आता परमेश्वराचे काय करायचे? - 4

(स्टीव्हन वाइनबर्ग याच्या What about God? या लेखाचा स्वैर अनुवाद)

मागील भागावरून (3) पुढे

वुल्फगॅन्ग पॉली (1900-1958, स्विट्झर्लॅन्ड येथे जन्मलेला अमेरिकन सैद्धान्तिक भौतिकी शास्त्रज्ञ, 1945 मधील भौतिकीचे नोबेल पारितोषिक विजेता) याला एका अतिशय चुकीच्या पद्धतीने विचार केलेल्या भौतिकी प्रबंधाबद्दल त्याचे काय मत आहे? अशी विचारणा केली गेली होती. यावर त्याने दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. तो म्हणतो की या प्रबंधाला तो चूक आहे असे म्हणणे हे सुद्धा फार सौम्य ठरेल, तो मुळात प्रबंधच नाही. धार्मिक कट्टरवाद्यांची मते मला कितीही चुकीची वाटत असली तरी त्यांच्याबद्दल मी एवढेच म्हणू शकतो की ज्या तत्वांवर त्यांचा विश्वास आहे ती मला चुकीची वाटतात परंतु त्यांचा कोणत्या तरी तत्वांवर विश्वास आहे हे ते विसरलेले नाहीत. मात्र धार्मिक उदारमतवाद्यांबद्दल मला पॉलीच्या उत्तराची पुनरावृत्ती करावीशी वाटते की त्यांच्या विचारांना चूक म्हणणे शक्य नाही कारण मुळात त्यांच्या विचारांना विचार म्हणणे सुद्धा कठीण आहे.

काही लोक असे मानतात की कोणत्याही धर्मामधील वेदान्त (थिऑलॉजी) हा महत्वाचा नसून तो धर्म आपले आयुष्य कंठण्यासाठी आपल्याला धीर किंवा बळ देतो ही गोष्ट सर्वात महत्वाची असते. हा विचार तर मला विलक्षणच वाटतो! म्हणजे आपण त्या धर्मात प्रतिपादन केलेल्या, परमेश्वराचे अस्तित्व, त्याचे स्वरूप, पाप आणि पुण्याच्या कल्पना, स्वर्ग आणि नरक यांच्याबद्दलच्या कल्पना आणि परमेश्वराची कृपा यासारख्या गोष्टी महत्वाच्या न समजून त्याकडे दुर्लक्ष करावयाचे आणि फक्त तो धर्म आपल्याला जीवन जगण्यासाठी धीर देतो की नाही एवढेच बघायचे!. माझ्या मताने ह्या अशा लोकांना प्रत्यक्षात त्यांच्या धर्मातील वेदान्त, खरे तर पटत नाही! पण ते उघड रितीने मान्य करण्याचे धैर्य किंवा साहस त्यांच्या अंगी नसते. असे जरी असले तरी ही गोष्ट मान्य करावीच लागेल की ऐतिहासिक कालखंडात आणि आज सुद्धा जगाच्या काही भागातील लोकांचा त्यांच्या धर्मातील वेदान्तावर पूर्ण विश्वास होता किंवा आहे आणि त्यांच्यासाठी तो विश्वास अत्यंत महत्वाचा होता किंवा अजूनही आहे.

उदारमतवादी दाखवत असलेल्या बौद्धिक धुसरतेमुळे आपल्याला फार तर त्यांच्याशी चर्चा करणे सोडून द्यावे एवढेच वाटेल पण समाजाचे खरे नुकसान होते ते धार्मिक कट्टरवादी किंवा सनातनी यांच्या दुराग्रहाने. मी हे मान्य करीन की या धार्मिक दुराग्रहाचे, नैतिकतेबद्दलचे आपले विचार आणि कलाविष्कार यांमधील विकसनाला पुष्कळ सहाय्य झाले आहे. परंतु धार्मिक कट्टरवादामुळे एका बाजूला या सहाय्यासारख्या चांगल्या गोष्टी झाल्या असल्या तरी दुसर्‍या बाजूला जिहाद सारख्या सैनिकी आक्रमणांमधून व्यक्त झालेली क्रूरता, अन्वेषण आणि वंशविच्छेद या सारख्या, कोणीही तिरस्कारच करेल अशा, गोष्टी निर्माण होत गेल्या किंवा आहेत किंवा होत आहेत. मी असे म्हणेन की या दोन्ही बाजूंमध्ये तुलना करण्याची हा लेख ही जागा नाही पण अशी तुलना करण्याची वेळ आलीच तर मला या मुद्द्यांवर भर द्यावासा वाटेल की जिहादसारखी सैनिकी आक्रमणे किंवा परधर्मियांचा छ्ळ किंवा त्यांच्यावर केलेली दडपशाही या गोष्टी सत्‌धर्माच्या मार्गातील फक्त विकृति आहेत अशी समजूत करून घेऊन त्यावर भागेल असे समजणे, हे माझ्या विचाराने, धर्माविषयी सखोल आदर पण रोचकतेचा अभाव दर्शविणारा जो एक व्यापक दृष्टीकोन पसरलेला दिसतो त्याचेच ते एक बाह्य लक्षण आहे. जगातील अनेक प्रमुख धर्म अशी शिकवण देतात की परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग, भक्तांनी त्या धर्माच्या विशिष्ट पंथाचा स्वीकार करून त्या पंथाने सांगितलेल्या मार्गानेच भक्ती केली तरच प्राप्त होतो. त्यामुळे साहजिकच अशा शिकवणींवर आंधळेपणाने विश्वास ठेवणारे काही लोक हे समजू लागतात की सहनशीलता, अनुकंपा किंवा प्रयोजन यासारख्या सद्‌गुणांपेक्षा धार्मिक शिकवण ही अतुलनीय महत्वाची आहे.

दुर्दैवाने सध्या एशिया आणि आफ्रिका खंडांच्यात अजाण पण उत्साही धर्मवेड्यांची दले मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्याचे दिसून येते आहे. त्यांच्या प्रभावामुळे पश्चिमेकडील निधर्मी देशांत सुद्धा, सहनशीलता, प्रयोजन यासारखे सद्‌गुण झाकोळलेले गेलेले वाटू लागले आहेत. ट्रेवॉर-रोपर (1914-2003, ब्रिटन व नाझी जर्मनी यांचा इतिहास लिहिणारा एक ब्रिटिश इतिहासकार) लिहितो की सतराव्या आणि अठराव्या शतकात युरोपमध्ये सर्वसामान्यांनी शास्त्रीय दृष्टीकोन सर्वव्यापक रितीने अंगिकारल्यामुळे अखेरीस, काही दुर्भागी स्त्रियांना चेटकिणी समजून त्यांना जिवंत जाळण्याची अत्यंत क्रूर आणि अनिष्ट प्रथा बंद पडली होती. ट्रेवॉर-रोपरचा मुद्दा पुढे नेत मी अशी आशा करतो की सध्याच्या काळात सुद्धा शास्त्रीय दृष्टीकोनाचा व्यापक स्वीकार आपल्याला पुन्हा एकदा अशाच एका धर्मवेड्या जगापासून एका सुजाण जगाकडे घेऊन जाईल. शास्त्रीय ज्ञान हे असे घडण्यासाठी सर्वात योग्य हत्यार आहे असे मला वाटण्याचे मुख्य कारण शास्त्रीय ज्ञानातील निश्चितता नसून त्यातील अनिश्चितता हे आहे असे मला वाटते. अलीकडे आपण नेहमी हे बघतो की प्रयोगशाळेत प्रयोग करणारे शास्त्रज्ञ, ते ज्या शास्त्रीय गोष्टी किंवा सिद्धांतावर काम करत असतात त्याबद्दलची त्यांची मते वारंवार बदलताना दिसतात. ही गोष्ट डोळ्यासमोर घडत असताना, मानवी अनुभवाच्या पलीकडे असणार्‍या गोष्टी, फक्त धर्मग्रंथांमध्ये लिहिल्या आहेत किंवा धार्मिक परंपरा म्हणून सांगितल्या आहेत म्हणून त्या गांभीर्याने घेणे कसे शक्य आहे?

अर्थात हे नाकारणे शक्य नाही की शत्रूला ठार किंवा नष्ट करणे सोपे आणि सहज शक्य होईल अशी जास्त जास्त परिणामकारक शस्त्रास्त्रे बनवणे हे आपल्याला शास्त्रीय प्रगतीमुळेच साध्य झाले आहे. परंतु या बाबतीत मी एवढेच म्हणेन की शास्त्रीय प्रगती काही आपल्याला शत्रूला ठार मारण्याची प्रेरणा देत नाही. भूतकाळात निर्माण झालेल्या अशा प्रकारच्या भयावह परिस्थितीसाठी जेंव्हा शास्त्रीय प्रगतीला जबाबदार धरले जाते तेंव्हा मी म्हणू शकतो की शास्त्रीय प्रगती याला जबाबदार नसून, नाझी जर्मनी मधील तथाकथित वंशवाद आणि निर्भेळ आर्यवंशाचे वेड या सारख्या शास्त्रीय विकृती, याच्या मागे होत्या. कार्ल पॉपर (1902-1994, एक ब्रिटिश प्राध्यापक व तत्वज्ञानी) याबाबतीत म्हणतो. “मध्ययुगीन कालातील ख्रिश्चन राज्यांनी धर्मयुद्ध या नावाने केलेल्या आक्रमणांची किंवा त्यांनी इतर गैरख्रिश्चन राज्यांबरोबर दाखवलेल्या वैरभावाची संपूर्ण जबाबदारी या राज्यांच्या बुद्धीवादहीन किंवा अतर्कसंगत वागणूकीवरच टाकावी लागेल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. मला अशा कोणत्याही युद्धाची माहिती नाही की जे शास्त्रीय लक्ष साध्य करण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रेरित केले होते”.

मला असे वाटते की कोणताही शास्त्रज्ञ त्याच्या संशोधनात ज्या पद्धतीने (अंतर्ज्ञानाने असेल किंवा तर्कशुद्ध विचाराने असेल) आपल्या निष्कर्षांना पोहोचतो तीच पद्धत तेंव्हा त्याने कां वापरली असावी असा प्रश्न कोणी विचारला तर त्या शास्त्रज्ञाची बाजू, कोठल्याही तर्कसंगत युक्तिवादाने मांडणे शक्य होणार नाही. डेव्हिड ह्यूम (1711-1776, एक स्कॉटिश तत्वज्ञानी, इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ आणि निबंधकार) याला दोन शतकांपूर्वीच हे लक्षात आले होते की कोणालाही ज्यावेळी शास्त्रीय संशोधनामधील यशप्राप्तीचे गतानुभव लक्षात घेण्यासाठी सांगितले जाते तेंव्हा त्या गतकालातील संशोधनात, निष्कर्षाला पोहोचण्यासाठी वापरलेल्या पद्धतीचे समर्थन केलेले असते आणि हे समर्थन करताना ती पद्धत बरोबरच आहे असे गृहितही धरलेले असते. यावरून असे म्हणता येते की तर्कसंगत विचार करणे पूर्णपणे नाकारून, कोणताही तर्कशुद्ध युक्तिवाद अयोग्य असल्याचे सहज सिद्ध करता येणे शक्य आहे. म्हणूनच सृष्टीच्या नियमांमध्ये आपल्याला हवा असलेला आध्यात्मिक आधार गवसला नाही तर तो आपल्याला कां मिळत नाहिये? असा प्रश्न न विचारता तो शोधण्यासाठी दुसर्‍या कोणत्या तरी आध्यात्मिक गुरूकडे धावत सुटणे किंवा धर्मबदलच करणे असे घडताना दिसते. मला हे सर्व चुकीचे वाटते.

परमेश्वरावर श्रद्धा असणे किंवा नसणे हे संपूर्णपणे त्या व्यक्तीच्या हातात असते. मला असे नेहमी वाटते की मी जर चिनी सम्राटाचा वंशज असतो तर मी जास्त सुखी झालो असतो आणि मी रीतिभाती देखिल जास्त चांगल्या संभाळू शकलो असतो. परंतु कितीही प्रयत्न केला तरी मला जसे माझ्या हृदयाचे ठोके थांबवणे शक्य नाही तसाच कितीही प्रयत्न केला तरी मी चिनी सम्राटाचा वंशज असण्यावर माझा विश्वास बसणार नाही. असे असले तरी काही व्यक्ती आपल्या श्रद्धेवर काही प्रमाणात नियंत्रण करू शकतात आणि ज्या गोष्टींनी त्यांच्या मनाला आधार वाटतो किंवा आराम वाटतो अशाच गोष्टींवर फक्त त्यांचा विश्वास बसतो. विश्वासावर नियंत्रण कसे करता येणे शक्य आहे याचे सर्वात रोचक उदाहरण मला जॉर्ज ऑरवेल याच्या 1984 या कादंबरीत मिळाले आहे. या कादंबरीचा नायक विन्स्टन स्मिथ याने आपल्या रोजनिशीत अशी नोंद केलेली असते की “दोन अधिक दोन चार होतात हे सांगता येणे म्हणजेच खरे स्वातंत्र्य!” नायकाच्या वर्तनाची चौकशी करणारा अधिकारी ओ’ब्रायन स्मिथचे मतपरिवर्तन करण्याचे आव्हान स्वीकारतो. स्मिथचा शारिरिक छळ सुरू झाल्याबरोबर स्मिथ दोन अधिक दोन बरोबर पाच होतात हे मान्य करण्यास लगेच तयार होतो. परंतु ओ’ब्रायनच्या दृष्टीने हे पुरेसे नसते. स्मिथच्या शारिरिक छळाचे प्रमाण इतके वाढवले जाते की शेवटी त्यातून सुटण्यासाठी स्मिथ स्वतःच्या मनावर, काही क्षणांसाठी का होईना! नियंत्रण मिळवून, दोन अधिक दोन बरोबर पाचच होतात हे मनाला समजवण्यात यशस्वी होतो. ओ’ब्रायनचे समाधान झाल्याने स्मिथचा शारिरिक छळ थांबतो. बरोबर याच पद्धतीने स्वतःच्या आणि स्वतःच्या जिवलगांच्या मृत्यूच्या नुसत्या कल्पनेतून सुटका करून घेऊन मनाला आराम, मिळावा यासाठी आपण स्वर्ग, पुण्य या सारख्या कल्पनांवर श्रद्धा ठेवण्यास तयार होतो. जर आपण आपल्या श्रद्धांवर अशा पद्धतीचे नियंत्रण करू शकत असलो तर ते कां करू नये? असे मला वाटते.

नैतिक बळ मिळावे म्हणून आपल्या श्रद्धांमध्ये थोडाफार फेरबदल करून जर आपल्या मनाला समाधान मिळणार असेल तर अमुक किंवा तमुक शास्त्रीय किंवा तर्कशुद्ध कारणास्तव असे करणे योग्य ठरणार नाही, असे म्हणता येईल असे कोणतेही कारण मला तरी दिसत नाही. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीने, आपल्याला पैशांची नितांत गरज असल्यामुळे आपल्याला लॉटरी मिळणारच आहे असे ठाम ठरवूनच टाकले असले. काही लोक त्या व्यक्तीला थोड्या काळासाठी जे समाधान मिळेल त्यासाठी तिचा जरूर हेवा करतील परंतु बहुसंख्य लोकांना या व्यक्तीने आपले प्रौढत्व व तर्कसंगत विचारबुद्धी यांचा त्याग केला नाहीना! अशी शंका येईल. ज्या पद्धतीने आपण बालपण ओलांडून पौढत्वाकडे वाटचाल करत असताना लॉटरी लागण्यासारख्या मनोकामनांचे प्रलोभन टाळण्यास शिकतो त्याच पद्धतीने मानवजातीने आपण समोर उलगडणार्‍या विश्वाच्या महाविशाल नाट्यात, मानवजात कोणतीही विशेष भूमिका साकार करीत नाहीये हे समजून घेणे आवश्यक आहे.

असे जरी असले तरी मला एखाद्या क्षणी सुद्धा असे वाटत नाही की मृत्यूची भीती वाटणे यासारख्या सामान्य मानवी भावनांना धर्माची शिकवण जसा बांध घालू शकते किंवा सांत्वन करू शकते तसे करणे कोणत्याही शास्त्रीय ज्ञानाला कदापिही शक्य होईल. माझ्या मताने, मानवासमोर असणार्‍या या अस्तित्वसंबंधी आव्हानावर सर्वात उत्कृष्ट भाष्य सातव्या शतकातील इंग्लिश संत ‘बीड’ याने लिहिलेल्या चर्चच्या इंग्लंड मधील इतिहासात केलेले आहे. मध्ययुगीन उत्तर इंग्लंडमधील एका राज्याचा राजा एडविन याने इ.स. 627 मध्ये राज्याचा धर्म कोणता असावा यासाठी एक परिषद आयोजित केली होती. या परिषदेत राजाच्या एका प्रमुख सरदाराने केलेले भाषण ‘बीड’ खालील प्रमाणे उद्धृत करतो.

“हे महाराज! मानवाच्या पृथ्वीतलावरील आयुष्याची आपल्याला अज्ञात असणार्‍या कालाशी जेंव्हा आपण तुलना करतो तेंव्हा मानवाचे आयुष्य हे, तुम्ही अणि तुमचे इतर मानकरी हिवाळ्यातील एखाद्या दिवशी भोजनालयात भोजनाला बसलेले असताना, एका चिमणीने भोजनालयाच्या टोकाच्या एका खिडकीतून आत येऊन भोजनालयाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या खिडकीतून बाहेर उड्डाण करावे तसे आहे असे मला वाटते. भोजनालयात उबदार वातावरण असले तरी त्याच्या दोन्ही टोकांना हिमवर्षाव किंवा पर्जन्यवृष्टि यामुळे अत्यंत शीत वातावरण आहे. ही चिमणी हे भोजनालय एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत अतिशय वेगाने पार करते. भोजनालयात असताना ही चिमणी बाहेरच्या हिमवर्षावापासून सुरक्षित असली काही क्षणांनंतर ती परत ज्या हिमवर्षावामधून आत आली त्याच हिमवर्षावात लुप्त होणार आहे. या चिमणीप्रमाणेच मानव पृथ्वीतलावर काही काल अवतरत असला तरी त्या अवताराच्या आधी त्याचे काय चालले होते व या अवतारानंतर त्याचे काय होणार आहे याबद्दल आपण संपूर्ण अज्ञानात आहोत”.

भोजनालयाच्या बाहेर आपल्यासाठी काहीतरी आहे, या बीड आणि एडविन यांच्या समजुतीवर विश्वास टाकण्याचा मोह कोणालाही अनावर होणे साहजिकच आहे. परंतु हा मोह टाळण्याने आपल्या मनाला स्वतःबद्दल जो आदर प्राप्त होणार आहे तो, मनाला बांध घालू शकणार्‍या किंवा मनाचे सांत्वन करू शकणार्‍या धर्माच्या शिकवणीपुढे नगण्य जरी असला तरी स्वतःच्याच मनाबद्दल स्वतःला आदर वाटण्याने मिळणारे समाधान सुद्धा अगदीच कमी दर्जाचे आहे असे मुळीच नाही.

समाप्त

27 मार्च 2018

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अपत्याचे संगोपन करताना अपत्याला निरिश्वरवादी विचार द्यावेत की ईश्वरवादी विचार द्यावेत की याबद्दल काहिही बोलू नये ?

कोणतेही विचार अपत्यावर इम्पोझ करणे चूक असेल तर निरीश्वरवाद (किंवा ईश्वरवाद सुद्धा) शिकवणे, नकळत बीजारोपण करणे, Nudge करणे हे सुद्धा चूकच नैका ?
.
अपत्य जर निरिश्वरवादी घडलं तर ते भजन, प्रार्थना यासारख्या संगीतप्रकारातील (तसेच शास्त्रोक्त मधल्यासुद्धा) भक्तीरसाच्या आनंदाला मुकेल असं पण वाटतं. आफ्टरऑल जे अस्तित्वातच नाही त्याची कसली आलिये भक्ती ? व त्यातून कोणता भक्तीरस उत्पन्न होणार ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अपत्य जर निरिश्वरवादी घडलं तर ते भजन, प्रार्थना यासारख्या संगीतप्रकारातील (तसेच शास्त्रोक्त मधल्यासुद्धा) भक्तीरसाच्या आनंदाला मुकेल असं पण वाटतं.

मला असे अजिबात वाटत नाही. मुलांना संगीताची आवड असेल तर त्यांंना सर्व प्रकारचे संगीत आवडेलच. अगदी भजन सुद्धा. त्या साठी त्यांना दैववादी बनवण्याची गरज आहे असे वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्तित्वाच्या लढ्यासाठी मेंदुत तदानुषंदगीक बदल होत असतात. त्याप्रमाणे तो वागतो.बदलतो.आपण शिक्के हे फक्त सोयीसाठी मारतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/