार्‍याला काय घडलं हे जाणून घेण्याचीही त्यांना उत्सुकता होती! रोहितने सापुतार्‍याच्या इन्स्पे. पटेल आणि शहांकडून मिळालेली माहीती थोडक्यात त्यांच्या कानावर घातली. तो सगळा प्रकार ऐकून तर ते अधिकच गोंधळून गेले.

"सर, आपण आतापर्यंत फक्तं प्रिया आणि सुनेहाचाच खून झाला आहे असं धरुन चाललो होतो. आता हा तिसरा खून उजेडात आला आहे! एक कळत नाही, त्या मुलीच्या खुनाच्या केसमध्ये स्वप्नाला एवढा इंट्रेस्ट का? आणि तिला त्याबद्दल माहिती कुठून मिळाली?"

"मे बी धीरजकडून...." रोहित विचार करत म्हणाला, "धीरजचा खून करण्यापूर्वी स्वप्नाने ही इन्फॉर्मेशन त्याच्याकडून काढून घेतली असावी. त्याचा खून केल्यावर ती सरळ सापुतार्‍याला गेली, आणि पोलीस स्टेशन गाठून तिने सब् इन्स्पे. शहांकडून त्या केसचे डिटेल्स मिळवले. त्यानंतर ती त्या फॉरेस्ट ऑफीसर्सना भेटली, त्यांना तो स्केलेटन मिळालेला स्पॉटही पाहिला आणि तिथे फोटोग्राफ्स काढले. नाऊ द क्वेश्चन इज, ज्या मुलीचा हा स्केलेटन होता, तिचा स्वप्नाशी काय संबंध होता? प्रियाच्या खुनाबद्दल पोलीस आपल्या शोधात असताना आणि आपल्याला अ‍ॅबस्काँडींग म्हणून डिक्लेअर केलेलं असतानाही, त्या मुलीच्या खुनाबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी तिने थेट पोलीस स्टेशनला येण्याइतकी रिस्क घ्यावी असं दोघींमध्ये काय रिलेशन होतं?"

कदम काहीच बोलले नाहीत. प्रियाच्या हत्येपासून आणि विशेषत: गेल्या दोन महिन्यांच्या अनुभवावरुन स्वप्ना ही काय चीज आहे आणि तिची प्रत्येक चाल किती चक्रावून टाकणारी असते याचा त्यांना पुरेपूर अनुभव आला होता. प्रत्येक वेळेस एखाद्या धूमकेतूसारखं अचानक प्रगट होत ती खून करत होती आणि हवेत विरुन गेल्यासारखी अदृष्यं होत होती. एकापाठोपाठ एक अशी पाचजणांची तिने हत्या केली होती, पण सीआयडींनी आकाशपाताळ एक करुनही तिचा ठावठिकाणा कळत नव्हता!

"स्वप्नाच्या दुसर्‍या बँक अकाऊंटबद्दल काही कळलं?"

"नाही सर...." कदम भानावर येत उत्तरले, "तुमच्या सूचनेप्रमाणे स्वप्ना देशमुख नावाच्या सगळ्या अकाऊंट्सची मी माहिती मागवून घेतली. एकूण दोनशे अठ्ठावन्न अकाऊंट्स निघाले सर! त्या प्रत्येक अकाऊंट होल्डरचे फोटोग्राफ्स आम्ही तपासले, पण त्यातला एकही फोटो आपल्याला हव्या असलेल्या स्वप्ना देशमुखशी जुळत नाही. तिने खंडाळ्याच्या रिसॉर्टमध्ये दिलेलं पॅनकार्ड आपल्या अपेक्षेप्रमाणे बोगसच निघालं सर! तो पॅन नंबर अस्तित्वातच नाही! आम्ही तिच्या मोबाईलच्या सर्विस प्रोव्हायडरला तिचा फोन सुरु होताक्षणी आपल्याला कळवण्याची सक्तं वॉर्निंग दिली आहे, पण खंडाळ्याला एकदा तिचा फोन बंद झाल्यानंतर पुन्हा एकदाही सुरु झालेला नाही."

"नॉट अ‍ॅट ऑल अनएक्सपेक्टेड! स्वप्नाचं मेन इन्टेन्शन त्या पाचही जणांना संपवणं हेच असेल तर आता पुन्हा तिचा फोन सुरु होणारही नाही! आता स्वप्नासारख्या चलाख आणि बिलंदर मुलीला तो नंबर ट्रेस करुन आपण तिच्यापर्यंत पोहोचू शकतो त्याची पूर्ण कल्पना असणार यात कोणतीच शंका नाही. त्यामुळे एवढी रिस्क ती घेणार नाही! तिला गाठण्यासाठी आपल्याला वेगळा काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे! एक काम करा, तिच्या दोन्ही अकाऊंट्समध्ये तिने कोणतंही ट्रँझॅक्शन किंवा विड्रॉवल करण्याचा प्रयत्नं केला तर ते प्रोसेस करण्यापूर्वी आपल्याला इन्फॉर्म करण्यात यावं असा तिच्या बँकेला अर्जंट अ‍ॅलर्ट पाठवा. आपल्या सगळ्या पंटर्सना पुन्हा एकदा स्ट्रिक्टली दम द्या! त्यांचे जे काही सोर्सेस असतील ते सगळे वापरायला सांगा! कितीही खर्च झाला तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत स्वप्ना आपल्या हाती लागलीच पाहिजे!"

******

मंत्रालयात परत येताना गृहमंत्री पवारांच्या चेहर्‍यावर दिलखुलास स्मित झळकत होतं!

सीआयडी ऑफीसमध्ये त्या इन्स्पे. प्रधानने ज्या परखडपणे आमदार चव्हाणांना सुनावलं होतं त्यावरुन या केसमध्ये नक्कीच काहीतरी पाणी मुरत आहे याची त्यांना कल्पना आली होती. प्रिया मल्होत्राच्या खुनात आमदार चव्हाणांचा मुलगा गुंतलेला होता हे तर त्याने उघडपणे त्यांच्याजवळ बोलून दाखवलं होतं. ज्या अर्थी सीबीआयने इन्क्वायरी केली तर चव्हाणांच्या दृष्टीने ते त्रासदायक ठरेल असं तो इतक्या ठामपणे म्हणत होता, त्या अर्थी यात चव्हाणांचे हितसंबंध गुंतलेले होते हे चाणाक्ष पवारांच्या ध्यानात आलं होतं. चव्हाणांचे दिल्लीत असणारे लागेबांधे त्यांच्या चांगल्याच परिचयाचे होते. ही केस सीबीआयकडे गेली तर हायकमांडशी असलेले संबंध वापरुन आपल्या मुलाशी संबंधीत सर्व पुरावे ते दाबून टाकतील याची पवारांना खात्री होती.

.....आणि म्हणूनच केस लवकरात लवकर निकालात काढण्याची त्यांनी रोहितला ऑर्डर दिली होती!

पवारांचा हिशोब अगदी सरळ होता. आमदार चव्हाण त्यांचे जवळचे मित्रं असले तरी राजकीय प्रतिस्पर्धी होते. उद्या वेळ पडलीच तर हायकमांडच्या दबावाखाली आपल्याला बाजूला सारुन चव्हाण गृहमंत्री आणि कदाचित मुख्यमंत्रीही होतील याची त्यांना पक्की खात्री होती. किरणचे काय धंदे चालतात याची त्यांना साधारण कल्पना होती पण आजपर्यंत तिकडे दुर्लक्षं करणं भाग पडलं होतं. या केसच्या निमित्ताने ही सगळी प्रकरणं बाहेर पडली तर ती चव्हाणांवर शेकणार हे उघड होतं. मिडीयामधल्या लोकांना मॅनेज करुन बापाच्या आमदारकीच्या पडद्याआड किरणने केलेले उद्योग वारंवार चवीने चर्चिले जातील याची तजवीज करणं सहज शक्यं होतं. आपल्या पे-रोलवर असलेल्या पत्रकारांकडून चव्हाणांविरुद्ध रान उठवता येणार होतं. इतकंच नव्हे तर चव्हाणांनी राजीनामा द्यावा म्हणून काही समाजसेवकांना उपोषणालाही बसवता आलं असतं. त्यांच्या निषेधार्ह मोर्चे काढण्यात येणार होते आणि अगदीच गरज लागली तर छोटीशी दंगल आणि थोडीफार जाळपोळही घडवून आणणं अशक्यं नव्हतं. एवढं सगळं झाल्यावर चव्हाणांना वाचवणं हायकमांडलाही शक्यं झालं नसतं! उलट हायकमांड त्यांच्यापासून हातभर अंतर राखूनच राहीली असती. चव्हाणांचं संपूर्ण खच्चीकरण करुन आपल्या मार्गातून त्यांना दूर करण्याची संधी अनायसे चालून आली होती, आणि ती दवडण्याइतके ते दूधखुळे नव्हते!

मंत्रालयात परताल्यावर खच्चून भरलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये गृहमंत्री बबनराव पवारांनी जाहीर केलं.

"मुंबई सीआयडींचा तपास योग्य रितीने सुरु आहे. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. लवकरच या प्रकरणातलं सत्यं प्रकाशात येईल याबद्दल मला कोणतीही शंका नाही. सध्यातरी केस सीबीआयकडे सोपवण्याची आवश्यकता वाटत नाही!"

******

संध्याकाळी पाचच्या सुमाराला एक हवालदार रोहितच्या केबिनमध्ये शिरला आणि त्याला सॅल्यूट ठोकून समोर उभा राहिला. त्याच्या हाता पांढर्‍या रंगाचा लहानसा बॉक्स होता.

"जयहिंद साहेब! हे कुरीयर आलं होतं तुमच्यासाठी."

"कुरीयर? माझ्यासाठी?"

रोहित चकीत झाला. हवालदाराच्या हातातलं पॅकेट त्याने काळजीपूर्वक तपासून पाहिलं. साधारण मिठाईचा मोठा बॉक्स असतो तशा प्रकारचा तो बॉक्स होता. पांढर्‍या रंगाच्या पॅकींग पेपरमध्ये तो गुंडाळलेला होता. बॉक्सवर असलेल्या स्टिकरवर त्याचं नाव आणि क्राईम ब्रँच. सीआयडी, मुंबई असा पत्ता टाईप केलेला होता. मात्रं पाठवणार्‍याचं नाव किंवा पत्ता मात्रं त्यावर दिसत नव्हता.

सावधपणे त्याने तो बॉक्स उघडला. आतमध्ये चारही बाजूंनी असलेल्या पॅडींगमध्ये एक सीडी कव्हर होतं.
Highly Confidential

क्षणभर विचार करुन त्याने आपला लॅपटॉप काढला आणि ती सीडी त्यात टाकली मात्रं,

धीरज सक्सेनाचा प्रचंड भेदरलेला चेहरा स्क्रीनवर दिसू लागला....

******

कमिशनर मेहेंदळे अत्यंत गंभीरपणे समोर बसलेल्या रोहितकडे पाहत होते.

कुरीयरने त्याच्या नावे आलेली ती सीडी पाहून तो थक्क झाला होता. आपल्याला असं काही पाहायला मिळेल याची त्याने अपेक्षाच केली नव्हती. ती सीडी पूर्णपणे पाहिल्यावर त्याने सर्वात प्रथम कमिशनरसाहेबांकडे धाव घेतली होती. त्याच्याकडून हा सगळा प्रकार कळल्यावर कमिशनर मेहेंदळेही स्तंभित झाले. त्या सीडीमधले धीरज आणि कौशल यांनी जीवाच्या भितीने दिलेला कबुलीजबाब ऐकून ते अक्षरश: आ SS वासून पाहत राहिले. सुरवातीचा धक्का ओसरल्यावर त्यांनी पुन्हा ती सीडी लक्षपूर्वक पाहिली होती. दुसर्‍या वेळेस सीडी पाहताना एक गोष्टं जाणवली होती ती म्हणजे संपूर्ण सीडीमध्ये धीरज आणि कौशल यांच्याव्यतिरिक्त कोणाचाही आवाज रेकॉर्ड झालेला नव्हता. सीडी अत्यंत कौशल्याने एडीट करण्यात आलेली होती.

"रोहित, ही सीडी कुठून आली याचा पत्ता लागला?"

"वी शुड कम टू नो सून सर! आय हॅव अ फिलींग, ही सीडी स्वप्नानेच आपल्याला पाठवली असावी. सीडीमधल्या धीरज आणि कौशलच्या स्टेटमेंट्सवरुन प्रिया आणि सुनेहाच्या खुनामध्ये त्या पाचही जणांचा हात होता हे स्पष्टच आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे प्रिया आणि सुनेहाप्रमाणे स्वप्नालाही रेप करण्यात आलं असावं आणि त्याचा सूड घेण्यासाठी म्हणून तिने एकेक करुन त्यांना संपवलं. शी इज ट्राईंग टू जस्टीफाय! अर्थात तिने स्वत:ला जस्टीफाय करण्याचा कितीही प्रयत्नं केला, तरी शी इज अ कोल्ड ब्लडेड किलर! तिला कोणतीही सिंपथी मिळावी असं मला वाटत नाही सर!"

रोहित आपल्या केबिनमध्ये परतला तोच त्याच्यापाठोपाठ कदम आत शिरले. त्यांच्याबरोबर सुमारे चाळीशीचा एक माणूस होता. तो कुरीयर कंपनीवाला असावा असा त्याने अंदाज केला.

"सर, हे रमणीकलाल मेहता. दादर वेस्ट स्टेशनला लागून असलेल्या बिल्डींगमध्ये त्यांच्या कुरीयर कंपनीचं ऑफीस आहे. आपल्याला आलेलं ते कुरीयर यांच्याच कंपनीकडून आलेलं होतं."

"आय सी! मेहता, हे कुरीयर तुमच्याकडे कोणी आणून दिलं होतं हे सांगू शकाल?"

"हो साहेब! मी बुकींग रजिस्टरच बरोबर आणलं आहे." मेहतांनी आपल्याजवळच्या पिशवीतलं रजिस्टर काढून एका विशिष्टं पानावर बोट ठेवलं. "हे पहा साहेब. काल संध्याकाळी सातच्या सुमाराला ऑफीस बंद होता होता एक मुलगी ते कुरीयर देण्यासाठी आली होती. कोणत्याही परिस्थितीत आज ते डिलीव्हर झालंच पाहिजे असा तिचा आग्रह होता. त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस देण्याचीही तिची तयारी होती. त्याप्रमाणे आम्ही तिच्याकडून अर्जंट डिलीव्हरीचे चार्जेस घेतले आणि ते पॅकेट जमा करुन घेतलं."

"काय नाव होतं त्या मुलीचं? तिचं वर्णन करु शकाल?"

"तिचं नाव सईदा होतं साहेब! सईदा खान! तिचं वर्णन मात्रं मी करु शकणार नाही कारण तिने बुरखा घातला होता! मी फक्तं तिचे डोळेच तेवढे पाहू शकलो."

रोहितने त्यांना आणखीन बरेच प्रश्नं विचारले, पण त्यांच्याकडून त्याव्यतिरिक्तं फारशी काही माहिती हाती लागली नाही. मेहता निघून गेले.

"ती सईदा म्हणजे स्वप्नाच असणार सर!"

"ऑफकोर्स कदम! नो डाऊट, ती स्वप्नाच होती. ज्या अर्थी तिने आपल्याला हे कुरीयर पाठवलं आहे, त्या अर्थी ती मुंबईतच आहे, अ‍ॅन्ड नॉट ओन्ली दॅट, बुरख्याआड चेहरा लपवून ती बिनधास्तपणे वावरते आहे!"

"सर, मुंबईत बुरखा घालणार्‍या हजारो बायका आहेत, त्यातला आपल्याला हवा असलेला बुरखा नेमका कोणता हे कसं ओळखणार? प्रत्येक बाईला बुरखा वर करायला तर आपण सांगू शकत नाही, त्यातून भलतीच भानगड निर्माण होईल आणि ते आपल्या अंगाशी येईल! एक कळत नाही सर, ती सीडी आपल्याला पाठवण्यामागे तिचा कोणता हेतू असावा?"

"व्हेरी सिंपल कदम, जस्टीफिकेशन फॉर द मर्डर्स! बट अ‍ॅट द मोमेंट, सीडी हा एवढा इश्यू नाही. द फॅक्ट इज स्वप्ना इज स्टिल इन टाऊन! आता प्रश्न असा आहे, अत्यंत सिस्टीमॅटीकली वन बाय वन तिने त्या पाचही जणांना संपवलेलं आहे. हर जॉब इज डन! सो व्हॉट इज होल्डींग हर बॅक नाऊ? आपण दिवसरात्रं तिचा शोध घेत असताना आणि सगळ्या न्यूज चॅनल्सवरुन फरार खुनी म्हणून तिचा चेहरा दाखवला जात असतानाही मुंबईत थांबावं असं कोणतं कारण आहे?"

"कदाचित पैसे सर?" कदमनी शंका बोलून दाखवली, "स्वप्नाच्या दोन्ही अकाऊंट्समध्ये मिळून आठ लाख रुपये आहेत. त्यातल्या एका पैशालाही तिने अद्याप हात लावलेला नाही. ती यापुढे मुंबईत राहू शकत नाही हे उघड आहे. खरंतर उभ्या भारतात ती कुठेही गेली तरी तिच्या डोक्यावर कायम टांगती तलवार राहणारच आहे. अशा परिस्थितीत परदेशी पलायन करणं हा त्यातल्या त्यात सुरक्षित मार्ग आहे. तसं असेल तर इथल्या अकाऊंटला असलेले पैसे ती सोडणार नाही सर!"

"यू हॅव अ पॉईंट!" रोहित विचार करत म्हणाला, "एक काम करा कदम, तिच्या ट्रँझॅक्शन्सबद्दल अ‍ॅलर्ट करण्यासाठी आपण बँकेला कळवलं आहे. हॅव हर डेबिट कार्ड ब्लॉक्ड अ‍ॅज वेल! आपल्याकडे तशी कोर्ट ऑर्डर ऑलरेडी आहे, पण आतापर्यंत मी ती मुद्दामच वापरली नव्हती, कारण ती ते अकाऊंट्स ऑपरेट करेल अशी मला अपेक्षा होती. अ‍ॅज स्मार्ट अ‍ॅज शी इज, त्या पाचहीजणांची हत्या करेपर्यंत तिने त्या अकाऊंट्सना हातच लावला नाही. इफ मनी इज द थिंग होल्डींग हर बॅक,, लेट्स मेक हर डेस्परेट! या पैशांच्या नादातच ती आपल्या हाती सापडण्याची शक्यता आहे!

******

संध्याकाळी सात वाजता.....
माहीमच्या सिटीलाईट थिएटरच्या समोरच्या बिल्डींगमध्ये असलेलं कुरीयर ऑफीस.....

"सलाम आलेकुम जनाब! हमें कुरीयर करना है! अर्जंट है! कल शामतक पहुंचना चाहीए!"

"अ‍ॅड्रेस....."

"सिनीयर इन्स्पेक्टर प्रधान, क्राईम ब्रांच - सीआयडी, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई!"

पत्ता लिहून घेणार्‍याने एकदम चमकून वर पाहिलं, पण बुरख्याआडचा तिचा चेहरा त्याला दिसू शकणार नव्हता.

"आपका नाम और आयडी?"

"सईदा खान! पॅन कार्ड है लेकीन बारीश में भीग गया तो तसवीर ठिकसे नहीं दिखती. झेरॉक्स है! चलेगी ना?"

"हां .... ठीक है! अर्जंट के ज्यादा पैसे लगेंगे, ठीक है?"

"जी ..... शुक्रीया! खुदा हाफीज!"

******

रोहित घरी पोहोचला तेव्हा त्याला प्रचंड थकवा जाणवत होता. गेले दोन दिवस त्याला कमालीचे धावपळीचे गेले होते. त्या दिवसी सापुतार्‍याहून घरी परत येण्यास त्याला पहाटेचे तीन वाजले होते. जेमतेम तीन-चार तास झोप झाल्यावर त्याने ऑफीस गाठलं होतं आणि सकाळीच एमएलए चव्हाण आणि होम मिनिस्टर पवारांना तोंड द्यावं लागलं होतं. संध्याकाळी ते कुरीयर ऑफीसमध्ये धडकलं होतं. स्वप्नाने पाठवलेली ती सीडी म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा कळस होता. खुद्दं कमिशनरसाहेबही ती सीडी पाहून हादरले होते. ती सीडी बाहेर आली तर भलताच गहजब होणार होता. आमदार चव्हाण दिल्लीतल्या आपल्या ओळखी वापरुन ही केस सीबीआयकडे देण्याच्या प्रयत्नात होते. कोणत्याही परिस्थितीत सीबीआयचा या प्रकरणात शिरकाव होण्यापूर्वी या केसचा निकाल लागणं आवश्यक आहे असं कमिशनरांनी त्याला बजावलं होतं. त्याच्या सूचनेप्रमाने कदमनी स्वप्नाच्या बँकेच्या अधिकार्‍यांना भेटून स्वप्नाच्या अकाऊंटच्या संदर्भात पोलिसांना सावध करण्यावरुन ताकीद दिली होती. परंतु कुरीयर करुन गायब झाल्यावर पुन्हा स्वप्नाची कोणतीही हालचा दिसून आली नव्हती. तिचा फोनही बंदच होता. आपण पुढे नेमकं कोणतं पाऊल उचलावं या विचारात तो गढलेला असताना त्याच्या मोबाईलच्या मेसेजचा टोन वाजला.

मेसेज पाठवणार्‍या व्यक्तीचा स्क्रीनवर उमटलेला नंबर पाहून तो उडालाच!
या महाबिलंदर पोरीने थेट आपल्याला मेसेज करावा?

Checkmate! You never had any chance. Goodbye!

रोहित क्षणभर फोनकडे पाहतच राहिला. क्षणभर त्याचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. पुन्हा - पुन्हा त्याने तो मेसेज वाचला. अवघ्या अर्ध्या मिनिटापूर्वी तो मेसेज त्याच्या इनबॉक्समध्ये धडकला होता. स्वत:ला सावरत त्याने तिचा नंबर रिडायल केला, पण तिचा फोन स्विच ऑफ झाला होता! क्षणभर विचार करुन त्याने कंट्रोल रुमचा नंबर डायल केला.

"सिनीयर इन्स्पे. रोहित प्रधान हिअर! एक मिनिटापूर्वी मला स्वप्ना देशमुखच्या नंबरवरुन एक मेसेज आलेला आहे. तिच्या मोबाईलचं लोकेशन शोधून काढा! ताबडतोब!"

कंट्रोलरुमच्या अधिकार्‍यांकडून अवघ्या मिनिटभरात तिच्या मोबाईलचं लोकेशन कळल्यावर त्याने कदमना फोन केला.

"कदम, आता दोन मिनिटांपूर्वी मला स्वप्नाचा एअरपोर्टवरुन मेसेज आला होता! तुम्ही ताबडतोब एअरपोर्टला जा! मी तासाभरात तिथे पोहोचतो आहे! हरी अप!"

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन कारच्या स्पीडनेच त्याचे विचार धावत होते.

स्वप्नाने एअरपोर्टवरुन मेसेज केला होता याचा अर्थ ती मुंबईबाहेर सटकली असणार! परंतु मुंबईबाहेर म्हणजे नेमकी कुठे? आपण तर सगळ्याच एअरपोर्टवर तिच्यासाठी अ‍ॅलर्ट पाठवलेला आहे. असं असतानाही एअरपोर्ट पोलिसांनी आपल्या अ‍ॅलर्टकडे लक्षं न देता तिला फ्लाईट बोर्ड करु दिली? भारत सोडून दुसर्‍या एखाद्या देशात पळ काढण्याचा तर तिचा इरादा नव्हता? पण इमिग्रेशन ऑफीसर्सनी तिला अडवण्याचा प्रयत्नं का केला नाही? का स्वप्ना दुसर्‍याच कोणत्या नावाने प्रवास करत होती? एअरपोर्टवरुन फ्लाईट पकडून स्वप्ना नेमकी कुठे गेली असेल?

******

रोहित आपल्या केबिनमध्ये बसून एअरपोर्टवरुन आलेली पॅसेंजर्स लिस्ट पाहत होता.

आदल्या रात्री स्वप्नाचा मेसेज आल्यावर त्याने एअरपोर्ट गाठून तिथल्या अधिकार्‍यांची भेट घेतली होती. त्याच्या विनंतीवरुन एअरपोर्टच्या अधिकार्‍यांनी त्या दिवशी रात्री आठ वाजल्यापासून ते पुढच्या चोवीस तासांतल्या सगळ्या फ्लाईट्सच्या पॅसेंजर्सची नावं तपासली होती. परंतु त्यात कुठेही स्वप्ना देशमुख हे नाव आढळून आलं नव्हतं. तिने प्रिया मल्होत्रा, सुनेहा त्रिवेदी किंवा खासकरुन सईदा खान यांच्यापैकी एखाद्या नावाने प्रवास करण्याची शक्यता गृहीत धरुन त्यांच्या नावाचा घेतलेला शोधही निष्फळ ठरला होता. मुख्यं प्रवेशद्वारावर असलेल्या दोन सेंट्रीजकडे चौकशी करण्यात काही अर्थच नव्हता, कारण दर तासाला शेकडो लोकांना पासपोर्ट आणि तिकीट पाहून आत सोडत असल्याने कोणाचा चेहरा त्यांच्या लक्षात राहील ही अपेक्षा करणंच चुकीचं होतं.

स्वप्नाचा मेसेज रात्री अकरा वाजता आलेला होता. तिने एअरपोर्टवरुन फ्लाईट पकडली असलीच, तर सिक्युरीटी क्लिअरन्स ते टेक ऑफ या दरम्यानच्या काळात तिने तो मेसेज पाठवला असणार असा त्याचा तर्क होता. त्या दृष्टीने विचार केल्यास रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान एअरपोर्टवरुन गेलेल्या प्रत्येक फ्लाईटची पॅसेजर्स लिस्ट आणि त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचं रेकॉर्डींग सीआयडी ऑफीसमध्ये पाठवण्याची त्याने एअरपोर्टच्या अधिकार्‍यांना विनंती केली होती. त्याप्रमाणे पॅसेंजर्सची लिस्ट सकाळीच आली होती, पण सीसीटीव्ही रेकॉर्डींग मिळण्यास संध्याकाळपर्यंत वेळ जाणार होता.

क्वालालंपूरला जाणार्‍या फ्लाईटच्या पॅसेंजर्सची नावं पाहून त्याच्या हाती काहीच लागलं नाही. तो पुढच्या फ्लाईटच्या पॅसेंजर्सची नावं पाहत असतानाच कदम आत शिरले.

"जयहिंद सर! आपण बोलावलं होतं ते सर्वजण आले आहेत...."

"अं.... " पॅसेंजर्स लिस्टमधून डोकं वर काढत तो म्हणाला, "सर्वजण आले? गुड! एक काम करा कदम, एकेका ग्रूपला आत पाठवा!"

कदम बाहेर पडले. दोन मिनिटांतच सुनेहाच्या कुटुंबियांसह परतले. त्याने सापुतार्‍याहून आणलेलं ते लॉकेट त्यांच्यासमोर ठेवलं.

"हे लॉकेट तुम्ही ओळखता? तुम्हाला याबद्दल काही सांगता येईल?"

त्रिवेदी पती - पत्नी आणि महेश यांनी ते लॉकेट काळजीपूर्वक पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली.

त्रिवेदींच्या नंतर मल्होत्रा परिवाराला आत बोलावण्यात आलं, पण त्यांनाही ते लॉकेट ओळखता आलं नाही. त्यांच्यानंतर प्रियाच्या मैत्रिणी रित्वी, वरदा आणि अ‍ॅना यांनाही ते लॉकेट दाखवण्यात आलं, पण त्यांनीही ते ओळखण्यात असमर्थता दर्शवली. सर्वात शेवटी स्टेशन डायरेक्टर फर्नांडीस आणि रोशनी हे दोघं आत आले. फर्नांडीसनी ते लॉकेट ओळखलं नाही, रोशनीने ते लॉकेट पाहिलं मात्रं.....

"सर! हे.... हे लॉकेट..... ओ माय गॉड...." ती इतकी उत्तेजित झाली होती की तिच्या तोंडून शब्दं फुटेना!

"येस रोशनी? हॅव यू सीन धिस लॉकेट बिफोर? कोणाचं लॉकेट आहे हे?"

तिने काही क्षण ते लॉकेट नीट निरखून पाहिलं.
रोहित आणि कदम अपेक्षेने तिच्याकडे पाहत होते....

"हे लॉकेट स्वप्नाचं आहे सर!"

******

क्रमश:
(पुढील भाग अंतिम)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

स्वप्ना आपली ओळख देत धीटपणे इथे तिथे फिरत होती त्यावरूनच वाटले होते की ती स्वप्ना नसावी. ती मरण पावली असावी आणि तिचा फोन दुसरेच कुणीतरी वापरत असावे. बॅंक खात्याला हातही न लागल्यामुळे हा संशय पक्का झाला होता. पण आता वाटतेय की तिने आपल्या मृत्यूचा आभास निर्माण केलेलासुद्धा असू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढचा भाग कुठाय ?????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“Do not judge, or you too will be judged" Bible
Matthew 7:1-6 New International Version