दुबई : अरेबियन मयसभा !

पहाटे चार वाजून वीस मिनिटांच्या दुबई फ्लाईटसाठी साडेबारा वाजता चेक इन करून आम्ही टुरीस्ट मंडळी झोपेच्या खोबरी वड्या करत बसलो.आमच्या गेटटुगेदर ग्रुपचा हौशी ' फोटो उन्माद' कयामत तक पोहोचला होता.त्यामुळे डुलकी घेत असल्याचं भासवताना खरच छोटीशी डुलकी लागून घात झाला. सेल्फी ब्रूम स्टिकी चेटकिणी, निष्पाप डुलकीचा फोटो काढून खुनशी खिदळू लागल्या. त्यामुळे मोठ्या गृपाप्रती आधीच असलेलं वैराग्य अतोनात वाढीस लागल.त्या काळ्या पहाटे विमानात बसल्यावर शरीर इतक आक्रसून, आंबून गेलं की खुर्च्यांच्या पॅसेजमध्ये देह ठेवायची उर्मी दाटून आली. थकव्याने आपोआप झोप लागली इतक्यात विमान उतरायाची त्वरा झाली.सोपस्कार आटोपून शारजा विमानतळाबाहेर आलो. थंडगार बोचरी हवा लपेटून घेत चहा पिताना अकस्मात जीवन सुंदर वाटू लागल.

गोल घुमट असलेला शारजा विमानतळ टुमदार,स्वच्छ आहे.कचरा पेटीच्या बाजूला अरबाचे गोंडस चित्र काढून त्याखाली कचरा फेकण्यासंदर्भात खतरनाक सुचना लिहिल्या होत्या. आमच्या ग्रुपला एका वोल्वो बस मध्ये बसवून थेट शारजा नॅशनल पार्क मध्ये नेऊन मराठमोळे चना पोहे ,बटाटेवडा आणि फळांच कस्टर्ड खायला घालताच लोकं गहिवरू लागले.आमचे दुबईला हॉटेल चेकइन दुपारी ३ वाजता असल्याने आमची दुबई सेन्ट्रल मॉलमध्ये टाईमपास शोभायात्रा काढण्यात आली.शॉपोहोलीक्स मंडळी तरंगत खरेदीला जुंपली.आमच्यासारखी तुरळक लोकं वस्तूंच्या किंमती दिरहाममधून रुपयातंरीत करत कालहरण करू लागली. सकाळचा ब्रेकफास्ट जिरलेला नसताना एका पाकिस्तानी हॉटेलात भरगच्च लंच खिलवून ३ वाजता हॉटेलात चेकइनसाठी नेले. कंटाळ्याच्या पलीकडे गेल्यावर आणि कयामत से पहले एकदाची रूम देण्यात आली. लगेच सात वाजता दुबई सिटी मॉल,फाऊंटन शो आणि बुर्ज खलिफा या जगातल्या सगळ्यात उंच इमारतीच्या १२५ व्या मजल्यावर आमची गृपीय वरात निघाली.या नेत्रदीपक मयसभेतून गुंग होऊन बाहेर पडलो .डब्बा हलवून त्यात धान्य अॅडजस्ट करतात तसं पुन्हा आमचं पोटाचं भरलेलं डेरकं ओसंडून भरण्यात आलं आणि सगळी भरलेली डेरकी आयोजकांनी थेट हॉटेलात नेऊन जमा केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता अबुधाबी शहराच्या सफरीला निघायचं असल्यानं उगीचच पुरेशी विश्रांती मिळण्याचं संकट वाटू लागलं. कार्यक्रम इतके भरगच्च हवे की श्वास घ्यायला वेळ मिळू नये आणि तळहातावर ऑक्सिजन सिलिंडर बांधूनच टुरिझम करावं !

वास्तुशिल्पाचा अनुपम,भव्य आणि अलौकिक नमुना असलेली अबुधाबीची, शेख झायेद ग्रँड मशीद पाहून मंत्रमुग्ध झालो.विविध देशातल्या स्त्रिया, कोको कलरचे, भाड्याने मिळणारे अबाया घालून मशीद बघत होत्या .त्यांचे हौसेने सेल्फी काढणे मशिदी सारखेच मनोरम दृश्य होते.विलोभनीय संधीप्राकाशात सुरील्या अजानचे दैवी,आर्त सूर अनामिक शांती देऊ लागले.

दुबई टूरवर आमच्या दिमतीला उत्साही पाकिस्तानी गाईड आणि ड्रायव्हर होते. अली हा आमचा तरुण गाईड म्हणत होता ' तुम्हाला काही फरक वाटतो काय हिंदुस्तान,पाकिस्तान असा? आपण सगळे एक आहोत. ही दुष्मनी राजकारणाचा अविभाज्य घटक आहे ,आपण सामान्य लोकं एकमेकांचा आदर करतो'. एक याकुब नावाचा गाईड मात्र उपहासाने चौफेर फटकेबाजी करून एकेका टुरिस्ट पामराला घायाळ करत, इतरांना क्रूर आनंदाचा लाभ करून देत होता.परंतु लवकरच सगळ्यांना तो नकोसा झाला शिवाय शुक्रवारचा नमाज वेळेवर न मिळाल्याने त्याची चिडचिड होऊ लागली.
शुक्रवार असल्याने दुबईचा गोल्ड सुक हा सोन्याचा बाजार बंद होता त्यामुळे सोन्याच्या व्हल्गर डिस्प्लेला आम्ही मुकलो.दर्दी सोनेरी टोळीने मात्र नंतर वेळात वेळ काढून मीना बाजार लुटून आणलाच.

दुबईचे प्रशस्त ,सुंदर रस्ते ,स्वच्छता आणि नियमांचे काटेकोर पालन उल्लेखनीय आहेत.उम्म नाहाद , उम्म हुर्राह अशी रस्त्यांची लाडिक नावं शिखा(शेखचे स्त्रीलिंगी रूप) ने शेख सोबत केलेल्या मधुर संभाषणात " उम्म मी नाही ज्जा " असे लटिके बोलत ठेवली की काय अशी शंका आली. राजे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कडक सुरक्षाव्यवस्था असलेले अनेक उत्कृष्ट राजवाडे आहेत.
दुबईला अगदी टोकाच्या उंच ,पिळदार वगैरे गगनचुंबी इमारती असल्या तरीही अतिशय सुबक,सुंदर व साध्या, वाळूच्या रंगाच्या, बैठ्या सरकारी इमारतीच मन मोहून घेतात.
अरबी समुद्रात पामच्या झाडाच्या आकाराचा भराव घालून तिथे पाम जुमेरा ही अति श्रीमंत वसाहत आहे. शाहरुख खान हा दुबईचा ब्रँड अँबेसेडर असल्याने त्याला तिथे फुकट बंगला दिलेला आहे हे ऐकून हिंदी सिनेमाच्या लोकप्रियतेचा पुनःप्रत्यय आला.जगातल्या नामांकित कलावंतांची,अति श्रीमंत लोकांची इथे घरे आहेत.

डेझर्ट सफारीला लँड क्रुझरने निघालो तेंव्हा मोहसीन या आमच्या ड्रायव्हरने एका यादगार सफारीचा वादा केला होता.पहिल्याच स्टॉपवर त्याने वादा तोडून आमच्या ग्रुपमधल्या घाईगडबडवाल्या मंडळींना नेले. तरीही सफारी यादगार झाली. लँड क्रुझरमधून हवा कमी करून, वाळूच्या उंच सखल भागातून जोशात गाडी हाणून रोलर कोस्टर राईड सारखा थरारक अनुभव देतात. गाडी कलंडून आपल्याला वालुकासमाधी मिळते की काय अशी धास्ती वाटू लागली. नवीन ड्रायव्हर अनुभवी नव्हता. त्याने वाळूच्या टेकडीवर आम्हाला सोडल्यानंतर गाडी खड्ड्यातच पार्क केली. इथे गाडीत पुन्हा हवा भरून ,टेकडी उतरून कँम्पवर जायचे होते.त्याने आम्हाला गाडीत बसवले त्यामुळे गाडी वाळूच्या कुशीत खोल शिरू लागली.गाडी सुरु होताच मागची चाके वाळूत दिसेनाशी होऊन वाळूचा उपसा करू लागली. आम्ही सात लोकं वाळूच्या कुशीतून जन्मून बाहेर आलो आणि धक्का देऊ लागलो तरी गाडी तसूभरही हलेना.वाळवंटात दूरदूर कोणीही दिसेना.आईशप्पथ नॉर्थ स्टारसुद्धा दिसेनासा झाला.बहुदा अंधार झाल्यावर दिसेल असा क्षीण आशावाद एकाला झाला. ड्रायव्हरचा वॉकीटॉकी आणि मोबाईलसुद्धा चालेना. बऱ्याच वेळाने एक ससाणा सोबत घेऊन लोकांचे फोटो काढणारा स्कूटरस्वार अरब दिसला. त्याची स्कूटर घेऊन ड्रायव्हर गेला आणि त्याने दुसरी एक गाडी शोधून आणली आणि मग आमची फसलेली गाडी बाहेर ओढून काढण्यात यश आले.एका कँम्पवर नृत्य, आगीचे खेळ आणि जगप्रसिद्ध , दिलखेचक बेली नृत्य असा बहारदार कार्यक्रम झाला.या सफारीत नव्वद टक्के लोकं भारतीय होते. सगळ्या ग्रुपची नावं घेऊन तिथे स्वागत करण्यात आले त्यात एक अग्रवाल समाजाचाही ग्रुप होता. त्यांच्या खाण्यापिण्याची वेगळी रांग होती.व्हीआयपींची वेगळी व्यवस्था होती.
दुबईचे मिरॅकल गार्डन हा वाळवंटात अतिशय कष्टाने फुलवलेल्या, लक्षावधी, व्हायब्रंट फुलांचा उत्सवी चमत्कार आहे.अवघ्या आयुष्यात येवढी फुले एकाच जागी पुन्हा बघायला मिळतील अशी शक्यता नाही.
दुबईचा डॉल्फिन शो हा टुरिस्ट आकर्षण कार्यक्रम अफाट लोकप्रिय आहे.गोंडस,खट्याळ आणि बुद्धिमान डॉल्फिनच्या कसरतीनी सगळ्यांना संमोहित केले.

विशाल परिसरात सजवलेल्या ग्लोबल व्हिलेज मध्ये विविध देशांच्या स्टॉलवर त्यांचे खाद्यपदार्थ , पारंपारिक वस्तू आणि दागिने यांची विक्री होते.तिथेच बाजूला मंचावर त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात.दुबईच्या शेखच्या आईचे निधन झाल्याने त्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाहीत.
पायाचे तुकडे पडेपर्यंत देशोदेशींचे रंगारंग स्टॉल बघितले आणि धाडसाने रगाग ब्रेड नावाचा अमिराती पदार्थ खाला.चवीला कुरकुरीत ,साधासा छान पदार्थ होता.तव्यावर पिठाचे पातळ डोसे घालून त्यावर अंड आणि चीज घालून देतात.आयोजकीय दक्षतेने सगळीकडे भारतीय पदार्थ असल्याने धाडस करायची संधी नव्हतीच.

शेवटच्या दिवशी संयुक्त अमिरातीच्या जबल जैस या सर्वात उंच पर्वतावर गेलो.रस्ता बंद असल्याने शिखरावर जाता आले नाही.रस्ता बंद केलेल्या शिखराजवळच्या ठिकाणी ओमान देशाची बॉर्डर होती.तिथल्या गार्डशी गप्पा मारताना आमच्यातला एकजण सिगारेट ओढू लागला तेंव्हा गार्डने सांगितले की सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाले असूनही मी तुम्हाला वॉर्निंग देऊन सोडतो आहे.तिथे पर्वतरांगा आणि दगडांच्या नैसर्गिक रचना मोहक आहेत पण क्वचितच दिसणारी खुरटी झुडपं वगळता हिरवाईचा अंश दिसत नाही.

दुबई हे कठोर शासनामुळे सुरक्षित शहर आहे.चोरीमारी होत नाही. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सोन्याच्या पत्र्याने मढवलेल्या सुशोभित वस्तूंनासुद्धा कोणी हात लावत नाही.एका ठिकाणी सोन्याने मढवलेले सात घोडे दिमाखात उभे आहेत.सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. रेल्वे रूळ ओलांडणे,शिवी देणे यासाठी जबर दंड होतो.अनेक बांधकामे सुरु असूनही कचरा आणि घाण दिसली नाही.आमच्या प्रवासात एफएम रेडिओवर २/३ चॅनेलवर हिंदी फिल्मी गाण्यांचा रतीब सुरु होता.फक्त सतरा टक्के स्थानिक लोकसंख्या असलेल्या या देशात पाण्यासकट सगळंच महाग आहे.
ड्युटी फ्री देश असल्याने दुबई हा शॉपिंग फ्रिक ,श्रीमंत लोकांचा स्वर्ग आहे.
( माहेर मासिकात पूर्वप्रकाशित)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चतुराईनं, तुम्ही तिथे जाऊन काय चरलंत, किती सोनं खरेदी केलंत, दुबईच्या दिऱ्हमचा रूपयांतला दर वगैरे तपशील तुम्ही टाळले आहेत. त्याबद्दल मराठी मध्यमवर्ग तुम्हाला माफ करणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येवढा लेख वाचला ममव ने तरी मी आजन्म उपकृत होईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक लेख. देशी प्रवास कंपन्या, परदेश बघायला आलेली मंडळीं फक्त जेवायला (ते सुद्धा फक्त भारतात मिळणारे जेवण) आणि अचरटासारखी खरेदी करण्यासाठीच टूरवर येतात हे ग्रुहीत धरून त्यांच्या प्रवासाचा कसा विचका करतात याचे उत्तम वर्णन. लेखकाला लेख विनोदी शैलीत लिहायचा की साधे प्रवास वर्णन लिहायचे हे शेवटपर्यंत ठरवता न आल्याचे मात्र जाणवत राहते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरबांकडे गेल्यावर भारतीय जेवण कशाला घ्यायचे ? त्यापेक्षा उंट पार्टी करायची!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

स्नानासाठी शॉवरमधून उंटीणीचं दुध मिळालं असतं तर क्लिओपात्रा सारखं राजस स्नान तरी झालं असतं Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एके काळी आपला दाऊद त्यांचा ब्रँड अँबॅसॅडर होता आणि त्याच्या पार्टीत नाचलेल्या सिनेतारकांच्या बातम्या देऊन देऊन प्रसारमाध्यमं थकत. मग दाऊद 'त्यांचा' झाला. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शाहरुख पण फिल्मी डॉन आहेच Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाहरुख पण फिल्मी डॉन आहेच

तो बिचारा भातुकलीच्या खेळामधला; खरा डॉन बोले तो सल्लू भाय. सब गुनाह माफ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विनोदी लेखनाचाच उद्देश आहे.
बाकी भारतातले टुअरवाले कायकाय दाखवतात,पोटबर खाऊ घालतात,कमिशन न मिळाणारी स्थळं स्पष्टीकरणांसह कशी गाळतात याचा अनुभव असणाय्रांना काही सांगण्याची गरज नाही.
पोटभर खायला घालतात हे काय कमी आहे?

टुअरसारखाच फास्ट लेख फार आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद ! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका लाडक्या जावयाने सांगितलं होतं ममवं सासुसासय्रांना की अमुक टुअर कंपनीच्या अमुक टुअरने बुकिंग करून या. मी भेटतो वाटेत, माझ्याकडे एक दिवस काढा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केवढे ते ममत्व , ममवं सासुसासऱ्यांबद्दल!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

डब्बा हलवून त्यात धान्य अॅडजस्ट करतात तसं पुन्हा आमचं पोटाचं भरलेलं डेरकं ओसंडून भरण्यात आलं आणि सगळी भरलेली डेरकी आयोजकांनी थेट हॉटेलात नेऊन जमा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता अबुधाबी शहराच्या सफरीला निघायचं असल्यानं उगीचच पुरेशी विश्रांती मिळण्याचं संकट वाटू लागलं. कार्यक्रम इतके भरगच्च हवे की श्वास घ्यायला वेळ मिळू नये आणि तळहातावर ऑक्सिजन सिलिंडर बांधूनच टुरिझम करावं !

खी: खी: खी:, बेश्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक नंबर लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं