क्रिकेट फिल्डींगचा सम्राट हरपला - कॉलीन ब्लँड

१९६५ सालचा जुलै महिना....

पीटर व्हॅन डर मर्व्हचा दक्षिण आफ्रीकन संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर होता. लॉर्ड्सच्या पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून बॅटींग करणार्‍या दक्षिण आफ्रीकेची इनिंग्ज २८० रन्सवर आटपली होती. जेफ्री बॉयकॉट आणि रॉन बार्बर यांनी ८२ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर ते दोघं आणि जॉन एड्रीच आऊट झाल्यामुळे इंग्लंडची ८८ / ३ अशी अवस्था झाली. केन बॅरींग्टनने कॉलीन कौड्रीबरोबर ५६ रन्सची जोडल्या, पण रिचर्ड डम्ब्रीलने कौड्रीचा ऑफस्टंप उखडल्यावर त्याने कॅप्टन माईक स्मिथबरोबर ९६ रन्सची पार्टनरशीप करत इंग्लंडला सुस्थितीत आणलं. स्मिथ शांत डोक्याने स्ट्राईक रोटेट करत होता तर बॅरींग्टनची फटकेबाजी सुरु होती! आता बॅरींग्टन आणि फटकेबाजी हा प्रचंड विरोधाभास असला तरी कमालीचा चिकट आणि कंटाळवाणा म्हणून ओळखला जाणारा बॅरींग्टन सुरवातीच्या काळात आक्रमक बॅट्समन होता. नंतरही मधूनच एखाद्या इनिंग्जमध्ये बॉलर्सवर तुटून पडण्याची त्याला सवय होती. ११ बाऊंड्री आणि ऑफस्पिनर हॅरी ब्रोमफिल्डला तडकावलेल्या सिक्सच्या जोरावर तो ९१ पर्यंत पोहोचला होता. ही पार्टनरशीप इंग्लंडला लीड मिळवून देणार अशी चिन्हं दिसत असतानाच....

एडी बार्लोचा बॉल बॅरींग्टनने स्क्वेअरलेगला खेळला आणि एक रनसाठी कॉल दिला....
स्मिथने त्याच्या कॉलला प्रतिसाद दिला. मिडविकेटचा फिल्डर बॉल फिल्ड करेपर्यंत एक रन आरामात पूर्ण होणार होती....
पण.... तो फिल्डर कोण आहे हे पाहण्याची त्याने तसदी घेतली नव्हती!
तुफान वेगाने धावत आलेल्या त्या फिल्डरने बॉलवर झडप घातली.....
एखाद्या नृत्यांगनेने घ्यावी तशी एका पायावर तोल सावरत त्याने स्वत:भोवती गिरकी घेतली....
दुसर्‍याच क्षणाला सुसाटत गेलेला त्याचा थ्रो नॉन-स्ट्राईकर एन्डच्या स्टंप्सवर आदळला!
बॅरींग्टन आ SS वासून पाहत राहीला!
धोक्याची पुसटशी जाणिव होण्यापूर्वीच तो रन आऊट झाला होता!

लॉर्ड्सवर हजर असलेले यच्चयावत प्रेक्षकांनी उस्फूर्तपणे उठून उभं राहत टाळ्यांचा गजर केला!
बॅरींग्टनच्या इनिंग्जपेक्षाही ही त्या फिल्डरला दिलेली दाद होती!

स्मिथ आऊट झाल्यावर फ्रेड टिटमस आणि विकेटकीपर जिम पार्क्स यांनी इंग्लंडचा स्कोर २९४ पर्यंत नेल्यावर पुन्हा एकदा त्याच दक्षिण आफ्रीकन फिल्डरने मिडविकेटलाच आपली करामत दाखवली....

यावेळेस त्याच्या अचूक थ्रोमुळे बळी गेला तो जिम पार्क्सचा!
खरंतर तो फिल्डर किती धोकादायक आहे याची कल्पना आलेला पार्क्स स्टंप्स कव्हर होतील अशा रेषेत धावला होता....
पण थ्रो इतका अचूक होता की रन घेणार्‍या पार्क्सपासून अवघ्या दोन इंचावरुन बॉल स्टंप्सवर गेला!

खरंतर इंग्लिश खेळाडूंना, खासकरुन स्मिथ आणि कौड्री यांना तो किती धोकादायक आहे याचा पुरेपूर अनुभव होता. आदल्या वर्षीच स्मिथचा एमसीसी संघ दक्षिण आफ्रीकेत गेलेला असताना र्‍होडेशियात सॅलिस्बरीच्या (आता झिंबाब्वेतलं हरारे) मैदानात त्यानेच कव्हर्समधून केलेल्या अचूक थ्रो मुळे माईक ब्रिअर्ली आणि टेड डेक्स्टर यांना पॅव्हेलियनची वाट धरावी लागली होती. नेहमी कव्हर्समध्ये असलेल्या या प्राण्याने आज मिडविकेटला इंग्लिश बॅट्समनना आपला 'हात' दाखवला होता!

क्रिकेटच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ फिल्डर कोणता असा प्रश्नं कोणालाही विचारला तर नव्याण्णव टक्के लोकांचं उत्तर असेल ते म्हणजे जाँटी र्‍होड्स! काहीजण र्‍होड्सच्या बरोबरीनेच हर्शेल गिब्ज, पॉल कॉलिंगवूड, रिकी पाँटींग, युवराज सिंग इतकंच काय रविंद्र जाडेजाचंही नाव घेतील. आधीच्या पिढीतले लोक एकनाथ सोळकर, क्लाईव्ह लॉईड, व्हिव्हीयन रिचर्ड्स इतकंच काय रोहन कन्हाय आणि गॅरी सोबर्सपर्यंतही जातील. पण स्वत: सोबर्स आणि दस्तुरखुद्दं जाँटी र्‍होड्स मात्रं एकमताने एकाच माणसाचं नाव घेतील....

कॉलीन ब्लँड!

Bland

र्‍होडेशियातल्या सॅलिसबरीला (आता झिंबाब्वेतलं हरारे) जन्मलेला ब्लँड दक्षिण आफ्रीकेसाठी २१ टेस्ट्स खेळला. ३९ इनिंग्जमध्ये ३ सेंचुरी ठोकत ४९ च्या अ‍ॅव्हरेजने त्याने १६६९ रन्स काढल्या. पण जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आजही कोलिन ब्लँड म्हटलं की आठवते ती त्याची फिल्डींग! एखाद्या इनिंग्जमध्ये ब्लँडने बॅटींगमध्ये काही केलं नाही तरी केवळ फिल्डींगच्या जोरावर दक्षिण आफ्रीकन संघासाठी तो किमान २० ते २५ रन्स वाचवत असे! ब्लँड आणि टोनी ग्रेग हे तसे समकालिन होते म्हणून नाहीतर जाँटी र्‍होड्सबद्दल - Two thirds of land is covered by water, rest one third by Jonty Rhodes - अशी अफाट कॉमेंट करणार्‍या टोनीने ब्लँड्बद्दल कदाचित - Colin Bland catches a bullet and throws it back like handgranade to blast the stumps - असे उद्गार काढले असते! सर्वात महत्वाचं म्हणजे ब्लँड केवळ असामान्यं फिल्डरच नव्हता तर, कितीही दूर अंतरावरुन अचूक थ्रो करुन स्टंप्सचा अचूक वेध घेण्याबद्दल त्याची ख्याती होती!

१९६५ च्या त्या इंग्लंड दौर्‍यावर पोलॉक बंधू, एडी बार्लो, अली बाकर, पीटर वॅन डर मर्व, डेनिस लिंडसे असे एकापेक्षा एक सरस खेळाडू असतानाही खर्‍या अर्थाने दौरा गाजवला तो ब्लँडच्या फिल्डींगने!

अली बाकर म्हणतो,
"It was a case of come and watch Graeme Pollock bat and Colin field – he was amazing."

प्रसिद्ध क्रिकेट कॉमेंटेटर ब्रायन जॉन्स्टन म्हणतो,
"For the first time I heard people saying that they must go to a match especially to watch a fielder."

खुद्दं बॅरींग्टन लॉर्ड्सवरच्या त्या रनआऊटबद्दल नंतर त्याबद्दल बोलताना म्हणाला,
“I knew Colin was great, but he’s greater than I thought!”

ब्लँडच्या या करामतीची झलक एकदा केंटरबरीच्या प्रेक्षकांना पाहण्यास मिळाली. दक्षिण आफ्रीकन संघाची केंट विरुद्धची मॅच विकेटमध्ये झिरपलेल्या पाण्यामुळे मॅच वेळेवर सुरु होणं अशक्यं झालं होतं. स्टेडीयममध्ये आलेले प्रेक्षक चांगलेच वैतागले होते. केंटचा कॅप्टन कॉलिन कौड्रीने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणि वेळ घालवण्यासाठी म्हणून ब्लँडला फिल्डींगचं प्रात्यक्षिक दाखवण्याची विनंती केली! ब्लँडने त्याला आनंदाने होकार दिला.

बाऊंड्रीपासून जवळ एका ठिकाणी स्टंप्स रोवण्यात आले. वेगवेगळ्या स्पीडने आणि अँगलने कौड्रीने ब्लँडच्या दिशेने बॉल ड्राईव्ह केला. सुमारे वीस ते तीस यार्डांवरुन पंधरा पैकी बारा वेळा त्याने स्टंप्सचा अचूक वेध घेतला!

अर्थात बारा वेळा अचूक स्टंप्सचा वेध घेतल्याच्या आनंदापेक्षा तीन वेळा चुकलेल्या थ्रोबद्दल त्याला हळहळ वाटत होती!
“They spoilt me by giving me three stumps to aim at. I always practiced with one.”

द गार्डीयनचा लेखक फ्रँक किटींग म्हणतो,
"Without a shadow of doubt that while Jonty Rhodes might have matched his compatriot as a ball predator, Colin Bland's throwing was far more killingly accurate."

अर्थात ब्लँडच्या या अचूकतेमागे त्याने घेतलेली अपार मेहनत होती. सॅलीस्बरी (हरारे) स्पोर्ट्स क्लबच्या ग्राऊंडवर हॉकीच्या गोलपोस्टमध्ये एक स्टंप ठोकून पंचवीस - तीस यार्डांवरुन त्याचा अचूक वेध घेण्याची तो तासन् तास प्रॅक्टीस करत असे!

ब्लँडचा दक्षिण आफ्रीकन संघातला सहकारी असलेला अली बाकर म्हणतो,
“Fielding for us used to just consist of 15 minutes of catching and throwing, but Colin would spend hours and hours practicing by himself, chasing a ball, picking it up, turning and throwing at the stumps. We’d watch him and would think he was from a different planet."

खुद्दं ब्लँडचं मत मात्रं अगदीच साधं होतं.
"The more I practise, the luckier I get."

अली बाकरलाही र्‍होड्स आणि ब्लँड यांची तुलना करायचा मोह आवरला नाही.
"Jonty used to huff and puff, almost bulldozer-like in the field. Colin was very different, he was incredibly graceful, sheer poetry in motion. He was magic."

ब्लँडच्या करामतीचा झटका १९६१ - ६२ च्या मोसमात दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर आलेल्या न्यूझीलंडच्या संघालाही बसला. जोहान्सबर्गच्या टेस्टमध्ये किवी कॅटन जॉन रीडने अचूक टायमिंग साधत फ्रंटफूटवर येत खणखणीत कव्हर ड्राईव्ह मारला. बॉल बाऊंड्रीच्या दिशेने जात असतानाच कव्हर्समध्ये असलेल्या ब्लँडने उजव्या बाजूला डाईव्ह मारली आणि जमिनीला समांतर असताना दोन्ही हातांत पूर्ण ताकदीने तडकावलेला बॉल अगदी आरामात पकडला!

रिचर्ड व्हिटींग्टन म्हणतो,
"It looked a certain four – but, diving as if to clutch a low-flying trapeze, Bland held, with both hands to his right side, a cover-drive that blazed from Reid’s bat and should, in all justice, have been a boundary.”

जॉन रीडचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना!
भानावर आल्यावर पॅव्हेलीयनमध्ये परतण्यापूर्वी त्याने ब्लँडच्या पाठीवर थाप मारत त्याचं अभिनंदन केलं!

अशा या खेळाडूचं इंटरनॅशनल करीअर फिल्डींग करताना झालेल्या दुखापतीमुळे संपुष्टात यावं यासारखा दुर्दैवं ते कोणतं?

१९६६ - ६७ ऑस्ट्रेलियन संघाच्या दक्षिण आफ्रीका दौर्‍यात जोहान्सबर्गच्या पहिल्याच टेस्टमध्ये शेवटच्या इनिंग्जमध्ये बाऊंड्री अडवण्याच्या प्रयत्नात तो बाऊंड्रीबाहेर असलेल्या अ‍ॅडव्हर्टायझिंग बोर्डवर जोराने आदळला. त्याच्या डाव्या गुडघ्याला इतका जोराचा मार बसला होता की त्याला स्ट्रेचरवरुन ड्रेसिंग रुममध्ये आणि तिथून थेट हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. या दुखापतीतून सावरण्यास त्याला सुमारे चार महिने लागले, पण त्यानंतर पुन्हा त्याची दक्षिण आफ्रीकन संघात निवडच झाली नाही. आणखीन दोन वर्षांनी १९७० मध्ये 'बेसिल डॉलिव्हीएरा अफेअर' नंतर वर्णद्वेषी धोरणांमुळे दक्षिण आफ्रीकेवर इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यास बंदीच आली!

ब्लँड पुढे १९७४ पर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत होता. निवृत्तीनंतर अनेक वर्ष वेगवेगळ्या संघांचा कोच म्हणूनही त्याने महत्वाची भूमिका बजावली. इंग्लंडमध्ये सेटल झाल्यावर बीबीसीसाठी कॉमेंट्री आणि फिल्डींग कोच म्हणून कित्येक वर्ष तो कार्यरत होता! अगदी अलीकडे २००४ मध्ये एमसीसीने इंग्लंड संघासाठी फिल्डींग कन्सल्टंट म्हणून ६५ व्या वर्षी ब्लँडची नेमणूक केली होती!

ब्लँडचा सहकारी आणि १९६५ च्या दौर्‍यातला कॅप्टन असलेल पीटर वॅन डर मर्व १९९९ मध्ये बोलताना म्हणाला,
“He revolutionized the attitude to fielding, and set a standard not yet equalled.”

१९९१-९२ च्या वर्ल्डकपमध्ये जाँटी र्‍होड्सचा उदय झाल्यानंतरही वॅन डर मर्वने कॉलीन ब्लँड सर्वोत्कृष्ट फिल्डर होता असं म्हणावं यातच सगळं आलं!

खुद्दं जाँटी र्‍होड्स म्हणतो,
"I have made a conscious effort to reach the standards set by Colin Bland all my career, but I could never reach it! He was in his own league! Over the years, I been able to make few good grabs, but the best I had seen on field on video was Colin Bland's mind boggling catch of the New Zealander John Reid in Johannesburg on 1961-62 tour. That was out of this world!"

तीन दिवसांपूर्वी - १४ एप्रिलला कॉलिन ब्लँड कॅन्सरशी सुरु असलेल्या झुंजीत अखेर पराभूत झाला, पण क्रिकेटरसिकांच्या मनात मात्रं जगाने पाहिलेला सर्वोत्कृष्टं फिल्डर म्हणून तो अजरामर आहे.

ब्लँडला श्रद्धांजली वाहताना जाँटी र्‍होड्सने त्याचा उल्लेख Father of fielding अशा अत्यंत समर्पक शब्दांत केला!
फिल्डींगच्या बादशहाने फिल्डींगच्या सम्राटाला दिलेली ही अचूक आदरांजली!
कॉलीन ब्लँडच्या अचूक थ्रो सारखीच!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ठीक पण १९६४-६५ ला टेड डेक्स्टर बरोबर माईक ब्रेअरली ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय. टेड डेक्स्टर आणि माईक ब्रिअर्लीच होते.
तो टेस्टचा दौरा नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0