बैजवार रचून ठेवलेलं दारिद्र्य

****बैजवार रचून ठेवलेलं दारिद्र्य***

फुटक्या कौलांच्या खाली झाकून ठेवलेले ते एका खोलीच पडकं घर लैच चिकाटीच होतं .

आज पडेल, उद्या पडेल म्हणत चांगलच टिकून होत.

छपराच्या भोकातून अन पडक्या भिताडाच्या कोपऱ्यातून चांगलाच थंडीचा वारा घुमायचा घरात.

पण गोधडीच्या आत ती आणि तीच पोरगं चांगलीच ऊब धरून झोपायची.

त्यांच्या पायाजवळ शेळी करढ सुद्धा त्यांना ऊब देत झोपायची.

जशी ती उठली तशी लगेच शेळी आणि करढू सुद्धा अंग झटकत उठलं.

तिने गोधडीत लपलेल्या शेळीच्या चुकार लेंड्या अंथरुणाबाहेर टाकल्या आणि पोराच्या अंगावर गोधडी टाकली ; पोरगं तसच मुरकाटून झोपलं .

तिने शेळी बाहेर बांधली आणि पटापटा दारातल्या निरगुडीच्या एका मापातल्या काड्या तोडल्या ; चांगलाच खराटा तयार केला .

ओट्याला सारवून २ महिने झाल होतं, पार पोपडं उडून खडबडीत झाला होता ओटा. चांगला जोर लावून भल्या थंडीचा ओटा निरगुडीच्या खराट्यानी खरडून काढला. सगळा धुराळाच धुराळा दारात.

दारात व्हतं-नव्हतं ते सगळं सरपण गोळा केलं आणि आंघोळीचं पाणी तापवायच्या चुली पुढं लावून ठेवलं.

तिथंच कोपर-यात तांब्याभर पाणी ओतलं आणि हातानी मातीचा चिखल केला. पाणी तापवायच्या बघुल्याला सरासरा चिखलानं रंगवून टाकलं आणि तिथंच पालथं घातलं वाळायला.

आता उजाडायला लागलं होतं. आत गेली आणि पोराला उठवलं. पोराच्या हातात घमेलं दिलं “जा, भाऊच्या गोठ्यावरनं शेण घेऊन ये, आज सारवायचय” .

पोरगं विनातक्रार झोपतच फाटक्या बनेलात थंडीचं चालत चालत भाऊच्या गोठ्याकडे गेलं.

तिनं घरातली चूल मोकळी केली, सगळा निखारा काढला आणि भांडी घासायच्या दगडा जवळ सगळी राख टाकली.

फळी वरचे दोन-तीन पिताळाचे डबे, ताटं, तांबे, पातेली, हंडा,तप्यालं, परात सगळी भांडी बाहेर आणली आणि बसली घासत त्याच राखच्या चिखलानं .
चांगली चमकून काढली भांडी. आणि तिथंच पोत्यावर सगळी पालथी घालून ठेवली.

पोरगं आलं, दारात घमेलं उलटं केलं. भरपूर शेण आणलं होत. पोरग घरात गेलं आणि अंथरून गोळा करायला लागलं. तिने लगेच घर झाडून घेतलं.

काल रानातून येताना आणलेल्या चुणकळीची माती पत्र्याच्या डब्यात टाकली, त्यात पाणी घातलं, चांगली हलवून एकजीव केली आणि भली मोठी जुनी चिंधी त्यात टाकली. पोथेरा तयार झाला होता.

चुलीला पोथेरा द्यायला लागली. पार काळी कुळकुळीत झालेली चूल पोथेरा देऊन गोरीपान केली.

पोरगं आडावर पाणी भरत होत . लागलं तस आईला पाणी आणून देत होतं .

दारातलं निम्मं शेण तीन घरात घेतलं, पोरानी बादलीत पाणी ओतलं, शेणाच्या गोळ्यावर पाणी घालून चांगलं गरगरीत केलं. तिच्या हातानी सपाट सारवायला लागली.

घर हळूहळू गुळगुळीत आणि हिरवंगार झालं. चमकायला लागलं होतं घर.

उरलेलं शेण परत गरगरीत केलं आणि सगळा ओटा सरळ केला. घरापासून ओट्यापर्यंत सगळा खड्डानी खड्डा बुजवून टाकला.

पोरानी चुलीवर पाणी तापवलं होतंच. मोरीत उभा राहून त्यानी अंघोळ करून घेतली.

त्याच्या आईच सुद्धा घर आणि ओटा सारवून झाला होता. शेळीचं पाय बगलत घेऊन तीन धार काढली आणि मग करढू प्यायला सोडून दिलं.

तीन सुद्धा आता आंघोळ करून घेतली. गोरीपान झालेल्या चुलीवर अजून ओल होतीच, तिनं मग स्टोव्ह पेटवला आणि चहा ठेवला. पोरगं भूक-भूक करतच होतं.

पाववाल्याकडून तिनं बटरं घेतली, पोरगं मरणाचं खुश झालं होतं. सांडशीत बटरं धरून फोडली आणि दोघांनी चांगला चहा बटरावर ताव मारला.

उरलेला चहा तीने फुलपात्रात ओतून घेतला आणि निवांत पीत बसली. सगळ्या घराकडं नजर फिरवत बसली. पडकं होत पण उजळून टाकलं होत.

घरात कपाट नव्हतच, सगळी कपडे समोरच्या वलणीवर लटकत होती. तिच काय मन भरलं नाही.

सकाळी घासलेली भांडी बैजवार फळीवर लावली. चिंबलेली बाजू भिताडाकडं केली.

वलणीच्या बांबू वरची सगळी फाटकी-तुटकी कपडे खाली घेतली आणि घड्या करून लावायला लागली.

स्वतः:चा रंग उडालेला परकर आणि झंपर फाटक्या साडीच्या घडीत बरोबर लपवला आणि ती साडी वलणीवर टाकली.

पोराची चड्डी, भोकं पडलेलं बनेल शाळेच्या पॅन्ट शर्ट मध्ये लपवून व्यवस्थित वलणीवर टाकलं.

नवऱ्याच्या शर्ट-पॅन्टची घडी केली अन त्याच्यावर टावेल टाकला,

शेजारी पिशव्या, लसणाच्या दोन पेंढ्या आणि दुरडी वलनीला अडकवली ..

आता सगळंच आवरून झालं होत.

पडायला लागलेल भिताड, कुरकुर आवाज करणार छप्पर. ऊन, वारा, पाणी इथून तिथून घरात सोडणारी कौलं, बळच ठोकून ठेवलेली तुळई ह्याच अजिबात तिला काहीच वाटत नव्हतं.

सारवून लख्ख झालेलं घर, गोरीपान चूल आणि वलणीवर ‘बैजवार रचून ठेवलेलं दारिद्र्य’ बघून ह्या दोघा माय-लेकाला उगाच श्रीमंत झाल्यासारखं वाटत होत.

___मनस्वी राजन

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बैजवारच झालं म्हणायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुलीला पोचारा, वलणीवरचे कपड़े, शेणाने सारवलेले घर, कौलाचे छप्पर, शेळी या सर्वांना खुप मिस करतोय. सुबत्ता आली पण मानसं खुप दूर गेलीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

सत्यमेव जयते