मिझोरमच्या ट्रेकमधले अनुभव

मिझोरमच्या ट्रेकमधले अनुभव

कार्तिक शुद्ध एकादशी .
मिझोरममधील लुआंग-मुआल नामक लहानशा गावात संध्याकाळी ट्रेकच्या बेसकॅम्प मध्ये अचानक दिवे गेले. दुपारी साडेचार वाजताच सूर्यास्त झाला आणि थोड्या वेळातच आकाशात नक्षत्र चमकू लागली. कॅम्पवरून खाली अंधारात बुडालेला गाव पाहून मी आणि संदीप नाईटवॉकला निघालो . वळणावळणांनी चाचपडत उतरत असता मधेच समोर गावातल्या एका छोट्या चौकातून खाली उतरत जाणारे , एखाद्या कादंबरीत शोभून दिसेल असं रम्य वळण आलं. उजव्या हाताला रस्त्याच्या बाजूला एक छोटे झोपडीवजा दुकान , नजरेसमोर दूरवर अंधुक दिसणारे उंच पर्वत , खाली दरीत पसरलेलं दाट धुकं , डाव्या बाजूच्या डोंगरावर सहस्त्र दिव्यांनी चमकणारं राजधानीच ‘ऐझ्वाल’ शहर आणि डोक्यावर नुकताच उगवलेला एकादशीचा चंद्र ! स्तब्ध – निःशब्द गावातून माणसांची अगदी तुरळक ये जा चालू होती. आम्ही दोघ तिथेच एका दगडी कट्ट्यावर बसलो. समोरच झोपडीजवळ शेकोटी पेटलेली होती. हवेत मंद गारवा आणि निवळत चाललेलं वातावरण ... शांतपणे सगळी वेळ कशी जुळून आल्यासारखी वाटत होती.

बोलता बोलता आम्ही दोघ , आमची कामं, रोजच धकाधकीचं आयुष्य इ. सोडून अकल्पितपणे अश्या उपऱ्या , रम्य जागी पोहचल्याच नवल करू लागलो. आपण कोण , इथेच आणि आत्ताच या जागी काय करत आहोत आणि आपण इथेच का आहोत ; अशी हुरहूर लावणारी उत्कट ओढ मला वाटत होती. थोड्याच दिवसांपूर्वी वाचलेला काम्युचा अस्तित्ववादाचा लेख आठवला .संदीप म्हणाला ,‘’उपनिषदांत वाचलेल्या प्रमाणे , जड द्रव्य कधीही नष्ट होत नाही . त्यांचे रुपांतर मात्र कायम होत राहते. आपण आतासुद्धा त्या बदलत राहणाऱ्या शक्तीला साक्ष आहोत आणि त्याच रूपांतराचा भागही आहोत. वैश्विक शक्ती स्तब्धतेतून स्फोट पावते व विविध रूपांचा अविष्कार घडवत परत स्तब्धतेकडे जाणारा प्रवास करत राहते.’’ . ज्या जड मूलद्रव्यांपासून आजूबाजूचा सुंदर परिसर बनलेला आहे , त्याच मूलद्रव्यांच्या सरमिसळ आविष्काराचा आपला जडदेहसुद्धा एक भाग आहे , ही जाणीव मनातून पटत होती. आणि शरीर हे जसे जड द्रव्य आहे तसेच इच्छा , भावना , विकार व विचारही जड द्रव्यच आहेत. मला ही भावना जबरदस्त भारावून गेली की स्वतःत मानवी चैतन्य असल्यामुळे , त्या प्रवासाचा केवळ एक भाग असून आपण इतर अचेतन अविष्कारांकडे पाहून नवल ,दुःख वा आनंद करत आहोत. जे पिंडी ते ब्रम्हांडी याची खोल आणि शारीर जाणीव माझी आजूबाजूच्या अंतराळात , विश्वाच्या पसाऱ्यात पाउल टाकायची भीती कमी करून गेली , भोवतालच्या सृष्टी-सौंदर्याशी वेगळ्या पातळीवर बांधून गेली .

द्वादशी
दुसऱ्या दिवशी ट्रेक करत रानातून जात असता वाटेत लहानशी नदी लागली. छोटासा लाकडी पूल ओलांडून पलीकडच्या काठावरील झोपडीवजा रेस्टॉरंटमध्ये सगळ्यांनी चहा –नाश्ता करून घेतला. फावल्या वेळात मी नदीच्या पात्राजवळ जाऊन बसलो आणि दगडावर बसल्या बसल्या पाण्याचा खळाळणारा आवाज ऐकताना परत भोवतालच्या रम्य वातावरणात हरवल्यासारखा झालो . पात्रभर पसरलेले आणि प्रवाहांनी गुळगुळीत झालेले प्रचंड खडक , दोन्ही बाजूना हिरवीगार घनदाट झाडी , स्वच्छ नितळ वाहणारं पाणी , निरभ्र निळभोर आभाळ , वर सौम्य हिवाळी सूर्यप्रकाश आणि निबिड अरण्यातील स्तब्ध शांतता .

काल रात्रीच्या संभाषणाचा धागा पकडून मनात विचार आला की, ही सर्व जड पंचतत्वाची निसर्गातील विराट रूपं .. शहरातील कोंदट वातावरणात कधीही या सर्वांचा असा विलक्षण आणि भव्य अनुभव येतंच नाही . इथे या मोकळ्या हवेत , खुल्या वातावरणात मनसुद्धा जास्त मोकळं आणि संवेदनाक्षम झालाय की काय ! लहानसहान , एरवी लक्ष न जाणाऱ्या गोष्टींमुळेसुद्धा आत्ता मनात सूक्ष्म परिणाम होतोय . त्या सर्व मूळ तत्वांच्या स्वतःमध्ये होणाऱ्या अव्याहत प्रवासाची शारीरिक अनुभूती आल्याचा क्षणभर भास झाला . निसर्गांशी आतून अद्वैत साधल्याचा अदभूत अनुभव आला. जे इंद्रियगम्य जग बाहेर आहे त्याचाच अंश आपल्या शरीरात असल्याचा आनंद , अभिमान व कृतज्ञता ; अशाच सुंदर ठिकाणी जाणवण्याची शक्यता आहे.

केळी,बांबू –सागवानाच्या घनदाट जंगलातून वाट काढत आम्ही पहिल्या कॅम्पच्या मुक्कामी पोहचलो . रानातील खोल , निबिड जागी एखाद्या बशीप्रमाणे वाटणाऱ्या मोकळ्या खडकाळ ठिकाणी तंबू ठोकले होते. तीनही दिशांना डोगरांवर उंच वाढत गेलेली झाडी आणि चौथ्या दिशेला कोरड्या पडलेल्या दगडी डोहाप्रमाणे खोल जागा व त्यातून वाहणारा झरा होता. परत दुपारी साडेचारलाच सूर्यास्त झाला . हळूहळू थंडी वाढत गेली . तंबूच्या समोर मोकळ्या जागेत शेकोटी पेटली . मंद आगीच्या उजेडात रात्रीचा गप्पा-गाणी कार्यक्रम चालू झाला . थोड्या वेळात डोंगरावर क्षितिजापाशी चंद्र उगवला आणि इतर ताऱ्यांच तेज मंदावल . त्या अनोळखी-गूढ ठिकाणी , मंद गार वाऱ्यात , चंद्राप्रकाशाने विलक्षण चमकून उठणाऱ्या सळसळत्या केळीच्या पानांत , दाटून आलेल्या काळोखात ; अज्ञाताच्या जाणीवेने माझी भारल्यासारखी अवस्था झाली. शेकोटीच्या जादूमय प्रकाशात सर्व व्यक्तींच्या पाठमोऱ्या आकृत्या कडेने उजळून निघाल्या होत्या. पृथ्वीच्या आदिम काळी , आदिवासी मानवाच्या टोळीत, इतर जगाशी काही नाते नसताना , त्या एकाकी जागेशी कधीतरी जुनी ओळख असल्यासारखी वाटत होती.

त्रयोदशी
लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे ‘गुहा’ म्हणालं ,की काहीतरी अर्धगोलाकार , उंच डोंगर फोडून केलेल्या बोगद्याप्रमाणे वाटणारी , राहण्यालायक प्रचंड जागा ; अशी मी स्वतःची कल्पना करून घेतली होती . मात्र ऐल्वांग गावाजवळ असलेल्या गुहा नामक डोंगरातील नैसर्गिक विवराने किंवा फटीने म्हणता येईल, माझ्या पूर्वकल्पनांना धक्कादायक सुरुंगच लावला. आतमध्ये दाही दिशांनी वेड्यावाकड्या आकारात वर-खाली आलेले डोंगराचे खडक होते. खरं म्हणजे , एखाद्या भूकंपाने डोंगर विभागून पडलेली मोठी चीरच होती ती ! जेमतेम श्वास घेता येईल इतकीच हवा , स्वतःची बोटं दिसणार नाहीत असा दाट अंधार , कुंद दर्प , अंगभर लागणारा चिखल , वरून ठिबकणारे पाणी आणि कुठतरी एखादं पाउल टाकायला चुकल तर वीस फूट खोल पडण्याची भीती ! असा अनुभव ना कधी पूर्वी कल्पित केलेला ना कधी भविष्यात परत येण्याची शक्यता . बाहेरचं सगळं जग , दैनंदिन व्यवहार , आयुष्य – इगो सर्व काही विसरून , केवळ त्या अडकलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्याची ,विविध अंगांनी केलेली धडपड ; परत एकदा जन्म पावल्याचा विलक्षण अनुभव देऊन गेली. कसलाही मानसिक निग्रह न करता , भूत आणि भविष्याच्या चिंतेला आपोआप बाजूला सारून , फक्त वर्तमानातच आणि वर्तमानासाठी जगायला लावणारी ती शारीरिक घटना होती. त्या क्षणी तिथे असणाऱ्यांची सोबत दिलासा देत होती . कणाकणांनी थोड पुढे सरकत , सरपटत, रांगत , उड्या मारत , घसरत , केवळ त्या वेळेस समोर आलेल्या विचित्र प्रश्नातून – जागेतून सुटण्याचा मार्ग शोधताना शेवटाबद्दल विचारही मनात येत नव्हता . असा केवळ शारीर संवेदना – जाणीवांनी भरलेला अनुभव , पुढील आयुष्यातील जटील मानसिक , भावनिक प्रश्नांवर मात करण्याचा मार्ग सुचवून गेला. गूढ अज्ञाताचा ,तीमिराकडून तेजाकडे नेणारा प्रवास !

रात्रीच्या मुक्कामासाठी त्या खेडेगावातच डोंगराच्या माथ्यावर तंबू ठोकले होते. जरासं खाली एका मोकळ्या मैदानाजवळच्या शाळेत मिझो मुला-मुलींची सहल राहायला आली होती. त्यातल्या काहींनी कॅम्पवर येऊन आम्हाला त्यांच्याबरोबर गप्पा मारायला शाळेत येण्याचा आग्रह केला. मैदानावर मधोमध प्रचंड शेकोटी पेटवून त्याच्या भोवती बसायला बुटके लाकडी फळकूटांचे बाक ठेवले होते. त्या सगळ्या भोवती गोल रिंगण करून शाळकरी मुलाचं नाच-गाणं रंगात आलं होतं . त्यांनी आपुलकीने केलेला आमचा स्वीकार, आमच्याबरोबर बोलून ओळख करून घेण्याची त्यांची आतुरता, त्यांच्याबरोबर मुल होऊन आम्हीसुद्धा केलेले वेडेवाकडे नाच , आमच्याकडून म्हणून घेतलेली मराठी गाणी आणि त्यावर पिटलेल्या टाळ्या , ग्रुप फोटो ; सर्व गोष्टीनी थोडा वेळ खूप निरागस , निर्हेतुक आनंद दिला. त्यांना कल्पनाही नव्हती की ते काय अनुभव आमच्या आयुष्यात भरत होते , त्यामुळे तो घेताना कसलाही अवघडलेपणा , देण्या-घेण्याची व्यवहारी जाणीव नव्हती .

दूरवर दरीपलीकडे पर्वतावर राजधानीचे शहर चमकत होते. चंद्र डोक्यावर आला . मी शेकोटीकडे पाहत , ती मिझो गाणी ऐकत बुटक्या लाकडी बाकावर बसलो होतो . त्या आपलेपणामुळे , जिव्हाळ्यामुळे घरापासून दूर असूनसुद्धा उपरेपणाची जाणीव येत नव्हती . अचानक माझ्या केसात , अगदी टाळूपर्यंत मला नवख्या – अनोख्या स्पर्शाची जाणीव झाली . अंगभर कोवळ्या चेतनेचा अतिशय रेखीव शारीर प्रवाह वाहून गेला. क्षणभर काय होतंय तेच कळाल नाही . मग लक्षात आलं की पाच –सहा वर्षांचा एक मुलगा माझ्या मागे उभा राहून नकळत , निःशब्द हलकेच त्याचा कोमल,नाजूक लहानसा हात माझ्या केसात अजाणतेपणे फिरवत होता. मी अजिबात मागे वळून त्याला बघायची वा त्याच्याशी बोलायची चूक केली नाही. मला केवळ त्याच्या स्पर्शातूनच कळत होतं की तो कसल्यातरी तंद्रीमध्ये , त्याच्याही नकळत माझ्या केसात हात फिरवत होता . मी मागे वळून पाहताच त्याला तो काय करतो आहे याचं भान येऊन त्यानं हात फिरवण थांबवलं असतं . मला कळाल की इतर ज्ञानेंद्रियांनी दिलेला अनुभव स्पर्शाच्या अनुभवामानानी किती थोटका असतो . कुठलाही स्वर , दृश्य , गंध अथवा रस , त्या स्पर्श-संवेदनेची कधीही बरोबरी करू शकत नाही . मी त्या मुलाचा चेहराही कधीच पहिला नाही , मग त्याच्याशी कुठलीही भावनिक देवाण घेवाण तर दूरच ! पण त्याच्या देण्यातील नेणीवेने मला जो गाढ ,खोल अनुभव मिळाला , तो मला माझ्या हरवलेल्या संवेदनक्षमतेचा परत प्रत्यय देऊन गेला.

चतुर्दशी
दिवसभर वाट उतरत – उतरत अधिकच गर्द , किर्र होत जाणाऱ्या अरण्यात मंद वाहणारी नदी परत वाटेत लागली. चिखल , धूळ , ऊन , पाचोळा इ , सर्वातून सात आठ तास चालून थकलेल्या , घामेजलेल्या अंगाला एकदाचा थंडगार पाण्याचा दिलासा मिळाला. सर्वांनी एकत्रच नदीच्या पात्रातील लहान डोहांत आंघोळी उरकून घेतल्या . या ठिकाणी वावरायला जास्त जागा नव्हती . नदीवरचा छोटा , कच्चा लाकडी पूल ओलांडून , चिंचोळ्या , दोन्ही बाजूला दाट झाडी असलेल्या अरुंद वाटेवरून जाऊन , सर्वांच्या साठी एकच मोठा तंबू बांधला होता . सर्वत्र ओलसर माती , संडासाची गैरसोय , जेवताना बसायला अपुरे बाक , आणि निबिड अरण्यभर उपद्रवकारक रक्त शोषणाऱ्या जळवा ;सर्व काही सहप्रवासी आणि मित्रांच्या संगतीमुळे सुसह्य आणि खरतर मजेशीर वाटत होतं. आम्ही संध्याकाळी सातलाच , हातात ताट घेऊन , बांबूच्या सुबक बाकावर जेवायला बसलो होतो. सर्वत्र बांबूची दाट बेट दाटीवाटीन उगवली होती आणि त्यातूनच दिसणाऱ्या आभाळाच्या लहानश्या तुकड्यावर चंद्रोदय झाला. रातकिड्यांच्या आवाजाशिवाय स्तब्ध शांतता होती . पूर्ण रानात ना भटकणारे प्राणी , ना पक्ष्यांचा किलबिलाट ! जंगलाच्या निबिडपणामुळे आणि वावरायाच्या जागेअभावी तिथे हरवल्या – अडकून पडल्याचा भास होत होता . रात्री तंबूत पडल्या पडल्या छतावर नजर गेली. निळसर अर्धपारदर्शक कापडातून स्वच्छ-मंद चंद्रप्रकाश झिरपत होता. आणि त्यातच बांबूच्या पानांच्या चित्र-विचित्र पण सुंदर आकाराच्या सावल्या शांतपणे वाऱ्यावर हलत होत्या , चंद्रप्रकाशात नक्षी कोरत होत्या. त्या निवळत जाणाऱ्या हवेत , उबदार पांघरुणात आणि गाढ शांततेत कधी झोप लागली कळलच नाही .

त्रिपुरारी पोर्णिमा
आदल्या रात्रीच्या तंबूतून निघून जंगलातून चालत परत मोठ्या नदीवर पोहचल्यावर सगळ्यांच्या बुटा-कपड्यांमधून जळवा निघू लागल्या. प्रवाहाच्या तीरावर थोडा वेळ दंगा उडाला . काहीजण नदीत डुंबत होते , काही जळूंच्या दंशावर उपाय करत होते, कोणी जीन्स वर करून सामान सांभाळत नदी पार करू लागले , इतर लोक फोटो काढणे , पाण्यात घसरून पडणे , कपडे वाळवणे इ करण्यात दंग झाले. गाईडने बऱ्याच वेळाने सर्वाना तिथून हाकलत चढतीच्या कष्टदायक मार्गाला लावले. वेगवेगळ्या अवघड वळणांना एकमेकांच्या आधाराने पार करत , धडपडत , काट्याकुट्यातून , पाना-फांद्यांना डोळ्यावरून दूर करत , शेवटी एका लहानशा खेड्यात उंच जागी सगळे पोहचलो . तिथेच वस्तीत मध्यभागी विस्तीर्ण मोकळी जागा होती . एका कोपऱ्यात रिकामी शाळा , भोवती बसकी बुटकी लाकडी घरं आणि खाली दूरवर पसरलेलं घनदाट रान ! मध्यभागी एका झाडाखाली जेवण उरकल आणि हापशाच थंडगार पाणी पिऊन सगळे बसलो होतो. गाईडनि गावात मिझो भाषेत काहीतरी सांगताच , सगळी लहान पोरं आपापल्या घरातील चहाचा एकेक कप घेऊन गावातील एका घरात पळाली . आम्हा १५-२० जणांना त्या घरातून चहाच आमंत्रण आलं . संपूर्ण घराला आतून सागवानी वाशा खांबांचा आधार , आतल्या –बाहेरच्या भिंती आणि फरश्यासुद्धा विणलेल्या बांबूच्या सुबक चटयानी बनवलेल्या ! छतालासुद्धा लाकडीच फळ्या , नीटनेटक घर, मोजकं जरुरीपुरत सामान , कोपऱ्यात उघडंच लहानसं स्वयपाकघर आणि चूल . पलीकडच्या दुकानात मी बिस्किटांचा पुडा घ्यायला गेलो आणि माझ्या उंचीकडे पाहत तिथे लोकांची लहानशी गर्दी जमली. माझ्या शेजारी चिकटून उभे राहून स्वतःच्या उंचीशी तुलना आणि माझ्या प्रमाणात इतरांच मोजमाप घेणं चालू झालं. अगम्य मिझो भाषेतील त्या लोकांचा किलबिलाट आणि हास्य कानाला गोड वाटत होतं. लिलिपुटमध्ये गलिव्हरला काय अनुभव आला असेल त्याची मला पुसट कल्पना आली. त्या लोकांचा पाहुणचार आटपून परत पुढचा डोंगर उतरत शेवटच्या कॅम्पवर आम्ही आलो.

रात्री मिझो स्पेशल डिश खाऊन परत शेकोटीभोवती सगळे गोळा झाले. गाणी –गप्पा ,विनोद ,चिडवाचिडवीला ऊत आला . थोड्या वेळानं त्यातून उठून मी कॅम्पच्या मागच्या उतरणीवर आलो . वर पाहिलं , तर आभाळात ढगांच्या पुंजक्यासारख्या लाटांचा जणू समुद्र ओथंबला होता . मी विस्मयाने त्या लाटांमधून प्रकटलेल्या दैदीप्यमान तेजस्वी त्रिपुरारी पौर्णिमेच्या चंद्राकडे भान हरपून पाहत राहिलो . चंद्रप्रकाशात प्रत्येक ढगाच्या लाटेची किनार उजळून निघाली होती. या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत मान गोल वळवून पहिली तरी ढगांच्या अर्धगोलाकार, एकामागून एक येणाऱ्या पुंजक्यांची रांग संपत नव्हती ; खरतर ढगांमुळे आकाशाचा एक तुकडासुद्धा कुठे दिसत नव्हता . तेवढ्यात चंद्राभोवती विलक्षण वाटणारा , गूढ असा , तपकिरी – पिवळसर प्रकाशाचा गोल पसरला . त्याच्याकडे पाहून , एखाद्या अज्ञात जगात नेणाऱ्या , नेत्रसुखद , परीकथेत असलेल्याप्रमाणे भासणाऱ्या विवरमार्गाचा भास होत होता . त्या सर्व दृश्याला वाऱ्यावर हलणाऱ्या , अंधारात काळ्याभोर दिसणाऱ्या झाडांच्या फांद्यांची चौकट परीपूर्णता आणत होती. त्या अप्रतिम निसर्गाच्या कलाकृतीला योग्य वेळेस आपण साक्ष असल्याचा मला सुखद अनुभव आला.

सर्व मिझोरमच्या ट्रेकमध्ये खूप सुंदर जागा पहिल्या , निसर्गाची विलोभनीय रूपं बघायला मिळाली. वेगळ्या वातावरणात , शहरी जगापासून दूर , चिंता विसरून , मन शांत व्हायला मदत झाली. कुठेतरी नकळत माझ्या मनात परत संवेदनाचा ओलावा पसरला . घटना केवळ घडत न राहता ;त्यांचा अनुभव तयार होण्याची प्रक्रिया होत आणि जाणवत गेली. आनंद मिळायला रोज नवीन उपाय शोधावा लागत नाही ,मनाची तरलता-संवेदनशीलता ,लवचिकता शाबूत असेल; तर आहे त्या साध्या आयुष्यातच , लहानसहान भारूड आनंदात समाधान मिळत .

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

दोनचार फोटो हवेत. ग्रुपबरोबर न जाता स्वतः (किंवा आपलेच कुटुंब) गेल्यास आणखी मजेदार अनुभव येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरेख अनुभव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उत्तम . पूर्णपणे अज्ञात प्रदेशात असताना , इतर कुठल्याही अवाजवी टिप्पणी नसलेला, अगदी बेसिक अनुभव असलेला हा लेख छान वाटलं . मस्त .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिलय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

mast lihilay

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0